हा लेख पत्रकार म्हणून नाही तर एक भारतीय व त्यातही एक मुस्लीम म्हणून लिहिलाय. या लेखातली लेखकाची मते व्यक्तिगत असून ती आक्रोषातून आलेली आहेत. ती सर्वांना मान्य असावी असा आग्रह नाही...
..................................................................................................................................................................
प्रथम एक बाब स्पष्ट करतो की, रोहित सरदाना ‘पत्रकार’ नव्हे, तर ‘अभाविप’चे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना पत्रकार किंवा अँकर म्हणवणं अन्यायाचं होईल. पत्रकारिता नि:ष्पक्ष व पीडित, शोषितांच्या बाजूनं उभी असते. ती एकांगी, एककल्ली नसते. ती मानवतेच्या विरोधात तर कधीच नसते. संघटक, कार्यकर्ते भूमिका घेतात. ही भूमिका कधी मानवतेच्या बाजूनं असू शकते, तर कधी विरोधात.
रोहित भूमिका घेणारे अभाविपचे कार्यकर्ते होते, हे मी म्हणत नाही, तर भाजप-संघाच्या अनेक मान्यवरांनी त्यांना घोषित रूपानं आदरांजली देत म्हटलं आहे. कार्यकर्ते आणि तेही अभाविपचे म्हणजे तो परंपरावादी, धर्मभिमानी, अस्मितावादी असणार आणि उदारमतवादी विचार व धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असणं साहजिकच आहे. कारण त्यांच्या मातृ-पितृसंघटनेची ती उघड भूमिका आहे.
प्रधानसेवक मोदींपासून ते गृहमंत्री शहा व राष्ट्रपतींनी रोहित यांना श्रद्धांजली देत ‘ॐ शांति’ असा टॅग चालवला. या महामहीमनी आदंराजली द्यावी, खरंच ते इतकी मोठे व्यक्ती होते का? याचं उत्तर ज्यानं-त्यानं ठरवावं. ते भाजपचे क्रियाशील प्रवक्ते असल्यानं त्यांना श्रद्धांजली देणं, या मंडळीचं नैतिक कर्तव्य होतं, त्यांनी ते पार पाडलं.
रोहित कोविडनं गेले. आजघडीला दोन लाखांपेक्षा (२,११,८३५) अधिक भारतीय या रोगराईत आपण गमावले आहेत. माझ्या लेखी अन्य मृतांपैकीच ते एक आहेत. रोहित सरदाना यांचा रोगराईनं (ज्याबद्दल ते सतत सरकारच्या चुकांची पाठराखण करत होते) त्यांचा बळी घेतला, याचं अधिक वाईट वाटतं. ज्या भाजपच्या राजकीय व सांघिक उत्थानासाठी ते झटत होते, त्याच सरकार अर्थात ‘सिस्टिम’च्या अनास्थेचा ते बळी ठरले. आजपर्यंत देशभरात १५६ पत्रकार कोविडने मरण पावले आहेत. त्यामुळे रोहित सेलिब्रिटी वगैरे होते, असा गैरसमज करून घेऊ नये.
पत्रकारितेची शैली (?)
‘मरणानंतर वैर संपतं’ या कथनाला जरी जागलं; तरी रोहित यांच्या दृष्कृत्याची चर्चा करण्यास कोणीही रोखू शकत नाही. तेवढं व्यक्तिस्वातंत्र्य आहेच की! त्यामुळे ते वापरत मी रोहितचा ‘एकेरी’ उल्लेख करत आहे. कारण तो इसम माझ्यालेखी कधीही महान व आदरणीय वगैरे नव्हता.
मीडियातले तमाम लोक म्हणत आहेत, रोहितच्या पत्रकारितेची खास शैली होती. होय, नक्कीच होती. कारण त्याच्या या शैलीनं अनेक जण उद्ध्वस्त झाले, देशोधडीला लागले… लाखोंचे संसार, व्यापार, रोजगार उद्ध्वस्त झाले. अनेक जण आयुष्यातून उठले, हजारो जण अकारण तुरुंगात सडत आहेत. अनेकांचं अस्तित्व, त्यांची ओळख, जगणं, वागणं, दिसणं, असणं सारं काही संकटात आलेलं आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्याच्या कथित पत्रकारितेनं बहुसंख्याकांच्या मानसिकतेवर आघात केला. त्याच्या शैलीनं समाजात जात, धर्म व वर्णविद्वेषी ‘हेट क्राइम’ला जन्म दिला. एका समाजाला हिंदू म्हणून प्रचारित करत मुस्लीमविरोधात उभं केलं. त्याच्या या शैलीनं बहुसंख्याकांच्या मानसिकतेवर आघात झाला. निकडीचे मूलभूत प्रश्न विसरून त्याला ‘हिंदू, हिंदू..’, ‘मोदी, मोदी..’ करण्यास भाग पाडलं. त्याची शैली पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात नव्हे, तर संघाच्या वर्णद्वेषी शाखेत शिकवली जाते.
पत्रकारितेला माध्यम बनवून त्यानं संघाच्या वर्ण, वर्ग आणि जातद्वेषी प्रचार राबवला. त्यांच्या पत्रकारितेनं फैलावलेल्या विषाचे रोगट दंश रोजच भारतीय समाज सोसत, भोगत आहे. त्याच्या शैलीनं भारतीय मुस्लिमांचं राक्षसीकरण व उद्ध्वस्तीकरण झालं. दलित-ख्रिश्चन, शोषित, पीडित असुरक्षित होऊन त्यांच्यापुढे अस्तित्वाचे प्रश्न उभे ठाकले.
रोहित दररोज संध्याकाळी भारतीय समाजात (न्यूज चॅनेलवर) ‘दंगल’ माजवायचा. विखारी विषय घेऊन रोज वाद व तेढ निर्माण करायचा. फेसबुक स्क्रोल करताना कधीतरी त्याचा वर्णद्वेषी चेहरा दिसायचा. दखल म्हणून चार-दोन मिनिटं तिथं स्थिर होत, पण त्याची नेहमीची विखारी भाषा ऐकून किळस येई.
कधी कधी मनात विचार येई की, या माणसाला झोप कशी येत असेल? त्याला स्वप्नं कशी पडत असतील? सकाळी झोपेतून उठल्यावर पत्नीला काय म्हणत असेल? लेकीला खेळताना पाहून त्यांच्या भविष्याबद्दल काय प्लॅनिंग करत असेल? करोनाकाळात ‘मीडिया टेरर’नं भयग्रस्त झालो, त्या वेळी रोहित, सुधीर व अर्णबच्या दिनक्रमाविषयी मला सतत चिंता वाटत राहिली.
रोहितनं फेसबुकवर एकदा कुत्र्यासोबत आपलं छायाचित्र टाकलं आणि धावतं घोडं अंगावर घेतलं. तो त्या दिवशी तो भाजपविरोधकांकडून जाम ट्रोल झाला. रोजच प्राइम शो पूर्वी लाइव्ह येऊन शिव्या खाऊन जायचा, त्याचा राग तो शोमध्ये काढायचा. एकदा त्यानं आपल्या लहान मुलींसोबत फेसबुकवर छायाचित्र टाकलं. लोकांनी त्याला विचारलं, या मोठ्या झाल्यावर कोणी त्यांना बलात्कार व अॅसिड फेकण्याची धमकी दिली, तर तुम्ही काय कराल? त्या दिवशी तो ट्रोल्सवर खूप भडकला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कधी कधी अमित शहा, राजनाथ, मोदीसबोतची आपली छायाचित्रं टाकायचा. कधी वादग्रस्त भाषणं ठोकणाऱ्या भाजपच्या नेत्यांची छायाचित्रं टाकायचा. त्यावर कोणी त्याला तुम्ही भाजपचे का, असं म्हटलं की वैताग, चिडचिड करायचा.
‘हेट क्राईम’चा कर्ता
२०१५पासून टीव्हीत गेल्यावर त्याला नोटिस करायला लागलो. रोज रात्री तो आणि त्याचा सहकारी सुधीर चौधरी (तिहाडी) ‘झी न्यूज’वर मुस्लीमविरोधाचे स्पेशल शो करत. दोघांचेही शो एकापेक्षा अधिक जहरी. पुढे तो ‘झी’ सोडून ‘आज तक’मध्ये गेला, की पेरला गेला माहीत नाही. तिथंही रोजच विषाचे कितीतरी टँकर तो समस्त भारतीयांवर लोटत राहायचा.
गोमांस बाळगण्याच्या आरोपातून झालेल्या माणसांच्या हत्येचं तो नेहमीच समर्थन करत राहिला. कठुआच्या निष्पाप चिरमुडीवर झालेल्या बलात्काराचं तो समर्थन करत राहिला. कुलदिप सेंगर, चिन्मयानंदसारख्या बलात्कारीच्या संरक्षणार्थ उभा ठाकला. बलात्कार, निर्दोष व निष्पाप माणसांच्या हत्येचं समर्थन म्हणजे त्याची ‘देशभक्ती’ व ‘माणूस’ असण्याची ग्वाही असावी!
रोजच तो मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या विरोधात ‘हेट क्राईम’ची सुपारी द्यायचा. ‘जिहादी’, ‘अर्बन नक्सली’, ‘देशद्रोही’ म्हणून देशातील युवकांना हिणवायचा. त्यानं जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर गलिच्छ शिंतोडे उडवले. कधी त्यानं मोदींच्या अपयशाला झाकून त्यांना ‘विश्वगुरू’ म्हटलं, कधी निवडणुकीत भाजपचा प्रचारक झाला. गौरी लंकेश, दाभोलकर यांच्या खुन्यांचं तो निर्लज्जपणे समर्थन करत राहिला. भाजपविरोधी पत्रकारांना तो शिव्याशाप द्यायचा.
भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दलितविरोधी दंगलीचं समर्थन असो की, त्या दंगलीच्या निषेधार्थ झालेल्या ‘भारत बंद’चा विरोधक, आरक्षणावर घेतलेले तोंडसुख, दलित-ख्रिश्चनांच्या हल्लेखोरांना सरंक्षण, इत्यादी घटकांत तो रोजच अधिकाधिक ‘उजवा’ होत एका कंपू गटात सेलिब्रिटी होत गेला. तिकडे चीननं भारताची हजारो स्केअर किलोमीटर जमीन बळकावली, इकडे त्याची ‘मोदी(देश)भक्ती’ अधिक उजळून निघाली!
पाकिस्तान आर्थिक संकटात आला तरी मोदी,
म्यानमारमध्ये रोहिग्या मुस्लिमांचं हत्याकांड झालं तरी मोदी,
अरब काही झालं तरी मोदी,
अमेरिकेच्या निवडणुकीत मोदी,
ट्रम्प हरले की मोदी,
इस्रायल दौऱ्यात मोदी,
संयुक्त राष्ट्र परिषदेत मोदी,
गलवान घडले मोदी,
जवान शहिद झाले मोदी,
तलाक रद्द झाला मोदी,
राम मंदिर निकाल मोदी,
एनआरसी मोदी.. अबब…
फक्त मोदी आणि मोदी!
हद्द म्हणजे करोनाकाळात मोदी,
तबलिग प्रकरणी मोदी,
कितीतरी दिवस मोदींनी करोना पळवून लावल्याची हकाटी पिटत राहिला.
सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे मोदी, असा प्रचार या ‘गोदी मीडिया’च्या कर्त्याने केला.
‘मुस्लीम’ या संज्ञेशी अतीव प्रेम
रोहितच्या मुस्लीमविरोधाबाबत किती व काय-काय सांगावं! सकाळी उठल्यापासून तो रात्री निजेपर्यंत तो मुस्लिमांच्या अस्तित्वाला कलंकित करत रहायचा. जणू मुस्लीमच त्याचं अंथरूण-पांघरूण झालं होतं. रोज कुठलाही विषय मुस्लिमांवर आणायचा व त्यावर भाष्यकाररूपी श्वान सोडायचा. दोन नव्हे तर एकदाच चार-चार, सहा-सहा कोंबड्याची झुंज तो लावायचा. या सर्वांचा त्याचा विकृत पद्धतीनं आनंद लुटायचा.
राम मंदिर, अयोध्या, काश्मीर, गोरक्षा, मॉब लिचिंग, तलाक, ओवैसी, अबू आझमी, आजम खान, सीएए, एनआरसी, दिल्ली दंगल इत्यादी विषयावर त्यानं फैलावलेलं जहर रोजच विखाराच्या ठिणग्या उडवे. राम मंदिर, बाबरी प्रकरण चेतवून त्यानं असंख्य सामान्य नागरिकांची माथी भडकवली.
कोविड संक्रमणात ‘तबलिग प्रकरण’ प्रपोगेट करत त्यानं कहरच केला. भाजप सरकारच्या (त्याच्या भाषेत ‘सिस्टम’) अकर्मण्येचे दोष दाखवण्याऐवजी त्यानं कोविड पॅन्डिमिकचं सारं खापर मुस्लिमांवर फोडलं. त्याच्या इतर सहकाऱ्यांसारखा नुसता ‘तबलिग.. तबलिग...’ करत ओरडत राहिला. सबंध वर्षभर त्यानं भारतीयांना मुस्लिमांविरोधात ‘हेट क्राइम’ करण्यास उत्तेजन दिलं आणि झालंही तसंच. त्यानं फैलावलेलं विष डोक्यात भिनवून सामान्य माणसं रस्त्यावर उतरली आणि मुस्लिमांना जगण्याचा, व्यापाराचा, विहाराचा हक्क नाकारत राहिली.
ढेपाळलेली आरोग्य सुविधा, औषधांची कमतरता, बुडते रोजगार, लाखोंचं स्थलांतर, पायपिट करून मरणारे लोक, किंकाळ्या फोडणारे पेशंट, रस्त्यावर मरणारी माणसं सारं काही मुस्लिमामुळे घडत आहे, असा खोटा प्रचार त्यानं केला.
मोदी सरकारचं दोष लवपून थाळ्या बडवण्याचा आनंद साजरा करू लागला. विरोधकांना नामोहरम केलं. त्यांना देशाचे शत्रू म्हणून प्रचारित केलं. करोनासारख्या आणीबाणीत सरकारनं केलेल्या चुकांना दडवून हिंदू-मुस्लीम करू लागला. दुर्दैव म्हणजे ज्या चुकांना, कमतरतांना, दोषांना त्यानं दडवून ठेवलं अखेरीस त्याचाच तो बळी झाला.
सौजन्यशीलता कुठली आणू?
मरणानंतर उणिवा, दोष विसरणं भारतीय संस्कृती आहे. माफ करा, मी विसरू शकत नाही. कारण माणूस जसा विचार करतो, तसाच बोलतो. रोहितनं कधीही सामान्य विचार करू दिला नाही. त्यानं मला नेहमी त्याचा द्वेष करायला भाग पाडलं. माझ्यात नसलेल्या विकृत विचारांना उत्तेजन दिलं. त्याच्याबद्दल ‘अँकर’ म्हणून नव्हे तर संघाचा ‘विद्वेषी प्रचारक’ म्हणून पाहू, बघू, विचार करू लागलो. त्यानेच मला तसं करायला भाग पाडलं.
तो मुस्लिमांचा सतत राग राग करायचा, त्यांना अपमानित करायचा, ‘जिहादी’ संबोधन वापरायचा, इस्लाम व मुस्लिमांना हिंदूंपुढील आव्हान म्हणून ट्रीट करायचा. त्यांच्या जगण्याचा हक्क नाकारायचा, शिव्या-शाप द्यायचा, मुस्लीम प्रवक्त्यांना चॅनेलवर बोलावून भलं-बुरं बोलायचा, ‘गद्दार’ म्हणायचा, ‘पाकिस्तानला जा’ म्हणायचा, बहुसंख्याकांना मुस्लिमांच्या विरोधात गुन्हे करायला उत्तेजित्त करायचा.
अशा हिंस्र व्यक्तीला मी ‘चांगला’ कसं काय म्हणू? त्यानं केलेलं मानवताविरोधी, संविधानविरोधी, समाजविघातकी कृत्यं आणि हिंस्र, श्वापदी प्रचार व विचार सहज विसरू इतका विवेक व सौजन्यशीलता माझ्यात नाही. शिवाय मी ज्या भारतीय संस्कृतीत वाढलो, ती मला तसं करायला परवानगीही देत नाही.
निधनावर आनंदोत्सव साजरा करावा, इतका विवेकहीन मी नाही. अशा विकृत कृतीचं समर्थनही होऊ शकत नाही. काहींनी त्याला ‘रोहित दंगाना’ असं संबोधन वापरलं, तर त्यात काय वाइट? त्यानं नाही का घडवल्या दंगली? दिल्ली दंगल त्याच्यासारख्या पत्रकारांमुळेच घडली! त्याच्या मृत्युवर हर्ष करणाऱ्या वर्ग-गटाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण त्यानं आपल्या कृतीतून त्यांना तसे करायला उद्युक्त केलेलं आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
साहजिक आहे, त्याचे सर्वांत जास्त विरोधक मुस्लीम होते. पण ते त्याचे शत्रू नव्हते. त्यानं केलेल्या कथित पत्रकारितेचं, अपप्रचाराचं, द्वेषी मोहिमेचे ते समीक्षक होते, टीकाकार होते. त्याचे कान टोचणारे होते. त्याच्याविरोधात मुस्लिमांनी कधीही जाहिररित्या हिंसक भाषा वापरली नाही. त्याच्या निधनावर ते ‘खिराजे अकिदत’ पेश करत आहेत. त्यातले काही हर्षित झालेही असतील. त्याबद्दल नैतिक-अनैतिक चर्चा होत राहील, पण त्यांना शोक प्रस्ताव पारित करायचा नसेल तर तो त्यांचा हक्क आहे. दलित व इतर घटकांतील लोकांना त्याच्या मृत्युवर दु:ख होत नसेल तर, ते करण्यास त्यांना भाग पाडलं जाऊ शकत नाही. त्यांच्या हक्कांचं जतन व संवर्धन करणं हे भारतीय संविधानानं त्यांना दिलेली हमी आहे.
बरं भारतात विरोधी मतांच्या व्यक्तीच्या निधनावर उत्सव साजरा करण्याची विकृत परंपरा राहिलीच आहे की! गांधी हत्येनंतर पेढे वाटणारी जमात इतिहासात नोंदली आहे. नथुरामला ‘हुतात्मा’ म्हणणारी मंडळी महाराष्ट्रात निपजलीच की! कसाब व अफजल गुरूच्या फाशीवर उत्सव साजरा झालाच होता की! गौरी लंकेशचा मृत्युचा हर्ष साजरा करणारे विकृत ट्रोल्स आहेतच ना?
तरीही इच्छेविरोधात जाऊन सर्वांनी रोहितला चांगलं म्हणावं, श्रद्धा सुमन अर्पित करावी, अशी ‘लिबरल’ व ‘सेक्युलर’ असण्याची अट आणि ती प्रत्येकांनी मान्यच करावी, हा फाजिल आग्रह आहे. हा हट्ट पूर्ण करण्यास कोणीही बांधील असू शकत नाही. तेवढे व्यक्तिस्वातंत्र्य एक मानव म्हणून सर्वांनाच आहे, असायला हवं…
.............................................................................................................................................
लेखक कलीम अजीम मुक्त पत्रकार आहेत.
kalimazim2@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment