वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी पेन परजून बसलेला ईगो आपला पराभव खुल्या मनाने मान्य करतो. हे करत असताना आपली पत गमावतो, प्रामाणिकपणाची किंमत मोजतो...
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मंदार काळे
  • ‘रॅटटुई’ सिनेमाचे पोस्टर आणि त्यातील काही दृश्यं
  • Fri , 23 April 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र रॅटटुई Ratatouille लिंग्विनी Linguini रेमी Remy स्किनर Skinner अंतोन ईगो Anton Ego

थोडक्या पैशात चालवली जात असल्याने ‘फुकट लिहिणार्‍यास प्राधान्य’ अशी पाटी लावून बसलेली पोर्टल्स तसंच वृत्तपत्रे, आणि फेसबुकसारखी समाजमाध्यमे यांच्या कृपेने चित्रपटांच्या समीक्षकांचे हल्ली भरघोस पीक आले आहे. चित्रपटाची कथा आपल्या शब्दांत सांगून, त्याला दिग्दर्शक, प्रमुख अभिनेत्यांच्या meta-data म्हणजे पूर्व-माहितीची जोड देऊन समीक्षक म्हणून मिरवणारे बरेच दिसू लागले आहेत. सोबत ‘मीच पयला’ची अहमहमिका चालवणारे आणि ‘बकवास आहे. पैसे फुकट घालवून नका’चे सल्ले न मागता देणारेही उगवले आहेत.

‘मसान’सारख्या नितांतसुंदर चित्रपटाबद्दलही असला सल्ला वाचला होता. त्यावर मी तपशीलाने लिहिल्यावर ‘आम्ही खरंच या दृष्टीने पाहिले नव्हते. आता पुन्हा पाहू,’ म्हणून कबुली देणारे एक-दोघे निघाले, नि लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटून गेले. पण अशी खुल्या मनाने विचार करणारी माणसे विरळाच. खाली दिलेल्या व्हिडिओतील ईगो हा असा दुर्मीळ नमुना. एरवी आपल्यासारख्यांचा कंपू बनवून ‘अहो रूपम् अहो ध्वनिम्’ पद्धतीने स्वत:चे म्हणणे रेटणारेच अधिक. अज्ञानींच्या बहुमताने ज्ञानालाही सत्याच्या स्थानावरून खाली खेचता येते, हा आता नित्य अनुभवाचा भाग झालेला आहे.

आणि या सर्वांवर कडी म्हणजे बहुसंख्य लोकांना आवडते ते सारे वाईट आहे, कमअस्सल आहे, हे आवर्जून सांगणारे ‘उन्नत-नासिका’ समीक्षक तर आपली मोठी परंपराच घेऊन येतात. यांच्या समीक्षेत गोष्ट आणि माहितीसोबत वास्तववाद, नव-वास्तववाद, जादुई-स्वप्नवाद वगैरे जड-जड शब्दांची पखरण असते. ज्याने समीक्षेचे वजन वाढते बहुतेक! या चिरफाड\पोस्टमॉर्टेममध्ये बिचारे चित्रपटाच्या अनुभवाशी नाते जोडण्याचे विसरून जातात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अशा सर्वांसाठी ‘रॅटटुई’ या चित्रपटातले हे स्वगत (जे त्या समीक्षकाने लिहिलेल्या एका रिह्व्यूचा भाग आहे) इथे शेअर करतो आहे. ‘रॅटटुई’ हा चित्रपट आपल्याकडील पंचतंत्राच्या कुळीतली कथा घेऊन आला आहे. गुणवत्ता नसून केवळ वारसा म्हणून मालकी/सत्ता हाती आलेले, गुणवत्ता असूनही हलक्या कुळातील असल्याने हक्काचे स्थान नाकारले गेलेले, त्यांना ते मिळते आहे, असे दिसताच ते हिरावून घेण्याचा आटापिटा करणारे; अनुक्रमे लिंग्विनी, रेमी (उंदीर) आणि स्किनर ही तीन पात्रे तीन मानवी प्रवृत्तींची प्रतीके आहेत. या तिघांपलीकडे चौथे महत्त्वाचे पात्र आहे ते अंतोन ईगो. चित्रपटात ईगोला इतर तिघांइतके फुटेज मिळाले नसले तरी त्या पात्राचे महत्त्व कमी नाही. याचे कारण म्हणजे तो एका बाजूने त्याच्याशिवाय त्या कथेचा निरास होऊ शकत नाही आणि दुसरे म्हणजे त्या कथानकाचा तो एकप्रकारे सूत्रधार आणि निवेदकही आहे.

हा ईगो फूड-क्रिटिक अर्थात खाद्य-समीक्षक आहे. आपल्याकडे हा प्रकार फारसा नसला, तरी चित्रपटाची पार्श्वभूमी असलेल्या फ्रान्समध्ये माणसे जगण्याचा सर्वांगांनी उपभोग घेत असल्याने त्याची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याकडे चित्रपटाची तथाकथित वृत्तपत्रीय समीक्षा वाचून (खरं तर दिलेले रेटिंग पाहून) अनेक प्रेक्षक तो पाहावा की नाही हे ठरवतात. तसेच ईगोसारख्या चिकित्सक समीक्षकाचे मत वाचून चित्रपटातील पॅरिसमधले खवय्ये एखाद्या रेस्तरांमध्ये जावे की नाही, जाऊन कोणता पदार्थ खावा, याबाबत निर्णय घेत असत. त्यामुळे शहरातील सर्व रेस्तरांमधील शेफ/कुक यांच्यात त्याचा दरारा होता. शेफ गुस्तोवच्या ‘गुस्तोव्ज’ या रेस्तराचे रेटिंग ईगोने कमी केल्यामुळे त्याचा व्यवसाय डबघाईला येतो. त्यातून त्याची आर्थिक परिस्थिती ढासळते, परिणामी त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्याचा मृत्यू होतो. ईगोचा एक रिव्ह्यू काय करू शकतो, याची ही झलक असते. अशा कठोरहृदयी ईगोचे हे खाली दिलेले स्वगत आहे, ते रेमी या छोट्या उंदराबद्दल, त्याच्या भाषेत ‘लिटल शेफ’बाबत.

गुस्तोवचे डबघाईला आलेले रेस्तरां रेमीच्या पाककौशल्याने पुन्हा उभारी धरते. अर्थात त्याचे श्रेय त्याचा चेहरा म्हणून मिरवणार्‍या लिंग्विनीकडे जाते. या नव्या रेस्तरां आणि शेफच्या मूल्यमापनासाठी ‘मी तुमच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उद्या येईन’ अशी गर्भित धमकीवजा सूचना देऊन ईगो जातो. थोडक्यात आयत्या वेळच्या कारणांना जागा न ठेवता पदार्थ निवडीला आणि पाककौशल्य साधण्यास भरपूर वेळ देऊन आव्हान देतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

सारे प्रसिद्ध पदार्थ सोडून रेमी त्याच्यासाठी ‘रॅटटुई’ या खेडूत-खाण्याची निवड करतो, तेव्हा त्याचे सहकारी आश्चर्यचकित होतात. ज्याप्रमाणे चित्रपटाचा संभाव्य प्रेक्षक ध्यानात घेऊन मांडणी केलेला चित्रपट लोकप्रिय होतो, त्याप्रमाणे खरा शेफ आपल्या ग्राहकाला अचूक जाणणारा असावा लागतो. त्याची संभाव्य आवडनिवड, चवीबद्दल त्याची अपेक्षा वगैरे बाबींचा ग्राहकाच्या प्रकृतीनुसार अदमास घेऊन त्या ग्राहकासाठी पदार्थ तयार करू शकतो, तो खरा श्रेष्ठ शेफ ठरतो. रॅटटुई खायला घालून ईगोला त्याच्या बालपणात घेऊन जाणारा रेमी हे आव्हान जिंकतो ते त्यामुळे.

वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी पेन परजून बसलेला ईगो आपला पराभव खुल्या मनाने मान्य करतो. हे करत असताना तो खाद्य-समीक्षक म्हणून असलेली बाजारातील पत गमावतो, प्रामाणिकपणाची किंमत मोजतो. म्हणून त्याचे हे स्वगत उल्लेखनीय ठरते -

“In many ways, the work of a critic is easy. We risk very little, yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face is that in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so. But there are times when a critic truly risks something and that is in the discovery and defense of the new. The world is often unkind to new talent, new creations. The new needs friends.

Last night, I experienced something new, an extraordinary meal from a singularly unexpected source. To say that both the meal and its maker have challenged my preconceptions about fine cooking is a gross understatement. They have rocked me to my core. In the past, I have made no secret of my disdain for Chef Gusteau's famous motto, "Anyone can cook."But I realize only now do I truly understand what he meant. Not everyone can become a great artist, but a great artist can come from anywhere. It is difficult to imagine more humble origins than those of the genius now cooking at Gusteau's, who is, in this critic's opinion, nothing less than the finest chef in France. I will be returning to Gusteau's soon, hungry for more.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जाता जाता : चित्रपटाबद्दल लिहिताना फोलपट-मसाला (मेटा-डेटा) अथवा माहितीची जोड नाही म्हणून या लेखनाला नापास करण्यासाठी ईगोप्रमाणेच पेन सरसावून बसलेल्यांसाठी थोडेसे.

या चित्रपटामध्ये ज्याचे स्वगत आहे, त्या ईगोला प्रसिद्ध अभिनेता पीटर ओ’टूल याचा आवाज दिला आहे. पीटर ओ’टूल म्हणजे ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका केलेला अभिनेता, आठ वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळूनही त्याच्यापासून वंचित राहिलेला.

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख