वनराज भाटिया : आपले ‘हटके’पण सांभाळणारा आणि त्याची बूज राखणारा ‘स्टॉलवर्ट’ संगीतकार!
संकीर्ण - श्रद्धांजली
राम जगताप
  • वनराज भाटिया (३१ मे १९२७ - ७ मे २०२१)
  • Wed , 12 May 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली वनराज भाटिया Vanraj Bhatia श्याम बेनेगल Shyam Benegal सरदारी बेगम Sardari Begum तमस Tamas अंकुर Ankur

हल्ली रोजचं वर्तमानपत्र उघडताना धास्तीच वाटू लागली आहे. सोशल मीडियावरही अनेकदा धक्कादायक बातम्या वाचायला मिळतात. कारण रोज कुणा ना कुणाच्या मृत्युची बातमी वाचायला मिळते. निव्वळ छायाचित्रं किंवा आकड्यांपुरतंच नशीब वाट्याला आलेल्यांची संख्या कितीतरी आहे. त्यामुळे मन घट्ट करून वर्तमानपत्रं किंवा फेसबुक\ट्विटर उघडावं लागतं. शिवाय पत्रकारांची अडचण असते की, त्यांना कुठल्याही प्रसिद्ध, मान्यवर व्यक्तीच्या निधनावर केवळ दु:ख व्यक्त करून किंवा श्रद्धांजली वाहून चालत नाही. लगेच तिच्या बातमीची, अल्पपरिचयाची, संपादकीय स्फुटाची किंवा अग्रलेखाची तयारी करावी लागते. प्रसंगी विशेष पान किंवा विशेष विभाग करावा लागतो. त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या आसपासच्या लोकांशी किंवा अभ्यासकांशी बोलावं लागतं. त्यांच्याकडून निर्लज्जपणे लेखाची मागणी करावी लागते. नातेवाईक, मित्रपरिवार, चाहते यांना शोक अनावर होतो, तसा तो पत्रकारांनाही होतो. त्यात त्या व्यक्तीशी काही काळ संबंध आलेला असेल तर खूपच होतो. पण तरीही स्वत:ला सावरून त्या व्यक्तीची ओळख, काम आणि योगदान यांची आपल्या वाचकांना ओळख करून द्यावी लागते. व्यक्ती जितकी मोठी, तितकं हे काम जिकिरीचं होऊ बसतं. कारण या सगळ्या तयारीसाठी फारसा वेळही हाताशी नसतो.

संबंधित व्यक्ती सेलिब्रेटी असेल तर तिच्याविषयी बोलणारे, लिहिणारे किंवा आठवणी सांगणारे अनेक जण असतात. तिच्याविषयी पुस्तकं, लेख अशी सामग्रीही असते. मात्र व्यक्ती स्टॉलवर्ट असेल, पण प्रसिद्धीपराङमुख असेल तर पत्रकारांचीही पंचाईतच होऊन बसते. शुक्रवारी (७ मे २०२१) ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचं वयाच्या ९४व्या वर्षी निधन झालं. तेही वार्धक्यानं, आजारानं. ३१ मे १९२७ रोजी मुंबईतल्या कच्छी परिवारात जन्मलेल्या या अस्सल मुंबईकर संगीतकाराविषयी तशी मराठी प्रसारमाध्यमांना फारशी माहीत असायचं कारण नाही. त्यामुळे ८ मार्चच्या बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये फक्त त्यांच्या निधनाचीच बातमी आली.

गाण्यांचे संगीतकार तसे लक्षात राहतात, अभ्यासकांच्या, प्रेक्षकांच्या आणि माध्यमांच्याही; पण केवळ पार्श्वसंगीत देणाऱ्या संगीतकारांचं नाव तितकंसं लक्षात राहत नाही कुणाच्याच. त्यातही बहुतेक समांतर सिनेमांना पार्श्वसंगीतकाराचं नाव लक्षात राहणं तसंही दुर्मीळच. मराठीतील एक ज्येष्ठ कथा-कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित झाली १९५५मध्ये, तिच्यावर १९९५मध्ये अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपट केला. त्याचं संगीत वनराज भाटिया यांनी केलं. हा त्यांनी केलेला एकमेव मराठी चित्रपट. तोही त्यांनी समांतर चित्रपटांच्या चळवळीत सक्रिय असलेल्या अमोल पालेकरांमुळेच केला.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

तसंही भाटियांचं हिंदीसिनेक्षेत्रातलं बहुतांश काम हे समांतर चित्रपटांसाठीचंच आहे. त्यांनी तब्बल ३० समांतर चित्रपटांना (त्यात ‘बनगरवाडी’ आणि अ‍ॅनिमेटेड ‘रामायण’ही आले) संगीत दिलं. त्यातील तब्बल १२ चित्रपट हे श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. त्याशिवाय गोविंद निहलानी यांच्या ‘आघात’, ‘द्रोहकाल’ आणि सईद मिर्झा यांच्या ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘नसीम’ या सिनेमांचाही समावेश आहे. बेनेगलांचा ‘सरदारी बेगम’ हा सिनेमा सोडला तर जवळपास कुठल्याच समांतर सिनेमात गाण्यांना फार महत्त्व नव्हतं. पार्श्वसंगीतातून सिनेमातले प्रसंग परिणामकारक करणं, हे त्यातलं संगीताचं प्रमुख काम. ते भाटियांनी अतिशय निगुतीने, प्रामाणिकपणे आणि कल्पकतेनं केलं.

दुसरी गंमत म्हणजे भाटियांची परंपरा मराठी संगीत नाटकांची आणि मुंबईतल्या गुजरात (भांगवाडी) नाटकांची. सुरुवातीचं त्यांचं संगीत शिक्षणही मराठीतून झालं. बालगंधर्वांची नाटकं हा त्यांचा वीकपॉइंट होता. त्यांची एकूणएक नाटकं त्यांनी पाहिली. मराठीतलं ‘सौभद्र’, गुजराती ‘सती द्रौपद्री’ ही नाटकं तर कमीत कमी २०-२० वेळा पाहिली. ‘संगीत शारदा’, ‘सं. संशयकल्लोळ’ ही आणि आनंद नाटक मंडळींचं ‘सोन्याची द्वारका’ ही नाटकं त्यांनी चार-चार वेळा पाहिली. बालगंधर्वांचा आणि मराठी नाटकांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यानंतर भांगवाडी नाटकांचा. काळबादेवीच्या या नाटकांमध्ये त्यांनी खूप गुजराती नाटकं पाहिली. त्यांचं मुख्य शिक्षण हेच होतं.

नंतर ते पाश्चात्य संगीताकडे वळाले. १९४९मध्ये मुंबईच्या इल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये एम. ए. करत असताना ते डॉ. मानेक भगत यांच्याकडे शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवत होते. त्यानंतर त्यांनी थेट लंडन गाठलं. तिथं ‘रॉयल अकडेमी ऑफ म्युझिक’ या ख्यातनाम संस्थेत पाच वर्षं आणि त्यानंतर पॅरिसमध्ये सहा वर्षं पाश्चात्य संगीताच्या मुळाक्षरापासूनचं प्रशिक्षण पूर्ण करून केलं. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले आहेत- “फ्रान्समध्ये जो शास्त्रोक्तपणा आहे, तो लंडनमध्ये नाही. तिथे माझा हार्मनीचा क्लास आठवड्यात फक्त २० मिनिटांचा होता. पॅरिसमध्ये मी दिवसात १३ तास हार्मनी करत होतो. ब्रिटिशांचं प्रशिक्षण वसाहतवादी असतं. फ्रेंचमध्ये तसं नसतं. तिथं प्रत्येक गोष्ट ठरलेली असते. अगदी खाण्याच्याबाबतीतही. तुम्ही अंड्यांचं ऑम्लेट करणार असाल तर ते दोन अंड्यांचंच होईल, एक अंड्याचं होणार नाही आणि तीन अंड्यांचंसुद्धा होणार नाही. त्यामुळे तिकडे संगीतातही तसंच आहे. त्यातही प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे. त्याचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. पहिल्या दिवशी मी गेलो, नादिया बाऊलँगर माझी शिक्षक होती. मी म्हटलं की, ‘तुम्ही कुठून सुरुवात करणार?’ त्या म्हणाल्या की, ‘हार्मनीच्या रुट पोझिशनपासून करू’. मी म्हणालो, ‘ते तर मी किती वर्षांपासून करत आलोय’. तर म्हणाली, ‘बारा पाठांमध्ये कधी केलंय हार्मनी?’ तिने मला पुस्तक दिलं, ‘Theory of Harmony’ (Arnold Schoenberg). ते पुस्तक फ्रेंचमध्ये होतं. मी तिला म्हणालो, ‘मला फ्रेंच येत नाही’. तर ती म्हणाली, ‘मलाही ग्रीक येत नाही. तर मग आपण काय करू शकतो, बोल?’ दोन महिन्यांनंतर तिच्या घरी सर्वांना डिनरला बोलावलं, तेव्हा मी फ्रेंचमध्ये बोलत होतो. ते पाहून ती म्हणाली, ‘मी तेच पाहत होते की, अजून तुला फ्रेंच येतं की नाही. नाही तर तुला काढून टाकणार होते क्लासमधून.’… तर अशा प्रकारे माझं प्रशिक्षण झालं.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

थोडक्यात वनराज भाटिया हा संगीतकार ‘हटके’च होता. केवळ ३० सिनेमांना (फीचर फिल्म्स) संगीत, १२ सिनेमांना पार्श्वसंगीत, आठ टीव्ही मालिका आणि चार नाटकांना संगीत देणारा संगीतकार ‘हटके’च असणार’. शिवाय श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, इब्राहिम अल्काझी, कुंदन शाह, अपर्णा सेन, विजया मेहता यांच्याबरोबर काम करणारा संगीतकार फार ‘परफेक्शनिस्ट’ असणार हेही ओघानं आलंच. पण आता अनेकांच्या स्मृतीत नसलेली गोष्ट म्हणजे भाटियांना एकेकाळी ‘जिंगल्स किंग’ म्हटलं जायचं. त्यांनी तब्बल सात हजार जिंगल्सना संगीत दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जिंगल्ससाठी ओरिजिनल संगीत देण्याचा पायंडा पाडला!

भाटियांच्या करिअरची सुरुवात अ‍ॅड फिल्मपासून झाली असली तरी त्यांना मुळात त्या करायच्या नव्हत्या. पॅरिसहून परतल्यावर काही मित्रांनी त्यांना ‘तुम्हाला अ‍ॅड फिल्म कराव्या लागणार, त्याशिवाय रोजीरोटी मिळणार नाही’ असं सांगितलं. तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी मरेन पण ते काम करणार नाही.’ खरं तर त्यांची मनासारखं करता येईल असं कुठलंही काम करायची तयारी होती. ते त्यांना अ‍ॅड फिल्ममध्ये मिळालं. इतकंच नव्हे तर ते त्यात माहीर झाले. त्यामुळे श्याम बेनेगल यांनी जेव्हा त्यांच्या ‘अंकुर’ या पहिल्याच चित्रपटासाठी भाटियांना संगीतकार म्हणून घेतलं, तेव्हा चित्रपटसृष्टीतल्या अनेकांनी गृहीतच धरलं होतं की, बेनेगल आणि भाटिया म्हणजे हे लोक सिनेमाच्या नावाखाली हमखास लघुपट करणार. १९७४ साली ‘अंकुर’ प्रदर्शित झाला आणि टीकाकारांना आपोआपच उत्तर मिळालं.

श्याम बेनेगल यांचे शेवटचे दोन-तीन चित्रपट सोडले तर बाकी सर्वांना भाटियांनीच संगीत दिलं आहे. ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘३४ चौरंगी लेन’, ‘त्रिकाल’, ‘मंडी’ आणि ‘सरदारी बेगम’ या चित्रपटांमधील त्यांचं संगीत खूप वाखाणलं गेलं.

‘भूमिका’तल्या किंवा ‘सरदारी बेगम’मधल्या गाण्यांच्या चाली आजही गुणगुणल्या जातात. ‘सरदारी बेगम’ हा सिनेमा तर भाटियांनी आव्हान स्वीकारून केला होता. अगदी त्यांच्या शब्दांत सांगायचं तर ‘विरोधकों को तमाचा मारने के लिए’ केला होता. गोष्ट अशी होती की, हिंदी सिनेमांमध्ये पाश्चात्य संगीतच वापरलं जातं आणि भारतीय शास्त्रीय\उपशास्त्रीय संगीत येत नाही, अशी टीका केली जायची. तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत शिकलेल्या भाटियांनी ठरवलं की, या लोकांना ‘भारतीय संगीत’ काय असतं ते दाखवून द्यायचं. या सिनेमाचे गीतकार होते जावेद अख्तर. त्यांच्यासोबत भाटियांनी या सिनेमातली १५ गाणी केवळ सहा दिवसांत बनवली. त्यासाठी त्यांनी तबला, हामोर्नियम आणि सारंगी ही केवळ तीनच वाद्यं वापरली आहेत. हे ते बालगंधर्वांकडून शिकले होते. दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमाचं सगळं संगीत त्यांनी स्टुडिओत बसूनच केलं, घरी काहीही केलं नाही.

पण सरदारी बेगमच्या संगीतावरून भाटिया आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये मोठी भांडणं झाली. बेनेगलांनी सांगितलं की, ‘तुम्हाला एकमेकांबरोबर काम करायचंय नसेल तर मी सिनेमाच बंद करतो.’ शेवटी दोघांमध्ये समेट झाला आणि गाणीही उत्तम झाली. त्याविषयी भाटियांनी म्हटलंय, “एका प्रसंगात तवायफ म्हणते, ‘मैं आपसे रूढ गई हूँ. आप चले जाइये’. त्यावर जावेद म्हणाला, ‘तवायफ का धंदा है. क्यो बोलेगी चले जाइये. रूढी भले हूँ मैं आप आ जाइये’. म्हणून जावेदनं लिहिलं – ‘राह मैं बिछी पलके आओ’. मग आम्ही ते गाणं केलं. नंतर ‘जा के परदेस बिराजे’ या गाण्याच्या वेळीही अशीच नौबत आली. त्याला मात्रा कमी पडत होत्या. तेव्हा आरती अंकलीकर माझ्या मदतीला आली. ती म्हणाली, ‘आपण असं करू- जा के परदेस बिराजे वो जाके…’ ”

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भाटियांनी व्यावसायिक सिनेमेही केले, नाही असं नाही; पण फारच थोडे. पण म्हणून त्यांना नवे दिग्दर्शक आणि नवे सिनेमे पसंत नव्हते असं नाही. खरी गोष्ट अशी होती की, या लोकांना भाटियांचं ‘हटकेपण’ नको होतं. भाटियांनी ‘दामिनी’, ‘चायना गेट’चं पार्श्वसंगीत केलं आहे. प्रकाश झा, कुंदन शाह यांचेही सिनेमे केले आहेत. मात्र नव्या सिनेमांबद्दल, त्यांच्या संगीताबद्दल त्यांची बरीच नाराजी होती. त्यांनी म्हटलंय- “नव्या सिनेमांतलं संगीत एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालत नाही, सिनेमाही सिनेमागृहाच्या बाहेर गेला की, कुणाच्या लक्षातही राहत नाही. आता प्रेक्षकांना तत्पर करमणूक हवी आहे. बौद्धिक करमणूक नकोय. आमच्या वेळी तीन प्रकारचे चित्रपट होत असत. आता त्यांची सरमिसळ झाली आहे. यात काही खराबीही नाही. संस्कृत नाटकांतल्या प्रत्येक अंकात नऊ रसांचा समावेश असतो. ही आपली परंपरा आहे. त्यानुसारच आजचे चित्रपट बनवले जातात. पाश्चात्य देशांमध्ये जसे कॉमेडी आणि ट्रॅजेडी हे प्रकार असतात, तसे भारतात नसतात. आपल्याकडे कॉमेडी, ट्रॅजेडी, नाच, गाणी, असं सगळं लागतं. तुम्ही कुठलंही संस्कृत नाटक पाहिलं तर त्यात हे सगळं आहे.”

पण काम मिळवण्यासाठी, टिकून राहण्यासाठी त्यांनी कधीही आपल्या हटकेपणाशी तडजोड केली नाही. करायचं ते उत्तम आणि उत्तम करायचं असेल तरच करायचं हा भाटियांचा खाक्या होता. शिवाय काय करायचं नाही, हेही त्यांचं ठरलं होतं. त्यामुळे त्यांनी आपण मागे पडतोय याविषयी कुठलाही विषाद न व्यक्त करता स्पष्टपणे म्हटलंय, “मैं तो पुराने जमाने का नहीं, लेफ्टओव्हर कंपोझर हूँ. जो बीत गया सो बीत गया. उसको हम पकड नहीं सकते. कोई भी चीज जब स्लीप हो जाती है, तो उसको पकडना नहीं चाहिए. जब थे तब अच्छा था, अब नहीं है तो जाने दो. मैं उसपर भरोसा रखता हूँ. किसी के पिच्छे पडने से कोई फायदा नहीं.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भाटिया यांच्या या विधानांतून त्यांची परिस्थितीशरणता डोकावत नाही, तर त्यांची जगाबद्दलच्या प्रगल्भ भानाची प्रचीती समजते. स्वत:चे चित्रपट आता पुन्हा पाहताना त्यांना त्यातल्या अनेक चुका दिसत. ‘तमस’मध्ये थोडं अजून संगीत असायला हवं होतं. पण गोविंद निहलानीला त्या वेळी खूप संगीत नको होतं, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय.

नाटकाच्या आवडीपोटी भाटियांनी काही नाटकांनाही संगीत दिलं होतं. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे पहिले संचालक इब्राहिम अल्काझी यांच्याबरोबर त्यांनी ‘तुघलक’, ‘द कॉकेशियन चॉक सर्कल’, ‘थ्री पेनी ऑपेरा’ आणि ‘अंधायुग’ अशी चार नाटकं केली होती. ‘थ्री पेनी ऑपेरा’मध्ये तर त्यांनी स्वत: स्टेजवर बसून हॅप्सिकॉर्ड वाजवली होती.

भाटियांच्या कामाची यादी आणि त्यांना कौतुक वाटणाऱ्या गोष्टी यांची कितीतरी उदाहरणं सांगता येण्यासारखी आहेत. आदर्श, परंपरा आणि प्रेरणा हा त्यांच्या संगीताचा प्राण होता. ‘हटकेपणा’बद्दल त्यांनी स्वत:च म्हटलंय- ‘‘मैं हटके हूँ, लेकिन थोडासा, ज्यादा नहीं. मणि कौल, कुमार साहनी, जितने हटके थे, उतना थोडेही हूँ?”

(प्रस्तुत लेखकाने दै. ‘प्रहार’च्या ‘कोलाज’ या रविवार पुरवणी (१० ऑक्टोबर २०१०)साठी घेतलेल्या मुलाखतीवर आधारित लेख.)

..................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......