अजूनकाही
१. राज्यातील फडणवीस सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे राज्यातील भाजप सरकारच्या स्थिरतेविषयी शंका निर्माण झाली आहे. त्याचवेळी राजीनामा खिशात घेऊन फिरतो आहोत, हे शिवसेनेच्या मंत्र्यांचे दावे म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
अजितदादा म्हणतात शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकार कोसळेल, याचा सरळसरळ अर्थ होतो की, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही. आता अजितदादांनी हे वक्तव्य केलं म्हणजे शरद पवार त्याविरोधात निर्णय घेतील, हे उघडच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देऊही शकते. पण, इतकं दोन अधिक दोन बरोबर चारचं गणित पवार करणार नाहीत. शिवाय, उद्धव ठाकरेंनी कितीही गर्जना केल्या, तरी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर ते कमळाबाईच्या दारात नाक घासत जाणार नाहीत, असंही नाही… म्हणजे थोडक्यात, काँग्रेसला सत्तेच्या राजकारणात काहीच स्थान उरलेलं नाही, ही एक गोष्ट वगळता काहीही स्थिर नाही तर.
…………………………………………..
२. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला अवगत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बिनसाबणाचे फुगे सोडण्याची कला आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले आहे.
पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या पुरुषांनी एकट्याने, दुकट्याने वा समूहाने आपापल्या बाथरूममध्ये काहीही करावं, त्याला कोणाची काही हरकत असणार नाही; पण, त्यांनी दुसऱ्याच्या बाथरूमवर असं चोरून लक्ष ठेवणं मात्र फारच रोगट आणि आंबट मनोवृत्तीचं लक्षण आहे, नाही का?
…………………………………………..
३. गुजरातमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही गंभीर आहे. त्यातही सौराष्ट्रातील कोडिनार येथील परिस्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या कोडिनार हिंसेच्या घटनेच्या व्हिडीओत पोलीस पीडितांऐवजी दंगेखोरांना मदत करत असल्याचे पाहून न्यायाधीशही स्तब्ध झाले. या घटनेतील आरोपी भाजप खासदार दीनू सोलंकी यांच्याविरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यावरून न्यायाधीश जे. बी. परडीवाला यांनी पोलिसांना धारेवर धरलं.
हे परडीवाला कुठून प्रतिनियुक्तीवर आलेत काय गुजरातमध्ये? त्यांना गुजरातच्या, खासकरून पोलिसांच्या उज्वल अर्वाचीन परंपरांविषयी मूलभूत माहितीही नाही, तर अभिमान, गर्व आणि आदर कुठून असणार? आज हे पोलिसांना त्यांचं कर्तव्य शिकवतायत, उद्या राज्यकर्त्यांना राजधर्म शिकवतील. त्यांना विचारतो कोण?
…………………………………………..
३. भारतीय मुस्लिम हे हिंदुस्तानात राहतात आणि येथील परंपरांचा सन्मान करतात. तेव्हा भारतीय मुसलमान हे राष्ट्रीयत्वाने हिंदूच आहेत, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. संपूर्ण जगभरात भारतीय समाज हा हिंदू समाज म्हणून गणला जातो तेव्हा आपण सारे भारतीय हे हिंदूच आहोत, अशी भावना आपल्या मनात असायला हवी असे भागवत म्हणाले.
दरम्यानच्या काळात भारत स्वतंत्र झाला तेव्हा हे पुण्यभू इटलीत गणवेष शिवायला गेले होते की कवायत शिकायला? हा तिकडून आयात केलेला राष्ट्रवाद भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला नाही. या देशाचं राष्ट्रीयत्व हे फक्त आणि फक्त भारतीयत्व आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतीलच म्हणा त्यांना समजावून.
…………………………………………..
४. आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच; पण असे अनेक ‘सुखराम’ नंतर भाजपच्या गंगेत पावन करून घेतले गेलेच ना? काँग्रेसने चोऱ्यामाऱ्या करूनच राज्य कारभार केला हे मान्य केले तरी ज्या देशात स्वातंत्र्याच्या वेळी सुईदेखील बनत नव्हती, तो देश आज आर्थिक व औद्योगिक बाबतीत खूपच पुढे गेला आहे. २८० खासदारांचे बहुमत असलेल्या भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत देशात नक्की कोणते परिवर्तन घडवून आणले? : 'सामना'चा अग्रलेख
चला, आता काँग्रेसला निदान काही दिवस तरी वेगळं वर्तमानपत्र काढायला नको! सध्या परवडणारही नाही. सेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या या मजकुराची माहिती स्व. यशवंतराव चव्हाणांनी दिल्यानंतर तिकडे स्वर्गात गांधी-नेहरू आणि पटेल सद्गतित होऊन डोळे पुसत असल्याची बातमी खरीच मानायला हवी.
…………………………………………..
५. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने जाहिरात आणि प्रसिद्धीवर ९९२ कोटी रुपये खर्च केले आहेत, असे माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राज्यसभेत लिखित उत्तरामध्ये सांगितले.
बापरे, एका माणसाच्या प्रसिद्धीवर एवढा खर्च? काय सांगताय? इतरही कोणी आहे काय या सरकारमध्ये? ओहोहो, एक नाव तर या बातमीतच आहे की. लक्षातच नाही येत पटकन्.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment