अजूनकाही
सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, तर देशपातळीवर उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा आदि पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांची! राज्यात विधानसभेत एकत्र सत्तेत असलेल्या आणि गेली पंचवीसेक वर्षं युतीमध्ये असलेल्या सेना-भाजपने महानगरपालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचे ठरवून स्वत:ची स्वतंत्र शक्ती अजमावण्याचं ठरवलं आहे. वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया या ठिकाणी सेना-भाजपच्या नेत्यांचे आरोप-प्रत्योरोप रोजच्या रोज गाजत असताना मनसे आणि त्याचे प्रमुख राज ठाकरे भूमिगत म्हणावेत इतके बेदखल ठरले आहेत. त्यांच्याविषयीच्या साध्या बातम्याही वरील तिन्ही ठिकाणी फारशा वाचायलाही मिळत नाहीत. काही दिवसांपूर्वी भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी सेनेसोबत युती करण्याचा प्रस्तावही मांडून पाहिला, पण त्याला उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा आणि त्याच्या नेत्यांचा – मग ते देशपातळीवरील असोत की राज्य पातळीवरील – आत्मविश्वास अजूनही हरपलेलाच असल्यामुळे त्यांचाही आवाज क्षीण म्हणावा असाच आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक सकृतदर्शनी तरी सेना-भाजप यांच्यातच होते आहे की, काय असं एकंदर चित्र आहे. या निवडणुकीत सेनेला घवघवीत यश येतं की अपयश यावर राज्यातील पुढील सत्तेचं राजकारण अवलंबून असेल.
देशपातळीवर अरविंद केजरीवाल पंजाब विधानसभेची निवडणूक ‘दिल्ली मॉडेल’च्या बळावर लढवू पाहत आहेत. आणि केजरीवाल हाच पंजाबच्या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अकाली दल, काँग्रेस आणि भाजप यांच्यापेक्षाही केजरीवालांचा आप पंजाबमध्ये काय करणार, यावर तेथील सत्तेची गणितं अवलंबून आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षातील सगळी बंडं अखेर लुटूपुटीची ठरून मुलायमसिंग मुलगा, अखिलेशसाठी प्रचार करायला तयार झाले आहेत. समाजवादी पक्षातील सगळा ड्रामा इतक्या अपेक्षित वळणावर आला आहे की, यामागे पद्धतशीर नियोजन असावं अशी साधार शंका आल्यावाचून राहत नाही. सध्या तरी देशपातळीवर अखिलेश यांच्या कार्यक्षमतेची, ते करत असलेल्या विकासाची चर्चा होते आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशची जनता त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी देणार की नाही, यावर उत्तरप्रदेशचं आणि अखिलेशसारख्या नव्या तरुणांच्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून आहे.
भाजपसाठी मात्र उत्तरप्रदेशची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची आहे. हे देशातील सर्वाधिक मोठं राज्य. तब्बल ८० खासदार असलेलं. त्यामुळे या राज्यात भाजपला यश मिळालं तर त्याचं लोकसभा व राज्यसभेतील संख्याबळ वाढेल. हा पक्ष अजून मजबूत होईल. आणि २०१९च्या लोकसभा निवडणुका कदाचित नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील. पण जर भाजपने उत्तरप्रदेशमध्ये सपाटून मार खाल्ला तर मात्र नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या तिखटपणाची धार बरीचशी बोथट होईल आणि मुख्य म्हणजे २०१९च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपमध्ये त्यांच्याऐवजी नवा पर्याय शोधला जाईल.
असो. अजून निवडणुका व्हायच्या आहेत, निकाल लागायचे आहेत. त्यामुळे या जर-तरला सध्यातरी फारसा अर्थ नाही. पण आपला, आपल्या राज्याचा आणि देशाचा व्यापक पातळीवर विचार करता मतदार म्हणून आपण कुणाला मतदान करावं, हा आपल्या दृष्टीने सर्वाधिक कळीचा मुद्दा असायला हवा. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते भ्रष्टाचार करतात, गुन्हेगार उमेदवारांना पाठीशी घालतात. त्यांना तिकिटं देतात. जातीयवादाचं राजकारण करतात. राजकारणात, सत्तेत राहायचं असेल तर हे सर्व करावं लागतं, असं त्याचं खाजगीत समर्थनही करतात. हे दुष्टचक्र थांबवण्यापलीकडे गेलं आहे. पण सुजाण मतदार म्हणून आपण मतदानासाठी काहीएक निश्चित भूमिका ठरवली तर आपण या दुष्टचक्राला काहीएक प्रमाणात रोखू शकतो, पायबंद घालू शकतो.
त्यासाठी मतदार म्हणून आपण आपली भूमिका नक्की करणं आवश्यक आहे.
हिंदीतील मान्यवर कवी (कै.) गजानन माधव मुक्तिबोध आपल्या मित्रांना, तरुण साहित्यिकांना, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” हा प्रश्न विचारत. मुक्तिबोध यांचा हा प्रश्न म्हटलं तर साधासुधा आहे. सूचक आहे आणि तितकाच मर्मभेदक-खोचकही आहे. कारण ‘राजकारण’ या शब्दाविषयी आपल्याकडे भयानक आणि भयंकर असे समज-गैरसमज आहेत. हा शब्द भारतीयांनी इतका बदनाम करून ठेवला आहे की, तो आता जवळपास तुच्छतेनेच वापरला जातो. मुक्तिबोध ‘पॉलिटिक्स’ हा शब्द ‘रोल’ वा ‘भूमिका’ या अर्थाने हा शब्द वापरतात. म्हणजे, “पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?” याचा अर्थ, “मित्रा, तुझी नेमकी (राजकीय) भूमिका काय आहे?”
पण मग पॉलिटिक्स म्हणजे नेमकं काय? जॉर्ज ऑर्वेल हा ब्रिटिश लेखक म्हणतो, “राजकारण हा शब्द शक्य तितक्या उदारपणे घ्यावा. जगाला एका विशिष्ट हेतूनं ढकलणं, हाही राजकीय हेतूचा/धोरणाचाच भाग असतो.” थोडक्यात, राजकारण म्हणजे आपली जगाबद्दलची-जगण्याबद्दलची भूमिका काय आहे, हे ठरवणं.
म. गांधी यांनी ‘तत्त्वहीन राजकारण’, ‘नीतिमत्तारहित व्यापार’, ‘कष्टाविना संपत्ती’, ‘चारित्र्याविना शिक्षण’, ‘मानवतेविना विज्ञान’, ‘विवेकहीन सुखोपभोग’ आणि ‘त्यागरहित भक्ती’ अशी सात ‘सामाजिक पापकर्मे’ सांगितली आहेत. या पापकर्मांच्या विरोधात लढण्याचे काम, निदान पक्षी या पापकर्मांचा उच्छाद मांडणार नाही असा पक्ष वा नेता निवडून देणे, आपल्या लोकशाहीसाठी नितांत निकडीचे झाले आहे. आमचा मित्र व साधना साप्ताहिकाचा विद्यमान संपादक, विनोद सिरसाठ याने काही वर्षांपूर्वी मतदारांसाठी पंचशील तयार केलं होतं. ते असं -
प्रेम-द्वेष सिद्धान्ताचे बळी नसलेल्या व्यापक समाजहिताचा वापर करणाऱ्या आणि ‘प्रामाणिकपणा’ ही सर्वश्रेष्ठ व दीर्घकाळ टिकणारी रणनीती आहे असं समजणाऱ्या मतदारांसाठी ‘पंचशील’ सुचवता येईल. सभोवतालची राजकीय परिस्थिती सामान्य असेल तर मतदान करताना तीन निकष लावावेत.
१) निवडणुकीला उभ्या असणाऱ्यांपैकी जास्तीत जास्त चांगल्या उमेदवाराला मतदान करावं. तसा उमेदवार एकही नाही असं वाटत असेल तर कमीत कमी वाईट उमेदवाराला मतदान करावं. तो उमेदवार अपक्ष असला तरी आणि निवडून येण्याची शक्यता नसली तरी!
२) एखादा पक्ष चांगला आहे, पण उमेदवार भ्रष्टाचारी, अकार्यक्षम, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असा असेल तर त्या उमेदवाराला मतदान करू नये! त्या पक्षाला धडा शिकवला पाहिजे. ‘असले उमेदवार आमच्यावर लादू नका!’ हा संदेश देण्यासाठी अशा उमेदवाराला पराभूत केलं पाहिजे.
३) एखादा पक्ष वाईट आहे, पण त्या पक्षाचा उमेदवार चांगला आहे असं वाटत असेल तर त्याला मतदान केलं पाहिजे. मात्र तो उमेदवार त्या पक्षाच्या वाईट कृत्यांना अडथळे आणेल इतका बलवान असावा. त्या पक्षाचा चेहरामोहरा बदलण्यास तो थोडाफार हातभार लावील ही आशा!
राजकीय-सामाजिक परिस्थिती असामान्य असेल तर मात्र मतदान करताना वेगळे दोन निकष लावावेत.
१) मतदारसंघातच परिस्थिती असामान्य असेल तर म्हणजे एखादा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, पण त्याला पराभूत करणं अत्यावश्यक आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याला पराभूत करू शकणाऱ्या, तुल्यबळ लढत देऊ शकणाऱ्या उमेदवाराला (तो कोणत्याही पक्षाचा असला किंवा नसला तरी) मतदान करावं.
२) राज्यात-देशात असामान्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर, म्हणजे एखाद्या पक्षाला सत्येवरून हटवणं किंवा सत्येपासून रोखणं अत्यावश्यक असेल तर त्या पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करू शकणाऱ्या, इतर पक्षाच्या प्रबळ उमेदवारांना मतदान करावं.
अर्थात हे पंचशील राबवताना आपल्या मतदारसंघातील, राज्यातील, देशातील परिस्थिती सामान्य आहे की, असामान्य हे मात्र ज्यानं त्यानं ठरवावं!
या पंचशीलाचा वापर मतदान करताना केला तर आपल्याला अपेक्षित तो बदल येत्या काही वर्षांत नक्की घडू शकेल. निदान पक्षी आपल्याला जे राज्यात, देशात घडू नये असे वाटते त्याला काही प्रमाणात नक्कीच अटकाव करता येईल.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
jitendra sakpal
Wed , 22 February 2017
सेना -भाजप ची भाडंणे तूम्ही मिडीयावालेच दाखवत आहात ना त्याचा गाजावाजा तूम्हीच करत आहात . . . मनसेच्या विकासाच्या मुदयाला बगल देऊन .तूम्हा मिड़ीयाला पेशांची पाकीटे पोहोचलीत वाटत