अजूनकाही
शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे नात्यानं मामा-भाचे. मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात सुधीर जोशी महसूल मंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मामांविषयी सुधीर जोशी यांची एक मुलाखत प्रकाशित झाली होती. त्यात एक प्रश्न होता – ‘मनोहर जोशी यांच्या स्वभावातला सगळ्यात स्ट्राँग पॉइंट कोणता?’
त्यावर सुधीर जोशी यांचं उत्तर होतं, ‘त्यांना लक्ष्याचा एकच डोळा दिसतो.’
लगेच दुसरा प्रश्न होता आणि ‘वीक पॉइंट कोणता?.’
सुधीर जोशी यांचं उत्तर होतं, ‘त्यांना लक्ष्याचा एकच डोळा दिसतो.’
तत्कालिन राजकीय संदर्भ माहिती असणाऱ्यांना सुधीर जोशी यांचं टायमिंग आणि त्यांच्या उत्तरातील खोच सहज लक्षात येईल. मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशी यांचं नाव ठरलं होतं, पण ऐनवेळी ती खुर्ची पटकावली मनोहर जोशी यांनी, असा तो संदर्भ आहे. एखाद्या माणसाचा स्ट्राँग आणि वीक पॉइंट एकच कसा आहे हे सुधीर जोशी यांचं निरीक्षण निश्चितच जबरदस्त आहे. (सुधीर जोशी यांनीच ही हकिकत दोन-तीन वेळा आम्हा काही पत्रकारांना सांगितलेली आहे.)
ही हकिकत आठवण्याचं कारण राज ठाकरे आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडल्यावर झालेल्या पहिल्याच मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश संपादन करून महाराष्ट्राच्या राजकारणाचं मध्यवर्ती केंद्र झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आज अस्तित्वाची लढाई लढत आहेत. याचं कारण जे त्यांचे स्ट्राँग पॉइंट होते, तेच नंतरच्या काळात त्यांचे वीक पॉइंट ठरलेले आहेत.
राज ठाकरे यांनी सेना त्याग (२७ नोव्हेंबर २००५) केला, तो शिवसेनेत परिवर्तनाचा काळ होता. बाळासाहेब ठाकरे वयोमानानुसार थकलेले आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सेनेत स्थिरावू लागण्याचे ते दिवस होते. उद्धव यांच्याकडे बाळासाहेब यांचा करिष्मा, वक्तृत्व, संघटन कौशल्य नव्हतं किंवा असलं तर ते सिद्ध व्हायचं होतं (ते पुढच्या काळात सिद्ध झालं!). शिवाय राजकीय पक्ष चालवण्याचा अनुभव नव्हता. सेनेच्या तोवरच्या आक्रमक परंपरेला (आणि राड्याला) प्राधान्य न देणारी उद्धव यांची सौम्य उक्ती आणि कृती बहुसंख्य शिवसैनिकांना न रुचणारी होती. राडा करणारा पक्ष या प्रतिमेतून सेनेला बाहेर काढून एक गंभीर राजकीय पक्ष असं रूपडं देण्याच्या दिशेने उद्धव यांनी हालचाली सुरू केलेल्या होत्या. मुंबईबाहेर पडून शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करून सेनेचा पाया आणखी व्यापक आणि लोकाभिमुख करण्याचा उद्धव यांचा प्रयत्न होता. मराठी हा सेनेचा अजेंडा काहीसा मागे पडला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी बाजूला सारून एक नवी टीम उभारण्याच्याही दिशेनं उद्धव यांच्या हालचाली सुरू होत्या.
उद्धव यांच्यामध्ये जे नव्हतं ते नेमकं राजमध्ये लोक बघत होते. सेनेची विद्यार्थी आघाडी सांभाळत असताना ‘पेहराव ते वक्तृत्व’ अशा सर्वच बाबतीत राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिकृती झालेले होते. सेना-भाजप युतीच्या काळात सत्तेच्या दालनात राज ठाकरे हेच बाळासाहेब यांचे राजकीय वारसदार असतील असा समज होता. राज आल्याचा निरोप मिळताच मंत्रीच नाही, तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही शिष्टाचार सोडून त्यांच्या स्वागताला सामोरे जात असत, अशी त्यांची ऐट अनुभवायला येत असे. बाळासाहेब ठाकरे नावाच्या काकाचं आणि आणि एका राजकीय नेत्याचं केवळ अनुकरण राज ठाकरे यांच्यात नव्हतं तर, त्यांचं राजकीय आकलन व्यापक होतं. भाषण करताना अभिनय, हजरजबाबीपणा आणि टायमिंग असं बेमालूम कसब त्यांच्यात होतं. नितीन गडकरी आणि अजित पवार यांच्यातही एक रांगडा पण लोभस स्पष्टवक्तेपणा आहे आणि तो अनेकांना मनापासून भावतो. राज ठाकरे यांचा स्पष्टवक्तेपणात (सत्तरीच्या दशकातल्या अमिताभच्या भूमिका सदृश्य) अंगार व उपहास ठासून भरलेला होता. त्याची भुरळ तरुणांना पडलेली होती. ‘अरे’ला ‘कारे’ करण्याचा त्यांचा स्वभावही तरुणाईला आकर्षित करणारा. त्यांच्यात एक व्यंगचित्रकार आणि त्यांची सांस्कृतिक समज प्रगल्भ; तसंच सांस्कृतिक जगतात त्यांचे तोवर अनेकांशी अंतरंगी संबंध निर्माण झालेले. विद्यार्थी सेनेचं काम करत असल्यानं तरुण वयातच मुंबईसोबत राज्यभर तालुका पातळीपर्यंत त्यांचं नेटवर्क निर्माण झालेलं होतं. त्यामुळेच बहुदा उद्धवमुळे शिवसेना मवाळ होण्याची शक्यता नामंजूर असणारा शिवसैनिक, सेनेबाहेरचा तरुण वर्ग आणि सर्ववयीन महिलांमध्ये राज नावाची क्रेझ निर्माण होऊ लागली. सेना-भाजप युतीच्या काळात केणी प्रकरण गाजत असताना केव्हाही गजाआड जाण्याची भीती दाटून आलेली असतानाही वयाला न शोभेसं एक पोक्तपण राज यांच्या व्यक्तिमत्त्वात अनुभवायला मिळायचं. एकूण काय तर, एक लोकप्रिय नेता होण्याची पुरेपूर सामग्री राज ठाकरे यांच्यात ठासून भरलेली होती. या सर्व जमेच्या बाजू घेऊन राज यांनी वाजत गाजत बाणेदारपणे सेना सोडली.
महाराष्ट्रात जन्मला तो मराठी आणि मराठी माणसासाठी काय वाट्टेल ते (म्हणजे सेनेपेक्षा दोन पाऊलं पुढे जाऊन राडा करण्याची तयारी!) दर्शवत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना (९ मार्च २००६) केली. ‘मला महाराष्ट्र घडवायचा आहे’, ‘काही कमावण्यासाठी मला सत्ता नकोय’ अशी ग्वाही दिल्यावर तर राज ठाकरे यांची क्रेझ आणखी वाढली. ते तरुण आणि महिलांच्या गळ्यातील ताईतच झाले. अन्य नेते करिअर म्हणून राजकारणाकडे बघत असताना राज ठाकरे नावाचा नेता महाराष्ट्राच्या विकासाचं डाक्युमेंट सादर करत असल्याची भाषा करू लागला. हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीनच होतं. अगदी राष्ट्रीय नेत्याच्या सभेलाही गर्दी जमवताना अन्य पक्षांची दमछाक होत असताना राज ठाकरे यांची सभा म्हटली की, किमान लाखावर लोक, हे समीकरण झालं. तेव्हा राज नावच्या ‘क्रेझ’नं अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पोटात गोळा उठला होता. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात गेलं तरी राज ठाकरे अमुक रस्त्यानं जाणार असल्याचं कळलं तरी लोक दुतार्फा गर्दी कशी करायचे, हे एक पत्रकार म्हणून मी अनुभवलं आहे. (दिल्लीत पत्रकारिता करत असतानाही असाच अनुभव आला. उत्तर भारतात कुठंही फिरताना आपण मराठी असल्याचं कळलं की, ‘ये राज ठाकरे दिखता कैसा है? अंगार भरा है क्या उसमे? आप मिले है क्या उनसे?’ अशा प्रश्नांचा भडीमार झेलायला मिळालेला आहे!) त्यातच पहिल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’नं नेत्रदीपक यश मिळवलं. मग, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मनसे राज्यात सिंगल लार्जेस्ट आणि २०१९च्या निवडणुकीत सत्ताधारी होणार, राज ठाकरे मुख्यमंत्री होणार असं (सेनेचा-भाजपचा हिंदुत्ववाद अमान्य असणाऱ्याही), संपादक तसंच राजकीय वृत्तसंकलन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या ‘बैठकां’त खुलेपणानं आणि कौतुकानं बोललं जाऊ लागलं. राज ठाकरे यांच्यात नेतृत्वाचे गुण आहेत, असं प्रशस्तीपत्र साक्षात शरद पवार यांनी दिलं. स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांच्या आत एखाद्या राजकीय पक्ष आणि नेत्याला असा करिष्मा प्राप्त होण्याची, तो नेता राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी जाण्याची ही महाराष्ट्रातली तरी पहिलीच वेळ होती.
पण, गल्लत इथेच झाली लोकांचामिळणारा प्रतिसाद हा पाठिंबा नाहीये हे राज ठाकरे यांना समजलं नाही. हा प्रतिसाद पाठिंब्यात बदलवून घेण्याचं (काही लोकांनी सुचवूनही) त्यांना उमजलंच नाही. राज यांचा आदर्श असणारे बाळासाहेब ठाकरे हे जितके राजकीय तितकेच सांस्कृतिक होते, पण या दोन्हीतील सीमारेषा त्यांना चांगली ठाऊक होती. शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, ‘दादू’ उद्धव ठाकरे हेही सांस्कृतिक भान असणारे, पण त्या सांस्कृतिकतेचा अतिरेक मात्र त्यांनी होऊ दिला नाही. इकडे ‘मनेसे’चा कार्यक्रम मात्र आधी अमिताभशी पंगा, नंतर सुलुख, ’या नटाला बंदी’ , ‘त्या गायकाला मनाई’, हा चित्रपट नको’ असे फतवे काढणे आणि लगेच ते फतवे मागे घेणे असा झाला.
थोडक्यात, ‘राजकीय मनसेची ’चित्रपट सेना‘ झाली असं दिसू लागलं. ‘टोल’ विरोधासारखं लोकप्रिय आंदोलन अचानक थंड करून आपल्या कृतीला राज यांनीच संशयाच्या भोवऱ्यात अडकवून टाकलं. मिळालेल्या यशानं राज ठाकरे सरंजामी गाफील बनले. जे त्यांचे प्लस पॉइंट आणि पर्यायाने शक्तीस्थान म्हणून ओळखलं जात होतं, त्याच गुणांनी राज ठाकरे यांच्यात एक असमर्थनीय राजकीय शैथिल्य आणलं. यशाइतकी गहरी गुंगी अन्य कशाचीच नसते, असं जे म्हणतात, तसंच घडत गेलं. त्यांचा तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी असणारा संपर्क तुटला. त्यामुळे नाशिक महापालिकेतील ‘मनसे’ची चांगली कामगिरी झाकोळली गेली, लोकांसमोर आलीच नाही.
राजकीय कार्यक्रम नसल्यानं पक्ष हळूहळू आकुंचन पावू लागला. लोकसभा निवडणुकीत तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची त्यांची कृती पूर्णपणे पायावर धोंडा पाडून घेणारी ठरली. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी तसंच शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली आणि आघाडी व युतीला पर्याय म्हणून तिसऱ्या स्थानावर असणारी मनसे पाचव्या स्थानावर फेकली गेली. स्वतंत्र लढूनही सेना तसंच भाजपची ताकद वाढली आणि मनसेचं महत्त्व ओसरलं. वाट्याला मोठ्ठा पराभव आला आणि कार्यकर्ते, विविध निवडणुकात विजयी झालेले उमेदवार मनसे सोडून जाऊ लागले. ही पाचवी जागा महत्त्वाची आहे किंवा नाही हे या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.
आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे जाणं म्हणजे त्यांनी शिवसेना सोडण्याची चूक केली, हे मान्य करत शरणागतीचं पांढरं निशाण फडकावण्यासारखं झालं. मराठी माणसाचा इतका पुळका होता तर मग तेव्हाच शिवसेना का सोडली, तेव्हा कुठे गेला होता हा मराठी हिताचा मुद्दा, असे प्रश्न शेंबडा सैनिकही समाज माध्यमातून विचारू लागलं. राज यांचा (बिनशर्त युतीचा?) प्रस्ताव नाकारून ‘एकही मारा मगर, क्या सॉलिड मारा’सकट आजवर झालेल्या सर्व उपमर्दांचा शिवसेनेनं सूड उगवला. सेनेला युतीचा प्रस्ताव देण्याची राज यांची कृती चुकलीच. पु. ल. देशपांडे यांच्या एका लेखाच्या शीर्षकाचा आधार घेऊन सांगायचं तर – ‘राज, तुम्हारा चुक्याच!’ या प्रस्तावामुळे मनसेच्या मनोधैर्याचं खच्चीकरणच झालं आणि हा प्रस्ताव स्वीकारुन वडीलधारा उमदेपणा दाखवण्याची संधी उद्धव ठाकरे यांनीही हातची गमावली...
अर्थात सर्व काही संपलेलं नाही. राजकीय पक्षाच्या आणि त्या पक्षाच्या नेत्याच्या वाट्याला असे नाउमेदीचे , कठीण कसोटीचे अनेक प्रसंग येत असतात. राजकीय जीवनात चढ-उतार आणि निवडणुकीत पराभव होतच असतात. जो नेता पराभवात रमतो तो त्यातून बाहेरच येऊ शकत नाही
राज ठाकरे पराभवात रमणारे नेते नाहीत आणि ती त्यांची ओळख नाही. ती त्यांची वृत्ती तर नाहीच नाही. पराभूत अगतिक केविलवाणे राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना ,मनसेबाहेरच्या त्यांच्या चाहत्यांना आणि खुद्द राज ठाकरे यांनाही नको असणारच. पूर्वपरिचित फायर ब्रँड आणि चैतन्यानं सळसळलेले राज ठाकरे पाहण्यास सर्वच उत्सुक आहेत.
लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment