राष्ट्रीय पर्यायाची राजकीय दिवाळखोरी!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
  • Sat , 08 May 2021
  • पडघम देशकारण बंगाल West Bengal ममता बॅनर्जी Mamata Banerjee नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP तृणमूल काँग्रेस Trinamool Congress

कुणाला तरी दैवत्व प्राप्त करून द्यायला श्रद्धाळू माणसाला जसं आवडतं, तसंच आपल्या राजकारणी, त्यातही विशेषत: राजकीय विश्लेषकांना नेहमीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध एका पर्यायाचा म्हणजे ‘हिरो’चा शोध असतो. पर्याय शोधण्याचा हा ‘खेळ’ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे. आधी व्यक्ती म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहाद्दूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी प्रभृतींना पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाले आणि त्यांना यश आलं नाही. पर्याय शोधण्याच्या या खेळात दुसर्‍यासोबत तिसरा, चौथा असे पर्याय आले आणि कधी विरून गेले हे कळलंही नाही.

या देशावर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील दीर्घकाळ सरकार होतं. त्या सरकारलाही पर्याय शोधण्याचे प्रयत्न राजकीय पातळीवर सुमारे सहा दशकं अव्याहत सुरू राहिले. आता २०१४ पासून नरेंद्र मोदी आणि भाजपला पर्याय शोधण्याचा खेळ सुरू झालेला आहे. अशा पर्यायाच्या खेळाला एक चेहरा लागतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश संपादन करणारा ममता बॅनर्जी यांचा चेहरा या आठवड्यात नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून पुढे आला असल्याचा निर्वाळा तथाकथित राजकीय विश्लेषक आणि काही नेत्यांनी दिला आहे. प्रस्थापितांना कोणताही पर्याय हा सुरुवातीला तरी मृगजळच ठरत असतो. मृगजळाचा वास्तवाशी संबंध नसतो. ममतादीदींनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बलाढ्य भारतीय जनता पक्ष आणि राजकीय ‘महाबली’ नरेंद्र मोदी व अमित शहा या दुक्कलीला पाणी पाजलेलं असलं तरी, त्यांचं नेतृत्व राष्ट्रीय असणं हे या घटकेला मृगजळच आहे.

सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी होणं सोपं नाही. ममतादीदींचं यश हा दीर्घ संघर्षाचा प्रवास आहे. २००१च्या लोकसभा निवडणुकीपासून ममता आणि तृणमूल काँग्रेसचा उदय पश्चिम बंगालच्या राजकारणात झाला. २०११च्या निवडणुकीत १८४ जागा मिळवून त्यांनी ३४ वर्षं भक्कम असलेला डाव्यांचा गड भुईसपाट केला. २०१६च्या निवडणुकीत त्यांनी २११, तर आता २१२ जागा मिळवल्या. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही पक्षाला असं यश मिळवता आलेलं नाही. त्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज, राज्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड आणि मतदारांच्या मनावर मोहिनी असावी लागते, अगदी तळागाळापर्यंत संपर्क असावा लागतो आणि करिष्मा जर त्यासोबत असेल तर निवडणुकीच्या बाजारात त्या नेतृत्वाला सोन्याहून जास्त किंमत येते, हे ममतादीदींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे, याबद्दल दुमत होण्याचं कारणच नाही.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

आत्मचरित्र हा वाचकप्रिय वाङ्मय प्रकार आहे. I-Transform आयोजित आमच्या ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळेत सहभागी व्हा!

आपण सगळे मिळून चर्चा करूया. लेखन सगळ्यांना जमेल असं नाही. पण या वाङ्मय प्रकाराविषयी सजग होऊया. खूप आत्मचरित्रांविषयी ऐका. कदाचित तुमच्या आयुष्यातल्या समस्यांची उत्तरं सापडून जातील. कदाचित तुमच्या लेखनाचा मार्ग सापडेल.

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

बहुदा त्यामुळेच भारावून जाऊन (नंदिग्राम मतदारसंघातून ममतादीदी पराभूत झाल्या असल्या तरी) त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनं मिळवलेल्या विजयाच्या बातम्या लिहूनही होत नाही, तोच नरेंद्र मोदी आणि भाजपला पर्याय राष्ट्रीय राजकीय पर्याय म्हणून त्यांचं नाव पुढे यावं, हे आपल्या देशातील बहुसंख्य राजकीय विश्लेषक किती उथळ विचार करतात, याचं उदाहरण समजायला हवं.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि डावे पक्षही मैदानात होते, पण ममतादीदी म्हणजे तृणमूल काँग्रेसचा विजय म्हणजे, भाजपचा पराभव झाला म्हणून डावे पक्ष आणि काँग्रेसनं राष्ट्रीय आनंद व्यक्त करण्याला राजकीय विरोधाभास आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसनं मिळून काँग्रेस आणि डाव्यांची नामोनिशाणी पश्चिम बंगालच्या विधानसभेत शिल्लक ठेवलेली नाही, तरी काँग्रेस आणि डाव्यांनी आनंद करण्याला खरं तर राजकीय दिवाळखोरीही म्हणायला हवी.

शिवसेना, (महा)राष्ट्रवादी, डीएमके इत्यादी पक्षांचं तर नाममात्रही अस्तित्व पश्चिम बंगालमध्ये नाही, या पक्षांचा म्हणूनच उमेदवार तिकडे रिंगणात नव्हता. या तिन्ही पक्षांचे कुणी नेतेही ममतादीदींच्या समर्थनासाठी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला गेलेले नव्हते, तरीही या पक्षांच्या नेत्यांनी आनंद व्यक्त करणं म्हणूनच ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’सारखं आहे.

निकालाच्या वार्ता विरतात न विरतात तोच ममतादीदींनी सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधून नरेंद्र मोदी आणि भाजपला पर्याय म्हणून उभं राहावं, अशी अपेक्षाच नाही, तर स्वप्नरंजनही अनेक राजकीय विश्लेषकांनी सुरू केलं आणि त्याला काही नेत्यांनीही मान डोलावलेली आहे. प्रादेशिक पक्षाचा राज्यनिहाय विचार केला, तर समोर येणारं चित्र ममतादीदींना पर्याय ठरवण्यासाठी मुळीच पोषक नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड, कर्नाटक, झारखंड इत्यादी राज्यात मिळून लोकसभेच्या सुमारे १५० जागा आहेत आणि यापैकी एकाही राज्यात प्रबळ प्रादेशिक पक्षच अस्तित्वात नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि (महा)राष्ट्रवादी असे दोन प्रादेशिक पक्ष आहेत. लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी या दोन्ही पक्षांचे मिळून २३ सदस्य लोकसभेत आहेत, पण शिवसेनेचे १८ उमेदवार भाजपसोबत युती करून आणि भाजपचे उमेदवार सेनेच्या पाठिंब्यावर विजयी झालेले आहेत, असा हा जांगडगुत्ता असून येत्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांची स्वबळाची झाकली मूठ उघडी पडेल.

तिकडे उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी प्रादेशिक पक्ष बसपच्या ताब्यात १० आणि समाजवादी पक्षाच्या ताब्यात १० जागा आहेत. कम्युनिस्ट आणि मार्क्सवाद्यांचे पानिपत झालेले आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून तृणमूल काँग्रेसचे २५ सदस्य आहेत. तमिळनाडूत  डीएमके, भाजपच्या विरोधात असून या पक्षाचे २४ लोकसभा सदस्य आहेत. उत्तर प्रदेशातल्या ८० पैकी १० जागा बसप आणि समाजवादी पक्षाकडे ५ जागा आहेत. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह आणि मायावती यांनी स्वबळावर सत्ता संपादन केलेली होती, हे सध्या तरी स्मरण रंजन आहे. कारण आता हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष कसेबसे तग धरून आहेत. (आत्ताच आलेल्या निकालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने भाजपवर आघाडी घेतलेली आहे. म्हणजे या स्मरणरंजनात अजून धुकधुकी आहे!)

डीएमके तमिळनाडूच्या बाहेर नाही. अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’चा राष्ट्रीय प्रयोग सपशेल फसलेला आहे. तेलंगणात चंद्रशेखर राव तसंच आंध्रप्रदेशात जगन मोहन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू हे सर्वांसोबत आहेत, पण कुणासोबतही नाहीत, अशी विचित्र परिस्थिती असते. भाजप विरोधकांची ही सर्व गोळाबेरीज केली तर शंभरच्या आसपास जेमतेम पोहोचते. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानपदाचा पर्याय म्हणून ५५२ सदस्यांच्या सभागृहात पाठिंबा देणाऱ्या सदस्यसंख्येची शंभरीही न गाठलेल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्या ममतादीदी पंतप्रधानपदाच्या उमेदवार ठरवल्या जाणं, ही किमान अंकशास्त्र न समजणारी राजकीय दिवाळखोरीच म्हणायला पाहिजे.

ममतादीदी आणि डाव्यांतील वैर साताजन्माचं आहे. म्हणजे डावे त्यांना राष्ट्रीय नेतृत्व करण्यासाठी पाठिंबा देणार नाहीत आणि त्या तो घेणारही नाहीत हे उघड आहे. डावे आता केवळ केरळपुरते मर्यादित आहेत. शिवाय अणुकराराच्या वेळी घेतलेल्या भूमिकेमुळे डाव्यांच्या विश्वासाहर्तेचा बाजार तसाही उठलेला आहेच. एकुणातच डाव्यांची अवस्था सध्या देशाच्या राजकारणात उरलो केवळ नावापुरता अशी झालेली आहे, म्हणजे असल्या-नसल्या डाव्या सदस्यांच्या पाठिंब्याचा मुद्दा आधीच निकाली निघतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

शिवाय प्रादेशिक पक्ष जितके त्या प्रदेशापुरते मजबूत तितकीचं त्यांची प्रादेशिक अस्मिता तीव्र. अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांचे नेते हे त्यांच्या प्रदेशापुरते सार्वभौम असतात आणि दिल्लीत त्यांचं स्थान एखाद्या सरदारापेक्षा मोठं नसतं. ही खंत मनात बाळगून त्यांचे अहंकार अतिशय तीव्र असतात आणि वरकरणी एकतेची किती भाषा केली तरी अन्य कोणाचं नेतृत्व मान्य करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते, हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे.

उदाहरण द्यायचं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे झेंडे घेऊन चालणारे असंख्य पक्ष आपल्या देशात आहेत, पण संघटित शक्ती म्हणून ते कधीच एका झेंड्याखाली येत नाहीत. काँग्रेसला पर्याय म्हणून कर्पूरी ठाकूर ते अरविंद केजरीवाल मार्गे व्ही. पी . सिंग असा हा व्यापक पट आहे आणि त्या नावातच त्यांच्या मर्यादा लपलेल्या आहेत, कारण यापैकी कोणताही नेता देशभर पाय रोवून उभा राहू शकलेला नाही, हे आपण लक्षात घेतं पाहिजे. मुलायम सिंह, मायावती, चंद्रशेखर राव, जगन मोहन रेड्डी, स्टॅलिन, चंद्राबाबू हे नेते स्वबळावर त्यांच्या राज्यात सत्तेत आले. आपल्या महाराष्ट्राचे शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांना तर तेही अद्याप जमलेलं नाही. (सध्या सत्तेत असूनही विधानसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून आताच्या घटकेला जेमतेम १०० सदस्य आहेत.) तरी हे सर्व नेते प्रादेशिक स्तरावर मोठे आहेत आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षाही मोठ्या आहेत. त्यांना मुरड घालून हे सर्व नेते ममतादीदींचं नेतृत्व मान्य करणं जवळ जवळ अशक्यच आहे.

ममतादीदी जर पंतप्रधानपदाच्या उमेदवार असतील तर शरद पवार, मुलायम सिंह, मायावती यांच्या या पदाच्या इतकी वर्षं पाहिलेल्या स्वप्नाचं काय होणार, हाही एक अत्यंत कळीचा आणि भावनात्मक अस्मितेचा मुद्दा आहे. शिवाय हे सर्व नेते आणि त्यांचे पक्ष देशासाठी राज्याच्या कक्षा ओलांडून प्रादेशिक अस्मिता म्यान करू शकत नाहीत. त्यामुळे राज्यातली सत्ता त्यांच्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वापेक्षा कायमच मोलाची आहे. म्हणून ते कुठेही असले तरी त्यांचा जीव राज्यातच अडकलेला असतो. या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत मुलायम आणि ममतादीदी यांची उदाहरणे देता येतील. त्या अर्थाने हे सर्व प्रादेशिक नेते नावालाच राष्ट्रीय आहेत, म्हणजे सध्याच्या भाषेत ‘लोकल-ग्लोबल’ आहेत! ही टीका नाही तर ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळेही ममतादीदींकडे भाजपला पर्याय म्हणून बघणं हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पेक्षा जास्त काही नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भारतीय जनता पक्षाला पर्याय उभा करायचा असेल तर आधी संघटनात्मक बाजू अतिशय बळकट करावी लागेल. लोकसभेत दोनवरून तीनशे ही मजल मारताना भाजपनं राजकारण आणि संघटना या दोन्ही पातळ्यांवर तीन-साडेतीन दशकांपेक्षा जास्त काळ कशी-कशी आणि कुठे-कुठे मेहनत घेतली, कोणती नवी समीकरणे जन्माला घातली, मतांचे ध्रुवीकरण कसं केलं, याचा सूक्ष्म अभ्यास करून पर्यायाची बांधणी त्यापेक्षा व्यापक करावी लागेल. इतकी चिकाटी, जिद्द, प्रदीर्घ काळ काम करण्याची क्षमता आपल्या देशातल्या एकाही प्रादेशिक पक्षात सर्व पातळ्यावर आज तरी नाही. अर्थात या विधानाला शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममतादीदी हे व्यक्तिगत पातळीवर अपवाद आहेत.

राष्ट्रीय पातळीवर साधारण २०१०पर्यंत काँग्रेस हा एकमेव पक्ष देशभर तळागळात पसरलेला होता. ती जागा आता भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे तरी काँग्रेसची पाळंमुळं अजूनही अस्तित्वात आहेत. ती घट्ट करण्यासाठी काँग्रेसमधून सक्षम नेतृत्व पुढे यायला हवं; तसं ते आलं तर काँग्रेसच्या ‘श्रेष्ठी’ आणि हुजर्‍यांना ते मान्य व्हायला हवं किंवा वर उल्लेख केलेल्या सर्व प्रादेशिक नेत्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन तन-मन-धन पणाला लावून प्रयत्न करून भाजपला पर्याय उभा करायला हवा, पण असं घडणं शक्य नाही कारण ‘आत्याबाईला मिशा नसतात’. म्हणूनच ममतादीदींकडे राष्ट्रीय पर्याय म्हणून पाहणं आज तरी मृगजळ आहे! 

Disclaimer - याचा अर्थ नरेंद्र मोदी यांना पर्याय नाहीच असा मुळीच नाही. आजच्या घटकेला तो भाजपमधूनच पुढे यावा लागेल. त्यासाठी परिवाराची संमती लागेल आणि सध्या तशी कोणती झुळूकही नाही!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......