रात्री आम्ही फारुक अब्दुल्ला यांच्याकडेच राहायला होतो. तसं बघायला गेलं तर थोरले अब्दुला म्हणजे मरहूम शेख अब्दुल्ला यांच्यापासूनच आमचे काश्मीर रियासतीशी संबंध आहेत, पण ते जाऊ दे. काश्मिरातील प्रसिद्ध मटन गुश्ताबा ही आमची आणि फारुकजींची मुख्य आवड आहे. गुश्ताबा असेल तर आम्हाला फारुकजींकडे आमंत्रण असतेच. दरवेळी जाणे जमतेच असे नाही, पण आम्ही जाण्याच्या प्रयत्नात असतो. असो. रात्री गुश्ताब्यावर ताव मारून झाल्यावर सकाळी आम्ही आमच्या बेडरूममधून बाहेर आलो, तर फारुक साब अमितजींशी फोनवर बोलत होते. काहीतरी लोकसभेतील कामकाजाविषयी चर्चा सुरू होती. मी तिथेच आहे म्हटल्यावर अमितभाई एकदम खुश झाले. म्हणाले, ‘हमारे शिरुभाय को फोन दे सकते हैं आप?’
आम्ही फोन घेतल्यावर अमितभाई म्हणाले, ‘गुश्ताबा केवी हती?’
अमितभाई यांची गृहमंत्रालयावर पकड चांगली आहे. आम्ही फारुकजींकडे गेलो, हे गुप्तहेरांनी त्यांना सांगितले तर होतेच, पण गुश्ताब्याची पार्टी आहे, हेसुद्धा सांगितले होते. मी सांगितले, ‘गुश्ताबा न होता कर्या. रोगन जोश पार्टी हती.’ इन्फर्मेशन चुकल्याचे दुःख अमितभाईंना झाले असणार. आम्ही फारुकभाईंना डोळा मारला. ते अर्थपूर्ण हसले.
राजकारणात अशा छोट्या-छोट्या ‘चाटा’ घालायच्याच असतात. फुटबॉलमध्ये ‘चाट घालणे’ हा ‘फाउल’ मानला जातो. काही वेळातर चक्क ‘यलो कार्ड’ दिले जाते किंवा ‘रेड कार्ड’सुद्धा दिले जाते. इथे राजकारणात ‘चाटा’ घालत घालतच गोल मारायचा असतो! असो.
अमितभाई कसलेले राजकारणी असल्यामुळे चटकन सावरले. म्हणाले, ‘मारी साथे बांगला आवी रह्यो छूं? हूं पिस्तालिस मिनिटमा जतो रह्यो छूं.’ आम्ही म्हटले – ‘मारी खुशी’.
नाहीतरी ममतादीदींकडे आम्हाला जायचेच होते. दीदींचा पाय प्लास्टरमध्ये होता. त्यांच्या पायाला दुखापत झाली म्हणजे आमच्या हृदयालाच दुखापत झाल्यासारखे होते. त्यांना भेटल्याशिवाय राहवतच नव्हते आम्हाला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
आमच्या मनामध्ये तामलुकला जायचे होते. हे शहर पूर्बो मिदनापूर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आम्हाला तिथे जायचे होते, कारण हा भाग आता भाजपचा गड झालेला आहे. मिदनापूरचा खरा बंगाली उच्चार ‘मेदिनीपुर’ असा आहे. तामलुकचे कम्युनिस्ट नेते दक्षिणअक्षय बर्मन आमचे खूप पूर्वीचे मित्र आहेत. दक्षिणचा उच्चार बंगालीमध्ये ‘दोक्षिन’ असा होतो आणि ‘अक्षय’चा उचार ‘आखय’ असा होतो. हे दोन उच्चार मराठीमध्ये एकत्र करताच येत नाहीत, म्हणून आम्ही त्यांना ‘दोक्षिनबाबू’ म्हणतो. मेदिनीपुर पहिल्यांदा अर्थातच कम्युनिस्टांचा गड होता, मग तो ममता बनर्जी यांचा गड झाला आणि आता तो भाजपचा गड झाला आहे. हाडाच्या कम्युनिस्ट नेत्याला भाजपच्या गडावर राहताना कसे वाटते आहे, हे आम्हाला पाहायचे होते.
आम्ही दोक्षिनबाबूंना फोन केला, तर ते अतिशय खुश झाले. ‘आपनी शॉगोतो निबाशबाबू’ असे म्हणून त्यांनी आमचे स्वागत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाचे जसे दोन भाग आहेत, तसेच आमच्या नावाचेही ‘श्री’ आणि ‘निवास’ असे दोन भाग आहेत. त्यांच्या नावाचा नीट उच्चार मराठीत जमत नाही, तसाच आमच्या नावाचाही नीट उच्चार बंगालीत जमत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना जसे नुसतेच ‘दोक्षिनबाबू’ म्हणतो, तसे ते आम्हाला नुसतेच ‘निबाशबाबू’ म्हणतात. बंगालमधील प्रसिद्ध इलिश मासा आमचा वीकपॉइंट आहे, हे दोक्षिनबाबूंना माहीत आहे. त्यामुळे ते म्हणाले – ‘एशो एशो आमि इलिश माछ रान्न कोरबा.’ (या, या, मी इलिश मासे तयार करून ठेवतो!) दोक्षिनबाबूंनी असे म्हटल्यावर आम्हाला अतिशय आनंद झाला. बंगाली राजकारणावर चर्चा आणि इलिश! आहाहा!
आम्ही अमितजींबरोबर चार सीटर विमानात बसलो, तेव्हा आम्हाला इलिशशिवाय दुसरे काही सुचत नव्हते. पण अमितजी पक्के शाकाहारी आहेत. नुसतेच शाकाहारी नाहीत, तर अत्यंत मिताहारीसुद्धा आहेत. विमानाने ऊंची पकडल्यावर आमची चर्चा सुरू झाली. आमच्यासमोर मंद केशरपाणी शिंपडलेले सॉल्टेड काजू आले. दोन तासाच्या प्रवासात आम्ही ते केशर-काजू खात खात गप्पा मारत होतो. मिताहार म्हणजे मिताहार! फार खाणे तब्येतीसाठी आणि राजकारणासाठीही चांगले नसते.
वातावरण थोडे मोकळे झाल्यावर आम्ही बंगालमधल्या राजकीय गुंडगिरीचा विषय काढला.
अमितजी म्हणाले की, ‘पहेला यूपी अने बिहार राजकीय हिंसाना केंद्रों हता.’ अमितजी खूप वेळ या विषयावर बोलत राहिले. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे की, आजच्या तारखेला बंगाल हेच भारतातील राजकीय हिंसेचे केंद्र बनले आहे. या हिंसेची सुरुवात बंगालमधील कम्युनिस्ट राजवटीच्या काळापासून झाली. कम्युनिस्टांच्या गुंडागर्दीला तोंड देता यावे म्हणून ममतादीदींनी अटलजींच्या काळात भाजपबरोबर युती केली. अटलजींनी पंतप्रधान म्हणून बंगालमधील गुंडगिरीला आवर घालण्यासाठी दीदींना मनापासून साथ दिली. पुढे जेव्हा ममतादीदी कम्युनिस्टांना हरवून बंगालमध्ये निवडून आल्या, तेव्हा हे सगळे कम्युनिस्ट गुंड पोरके झाले. ममतादीदींनी तेव्हा गुंडगिरी संपूर्ण मोडून काढायची संधी घालवली. उलट या गुंडांना स्वतःच्या पक्षामध्ये प्रवेश दिला. त्या त्यांच्या ‘मायबाप’ झाल्या.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
गुंडगिरी मोडून काढण्याची ऐतिहासिक संधी गेल्याचे दुःख अमितभाईंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ते म्हणाले – ‘बंगाल का हाल जैसा का वैसा रह गया. फक्त शक्ति बदलाई गई छे, गुंडो समान रहे छे. बंगाल भोगवी रह्यूं छे.’
‘बंगाल भोगवी रह्यूं छे’ म्हणजे बंगाल दुःख भोगत राहिला आहे. हे वाक्य बोलताना अमितजींच्या आवाजात तळमळ होती!
मी अमितजींना म्हटले की, ‘ममतादीदी तर म्हणत आहेत- प्रत्येक इलेक्शनच्या वेळी भाजपवालेच बिहारमधून गुंड घेऊन येतात. अमितजी यावर मनापासून हसले. म्हणाले- दीदी खुद बिहार से गुंडे लाती हैं और बीजेपी के नाम टिकट कटवाती हैं.’
पुढे मग खूप चर्चा झाली. निवडणुकांचा रिझल्ट काय लागेल हे विचारण्यात अर्थ नव्हता. अमितजी, भाजपला ७० टक्के जागा मिळणार, असे प्रत्येक इलेक्शनला सांगतात. त्यांचे अंदाज ११ निवडणुकांत चुकले आहेत, पण तरीही ते ७० टक्क्यांच्या खाली कधीही उतरत नाहीत. चाणक्य पातळीवरचे लोक असेच असतात! आम्ही नमोजी यांचे इतके जवळचे मित्र आहोत, पण तरीही अमितजी खरा अंदाज आम्हालाही सांगणार नाहीत, हे आम्हाला माहीत होते. असो. प्रोफेशनॅलिझम यालाच म्हणतात! आम्हीसुद्धा फुकटचा भोचकपणा कधी करत नाही. त्यामुळेच तर सर्व पक्षांमध्ये आमच्या इतक्या जवळच्या मैत्र्या आहेत.
अमितजींनी आम्हाला कोलकत्याला सोडले. ते त्यांच्या सभांना गेले, आम्ही आमच्या मार्गाला लागलो. कोलकता ते तामलुक फक्त अडीच तासांचा रस्ता आहे. आम्ही साध्या बसमधूनच गेलो. सामान्य माणसांशी गप्पा मारण्यातली मजा काही और होती. आम्ही बंगाली भाषेमध्ये अगदी इलिश माशासारखे पोहत नसलो, तरी आम्हाला त्या भाषेत पाठीला डबा बांधून पोहता येते!
तामलुकला पोहोचलो, तर तिथे बस स्टॅंडवर आमची वाट बघत एक सिनिअर आयपीएस उभा होता. त्याने आमच्यासाठी ममतादीदींचा निरोप आणला होता. ‘संध्याकाळी जेवायलाच या’ असा तो निरोप होता. अमितजींनी आमच्यावर पाळत ठेवायला गुप्तहेर नेमले आहेत, ही बातमी ममतादीदींना लागल्यामुळे त्या गुप्तहेरांवर नजर ठेवायला दीदींनी बंगाल पोलिसातले गुप्तहेर नेमले होते. त्यामुळेच आम्ही तामलुकला येत आहोत, हे दीदींना कळले होते आणि आम्हाला संध्याकाळच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले होते.
दीदींकडे जायला अजून वेळ होता म्हणून आम्ही तामलुकमध्ये फेरफटका मारायला गेलो. तृणमूल काँग्रेसची एक पदयात्रा सुरू होती. आम्हीही त्या पदयात्रेबरोबर चालायला लागलो. दीदी थोड्या वेळाने पदयात्रेत येणार होत्या. इतक्यात एका टोकाला गोंधळ सुरू झाला. काही लोकांनी दगडफेक सुरू केली होती, पण धिप्पाड प्रकृतीच्या तृणमूल काँग्रेसचे टी शर्ट घातलेल्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. ते दगडफेक करणारे सारे लोक पळून गेले.
संध्याकाळी आम्ही दीदी एका कार्यकर्त्याच्या घरात उतरल्या होत्या तिथे गेलो. जेवण साधेच होते. कलाई एर दाल, भात आणि आलू पोस्तो. बंगालीमध्ये भाताला ‘भात’च म्हणतात, हे ऐकून अनेक मराठी लोकांना मौज वाटेल! कलाई एर दाल म्हणजे उडदाची डाळ. आलू म्हणजे अर्थातच बटाटा आणि पोस्तो म्हणजे खसखस. मसाले आणि खसखस यांच्या पेस्टमध्ये शिजवलेला बटाटा म्हणजे आलू पोस्तो.
जेवण झाल्यावर दीदी बाहेरी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसल्या. त्यांनी आमची सगळ्यांशी ‘एई आमादेर निबाश बाबू, आमार खूब भालो बोंधू आछे’ अशी ओळख करून दिली. (हे आमचे निबाशबाबू, हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत!) बंगालीमध्ये ‘बोंधू’ म्हणजे शब्दशः ‘बंधू’ असे असले तरी त्याचा ‘मित्र’ असाही अर्थ होतो.
थोड्या वेळाने आम्ही दुपारी पदयात्रेत झालेल्या गोंधळाबद्दल त्यांच्याशी बोललो. दीदी म्हणाल्या, ‘अरे ये शोब बीजेपी का गुंडा है, ओर कोम्युनिस्ट गुंडा! हमारा पार्टी का टी शोर्ट पहनके ये लोग हमारी रॅली में घुसता हैं. दुसरा बिना टी शोर्ट पहने आक्रमोन कर देता हैं. पाथर फेकता है. एक कोम्युनिस्ट गुंडा ओर दूसरा बीजेपी गुंडा हमारी रॅली में झोगडा करता है. लेकिन लोक फोसने वाला नोही है. इनको बांग्ला में सिर्फ बिश्रोंखोला चाहिए. (विश्रृंखला म्हणजे गोंधळ, केऑस!) बिहार से लाया है बीजेपी ये शोब गुंडा! बांग्ला भूग छे!’
‘बांग्ला भूग छे’ म्हणजे बंगाल दुःख भोगत राहिला आहे. हे वाक्य बोलताना दीदींच्या आवाजात तळमळ होती!
थोडा वेळ गप्पा मारून आम्ही दोक्षिनबाबूंकडे राहायला गेलो. काय गंमत होती बघा, एकेकाळी कम्युनिस्टांच्या गुंडगिरीच्या विरोधात एकत्र आलेले बीजेपी आणि तृणमूल आता एकमेकांवर गुंडगिरीचे आरोप करत होते.
आम्ही दोक्षिनबाबूंकडे गेलो. रात्री खुशालीच्या गप्पा झाल्या. सकाळी उठून कार काढून आम्ही जवळच्या शंकरपूर बीचवर गेलो. अतिशय शांत बीच. दोक्षिनबाबूंना शांतता फार आवडते. कम्युनिस्टातल्या कुणाला तरी शांतता आवडते, हे बघून आम्हाला फार बरे वाटले.
दोक्षिनबाबूंनी आम्हाला गुंडगिरीचे राजकारण समजावून सांगितले. विरोधी पक्षाच्या मतदारांना मतदान करण्यासाठी येऊ न देणे, विरोधी मतदारसंघात आतंकी वातावरण फैलावणे, विरुद्ध पक्षाच्या गुंडांना आवर घालणे, गुंडगिरीचे असे अनेक राजकीय उपयोग त्यांनी आम्हाला समजावून सांगितले.
ही सगळी सुरुवात कम्युनिस्ट पक्षाने केली, असे तुमच्यावर आरोप आहेत, असे मी त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले की, आमच्या पक्षाने कधीही गुंडगिरीला थारा दिला नाही. आमचे केडर कमिटेड होते. कुठल्याही परिस्थितीत लोकशाहीची सुरोक्षा करायची हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. लोकशाहीच्या रक्षणासाठी ताकद वापरली गेली तर त्यात काही चूक नाही, असे ते म्हणाले. त्यावर, हिंसा नको म्हणून तर लोकशाही अस्तित्वात आली, असे आम्ही म्हणालो. त्यावर दोक्षिनबाबू हसले. म्हणाले, ‘वो शोब थिअरी है’.
पुढे ते म्हणाले की, ‘आमची सत्ता गेल्यावर आमचे काही केडर दीदींच्या पक्षात गेले. हे कमिटेड केडर ममतादीदींच्या पक्षात गेल्यानंतर दीदींनी या केडरला गुंडगिरी शिकवली!’
तुमचे केडर कमिटेड होते, तर ते विरुद्ध पक्षात कसे गेले, हा प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. काही गोष्टी समजून घेण्याच्या असतात...
शंकरपूरवरून परत येताना दोक्षिनबाबू म्हणाले, ‘आमि आपनाके किछु मोजा देखाबा’. (मी तुम्हाला एक मजा दाखवतो!)
आता दोक्षिनबाबू आम्हाला काय मजा दाखवणार, याची आम्हाला फार उत्सुकता लागून राहिली.
दोक्षिनबाबूंनी, एक मंगल कार्यालयासारखी इमारत होती, तिथे गाडी घेतली. आम्ही आत गेलो. तिथे तगड्या शरीरयष्टीचे अनेक लोक होते. गमचे खांद्यावर टाकून गप्पा वगैरे सुरू होत्या. एका बाजेवर त्या सर्वांचे नेते त्रिविक्रम सिंह पहुडले होते. त्यांचे दोन चेले त्यांच्या भव्य शरीरयष्टीला मालिश करून देत होते.
नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही त्यांना विचारले की, आपण कुठून आला आहात?
त्यावर त्रिविक्रम म्हणाले की, ‘हम यहीं के हैं. तामलुक के रहनेवाले हैं.’
आम्ही – यहां के हो तो घर कहां हैं आपके?
त्रिविक्रम – यही हैं पास में.
आम्ही - आप सब के घर इसी शहर में, हैं तो आप इतने सारे लोग यहां क्या रह रहे हों?
त्रिविक्रम - मर्जी हैं भाई हमारी!
आम्ही - बांग्ला भाषा जानेन?
त्रिविक्रम - (दोक्षिनबाबूंना) क्या कह रहें हैं ये?
दोक्षिनबाबू - ये कह रहा हैं की, ऑपको बांग्ला भाषा ओता हैं क्या?
त्रिविक्रम - तो हम अब कौनसी भासा बोल रहें हैं? ये बंगाली भासा ही तो हैं.
त्रिविक्रम यांच्या या उत्तरावर आजूबाजूचे लोक भरपूर हसले!
आम्ही - हमने कभी सुनी नहीं ये बांग्ला.
त्रिविक्रम - ये बांग्ला की एक बोली हैं. हिंदी की बोली हैं ना वैसी. ब्रज भासा हैं, खरी बोली हैं, हरयाणवी हैं. वैसेही हम जो बोल रहें हैं वो ‘पटना बांग्ला’ हैं.
तसे बघायचे झाले तर हे जग आता या वयात आम्हाला धक्का देऊ शकत नाही, पण हा प्रकार आमच्याही डोक्याच्या बाहेरचा होता.
आम्ही थोडा वेळ बसून अजून थोड्या गप्पा मारून बाहेर पडलो.
दोक्षिनबाबू हसत होते. ते म्हणाले – ‘बांग्ला की, ये बोली एकदम ‘बिहारी हिंदी’ जैसी लगती हैं ना?’
आम्ही काय बोलणार!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आम्ही दोक्षिनबाबूंचा निरोप घेऊन निघालो. चारच वाजत होते. आमची मुंबईची फ्लाईट कोलकत्यावरून रात्री साडेदहा वाजता होती. आम्ही बसने निघालो.
बसमध्ये शेजारी ऑनिर्बन गांगुली होते. तामलुकमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी ३० वर्षे काढली होती.
त्यांचे म्हणणे होते की, पूर्वीचे सुसंकृत बंगाली भद्रलोग कल्चर संपून गेले आहे. संस्कृतीचा पूर्ण ऱ्हास झाला आहे. राजकारणाचे ‘शोम्पूर्ण ऑपोराधीकोरण’ झाले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘कम्युनिस्ट त्यांच्या गुंड केडरना ‘बिद्रोहेर नॉयक’ (विद्रोहाचे नायक) म्हणतात. दीदी त्यांच्या गुंडांना ‘पोरिबोर्तन नॉयक’ (परिवर्तनाचे नायक) म्हणतात. आणि भाजप त्यांच्या गुंडांना ‘शांश्कृतिक नॉयक’ (संस्कृतीचे नायक)’.
काँग्रेस पक्षाकडे कुणी नॉयक नाही का, असे आम्ही विचारले.
ऑनिर्बनबाबू त्यावर म्हणाले – ‘काँग्रेसवाले कोम्युनिस्ट लोग के कंधेपर बैठे हैं’.
कोण खरे, कोण खोटे मला कळेना. बंगालमध्ये गुंडगिरी होती, पण ती गुंडगिरी कोण करते आहे, हेच कळेना. एक सत्य मात्र कळले - गुंडांना विद्रोह नायक, परिवर्तन नायक आणि सांस्कृतिक नायक अशी सुंदर सुंदर नावे देता येतात! लोकांना ही नावे पटतही असावीत. राजकीय गुंडगिरीचे नागवे सत्य लपवण्यासाठी सुंदर शब्दांची तलम वस्त्रे वापरता येतात, हे त्या साध्यासुध्या प्राध्यापकाने आम्हाला सांगितले होते. ही फक्त थिअरी आहे की, असे प्रत्यक्षातही केले जाते, हे वाचकांनी स्वानुभवातून ठरवायचे आहे. इतिहास, संस्कृती आणि समानता या सर्वांचा वापर गुंडगिरी लपवण्यासाठी होतो की नाही, हे सर्वांनी आजुबाजूला काय घडते आहे ते पाहून ठरवायचे आहे.
बाकी काही असले तरी आमची ट्रिप मात्र मस्त झाली!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment