‘जुगाड’ : निमशहरी भागातल्या तरुणांचं शहरात आणि निमशहरात होणाऱ्या परवडीचं प्रातिनिधिक चित्र
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
भाग्यश्री भागवत
  • किरण गुरव आणि त्यांच्या ‘जुगाड’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Tue , 11 May 2021
  • ग्रंथनामा शिफारस जुगाड Jugaad किरण गुरव Kiran Gurav

किरण गुरव यांची ‘जुगाड’ ही पहिलीवहिली कादंबरी नुकतीच वाचनात आली. खरं सांगायचं तर त्यांच्या कथा मी वाचलेल्या नाहीत. त्यामुळे ‘कथाकार’ म्हणून त्यांच्या लेखनाचा कोणताही ठसा मनावर नाही किंवा शैली परिचित नाही. २०२०च्या साहित्य संमेलनात त्यांना थोडंफार ऐकलं होतं. पण मुलीला सांभाळत त्यांना ऐकल्याने लक्षपूर्वक ऐकताही आलं नाही. मात्र त्यांचा मितभाषीपणा, कुठल्याही प्रकारे स्वतःकडे लक्ष वेधून न घेऊ पाहणारी त्यांची अंतर्मुख देहबोली आणि एकूण सांगण्यात न जाणवलेला आवेश व दंभ ही त्या वेळी अगदीच पुसट जाणीव झालेली त्यांची वैशिष्ट्यं प्रस्तुत कादंबरी वाचताना ठळक झाली.

तंत्रज्ञानाचं कष्टपूर्वक शिक्षण घेतलेल्या निमशहरी भागातल्या तरुणांचं शहरात आणि निमशहरात होणाऱ्या परवडीचं प्रातिनिधिक चित्र ही कादंबरी आपल्यापुढे रेखाटते. तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला एकूणच समाजात आब आहे. पण त्यातही पदविका, पदवी, शाखा, कॉलेजचं नावाजलेपण, पुण्या-मुंबईतलं आणि पुण्या-मुंबईबाहेरचं शिक्षण, मोठ्या महाविद्यालयांचं आणि नोकरी देणाऱ्या संस्थांचं बड्या प्रस्थांशी असलेलं साटलोटं आणि त्यातून केलं जाणारं राजकारण, हे सगळे घटक तंत्रज्ञानात कुशल असणाऱ्या होतकरू तरुणाशी सतत कबड्डी खेळत राहतात आणि बहुतेकदा त्याचा पाय ओढून त्याला लोळवण्यात यशस्वी ठरतात. तसंच एखाद्या वेळी या सगळ्या घटकांना चकवून कोणा होतकरूला नोकरी लागलीच, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला धडा शिकवायला आणि कोणातरी वरिष्ठाची चाटुगिरी करायला भाग पाडणारी, ही व्यवस्था माणसातलं जनावर जागं करते.

प्रस्तुत कादंबरीचा नायक डिप्लोमा होल्डर आहे. त्याच्या-त्याच्या क्षेत्रात हुशार आणि कुशल आहे. मात्र ढिगाने मिळणाऱ्या डिग्रीवाल्या मुलांच्या दुनियेत डिप्लोमा होल्डर्सची वर्णी कामगारांबरोबर लागते, हे वास्तव आहे. आणि या वास्तवाचा सामना याही तरुणाला करावा लागतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे भरीला भर म्हणजे, फार न नावाजलेल्या, पुण्या-मुंबईबाहेरच्या, इंग्रजी ‘स्मार्टली’ न बोलता येणाऱ्या निमशहरी भागातून हा तरुण आलेला आहे. वर्षानुवर्षं नोकरी शोधत थोराड होत चाललेल्या तरुणांच्या एका लॉजमध्ये राहणाऱ्या या नायकाच्या निवेदनाने कादंबरीची सुरुवात होते. निमशहरी भागांतून आलेले हे तरुण त्यांच्या घरच्यांच्यासाठी मात्र आशेचा किरण असतात. शब्दशः घरातल्या सर्वांच्या जिवाच्या करारावर त्यांनी पैसा मिळवून घराची गाडी रुळावर आणणारं हे शिक्षण घेतलेलं असतं. त्यामुळे कामाचं समाधान, हव्या त्या क्षेत्रात काम करायला मिळणं किंवा रेप्युटेड कंपनी या मध्यमवर्गीयांसाठीच्या पूर्वअटी या तरुणांसाठी मऊ-मुलायम, पण अप्राप्य स्वप्नासारख्या असतात आणि ‘पर्मनंट नोकरी’ हेच त्यांचं जीवनध्येय असतं.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

त्यामुळे घर, त्या-त्या भागातला एकूण समाज यांच्या आशाळभूत आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याप्रमाणे बघणाऱ्या नजरा आणि त्याच्याबरोबर उलट मोठ्या शहरांतून वाट्याला आलेलं एकटेपण, सापत्नभावाची वागणूक, पदरी पडणारे गंड अशा कचाट्यात ही मुलं पिचत असतात. त्यांचं हे कचकलेलं भावविश्व नायकाच्या सुरुवातीच्या निवेदनातून समोर येतं. अशा थोराड मुलांना वर्षानुवर्षं पोसणाऱ्या लॉजचं बकाल चित्र, मेस नावाचा उपहास, कडवट अनुभवांमुळे जगण्या-वागण्या-बोलण्यात आलेलं विकटपण, त्यासाठीचा जीवघेणा आणि उलट-सुलट गोष्टी करवून घेणारा केविलवाणा उपरोध निवेदनातून वाचकावर चांगलाच दाब निर्माण करतो. नोकरी मिळण्याची तीव्र आशा-निराशा या पहिल्या भागाला पूर्ण व्यापून टाकते. आणि त्यातून निर्माण होणारा गडद उपहास आपल्या अंगावर येतो; अस्वस्थ करतो.

कादंबरीच्या दुसऱ्या भागाचा विचार करता, ‘पर्मनंट नोकरी’ नावाचा शिक्का या नायकाच्या नावावर बसतो; मात्र तो नावापुरताच उरतो. पर्मनंट होण्याच्या तीव्र गरजेपायी कोल्हापूरमधील नव्या प्लांटचा ‘प्रॉडक्शन इन चार्ज’ म्हणून हा नायक रुजू होतो. इथे त्याला नव्यानव्या गोष्टी शिकायला मिळतात. ‘इन चार्ज’ म्हणून पुष्कळ गोष्टी हाताळायला मिळतात, प्रयोग करता येतात; पण एका राजकारण्याचा असलेला हा प्लांट या नेत्यासाठी पटावरची केवळ चाल असतो. त्यामुळे प्लांटची पुंगी या नाहीतर त्या पद्धतीने खेळखंडोबा करत वाजवून घेणं आणि अडवणूक-पिळवणूक करत स्वतःचा मतलब साधून घेणं, या नेत्याला चांगलंच अवगत असल्याचं दिसतं. प्लांट टाकणं ही त्याच्या लेखी अनेक खेळींमधली एक खेळी असल्याने ती फसली, तर दुसरी त्याच्याकडे तयार असते. त्यामुळे खेळी सफल होण्यासाठी माणसं नाचवणं आणि खेळी फसत असल्याचं लक्षात आल्यावर तो डाव उधळून नवा टाकणं, हे त्याचं धोरण असतं.

परिणामी, या प्लांटवर राबणारी सगळीच माणसं आपापल्या गरजांपोटी या खेळीची बळी ठरतात. प्लांटवरचे कामगार कष्टाचे बळी ठरतात; मुलगी नात्याचा बळी ठरते; तर नायक कष्ट, नातं यांच्याबरोबरच नोकरीचाही बळी ठरतो आणि अखेरीस तीव्र हतबलतेने ‘पर्मनंट नोकरी’ सोडून स्वतःच्या गावाचा रस्ता धरतो.

‘स्वतःचं काम काढून घेणं’ या ‘चालूपणाला’ सध्याच्या काळात ‘मॅनेजमेंट’ या गोंडस नावाखाली मान्यता आणि सभ्यताही प्राप्त झाली आहे. आजच्या जगातलं हे ‘स्मार्ट’ आणि ‘संधिसाधू’ कौशल्य नायकाला अवगत नाही. दुर्दैवाने या कौशल्यांना प्रामाणिकपणा आणि प्रसंगी बुद्धिमत्तेपेक्षाही सध्याच्या काळात महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे सगळं काही असूनही कादंबरीचा नायक या व्यवस्थेत उपरा आणि एकाकी पडत असल्याचं दोन्ही भागांतून समोर येतं. महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि संधी या तीनही घटकांशी कबड्डी खेळता खेळता नायकाची मूल्यं आणि बुद्धिमत्ता दोहोंची दमछाक होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कादंबरीचं सूत्र पक्कं आहे, तिचं निवेदन कृत्रिम नाही, ती परिणामकारकही आहे; मात्र रुतून बसत नाही. आणि याचं कारण तिच्यातल्या तत्त्वापेक्षा तिच्या तपशिलात किंवा मांडणीत अधिक आहे. वातावरणनिर्मिती करताना तपशिलाला जिवंत करण्यात, तत्त्वाशी एकजिनसी होण्यात कादंबरी कमी पडते. त्यामुळे वाचक तपशिलात अडकत नाही आणि निवेदन तपशिलातल्या उत्सुकतेला गती देण्यासाठी कमकुवत ठरतं. किंबहुना कादंबरीचा तपशील निवेदनात पूर्णपणे कन्व्हर्ट होत नाही. त्याला सांगण्याचा सूर प्राप्त होत नाही. त्यामुळे तो स्थितीशील राहतो आणि एकाच अर्थाची अनेक वाक्यं वा तपशील गाळून वाचक पुढे जात राहतो. याने कथानक कळतं, सांगण्यातलं गांभीर्यही पोहोचतं, पण गहिरेपण मात्र बाधित होतं आणि वाचकात आणि कादंबरीत अंतर तयार होतं; आणि संपूर्ण कादंबरीभर हे अंतर कायम राहतं.

कादंबरीतला बहुतेक भाग कारखान्याशी निगडित यंत्रांशी, त्यांच्या कार्याशी आणि त्यांच्या जोडणीशी संबंधित आहे. तो तसा असणं ही कादंबरीची गरजदेखील आहे. कारण कादंबरीचा गाभा आणि भावविश्व याच यंत्रविश्वाशी आणि त्यातल्या माणसांशी जोडलं गेलेलं आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रांच्या कार्याचं, दुरुस्तीचं, जोडणीचं वर्णन असताना त्याचं चित्र सामान्य वाचकाला इमॅजिन होईल, अशा पद्धतीने उभं करणं आवश्यक वाटतं. कारण कादंबरीचा जवळजवळ ६० ते ७० टक्के भाग या वर्णनांनी व्यापला आहे.

अशा वेळी यंत्रांचा हा सव्यापसव्य वाचकाला इमॅजिन झाला नाही, तर तो वाचनापासून तुटतो आणि त्याची पुस्तकातली गुंतवणूक कमी होते; अनेकदा लक्ष भरकटतं आणि सलग वाचलं जात नाही. किंवा हा सगळा सव्यापसव्य पुन्हा पुढे-मागे करत वाचून घेण्याच्या आणि इमॅजिन करण्याच्या नादात तपशिलातच अधिक अडकल्याने रसभंग होतो. मात्र म्हणून यंत्रांच्या सव्यापसव्याचा हा भाग टाळायला हवा, असा याचा अर्थ अजिबात नाही.

उलट हे जग आणि त्यातली सगळी घरघर, ढोरमेहनत, तरीही येणारं कःपदार्थपण, त्यातला अजगरी थंड दाब हे सगळं इतकं तपशीलवार लिहिलं जात नाही; ते नवीन आहे; त्यातला ताण सांगणं महत्त्वाचंही आहे. फक्त हा ताण सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिक असला, तरी अपुरा आहे. वाचकाशी त्याची सांधेजोड बसत नाही. त्यामुळे काचेपलीकडचं नाट्य पाहत असल्याप्रमाणे तीव्रता कळते, पण पोहोचत नाही, अशी काहीशी अवस्था होते.

कदाचित किरण गुरव यांची ही पहिलीच कादंबरी असल्याने असं झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कादंबरी ही कथेच्या तुलनेत अधिक दमसासाची गोष्ट असते. त्यामुळे त्यात भावनिक उर्ध्वपतन अधिक होतं आणि त्याचा पटही मोठा असतो. परिणामी, एका प्रयत्नात इतके सगळे घटक पकडीत येणं निश्चितच कठीण आहे. शिवाय कादंबरीची वीण घट्ट नसली, तरी कादंबरी पोझ घेऊन लिहिलेली नाही, तिच्यात आव नाही, दंभ नाही. तिच्यात चमक आहे, तत्त्व आहे आणि कथनाच्या शक्यताही आहेत. त्यामुळे लेखकाच्या नव्या लेखनाबद्दल ती आशा निश्चितच निर्माण करते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ही कादंबरी दर्या प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. तिची निर्मिती उत्तम आहे. कागद उत्कृष्ट वापरला आहे. मुद्रितशोधनाच्या चुका नगण्य आहेत. वर सांगितलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने संपादनाची वा संपादकाची गरज निश्चितच होती. राजन गवस यांचा ब्लर्ब कादंबरीच्या गाभ्यावर नेमका प्रकाश टाकतो. मुखपृष्ठाचा विचार करता, कादंबरीच्या शीर्षकाशी चित्र मेळ खातं. मात्र रंगसंगती तितकी प्रभावी वाटत नाही. मुखपृष्ठाचा कागदही उत्तम वापरला आहे आणि मुद्रणही उत्तम झालं आहे.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘मॅनेज’ करण्याचं वर्तमानातलं कौशल्य, ज्याला बोलीत ‘जुगाड’ म्हणतात, त्याचा या नायकाकडे अभाव आहे. आणि सद्य वर्तमानाची दुर्दैवाने हीच नस आहे. वर्तमानाचा हा स्वभाव आणि या स्वभावाचा लेखकाकडे असलेला अभाव सर्व कादंबरीभर पसरला आहे. त्यामुळे शीर्षक अत्यंत समर्पक आणि बोलकं ठरतं. राजन गवस यांनी या शीर्षकाला अर्थाचा आणखी एक स्तर देत, ‘अशा परिस्थितीत टिकून राहणे, हाच खरा जुगाड’ असं म्हटलं आहे. कादंबरीचा शेवट वाचताना याचं सूचन नक्कीच होतं, मात्र त्या टिकून राहण्यातला चिवटपणा अधिक घट्टपणे व्यक्त होण्याची अपेक्षा गुरव यांच्याकडून आहे, हे नक्की!

जुगाड – किरण गुरव

दर्या प्रकाशन, पुणे

पाने - २४६ , मूल्य – २५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक आहेत.

bhagyashree84@gmail.com 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......