काय म्हणता, मीडिया ताळ्यावर आला? हे भलतंच झालं…
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • ‘गुजरात समाचार’, ‘इंडिया टुडे’, ‘आउटलुक’, ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘टेलिग्राफ’
  • Tue , 11 May 2021
  • पडघम माध्यमनामा गुजरात समाचार Gujarat Samachar इंडिया टुडे India Today आउटलुक Outlook द न्यू इंडियन एक्सप्रेस The New Indian Express टेलिग्राफ The Telegraph

गुजराती भाषेत ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीसारखी म्हण आहे की नाही माहीत नाही. तशी एखादी असावी, याची खात्री मात्र रविवारी, ९ मे २०२१ रोजी पटली. ‘गुजरात समाचार’ या तिथल्या जुन्याजाणत्या दैनिकाने पंतप्रधान मोदी कसे नव्या संसदेच्या बांधकामात गर्क झालेत, याची चक्क आठ कॉलमी नोंद केली, तीही पहिल्या पानावर! देशात काय चाललेय अन हा माणूस काय भलतेच करतोय, असा भला मोठा आरसा थेट त्यांच्याच घरातून मोदींना दाखवला जावा, म्हणजे वासे फिरलेलेच आहेत!!

‘इंडिया टुडे’चा ताजा अंक घ्या. स्मशानात अंत्यविधीसाठी वेळ लागतोय म्हणून जमिनीवर रांगेत ठेवलेली प्रेते आणि शेजारी ‘द फेल्ड स्टेट’ असे शीर्षक दिलेले. कधी काळी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे छायाचित्र देऊन ‘द फेल्ड प्राइममिनिस्टर’ असे सुचवणाऱ्या ‘इंडिया टुडे’ला मोदींची भीती वाटली बहुधा. मुखपृष्ठावर ना त्यांची छबी, ना नाव! आडूनआडून स्टेटच्या नावाने मोदींचे अपयश निदान कबूल तरी केले त्याने. तिकडे चेन्नईच्या ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादक जी. एस. वासू यांनी एक मेचा लेख एका कबुलीजवाबासारखा लिहिलाय – ‘अन एडिटर्स कन्फेशन : देअर इज ब्लड ऑन अवर हँडस’ अशा शीर्षकाखाली त्यांनी आम्ही सरकारचे कान धरणे सोडले, ते कसे चुकले याविषयी मनमोकळे केले.

बाकी ‘इंडियन एक्सप्रेस’बद्दल काय सांगावे? त्याला रोज मोदी सरकार, योगी सरकार इतका मालमसाला देतेय की, त्यातून तो खमंग धपाटे घालू लागलाय. कुणी म्हणेल, शेकडो पत्रकार कोविडने गिळले, त्याचा राग काढतायत. कुणी म्हणेल, उच्च न्यायालये वैतागली अन सर्वोच्च न्यायालय खवळले म्हणून चाललाय हा तमाशा. (एक माणूस जाताच केवढा बदल होतो किनई!) अजून कुणी म्हणतील, ममता बॅनर्जी पुन्हा जिंकल्याचा आनंद यांना झालाय.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

अहो, ‘अमर उजाला’, ‘जागरण’, ‘प्रभात खबर’ यांसारख्या हिंदी दैनिकांनीही अयोध्या, मथुरा, काशी या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाल्याचे निर्भयपणे छापावे, म्हणजे हवा बदलल्याचे लक्षण का? ‘इंडिया टुडे’च्या १७ मेच्या अंकात मालक-संपादक अरुण पुरी यांचे चक्क दोन पानी संपादकीय छापलेय. रोहित सरदानाचा मृत्यू फारच जिव्हारी लागलेलाय. अन्यथा एका पानात त्यांचे संपादकीय संपत असते. अंकात लेख, आकडेवारी बऱ्यापैकी आहे. या ‘इंडिया टुडे’ची मजा अशी की, साप्ताहिक अंकात बऱ्याचदा मोदी सरकारवर टीका असते, मात्र टीव्हीवर क्षणोक्षणी मोदींचा बचाव चालू असतो. बरोबराय, गेल्या वर्षापासून वाचक रोडावला अन प्रेक्षक फुगला. शेवटी धंदाय साहेब आपला...

‘आउटलुक’ने १७मेच्या अंकात ‘घोस्ट इन द मिरर’ असा दुपानी लेख छापून जगभरच्या वर्तमानपत्रांनी मोदींना त्यांचा भेसूर चेहरा कसा दाखवलाय, त्याचा आढावा घेतलाय. सीमा गुहा या बाईंनी लेखाला इंट्रो काय द्यावा? तर- ‘पाश्चात्य माध्यमांनी भयंकर कोविड संकटाची रोखठोक, भडक अन वास्तवदर्शी वार्तांकने केल्याने मोदी सरकारला मिर्च्या झोंबल्या!’

‘टेलिग्राफ’ या इंग्रजी दैनिकाचे कौतुक जितके करावे तितके थोडेच. देशातले हे एकमेव दैनिक, जे निर्भीडपणे मोदी सरकारचा अपयशी कारभार रोज नेमाने सांगत राहते. मोदींची बेफिकीर वृत्ती व अमित शहांची अहंकारी चाल उघडे पाडणारे हे एकमात्र दैनिक देशात उरावे, हे लज्जास्पद! कोलकात्याहून प्रकाशित होत असल्याने त्याची पोच फार नाही, पण खोच मात्र जबर देत असते. देशाच्या प्रगतीचे श्रेय घेता ना, मग अपयशही सोबतीला असू द्या, हा त्याचा बाणा मस्तच असतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

म…म…म…मराठीचे काय असे विचारताय? काय लाज आणताय का महाराज! असे कुणी विसरते का आपल्या आईला!! आपली आई लई सोशिक, समंजस, संतुलित, सालस, संयमी, सहिष्णू, सात्त्विक अन सोज्ज्वळ हाय बाबा. घरची परिस्थिती खराब झालीय लेका. तवा जरा दमादमानं हाकावा लागतोय गाडा तिला, समजलं का? फडणवीस काय, दरेकर काय अन त्यो भातखळकर काय, समदी मायमराठीची लेकरं. तिला मायेत दूजाभाव करता येईना बघा… अहो, साहेब, या मराठी वर्तमानपत्रांनी आणि टीव्हीवाल्यांनी महाराष्ट्राच्या भाजपचा ‘भा.द.फ.’ असा कायापालट केलाय, इतकी प्रसिद्धी त्या तीन जणांना दिली जातीय रोज. त्यांची बाजू आली की, झाला स्पष्टवक्तेपणाचा प्रयोग पूर्ण यांचा. तो महाराष्ट्राचा मानबिंदू इतका नादी लागला यांच्या की, अखेरीस नाक दाबावे लागले, तेव्हा तोंड उघडले त्याचे म्हणे! सरकारी जाहिरातींवर कायम डोळा ठेवणारा तो, आता ताळ्यावर आलाय.

मराठी पत्रकारांच्या राजकीय बातम्या म्हणजे पुढाऱ्यांनी काय म्हटले, न्यायालयांनी फटकारले की खडसावले आणि ‘सामना’च्या अग्रलेखात कोणाला हाणले एवढ्याच. सर्व माध्यमांत प्लांटेड अर्थात पेरलेल्या बातम्यांच्या बागा फुललेल्या व बहरलेल्या. सारे वातावरण सपक, मचूळ, नि:सत्त्व.

मराठी पत्रकारिता आजच्याएवढी लबाड आणि लटपटी कधी पाहिली नव्हती. माणसांची कपात झालेली, असलेल्यांचे पगार घटलेले, घरूनच काम करण्याची सक्ती आणि अनामिक म्हणा की सनाम, सदैव अवतीभवती तरंगणारी एक दहशत, याने मराठी पत्रकारिता पर्समध्ये ठेवायच्या आरशाएवढी होऊन बसलीय. चेहरा ठाकठीक करायला पुरेशी. तो आरसा इतरांना दाखवायला जावे तर ते हसणार, आपण पाहायला जावे तर फक्त थोबाड दिसणार. एवढेच दाखवतोय हा आरसा, असे म्हणत आपणही आपल्याला हसणार. बिचारा मराठी पत्रकार!

व्यंगचित्रकारांनी मात्र खरोखर बहार आणलीय. एकेकाच्या अशा काही अचाट कल्पना अन टोकदार भाष्ये, की वाटते हे खरे मर्द लढवय्ये! दाढी, केस वाढवून संत-महाराजांच्या भूमिकेत शिरलेल्या मोदींचा प्रत्येकाने असा काही समाचार घेतलाय की बस्स! माध्यमांची लाज या व्यंगचित्रकारांनी राखली. या काळात हौशी व्यंगचित्रकार अगणित जन्मले. कोणाचे चित्र चांगले, तर कोणाचे भाष्य. पण त्यांचे धाडस अन दृष्टी खचितच गौरवास्पद. ‘मार्मिक’ साप्ताहिकाने याच चार-सहा महिन्यांत आपली शैली बदलली आणि रंगत वाढवली. व्हॉटसअपवर कित्येक व्यंगचित्रे रोजच लाखो पडद्यांवर झळकून पुढे रवाना होतायत, ही फार आनंदाची गोष्टय.

मध्यंतरी होसबळे बरळले- पाश्चात्य मीडियाचा बदनामीचा डाव अन त्याला राष्ट्रद्रोह्यांची साथ वगैरे. २०११, १२, १३ साली याहून जास्त धुलाई मनमोहनसिंग सरकारची चालली होती. ती आवडली होती यांना. काँग्रेसने तेव्हा ना कोणाला तुरुंग दाखवला, ना धमक्या दिल्या. पत्रकारांच्या या मोहिमेचा फायदा मोदींनी घेतला. आता ते व त्यांचे भक्त मीडियाच्या मुसक्या आवळा असे कसे म्हणू शकतात? अवघा देश काश्मीरसारखा करकचून कसा बांधता येईल? खुमखुमी असणार या होसबळेबाबांना, पण कोविडने जाळलेल्या चितांमध्ये तीही जळून गेली. यांचा सुंभ जळून गेलाय, पीळ काही केल्या जळत नाहीय. ठीकाय. चटके तर बसतायत ना…

मागच्या वर्षी भारतातल्या तमाम भांडवली माध्यमांनी हजारो पत्रकार काढून टाकले. आवृत्त्या बंद केल्या, तर स्टुडिओज गुंडाळले. अजूनही नोकरकपात, खर्चात कपात आणि वृत्तांत कपात चालूच आहे. किती वेळा या होसबळेछाप नेत्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला? किती मालकांना असे न करण्याबद्दल बजावले? तोच भांडवली मीडिया आज मोदींना ताळ्यावर आणू पाहतोय, यामागचे कारण सर्वांना समजते.

बव्हंश, भारतीय नागरिक करोनाला वैतागला आहेच. पण मोदी सरकार जो घोळ घालून बसलेय, त्याने ते जास्त होरपळलेत. प्राथमिक आरोग्य सेवा देशभरच मोडून टाकून खाजगीकरणाला उत्तेजन देणाऱ्या सरकारवर लोक संतापणार नाहीत तर काय? किती वर्तमानपत्रांनी गावोगावची प्राथमिक आरोग्य केंद्रे कशी रखडत चाललीयत, याचा प्रश्न लावून धरला? भांडवली माध्यमे खाजगीकरणाची पाठीराखी आज नाहीत, गेल्या ४० वर्षांपासून आहेत. ती फक्त तुटवडा, गैरकारभार, बेफिकीरी आणि अस्वच्छता यांच्या बातम्या देतील. पण त्यामागचे सरकारी धोरण आणि गावोगावी उघडलेली महागडी वैद्यकीय उपचार केंद्रे यांची ‘अंदर की बात’ कधीही सांगणार नाहीत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

म्हणून मीडिया ताळ्यावर आलाय म्हणजे तो सरकारी बेपर्वाईची कारणमीमांसा करतोय, अशा अर्थाने अजिबात नव्हे. ती तो करील तर चकचकीत हॉस्पिटलांच्या जाहिराती कशा मिळतील? निदान आज सरकारी कारभाऱ्यांना तो दोषी धरतोय तरी. उद्या सारा दोष खाजगी हॉस्पिटलवाल्यांना तो देणारही नाही. खाजगीकरणाचे सत्ताधारी कसे चाहते असतात आणि तीच खाजगीकरणातली वैद्यकीय सेवा कशी पूर्णपणे कोलमडली याच्याशी त्यांचे काही देणेघेणे नाही, एवढाच साक्षात्कार माध्यममालकांना झालेलाय. त्यामुळे तो आपल्याबरोबर रडतोय, आसवे गाळतोय. कित्येक वर्षांनी कोविडच्या निमित्ताने या खाजगी, श्रीमंत, झगझगीत रुग्णालयांची भुसभुशीत माती जगाला दिसली एवढेच काय ते माध्यमांचे काम. या भुसभुशीत मातीतून उगवलेल्या राजकीय संस्कृतीचे पापही या वेळी दिसले.

समता, न्याय, समाजवाद यांची कायम हेटाळणी करणाऱ्यांना शिक्षण, आरोग्य, वाहतूक व दूरसंवाद या क्षेत्रांत सरकारची गुंतवणूक महत्त्वाची असते, याचा उलगडा झाला तरी या ताळ्यावर आलेल्या माध्यमांनी उपकार केले असे मानू या.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......