कॅथलिक चर्चनं दोन ऐतिहासिक ‘ex cathedra’ चुका दुरुस्त केल्या, पण एकीच्या बाबतीत त्यांची ही पश्चातबुद्धी कामाला आली नाही!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 21 April 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध एक्स कथिड्रा ex cathedra मॅगडलीन Magdalene

शब्दांचे वेध : पुष्प तेहतिसावे

‘एक्स कथिड्रा’ (ex cathedra) हा शब्दप्रयोग आपण कधीतरी नक्कीच ऐकलेला असतो, पण त्याचा खरा अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. लॅटिन भाषेत ‘ex’  म्हणजे ‘from’ (पासून), Cathedra म्हणजे chair, खुर्ची. सत्तेच्या खुर्चीवर किंवा आसनावर बसून दिलेला आदेश, मांडलेलं मत म्हणजे ‘एक्स कथिड्रा’. रोमन कॅथलिक ख्रिस्ती पंथात त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप जेव्हा त्यांच्या अधिकृत आसनावर बसून एखादी धर्मविषयक घोषणा करतात किंवा नीतीविषयक मत मांडतात, अभिप्राय देतात, तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्द हा त्या बाबतीतला अंतिम शब्द मानला जातो. कारण पोप कधीच चूक करू शकत नाहीत, त्यांच्याकडून निर्णय-प्रमाद कधीच होऊ शकत नाही, असा त्यांच्या अनुयायांचा विश्वास असतो. यालाच ‘doctrine of Papal infallibility’ असे म्हणतात.

‘ब्रिटॅनिका’ या ज्ञानकोशातील माहितीनुसार Papal infallibility, in Roman Catholic theology, is the doctrine that the pope, acting as supreme teacher and under certain conditions, cannot err when he teaches in matters of faith or morals.

पोपची ही खुर्ची (खरं म्हणजे सिंहासन) ज्या पवित्र धर्मगृहात ठेवलेली असते, त्याला ‘कथिड्रल चर्च’ (cathedral church) असं पूर्ण नाव आहे. त्याचंच लघुरूप आहे ‘कथिड्रल’. छोट्या-मोठ्या चर्च खूप असतात. पण नुसते पोपच नाही तर बिशपसारखे धर्मप्रांतप्रमुख असलेले वरिष्ठ अधिकारीही ज्या चर्चमधून काम करतात, तिला ‘कथिड्रल’ असं नाव आहे. हे वरिष्ठ अधिकारी ज्या अधिकृत आसनावर बसतात, ते ‘कथिड्रा’. त्यांनी त्या आसनावरून केलेली घोषणा म्हणजे ‘एक्स कथिड्रा’. हा झाला या शब्दप्रयोगाचा मूळ अर्थ.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मात्र या मूळ अर्थाला कालांतरानं अलंकारिक स्वरूप प्राप्त झालं. आज ‘ex cathedra’चा अर्थ होतो ‘Spoken with authority; with the authority of the office’. फक्त चर्चच नाही तर अन्य कोणत्याही (गैर -धार्मिक) कार्यालयात पीठासीन अधिकाऱ्यानं आपल्या अधिकृत खुर्चीवर बसून मांडलेलं मत, केलेला न्यायनिवाडा. परंतु गंमत अशी आहे की, यापैकी कोणाच्याच बाबतीत पोपबद्दलचं ‘doctrine of infallibility’ लागू पडत नाही. अनेकदा ही माणसं सामान्य वकुबाची असतात. ज्या पदावर ती विराजमान असतात, तिथे बसण्याची पात्रता, क्षमता त्या प्रत्येकातच असते असं नाही. पण तरीही त्यांना सत्तेचा, अधिकाराचा मोह आवरत नाही आणि ते त्या पदाला चिकटून राहतात. अशा गुणवत्ताहीन माणसांकडून अनेकदा निर्णय-प्रमाद होत असतात. पण अन्य काहीही पर्याय नसल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागतात. या अशा लायकी नसलेल्या दुय्यम प्रतीच्या अधिकारी माणसांनी दिलेले निर्णय ‘ex cathedra’ असतात. केवळ ते त्या जागेवर आहेत म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत असते. ही अशी माणसं साऱ्या जगभर आहेत. आणि त्यांची परंपरा फार प्राचीन आहे. राजे, महाराजे, सम्राट, हुकुमशहा, यांच्यापासून ते राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, धर्मगुरू, न्यायाधीश, मंत्री, सैन्यदल आणि पोलिसदलातले अधिकारी, सनदी नोकरशहा, हे सगळे यात येतात. त्यांचं पाहून त्यांच्यापेक्षा खालच्या हुद्द्यावर असलेले अधिकारीदेखील तसंच वागतात. याला तुम्ही ‘tyranny of the inferior mind’ असं म्हणू शकता. एखाद्या निर्बुद्ध, अपात्र व्यक्तीनं फक्त सत्तेच्या जोरावर केलेली अरेरावी, मुजोरी, जुलूम जबरदस्ती, मनमानी, म्हणजेसुद्धा ‘ex cathedra’ वर्तणूक. लायक असलेली, पात्र असलेली व्यक्तीदेखील अनेकदा सत्ताधुंद होते.

सदसदविवेकबुद्धी, तारतम्य, इमानदारी, सचोटी, यासारख्या बाबी तिला नजरेआड कराव्याश्या वाटतात. काही फैसले पैशाच्या लोभानं, तर काही वैयक्तिक हेवेदावे, पूर्वग्रह न विसरता, आणि तटस्थ न राहता केले जातात. यात समोरच्यावर अन्यायदेखील होऊ शकतो, पण त्याला इलाज नसतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. सॉक्रेटिसवर विषप्रयोग करण्याचा हुकूम, ख्रिस्ताला सुळावर लटकवण्याचा हुकूम, ज्ञानेश्वरांच्या मातापित्याना वाळीत टाकण्याचा हुकूम, यासारखी ‘ex cathedra’ वर्तणुकीची अनेक ऐतिहासिक उदाहरणं देता येतील. ब्रिटिशांनी बंगालची केलेली फाळणी किंवा भारताला स्वातंत्र्य द्यायच्या दिवशी त्यांनी मनमानी पद्धतीनं केलेलं देशाचं विभाजन, हेदेखील ‘ex cathedra’ आदेश होते. कोणत्याही देशाच्या उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचा अगदी प्रत्येकच आदेश बिनचूक असतो, असं नाही.

पण त्यात दोष असले तरी ती ‘ex cathedra pronouncement’ (घोषणा) असल्यानं ती मान्य करावीच लागते. पुढे जर न्यायालयालाच आपली चूक लक्षात आली, तर त्यात बदल होऊ शकतो, अन्यथा हा नकळत झालेला अन्याय कायम राहतो. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, हेदेखील अशाच चुका करतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आपलं मत म्हणजे जणू काही अंतिम मत असं समजून ही मंडळी अनेकदा अधिकारवाणीनं ‘ex cathedra’ मतप्रदर्शन करतात. आणि त्याला चिकटून राहतात. त्यातली बरीच मतं पुढे खोटी ठरतात, पण याची त्यांना पर्वा नसते.

डॉ. वसंतराव देशपांडे यांची काहीशी अपारंपरिक आणि बंडखोर गायकी न आवडणारे काही (दुर्दैवी) लोक होते. त्यातले काही जण आकाशवाणीच्या संगीत विभागाचे सर्वेसर्वा होते. वसंतरावांना गाणं येत नाही, या एकमेव पूर्वग्रहानं पछाडलं जाऊन या झारीतल्या शुक्राचार्यांनी कित्येक वर्षं त्यांना आकाशवाणीवर गाण्याची संधी नाकारली होती. या आपल्या ‘ex cathedra’ मतप्रदर्शनानं एका महान कलाकारावर अन्याय होतो आहे, हे या अधिकाऱ्यांच्या गावीही नव्हतं. कदाचित तीच त्यांची इच्छा असावी. त्या वेळचे आकाशवाणीतले हे सारे तथाकथित शुक्राचार्य, बृहस्पती, तानसेन, मानसेन असे अधिकारी आज कालवश झाले आहेत आणि त्यांची नावंही कोणाला माहीत नसतील. वसंतराव मात्र या साऱ्या क्षुद्र मशकांच्या कारस्थानांना बळी न पडता स्वबलावर, स्वपराक्रमामुळे, आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या जोरावर कालजयी झाले आहेत.

कुठे संगीतसम्राट वसंतराव आणि कुठे त्यांना संधी नाकारणारे ते दीडदमडीचे अधिकारी. पण फक्त हातात सत्ता असल्यानं ते हे असे ‘ex cathedra’ निर्णय घेऊ शकले. (याच आकाशवाणीनं पुढे वसंतरावांना गाण्यासाठी सन्मानानं आमंत्रित केलं, पण ती वेगळी कहाणी आहे.)

आकाशवाणी हे सरकारी प्रसारमाध्यम असल्यानं अशा प्रकारचे तुघलकी निर्णय तिथे बऱ्याच वेळा घेतले गेले आहेत. हार्मोनियम (बाज्याची पेटी) या वाद्यावर तिथे अगदी आत्ता-आत्तापर्यंत बंदी होती. (नेहरूंना पेटीचा आवाज आवडत नव्हता, म्हणून ही बंदी घालण्यात आली, अशी अफवादेखील त्या काळात पसरली होती.) नेहरूंचं माहीत नाही, पण कट्टर गांधीवादी आणि तत्कालीन नभोवाणीमंत्री श्री केसकर यांना हिंदी सिनेमा संगीतावर प्रचंड राग होता, म्हणून त्यांनी आकाशवाणीवर फिल्मी गीतं वाजवण्याला मनाई केली होती. परिणामी केवळ हीच गाणी वाजवणाऱ्या रेडिओ सिलोनवर भारतीय श्रोते ‘जी जान से प्यार’ करू लागले. शेवटी केसकरांच्या तालमीत तयार झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांना शरणागती पत्करावी लागली आणि म्हणून १९५६ मध्ये ‘विविध भारती’चे प्रसारण सुरू झाले. इंदिरा गांधी सरकारची खफ़ा मर्ज़ी झाल्यामुळे १९७५ साली आकाशवाणी व दूरदर्शनवर किशोरकुमारच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती!

हे आणि असे सगळे निर्णय ‘ex cathedra’ प्रकारचे असतात. एखाद्या नाटक सिनेमा किंवा पुस्तकावर घातली जाणारी बंदी असो किंवा आणीबाणीसारखे अचानक घोषित केले जाणारे निर्णय असोत, या साऱ्यांमधून एक प्रकारच्या अधिकारशाहीचा वास येतो. असे बहुतेक निर्णय राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार घेतले जातात. तुघलकने जे केले; झार, हिटलर, माओ यांनी जे केले त्याचीच ‘री’ आज जगभरात ओढली जात आहे. या अशा मनमानी, हुकूमशाही ‘ex cathedra’ निर्णयांना इंग्रजीत ‘डिक्टॅट’ (diktat), ‘फियाट’ (fiat), आणि ‘युकेझ’ (ukase) असे समानार्थी शब्द आहेत.

असे बहुतेक निर्णय लादलेले असतात. त्यांच्यामागे काही कारणमिमांसा असलीच तरी ती भ्रामक, पोकळ, आणि तकलादू असते. कोणत्याही प्रकारची सत्ता उपभोगणाऱ्या व्यक्तीला आपण कधी चूक करू शकू, असं वाटतच नाही. जणू काही त्याच्या पदानं त्याला तो कधीच चूक करणार नाही, असं वरदान दिलं असतं. हा जो त्यांचा फाजील आत्मविश्वास असतो, त्यामुळे ‘ex cathedra’ हा शब्दप्रयोग आजकाल उपरोधानं किंवा टवाळी करण्याच्या उद्देशानं वापरला जातो.

पिएट हाईन (१९०५ - १९९६) या डॅनिश कवीनं यावर एक छान चारोळी लिहिली आहे – ‘Experts have their expert fun ex cathedra telling one just how nothing can be done.’ (‘Experts’, 1966)

‘Ex cathedra’ घोषणा, निर्णय जर चूक असतील तर त्यामुळे एखाद्यावर किंवा अनेकांवर अन्याय होऊ शकतो, हे आपण पाहिलं. अशी चूक दुरुस्त करता येत नाही का? येते, पण त्यासाठी आपलं चुकलं होतं, हे त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे. किंवा तसं कोणी त्याला पटवून दिलं तर ते मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा त्याच्याकडे असायला हवा.

कधी कधी ही चूक इतकी उशीरा लक्षात येते की, आपण चुकलो होतो, हे लक्षात येऊनही काही फायदा होत नाही. The damage is already done.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कॅथलिक चर्चनं अशा दोन ऐतिहासिक ‘ex cathedra’ चुका केल्या होत्या. पुढे त्या दोन्ही चुका त्यांनी दुरुस्त केल्या. पण त्यापैकी फक्त एकाच चुकीच्या बाबतीत त्यांची ही पश्चातबुद्धी कामाला आली; दुसरीच्या बाबतीत त्यांच्या दुरुस्तीचा काही उपयोग झाला नाही.

आधी याच दुसऱ्या चुकीबद्दल बोलू या. तुम्ही ‘magdalene’ किंवा ‘magdalen’ हा इंग्रजी शब्द ऐकला असेलच. त्याचा उच्चार ‘मॅगडलीन’ किंवा ‘मॅगडलन’ असा होतो आणि अर्थ आहे पश्चातापदग्ध स्त्री किंवा देहविक्रय करणं थांबवून सन्मार्गाला लागलेली वेश्या. इंग्रजी भाषेत सुमारे १५६३ सालाच्या आसपास या शब्दाचा प्रवेश झाला. ‘मेरी मॅगडलीन’ या नावाची महिला येशू ख्रिस्ताची अनुयायी होती, असा उल्लेख ‘बायबल’मध्ये आहे. तिच्या नावावरून हा ‘magdalene’ शब्द तयार झाला. आता गंमत अशी आहे की, ही मेरी मॅगडलीन एक सद्गुणी, चांगली बाई होती. मग ‘Magdalene’ या शब्दाच्या अर्थात ती पश्चातापदग्ध होऊन ख्रिस्ताला शरण गेलेली वेश्या होती, असा जो भाव आहे, तो कुठून आला? मुळात मेरी मॅगडलीन वेश्याव्यवसाय करायची (आणि म्हणून ती एक पापी स्त्री होती) हा फार मोठा गैरसमज आहे आणि तो आजही बव्हंशी कायम आहे. खरी मेरी तशी नव्हतीच. मग तिच्यावर हे किटाळ आलं कसं?

याला कारण आहे इसवी सन ५८१मध्ये कॅथलिक चर्चचे तत्कालीन सर्वोच्च धर्मगुरू पोप ग्रेगरी पहिले यांनी केलेली चूक. ही ‘ex cathedra’ चूक होती. ही चूक त्यानंतर १३८८ वर्षांनी म्हणजे सन १९६९ मध्ये दुरुस्तही करण्यात आली. पण त्यामुळे मेरी मॅगडलीनच्या चारित्र्यावर लागलेला डाग काही धुवून निघाला नाही. तोपर्यंत म्हणजे आधीच्या १३८८ वर्षांत जगभर प्रकाशित झालेल्या लिखाणात, चित्रांत, सिनेमे आणि इतर माध्यमांत मेरी मॅगडलीन म्हणजे पूर्वाश्रमीची एक पापी स्त्री आणि ख्रिस्ताला अनुसरल्यामुळे पुढे सुधारलेली महिला असंच तिचं चित्रण केलं गेलेलं आहे. जनमानसावर तिची हीच प्रतिमा पिढ्यान् पिढ्या कोरली गेली आहे. पोप ग्रेगरी पहिले यांनी केलेल्या या चुकीचे पडसाद आजही ऐकू येतात. कितीही प्रयत्न केले तरी हा गैरसमज दूर होणं जवळपास अशक्य आहे.

‘बायबल’मध्ये खरं तर मेरी मॅगडलीनचं खूप चांगलं वर्णन केलं गेलं आहे. ती येशूची शिष्या होती आणि इतर काही शिष्यांप्रमाणेच तीही त्याच्यासोबत प्रवास करत असे. येशूला सुळावर चढवलं गेलं, तेव्हा ती तिथे हजर होती. त्यानंतर तिथे ज्या घटना घडल्या, त्यांची ती साक्षीदार होती. ती एक धार्मिक वृत्तीची, सभ्य, सुशील, कुलीन स्त्री होती. ती वाईट चालीची होती, असं ‘बायबल’मध्ये कुठेही म्हटलेलं नाही. असं असतानाही तिच्यावर ती वेश्या होती, असा आरोप का झाला? याला जबाबदार होते पोप ग्रेगरी पहिले. सन ५८१ मध्ये ईस्टर सणाच्या निमित्तानं दिलेल्या प्रवचनांमध्ये त्यांनी मेरी मॅगडलीन ही पूर्वाश्रमीची वेश्या होती, असं ‘ex cathedra’ विधान केलं. साक्षात पोपनंच असं सांगितल्यामुळे सर्वसामान्य लोकांचा यावर पटकन विश्वास बसला आणि त्यानंतर तिच्या नावाला जो कलंक लागला, तो लागलाच. आधी सांगितल्याप्रमाणे पुढची तेरा-चौदाशे वर्षं जनमानसात तिची प्रतिमा अशी डागाळलेलीच राहिली.

पण काही कॅथलिक विद्वानांना मात्र हे खटकत होतं. यात काही तरी गडबड आहे, असं त्यांना वाटत होतं. बरंच संशोधन केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की, हा नामसाधर्म्यामुळे झालेला समजुतीचा घोटाळा आहे. आपल्या प्रवचनात पोप ग्रेगरी पहिले यांनी नजरचुकीनं म्हणा वा गैरसमजुतीमुळे म्हणा, या मेरीचा अन्य दोन महिलांसोबत संबंध जोडून सरमिसळ केली होती. याला इंग्रजीत ‘conflate’ करणं असं म्हणतात.

बायबलमध्ये ‘लुक’ (Luke)नं सांगितलेल्या शुभवर्तमानात या तिघींचाही उल्लेख आहे. मेरी मॅगडलीनची ओळख ‘Luke 8:2’मध्ये सापडते. ‘Luke 10:39’मध्ये बेथनीच्या मेरीबद्दल लिहिलं आहे. ‘Luke 7:36–50’नुसार एका ‘पापी महिले’नं' येशूच्या पायांना तेल लावलं, पण तिचं नाव दिलेलं नाही. या बाकी दोन महिलांचं वर्णन पोप ग्रेगरी पहिले यांनी मेरी मॅगडलीनच्या वर्णनात जोडून तिलाच त्या दिवशी पापी स्त्री ठरवलं. तेव्हापासून तिच्यावर हा जो शिक्का बसला, तो बसलाच!

मात्र ही चूक लक्षात आल्यावर (भलेही १३८८ वर्षांनी,) कॅथलिक चर्चनं मेरी मॅगडलीनवर लागलेलं लांच्छन दूर करण्यात जराही कसर सोडली नाही. १९६९ मध्ये पोप पॉल सहावे यांनी ‘General Roman Calendar’ या कॅथलिक चर्चच्या अधिकृत दैनंदिनीत योग्य ती दुरुस्ती करून तिच्यावर झालेला हा अन्याय दूर केला. आता तिला कोणीही वाईट चालीची मानू शकत नाही. कॅथलिक, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, अँग्लिकन, आणि लुथरन या पंथांच्या चर्च तिला आता एक संत (सेंट) मानतात. २०१६ मध्ये पोप फ्रान्सिस यांनी तिला ‘Apostle of the apostles’ असा बहुमान बहाल केला.

मात्र हे सगळं जरी असलं तरी लोककथा, जनमानस, आणि सामुहिक स्मृतीकोशात मेरी मॅगडलीनचं वर्णन मात्र पापी स्त्री असंच कायम राहणार आहे - निदान आणखी एखाद-दोन पिढ्या तरी, नक्की.

त्या मानानं कॅथलिक चर्चकडून गलिलिओसाहेबांना फार लवकर न्याय मिळाला. Galileo di Vincenzo Bonaiuti de' Galilei (१५६४ ते १६४२) हा इटली देशातला एक सुविख्यात संशोधक, शास्त्रज्ञ, इंजिनीअर, आणि खगोल वैज्ञानिक होता. पृथ्वी सूर्याभोवती रोज एक प्रदक्षिणा करते, या कोपर्निकसच्या सिद्धान्ताला त्यानं भरभरून पाठिंबा दिला. ‘बायबल’मधल्या या संदर्भातल्या कथनाशी हा विचार मेळ खात नसल्यानं रोमन कॅथलिक चर्च त्याच्यावर नाराज झाली. पण यामुळे खचून न जाता पुढे १६३२मध्ये त्यानं एक पुस्तक लिहून स्थिर सूर्य आणि त्याच्याभोवती फिरणाऱ्या आपल्या ग्रहमंडळाची वैज्ञानिक माहिती लोकांना दिली. याच पुस्तकात त्यानं तत्कालीन पोप (पोप अर्बन आठवे) यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. त्यामुळे पोप रागावले. त्यांच्या आदेशानुसार मग गलिलिओवर धर्मविरोधी वर्तणूक या आरोपाखाली खटला चालवला गेला. त्याच्यावर एवढं मानसिक दडपण आणलं गेलं की, शेवटी त्या बिचाऱ्यानं माफीनामा लिहून दिला आणि माझं वैज्ञानिक प्रतिपादन मी मागे घेतो आहे, असं त्याला जाहीर करावं लागलं. एवढ्यावरच हे थांबलं नाही. आपलं उरलेलं सगळं आयुष्य त्याला नजरकैदेत घालवावं लागलं. ‘ex cathedra’ निवाड्याचा हा एक उत्तम नमुना आहे.

मात्र गलिलिओवर केलेल्या या अन्यायाला कॅथलिक चर्चनं मेरी मॅगडलीनच्या तुलनेत फारच लवकर म्हणजे अवघ्या ३५९ वर्षांतच दूर केलं. १७१८ मध्येच याची सुरुवात झाली. मात्र गलिलिओ बरोबर होता, चर्चचंच चुकलं, असं औपचारिकरीत्या जाहीर करायला, झालेल्या चुकीची संपूर्ण दुरुस्ती करायला त्यांना आणखी अडीचशे वर्षं लागली. ३१ ऑक्टोबर १९९२ रोजी पोप जॉन पॉल दुसरे यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे वैज्ञानिक सत्य मांडल्याबद्दल चर्चनं गलिलिओला सुनावलेली शिक्षा अन्याय्य होती, असं अधिकृतरीत्या घोषित केलं.

असा आहे ‘ex cathedra’ आणि ‘Magdalene’ यांचा संबंध!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मॅगडलीन म्हणजे सन्मार्गाला लागलेली वेश्या, हे आपण बघितलं. पण मुळात मॅगडलीन म्हणजे काय? मध्यपूर्वेत गलिलीच्या समुद्राजवळ एक गाव आहे. ग्रीक भाषेत त्याचं नाव आहे मॅगडॅला. जी या मॅगडॅलाची रहिवासी ती मॅगडलीन. पण मग मॅगडॅला म्हणजे काय? अरेमाइक भाषेत त्याचा अर्थ आहे मनोरा, टॉवर. आता गंमत पहा. मॅगडलीन (म्हणजे सन्मार्गाला लागलेली वेश्या) हा एका व्यक्तीच्या नावावरून तयार झालेला शब्द (इपनिम) आहे. त्या व्यक्तीचं हे नाव एका गावाच्या नावावरून तयार झालं. आणि त्या गावाचं ते नाव एका वस्तूच्या नावावरून बनलं.

Magdaleneपासूनच maudlin (मॉडलिन) हे आणखी एक इपनिम इंग्रजीत तयार झालं. त्याचा अर्थ ‘overly sentimental’ किंवा अत्यंत फार जास्त संवेदनशील, भावनाप्रधान, हळवा, असा होतो. तिकडे इंग्लंडच्या प्रसिद्ध केंब्रिज विश्वविद्यालयाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयाचं नाव ‘Magdalene College’ असं आहे. याही ठिकाणी ‘मॅगडलीन’चा उच्चार ‘मॉडलिन’ (/ˈmɔːdlɪn/ MAWD-lin) असाच होतो. का, ते मला विचारू नका! बहुधा अत्यंत संवेदनशील, भावनाप्रधान अशा विद्यार्थ्यांनाच तिथे प्रवेश मिळत असेल. नामांकित इतिहासकार आणि राजकारणी Samuel Pepys (सॅम्युअल पिप्स)ला विचारावं लागेल! तो याच कॉलेजात शिकला होता. मला वाटतं- तो असं म्हणेल की, माझ्या आडनावाचं स्पेलिंग ‘Pepys’ असूनही जर त्याचा उच्चार ‘पिप्स’ असा होऊ शकतो, तर ‘मॅगडलीन’चा उच्चार ‘मॉडलिन’ असा करायला काय हरकत आहे?

करा ना बुवा! हरकत घेणारे आम्ही कोण? इंग्रजी भाषेच्या या अशाच चमत्कारिक वैशिष्ट्यांची भुरळ पडल्यानं आमच्यासारखे येडे पीर तिच्यावर मनापासून प्रेम करतात! (बरेच लोक यासाठीच तिला शिव्याही घालतात. पण ते जाऊ द्या.)

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......