अजूनकाही
तुमची घुसमट होतेय का? कोंडमारा झालाय आपला, असं वाटतंय का? कुणीतरी गळा दाबतोय आपला, छातीवर बसून दाब देतोय सारखा, असं जाणवतंय का? तोंड दाबून बुक्क्यांचा मार देतोय एक जण, असा भासही होतोय तुम्हाला? म्हणजे ओरडता येत नाहीये, बोलताही येत नाहीये, अशी अवस्था झालीय का तुमची?
छे, छे! ही सारी लक्षणं लोकशाहीची नाहीत, आजाराची आहेत! तुम्हाला लोकशाहीचा संसर्ग झालाय अन उगाच तुम्ही गुदमरताय असं वाटू लागलंय तुम्हाला. काहीही झालेलं नाहीये. खूप दिवस घराबाहेर न पडल्याचा हा परिणाम आहे. देश आणि देह असा गोंधळ करताहात तुम्ही. ऑक्सीजन देहाला लागतो, देशाला नव्हे! कुणी सांगितलं तुम्हाला देशाला ऑक्सीजन हवाय म्हणून? तुम्ही वर्तमानपत्रं फार वाचू लागलेले दिसता. शिवाय टीव्हीही बराच बघताय वाटतं. नका करू तसं. घरी बराच काळ बसावं लागल्यानं तुम्हाला वर्तमानपत्रं अन टीव्ही यांचं व्यसन जडलंय. व्यसनी झालाय तुम्ही. अशा व्यसनांपासून लवकर सुटका करण्याचा तर आमचा कार्यक्रम आहे. तशी योजनाही आखलीय आम्ही. वर्तमानपत्रं आणि टीव्ही ही काय व्यसनं झाली का हो? रिकामटेकड्या वाचकांनी, निरुद्योग्यांनी, प्रेक्षकांनी अन पक्षांच्या प्रवक्त्यांनी करायची असतात ती व्यसनं. त्यांना त्यावाचून काही सुचत नाही आणि त्यावाचून त्यांचं काही चालतही नाही. आपल्यामुळे वर्तमानपत्र खपतं; तो टीव्हीसुद्धा आपल्यावर जगतो, असा भ्रम झालाय त्यांना.
तुम्हाला काय हवंय, सिलिंडर ना? मिळेल की! प्लांट सुरू केलेत. ट्रक निघालेत. अहो, लागतोच केवढा तुम्हाला ऑक्सीजन? तुम्ही काय मानवच आहात ना, का राक्षस? देह केवढा तुमचा, तेवढा ऑक्सीजन मिळून जाईल. दम धरा जरा. काय म्हणता, थोडाही दम धरवत नाहीये आता? कसं व्हायचं साहेब अशानं? तुमच्या या टिचभर देहाला ऑक्सीजन नाही, म्हणून तडफडताय तुम्ही. कधी विचार केलाय का देशाचा? कधी काय मिळत असेल या देशाला, याचा काही अंदाज आहे तुम्हाला? गेली ७० वर्षं या देशाला लुटलं त्यांनी, छळलं त्यांनी, विचारलं कधी त्यांना तुम्ही?
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
औषधं दिली, लशी पोहचवल्या आम्ही, स्वत: लस टोचून घेतली, त्याची छायाचित्रं पाहिली असतील तुम्ही. लस घेण्याआधी ऑक्सीजन कशाला घेताय तुम्ही? या देशाची हालत पाहिलीत तुम्ही, काय करून ठेवलीय त्यांनी? या देशाला खरी गरज आहे हायड्रोजनची, न्यूक्लिअरची, टिटॅनियमची आणि ते मिळवायला खंबीर नेतृत्वाची…
अहो, कोणत्याही देशाचा खरा प्राणवायू असतो, तो त्या देशाचा नेता. खरा ऑक्सीजन तोच! आज देशाला कित्येक सिलेंडर्सची ताकद असलेला महान नेता लाभलाय. त्याच्याकडे नुसतं बघितलं तरी छाती ऑक्सीजननं भरून येते! हो, ‘अभिमाना’च्या जागी आम्ही ‘ऑक्सीजन’ शब्दाचा वापर करतो. कारण शेवटी, छातीतच सारं जाऊन सामावतं. कुठे त्यांची ५६ इंचांची छाती, कुठे तुमची ४०ची. विचार करा, त्यांच्या छातीत केवढा ऑक्सीजन भरलेला असेल. नुसता फू… करायचा अवकाश, विरोधी पक्षांचं एकेक राज्यं उडालंच समजा. उडालं म्हणजे गेलं उडत! त्याच्या मनात आलं की, तो छातीतला ऑक्सीजन असा काही सोडतो की, त्याचं वादळ तयार होतं आणि सारे मूर्ख विरोधक त्यात उडून जातात.
ऐका माझं. करोनाचा विषाणू तुमचा देह नष्ट करतो, देश नाही! आपला प्राचीन देश अन त्याची सनातन संस्कृती, अशा कितीतरी विषाणूंपासून सुरक्षित राहिलेलीय. असे कित्येक आले, धडकले अन मातीला मिळाले! देश जशाचा तसा उभाच आहे. असतील, काहींचे बळी द्यावे लागले असतील. अशा बलिदानांनी तर देश बनत असतो! त्याची फिकीर नाही आम्हाला. आमच्या नेत्याला तर अजिबात नाही! जसे कित्येक विषाण येऊन मात खाऊन गेले, तशी कित्येक बलिदानं त्यानं बघितलीयत. काही माणसं खपण्यासाठी असतात. त्यांनी खपलेलंच बरं, असं देशाचं तत्त्वज्ञान आहे.
काही लोकांना देशाची सेवा करायला आणि ती करता करता हौतात्म्य पत्करायला आवडतं. पण आवडीचा प्रश्न येतोच कुठे? त्यांना आम्ही ‘वॉरिअर’, ‘योद्धे’, ‘लढवय्ये’, ‘झुंजार’ असे किताब बहाल करतो आणि अजिंक्य राहतो! ‘अयोध्या’ या शब्दासारखेच हो!! युद्धात जी कोणाकडून जिंकलीच गेलेली नाही, ती नगरी आम्ही उगाच नाही गौरवत. तेव्हा नाही कुणी ऑक्सीजनचा आरडाओरडा केला! संजीवनी उटी आणायची आणि जगवायचं अशा शिपायांना. तुम्ही उटी आणि काढे यांची थट्टा करता, आम्हाला ठाऊकाय. म्हणूनच सारखा प्राणवायू लागतो तुमच्यासारख्या मरतुकड्यांना!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
राष्ट्राभिमान हा राष्ट्राचा ऑक्सीजन! तो आमच्या राज्यात भरपूर आहे. तो नळकांड्यातला मागून आमची लाज काढू नका. तुम्ही असे लेचेपेचे कसे काय हो? त्या नळकांड्यातल्या वायूवर जगता तुम्ही? त्यासाठी इतका गहजब करता? आमच्या राज्याची, आपल्या प्राणप्रिय राष्ट्राची लाज काढता? कुठे तो प्राणवायू, कुठे तो प्राणप्रिय! लक्षात आलं ना, प्राणापेक्षा जो प्रिय तो देश म्हणजे आपलं महान राष्ट्र. विश्वगुरू! त्याला तुम्ही प्राणवायूच्या नळकांड्याएवढा आकार देता? लाज वाटायला हवी तुम्हाला. तुमच्यात राष्ट्राभिमानाचा तुटवडाय, ऑक्सीजनचा नाही! तुमचं राष्ट्रप्रेम घटत चाललंय अन तुम्हाला वाटतं की, ऑक्सीजन ओसरत चाललाय.
आपल्या नेत्याच्या काळातली राष्ट्राची प्रगती तुम्ही फक्त त्या नळकांड्यामध्ये, त्या क्षुल्लक नळ्यांमध्ये शोधता, हे केवढं लज्जास्पद आहे आमच्यासारख्या राष्ट्रभक्तांसाठी. आमच्या छातीत तुमच्या त्या नळ्या खुपसा, केवढा तरी राष्ट्रभक्तीचा पुरवठा होईल तुम्हाला. ती राष्ट्रभक्ती भरून घ्या छातीत, मग बघा कशी मात करता येते ती. विषाणू, जिवाणू, शुक्राणू, किटाणू कुणीही येवो समोर… आमचा राष्ट्रनेता खातमा करतो त्यांचा!
‘ऑक्सीजन, ऑक्सीजन’ अशी आरडाओरड करायला राष्ट्रद्वेष्टे कारणीभूत आहेत, हे आम्ही जाणतो. तसं पत्रकदेखील आम्ही काढलंय. जे जे राष्ट्रशत्रू असतात, त्या साऱ्यांना आपल्या महान सामर्थ्याची बदनामी करायचीय. त्यामुळे त्यांनी या पत्रकारांना हाताशी धरून जळणाऱ्या चिता, रडणारे नातेवाईक, पळापळ करणारे शेजारी आणि पिडलेले डॉक्टर्स यांची छायाचित्रं आणि दृश्यं दाखवून आपलं महान नेतृत्व कसं खुशालचेंडू आहे, असं भासवायचा प्रयत्न केलाय. निमित्त ऑक्सीजनचं काढलं हो त्यांनी…
अहो, मला सांगा ऑक्सीजन नसता तर कशा जळाल्या असत्या त्या चिता? प्राणवायू नसता तर धावाधाव कशी करता आली असती, त्या आजारी माणसांच्या मित्रांना? ऑक्सीजन मुबलक आहे आणि तो पीपीई किट घालून रुग्णालयात वावरणाऱ्यांनासुद्धा घाम फोडत होता का? मुळीच नाही. आमच्या महापालिकेच्या दवाखान्यात तो केवढाय, हे तो गळाल्यामुळे समजलं तरी. नाहीतर कुठायत ती नळकांडी, असा भोंगा लावला असता सर्वांनी. आम्ही जमावबंदी केली म्हणून, नाहीतर प्रत्येक रिकाम्या विरोधी नेत्याला रस्त्यावर आमच्याविरुद्ध घोषणा द्यायला आजूबाजूला भरपूर ऑक्सीजन असतो, याची जाणीव झाली असती. म्हणे ऑक्सीजन! घसा खरवडून आणि मुठी आवळून बोंबलायला काय कर्णवायू लागतो की काय? घाण वासाचा कर्बवायू सोडून वातावरणात आमच्याबाबत दुर्गंधभरले करतात हे नतद्रष्ट!
बरं का, तुरुंगातही ऑक्सीजन असतो म्हणावं. तिथं कशाची आलीय घुसमट? हवा म्हणजे ऑक्सीजनच ना? विचारा त्या दिशा रवीला. वातावरणतज्ज्ञ म्हणवते ना स्वत:ला! सांग म्हणावं आम्ही तुरुंगामधून ऑक्सीजन काढून घेतला का ते. उत्तर प्रदेशातले तर किती तरी पत्रकार हवाला देतील तुरुंगातल्या ऑक्सीजनचा. खोट्या बातम्या दिल्या आमच्या राज्याबद्दल म्हणून ऑक्सीजन नसलेल्या बेटावर नाही धाडलं त्यांना! अजूनही सांगतो. आमच्या राज्यात ऑक्सीजनची टंचाईय, त्याचा काळाबाजार होतोय, अशा बातम्या छापणाऱ्यांना आम्ही ऑक्सीजनचा लाभ घेण्यासाठी तुरुंगात पाठवू. त्यांनी नाही तर म्हणावं! त्या नळकांड्यांना बांधून फटकेच हाणू यापुढे या पत्रकारांना. तुरुंगाची हवा खायला मजा येईल त्यांना. स्वातंत्र्य नाही, परवानगी नाही, असं खोटंनाटं सांगतात काय! तुमच्या मालकांना तरी ठाऊकाय का की, असं स्वातंत्र्यबितंत्र्य काही नसतं. ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ असाच खाक्या असतो जगाचा. त्या जगात आमचं राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राचा धर्म ‘तळे राखील तो पाणी चाखील’ हाच आहे, हे लक्षात ठेवा म्हणावं. आम्ही लाठ्या घुमवतो शाखेत तेव्हा जो ‘घूम घूम… गूँ गूँ’ असा ध्वनी निघतो, तो ऑक्सीजनमुळेच ना? की निर्वात पोकळीत आमच्या शाखा भरतात नि आमच्या लाठ्या पोकळ नळ्या असतात?
तो आमच्या पक्षाचा तरणाबांड माजी मुख्यमंत्री पाहता ना दररोज? त्याच्याकडे पाहिलं तरी ऑक्सीजन केवढा ठासून भरलेलाय सर्वत्र ते समजतं. ऑक्सीजनला शल्यांचा ध्वनी बहाल करण्याची अत्यंत विस्मयकारी कला त्याच्यापाशी असल्यानं तो कायम टीव्हीच्या बूमसमोर उभा राहून हवाबाणांचा भडिमार करत राहतो महाविकास आघाडीवर. बोला आता, आहे कुठे टंचाई? दिसतो कुठे तुटवडा? त्याचं बोलणं कसं आग ओकणारं असतं. आग कधी ऑक्सीजनवाचून तयार होईल काय? पेटायला वारा लागतोच. महाराष्ट्र दऱ्या-खोऱ्यांचं राज्य असल्यामुळे एरवीही इथं वारा भरपूर असतो. मुंबई तर समुद्राकाठीच. तिथं वाऱ्याला तोटाच नाही. वारेमाप ऑक्सीजन म्हणतात त्याला. साऱ्यांना तोंडाचा ‘आ’ वासून समुद्रकाठी उभं करायला लावलं की, झालं काम! अहो, आमच्या पक्षात आयडियांची कमी कधी नसते! ऑक्सीजन नाही तिथं आयडियांची कशी असणार?
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आमच्या पक्षाचं नाव यापुढे ‘ऑक्सी जनता पार्टी’ ठेवावं असा प्रस्ताव मांडायच्या विचारात काही हिमालयीन कार्यकर्ते असल्याचं समजतं आहे. हिमालयात ऑक्सीजन बक्कळ. फक्त तो एव्हरेस्टच्या आसपास नसतो म्हणे! तिथं काय इकडची नळकांडी पाठीशी बांधून चढाई करायची की झालं! कुठेही जा, चढाई महत्त्वाची. आता दिल्लीत नळकांडी घेऊन आमच्या नावाचा उद्धार करणाऱ्यांना त्या सेक्युरिटीवाल्यांनी चढाई करू दिली. त्याबद्दल टीव्हीवाल्यांचा ऑक्सीजन रोखून धरू, अशी तंबी दिल्याबरोबर सारे सरळ आले. टीव्हीचा ऑक्सीजन म्हणजे जाहिराती! त्या कितीतरी आमच्या हातात असतात!!
वर्तमानपत्रवालेही आमच्या तोंडाकडे पाहत असतात. त्यांनाही ऑक्सीजन आम्हीच पुरवतो. आमच्या म्हणजे राष्ट्राच्या नेत्याची छबी सतत दाखवत राहिलं पाहिजे, एवढीच आमची अट. म्हणजे कसं आहे बघा, आमच्या म्हणजे देशाच्या साहेबाचा ऑक्सीजन कोणता, तर लोक! त्यांना लोक दिसले की, स्फुरण येतं अन् छातीत फुलोरा येतो असं नाही. लोकांना ते दिसले की, त्यांना ऑक्सीजन चढलाच! म्हणून ते सदोदित लोकांना दिसावेत, अशी आमची खटपट राहते.
आम्ही नेहमी गमतीनं म्हणतो की, साहेबांना ऑक्सीजनवर ठेवलाय आम्ही! ट्रकच्या ट्रक भरून ऑक्सीजन आणावा लागतो, आम्हाला माहिताय का?
जय हिंद, जय महाराष्ट्र. जन जन में ऑक्सी, ऑक्सी में जन जन…
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment