शब्दांचे वेध : पुष्प पस्तिसावे
आजचे शब्द : रिदम, सीझिजी, लॅन्यॅप आणि कायरीओलेक्सी
‘सीझिजी’ (syzygy) आणि ‘रिदम’ (rhythm) या दोन शब्दांत - ते इंग्रजी शब्द आहेत हे सोडून - काय साम्य आहे? त्यांचं स्पेलिंग नीट बघा. या शब्दांत तुम्हाला a, e, i, o, आणि u या पाच स्वरांपैकी एकही स्वर दिसणार नाही. सगळी व्यंजनंच आहेत. बिनास्वराचा शब्द बनू शकत नाही, या रूढ समजाला धक्का देणारे ही स्पेलिंग्ज आहेत.
खरं तर हे दिसतं तसं नाही आहे. ‘Y’ या अक्षराला इंग्रजीत अर्ध स्वर मानतात आणि म्हणून my, by, syzygy आणि rhythm यांसारख्या काही शब्दांत ‘Y’ स्वराचं काम करतो.
या लेखमालेचा उद्देश इंग्रजीसह अन्य भाषांमध्ये असलेल्या चित्रविचित्र, असाधारण अशा काही शब्दांचा परिचय करून देणं हा आहे, हे तुम्ही जाणताच. ‘Syzygy’ आणि ‘rhythm’ हे शब्द त्यांच्या वेगळ्या स्पेलिंगमुळे वैचित्र्यपूर्ण झाले आहेत.
यातला ‘rhythm’ हा शब्द आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच माहीत असतो. ‘Rhythm’ म्हणजे ताल. संगीताच्या दुनियेत तर तालाला अनन्यसाधारण महत्त्व असतंच. पण एकूणच आपल्या सर्व मानवी व्यवहारांतही ताल चुकवून चालत नाही. मात्र पाच व्यंजनं आणि एक अर्धस्वर यांनी बनलेल्या या रिदमच्या स्वतःच्या स्पेलिंगमध्ये काही ताल आहे का? ‘Orthography’ म्हणजे इंग्रजी स्पेलिंगचा अभ्यास करणारी भाषाशास्त्रीय शाखा. या शाखेचे बरेच प्रचलित संकेत मोडून हे स्पेलिंग बनलं आहे. यातलं ‘rh’ ही जोडी अनोखी आहे. मध्यभागी असलेला ‘y’ अनोखा आहे. आणि ‘thm’ अशी सलग तीन व्यंजनांची युती तर फारच अनोखी आहे. हे असं का घडलं असेल?
याचं कारण म्हणजे हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे आणि तिथे ज्या प्रकारे त्याचं स्पेलिंग केलं जातं, तीच पद्धत इंग्रजीमध्येही वापरली गेली. (का, ते विचारू नका.) ग्रीकमध्ये ῥυθμός (rhythmos) म्हणजे ‘rhythm’. ग्रीकमध्ये अनेक शब्द ‘rh’ने सुरू होतात. ‘Y’ स्वराचं काम करतं. हा शब्द पुढे जेव्हा ग्रीकमधून लॅटिनमध्ये गेला, तेव्हा शेवटच्या ‘-os’चं ‘-us’ बनलं. पण तिथून हा शब्द इंग्रजीत येताना तो ‘us’ गळून पडला आणि त्याचसोबत ‘th’ आणि ‘m’ यांच्यामध्ये असलेला स्वरही असाच गळून पडला. त्यामुळे उरलं thm. अर्थात हे एक गृहितक आहे, पण ते नाकारण्यासाठी काही सबळ कारण दिसत नाही.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा
नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -
https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१
..................................................................................................................................................................
प्राचीन ग्रीक भाषेत ‘rhéō’ या शब्दाचा अर्थ ‘I flow’ (मी वाहतो) असा होतो. थोडक्यात वाहत्या प्रवाहाशी त्याचा संबंध आहे. ताल हा झरझर वाहणाऱ्या प्रवाहासारखा गतीमान असतो. याच ‘rhéō’तून पुढे (r̥ytʰ.mós/) ‘rhythmos’ हा शब्द बनला आणि त्यातून आपला आजचा ‘rhythm’ तयार झाला. ताल हा शब्द संस्कृत आहे, पण जगातल्या बऱ्याच भाषांमध्ये ‘rhythm’शी मिळताजुळता उच्चार असलेले शब्दच ‘ताल’ या अर्थानं वापरतात. गंमत म्हणून या यादीवर एक नजर टाका – रिझुमु (जॅपनिज), रित्मा (मलय), रिदिअम (कोरियन), रितिम (तुर्की), रितम (फ्रेंच), रित्मो (इटलियन), रित्मस (हंगरियन), रित्म (रशियन), इत्यादी.
‘Rhyme’ (यमक) या शब्दाच्या स्पेलिंगशी ‘rhythm’च्या स्पेलिंगचं काही नातं असेल का? फ्रेंच लोक ‘Rhyme’चं स्पेलिंग ‘rime’ असं करतात आणि इंग्रजीतही सुरुवातीला ते तसंच केलं जात होतं. पण सोळाव्या आणि सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये मुद्रणव्यवसाय जसा भरभराटीला येऊ लागला, तसा तिथल्या (अती)हुशार मुद्रकांना चेव चढला आणि आपण काही तरी वेगळं करून दाखवतो आहोत, हे सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी बऱ्याच शब्दांच्या स्पेलिंगमध्ये बदल केले आणि ते वारंवार वापरून त्यांचं चलन वाढवलं. ‘Rime’च्या स्पेलिंगच्या बाबतीतही काही प्रिंटर म्हणजे मुद्रक लोकांनी हा प्रयोग केला, असं मानलं जातं. ते ‘rime’चं स्पेलिंग ‘rhythm’ or ‘rythme’ असं करू लागले. (ग्रीक rhythmos आणि लॅटिन rythmusपासून ‘rime’हा शब्द देखील तयार झाला आहे, हे आपल्याला ठाऊक असल्याचं त्यांना बहुधा यातून दाखवायचं होतं. (अनेक शब्दांचं मूळ स्पेलिंग या काळात बदललं गेलं. उदाहरणार्थ, receytच्या जागेवर receipt, inditeच्या जागेवर indict इत्यादी.)
अगदी प्रारंभी ‘Rhyme’चा अर्थ ‘rhythm’ किंवा ‘rime’ असा होत होता. ग्रीकमध्ये फक्त सांगीतिक ताल याच अर्थानं तो वापरला जात नसे, तर स्वरांचा उच्चार वा नाद, आघात, विराम, उच्चारणाची लांबी, आणि त्यातलं माधुर्य वाढण्यासाठी ध्वनीचं केलेलं पुनरुच्चारण (यमक), यांसारख्या अनेक बाबींचा समावेश ‘rhythm’च्या अर्थात होत असे. इंग्रजीतही हे सोळाव्या शतकापर्यंत कायम राहिलं. मग मात्र ‘rhythm’ आणि ‘rhyme’ या वेगळ्या स्पेलिंगचे दोन शब्द तयार झाले आणि त्यांचे अर्थदेखील संकुचित झाले. आपण आज याच बदललेल्या अर्थांनी हे शब्द वापरतो.
आणखी एक गंमत म्हणजे आज इंग्रजीत ‘rime’ हा शब्द फक्त भाषाशास्त्रीय अभ्यासात वापरला जातो. कोणत्याही शब्दाचे दोन भाग असतात, असं भाषाविद मानतात. पहिला भाग म्हणजे सुरुवात. याला ते ‘ऑनसेट’ (onset) असं नाव देतात. उरलेला सगळा भाग ‘राईम’ (rime) असतो. जसं ‘Greek’ या शब्दात ‘Gr’ हा ऑनसेट आहे, तर ‘eek’ हा राईम आहे. CATमध्ये C हा ऑनसेट, तर at हा राईम आहे.
थोडक्यात काय, तर ‘rhyme’ आणि ‘rhythm’ हे पूर्वी एकच देह असलेल्या मूळ ग्रीक शब्दाचे आता झालेले दोन अवतार आहेत.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘Syzygy’ हा शब्द दहा वेळा न चुकता म्हणून दाखवा बरं. जिभेला वात आणणाऱ्या अशा शब्दांना किंवा वाक्यांना ‘टंग ट्विस्टर’ म्हणतात. (सीझिजीतला ‘झि’चा उच्चार हिंदीतल्या ‘झिलमिल’मधल्या ‘झि’सारखा होत नाही.)
‘सीझिजी’ ही खगोलशास्त्रात वापरली जाणारी तांत्रिक संज्ञा आहे. मराठीत तिला ‘संमेल’ असं म्हणता येईल. सूर्य, चंद्र, आणि पृथ्वी यांसारख्या कोणतीही तीन खगोलीय एककं जेव्हा जवळपास एका सरळ रेषेत येतात, तेव्हा त्यांच्या त्या जुळणीला ‘सीझिजी’ असं म्हटलं जातं. हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेतल्या ‘σύζυγος suzugos’ या शब्दापासून तयार झाला. त्याचा अर्थ एकत्र जुंपणे 'yoked together' असा करता येईल. (दोन बैलांना जसं एका बैलगाडीला एकत्र जुंपतात, तसं.) सूर्य आणि चंद्राच्या सीझिजीमुळे समुद्राला महिन्यातून दोनदा अष्टमीची भरती येते. याला ‘नीप टाईड’ (neap tide) असं म्हणतात. तसंच दर पौर्णिमा आणि अमावस्येला समुद्राला येणारी उधाणाची भरती (spring tide)देखील या ‘सीझिजी’मुळेच येते. ‘युती’ (conjunction), ‘प्रतियुती’ (opposition), ‘पिधान’ (occultation), ‘संक्रमण’ (transit) आणि ‘ग्रहण’ (eclipse), या सगळ्या खगोलशास्त्रीय घटना सीझिजीमुळे घडून येतात. याच शब्दामुळे इंग्रजीत Syzygial, Syzygiacal आणि Syzygetic हेही शब्द तयार झालेले आहेत. सुमारे १६५० सालाच्या आसपास ‘Syzygy’ हा शब्द इंग्रजीत पहिल्यांदा वापरला गेला. तीन व्यंजनं आणि तीन अर्धस्वर वापरून तयार झालेला हा एक मजेशीर शब्द आहे.
सीझिजीची अजिजी सोडून आता तुम्हाला शेवटी आणखी एक अनोखा शब्द ‘लॅन्यॅप’ म्हणून देतो. अरे हो, पण त्यासाठी आधी त्याचा अर्थ सांगावा लागेल. ‘लॅन्यॅप’ म्हणजे आमच्या वऱ्हाडातली ‘पस्तुरी’. म्हणजे ‘एकावर एक फ्री’. म्हणजेच ‘लॅन्यॅप’.
आमच्या घरात मी जबर चहाबाज आहे. सकाळी फक्त एका छोट्या कपातल्या चहानं ज्यांचं समाधान होतं, त्यांना मी खूप हसतो. काठोकाठ भरलेल्या बंपर आकाराच्या मोठ्या ‘मग’मधून किमान दोन-तीन वेळा चहा प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. पण हे लाड घरात चालतात! बाहेर कुठे गेलं की, पंचाईत होते. अशा वेळी माझी बायको अगदी आठवणीनं यजमानीण बाईंकडून माझ्यासाठी चहाची ‘पस्तुरी’ मागून घेते. (आधी माझी आई हे काम करायची.) माझी ही सवय बहुतेक सर्व परिचितांना माहीत झाली असल्यानं आता मला न मागताच ही ‘पस्तुरी’ मिळते.
आमच्या खेड्यातही पूर्वी आम्ही आंबे विकत घ्यायला कधी कोणाकडे गेलो की, तो आम्हाला ‘पाचखडी’ किंवा ‘सहाखडी’च्या मापानं आंबे द्यायचा. म्हणजे दर पाचावर किंवा सहावर एक आंबा फुकट. ठरलेल्या मापापेक्षा किंवा वजनापेक्षा थोडंसं जास्त देणं, याला ‘पस्तुरी’ म्हणतात! आजकाल बहुतेक सर्व ठिकाणी ‘एकावर एक फ्री’ ही योजना राबवली जाते. ग्राहकांना अशा पद्धतीनं आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या क्लृप्तीचा उपयोग केला जातो. तीच ही पस्तुरी.
अमेरिकन इंग्रजीत या ‘पस्तुरी’साठी ‘लॅन्यॅप’ असा शब्दप्रयोग करतात, आणि आता तो हळूहळू जगाच्या इतर भागातही वापरला जाऊ लागला आहे. त्याचं स्पेलिंग आहे ‘lagniappe’ किंवा ‘lagnappe’. ग्राहकाला खुश करण्यासाठी त्याला दुकानदारानं काहीतरी जास्तीचं सामान भेट म्हणून देणं, हे (बहुधा पुण्याचा अपवाद वगळता) जगात सगळीकडेच चालतं. या अशा एक्स्ट्रा आयटेमला ‘lagniappe’ असं नाव आहे. अमेरिकेतल्या न्यू ऑर्लिअन्स शहरात या ‘lagniappe’च्या परंपरेची सुरुवात झाली, असं मानलं जातं. सुमारे १८४९ साली हा शब्द तिथल्या इंग्रजी भाषेत शिरला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
न्यू ऑर्लिअन्समध्ये क्रिओल नावाची एक खास भाषा बोलली जाते. (‘क्रिओल’बद्दल सविस्तर माहिती पुन्हा कधी तरी देईन.) तिच्यामार्फत अमेरिकन इंग्रजीला मिळालेली ही भेट आहे. मात्र या शब्दाची नक्की व्युत्पत्ती सांगणं कठीण आहे. अमेरिकन स्पॅनिश लोक भेटवस्तूसाठी ‘la ñapa’ असा शब्द वापरतात, तर दक्षिण अमेरिकेत काही जागी बोलल्या जाणाऱ्या ‘Quechuan’ भाषेत ‘yapa’ म्हणजे जास्तीचं दिलेलं, भेट दिलेलं काहीतरी. या शब्दांपासून ‘lagniappe’ हा शब्द तयार झाला असंही मानलं जातं. १८८३ साली मार्क ट्वेन यानं आपल्या ‘Life on the Mississippi’ या पुस्तकात लिहिलेलं हे वाक्य बघा – “We picked up one excellent word — a word worth travelling to New Orleans to get; a nice, limber, expressive, handy word — ‘lagniappe’. They pronounce it lanny-yap. It is Spanish — so they said.”
तर सांगायचा मुद्दा हा आहे की, आज मी तुम्हाला ‘लॅन्यॅप’ किंवा ‘पस्तुरी’ म्हणून एका खास शब्दाबद्दल सांगणार आहे. हा शब्द आहे, ‘Kyriolexy’ किंवा ‘कायरीओलेक्सी’. त्याचा अर्थ आहे – ‘The use of literal or simple expressions, as distinguished from the use of figurative or obscure ones’. गूढ, अनोळखी, कठीण, अलंकारिक, लांबलचक, आडवळणाच्या शब्दांऐवजी साध्या, सरळ, सोप्या, परिचित, तंतोतंत शब्दांचा लेखनात - बोलण्यात उपयोग करणं या क्रियेला ‘Kyriolexy’ असं म्हणतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ग्रीक भाषेतून उचललेला हा शब्द आहे. ग्रीकमध्ये ‘κύριος’ म्हणजे ‘authoritative’, ‘proper’ किंवा योग्य आणि ‘λεξια’ म्हणजे ‘speaking’ किंवा बोलणं. म्हणजेच योग्य, बोलीभाषेतले, सामान्य, परिचित शब्द वापरून संभाषण करणं. आता ‘Kyriolexy’ हाच शब्द मुळात जड, अनोळखी, क्लिष्ट, आणि अलंकारिक आहे, ते सोडून द्या! पण शंभर दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या अलंकारिक भाषेतल्या अवघड पुस्तकांऐवजी लोकांना आजची चटपटित, snappy, सोपी पुस्तकं जास्त का भावतात, याचं ‘Kyriolexy’ या शब्दाच्या व्याख्येतून आकलन करून घेता येईल.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment