‘एक्फ्रेझिस’ ही एक प्रकारची ‘सीनर्जी’ असते. एकीमुळे दुसरीचं कार्य अधिक सुकर आणि जास्त परिणामकारक होतं
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 05 May 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध एक्फ्रेझिस Ekphrasis भास्करबुवा बखले Bhaskarbuwa Bakhale मोनालिसा Monalisa

शब्दांचे वेध : पुष्प चौतिसावे

आजचा शब्द – ‘एक्फ्रेझिस’ (Ekphrasis)

देवगंधर्व गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांच्याबद्दल मी सर्वप्रथम वाचलं ते पु. ल. देशपांडे यांच्या लेखात. बुवांचा काळ १७ ऑक्टोबर १८६९ ते ८ एप्रिल १९२२ असा होता. (त्यामुळे पुलंनीसुद्धा त्यांना प्रत्यक्ष पाहिलं/ऐकलं नव्हतं.) पुढच्या वर्षी ८ एप्रिलला बुवांच्या निधनाला शंभर वर्षं पूर्ण होतील. त्यांना जवळून पाहिलं असणारे आणि त्यांच्या असामान्य गायकीनं मंत्रमुग्ध झालेले एक फार मोठे कलावंत म्हणजे (कै.) केशवराव भोळे. भास्करबुवांची विलंपत गायकी कशी विलक्षण आणि अतुलनीय होती, यावर तितकाच विलक्षण प्रकाश टाकणारा एक विस्तृत लेख केशवरावांनी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिला होता. गेल्या वर्षी लीना पाटणकर यांनी या लेखाचं वाचन करून त्याची व्हिडिओ (खरं तर ऑडिओ) क्लिप यू-ट्यूबवर अपलोड केली आहे.

सुमारे ४५ मिनिटांचं हे व्याख्यान मी अनेकदा ऐकलं आहे. ते ऐकताना आपण थक्क होऊन जातो. भास्करबुवांचं गायन किती अद्भुत होतं, हे तर यातून कळतंच, पण त्याहीपेक्षा कमाल वाटते ती केशवराव भोळे यांच्या स्मरणशक्तीची आणि वर्णनशक्तीची. अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या बखलेबुवांच्या एका मैफलीचं शब्दचित्रण त्यांनी अशा काही ताकदीनं आणि खुमासदार पद्धतीनं केलं आहे की, ऐकताना (किंवा लेख वाचताना) असं वाटतं की, जणू काही आपण स्वतःच त्या मैफिलीत हजर होतो आणि भास्करबुवांच्या पुढ्यात बसून त्यांचं ते स्वर्गीय गायन ऐकण्याचा देवदुर्लभ अनुभव आपण आपल्या कानांनी घेतला होता. केशवरावांनी त्या मैफिलीतली भास्करबुवांची पेशकश अशी काही शब्दांकित केली आहे की, जणू काही ते एखादा व्हिडिओ कॅमेराच घेऊन तिथे रेकॉर्डिंग करत होते. (आज त्या मैफिलीला शंभर वर्षं तरी होऊन गेली असतील.) केशवरावांचा एक एक शब्द ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.

जॉन अर्लॉट (John Arlott) किंवा पिअरसन सुरीटा (Pearson Surita) यांनी केलेली क्रिकेट मॅचची बॉल टू बॉल लाईव्ह कॉमेन्ट्री रेडिओच्या सुवर्णयुगात ज्यांनी ऐकली असेल, त्यांना मला काय म्हणायचं आहे, हे पटकन कळेल! जिवंत, चैतन्यपूर्ण, रसरशीत, उमदं शब्दांकन. पण मुख्य म्हणजे केशवरावांची ही तान टू तान किंवा स्वर टू स्वर कॉमेंटरी लाईव्ह नव्हती. त्यांच्या स्मृतीपटलावर अमिट चिन्हांनी कोरल्या गेलेल्या एका जुन्या मैफिलीचं हे पुनर्दर्शन होतं. जणू काही लेख लिहिताना तो प्रत्येक क्षण ते पुन्हा अनुभवत होते आणि मनःचक्षुंनी बघत बघत आपल्या लेखणीनं त्याला शब्दांकित करत होते. त्यांच्यासाठी हा पुनर्प्रत्यय होता, पण त्यामुळे भास्करबुवांना न बघू शकलेल्या आपल्यासारख्या लोकांसाठी हा फार मोठा आनंदाचा खजिना पहिल्यांदाच उघडा झाला. यासाठी केशवरावांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच!

भास्करबुवांवरचा केशवरावांचा हा लेख वाचताना आणि ऐकताना मला सारखं असं वाटत होतं की, हे एक भव्य, दिव्य, उत्तुंग, विस्मयचकित करणारं, सुंदर कोरीव शिल्प आहे. मात्र हे प्रत्यक्षातलं, मूर्त स्वरूपातलं लेणं नव्हतं, तर ते एक शब्दशिल्प होतं. भास्करबुवांच्या त्या अप्रतिम गायनाला केशवरावांनी विश्वकर्म्याची प्रतिभा अंगी बाणून लेखणी आणि शाईच्या छिन्नी-हातोडीनं शब्दरूपात सजीव केलं होतं. जेवढं ते गायन थोर होतं, तेवढंच हे लिखाणही. दोघांचंही जितकं कौतुक कराल तेवढं कमीच पडेल!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

एखाद्या गोष्टीचं, प्रसंगाचं, चित्राचं अथवा शिल्पाचं, गाण्याचं वा इतर कोणत्याही कलाप्रकाराचं इतकं मनोहारी, सखोल, सविस्तर, भारावून टाकणारं वर्णन करणं हे येऱ्या-गबाळ्याचं काम नाही. त्यासाठी मुळात ती गोष्ट वा कलाविष्कार अत्युच्च पातळीचा असला पाहिजे. त्यानंतर, तो जो वर्णन करणारा आहे, तो लेखक, कथनकारही त्याच ताकदीचा असला पाहिजे. त्याच्याजवळ अमर्याद शब्दकळा तर असलीच पाहिजे, पण त्याला सौंदर्यदृष्टीही असली पाहिजे, त्याच्याजवळ प्रतिभाही असली पाहिजे, आणि नीरक्षीरविवेकबुद्धीदेखील असली पाहिजे. तरच तो आपल्या वर्णित विषयाला न्याय देऊ शकेल.

डॉर्न्फर्ड येट्स (Dornford Yates) या लेखकानं त्याच्या एका कादंबरीत (बहुधा ‘अडेल अँड को’) फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांच्या सीमेवर असलेल्या ‘द पायरिनीझ’ (the Pyrenees) या पर्वतराजीच्या जवळून केलेल्या एका मोटरकार प्रवासाचं वर्णन केलं आहे. कधी जमलं तर ते अवश्य वाचा. कादंबरी काल्पनिक आहे, तो प्रवासही काल्पनिक होता, पण तो करताना पात्रांना दिसलेल्या तिथल्या अद्भुत निसर्गसौंदर्याचं वर्णन मात्र खरोखरीचं असलं पाहिजे. लेखकानं कधी तरी तो अनुभव स्वतः घेतला असावा. एखाद्या कसबी निसर्ग चित्रकारानं आपल्या कुंचल्यानं रंगांची उधळण करत कॅनव्हसवर एखादं दृश्य सजीव करावं तसं हे शाब्दिक वर्णन आहे. इंग्रजी भाषा किती लवचीक आहे आणि एखादा पट्टीचा लेखक किती समर्थपणे तिला गवसणी घालून चांगली साहित्यकृती निर्माण करू शकतो, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे वर्णन.

सर बॅनिस्टर फ्लेचर यांचं ‘A History of Architecture’ या नावाचं जगप्रसिद्ध पुस्तक आहे. जगातल्या वेगवेगळ्या भागांत प्राचीन काळापासून स्थापत्यकला कशी विकसित होत गेली, याचा अत्यंत रसिला आणि खुमासदार इतिहास या ग्रंथात सापडतो. स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचं पारायण करणं अनिवार्य आहेच. पण त्याचबरोबर हौशी वाचक, प्रवासी, पर्यटक या साऱ्यांसाठीदेखील हा एक मोलाचा संदर्भग्रंथ आहे. अनेक पर्यटक रोम शहर बघायला इटली देशात गेले की, आपल्यासोबत हे पुस्तक घेऊन जातात. रोममधल्या प्राचीन इमारती आणि अवशेषांबद्दल तिथल्या अधिकृत गाईडला माहीत नसेल, असा इतिहास आणि त्यांचं सूक्ष्मातिसूक्ष्म वर्णन त्यांना या ग्रंथात सापडतं.

ही जी तीन उदाहरणं मी वर दिली आहेत, त्यांच्यात असलेल्या सखोल, समग्र, सविस्तर, सूक्ष्म, सजीव वर्णनाला ग्रीक भाषेत ‘एक्फ्रेझिस’ (Ekphrasis) अथवा ‘एक्फ्रेसिस’ (ecphrasis) असं म्हणतात आणि हा शब्द इंग्रजीतही जसाच्या तसा वापरला जातो. खरं तर कोणत्याही कलाविष्काराच्या साद्यंत आणि रोचक, रसिल्या वर्णनासाठी तो उपयोगात आणला जाऊ शकतो, पण बरेच लोक ‘ekphrasis’ म्हणजे कोणत्याही दृश्यकलेचं (a visual work of art) वर्णन अशा संकुचित अर्थानंच त्याला वापरतात. त्यामुळे मी सुरुवातीला दिलेली बखलेबुवांच्या मैफलीचं वर्णन किंवा येट्सनं केलेलं पायरिनीझच्या सौंदर्याचं वर्णन यांच्या उदाहरणांना तांत्रिकदृष्ट्या ‘ekphrasis’ म्हणता येईल की नाही, याबद्दल दुमत असू शकतं. दृश्यकलेच्या व्याख्येत पेंटिंग, ड्रॉइंग, प्रिंटमेकिंग, शिल्पकारी, सेरॅमिक्स, छायाचित्रकला, चित्रपटनिर्मिती, नाट्यकला, व्हिडिओ निर्मिती, नेपथ्य, हस्तकला, स्थापत्यशास्त्र, फाईन आर्ट्स, इत्यादींचा अंतर्भाव होतो. या मूलभूत कलाप्रकारांसोबतच इंडस्ट्रिअल डिझाईन, ग्राफिक डिझाईन, फॅशन डिझाईन, इंटेरिअर डिझाईन या प्रकारच्या उपयोजित कलांचा (applied arts) देखील या व्याख्येत समावेश केला जातो. या कलांच्या खऱ्या किंवा काल्पनिक दृश्य प्रकटीकरणाचं उत्कटतेनं, काव्यात्म किंवा नाट्यमय पद्धतीनं, प्रभावी शब्द वापरून केलेलं वर्णन म्हणजे ‘एक्फ्रेझिस’.

आता बखलेबुवांची गाण्याची मैफल ही या अर्थानं दृश्य-प्रकटीकरण नव्हती. तो एक श्राव्य अनुभव होता. येट्सनं केलेलं निसर्गसौंदर्याचं काल्पनिक वर्णनही सापेक्ष आणि वैयक्तिक अनुभूतीजन्य होतं. पण असं असलं तरी आपल्या अमोघ शब्दांच्या जोरावर भोळे आणि येट्स यांनी जे काही निर्माण केलं आहे, ते माझ्या मते ‘एक्फ्रेझिस’च्या व्यापक वर्तुळात आणलं जाऊ शकतं. कारण, तसंही पुरातन काळात ‘एक्फ्रेझिस’ म्हणजे अगदी कशाचंही वर्णन, असंच मानलं जात होतं - मग ती एखादी व्यक्ती असो किंवा वस्तू असो किंवा अगदी एखादा अनुभव असो. मात्र पुढे काळानुसार या शब्दाची व्याख्याही बदलली आणि तिला आजचं स्वरूप प्राप्त झालं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कलाविश्वात ‘एक्फ्रेझिस’ला महत्त्वाचं माध्यम का मानतात? कारण त्यातून आपल्याला मूळ विषयाचं सौंदर्य अधिक खुलून दिसू लागतं. आपल्या कविता किंवा गद्यलेखनातून (किंवा अगदी वक्तृत्वातूनसुद्धा) एक कलाकार दुसऱ्या एखाद्या कलाप्रकाराचा आस्वाद इतरांना घ्यायला शिकवतो. त्याची प्रतिभा जेवढी दांडगी, तेवढे उत्कट त्याचे शब्द असतात. नुसते शब्दच नाही तर एखाद्या सिनेमाच्या किंवा चित्राच्या किंवा छायाचित्राच्या माध्यमातूनसुद्धा हे साध्य केलं जाऊ शकतं. वर्णित विषयाचा गाभा काय आहे, त्याचं सौंदर्य नेमकं कशात आहे, त्याचा आशय काय आहे, याचं आकलन करून घेणं वक्त्याच्या/लेखकाच्या ‘एक्फ्रेझिस’द्वारे आपल्याला सोपं जातं. त्यामुळे आपण वर्णित विषयाशी अधिक चांगल्या प्रकारे नातं जोडू शकतो.

कोणत्याही कलाप्रकाराचं आकलन हे चार पातळ्यांवर होत असतं. गाण्याच्या मैफलीचंच उदाहरण घेऊ या. काही लोक गाणं ऐकायला आवडतं फक्त या कारणासाठी तिथं येतात. ते अजिबात खोलात न शिरता नुसतं गाणं ऐकतात आणि खुश होतात. दुसऱ्या पातळीवरचे श्रोते गवयाचं घराणं कोणतं, तो कोणता राग म्हणतो आहे, बंदिशीचे शब्द काय आहेत, याकडे लक्ष देतो. पण त्याला त्या गाण्यातलं व्याकरण कळत नाही. हे कानसेन असतात. अनेक मैफिली ऐकून ऐकून त्यांचे कान तयार झालेले असतात. ते आस्वाद घेतात पण ते तज्ज्ञ नसतात. तिसऱ्या पातळीवरचे श्रोते हे संगीततज्ज्ञ असतात. त्यांना गाण्यातलं सौंदर्यही कळतं आणि व्याकरणही. चवथ्या पातळीवरचा श्रोता हा खरा रसिक असतो. मैफल सुरू झाली की, काही वेळानं तो आजूबाजूचं सगळं विसरतो - गायक कोण आहे, काय गातो आहे, साथसंगत कशी आहे, या जाणिवेच्या पलीकडे जाऊन हा विद्वान रसिक नेणिवेच्या कानांनी गाणं ऐकत असतो. तो absolute bliss म्हणजे कैवल्यानंदाचा अनुभव घेत असतो. बहुसंख्य गायनप्रेमी हे पहिल्या पातळीवरचे असतात. पण दुसऱ्या पातळीवर असलेल्या कानसेनांना जर एखाद्या संगीततज्ज्ञानं आपल्या

‘एक्फ्रेझिस’द्वारे एखाद्या मैफिलीचे बारकावे समजावून सांगितले तर त्यांना तिचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.

हीच गोष्ट सिनेमाची आहे, चित्राची आहे. आपण स्वतः एखाद्या कलाकृतीचा स्वतःला हवा तसा आनंद घेतच असतो. पण त्याच कलाकृतीतले बारकावे, गुणदोष, वैशिष्ट्यं जेव्हा आपण एखाद्या कसबी गाईडच्या (किंवा तज्ज्ञाच्या) मुखातून वा लेखणीतून समजावून घेतो, तेव्हा आपला आनंद अनेक पटींनी वाढतो.

जगभरातल्या बहुसंख्य लोकांनी मोनालिसाचं प्रख्यात पेंटिंग बघितलं आहे. प्रत्यक्ष नसलं तरी त्याची छायाचित्रं तरी नक्कीच पाहिलेली असतात. तिच्या त्या गूढ स्मिताबद्दल आणि एकूणच त्या चित्राच्या गुणवत्तेबाबत आजवर रकानेच्या रकाने जाणकार आणि हौशी लोकांनी लिहिले आहेत. यातला सर्वांत अप्रतिम मजकूर आहे वॉल्टर होरॅशिओ पॅटर (Walter Horatio Pater) या एकोणिसाव्या शतकातल्या इंग्रज लेखक आणि कलासमीक्षकाचा. हे छोटेखानी ‘एक्फ्रेझिस’ मुळातूनच वाचण्यात गंमत आहे. तो म्हणतो -

“The presence that thus rose so strangely beside the waters, is expressive of what in the ways of a thousand years men had come to desire. Hers is the head upon which all 'the ends of the world are come', and the eyelids are a little weary. It is a beauty wrought out from within upon the flesh, the deposit, little cell by cell, of strange thoughts and fantastic reveries and exquisite passions. Set it for a moment beside one of those white Greek goddesses or beautiful women of antiquity, and how would they be troubled by this beauty, into which the soul with all its maladies has passed! All the thoughts and experience of the world have etched and moulded there, in that which they have of power to refine and make expressive the outward form, the animalism of Greece, the lust of Rome, the reverie of the middle age with its spiritual ambition and imaginative loves, the return of the Pagan world, the sins of the Borgias. She is older than the rocks among which she sits; like the vampire, she has been dead many times, and learned the secrets of the grave; and has been a diver in deep seas, and keeps their fallen day about her; and trafficked for strange webs with

Eastern merchants: and, as Leda, was the mother of Helen of Troy, and, as Saint Anne, the mother of Mary; and all this has been to her but as the sound of lyres and flutes, and lives only in the delicacy with which it has moulded the changing lineaments, and tinged the eyelids and the hands. The fancy of a perpetual life, sweeping together ten thousand experiences, is an old one; and modern thought has conceived the idea of humanity as wrought upon by, and summing up in itself, all modes of thought and life. Certainly Lady Lisa might stand as the embodiment of the old fancy, the symbol of the modern idea.”

(या उताऱ्यातले Hers is the head upon which all ‘the ends of the world are come’ हे शब्द पी. जी. वुडहाउसच्या काही कादंबऱ्यांमध्ये उद्धृत केलेले आहेत. पण फक्त एकाच ठिकाणी ते बिनचूक आहेत - बाकी जागी विनोदनिर्मितीसाठी त्यांच्यात काही बदल केले गेले आहेत. पॅटरनं स्वतः ‘the ends of the world are come’ हे शब्द बायबलमधून (1 Corinthians 10:11) उसने घेतले आहेत.)

मोनालिसाचं इतकं अप्रतिम वर्णन एवढ्या मोजक्या शब्दात आजवर तरी अन्य कोणी केलेलं नाही. हे शब्द समोर ठेवून तुम्ही जर मोनालिसाला पुन्हा निरखून बघाल तर तुम्हाला तिच्यात काही तरी नवीन दिसेल. आतापर्यंत तुमच्या नजरेतून सुटलेल्या बारीक बारीक बाबी तुम्हाला दिसू लागतील. पॅटर हा नुसताच कोरडा कलासमीक्षक नव्हता तर शब्दप्रभूसुद्धा होता, म्हणूनच तो इतकं सुंदर वर्णन करू शकला.

असंच एक अतिशय बोलकं, देखणं, सुंदर वर्णन (एक्फ्रेझिस) सुप्रसिद्ध कला आस्वादक माधव आचवल यांनी मराठीत केलेलं आहे.  देवीदास नावाच्या कवीनं रचलेल्या ‘श्री व्यंकटेशस्त्रोत्र’ या अत्यंत लोकप्रिय अशा काव्याचं त्यांनी एका विस्तृत लेखात रसग्रहण केलं आहे. या रचनेतलं अंतर्गत सौंदर्य, तिच्यातल्या प्रत्येक शब्दाचं वजन, तिच्यातली लय आणि नादमाधुर्य या सर्वांवर त्यांनी असा काही विलक्षण प्रकाश टाकला आहे की, ते वाचून या स्तोत्राकडे बघण्याची आपली दृष्टीच बदलून जाते. तुम्ही धार्मिक मनोवृत्तीचे नसलात तरी तुम्हाला एक नितांतसुंदर कविता या नजरेतून त्याचा आनंद कसा घेऊ शकता, हे आचवलांच्या या ‘एक्फ्रेझिस’मधून शिकायला मिळतं. आधी कवीच्या मनात असलेली व्यंकटेशाची सगुण प्रतिमा त्यानं शब्दांच्या माध्यमातून सजीव केली. पुढे आचवलांच्या चष्म्यातून ती पाहिल्यावर तिचं देदीप्यमान रूप आपल्या चित्तचक्षुंसमोर अधिक प्रखरतेनं साकार होतं.

थोडक्यात ‘एक्फ्रेझिस’ ही एक प्रकारची ‘सीनर्जी’ (synergy) असते. परस्परपूरक, परस्पर-सहायक अशा दोन गोष्टींच्या एकत्र काम करण्याला ‘सीनर्जी’ असं म्हणतात. एकीमुळे दुसरीचं कार्य अधिक सुकर आणि जास्त परिणामकारक होतं. ‘एक्फ्रेझिस’च्या माध्यमातून वर्णित विषय जास्त सुलभपणे आणि अधिक प्रभावीरीत्या समजायला आपल्याला मदत होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रोद्यां (Rodin) नावाच्या शिल्पकारानं तयार केलेला ‘The Thinker’ या नावाचा कांस्य पुतळा फार प्रसिद्ध आहे. आता या मूळ शिल्पाचं जर कोणी चित्र काढलं तर ते पेंटिंग आणि तो मूळ पुतळा हे बघणाऱ्यांसाठी सिनर्जीनं काम करतील. चित्रातून तुम्हाला पुतळ्याची कहाणी कळते आहे. त्यामुळे एक प्रकारे हे चित्र स्वतःच एक कथाकार किंवा व्याख्याता बनतं. त्याच वेळी एक चित्र म्हणून तर ते स्वतः एक कलाप्रकार बनलंच आहे. म्हणजे तुम्ही एकाच वेळी या दोन वेगवेगळ्या माध्यमांतून प्रतिपाद्य विषयाचा आस्वाद घेऊ शकता.

अशा प्रकारे कोणतीही दोन कलामाध्यमं एकमेकांना पूरक ठरून एकाच वेळी स्वतंत्रपणे आणि एकत्रपणे देखील आस्वादकाच्या आकलनात आणि आनंदात भर घालू शकतात. यालाच ‘एक्फ्रेझिस’ असं म्हणतात.

प्लेटो, अ‌ॅरिस्टॉटल, होमर, व्हर्जिल यांच्यापासून तर शेक्सपिअर, गोतिए, इब्सेन, डॉस्टोयेव्हस्की, हर्मन मेलव्हिल, ऑस्कर वाईल्ड यांच्यापर्यंत अनेक तत्त्वज्ञ, लेखक, कवींनी आपल्या लेखनात ‘एक्फ्रेझिस’चा प्रभावी वापर केला आहे. जगभरच्या कलासमीक्षकांनीही याचा भरपूर वापर (विशेषतः कला इतिहास सांगताना) केलेला दिसतो. काही पाश्चात्य संगीतकारांनीदेखील आपल्या सांगीतिक रचनांमधून ‘एक्फ्रेझिस’चा आधार घेतला आहे.

या बाबतीत मला एक कुतुहल आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे अनेक कलांमध्ये निपुण होते. त्यापैकी त्यांचं लेखन, संगीत, आणि चित्रकला यामध्ये परस्परपूरक अशी ‘एक्फ्रेझिस’ची उदाहरणं सापडतात का, हे जाणून घ्यायला मला आवडेल. एखाद्या जाणकार व्यक्तीनं मला याबाबत अधिक माहिती दिली तर आनंद होईल.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......