शाळेत असताना कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कविता अभ्यासाला होती. पायाखालची स्थिर जमीन सोडून उधाणत्या दर्याचे आव्हान स्वीकारत त्याच्याशी झुंज घेणारा दर्यावर्दी आणि त्याचे सहकारी यांच्या प्रवृत्तीचे शब्दचित्र तिने उभे केले होते.
‘कोट्यवधि जगतात जिवाणू, जगती अन् मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढती’
असे म्हणताना एक बोट सागराकडे करत ‘किनारा तुला पामराला’ म्हणत त्याच्या छातीवर बेगुमानपणे चढाई करणार्या, त्याला चिरडत जाणार्या त्या खलाशांचे ते चित्र शाळकरी वयात मनोहारी वाटावे असेच होते.
याच जातकुळीचे एक गीत अलीकडेच ‘मो’आना’ या डिस्ने स्टुडिओज निर्मित चलच्चित्रपटात पाहायला मिळाले. ‘Away Away, we know the way’ म्हणत समुद्राला आव्हान देणारे हे दर्यावर्दी पॉलिनेशियन बेटसमूहांपैकी मोतुन्युई बेटांवरील रहिवासी, ‘आम्ही सतत नवनव्या बेटांचा शोध घेत पुढे जातो’ म्हणणारे, ‘निर्मितो नव क्षितिजे’ म्हणणार्या कोलंबसाच्याच जातकुळीचे.
Tatou o tagata folau vala'auina
Le atua o le sami tele e o mai
Ua la ava'e le lu'itau e lelei
Tapenapena
(We are voyagers summoned by the mighty gods,
Of this mighty ocean to come,
We take up the good challenge,
Get ready.)
Aue, aue
Nuku i mua
Te manulele e tataki e
Aue, aue
Te fenua te malie
Nae ko hakilia kaiga e
(Oh! oh!
There is land up ahead,
A bird in flight to take us there,
Oh! oh!
This beautiful land,
The place I was looking for, we will make our home.)
We read the wind and the sky
When the sun is high
We sail the length of sea
On the ocean breeze
At night we name every star
We know where we are
We know who we are, who we are
Away! Away!
We set a course to find
A brand new island everywhere we roam,
Away! Away!
We keep our island in our mind
And when it's time to find home,
We know the way.
Away! Away!
We are explorers reading every sign
We tell the stories of our elders
In a never-ending chain,
Oh! Oh!
This beautiful land,
The place I was looking for,
We know the way.
- Songwriter : Lin-manuel Miranda
- Singer : Opetaia Foa'i
पण सर्व प्रकारच्या अनिर्बंधतेला बंधन घालणारा निसर्ग सर्वशक्तिमान असतो, याचे प्रत्यंतर त्यांना लवकरच येते. ज्यांना डेमन्स अथवा समुद्री सैतानांचे थैमान चालू होते. (बहुधा तेथील वातावरण बदलते, वादळांची, धुवांधार पावसाची वारंवारता वाढली, ऋतुचक्रात बदल होतो, ज्याच्याशी जुळवून घेणे मोतुन्युई जमातीला अवघड होत जाते.) एका मागोमाग एकेक जहाजे समुद्रावरून नाहीशी होतात, परतेनाशी होतात. गमावल्या सुहृदांच्या मृत्यूने धास्तावलेली, हतबल झालेली ती दर्यावर्दी जमात ‘टु युअर टेन्ट्स’ म्हणत माघार घेते, भूमीबद्ध होण्याचा निर्णय घेते. त्यांची जहाजे कायमची नांगरून पडतात. इतकेच नव्हे तर ती नजरेस पडली तर पुढील पिढ्यांमध्ये समुद्राबद्दलचे आकर्षण उफाळून येण्याची शक्यताही खुडून काढण्यासाठी एका विशाल गुहेमध्ये ती दडवून ठेवली जातात. आणि पुढील पिढ्यांमध्ये समुद्राची दहशत रुजवली जाते. (यासंदर्भात एकेकाळी वणिक संस्कृती असलेल्या भारतात समुद्रपर्यटनबंदीसारखे आत्मघाती नीतिनियम केल्याबद्दल धार्मिक मुखंडांवर सावरकरांनी केलेली कठोर टीका आठवते!) टोळीप्रमुखाच्या वृद्ध आईमधील मूळ जमातीचे रक्त तेवढे जिवंत असते. पण समाजातील इतरांच्या मतापेक्षा वेगळी मते असणार्याचे जे व्हायचे, तेच तिचेही होते. समाजापासून फटकून राहणार्या, आत्ममग्न अशा तिला ‘वेडी’ आजी म्हटले जाऊ लागते...
‘कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही,’ असं विधान व. पु. काळेंच्या एका कथेत वाचल्याचं आठवतं. याचा व्यत्यासही तितकाच खरा असावा, निदान मोतुनुईवरील जमातीबाबत तरी होता. रक्तात गगनभरारीचं वेड असेल तर ते पूर्णत: विझवता येत नाही किंवा पिंजर्यात बांधून घालता येत नाही. अनेक पिढ्या रक्तात रुजलेली समुद्र वेंधण्याची आस पुढच्या पिढीमध्ये पुन्हा अंकुरते. वेड्या आजीकडून हा वारसा टोळीप्रमुखाच्या छोट्या मुलीकडे - मो’आनाकडे - संक्रमित होतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
नुकतेच पाय फुटलेली टोळीप्रमुखाची छोटी मुलगी मो’आना जेव्हा प्रथमच किनार्याकडे येते, तेव्हा त्या उधाणत्या समुद्राच्या दर्शनाने तिच्या विस्फारल्या डोळ्यात दिसणारी चमक रक्तातील गगनभरारीचे वेड दाखवून जाते. पण तिची नाळ केवळ समुद्राच्या असीम विस्ताराशीच नव्हे, तर त्यातील जीव-जिवारांशीही जोडली गेली आहे. समुद्राने तिच्याकडे भेट म्हणून पाठवलेला गुलाबी शंख घेण्यासाठी, ती जेव्हा पाण्याकडे जाते, त्याच वेळी घरट्यातून बाहेर पडलेले कासवाचे पिलू शिकारी पक्ष्यांपासून बचाव करत समुद्राकडे धाव घेत असते. हा प्रसंग इतक्या लहान वयातला, पण भविष्यात तिच्यासमोर उभ्या ठाकणार्या आव्हानाचे सूचन करून जातो. इतक्या लहान वयातच तिला कासवाचे पिलू वाचवायचे की, तो देखणा शंख उचलायचा याचा निर्णय करावा लागतो. आणि त्या क्षणी ती जो निर्णय घेते, तो तिच्या पुढील आयुष्याची दिशा निश्चित करणारा असतो.
ज्या नेमक्या क्षणी तिला हा निर्णय घ्यायचा आहे, त्या क्षणी तिच्या मनातील संभ्रम चलच्चित्रकारांनी अतिशय सुरेख चितारला आहे. डावा हात लांबवून शंख उचलू पाहणार्या मो’आनाची नजर झाडीआडून बाहेर पडणार्या पिलाकडे असते. आणि निवडीचा संभ्रम ज्या क्षणी तिच्या मनात येतो, त्या क्षणी तिचा उजवा हात अस्वस्थपणे कसा हलतो, ते आवर्जून पाहावं. जेव्हा ते पिलू सुखरूपपणे समुद्रात पोहोचते, त्या परिपूर्तीच्या क्षणी तिच्या तोंडून आलेला समाधानाचा सुस्कारा ऐका आणि त्या क्षणी होणारी तिची हाता-पायांची हालचालही नीट पाहा. हाडामांसाची माणसे जिथे शब्दांविना अभिनय फारसा दाखवू न शकणार्यांना, एका पात्राची वट्टं आठ ते बारा स्थिरचित्रे सोबतीला घेऊन बाल हीरोंची बालिश चलच्चित्रे तयार करणार्यांना एवढा छोटा प्रसंगही बरेच काही शिकवू शकेल.
तिचा निर्णय पक्का होतो आणि वाळूवर समुद्राच्या दिशेने उमटत गेलेल्या तिच्या पाऊलखुणांमधून तो तुम्हा-आम्हालाही समजून जातो.
मागील पिढांनी साफ बुजवून टाकलेला समुद्रओढीचा झरा तिला आता मोकळा करायचा आहे. त्यासाठी त्या संपूर्ण माघारीस कारणीभूत असलेली परिस्थिती बदलायची आहे. मागच्या पिढ्यांनी गाडून टाकलेला दर्यावर्दी स्वभाव पुन्हा सोबत घेऊन तिला हे घडवायचे आहे. पण हतवीर्य होऊन बसलेली मागची पिढी तिला साह्यभूत होणे तर सोडाच, पण त्या विचारापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करते आहे. अपवाद फक्त एकच... वेड्या आजीचा. आपल्या दर्यावर्दी भूतकाळाची ओळख तिनेच या छोट्या मुलीला करून दिली आहे. आपल्या रक्तातील ओढीशी प्रामाणिक राहण्याचा सल्लाही. त्यामुळे स्वीकृत कार्य हे मो’आनाला केवळ स्वत:चा- आणि कदाचित समुद्राचा, भरवसा धरूनच पूर्ततेपर्यंत न्यायचे आहे.
इथे पुन्हा कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकरांच्याच प्रसिद्ध ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकरांचं हे प्रसिद्ध स्वगत आठवते -
या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून
उठून उभा राहिला एक माणूस
तुमचा आमचा बाप,
त्यानं चिरून काढलं स्वत:चं शरीर
आणि आकाशातील नक्षत्रावर
त्या रक्ताचं शिंपण करीत ,
साऱ्या पृथ्वीच्या नि:शब्दावर मात करीत
तो ओरडला :
कुणी आहे का?
दशदिशांतून उत्तर आलं :
मी आहे...
आणि माझ्यातही तूच आहेस!
या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं
एक नवीन विश्व
ज्यात मर्कटांची झाली माणसं ,
अक्षरांचे झाले मंत्र,
स्वराचं झालं संगीत
आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं
एक विराट सुंदर देवालय
ज्यात माणसाला सापडला ईश्वर
आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर!
ईश्वराच्या जागी ति’फिटी ही देवता कल्पिली तर गणपतरावांचे हे बोल मो’आनाला लागू पडतात. तिनेही स्वत:चा भरवसा धरून सागर लंघून, उसळत्या लाव्हाचा सामना केला. ति’फितीला भिडली आणि आपल्या स्निग्ध स्पर्शाने तिच्यातील रक्तवर्णी धग शांत करून हिरव्या स्वप्नाला वाट मोकळी करून दिली. सार्या जगावर पसरलेल्या काजळीला जणू एका फुंकरीने उडवून देत खालचा जीवनस्रोत मोकळा करून दिला. पण यासाठी दशदिशांतून साद येण्याची गरज नव्हती. एकट्या समुद्राची हाक तिला पुरेशी ठरली. छातीमध्ये कोंडलेल्या तुफानाला दार उघडून मोकळे करण्यास साह्यकर्ती झाली.
But the voice inside sings a different song
What is wrong with me?
म्हणत ती आपल्या आतल्या आवाजाची साद ऐकू लागली. त्यातून स्वत:च्या निर्णयाबद्दलचा, संभाव्य कृतीबाबतचा संभ्रम ‘हाऊ फार आय विल गो’ या गाण्यातून उलगडत गेला.
I've been staring at the edge of the water
'Long as I can remember
Never really knowing why
I wish I could be the perfect daughter
But I come back to the water
No matter how hard I try
Every turn I take
Every trail I track
Every path I make
Every road leads back
To the place I know where I cannot go
Where I long to be
See the line where the sky meets the sea?
It calls me
And no one knows
How far it goes
If the wind in my sail on the sea stays behind me
One day I'll know
If I go, there's just no telling how far I'll go
I know everybody on this island
Seems so happy on this island
Everything is by design
I know everybody on this island
Has a role on this island
So maybe I can roll with mine
I can lead with pride
I can make us strong
I'll be satisfied if I play along
But the voice inside sings a different song
What is wrong with me?
See the light as it shines on the sea?
It's blinding
But no one knows
How deep it goes
And it seems like it's calling out to me
So come find me
And let me know
What's beyond that line?
Will I cross that line?
And the line where the sky meets the sea
It calls me
And no one knows
How far it goes
If the wind in my sail on the sea stays behind me
One day I'll know
How far I'll go
- Songwriter: Lin-manuel Miranda.
- Singer : Chloe Auliʻi Cravalho
डिस्ने नायिका केवळ स्नो-व्हाईट, सिंडरेला, अथवा स्लीपिंग ब्यूटी सारख्या नाजूक-साजूक बाहुल्या वा पुरुषांकरवी होणार्या उद्धाराची वाट पाहणार्या, परंपरेने स्त्रीला दिलेले परावलंबी स्थानच अधोरेखित करणार्या असतात असे नाही. प्रसंगी शस्त्र परजून रणमैदानात उडी घेणार्या मूलानसारख्या असतात, समुद्राचे उधाण बेगुमानपणे अंगावर घेत त्याच्यावर चढाई करणार्या मो’आना सारख्याही असतात. कधी एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसलेल्या दोन जमातींमध्ये समेट घडवणार्या पोकाहोन्ताससारख्या शांतिदूतही असतात. एक उल्लेखनीय बाब म्हणजे या सार्या स्वतंत्र बाण्याच्या डिस्ने प्रिन्सेस या बिगर-युरपिय वंशाच्या आहेत. मूलान चिनी आहे, मो’आना समोअन वंशाची आहे, तर पोकाहोन्तास ही नेटिव अमेरिकन आहे. अगदी युवराज्ञी असून रस्त्यावरच्या फाटक्या पोराला जोडीदार म्हणून निवडण्याइतके स्वातंत्र्य घेणारी जॅस्मिन अरेबियन वंशाची आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मो’आनाची कथा मूळची कुठल्या प्रदेशातील, तिची भाषा कुठली, मावी खरोखरच डेमिगॉड म्हणजे देवमानव होता का?, या (दंत)कथेचा काळ कोणता, वगैरे गोष्टींचा पाठपुरावा अनेक चाहत्यांनी केलेला दिसतो. माणसाच्या मनातील ही जिज्ञासा, हे कुतूहल मला आश्वासक वाटते. एरवी इतिहासाची उकराउकर नवनवे वादंग निर्माण करुन त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठीच करणार्यांची किंवा चित्रपटाच्या कथानक वा सादरीकरणाऐवजी त्यातील मुख्य अभिनेत्या... नव्हे नट-नट्यांच्या ‘लुक्स’ किंवा खासगी आयुष्यातील भानगडी अधिक चवीने चघळणार्यांची भाऊगर्दी असलेल्या समाजात अशी अपेक्षा अस्थानीच आहे.
‘हे-हे’ नावाचा एक निर्बुद्ध कोंबडा मो’आनाचा सोबती आहे. त्याला चालू लागण्याची प्रेरणा झाली की, चालू लागतो. चालू लागण्यापूर्वी समोर जमीन आहे की, पाणी, पुढे जाण्यास मोकळी जागा आहे की अडथळा आहे याचा कणभरही विचार न करता चालू लागतो. भिंतीवर धडकला की वळून उलट दिशेने चालू लागतो, तिथे धडक बसली की, पुन्हा मूळ दिशेने. दोनही बाजूला धडका खाऊनही आता ‘तिसरी दिशा शोधायला हवी’, याचा विचारच त्याच्याकडे नाही. समोर दगड आहे की खाणे, ते आपल्या तोंडासमोर आहे की बाजूला, याची फिकीर न करता भुकेची प्रेरणा झाली की, खाली झुकून दाणॆ टिपत राहायचे... समोर खाणे असो वा नसो.
थोडक्यात हा कोंबडा एकप्रकारे परंपराप्रिय, बदलाचा विचारही मनाला शिवू न देणार्या माणसाचेच प्रतीक आहे. मो’आनासारख्या प्रत्येक प्रागतिक व्यक्तिला अशा विचारांध समाजाला सोबत घेऊन जावे लागते, त्याच्या विफल कृतीच्या जागी फलदायी कृती रुजवावी लागते. आणि हा नेहमीच ‘थॅंकलेस जॉब’ किंवा श्रेयहीन कर्तृत्व असते, हे त्या प्रागतिक व्यक्तीने कायमच गृहित धरुन चालायचे असते. कारण त्या कृतीचे मूल्यमापन करण्याची कुवत आणि कृतज्ञ राहण्याची दानत अशा कोंबड्यांमध्ये असत नाही.
तुम्ही-आम्ही मो’आनाचे नव्हे तर या ‘हे-हे’चेच सहोदर म्हणून अधिक शोभतो का, याचा विचार एकदा जरूर करायला हवा.
----
मेटाडेटा ऊर्फ फोलपटमसाला प्रेमींसाठी -
‘अवे अवे’च्याही आधी मला ‘हाऊ फार आय विल गो’ पाहायला मिळाले होते. यातील गायिकेच्या आवाजाचा पोत पाहता, ही युरपिय वा अन्य परिचित पार्श्वभूमीची नसावी असा तर्क मी केला. विकीपीडियाच्या कृपेने तिच्याबाबत माहितीही मिळाली. क्लोई ही नेटिव हवाई वंशाची, तर ‘अवे अवे’चा गायक ओपेताया फो’ई हा समोअन. दोघेही बिगर-युरपिय वंशाचे, पॉलिनेशिअन!
गंमत म्हणजे या क्लोईचा जो फोटो विकीवर आहे, त्यात तिने छानपैकी एक चाफ्याचे फूल माळलेले आहे. बिगर युरपिय किंवा तथाकथित मागास समाजात हे निसर्ग-नाते अधिक बळकट असलेले दिसते. प्रगतीच्या वाटा तंत्रज्ञानाची कास धरतात, तेव्हाच निसर्गाचा हात सोडून देताना दिसतात.
अधिक माहितीसाठी -
https://www.tahiti-infos.com/The-true-origins-of-Disney-princess-Moana_a142314.html
..................................................................................................................................................................
लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.
ramataram@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment