अजूनकाही
सध्या करोनासंदर्भात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी आणि त्याविषयीच्या उलटसुलट बातम्यांनी बहुतेकांच्या चिंतेमध्ये (आणि भीतीमध्येही) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात कोणती न कोणती चिंता जाणवत असते. छोटे-छोटे प्रसंगही चिंता निर्माण करतात. उदा. आपला चष्मा किंवा चावी वेळेत न सापडणं. या घटना तशा सामान्य, पण त्यांच्यामुळेही अनेक जण विचलित होतात. खरं तर अशा घटना घडूच नयेत म्हणून काळजी घेणं आपल्या हातात असतं. परंतु अति काळजी घेण्यानंही चिंता निर्माण होण्यास सुरुवात होते.
मानसशास्त्रज्ञांनी शास्त्रीयदृष्ट्या चिंतेची काही लक्षणं सांगितली आहेत. अस्वस्थता, लवकर थकवा जाणवणं, चित्त एकाग्र करता न येणं, चिडचिडेपणा, झोप न येणं, नाडीच्या ठोक्याचा वेग वाढणं, चक्कर येणं, निर्णय घेता न येणं, ही लक्षणं चिंता निर्माण करतात. सर्व काही व्यवस्थित चाललं आहे, असं जाणवत असलं, तरी अशी माणसं सतत चिंतातूर असतात. उदा. घरातील एखादा सदस्य काही कामासाठी बाहेर गेलेला असला तरी अशी माणसं चिंतातूर होतात. तो व्यवस्थित घरी पोहेचेल का? त्याला गाडी चालवता येईल का? त्याला पोलीस तर अडवणार नाहीत ना? त्याच्याकडे लायसन्स आहे का? ज्या कामासाठी तो गेला आहे, ते पूर्ण होईल का? गाडीत पुरेसं पेट्रोल आहे का? असे अनेक प्रश्न पडतात. तो सदस्य सुखरूप घरी आल्यानंतरसुद्धा चिंता कमी होते असंही नाही.
म्हणून जगविख्यात मानसशास्त्रज्ञ फ्राइड असं म्हणतात की, माणसाला त्रस्त करणाऱ्या मुक्त दिशाहिन विचारांना ‘चिंता’ म्हणतात. चिंताग्रस्त माणसाच्या मनात अनेक विचार येतात. एक विचार येऊन गेला की, लगेच दुसरा सुरू होतो. अशा सतत येणाऱ्या विचारानं माणूस ग्रस्त होत जातो. या विचारांना कोणतीही दिशा नसते. त्यांचा वास्तवतेशी संबंध असतोच असंही नाही. चिंतेला कोणताही एक विषय नसतो. कारण असा माणूस सातत्यानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करत असतो. त्याचं मन एका जागी स्थिर नसतं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
उदा. एखाद्या गृहिणीला आज आपला स्वयंपाकाचा गॅस संपेल का? संपला तर काय करायचं? या करोना टाळेबंदीच्या काळात किराणा सामान, भाजीपाला मिळेल का? असे एकामागून एक येणारे विचार त्रस्त करत राहतात. सततची चिंता माणसाला नाउमेद करते. सध्याच्या काळात तर सर्व जण घरातच आहेत. हातात स्मार्ट फोन आणि समोर टीव्ही. चोवीस तास चालू असणाऱ्या वृत्तवाहिन्यांमधून करोनाविषयीच्या अनेक बातम्या प्रसारित केल्या जात असतात. हे सर्व पाहून भीती निर्माण होते. आता आपलं काय होईल, अशी चिंता मनात घर करायला लागते.
चिंता कोणकोणत्या कारणांमुळे निर्माण होते, त्याचा मानसशास्त्रज्ञांनी अनेक अंगानं अभ्यास केला आहे. आपण जो विचार करतो, तो कोणत्या बाजूनं करतो, यावर चिंतेचं स्वरूप अवलंबून असतं, असं मत बेक आणि इमेरी या मानसशास्त्रज्ञांनी मांडलं आहे. माणसाच्या मनात नकारात्मक प्रतिमा आणि विचार असल्यामुळे चिंतेला सुरुवात होते. उदा. हे काम मला जमणार नाही, लोक मला काय म्हणतील, मला चांगलं काम करायला वेळच मिळत नाही, या जगात चांगलं काही घडतच नाही. सगळे लोक स्वार्थी आहेत, माझ्या जीवनात चांगलं काही घडतच नाही, असे नकारात्मक विचार मनात येत राहतात. त्याच विचारात माणसं गुरफटून जातात. अशी माणसं जगाकडे पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहतात. जे काही घडत आहे, ते योग्य नाही, असा विचार त्यांच्या मनात येत राहतो. त्यामुळे ती आणखी चिंताग्रस्त होत राहतात.
फ्राइड म्हणतात की, आपल्या व्यक्तिमत्त्वातील इदम (Id) आणि अहम (Ego) यांच्यातील संघर्षामुळे चिंतेची लक्षणं निर्माण होतात. इदम (Id)चं काम सुख तत्त्वानुसार चालतं, तर अहम (Ego)चं वास्तव तत्त्वानुसार चालतं. हा संघर्ष अबोध मनाच्या (Unconsciousness mind) पातळीवर चालू असतो. माणसात नैसर्गिकपणे काही इच्छा, प्रेरणा, भावना, वासना निर्माण होत असतात. परंतु त्या सर्वच्या सर्व पूर्ण करता येत नाहीत. ज्या पूर्ण होत नाहीत, त्या अबोध मनात दाबून ठेवल्या जातात.
उदा. लैंगिक इच्छा निर्माण झाल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी, असं इदमला वाटतं. आज, आत्ता, ताबडतोब मला सुख मिळालं पाहिजे, अशी इदमची इच्छा असते. परंतु त्याच वेळी अहम (Ego) जागा होतो. तो वास्तवतेची जाणीव करून देतो. हे सुख आता आपणाला मिळणार नाही, कारण लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी समाजानं काही नियम, नीतीतत्त्व, मानदंड घालून दिलेले असतात. त्यांचं पालन करणं आवश्यक असतं. त्यामुळे अहम इदमला वास्तवतेची जाणीव करून देतो. त्याच्या इच्छा दाबून टाकतो. या दोघांचा संघर्ष अबोध मनात सुप्त स्वरूपात चालू असतो. त्याची जाणीव आपल्याला नसते. अशा अतृप्त इच्छा दडपून ठेवल्यामुळे त्या वर येण्याचा प्रयत्न करतात. त्याचा प्रभाव वर्तनावर पडतो. थोडक्यात इदमच्या आवेगांना आविष्काराची संधी न मिळाल्यामुळे माणसामध्ये चिंता निर्माण होते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
काही वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी यापेक्षा वेगळं मत मांडलं आहे. माणसाच्या आयुष्यात ज्या काही घटना, प्रसंग घडतात, त्या प्रत्येकावर त्याचं नियंत्रण नसतं. त्यामुळे चिंता बळावते. उदा. चोरी, दुष्काळ, पूर, रोगराई, भूकंप, अपघात, आग इत्यादी.
शरीरशास्त्रानुसार आपल्या शरीरात होणारे बदल चिंता निर्माण करतात. अनुवांशिक घटकामुळेही चिंता निर्माण होते. आधीच्या पिढीकडून जे काही जीन्स, रंगसूत्रे संक्रमित होतात, त्यात काही दोष असतील, तर ते पुढच्या पिढीमध्ये येतात. त्या संदर्भात संशोधनात्मक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मेंदू जैवरसायन म्हणजेच मज्जापेशी द्रव्या (Neurotransmitter)ची भूमिका चिंता निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. गॉबा (Gaba- gama amino butyric acid) या जैव रसायनाच्या कमतरतेमुळे चिंता बळावते. पण ‘बेझोडीयाझेपाइन’ या औषधामुळे मेंदूतील लिंबिक यंत्रणेमधील गॉबाची कार्यात्मकता वाढते आणि चिंतेची पातळी कमी होते.
चिंता हा मनोविकार असला तरी तो दूर करता येतो. आपण चिंतेनं ग्रासलेले आहोत, याची जाणीव झाली की, वेळीच उपाययोजना करणं गरजेचं असतं. रॉजर्स या मानसतज्ज्ञाने ‘व्यक्तीकेंद्रित उपचार’ पद्धत सांगितली आहे. ‘रुग्ण’ या शब्दातून वेगळा अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे चिंताग्रस्त माणसाला ‘रुग्ण’ न म्हणता ‘सल्लार्थी’ म्हटलं पाहिजे, असं रॉजर्स यांचं मत आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात त्याच्या विकासाचं बीज सुप्त स्वरूपात दडलेलं असतं. परंतु त्याच्या सभोवतालचं वातावरण, परिस्थिती अडथळे निर्माण करतात. त्यामुळे चिंता निर्माण होतात. उदा. पालक आपल्या मुलावर तू मेडिकलला गेला पाहिजेस, सतत अभ्यास केला पाहिजेस, असा दबाव टाकत राहतात. परिणामी मुलामध्ये चिंता निर्माण होतात.
बऱ्याच वेळा आपण कुटुंबातील सदस्यांनी नैसर्गिक पद्धतीनं वर्तन करण्यावर बंधनं घालतो. मग त्यांच्या तक्रारी चालू होतात. मला हे जमत नाही, ते जमत नाही. शेवटी ते आत्मविश्वास हरवून बसतात. त्यातून अनेक मानसिक विकार जन्माला येतात. उदा. लहान मुलांना त्यांचे आई-वडील, नातेवाईक ‘असं बोलू नकोस, ते करू नकोस; हे चांगलं आहे, ते वाईट आहे’ असं सतत बोलत असतात. त्यामुळे मुलांमधील नैसर्गिक प्रवृत्ती दाबली जाते किंवा त्यांच्या प्रगतीवर बंधनं येतात. या लादलेल्या बंधनांचा मुलं अनिच्छेनं स्वीकार करतात. आपल्या आई-वडिलांना आवडेल असंच वर्तन करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये विकसित होते. त्याविरुद्ध वर्तन करणं चुकीचं आहे, असं स्वतःलाच सांगत ही मुलं एका चौकोनात बंदिस्त होत जातात. आपल्या जीवनात इतर अनेक पर्याय आहेत, हे ते विसरून जातात.
ही मुलं जेव्हा मोठी होतात, तेव्हा लहानपणची चौकट तशीच राहते. त्याच पद्धतीनं ते आपल्या भावना व्यक्त करतात, विचार करतात. चूक काय, बरोबर काय, आपण काय करतोय, हे त्यांना समजत नाही. त्यांच्या मनाचा सतत गोंधळ होत राहतो. त्यांच्यामध्ये हळूहळू मानसिक समस्या निर्माण व्हायला लागतात. सुरुवातीला त्या सुप्त स्वरूपात असतात. त्यामुळे त्यांची जाणीव होत नाही, पण नंतर गंभीर अशा मानसिक विकाराकडे वाटचाल सुरू होते.
माणसांमध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात, त्या सोडवण्यास ते पात्र असतात. तसा त्यांचा नैसर्गिक, मूळ स्वभाव असतो. फक्त त्यांना त्यांच्या पद्धतीनं वर्तन करू देणं अपेक्षित असतं. तसं वातावरण, परिस्थिती उपलब्ध करून दिली की, त्यांच्या प्रगतीचा आलेख चढता राहतो. व्यक्तिमत्त्वातील सुप्त गुण परिपूर्णतेच्या दिशेनं विकसित होत जातात. त्यासाठी व्यक्तिमत्त्वातील अदृश्य नियंत्रणं शिथिल करणं आवश्यक असतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
माणसाला समस्येतून बाहेर काढण्यासाठी रॉजर्स यांनी तीन उपाय सांगितले आहेत. १) सच्चेपणा किंवा अकृत्रिमता. यामध्ये चिंताग्रस्त माणसाशी संबंध ठेवत असताना कृत्रिमता न आणता, कोणतीही भूमिका न वठवता, कोणताही मुखवटा न चढवता सहजपणे संबंध ठेवणं, हितगुज करणं, बोलत राहणं गरजेचं असतं. २) त्याला सहानभूती दाखवणं, समजून घेणं, त्याच्या भावविश्वाचा वेध घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये जे आश्वासक गुण आहेत, ते ओळखून त्यासाठी त्याची स्तुती केली पाहिजे. त्याच्याकडे असणाऱ्या सकारात्मक गुणाकडे त्याचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. ३) समोरच्याचा बिनशर्त स्वीकार केला पाहिजे. प्रत्येकामध्ये काही न्यूनगंड असतात, आत्मविश्वासाचा अभाव असतो. अशा वेळी माणूस जसा आहे, तसा त्याचा स्वीकार केला पाहिजे. वास्तव स्वीकारलं पाहिजे. त्याला जे अपेक्षित आहे, तसंच त्याला प्रकट होऊ दिलं पाहिजे. आदराची, आपुलकीची, स्वागताची भावना त्याच्या व्यक्तिमत्त्वात रुजवणं गरजेचं असतं. म्हणजेच ‘तू कसाही असलास तरी एक सामान्य व्यक्ती म्हणून मला आदर आहे. तू तुझ्या समस्यांतून मार्ग काढण्यास समर्थ आहेस’, अशी स्वागतशील भावना त्याला आपल्याकडून प्रतीत होणं गरजेचं असतं.
या माध्यमातून प्रत्येक मानसिक समस्याग्रस्त माणूस आपल्या समस्येतून बाहेर पडू शकतो. विचार करू शकणारा प्रत्येक जण आपले प्रश्न सोडवू शकतो, फक्त समस्या सोडवण्यासाठी त्या प्रकारचं पोषक, सकारात्मक वातावरण निर्माण करणं गरजेचं असतं.
..................................................................................................................................................................
लेखक प्रा.डॉ. सोपान मोहिते श्री शिवाजी महाविद्यालयाच्या (बार्शी, सोलापूर) मानसशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.
profshmohite@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment