अजूनकाही
१. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला ‘माफिया’ आणि ‘बॉस’ म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तील मुलाखतीमधून 'होय, मी बॉस आहे; राहणारच', असे ठणकावून सांगितले आहे. ज्यांना शिवसेनेचे काम दिसत नाही त्यांच्या मेंदूत खड्डे पडले आहेत. २३ तारखेला ते भरले जातील, असे उद्धव म्हणाले. त्याचवेळी शिवसेनेचे मराठी माणसाबद्दलचे प्रेम भाषणापुरतेच असून खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला असून शिवसेनेच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. कंत्राटदारांना मलिदा खायला मिळावा, यासाठी रस्त्याची कामे दरवर्षी काढली जातात आणि नाल्यातील गाळच न काढता मुंबईकरांच्या घामाचे कोटय़वधी रुपये कंत्राटदारांच्या घशात घातले जातात, असेही ते म्हणाले.
निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी आयोगाने वाढवला पाहिजे. इतकं अव्वल दर्जाचं मनोरंजन इतर कोणत्याही मनोरंजन उद्योगातून मिळत नाही. परवापर्यंत दोघे भाऊ मिळून खात होते आणि आता एकमेकांची अंडीपिल्ली काढण्याच्या नादात स्वत:चीही लाज फेडून घेत आहेत. आणखी काही दिवस असाच प्रचार झाला असता, तर लोकांनी निव्वळ यांच्या पाचकळपणाला वैतागून बिजू जनता दल किंवा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमलाही निवडून दिलं असतं मुंबईतून!
……………………………………….
२. खाण्याच्या सवयी, जात-धर्म यांच्या आधारावर एखाद्याला घर विकायचे किंवा नाही, याचा निर्णय घेण्यासाठी विकासकांना दिलेल्या सवलतीवर टीका होऊ लागताच या सवलती रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच निवासी संकुलातील ‘ओपन पार्किंग’ विकण्याची सवलतही रद्द करण्यात आली आहे.
आपण अमुक धर्माच्या, जातीच्या, आहारसवयीच्या लोकांना घर विकत नाही, असं आजही कोणताही बिल्डर खुलेआम सांगत नाही किंवा कागदोपत्री लिहून देत नाही. तुमच्यासाठी इमारतीत घर नाही, एवढंच, तोंडी सांगितलं जातं. पार्किंग विकायला मनाई असतानाही पार्किंगसकट फ्लॅटची किंमत वसूल केली जात होतीच. तीही कागदोपत्री पार्किंगचा चार्ज म्हणून आकारली जात नाही. या बेकायदा गोष्टींना कठोर चाप लावणारी काही तरतूद, काही यंत्रणा असेल तर बोला; उगाच बोलाचीच कढी शिजवू नका.
……………………………………….
३. काँग्रेसच्या नेत्यांनी तोंडाला आवर घालावा, अन्यथा तुमची जन्मकुंडली बाहेर काढावी लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हरिद्वार येथील निवडणूक सभेत दिला. मोठेपणाचा त्याग करण्याची आपली इच्छा नाही, मात्र आपण तो सोडला आणि निरर्थक वक्तव्ये केली तर तुमचा इतिहास सदैव तुमचा पिच्छा पुरवेल याची जाणीव ठेवा, असं ते म्हणाले.
मोदींकडे मोठेपणा आहे, हा शोध त्यांचा त्यांनाच लागलाय की, नासाच्या संशोधनातून ते सिद्ध होऊन युनेस्कोने तसं प्रमाणपत्र दिलंय? आपणच आपल्याला मोठं म्हणणं ही एक छोटेपणाची खूण असते, हेही त्यांना माहिती दिसत नाही. बालनरेंद्राने चहा विकता विकता फलज्योतिषाचाही अभ्यास केला होता, असा उल्लेख 'होराभूषण नरेंद्र'चालिसामध्ये करायला हरकत नाही!
……………………………………….
४. मध्य प्रदेशातील छिंदवाडाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि तरुणांना ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला पालकांची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आणि समाज केंद्रांमध्ये पालक दिन म्हणून साजरा केला जावा, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी जे. के. जैन यांनी जारी केले आहे.
या सद्गृहस्थांनी पॉपायचा आदर्श ठेवून लहानपणी गरजेपेक्षा जास्त पालकाची भाजी खाल्लेली दिसते आहे. अन्यथा जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जी कामं करायला हवीत, ती सोडून बिचाऱ्या पोरापोरींच्या प्रेमदिनावर पालकाचं फतफतं ओतायची उठाठेव त्यांनी केली नसती.
……………………………………….
५. ‘वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. आम्ही आधी त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि मग त्यांना सुधारण्याचे काम करू,’ असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
अरे वा, ही छानच कल्पना आहे. इथून पुढे जो कोणी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा करील, त्याला थेट भाजपचं कर्मसिद्ध सदस्यत्व द्यायचं. पोलिस दल नको, तुरुंग नकोत, न्यायालयं नकोत. सगळे गुन्हेगार भाजपमध्ये गेले की, आपोआप त्यांच्यावर संस्कार होणार आणि कायदा व सुव्यवस्था यंत्रणांची गरजच नाही उरणार.
……………………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment