अंफलोस्केप्सिस, व्हायाग्रा, अ‍ॅटलस, टायटन, नाभीदर्शन इत्यादी इत्यादी
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 14 April 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध अंफलोस्केप्सिस Omphaloskepsis व्हायाग्रा Viagra अ‍ॅटलस Atlas टायटन Titans बेंबी navel

शब्दांचे वेध : पुष्प बत्तिसावे

आज सकाळी सकाळी यिट्झॅक नावाच्या माझ्या एका अमेरिकन मित्राचा मला फोन आला. “काय करतोस रे?”, त्यानं विचारलं. “काही नाही बा, इथे वुइकएंड लॉकडाऊन आहे, त्यामुळे घरातच आहे”, माझं उत्तर. त्यावर तो म्हणाला, “अंफलोस्केप्सिस करायचा किती छान मौका मिळाला आहे तुला.” यावर मग आम्ही दोघंही खूप हसलो.

यिट्झॅकसारख्या तज्ज्ञ आणि माझ्यासारख्या हौशी अशा, वेगवेगळ्या देशांतल्या काही भाषाप्रेमींचा समावेश असलेला एक समूह आहे. त्यात माझी त्याची पहिल्यांदा ओळख झाली. तो माझ्याहून वयानं खूप मोठा आहे, पण माझ्याशी अगदी बरोबरीच्या नात्यानं वागतो. त्याला भारतीय आणि पौर्वात्य संस्कृती, परंपरा, कला, भाषा, साहित्य, इत्यादी गोष्टींची बरीच माहिती आहे आणि सतत नवीन काही जाणून घ्यायची जिज्ञासा असते. ‘अंफलोस्केप्सिस’ हा त्याच्या आवडीचा शब्द आहे. त्याच्याकडूनच मी तो पहिल्यांदा ऐकला होता. या शब्दाच्या अर्थावरून आणि व्युत्पत्तीवरून आमच्याच समूहात एकदा यिट्झॅक आणि त्याच्याहूनही म्हाताऱ्या असलेल्या टोनी नावाच्या एका माणसाची चांगली जुंपली होती. विषय साधा होता, पण त्याला फाटे फुटत गेले आणि ते दोघंही जिद्दीला पेटून खूप वेळ भांडत राहिले. दोघांनाही

आपलीच बाजू खरी वाटत होती. शेवटी यिट्झॅकलाच टोनीचं म्हणणं मान्य करावं लागलं. पण तेव्हापासून ‘अंफलोस्केप्सिस करणं’ म्हणजे विनाकारण भांडण करणं, वितंडवाद घालणं, असा खास अर्थ आमच्यासाठी तयार झाला. मुळात ‘अंफलोस्केप्सिस’चा अर्थ वेगळाच आहे.

तुम्हाला ‘Bee in the bonnet’ (बी इन द बॉनेट) हा इंग्रजी वाक्प्रचार माहीत असेलच. एखाद्या विचारानं किंवा कल्पनेनं झपाटून जाऊन सतत त्यावर विचार करणाऱ्या, त्याबद्दलच बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आणि आपली कल्पना किती उत्तम आहे, हे लोकांना पटवून देणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना ‘he/she has a bee in his/her bonnet’ असं म्हटलं जातं. दुराग्रही माणूस!

यिट्झॅक हा माझा भाषाविद मित्र काही बाबतीत असाच दुराग्रही आहे. त्याच्या बॉनेटमध्ये (म्हणजे डोक्यात) एक नाही, तर शेकडो मधमाश्या घुसलेल्या आहेत. एकाहून एक विचित्र पण ओरिजिनल असे भाषाशास्त्रविषयक तर्क, उपपत्ती, आणि सिद्धान्त तो वेगवेगळ्या माध्यमांतून सतत मांडत असतो. आणि आपलंच म्हणणं कसं खरं आहे, हे समोरच्याला हिरिरीनं पटवून देत असतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हा माझा मित्र ज्यू यहुदी आहे. इंग्रजी, हिब्रू, आणि यिडिश या तीन भाषांचा तज्ज्ञ आहे. त्याचा प्रॉब्लेम हा आहे की, तो त्याच्या या सगळ्या तर्कांचा (तर्कटांचा?) संबंध हिब्रू भाषेशी जोडतो. जगातल्या बहुतेक सर्व भाषांमधले बहुतेक सर्व शब्द हे हिब्रू भाषेतून निर्माण झाले आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत, असा त्याचा दुराग्रह असतो. आम्ही त्याला खूप टोकतो, cross करतो, हसतो, पण तो आपला हेका सोडत नाही. त्याचं लिखाण वाचताना मजा येते, ज्ञानात मौलिक भर पडते, पण त्याच्या अगदी सर्वच गोष्टी आम्ही गांभीर्यानं घेत नाही.

यिट्झॅकच्या आवडीचे तीन विषय आहेत. एक म्हणजे ‘Phono-semantic matching’ (PSM), दुसरा म्हणजे ‘Anthropomorphic Maps’, आणि तिसरा म्हणजे नवनवीन शब्दांचा अभ्यास आणि जुन्या शब्दांचा मागोवा. आजच्या लेखात यिट्झॅकला आवडणाऱ्या याच तीन विषयांवर थोडसं बोलू या.

यापैकी ‘Phono-semantic matching’ (PSM) ही संकल्पना समजायला सोपी तर आहेच, पण गंमतीची देखील आहे. ‘Phonosemantics’ (फोनोसेमॅंटिक्स) हा भाषाशास्त्रातला एक विषय आहे. ‘Journal of Psycholinguistic Research’ यात प्रसिद्ध झालेल्या एका व्याख्येनुसार ‘Phonosemantics is a school of thought which believes that each sound or phoneme carries a specific psychological impression allotted by nature. And these psychological impressions were used to evolve different languages’. मानवी मुखातून उच्चारल्या जाणाऱ्या प्रत्येक ध्वनीतून अथवा भाषेतील ध्वनिघटकातून (phoneme) त्याचं स्वतःचं असं एक निसर्गदत्त मानसशास्त्रीय वैशिष्ट्य प्रकट होत असतं आणि याच मानसशास्त्रीय वैशिष्ट्यांमधून जगातल्या विविध भाषा उत्पन्न झाल्या, असं मानणारी विचारधारा म्हणजे ‘फोनोसेमॅंटिक्स’.

‘Phono-semantic matching’ (PSM)मध्ये फोनो म्हणजे ध्वनीविषयक तर semantic म्हणजे शब्दार्थासंबंधीचं. Matching म्हणजे जुळणारं. एखाद्या शब्दाचा उच्चार आणि अर्थ यांचं नातं जुळणं म्हणजे PSM. एखाद्या परक्या भाषेतले शब्द जेव्हा आपल्या भाषेत आयात होतात आणि इथे ते रुळतात, तेव्हा कालांतरानं त्यांचं परकेपण नाहीसं होतं आणि आपण त्यांना आपलेच शब्द म्हणून आत्मसात करतो. एवढंच नव्हे तर त्यांचावर पुढे देशी मातीचा मुलामाही चढतो. यातले अनेक शब्द बोलीभाषेत सापडतात तर काही औपचारिक असतात. ही प्रक्रिया ‘PSM’ या नावानं ओळखली जाते.

या प्रक्रियेमध्ये एका भाषेतला शब्द दुसऱ्या भाषेत जाऊन तिथे त्यापासून एक नवा शब्द तयार होतो. त्याला ‘neologism’ असं म्हणतात. यात त्या मूळ शब्दाचं परकेपण नाहिसं होऊन त्याची जागा ध्वनी आणि अर्थ यांचं साधर्म्य असणाऱ्या स्थानिक शब्दानं किंवा धातूनं घेतली जाते. यातून त्या परक्या शब्दाचा अर्थ आणि सर्वसाधारण उच्चार जरी जवळपास तसाच कायम राहत असला तरी ऐकणाऱ्याच्या कानांना तो नवा शब्द आपला म्हणजे देशीच वाटतो.

ही संकल्पना इझ्रायलच्या Ghil'ad Zuckermann या भाषाशास्त्रज्ञानं प्रचारात आणली. ‘दुसऱ्या भाषेतून उसने घेतलेले शब्द’ (lexical borrowing किंवा loanwords) या प्रचलित संकल्पनेला धक्का देणारा हा विचार होता. त्याच्या मते ‘PSM’ हे सरळसाधं उधार-उसनवारीचं प्रकरण नसून यात एकाच वेळी छद्मरूपानं आयात आणि प्रतिस्थापन (camouflaged borrowing in the form of ‘simultaneous substitution and importation’) केलं जातं. यासाठी एकच नाही तर अनेक भाषिक स्रोत कारणीभूत असतात असं तो मानतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘Phono-semantic matching’ (PSM) ची अनेक उदाहरणं देता येतील. अनेक भाषांमध्ये हा शब्द-संकर घडतो. यातलं सगळ्यात रोचक आणि रंजक उदाहरण इंग्रजीतलं आहे. ‘व्हिआग्रा’ किंवा ‘व्हायाग्रा’ (Viagra) या औषधाचं नाव अनेकांना माहीत असतं. लैंगिक दौर्बल्य किंवा इंद्रियातली शिथिलता (तात्पुरती का होईना पण) घालवण्यासाठी जगभरातले बरेच पुरुष ‘फायझर’ (Pfizer) या कंपनीनं तयार केलेल्या या गोळ्या खातात. Viagra हे ब्रॅंड नेम Interbrand Wood या सल्लागार कंपनीतर्फे फायझरला सुचवण्यात आलं होतं. PSMमध्ये अभिप्रेत असलेल्या multisourced neologism या बाबींचा हा उत्तम नमुना आहे. संस्कृतमधला व्याघ्र आणि अमेरिकेतला प्रसिद्ध नायागारा (धबधबा) हे या नावाचे दोन स्रोत आहेत. वाघाचा जोम, ताकद, शक्ती आणि नायागाराचा मुक्त, अनिर्बंध, अमर्याद प्रवाह यांचं मिश्र स्वरूप म्हणजे Viagra. व्याघ्र + नायागारा या दोन शब्दांना एकत्र आणून त्यातून ‘व्हायाग्रा’ हा नवा शब्द तयार करण्यात आला. यातला ‘व्याघ्र’ हा परका शब्द आहे. त्याची या ठिकाणी छद्मरूपानं आयात आणि प्रतिस्थापना झाली. नंतर त्याचा ‘नायागारा’ या देशी (अमेरिकन) शब्दाशी संकर झाला आणि त्यातून ‘व्हायाग्रा’ हे ‘neologism’ तयार झालं. ही आहे PSMची किमया!

यिट्झॅकचा ‘Anthropomorphic Maps’ या विषयाचाही खूप अभ्यास आहे. मॅप म्हणजे नकाशा हे तर सगळेच जाणतात. नकाशांचं संकलन असलेल्या पुस्तकाला अ‌ॅटलस असं म्हणतात. नकाशे कसे काढावेत याचं एक शास्त्र आहे. त्याला कार्टोग्राफी असं शास्त्रीय नाव आहे. ‘Map’ हा शब्द सोळाव्या शतकाच्या प्रारंभी लॅटिन भाषेतून इंग्रजीत आला. लॅटिनमध्ये mappa म्हणजे sheet शीट (चादर) किंवा नॅपकीन. एका मोठ्या कागदावर काढलेल्या जगाच्या नकाशाला mappa mundi म्हणायचे (mundi = जगाचा). त्यावरून इंग्रजीत मॅप शब्द बनला. Cartography हा शब्द मात्र एकोणिसाव्या शतकात फ्रेंच भाषेतल्या cartographie पासून इंग्रजीत तयार झाला. फ्रेंचमध्ये carte म्हणजे नकाशा किंवा कार्ड. ग्राफी म्हणजे लिहिणं. Atlas हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे. तो सतराव्या शतकात पहिल्यांदा इंग्रजीत वापरला गेला.

प्राचीन ग्रीस देशात Titans या नावाचे देव होते, असं तिथली पुराणं सांगतात. या देवांपैकी एक देव होता अ‌ॅटलस. कालांतरानं या टायटन देवांचं Olympian जातीच्या देवांशी युद्ध झालं आणि त्यात ते हरले. ऑलिंपियन देवांचा प्रमुख होता ‘झ्युस’ (Zeus). त्याची या अ‌ॅटलसवर फारच खुन्नस असली पाहिजे. कारण त्यानं मग अ‌ॅटलसला शाप देऊन त्याच्या खांद्यावर स्वर्गाचा भार दिला. कायमचा. जोवर स्वर्ग आहे तोवर तो अ‌ॅटलसच्या खांद्यांवर टेकलेला असेल असा हा शाप होता. हीच कल्पना पुढे चालवत आधुनिक काळात जगाचे प्रारंभिक नकाशे ज्यांनी तयार केले त्यांनी या नकाशांमध्ये खांद्यावर सृष्टीचा भार घेतलेल्या अ‌ॅटलसचं चित्र काढायला सुरुवात केली. त्यातूनच नंतर नकाशांच्या किंवा चार्टस‌्च्या संकलनाला ‘अ‌ॅटलस’ असं नाव देण्यात आलं. सोळाव्या शतकातला भूगोलशास्त्रज्ञ मर‌्केटर (Mercator) याला याचं श्रेय दिलं जातं.

आजच्या अ‌ॅटलसमधले नकाशे हे फक्त जगातल्या देशांचेच असतात असं नाही. पृथ्वी या आपल्या ग्रहावरील भौगोलिक, प्राकृतिक, आणि राजकीय परिस्थिती दाखवणारे नकाशे तर त्यात असतातच, पण आपलं सौरमंडल दाखवणारे, जगाची लोकसंख्या दाखवणारे, जलसाठा दाखवणारे, वनसृष्टी दाखवणारे नकाशेही त्यात असतात. उत्तर अफ्रिका खंडातल्या एका पर्वतराजीला ‘अ‌ॅटलस’ असं नाव आहे. या पर्वतानं पृथ्वीचा भार सांभाळला आहे, अशी एके काळी समजूत होती. प्राचीन ग्रीकांचे ऑलिंपियन देव हे तिथल्या Mount Olympusवर राहत असत. (आज अमेरिका देशातल्या वायव्येकडे असणाऱ्या एका पर्वताला हे नाव देण्यात आलं आहे.) ‘टायटन’ आणि ‘ऑलिंपिक’ हे इंग्रजीतले शब्द याच जुन्या ग्रीक शब्दांपासून तयार झालेले आहेत. ‘टायटन’ म्हणजे अती भव्य. ‘टायटॅनिक’ या प्रचंड जहाजाचं नाव यावरूनच ठेवण्यात आलं होतं. अ‌ॅटलसप्रमाणेच आपल्या पुराणांमध्येही भगवान विष्णूंनी वराह अवतारात पृथ्वीचा भार सांभाळला होता, असं वर्णन सापडतं.

नकाशांचा आणखी एक प्रकार आहे. त्याला ‘Anthropomorphic Maps’ असं नाव आहे. अँथ्रपमॉर्फिक म्हणजे अशी अ-मानवी गोष्ट की जिला मानवी रूप आहे किंवा जिच्यात मानवी गुणदोष आहेत, अशी कल्पना केली जाते. पूर्वी फक्त प्राण्यांविषयी हे विशेषण वापरायचे, पण नंतर मानवी शरीराच्या आकाराच्या नकाशांनाही अँथ्रपमॉर्फिक म्हणू लागले.

यातला ‘anthrōp’ हा शब्द ग्रीक आहे, आणि त्याचा अर्थ मानव. यातूनच ‘anthropology’ मानववंशशास्त्र हे शास्त्र तयार झाले. Morphic म्हणजे सदृश. जे मानवसदृश आहे ते अँथ्रपमॉर्फिक. कोणताही नकाशा हा आपल्याला जे दिसतं, भासतं, त्याचं दृष्य चित्रण असतं. Anthropomorphic Mapsमध्ये आपल्या जगाला (किंवा त्यातल्या काही भागांना) मानवी शरीराचं रूप देऊन त्यानुसार ते कसं दिसतं याचं काल्पनिक दृश्य चित्रण केलं असतं. शरीराच्या विविध अवयवांची नावं जगातल्या देशांना देऊन त्यांचं मानवीकरण केलं जातं. असे शेकडो नवे-जुने नकाशे उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करणं हा आमच्या यिट्झॅकचा छंद आहे. या विषयाबद्दल अधिक माहिती https://www.geographyrealm.com/maps-people-anthropomorphic-maps/ इथे वाचता येईल.

यिट्झॅकच्या अनेक लाडक्या तर्कटांपैकी एक तर्क असा आहे की, आजचा नेपाळ हा देश साऱ्या जगाचं नाभीस्थान आहे. नाभी म्हणजे बेंबी. आणि हे पटवण्यासाठी तो Anthropomorphic Mapsचा आधार घेतो. नेपाळ - नापी - नाभी असा प्रवास तो करतो. ही उपपत्ती ज्यांना पटत नाही, ते युरोपमधल्या काही देशांना जगाची नाभी मानतात. काय खरं काय खोटं, हे तेच जाणोत! आम्ही मात्र जेव्हा जेव्हा असे वाद रंगतात तेव्हा यिट्झॅकच्याच सांगण्यावरून अंफलोस्केप्सिस करत बसतो.

हा शब्द आजकाल फारसा कोणाला ठाऊक नाही. अनेक शब्दकोशांत तर तो सापडतही नाही. नवनवीन शब्दांचा अभ्यास आणि जुन्या शब्दांचा मागोवा घेणं हा यिट्झॅकचा तिसरा शौक आहे. ‘अंफलोस्केप्सिस’ (omphaloskepsis) हा अप्रचलित शब्द त्यानंच आम्हाला शिकवला.

‘अंफलोस्केप्सिस’ म्हणजे नाभीवर लक्ष केंद्रित करून ध्यानधारणा करणं. यालाच ‘Navel-gazing’ असंही म्हणतात. स्वतःच्या बेंबीकडे बघत बघत मेडिटेशन करणं. ध्यानधारणेचा हा एक मार्ग आहे अशी हिंदूंच्या योगशास्त्राची तसंच ख्रिस्ती ग्रीक लोकांच्या Eastern Orthodox Churchची मान्यता आहे. योगशास्त्रात नाभीत स्थित असलेल्या मणिपूर चक्राचं फार महत्त्व आहे. ग्रीस देशातल्या Mount Athos वर ध्यान करत बसणाऱ्या काही ख्रिस्ती साधूंनादेखील नाभीच्या दर्शनातून दैवी आनंदाचा प्रत्यय येतो, असं म्हणतात. प्राचीन ग्रीक भाषेतल्या ὀμφᾰλός (omphalós, 'navel' नाभी) आणि σκέψῐς (sképsis, 'viewing, examination, speculation' ध्यान करणं) या दोन शब्दांपासून ‘omphaloskepsis’ हा शब्द तयार झाला आहे.

आजकाल मात्र या शब्दाला इंग्रजीत विनोदानंही वापरलं जातं. स्वतःतच मश्गुल राहणं (self-absorbed pursuits) या नकारात्मक अर्थानं तो कधीकधी वापरला जातो.

मी तरी अजून हा अनुभव घेतलेला नाही. पण यिट्झॅक रोज omphaloskepsis करतो, असा त्याचा दावा आहे. त्याचा पडताळा घेण्यासाठी मला त्याची अमेरिकेत जाऊन भेट घ्यावी लागेल. पण तोवर या विषयाचा मी अधिक अभ्यास करेन असं म्हणतो.

इंग्रजीत बेंबीला ‘navel’ असं म्हणतात. अगदी याच उच्चाराचा दुसराही एक  इंग्रजी शब्द आहे. पण त्याचं स्पेलिंग आहे ‘naval’. नौदलाशी संबंधित व्यवहारांना ‘naval’ असं म्हणतात. २०१० साली ऑस्ट्रेलियन सरकारानं एक माहितीपत्रक काढलं होतं. त्याचं शीर्षक होतं, ‘AUSTRALIAN GOVERNMENT SUPPORTS COMPLETION OF MEMORIAL FOR AUSTRALIA’S GREATEST NAVEL TRAGEDY’.

त्यांना ‘NAVAL’ म्हणायचं होतं.  पण त्या संपूर्ण माहितीपत्रकात त्यांनी ‘NAVEL’ असाच शब्द वापरला होता. आमच्या समुहात या सरकारी मुद्रणदोषावर खूप चर्चा झाली, त्यांची टर उडवली गेली. आमचे ऑस्ट्रेलियन मित्र बिचारे अगदी ओशाळवाणे झाले होते. एका वात्रट इंग्रजानं सुचवलं की, ‘Give the author 50 lines. I must learn to spell NAVAL.’ ज्यानं हे लिहिलं त्या अधिकाऱ्याला पन्नास वेळा  ‘ ‘NAVAL’ या शब्दाचं स्पेलिंग मी नीट पाठ करायला हवं’ असं लिहायला सांगा. मी जास्त वात्रट असल्यानं असं सुचवलं की, In the alternative, he should be sentenced to spend the rest of his life in a naval quarter guard, doing ‘Omphaloskepsis’. त्याला जन्मभर नौदलाच्या तुरुंगात टाकून आपल्या बेंबीवर लक्ष देऊन अंफलोस्केप्सिस करायची शिक्षा द्या.

माझी ही सूचना अंमलात आणली गेली की नाही, हे मात्र मला ठाऊक नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एका वात्रटिकेनं या लेखाचा शेवट करतो. कवी कोण आहे कोण जाणे. पण आपल्या शशी थरूर यांच्याकडे त्यानं क्लिष्ट इंग्रजीचे धडे घेतले असावेत, असा माझा अंदाज आहे.

What you hold in your hands may be quisquilious (तुच्छ वस्तू) - even  rebarbative (आक्षेपार्ह, कुरूप); However, I believe you may be one of the few who appreciate the jocoserious (अर्ध विनोदी, अर्ध गंभीर) omphaloskepsis (स्वसंतुष्टता) of it.

माझ्या लेखनाचंच जणू हे वर्णन आहे. असो!

जाता जाता - Ayn Rand लिखित ‘Atlas Shrugged’ या कादंबरीचे लाखो भारतीय दिवाणे आहेत. To Shrug म्हणजे खांदे उडवणं, ओझं झटकून देणं. स्वकेंद्रित जीवनमूल्यांची भलावण करणाऱ्या या प्रदीर्घ कादंबरीच्या शीर्षकातूनच लेखिकेची भूमिका स्पष्ट होते. पृथ्वीचा भार खांद्यांवर घेऊन अनंतकाळासाठी उभ्या असलेल्या अ‌ॅटलसनं ‘श्रग’' का केलं, याची कल्पना हे पुस्तक वाचणाऱ्या किती लोकांना प्रथमदर्शनीच येते, हा माझ्यासाठी एक कुतुहलाचा विषय आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......