अवघड जागेतले दु:ख आणि दुखणाईत समीक्षा
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • ‘अजीब दास्तान्स’चे पोस्टर
  • Wed , 21 April 2021
  • पडघम माध्यमनामा अजीब दास्तान्स Ajeeb Daastaans गीली पुच्ची Geeli Pucchi

पत्रकार घाबरट, लेचेपेचे झाले ते समजले. ते ज्या माध्यमांत काम करतात, ती सारी सरपटणारी निघाली तेही समजले. पण समीक्षक, परीक्षक या मंडळींनाही कुठल्याशा अज्ञात शक्तीचे भय वाटावे अन त्यांनी स्वत:हून सेन्सॉरकाम सुरू करावे, याला काय म्हणावे? येऊनजाऊन आपले सेन्सॉर बोर्ड करते काय? अश्लील, हिंसक आणि असंस्कृत यांत त्याची जेवढी समज आहे, त्यावर कात्री चालवणे. ठीक आहे. भारतात आता राष्ट्रवाद अर्थात हिंदुत्ववाद नामक आणखी एक निकष लागू झाला असून त्याचे प्रत्यंतर साहित्य, चित्रे, चित्रपट आदी कलाप्रकारांतून आपल्याला आले. त्याची वेसण अर्थातच प्रस्थापित माध्यमांना आणि चिरपरिचित प्रदर्शकांना लावलेली. ओटीटी म्हणजे ‘ओव्हर दी टॉप’ मंच म्हणून घेणाऱ्यांना ती मुळीच लागू नाही, असेही नाही. प्रस्थापित माध्यमांना ओलांडून वा मागे टाकून वर पोचलेली ती ओटीटी माध्यमे अथवा मंच! त्यावर अत्यंत वेधक, स्फोटक, हिंसक, विचारोत्तेजक, लैंगिक विषय हाताळलेले बघायला मिळतात. १८, १५, १३ अशी वयोगटाची विभागणी करून प्रेक्षकांसाठी इशाराही हे मंच देतात. लैंगिकता, नग्नता, हिंसा, भाषा यांचा स्पष्ट उल्लेख करत राहतात. प्रेक्षकवर्गाची श्रेणी ठरवताना एलजीबीटीक्यू या समाजगटांसाठीसुद्धा चित्रपट वा मालिका आता तयार होतात.

अशा वातावरणात ‘नेटफ्लिक्स’ या मंचावर हिंदी भाषेत आलेली एक कलाकृती आणि त्यातल्या एका कथेच्या शीर्षकाने मराठी समीक्षकांची भंबेरी का उडावी? लाज, भय अथवा अवघडलेपण यांचा काहीही संबंध नसताना, त्यांनी नावाची गडबड का करावी? ‘अजीब दास्तान्स’ या हिंग्लिश शीर्षकाखाली चार गोष्टींचा गुच्छ, तिसऱ्या गोष्टीचा मथळा ‘गीली पुच्ची’ असा आपल्यापुढे येतो. ज्यांचे हिंदी भाषेचे ज्ञान उत्तम आहे, त्यांना या शीर्षकात काहीही अश्लील वाटणार नाही. इंग्रजी भाषेत ‘स्लॉपी किसेस’ म्हणजे थुंकी अथवा लाळ ज्या मुक्यांना लागते, त्या मुक्यांना अर्थात चुंबनांना ‘गीली पुच्ची’ असे म्हणतात. पुच पुच असा आवाज करून जे चुंबन घेतले वा दिले जाते, ते पुचकारना या क्रियापदात येते. पुचकारी म्हणजे असे गाल ओले करते ते चुंबन. साधारणपणे लहान बाळांचे मुके असे असतात. असे ओलसर चुंबन सहसा कुणाला आवडत नाही. पण ती एक नैसर्गिक क्रिया असल्याने त्यावर मनाई नाही. ‘गीली पुच्ची’ या कथेत हेच शब्द वापरून संवादसुद्धा आहेत. ते दोन कथानायिकांच्या दरम्यानचे आहेत. मुख्य म्हणजे सक्रिय आहेत. ओढ, जवळीक आणि गंमत अशा भावना त्या प्रसंगात दिसतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तर अशा या कथेचे समीक्षण करताना १९ एप्रिल रोजी कमलेश कुबल या समीक्षकाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रात कथेचे नावच गाळले, तर १८ एप्रिल रोजी ‘लोकसत्ता’मध्ये रेश्मा राईकवार यांनी तेच नाव ‘गीली पुछी’ असे पूर्ण चुकीचे आणि अज्ञानदर्शक छापले. मूळ इंग्रजी शीर्षक – ‘Geeli Pucchi’ असे असल्याने ‘च’ अक्षराचा उच्चार ‘छ’ असा होऊ शकतो. पण कथेत संवाद सरळ ‘पुच्ची’ असा म्हटला गेल्यावर नाव बदलायचे कारण काय? या दोन्ही चित्रपटसमीक्षकांना असा हक्क कुणी दिला? एकाने का म्हणून नाव वगळावे आणि दुसऱ्याने का म्हणून उच्चारात बदल करावा?

उघड आहे, दोघांनाही गैरअर्थ काढायची सवय असावी किंवा त्यांची भारतीय भाषांची समज कमालीची तोकडी असावी. आपण ‘मुघल-ए-आझम’ म्हणतो की ‘मोगल-ए-आझम’?, ‘दस्तानें’ की ‘दास्तानें’, यातला फरक आपण जाणतो ना? ‘पुची’नामक एक कंपनी सौंदर्यप्रसाधने तयार करते आणि ते नाव जगात प्रसिद्ध आहे, याची जाण आहे का या समीक्षकांना? Pucci असे तिचे स्पेलिंग आहे. इटालियन भाषेत ‘पुची’ उच्चाराचे आडनाव आहे. महाराष्ट्रात आणि मराठीत ते बदलायचे का? की वगळून टाकायचे? काय करायचे त्या माणसांनी?

‘चोदना’ असा एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ पाठवणे, प्रेरणा, उत्तेजन, प्रवर्तक गोष्ट. पण या समीक्षकांना फक्त हिंदीतलाच अर्थ माहीत असल्यावर ‘चोदनालक्षणधर्म’ आदी धर्मशास्त्रातले शब्दवापर वगळणार की, ‘च’ ऐवजी ‘छ’ घालून वापरणार? गुरुवर्य के. ल. दप्तरी कपाळ बडवत बसतील…

कदाचित ओटीटी मंचावर गेल्या दोन-तीन वर्षांत आलेल्या कलाकृतींमध्ये प्रचंड शिवीगाळ, नग्नता, लैंगिकता असल्याने ‘गीली पुच्ची’ हे नाव त्याच प्रकारातले असावे, असे या समीक्षकांना वाटले असावे. दादा कोंकडे यांच्या कधी गमतीदार तर कधी बीभत्स द्वयर्थी शब्दांमुळेही त्यांची ‘इथे काहीही चालते’ अशी समजूत झाली असावी.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘व्हजायना मोनोलॉग्ज’ हे नाटक साधारण १८-२० वर्षांपूर्वी इव्ह एन्सलर यांनी लिहिले. ते कसे सादर करावे त्याच्या अत्यंत स्पष्ट सूचना त्यांना नाटकासोबतच दिल्या. मराठीत हे नाटक ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ अशा शीर्षकाने सादर झाले. तेव्हा सनातन्यांनी व संस्कृतीरक्षकांनी खूप गदारोळ केला होता. राईकवार व कुबल त्यांच्यापैकी आहेत का? हे नाटक स्त्रीवादी असून स्त्रीची अवहेलना तिच्या इंद्रियाच्या निंदाव्यंजक नावांपासून कशी केली जाते, त्याकडे लक्ष वेधणारे आहे. ‘व्हजायना’ अर्थात योनी या अवयवाची हेटाळणी कोणकोणत्या शब्दांनी जगभर केली जाते, त्याची उजळणी करताना या नाटकामधले एक पात्र ‘पूची’ असे म्हणतेही.

असे असताना अन मराठीत त्या इंद्रियाच्या नावाने पुरुषमंडळी मनसोक्त शिव्या देत असताना एक संवेदनशील दिग्दर्शक मुद्दाम तेच शीर्षक निवडेल असे समजणे चूक. ते विचित्र वाटते खरे, मात्र हिंदी भाषेत ते सर्रास उच्चारले जाते, हेही तितकेच खरे.

‘आय लव्ह डिक’ या शीर्षकाची एक मालिका बहुधा नेटफ्लिक्सवर आहे. ‘डिक’ या शब्दाचा अर्थ ‘पुरुषाचे लिंग’ असा स्लँगमध्ये आहे, तसे ‘डिक’ हे डिकिन्सन या नावाचे लघुरूपही आहे. अमेरिकेत डिक चेनी हे उपराष्ट्रपती अलीकडेच होऊन गेले. मूळचे डिकिन्सन असणारे चेनी या लघुरूपामुळे लाजाळू झाले होते का? त्यांनी आपले नाव लपवायचा प्रयत्न केला का? ‘व्हर्जिन’ नामक एक विमान कंपनी अमेरिकेत आहे. तिचा मालक रिचर्ड ब्रॅन्सन त्याच्या ऐषोरामी राहणीमुळे जगप्रसिद्ध आहे. या नावाचा आणि व्हर्जिनिटीचा संबंध क्षणोक्षणी लावायलाच हवा का?

भारतात ‘अहल्या’ हे नाव कुमारिकेला उद्देशून वापरले जाते. हल म्हणजे नांगर. ज्या जमिनीत नांगर घुसलेला नाही ती अहल्या. अर्थात अशी स्त्री- जी अजून कुमारी आहे, तिचे कौमार्य भंगलेले नाही. इतका तपशीलवार विचार ज्या संस्कृतीत केलेला आहे, तीत लाज वाटायचे काय कारण? ‘अक्षता’, ‘अनाघ्रात’ हे शब्दसुद्धा स्त्रीच्या योनीसंबंधाने वापरात होते. ‘अक्षतयोनी’ हा शब्द तर भरपूर परिचित आहे. ‘च्युति’ हा संस्कृत शब्द कोशामधील अर्थानुसार पडणे, गळणे, नाश, स्वकर्म त्याग, गुदद्वार, योनि असा दिलेला आहे. या शब्दाचा निंदक वापर पुरुषासाठी केला जातो, हे निश्चितच निषेधार्ह आहे. ‘पुचाट’ हे विशेषण मुद्दाम घाबरट पुरुषासाठी वापरले जाते, तेही स्त्रीसम लेखण्यासाठी आणि लैंगिक अवहेलना करण्यासाठीच.

त्या कोणत्याच अर्थाने वा संदर्भाने या कथेला नाव देण्यात आलेले नाही, हे चांगले झाले. ‘च्युत’ म्हणजे गळणे वा ढळणे. एखाद्या पुरुषाला ‘अच्युत’ नाव दिले जाते, याचा अर्थ तो अढळ व ठाम असावा\असतो म्हणून. श्रीरामाला ‘अच्युत’ म्हटले गेले, कारण तो कधी ढळला नाही. आता कित्येक अच्युतरावांना त्यांच्या नावाची शरम वाटायला हवी होती. नामसाधर्म्यामुळे किंवा अन्य भाषांत त्या शब्दाच्या अधिक प्रचलित असणाऱ्या वापरामुळे. पण तसा कोणाचा अनुभव नाही. तमाम अहल्या व अक्षता तर लाजून चूर चूर व्हायला हव्या होत्या. तसेही काही आपल्या अनुभवात नाही. म्हणजे श्लील-अश्लील याचा विवेक डोक्यात आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कित्येक मराठी वृत्तपत्रे ‘जोडप्यास लॉजमध्ये अश्लील चाळे करताना पोलिसांनी पकडले’ अशी ओळ सर्रास लिहितात. आता हे अश्लील प्रकरण काय? जे कृत्य एखाद्या खोलीत दोन व्यक्ती खाजगीत करत असतात, त्याला सार्वजनिक जागेचे वर्णन चिकटवायचे? मग आपले आई-वडीलही अश्लील चाळे करत होते की काय? संभोगक्रिया ‘अश्लील चाळा’ का म्हणून गणली जावी? सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केले, म्हणून वेश्यांना पकडले जाते. ते चाळे व लॉजमधले चाळे यात फरक नसावा का? पण वर्षानुवर्षे असेच छापले जाते. छापणारा घरी जाऊन रात्री अश्लील चाळे करतो का, काही कळत नाही.

नग्नतेला अश्लील ठरवणाऱ्यांची सत्ता आल्यावर असा भ्रम, दुटप्पीपणा आणि राजकारण वाढत जाणार होतेच. पण ते इतक्या पोरकट अन घाबरट थराला जाईल, असे वाटले नव्हते!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......