अजूनकाही
आज १८ एप्रिल. विनोबांनी सुरू केलेल्या भूदान आंदोलनाला आज ७० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…
फलटणच्या विंचूर्णी गावचे बाबूलाल गांधी. सध्या नव्वदीच्या आसपास असतील. तरुणपणात विनोबांच्या भूदान चळवळीत उतरले. भूदानात दान झालेल्या जमिनीचे वाटप करण्याचे काम किचकट होते. बिहारमधील जमिनीच्या वाटपासाठी विनोबांनी बाबूलाभाईंना पाठवले. बिहारमधील कठीण परिस्थितीला तोंड देत बाबूलालभाई काम करत होते. काही वर्षांनी विनोबांनी सांगितले- ‘तू आता महाराष्ट्रात काम कर.’'
बाबूलालभाईंनी महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये भूदानाच्या जमिनीचे वाटप अतिशय काटेकोरपणे करून त्याची तपशिलासकट आकडेवारी ठेवली. हे सगळं काम त्यांनी एकट्याने सायकलवर फिरून केले. दररोज एक गाव, ग्रामसभा, जमिनीचे वाटप करून म्हणजे गावातील वाद-भांडणे सोडवून किंवा टाळून शक्यतो सगळे काम मार्गी लावून दुसऱ्या गावी निघणे. असं त्यांनी अनेक वर्षे केलं. एकदा रात्री चोरांच्या टोळक्याने बाबूलालभाईंना धरले. चाकू वगैरे काढले. बाबूलालभाई आपण काय करतो ते सांगू लागले. चोरांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून बाबूलालभाईंना देऊ केले. असे अनेक किस्से त्यांच्याकडे आहेत.
त्या काळातील अनुभवांवर आधारीत त्यांनी लिहिलेले पुस्तक परंधाम प्रकाशनाने प्रसिद्ध केले. प्रत्येक जिल्ह्यात किती जमीन मिळाली? त्यातली कोरडवाहू, बागायती किती? प्रत्येक जिल्यात तालुक्यात किती जमीन वाटली? असे अनेक तक्ते या पुस्तकात आकडेवारीसह आहेत.
जमिनीचे वाटप करताना बाबूलालभाईंनी दान देणाऱ्यांकडून फॉर्म भरून घेतले. आपण दान का करत आहात? हा एकच प्रश्न होता. त्याला पर्याय पुढीलप्रमाणे होते - १) विनोबांचे विचार पटले म्हणून दान करत आहे. २) वडिलांची इच्छा म्हणून दान करतोय. ३) भूमिहीन गरिबांबद्दल काही करावेसे वाटते. ४) घरातील भांडणावर उपाय म्हणून दान करतोय. या सर्वेक्षणाची आकडेवारी जनतेबद्दल काही वेगळेच सांगून जाते.
तसेच दान करणारे कोण होते? याची आकडेवारी भारतीय जनतेचे मन ओळखायला मदत करते. त्या पुस्तकास धनंजयराव गाडगीळांची सविस्तर प्रस्तावना आहे. (हे दुर्मीळ पुस्तक माझी ज्येष्ठ मैत्रीण सुरेखा दळवीकडून वाचायला मिळाले.)
आपल्या भावाचे निधन झाल्यावर घरची जबाबदारी घेण्यासाठी बाबूलाल गांधी विंचूर्णीला परतले. भूदानाच्या कामात फिरताना त्यांना हे कळले होते की, मूळ प्रश्न बरड जमिनीतून उत्पन्न कसे घ्यायचं हा आहे. सर्वोदयाची तत्त्वे पाळून हे आव्हान त्यांनी स्वीकारले. पाण्याचा थेंब जिरवणे, मातीचा कण थोपवणे हे सूत्र पकडून कामाला सुरुवात केली. त्यांनी आणि त्यांचे बंधू मगनलाल गांधी यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. माहितीची नोंद करणे, आकडेवारी ठेवणे, होणाऱ्या बदलांची नोंद करणे, पावसाचे प्रमाण, मातीचा पोत यांची नोंद करणे, हे सगळे अजूनही कसोशीने पाळले जाते. निसर्ग शेती शास्त्रीय आणि कल्पक पद्धतीने कशी करावी, याचा अनुभव तेथे येतो. निसर्ग शेतीमध्ये फायदा मिळू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
गांधी कुटुंबाची मिळून मोठी शेती आहे. बाबूलालभाई अविवाहित आहेत. त्यांचे भाऊ मगनलालभाईंच्या चार मुली, मुलगा, जावई, सून सगळे मिळून हा शेतीचा कारभार सांभाळतात. पूर्णपणे सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचन. मात्र चांगले उत्पन्न देणारी आणि जमिनीचा कस सांभाळणारी झाडे लावली आहेत. केळी, उससुद्धा ड्रीपवरच. एकंदर ५ ते ७ गडीमाणसे आहेत. ती पुरतात, कारण शेतीचे नियोजन उत्तम आहे. शेतावर १००-१५० मोर आहेत. कोल्हे, तरस, लांडगे यांचा वावर आहे. झाडाझाडांवर मधमाशांची छोटी-छोटी पोळी आहेत. विविध प्रकारची फुलपाखरे आणि विविध जातींच्या पक्ष्यांचे हे निवासस्थान आहे. बाबुलालभाईंच्या मते हेही सर्व शेताचे भाग आहेत. ही सगळी प्राणी पक्षी आणि कीटक सृष्टी शेतावर असली तर भरघोस उत्पन्न मिळतं, असं ते सांगतात. निसर्गाशी संवाद साधत शेती कशी करायची यासाठी शाळेतील मुलांची शिबिरे तेथे मगनलाल स्मृती केंद्रात घेतली जातात. स्मृतीकेंद्रात कुठेही भपका नाही, पण टापटीप आणि स्वच्छता नजरेत भरते.
तीन-चार वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली होती. भरपूर गप्पा झाल्या. निसर्ग शेतीतले अनुभव सांगितले. अडचणी येतात, तेव्हा कशा सोडवायच्या, व्यवहारी राहूनही हे काम कसं करावं हे त्यांनी छान सांगितले. एकंदर भूदानाच्या कामाबद्दल बोलले. मात्र स्वतःबद्दल जवळजवळ बोललेच नाहीत. तुम्ही एवढं मोठं काम कसं केलं, त्यावर साधं उत्तर होतं- ‘विनोबा म्हणाले तू कर, मी केलं.’ मी असे केले, तसे केले असं बोलण्यात काहीच नव्हतं. ‘मी’ सोडून गप्पा मारणे, अनुभव सांगणे, विषय मांडणे हे हल्लीच्या काळात आत्यंतिक दुर्मीळ आहे. बाबूलाल गांधी या दुर्मीळांपैकी एक आहेत.
..................................................................................................................................................................
लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.
vtambe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment