अजूनकाही
२०१२ मध्ये व्हिएन्नामध्ये एक जागतिक कॉन्फरन्स भरली होती. त्यात चर्चेचा विषय होता 'शाहरुख खान अँड ग्लोबल बॉलिवुड'. भारतासारख्या प्रचंड वांशिक, भाषिक आणि धार्मिक वैविध्य असणाऱ्या देशात एक अल्पसंख्य समुदायाचा, मध्यमवर्गीय घराण्यातून आलेला मुलगा सुपरस्टार होतो आणि त्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा चेहरा बनतो, ही फार दुर्मीळ घटना आहे. त्यावर या कॉन्फरन्समध्ये चाळीस देशांमधून आलेल्या विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांनी चर्चा केली. असा बहुमान एखाद्या भारतीय नटाला मिळाल्याचं दुसरं उदाहरण सापडणं अवघड आहे. आमीर खानची फिल्म चारशे करोडच्या क्लबमध्ये गेली असेल किंवा सद्यस्थितीत सलमान खान हा बहुतेक देशातला सगळ्यात मोठा स्टार असेल, पण शाहरुख खानबद्दल जे औत्सुक्य किंवा जिज्ञासा सर्वत्र आहे, ती त्यांच्याबद्दल नाहीये. याची कारणं शाहरुखच्या मुळांमध्ये शोधावी लागतात.
सलमान आणि आमीर हे मुंबईतच मोठ्या फिल्मी घराण्यात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. शाहरुख हा खऱ्या अर्थानं 'आउटसाइडर' आहे. दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या शाहरुखला कुठलीही फिल्मी पार्श्वभूमी नव्हती. आजूबाजूच्या लोकांचा विरोध आणि उपदेश बाजूला सारून हा पोरगा स्वप्ननगरीत आला आणि सगळ्यात मोठा स्टार बनला हे कुठल्याही परिकथेपेक्षा कमी नाही. त्याला 'ब्लॅक फ्रायडे'मधला एक डायलॉग खूप फिट बसतो- ‘मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया.’
शाहरुख नावाचा धूमकेतू जेव्हा उदयाला येत होता, तेव्हा आमीर आणि सलमान अगोदरच पदार्पण करून स्टार बनले होते. जागतिकीकरण आपल्या घरात आलं होतं. संगणकाचा चंचुप्रवेश झाला होता. राम जन्मभूमी आंदोलन ऐन भरात होतं आणि हिंदू-मुस्लिम यांच्यातली दरी रुंदावत चालली होती. एकूणच आपलं अति मर्यादित जग बदलायला लागलं होतं. बर्लिनची भिंत पडली होती, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं होतं. एकूणच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती गुंतागुंतीची आणि अस्थिर होती. भारतीय चित्रपटसृष्टीही याला अपवाद नव्हती. बच्चनचा फॉर्म पुरता हरपला होता. सततच्या अपयशाला कंटाळून मिथून उटीला निघून गेला होता. जागतिकीकरणामुळे आपली 'आयडेंटिटी' आता काय असणार असा प्रश्न अनेकांना पडायला लागला होता. ‘भारतीय की जागतिक नागरीक?’ असा एक तिढा तयार होत होता. विशेषतः अनिवासी भारतीयांना. या सगळ्या परिस्थितीवरचा उतारा आणि प्रश्नांची उत्तरं म्हणून शाहरुखचं पदार्पण झालं असावं.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
शाहरुख म्हणजे अखंड खळखळपणे वाहणारी सतत ऊर्जा. खुपदा समोरच्याला न झेपण्याइतकी. त्याने त्या काळात केलेल्या भूमिका बघितल्या आणि त्यांचं विश्लेषण केलं तर शाहरुख 'शाहरुख' का झाला हे कळायला मदत होते. त्याचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मधला राज हा त्या काळातल्या गोंधळलेल्या भारतीय आणि एनआरआय मंडळींना प्रचंड आपलासा वाटला. म्हणजे चित्रपटाच्या पहिल्या भागातमध्ये दुकानातून बियर चोरून पळून जाणार, निर्लज्जपणे मुलींशी फ्लर्ट करणारा 'रिच ब्रॅट' असं राज मल्होत्राचं पात्र दाखवलं होतं. दुसऱ्या भागात तोच राज मल्होत्रा अतिशय समजूतदार, शक्य असूनही सिमरनला पळवून न घेऊन जाणारा होता. हे जे संतुलन शाहरुखने व्यवस्थित पडद्यावर दाखवलं, त्यामुळे तो देशात लोकप्रिय झालाच पण एनआरआय मंडळींमध्येही तुफान लोकप्रिय झाला. आजही ओव्हरसिस मार्केटमध्ये कुठलाही भारतीय स्टार त्याचा हात पकडू शकत नाही.
'राजू बन गया जंटलमन', ‘कभी हा कभी ना' आणि 'यस बॉस'सारख्या चित्रपटांतून त्याने जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर उदयाला आलेल्या मध्यमवर्गाला अपिल केलं. ‘यस बॉस’ चित्रपटातलं शाहरुख खानचं ‘बस इतनासा ख्वाब है’ हे गाणं तत्कालीन मध्यमवर्गाच्या उमलत्या इच्छा-आकांक्षांचं यथार्थ वर्णन करतं. ‘राजू बन गया जंटलमॅन’मधला शाहरुख खान श्रीमंत आणि यशस्वी तर व्हायचंय, पण मूल्यांची कास सोडायची नाहीये, या टिपिकल मध्यमवर्गीय गुंतावळ्यात अडकलेला दिसतो. 'कभी हा कभी ना'मध्ये अॅना आऊट ऑफ लीगमध्ये आहे हे माहीत असूनही तिला प्राप्त करण्यासाठी धडपड करणारा नायक सर्वसामान्य लोकांना अपील होणारा होता.
शाहरुख म्हणजे भारतीय सिनेमामधल्या कथांवरचा अगोदरच पुसट होत चाललेला नेहरूवियन समाजवादाचा पगडा पूर्ण पुसून जागतिकीकरणाची हाळी देणारा नायक. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती कुठलीही किंमत देऊन मिळवलीच पाहिजे, मग भले त्यासाठी मूल्य-तत्त्व यांना सोडचिठ्ठी द्यायला लागली तरी हरकत नाही, अशी बंडखोर नायक ही शाहरुखची खासीयत. त्यातून शाहरुख आणि अँटी हिरो असं एक भन्नाट कॉम्बिनेशन आकाराला आलं. 'डर'मध्ये आवडत्या मुलीला प्राप्त करण्यासाठी आणि 'बाज़ीगर'मध्ये वडिलांच्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी कुठलाही विधिनिषेध न बाळगणारा नायक हा भारतीय प्रेक्षकांसाठी धक्का देणारा होता. जगासाठी आपण भारतीय मुस्लिमांचा चेहरा आहोत हे त्याला पक्कं माहीत आहे. त्यामुळे त्याने पडद्यावर अनेकदा मुस्लिम पात्रं रंगवली. 'चक दे इंडिया'मधला कबीर खान ते नुकताच आलेल्या 'रईस'मधला रईस खान या प्रवासात त्याने अनेक मुस्लिम भूमिका साकारल्या.
शाहरुखचा हा 'कल्ट' बनण्यासाठी त्याची ऑफस्क्रीन इमेजही महत्त्वाची ठरली. शाहरुख कधीच विनयशीलतेसाठी प्रसिद्ध नव्हता. तो इंडस्ट्रीमधल्या सिनिअर्सचा आदर करायचा, पण मी त्यांच्यापेक्षा काही कमी आहे असे समज आपल्याला आजूबाजूला फटकूही द्यायचा नाही. अनेकदा मुलाखतीमध्ये तो 'I am the best' अशी मोहम्मद अली छाप विधानं करायचा. कधी स्वतःलाच ‘किंग खान’ म्हणून घ्यायचा. विनयशीलतेचं अवास्तव स्तोम माजवून ठेवलेल्या जुन्या पिढीला ते आवडणं शक्य नव्हतं. पण आता तिशी-चाळीशीत असणाऱ्या आणि त्यावेळी नुकतीच सुरुवात करणाऱ्या पिढीला हा अॅरोगन्स जबरी आवडायचा.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
शाहरुखने एका हिंदू मुलीशी लग्न केलं आणि शोबिझनेसमध्ये राहूनही तिच्याशी एकनिष्ठ राहिला, ही बाब त्याच्या पक्षात गेली. गांधी घराण्याशी जवळचे संबंध असूनही त्याने कधीही राजकीय विधानं केली नाहीत. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांबाबत त्याने अळीमिळी गुपचिळी धोरण पाळलं. शबाना आझमी किंवा जावेद अख्तर यांच्यासारखी भारतीय मुस्लिमांच्या प्रश्नांवर त्यानं कधीही भूमिका घेतली नाही. तो एक स्टार होता आणि स्टारच राहिला. ‘उद्या 'मन्नत' समोर मला बघायला गर्दी नाही झाली किंवा माझा ऑटोग्राफ घ्यायला कुणी नाही आलं तर मी वेडा होईल’ असं त्याचं एक विधान प्रसिद्ध आहे… त्याच्यासाठी त्याचा स्टारडमच महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करणारं.
सध्या देशातलं एकूणच वातावरण धार्मिक केंद्रीकरणाकडे झुकत आहे. शाहरुख या केंद्रीकरणाच्या कचाट्यात सापडला आहे. मला स्वतःला शाहरुख नट म्हणून कधी आवडतो, कधी आवडत नाही. पण त्याने शून्यातून जग उभं केलं आहे त्याबद्दल आदर वाटतो. त्याचं 'वानखेडे'वरचं बेबंद वर्तन बघून त्याला शिव्याही घालाव्याशा वाटल्या होत्या. पण कसाही असला तरी तो देशद्रोही नाही, याची मला खात्री आहे. त्याला त्याच्या धर्मावरून कायमच 'धर्मपरीक्षा' द्यावा लागल्या आहेत. एकदा एका 'क्रिकेट सामन्यात' तो पाकिस्तानी ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा गदारोळ उडाला होता. त्याच्या आयपीएल टीमने पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली, तेव्हा काही वशिष्ट वर्तुळात बरीच कुजबुज झाली होती- 'बघा गेला की नाही शेवटी जातीवर?' बाकीच्या अनेक संघांनीही पाकिस्तानी खेळाडूंना घेतलं होतं, मात्र त्याच्या मालकांचं नाव 'खान' नव्हतं!
'माय नेम इज खान' आला तेव्हाही ‘बघा, बघा’चे सूर पुन्हा उमटले. ‘मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईल’ हे त्यानं कधीही न केलेलं विधान बिनदिक्कत त्याच्या नावावर खपवलं गेलं. हे समजून न घेता अनेक अर्धवट लोक ‘कधी जाणार पाकिस्तानात?’, असं अजूनही त्याला डिवचत असतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
तो मोठा सुपरस्टार आहे. बाहेरून दाखवत नसेल, पण त्याला या सगळ्याचं वाईट वाटत नसेल काय? ज्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्याला निव्वळ त्याच्या विशिष्ट आडनावामुळे ‘पाकिस्तानात चालता हो’ असं लोक सांगतात. आयुष्यात काहीही चमकदार न केलेली माणसं आणि 'आम्ही कर भरतो' ही देशभक्तीची व्याख्या असणारे लोक आपल्या जातीची, धर्माची, राष्ट्रवादाची 'कलेक्टिव्ह' जबाबदारी एखादा कलाकार, साहित्यिक किंवा खेळाडूवर का टाकत असावीत? आम्हाला आवडेल ते, पटेल तेच बोलावं अशा भाबड्या अपेक्षांचं काय करायचं?
शाहरुख काही मर्यादा पुरुषोत्तम नाही. त्याच्यात अनेक दुर्गुण आहेत. पण ते आपल्यात नाहीयेत का? त्याच्या चुकांची शिक्षा म्हणजे डायरेक्ट 'देशनिकाला'? पण देशातले लाखो-करोडो लोक त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्या छोट्या चुका पोटात घेतात. आपला देश सहिष्णू आहे (अजून तरी ) हीच बाब अधोरेखित करतात, पण शंकेचे काळे ढग जमा होत आहेत हेच खरं. 'चक दे इंडिया'मधला एक प्रसंग. महिला टीमच्या कोच पदासाठी मुलाखत देऊन कबीर खान त्याच्या मित्रासोबत बाहेर पडतो. त्याचा मित्र त्याच्या भूतकाळाचा संदर्भ देऊन म्हणतो, "एक गलती तो सबको माफ होती है यार." त्यावर केविलवाणेपणा आणि उपरोधिकपणा यांचं मिश्रण असणारं हसू चेहऱ्यावर आणून तो फक्त म्हणतो, "सबको?" आणि आपली पुराणी स्कूटर घेऊन ध्यानचंदच्या पुतळ्यासमोरून निघून जातो. पडद्यावर तो प्रसंग वठवताना त्याला फारसा त्रास झाला नसावा. या सीनची रंगीत तालीम तो रोजच करत असतो!
.................................................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
manoj patil
Fri , 07 September 2018
sir khup chhan lekh lihitat tumhi....ekhadya situation var shambhar drushtinni vichar karayla lavnara lekh lihitat....confusion tar hotach pan ti sthiti mi khup enjoy karto ,,khup avadta ....hats off to u sir
Ajaiz Shaikh
Tue , 21 February 2017
khup chaan
Bhagyashree Bhagwat
Sat , 11 February 2017
दुसऱ्या बाजूचा विचार करायला लावणारा संयत लेख.