अजूनकाही
लोकशाहीतले विरोधाभास सध्या आपला देश अनुभवतो आहे. करोनाच्या दुसर्या लाटेनं देशात उच्छाद मांडला आहे. औषधं, ऑक्सिजन, बेडसचा तुटवडा आहे. बेड न मिळाल्यामुळे लोक रस्त्यावर, रिक्षात, कारमध्ये प्राण सोडत असल्याची दृश्यं प्रकाश वृत्तवाहिन्यांवर पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत... एकाच सरणावर ४०-५०-७० पार्थिवांवर अंत्यसंस्कार होत असल्याचं देशातल्या अनेक शहरांत पाहायला मिळत आहे. परिस्थिती शब्दांत व्यक्त करता येणार नाही अशी अतिशय भयावह आहे...
आणि दुसरीकडे देशातल्या पाच राज्यात निवडणूक प्रचार जोरात आहे. देशाच्या अन्य भागातच कशाला महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचाही प्रचार जोरातच आहे. तृणमूल काँग्रेस, आसाम गण परिषद, राष्ट्रवादी आणि भाजप अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. हा धुरळा उडवताना तोंडाला मास्क बांधणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं अशा सर्व करोना प्रतिबंधक नियमांचा पंढरपूरपासून ते गुवाहाटीपर्यंत नेत्यांनीच फज्जा उडवलेला आहे. त्यात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही आणि हे म्हणतात – ‘लोकांनी नियम पाळावेत’, हाही विरोधाभासच आहे!
सध्या किमान महाराष्ट्रात तरी जवळजवळ एकआड घरटी किमान एक तरी करोनाचा रुग्ण आहे. दर दिवशी कुणी जीवाभावाचा करोनाला बळी पडल्याच्या वार्ता येतात. लोक मरणाच्या छायेत जगत आहेत. हे कमी म्हणून की काय करोनाची तिसरी लाट देशाचे दरवाजे ठोठावत आहे. तिसरी लाट किती भयानक असेल याचा अंदाज अजून आलेला नाहीये, पण हे सगळं वातावरण अतिशय सुन्न करणारं आहे. महाराष्ट्रात संचारबंदी जारी झालेली आहे आणि रस्ते बर्यापैकी ओस पडलेले आहेत, सर्वत्र सन्नाटा आहे. दर पंधरा-वीस मिनिटांनी रुग्णवाहिकेच्या सायरनचे शांतता चिरत येणारे आवाज जीवाची कालवाकालव करतात.
एकीकडे हे असं एकीकडे वातावरण आणि दुसरीकडे लसीकरणाचा उत्सव (हे तर मरणाचे सोहळेच नाहीत का?) काय आणि निवडणुकांचा प्रचार काय… किती विरोधाभासी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आपण जगतो आहोत! हे अनुभवताना काळीज अक्षरश: कुरतडतं... जीव तीळतीळ तुटतो... या निवडणुका पुढे ढकलता आल्या नसता का, हा प्रश्न गैरलागू आहे, कारण ‘निवडणुका आवडती सर्व राजकारण्यांना’ अशी स्थिती आहे!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता बहुतेक संपत आलेली आहे. देशाचं लक्ष प्रामुख्यानं आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांवर आहे. तीन आठवड्यांपूर्वी पश्चिम बंगालवर लिहिताना तृणमूल काँग्रेस सत्तेत येईल आणि भाजप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पश्चिम बंगालमध्ये उदयाला आलेला असेल, असं मत मी व्यक्त केलेलं होतं. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये, हे स्पष्टपणे तसं सांगून टाकायला हवं. माझे जे काही स्त्रोत आहेत, त्यापैकी काही अगदी स्पष्टपणानं सांगताहेत की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. नंदिग्राममधून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातलं मतदान संपल्यावर एका ज्येष्ठ स्नेह्याचा एसएमएस आला- ‘Nandigram fort is grounded today!’
तिकडे असलेले अनेक मित्र, स्नेही आणि स्त्रोत अशाच प्रकारचे संकेत देत आहेत. वरिष्ठ राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात ‘TMC can lose Bengal’ असे एसएमएस फिरायला लागले आहेत. त्यात आणखी एक बाब म्हणजे मतदानाची टक्केवारी अतिशय वाढलेली आहे. कदाचित पश्चिम बंगालच्या आजवरच्या निवडणुकांच्या इतिहासात मतदानाची टक्केवारी इतकी वाढलेली नसावी. अर्थात आमच्या मतदारांना मतदान करू दिलं जात नाही, असं ममता बॅनर्जी तरी म्हणतायेतच, पण त्यांचं म्हणणं तितकंसं खरं नसावं किंवा त्यात मुळीच तथ्य नसावं, हेच ही मतदानाची आकडेवारी सांगतेय. (ममता बॅनर्जी यांचा तो कांगावाही असू शकतो, कारण ती त्यांची संवय आहे!) हे वाढलेलं मतदान कुणीकडे जाणार, तसंच पश्चिम बंगालमध्ये अतिशय विस्कळीत असणारे डावे पक्ष आणि काँग्रेसचं मतदान कुणाकडे वळणार, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे.
ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने थयथयाट करताहेत, त्या काही तृणमूल काँग्रेससाठी शुभसंकेताच्या ओल्या रेषा नाहीत, हे स्पष्टच आहे. तरीही जी काही माहिती अन्य काही स्त्रोतांकडून मिळते आहे, त्यानुसार आताच्या घटकेला असं वाटतं की, तृणमूल काँग्रेसला निसटतं का होईना बहुमत मिळेल आणि भाजप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात आलेला असेल. त्यात भाजपचा आकडा शंभर अधिक–उणे असा आहे. हे लक्षात घेतलं तर पश्चिम बंगालमध्ये स्थिर सरकार येणं कठीण आहे. म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचं सरकारवर सत्तारूढ झालंच, तरी त्यावर अस्थिरतेचं सावट राहिल. भाजप ‘ऑपरेशन लोटस’ करून पश्चिम बंगालमधील सत्ता ताब्यात घेईल, अशी शक्यता दिसते आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
ते काहीही असो एक मात्र खरं, निवडणुकीच्या पहिल्या-दुसऱ्या टप्प्यापर्यंत जे वातावरण पश्चिम बंगालमध्ये होतं, ते आता तसं राहिलेलं नाही. ममता बॅनर्जी या तशा एकट्या पडलेल्या आहेत किंवा त्यांनी स्वत:ला एकटं पाडून घेतलेलं आहे असंही म्हणता येईल. देशातल्या विविध भागातल्या, ज्या सुभेदारांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलेला होता, त्यापैकी कुणीही त्यांच्या मदतीला गेलेलं नाही. मी मागच्या लेखातच म्हटलं होतं, त्यापैकी कुणी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला जाणारच नाही, कारण त्यापैकी कुणाचीही किंचितही ताकद त्या राज्यामध्ये नाहीये आणि ते तसंच घडलेलं आहे.
या प्रतिपादनाला फक्त शरद पवार अपवाद आहेत. शस्त्रक्रिया आणि प्रकृती अस्वास्थ्यमुळे ते काही महाराष्ट्र सोडू शकले नाहीत. परंतु आपल्या ‘मूहं बोल्या’ बहिणीच्या मदतीलाही न जाणारे महाराष्ट्रासकट अन्य राज्यांतील नेते यानिमित्ताने किती तोंडदेखला व तकलादू पाठिंबा देतात, ते समोर आलेलं आहे. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी मात्र अतिशय जोरदार मोर्चेबांधणी पश्चिम बंगालमध्ये केलेली आहे. ती सत्तेमध्ये परावर्तित होते की नाही, हे आता लवकरच समजेलच. काही लोक म्हणतात त्याप्रमाणे, वारे फिरू लागलेले आहेत. ते कोणाच्या तंबूत जाणून स्थिरावतात ते बघायला हवं.
दुसरं राज्य आसाम. आसाममध्येही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापर्यंतचा जो अंदाज होता, त्याप्रमाणे भाजप आणि आसाम गण परिषदेची युती सहज पुन्हा सत्ता प्राप्त करेल असं म्हटलं जात होतं. विविध पाहण्यांचे अंदाजही तसेच येत होते, पण आता त्या परिस्थितीत बराच फरक पडलेला आहे. जी काही माहिती हाती येत आहे, त्यातून भाजप बहुमताच्या किंचित का असेना जवळपास असेल किंवा निसटतं बहुमत भाजपला मिळेलं असेल असं दिसतंय. याचं कारण काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोत आघाडीनं आसाममध्ये मोठं आव्हान भाजपसमोर उभं केलंलं आहे, पण इथंही लढाई विषम आहे.
भाजपच्या तुलनेत महाजोत आघाडीकडे निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘साधन सामग्री’ची कमतरता आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी आणि एक-दोन मोजके नेते पूर्व भारतातल्या निवडणुकांत सक्रिय आहेत. आसाममध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोत या आघाडीत एकूण दहा पक्ष आहेत. त्यापैकी बोडो लॅण्ड पीपल्स फ्रंट आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट हे दोन प्रमुख आहेत. यापैकी बोडो लॅण्ड पिपल्स फ्रंट गेल्या निवडणुकीत भाजपसोबत होता. यावेळेस तो काँग्रेस आघाडीसोबत आहे. तो एक भाजपला झटकाच आहे. कारण आसामच्या काही भागांमध्ये बोडो लॅण्ड पिपल्स फ्रंटचं चांगल्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे सध्या महाजोत आघाडी जोरात दिसते आहे. ही आघाडी ५० ते ६०च्या दरम्यान जागा मिळवू शकेल, तर भाजप आघाडीला ६० ते ७० जागा मिळतील, असे अंदाज व्यक्त केले जाऊ लागले आहेत. हेच कल दाखवत सट्टा मार्केटही तेजीत आहे. असं हे एकंदरीत वातावरण आसामात आहे.
या निवडणुकांचे निकाल भाजपच्या पुढील निवडणुकीच्या रणनीतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून येनकेन प्रकारे भाजप तेथे सत्ता राखण्याचा प्रयत्न करेल याबद्दल शंकाच नाही. ईशान्य भारतात ज्या २५ लोकसभेच्या जागा आहेत, त्यापैकी एकही जागा एकेकाळी भाजपच्या ताब्यात नव्हती. २०१४च्या निवडणुकीत लोकसभेच्या १० जागा भाजपने जिंकल्या. २०१९च्या निवडणुकीत ती संख्या १८वर पोहोचली. पश्चिम बंगालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं असंच नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालवर एकदा जर भाजप वर्चस्व प्रस्थापित करू शकला, तर देशाच्या राजकारणाची बरीच समीकरणं बदलतील, भाजपची मुळं आणखीन मजबूत होतील, हे नक्की.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आत्ताच्या म्हणजे एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात मिळणार्या माहितीनुसार सत्ताबदलाचा कौल मतदारांनी दिला तर ममता बॅनर्जीं यांचं काय होणार हा प्रश्न राहील. नंदिग्राममधून त्या निवडणूक हरल्या तर तो फार मोठा धक्का त्यांना, त्यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या सर्व विरोधकांना असेल, यात शंकाच नाही. तृणमूलला लागलेली गळती आणखी वाढेल हे निश्चित. तृणमूल काँग्रेसची सत्ता गेली तर देशातल्या भाजप विरोधकांचं अवसानच गळेल.
पश्चिम बंगालमधलं पत्रकार मित्र सांगतात, त्याप्रमाणे मुख्यमंत्री झाल्यावर जो एक समजंसपणा आणि जे प्रौढत्व यावं लागतं, जो एक व्यापक दृष्टिकोन यावा लागतो, त्याचा ममता बॅनर्जींमध्ये अभाव आहे. त्या अजूनही युवक काँग्रेसच्या नेत्या असल्यासारख्या उतावीळ किंवा डाव्या आघाडीविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणाऱ्या (street fighter) नेत्या असल्याच्या आविर्भावात वावरत असतात. त्यांचं नेतृत्वही तसं एकारलं आणि एककल्लीच आहे. याचं उदाहरण म्हणून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत एक मोट बांधायला पाहिजे होती, हे दिलं जातं. ममता बॅनर्जी यांनी ती मोट बांधण्यास नकार दिला आणि ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. त्याची फळं त्यांना भोगावी लागतील असं दिसतंय का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी आता फार काळ वाट पहावी लागणार नाहीये.
करोनाचं प्रत्येकाच्या उरावर बसलेलं भूत एकीकडे मृत्यूचे अशुभ संकेत सातत्यानं देत आहे आणि दुसरीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत गर्क, असं हे विद्यमान चित्र आहे. लोकशाहीतला हा अतिशय विदारक विरोधाभास आहे; तो नाकारणं ही प्रतारणाच ठरेल.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 21 April 2021
नमस्कार प्रवीण बर्दापूरकर!
मी ऐकलंय की अमित शहा म्हणाले की बंगालचे निकाल उत्तरप्रदेशापेक्षा अध्क धक्कादायक असतील. माझ्याकडे नेमका संदर्भ नाही. पण हे जर खरं असेल तर बंगालात भाजप प्रचंड घट्टपणे पाय रोवून उभा राहील.
आपला नम्र,
गामा पैलवान