मोदीजींनी झुंज दिली कडवी करोना व्हायरसशी म्हणून जिवंत आहोत आपण!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 15 April 2021
  • संकीर्ण व्यंगनामा कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus लॉकडाउन Lockdown नरेंद्र मोदी Narendra Modi

केशव : अरे काय गोंधळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये! लॉकडाउन म्हणे लॉकडाऊन!! सगळं सुरू ठेवलं आहे. भाजी मार्केट सुरू, किराणा सुरू, हॉटेलं सुरू, बस आणि रिक्षा सुरू. म्हणजे फक्त ऑफिसं आणि दुकानं बंद.

नंदू : अशानं काय होणार आहे? करोना पसरतच राहणार.

केशव : संकट केवढं आहे आणि तुम्ही करता काय आहात! जमत नसेल तर सगळे मोदीजींच्या हातात सोपवा आणि गप्प बसा.

माधव : माझे मामा भाभा रिसर्चमध्ये शात्रज्ञ आहेत. ते म्हणत होते की, सरकारला आरोग्य सुविधा वाढवायला वेळ मिळावा म्हणून लॉकडाऊन करतात. तो रोग संपवण्यासाठी नसतात. लॉकडाऊनने जगात कुठे करोना थांबला आहे? मोदीजींनी एवढा कडक लॉकडाऊन केला, कुठे थांबला करोना?

केशव : ए, मोदीजींनी केलेल्या कामाला बोलायचं काही कारण नाही. त्यांनी किती फॅन्टॅस्टिक लॉकडाऊन केला होता.

माधव : मी बोललो मामाला की, मोदीजींनी किती भारीतला लॉकडाऊन केला होता.

नंदू : पोलिसांनी किती लोकांना सडकून काढलं. (हुहुहु) आपल्या लोकांना असंच पाहिजे.

माधव : मामा म्हणाले जगातला सगळ्यात कडक लॉकडाऊन तुम्ही लावलात. मोठी मोठी भाषणे केलीत, थाळ्या वाजवल्यात, दिवे लावलेत. काही उपयोग झाला का? करोना वाढलाच ना?

नंदू : मोदीजींनी दिवे लावले ते लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी.

माधव : मोदीजींचा निळ्या कुडत्यामधला समईच्या प्रकाशातला फोटो किती सुंदर आला होता. मोदीजींच्या उंचीची समई होती. हाताची घडी घालून मोदीजी समईच्या ज्योतींकडे बघत आहेत, असा फोटो. तेजानं ज्योतीची आरती चालली आहे असं वाटत होतं.

नंदू : आणि ती आरतीसुद्धा भारतातले सगळे दिवे लावून झाले तरी सुरू होती. किती नयनरम्य चित्र होतं!

केशव : भारतमातेनंसुद्धा आनंदाने अश्रू पुसले असतील.

माधव : मी माझ्या रूममध्ये लावलं आहे ते चित्र.

नंदू : कसलं? भारतमाता अश्रू पुसते आहे ते?

माधव : नाही, मोदीजी समईकडे बघत आहे ते! माझे मामा माझ्या रूममध्ये आले होते, तेव्हा त्यांना दाखवले मी!

नंदू : एकदम गार झाले असतील नं?

माधव : म्हणाले, फोटोमुळे सगळं जग इम्प्रेस झालं, पण करोना काही इम्प्रेस झाला नाही. तो परत आला.

केशव : पाकिस्तानात राहायला जा म्हणावं तुझ्या मामाला.

माधव : ते म्हणाले की, मोदीजींच्या चेहऱ्यावरचं तेज बघून पळून जाईल करोना असं मलाही तेव्हा वाटलं होते, पण तो परत आला. आणि त्यानंतर हसले ते दुष्टपणे.

केशव : (माधवकडे दुर्लक्ष करत) तेव्हा केवढी उत्साहाची लाट आली होती, भारत देशात तो फोटो पाहून.

माधव : माझे एक आयएएस काका आहेत, आता रिटायर झाले आहेत. ते म्हणाले की, उत्साहाची लाट वगैरे ठीक आहे, पण करोनावर मात करणं जास्त महत्त्वाचं आहे. तेज, देशप्रेम, उत्साहाच्या लाटा, अंगावरचे रोमांच असल्या गोष्टींनी करोना जात नाही.

नंदू : तुझा काका देशद्रोही आहे.

केशव : काका देशद्रोही आणि मामा पाकिस्तानी. (हुहुहु!)

माधव : एकमेकांत खूप जमतं त्यांचं.

नंदू : जमणारच!

केशव : यांच्या फॅमिलीत तुझ्यासारखा देशभक्त निपजला म्हणजे आश्चर्यच आहे.

माधव : ते दोघेसुद्धा हेच म्हणतात. आमच्या फॅमिलीत तुझा जन्म झाला, हे एक आश्चर्यच आहे. आणि टाळीसुद्धा देतात एकमेकांना त्यावर.

नंदू : ते काहीही म्हटले तरी तू तुझं देशकार्य चालू ठेव.

माधव : मी तर चालू ठेवणारच आहे. मी त्यांना तोंडावर सांगितलं की, मोदीजींनी त्या वेळी कडक लॉकडाऊन लावला नसता तर देशात मृतांचा खच पडला असता.

केशव : बरं झालं सांगितलंस. तोंडं एवढीशी झाली असतील त्यांची.

माधव : ते म्हणाले की, जगात कित्येक ठिकाणी खूप सौम्य लॉकडाऊन लावले गेले, तिथं कुठं खच पडला? स्वीडनमध्ये तर लॉकडाऊन लावलाच गेला नाही, तिथं कुठं खच पडला?

केशव : त्यांना सांग, तुमचं ज्ञान तुमच्यापाशीच ठेवा. मोदीजींनी निर्णय घेतला म्हणजे तो बरोबरच असणार. इतर देशातलं आम्हाला माहीत नाही. इथं या देशात मोदीजींनी निर्णय घेतला नसता तर खच पडला असता म्हणजे पडला असता. त्यावर चर्चा नको आहे. आणि त्यांना ते सौम्य लॉकडाऊनवाले देश इतकेच आवडत असतील तर तिकडं राहायला जा म्हणावं.

नंदू : हे असं काही ऐकलं की, माझा इतका संताप संताप होतो नं! सगळ्या अंगाची थरथरच सुरू होते.

माधव : ए, पण कडक लॉकडाऊन लावला नाही तरी का नसेल रे खच पडला तिकडे?

केशव : तुला काय करायच्या आहेत शंभर चौकश्या? इकडे मोदीजींनी झुंज दिली कडवी करोना व्हायरसशी म्हणून जिवंत आहोत आपण!

नंदू : मला इतका राग येतो या लोकांचा. हे मोदीजींमुळे जिवंत आहेत आणि त्यांचीच चेष्टा करतायत?

केशव : नाना म्हणालेच होते, एकदा संस्कार शिबिरात - वृक्ष चंदनाचा असला की, त्याला साप विळखे घालून बसतातच.

माधव : काका म्हणत होते की, लॉकडाऊनमुळे रोग जाणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. लॉकडाऊनमुळे लागण थोडी कमी होते. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होतो. हे लक्षात घेतलं तर लॉकडाऊन थोडा सौम्य असावा असंच काही तज्ज्ञांचं मत पडलं आहे.

नंदू : देशद्रोही नंबर एक आहे तुझा काका.

माधव : ते म्हणाले, मोदीजींनी कडक लॉकडाऊन लावला, तेव्हा भारतात पाचशे रुग्ण होते. काल उत्तर प्रदेशमध्ये २० हजार रुग्ण होते. तिथं तर भाजपचंच सरकार आहे. तिथं का नाही लावत कडक लॉकडाऊन? तिथं सौम्य लॉकडाऊन का लावतायत? मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही कडक लॉकडाऊन नाहीत लावलेले त्यांनी. 

केशव : जास्त शहाणपण करू नका म्हणावं. तुम्ही आयएएस असलात तरी तुमच्या घरी.

माधव : मी म्हणालो की, तिथले मुख्यमंत्री एक योगी आहेत. त्यांच्याकडे काय करायला पाहिजे, काय करायला नको याचं ज्ञान आहे. शिवाय योगीजींना मोदीजींचा गायडन्स आहे. त्यावर काका म्हणाले की, मोदीजींनी कडक लॉकडाऊन लावला की, तो योग्य; योगीजींनी सौम्य लॉकडाऊन लावला की तोही योग्य. आणि जिथं जिथं विरोधी पक्षांची सरकारं आहेत, तिथं दोन्ही अयोग्य. असं कसं चालेल?

नंदू : त्यांना सांग की, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची गरज आहे. विषय संपला.

केशव : इथं सौम्य लॉकडाऊननी काही होणार नाही. त्यांना म्हणावं तुमचं वय झालं आहे, तुम्ही मेलात तरी तुम्हाला चालणार आहे, आम्हाला जगायचं आहे पुष्कळ. 

माधव : मी सांगितलं त्यांना तसं.

नंदू : मग काय म्हणाले ते?

माधव : ते परत तेच म्हणाले - मोदीजींनी कडक लॉकडाऊन लावला इतके दिवस तरी करोना परत का आला?

नंदू : त्यांना म्हणावं की, भारतातले लोक बेजबाबदार आहेत, त्याला मोदीजी काय करणार? एकटे मोदीजी तरी कुठे कुठे लढणार? 

माधव : मी म्हणालो तसं त्यांना. ते म्हणाले की, मोदींचा निर्णय उलटा गेला की, लोक जबाबदार, आणि विरोधकांचा निर्णय उलटा गेला की, मुख्यमंत्री जबाबदार का?

केशव : हो! हो म्हणून सांग त्या म्हाताऱ्याला! काय करायचं ते करून घे म्हणावं तू.

माधव : मामा म्हणाले कडक लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. आता अजून एका कडक लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला सहन नाही होणार. लोक चिडून उठतील. 

नंदू : त्यांना म्हणावं तुम्ही फक्त गप्प बसा. अर्थव्यवस्था बघायला मोदी समर्थ आहेत.

माधव : लोक चिडतील म्हणूनच आता काळजी घेऊन पावलं टाकावी लागणार आहेत, असे म्हणाले मामा.

केशव : तुझ्या मामाला म्हणावं पाकिस्तानात जाऊन बोलून दाखव तुझं ज्ञान.

माधव : मामा म्हणाले इतकंच आहे, तर मोदीजींनी परत एकदा टीव्हीवर यावे आणि देश कडक लॉकडाऊनमध्ये टाकावा. त्यांना कोणी अडवलं आहे? ते तसं करत नाहियेत, म्हणजेच कडक लॉकडाऊन लावण्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे.

नंदू : काय भयंकर पाकिस्तानी माणूस आहे हा!

माधव : वाटलं तर ती समईसुद्धा लावा परत असं म्हणाले.

केशव : लावतील ते परत समई, सांग त्यांना. घाबरतात काय मोदीजी त्याला? मोदीजी कशाला घाबरत नाहीत. ओज, तेज आणि पराक्रम यांनी रसरसलेला माणूस आहे तो!

माधव : यावर ते म्हणतील की, तसं असेल तर छान आहे. लावा परत एकदा कडक लॉकडाऊन. लावून दाखवा.

नंदू : दाखवतीलच ते. नक्कीच दाखवतील. तशी वेळ येऊ द्या.

माधव : तशी वेळ आली नाहीये तर आत्ता कडक लॉकडाऊन का हवा आहे तुम्हाला?

नंदू : (चिडून) ए, तू कधी कधी तुझ्या काकासारखाच बोलतोस बरं का! मी नानांनाच सांगणार आहे तुझं नाव एकदा.

(इतक्यात माधवच्या फोनवर मॅसेज नोटिफिकेशन येतं. तो फोन बघतो.)

माधव : मॅसेज आलाय काकांचा. अभिनंदन. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची शक्यता.

नंदू : बोंबला! यांना साधा सौम्य लॉकडाऊन लावणं जमत नाहीये आणि हे काय कडक लॉकडाऊन लावणार?

केशव : हाल होणार रे गरिबांचे! गरिबांना दर महिना दहा हजार रुपये द्या म्हणावं आणि मग लावा कडक लॉकडाऊन काय लावायचा आहे तो. कडक लॉकडाऊन लावायच्या काही पद्धती असतात.

माधव : तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहेत म्हणे सात कोटी लोकांना.

केशव : धान्यानं काय होणार आहे?

माधव : मोदीजींनीसुद्धा धान्यच दिलं होतं.

नंदू : ती गोष्ट वेगळी. त्यांना बरोबर माहीत असतं कधी काय करायचं ते. अवतार आहेत ते!

(माधवच्या फोनवर मॅसेज नोटिफिकेशन वाजते. तो मॅसेज वाचतो.)

माधव : काका म्हणत आहेत की, लोकांना हजारो किलोमीटर चालत जावं लागू नये म्हणून कडक लॉकडाऊन लागणार असेल तर तशी आधी सूचना दिली जाईल असं सरकार म्हणत आहे.

केशव : अरे, सूचना कसल्या देताय. दहा हजार रुपये द्या प्रत्येकी म्हणावं. कशाला गरिबांना घरी जायला लावताय?

माधव : ए, पण मोदीजींनी त्या वेळी का नसतील रे दिले दहा दहा हजार रुपये?

केशव : ए, तू गप्प बसायला शीक रे थोडा वेळ. त्यांनी दिले नाहीत म्हणजे काही तरी प्रॉब्लेम असणार.

माधव : आणि मोदीजींनी आधी सूचना दिली असती तर मजुरांना चालत जावं लागलं नसतं हजारो किलोमीटर. (हुहुहु)

(माधवच्या फोनवर मॅसेजचं नोटिफिकेशन.)

माधव : काकांचाच मॅसेज आहे. (वाचतो). माधव, तू एक समजून घे की, सरकारमध्ये अभ्यास करून निर्णय घेतले जातात. मोदीजी असोत वा अजून कुणी, प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्यासाठी समिती असते. त्या त्या विषयात आयुष्य घालवलेले तज्ज्ञ असतात. त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातात. समाज ही गोष्ट इतकी कॉम्प्लिकेटेड असते की, कुठलाही निर्णय शंभर टक्के चूक किंवा बरोबर असत नाही. शिवाय सरकारने काहीही केलं तरी विरोधक बोलणारच असतात. आपण त्या हुल्लडबाजीत का भाग घ्यायचा? या कसोटीच्या काळात आपण सरकारच्या मागं उभं राहायला नको का? आपलं जीवन त्यावर अवलंबून आहे. यावेळी कुणीही राजकारण करणं योग्य नाही.

केशव : (भयंकर हसतो) कुणी केलं होतं रे याला आयएएस? मोदीजींना सगळं येतं एवढंसुद्धा याला माहिती नाहीये. जगातल्या सगळ्या एक्सपर्ट लोकांना त्यांचा त्यांचा विषय शिकवू शकतात मोदीजी.

नंदू : हे असले लोक होते म्हणूनच भारताची प्रगती झाली नाही गेल्या ७० वर्षांत.

केशव : आपल्याला बावळट समजतो आहे हा माणूस. कमाल आहे. त्याला सांग मोदीजी काय चीज आहेत हे आम्हाला कळतं आहे. याचाच अर्थ आम्ही तुझ्यापेक्षा हुशार आहोत. तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही, यातच तुझी लायकी कळली आम्हाला.

माधव : ए, पण खरंच मोदीजींना सगळ्या विषयातलं कळत असेल का रे? (हुहुहु)

नंदू : मग काय? अरे, स्वतः नानासुद्धा तसंच म्हणाले होते आपल्या संस्कार शिबिरात. म्हणजे ते खरंच असणार नाही का?

माधव : हुहुहु!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......