‘द डिसायपल’ : असे चित्रपट आवर्जून बघायला हवेत. त्यामुळे चित्रपट माध्यमाची आपली समज वाढते आणि आपण प्रेक्षक या नात्यानं पुढच्या इयत्तेत जातो!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘द डिसायपल’चे पोस्टर आणि त्यातील दोन प्रसंग
  • Sat , 01 May 2021
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा द डिसायपल The Disciple चैतन्य ताम्हाणे Chaitanya Tamhane कोर्ट Court

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणारा एक तरुण कलाकार काय विचार करत असेल? शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केल्यापासून गुरूंच्या आणि कलाकारांच्या इतक्या कथा ऐकल्या आहेत की, शिकण्यास सुरुवात करण्यापूर्वी मन खंबीर करावं लागतं. गुरूसुद्धा संगीत शिकवता शिकवता इतके डोस पाजत असतात की, आपण ज्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली आहे, तो बरोबर आहे की नाही, याचाच विचार करण्यात जास्त वेळ जातो. ‘आपलं(च) संगीत महान आहे. त्यामध्ये खूप साधना लागते’, ‘पैशाचा विचार करायचा असेल तर हे संगीत शिकायचं सोडून दे आणि फिल्मी संगीत किंवा भावगीत गा’, ‘आपलं संगीत म्हणजे ईश्वराची साधना’, ‘फक्त ‘सा’ व्यवस्थित लागण्यासाठी आयुष्य वेचावं लागतं’, ‘एकच राग शिकण्यासाठी अमुक खांसाहेबांनी १० वर्षं घालवली’, ‘लिहून कसलं घेतोयस? आमचे गुरू तर वही बाहेर ठेवल्याशिवाय आतमध्ये येण्याची परवानगी देत नसत’, ‘आपली कला गुरुमुखी आहे’.... अशी एकापेक्षा एक अचंबित करणारी वाक्यं सारखी कानावर पडत असतात. संगीत शिकता शिकता गुरूची सेवा करावी लागते. पूर्वीचे गुरू सूर व्यवस्थित लागत नसेल, तर काय काय शिक्षा करायचे, याच्या कहाण्या एका शिष्याकडून दुसऱ्या शिष्याकडे पसरवल्या जातात…

असा विचार करता करता युवा कलाकार नोकरी करावी की, संगीत शिकावं किंवा दोन्ही करावं या विवंचनेत असतात. कारण त्यांना स्वतःच्या पायावर उभं रहायचं असतं. एकेक मित्र–मैत्रिणी कमवायला लागतात, तेव्हा युवा कलाकाराचा आत्मविश्वास डळमळणं स्वाभाविक आहे. कला आणि अर्थकारण यांचा मेळ कसा घालायचा? फक्त नोकरी करत राहिलो, तर कला सोडून द्यावी लागेल. दोन्ही करत राहिलो, तर गुरूंची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आपल्या गुरूलाही आयोजक कार्यक्रमाचे पैसे देत नसतील, तर पूर्ण वेळ गाणं करायचं कसं? ‘उमेदवारी’ या नात्यानं फुकट कार्यक्रम किती महिने करत रहायचं? कार्यक्रम मिळवायचे असतील तर आयोजकांची चापलुसी करावी लागेल. कोणाकोणाशी संपर्क ठेवायचा? काल एक आयोजक म्हणाले की, ‘तू उत्तम गातोस.’ पण कार्यक्रम द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात, ‘नाव नसलेल्या कलाकाराला प्रायोजक मिळत नाहीत… तुम मिलते नहीं हो, मिलते रहो, देखेंगे’. गेल्या वर्षीसुद्धा ते असंच म्हणाले होते. आयोजकांनाच भेटत राहिलो तर रियाज केव्हा करू?    

नावाजलेल्या कलाकारांना प्रायोजक मिळतात, पण बरेचसे कलाकार नाव झाल्यावर जुगलबंदी करत बसतात. ते काय शास्त्रीय संगीत आहे का? वरचा ‘सा’ लावायचा, लगेच खर्जातला ‘सा’ लावायचा, तबला–हार्मोनियमबरोबर जुगलबंदी करून टाळ्या मिळवायच्या, या गिमिक्सचा संगीताशी काहीच संबंध नाही. जेवढ्या टाळ्या, तेवढे प्रायोजक असं गणित असल्यामुळे मी अशी गिमिक्स करावीत की, गुरूंच्या शिकवणुकीशी इमान राखावं?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या सगळ्या प्रश्नांमधून सुवर्णमध्य साधून संगीताचे वर्ग सुरू केले तर शिष्यांचे आई-वडील ‘इंडियन आयडॉल’मध्ये माझा पाल्य कधी जाणार आणि टीव्हीवर कधी झळकणार, असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. शिष्याला फ्युजन करू दिलं नाही म्हणून कालच त्याची आई तणतण करत गेली. अशा वृत्तीनं क्लासची गर्दी कमी होईल आणि मिळतं तेवढं उत्पन्नही जाईल. मी करतोय ते बरोबर आहे ना? की आमच्या गुरूंची शिकवण चुकीची आहे? त्यांनी चित्रपट संगीत–भावगीताला इतकं कमी का लेखलं? इतर देशांतील संगीताची ते हेटाळणी का करायचे? ‘इंडियन आयडॉल’मध्ये भाग घेऊन मैत्रीण पुढे गेली. तिचे फॅन केवढे वाढले आहेत, तिला किती लाईक्स मिळतात! माझ्या व्हिडिओखाली ‘रटाळ आहे’ अशा कॉमेंट्स आहेत. माझं काही चुकतं आहे का?

‘नेटफ्लिक्स’वर शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘द डिसायपल’ हा चैतन्य ताम्हाणे लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपट बघताना आपण शिष्याच्या भूमिकेतून असा विचार करत राहतो, हे त्याचं सर्वांत मोठं बलस्थान आहे. विचार करण्याची उसंत न देणारे आणि विचार करायला लावणारे, असे चित्रपटाचे दोन ढोबळ प्रकार मानले जातात. ‘कोर्ट’ या आधीच्या चित्रपटाप्रमाणेच ताम्हाणे वेगवेगळी दृश्यांची मालिका युवा गायकाच्या दृष्टीकोनातून दाखवतात. त्याच्या मनात काय चाललं आहे, हे कधी दृश्यांतून, तर कधी मनोगतातून दाखवलं जातं. जे दिसतं त्याचा अर्थ लावण्याचं काम मात्र त्यांनी प्रेक्षकांवर सोडलं आहे.

मायकल सोबोकिंस्की या पोलंडच्या सिनेमॅटोग्राफरच्या कॅमेऱ्यानं टिपलेली दृश्यं, त्याचे गर्भितार्थ आपल्यापर्यंत कमीत कमी संवादात पोहोचवतात. सुशांत सामंत यांचं कला दिग्दर्शन उत्तम आहे. विवेक गोम्बर यांनी अशा अनवट विषयावर चित्रपट निर्माण करण्यात दाखवलेलं धाडस कौतुकास्पद आहे. 

चित्रपटाचं संकलन काही प्रसंगांत विचित्र वाटतं. काही प्रसंग असे जोडले आहेत की, धक्के बसतात. गायक कलाकाराची विचार प्रक्रिया दाखवताना केलेला तंबोऱ्याचा वापर उत्तम आहे. परंतु गायनाची मैफल सुरू होते, त्या वेळी तो तंबोरा सुरू ठेवला असता तर प्रसंग जोडल्यासारखं वाटलं नसतं. एक लोकगीत गायक रेल्वेमधून जातो, तिथं चित्रपट अचानक संपतो, परंतु ते संगीत चित्रपटाच्या टायटल्सच्या वेळी सुरू ठेवायला हवं होतं, असं वाटतं. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे युगंधर देशपांडे यांनी केलेली उत्तम कलाकारांची निवड. संगीताची पार्श्वभूमी असलेल्या अनेक हिंदी-मराठी चित्रपटात नायक–नायिका वाद्यं चुकीच्या पद्धतीनं हातात धरतात, गाण्यात तबला ऐकू आला तरी दृश्यात आपल्याला मृदंग दिसतो. या चित्रपटात मात्र असं काही पाहायला मिळत नाही. नायकाची भूमिका आदित्य मोडक या युवा कलाकारानं केली आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणारा हा आश्वासक कलाकार गेली दोन दशकं डॉ. राम देशपांडे यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहे. अर्थात काही वेळेस त्याचा कोरा चेहरा खटकतो.

नायकाच्या गुरूची भूमिका जयपूर अत्रौली घराण्याचे गायक डॉ. अरुण द्रविड यांनी केली आहे. उस्ताद अब्दुल माजीद खां, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे गायनाचं शिक्षण घेतलेले बुजुर्ग कलाकार गुरूच्या भूमिकेसाठी लाभले आहेत हे विशेष. शिष्यांच्या भूमिकेमध्ये युवा गायिका दिपिका भिडे-भागवत, अभिषेक काळे, तबलावादक ओंकार गुलवडी, सारंगीवादक मुराद अली हे कलाकार आहेत. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उत्तम आहे. त्याचं श्रेय संगीत संशोधन आणि संगीत आराखडा (डिझाईन) करणारे प्रख्यात तबलावादक अनिश प्रधान यांनाही आहे.

किरण यज्ञोपवीत यांनी नायकाच्या वडिलांची भूमिका उत्तमरीत्या केली आहे. मुलांच्या खेळत्या वयात पालकांनी त्यांना खेळू न देता रियाज करायला लावणं, ‘गुरूची सेवा’ या नात्यानं बरंच काहीबाही करावं लागणं, ही सर्व उदाहरणं आपण प्रत्यक्षातही बघतो\ऐकतो. त्यामुळे हा चित्रपट आहे, असं आपल्याला वाटत नाही. 

प्रेक्षक या नात्यानं आपण नायकाच्या संगीत साधनेशी जोडले जात नाही, कारण त्याला दर्जाचा ध्यास आहे, पण रंजकतेचा तिटकारा आहे. तसंच त्याला दोन्हीचं संतुलन साधता आलेलं नाही. शास्त्रीय संगीतामध्ये काही दर्जेदार गायन-वादन करतात, परंतु अनेक जण लोकप्रियता मिळवण्याची ‘पळ’वाट धरतात. शास्त्रीय संगीत अधिकाधिक रसिकांनी ऐकायला हवं, या क्षेत्रात पैसा यायला हवा, परंतु त्याचं ‘आयपीएल’ होऊ नये एवढीच अपेक्षा. संगीत रंजक आणि दर्जेदार करण्याचा सुवर्णमध्य साधणारे कलाकार निर्माण व्हायला हवेत. तेच तेच राग आणि त्याच बंदिशी वारंवार गायल्या गेल्यास श्रोते कमी होणं साहजिक आहे. बुजुर्ग कलाकार वेळेत निवृत्त होत नाहीत, हे गर्दी कमी होण्याचं आणखी एक कारण या चित्रपटात दिसतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘आपलंच संगीत श्रेष्ठ’ असं सांगणारे गुरू लाभण्यापेक्षा सर्वच संगीताची आवड लावणारे गुरू लाभले, तर कलाकार आणि श्रोतेसुद्धा प्रगल्भ होतील. या चित्रपटात संगीत संग्राहकाच्या तोंडी एक महत्त्वाचं वाक्य आहे - ‘संगीत आत्मानंदासाठीच आहे, असं कोणी कलाकार म्हणत असेल तर ते खोटं आहे. आपली कला श्रोत्यांसमोर सादर करणं हे प्रत्येक कलाकाराला वाटणं साहजिक आहे. ते अमान्य कशाला करायचं?’ प्रेक्षकाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड नसेल तर त्या शिष्याचं मानसिक द्वंद्व त्याच्यापर्यंत पोहचेलच, असं सांगता येत नाही. 

प्रेक्षक सुजाण आहेत असं गृहीत धरून तयार केलेले, दृश्य माध्यमाचे अर्थ लावण्याची सवय लावणारे, असे चित्रपट आवर्जून बघायला हवेत. त्यामुळे चित्रपट या माध्यमाची आपली समज वाढते आणि आपण प्रेक्षक या नात्यानं पुढच्या इयत्तेत जातो. 

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Milind Kolatkar

Sat , 01 May 2021

माफ करा, पण चांगलाच कंटाळवाणा आहे हा. या पेक्षा त्या राजस्थानी मालिकेत बरंच काही घडतं. तितकासा भावला नाही. त्यात ते एकसुरी विचार येत रहातात. अन तो त्याच काही मार्गांवरून गाडी हाकत असतो. भयानक कंटाळा येतो. :-( यापेक्षा अधिक चांगला नक्कीच करता आला असता.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......