अजूनकाही
‘मॅडम एवढ्या देशप्रेमी आहेत तर त्यांनी सांगावे की, दोन भारतीय मच्छीमारांची हत्या करणारे इटालियन मरिन्स कोणत्या तुरुंगात आहेत’, असे आव्हान देत नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींवर हल्ला केला होता. ते मोदी आता पंतप्रधान आहेत. ते मरिन्स त्यांच्या मायदेशात आहेत. इटालियन मरिन्सनी मायदेशात राहण्यास आमची काहीच हरकत नाही असे मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. आणि आता तर या प्रकरणी नुकसान भरपाई घेऊन मामला रफादफा करावा अशी सरकारची भूमिका आहे. यालाच न्याय म्हणतात की काय कोण जाणे. एक मात्र खरे, की या प्रकरणाने मोदींच्या ‘मैं देश नही झुकने दूंगा’ या प्रतिमेला त्या प्रचारकाळात चांगलीच झळाळी आणली होती…
सर्वोच्च न्यायालयात ९ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यानिमित्ताने…
..................................................................................................................................................................
उत्तम प्रोपगंडाकार आणि कुशल सेनापती यांच्यात एक लक्षणीय साम्य असते. दोघेही समोर ठाकलेल्या प्रत्येक परिस्थितीचा, हरेक घटना-घडामोडीचा योग्य प्रकारे वापर करून आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करीत असतात. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत याची दोन उत्तम उदाहरणे दिसतात. पहिले - ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाचे. आणि दुसरे - इटालियन्स मरिन्स प्रकरणी मोदींनी केलेल्या गदारोळाचे.
त्या लोकसभा निवडणूकपूर्व काळात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांची संभावना ‘मौत के सौदागर’ अशा शब्दांत केली होती. हे प्रोपगंडातील राक्षसीकरणाचे - डेमनायझेशनचे - तंत्र. विरोधकांच्या प्रतिमाहननाकरताच नव्हे, तर त्यांच्याविषयी लोकमानसात भयभावना वा घृणा निर्माण करण्यासाठी ते सर्रास वापरले जाते. असाच प्रकार ऐन निवडणूक काळातही दिसला. १७ जानेवारी २०१४ रोजी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी एक विधान केले - ‘या एकविसाव्या शतकात तरी मोदी पंतप्रधान बनू शकणार नाहीत. मात्र त्यांना चहा विकायची इच्छा असेल, तर आम्ही त्यांना येथे जागा देऊ.’ नरेंद्र मोदी हे बालपणी कसे गरीब होते, ते रेल्वे स्थानकावर कसे चहा विकत असत वगैरे कथा सांगून त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींचे प्रोपगंडाकार करत होते. शाहजादे विरुद्ध सामान्यजन असे द्वंद्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. या प्रतिमेतून ते मोदींभोवती ‘हॅलो बायस’ निर्माण करत होते. गरिबीचे चटके सोसलेली व्यक्ती ही गरिबांबाबत कळवळा बाळगणारीच असणार असा भ्रम असतो अनेकांचा. त्याचा वापर येथे करून घेण्यात येत होता. त्याच वेळी मोदींविरोधात राहुल गांधी यांना ‘प्रोजेक्ट’ करून हा सामना कसा असमान आहे हेही दाखवण्याचा तो एक प्रयत्न होता. मोदींची चहाविक्रेता ही प्रतिमा लोकांना भावत होती. काँग्रेसला ते अडचणीचे ठरू लागले होते. त्याचे प्रतिमाहनन करण्यासाठी काँग्रेसचे नेते त्याची खिल्ली उडवू लागले होते. त्यांना हे समजलेच नाही, की एखाद्याच्या गरीबीची टिंगल टवाळी भारतीय मानसाला आवडत नाही. कोट्यवधी गरिबांच्या देशात हे असे प्रकार अंगावर उलटतात. तेच घडले. प्रशांत किशोर हे मोदींचे प्रोपगंडाकार. अय्यर यांनी उडवलेल्या खिल्लीतून त्यांना उत्तमच कार्यक्रम मिळाला. त्यांनी ‘चाय पे चर्चा’ सुरु केली. तिचे यश वेगळे सांगावयास नको. आपला नेता नुसता भाषण करून जात नाही, तर आपले म्हणणे ऐकतो, ही भावना या ‘चाय पे चर्चा’ने निर्माण केली. या कार्यक्रमात हजारो लोकांनी सहभाग घेतला खरा, पण तो पोचला ४५ लाख लोकांपर्यंत. अय्यर यांनी आपल्या वाचाळतेने मोदींच्या प्रोपगंडाकारांना सुंदर संधी दिली मोदींच्या प्रतिमासंवर्धनाची. असेच घडले इटालियन मरीन्स प्रकरणातून.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
तो काळ पाहा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आक्रमक अतिराष्ट्रवादाचे मूर्तीमंत रूप म्हणून मोदी यांना पुढे आणण्यात आले होते. मनमोहनसिंग हे तत्कालिन पंतप्रधान. ते सौम्य प्रवृत्तीचे. विद्वान अर्थतज्ज्ञ ते. अमेरिका-भारत अणुकराराच्या वेळी त्यांचा पोलादी पाठकणा देशाने पाहिलेला होता. पण आता त्यांची प्रतिमा सोनिया गांधींचे कळसुत्री बाहुले अशी करण्यात आली होती. पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मनोहनसिंग यांच्यावर टीका करताना ते सतत एखाद्या खेडवळ बाईप्रमाणे अमेरिकेकडे तक्रार करायला जातात, असे उद्गार काढल्याच्या बातम्या ऑक्टोबर २०१३मध्ये प्रसिद्ध झाल्या. शरीफ यांचे म्हणणे असे की ते असे काही म्हणालेच नाहीत. पण म्हणाले असतील, तरी ती त्यांनी दिलेली उपमा होती. मोदींनी एकदा दंगलबळींबाबत बोलताना गाडीखाली येणाऱ्या कुत्र्याची उपमा वापरली होती, तसाच हा प्रकार. पण मोदींच्या भाषण-लेखकांनी या ‘देहाती औरत’ शब्दाचा वापर करून, एकीकडे आम्ही भारताच्या पंतप्रधानांचा असा अपमान सहन करणार नाही, असे म्हणताना पुन्हा मनमोहनसिंग हे किती दुबळे आहेत, याचाच प्रचार केला. मनमोहनसिंग हे वृद्ध, प्रकृतीने दुबळे. आपल्या हिरोच्या प्रतिमेत न बसणारे. राहुल गांधी यांनी सरकारी वटहुकूम फाडला त्यातून या पंतप्रधानांची हतबलताच दिसली, असा प्रचार करण्यात येतच होता आणि सामान्य जनतेला ती आपल्या मनातलीच भावना वाटत होती. या अशा ‘दुबळ्या’ पंतप्रधानांच्या समोर ‘पोलादी पुरुष’ अशी मोदींची प्रतिमा उभी करण्यात आली होती. ती लोकांना खरी वाटत होती. या पंतप्रधानांनी देशाची किंमत कमी केली, ती आता मोदी वाढवतील असा भाजपचा प्रोपगंडा होता. २५ मार्च २०१४ रोजी प्रकाशित करण्यात आलेले ‘सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा…’ हे गीत हा याच प्रोपगंडाचा भाग. त्या दिवशी रात्री ९.१९ वाजता ट्विट करून नरेंद्र मोदी यांनी स्वतः या गाण्याची माहिती दिली.
यानंतर पाचच दिवसांनी, ३१ मार्च २०१४ रोजी अरुणाचल प्रदेशातील एका प्रचारसभेतून मोदींनी सवाल केला. एका दगडात दोन पक्षी मारणारा तो सवाल. एकीकडे त्यातून त्यांचे ‘देश नहीं झुकने दूंगा’ हे वचन अधोरेखित होत होते आणि त्याच वेळी तो सोनिया गांधी यांच्यावर हल्ला करणारा होता. मोदी विचारत होते इटालियन मरिन्स प्रकरणाबाबत. ‘कोण आहे ते लोक ज्यांनी इटालीयन मारेकऱ्यांना इटलीला जाण्यासाठी सुरक्षित रस्ता दिला? कुणाच्या निर्देशांनुसार त्यांना इटालीला जाऊ देण्यात आले? इटलीहून परत येण्यापासून त्यांना कोणती शक्ती रोखत आहे?’ त्याच संध्याकाळी ६.५९ वाजता मोदींनी ट्विट केले. ‘इटालियन मरिन्सने क्रूरपणे आपल्या मच्छीमारांची हत्या केली. मॅडम एवढ्या देशभक्त आहेत, तर मग त्या सांगू शकतील का, की त्या मरिन्सना कोणत्या तुरूंगात ठेवण्यात आले आहे?’
सोनिया गांधी मूळच्या इटालियन. भाजपने या पूर्वी त्यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावर मोठे रान उठवले होते. त्यांचे मूळ विदेशी, त्यामुळे त्या राष्ट्रनिष्ठ असू शकत नाहीत. त्यांच्या हातात देशाची सूत्रे गेली तर ते घातक ठरेल, असा अतिराष्ट्रवादी विचार भाजपचा. इटालियन मरिन्सचे प्रकरण जणू त्याला दुजोरा देणारेच. सोनिया गांधी यांनीच आपल्या मातृभूमीच्या निष्ठेस जागत त्या मरिन्सची सुटका केली असा मोदींच्या त्या ट्विटचा भावार्थ होता. किंबहुना त्यासाठीच त्यांच्या प्रोपगंडाकारांनी हे प्रकरण उकरून काढले होते. पुढच्या काही निवडणूक प्रचारसभांतून मोदींनी ते लावून धरले होते. कासारगोडमधील प्रचारसभेत त्यांनी वचन दिले देशाला, ‘मी त्या मच्छीमारांच्या हक्कांबाबत बोलत आहे. त्या केरळमधील मच्छीमारांसाठी मी लढणार आहे.’
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मच्छीमारांच्या हत्येची ती घटना होती दोन वर्षांपूर्वीची. १५ फेब्रुवारी २०१२मध्ये केरळनजीक समुद्रात एका मालवाहू जहाजावरील संरक्षक मरिन्सनी समुद्री चाचे समजून त्या दोन मच्छीमारांना अटक केली होती. भारतीय सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी ते जहाज रोखून त्यांना पकडले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. पुढे वर्षभरानंतर त्या दोन मरिन्सनी मायदेशातील निवडणुकीत मतदानासाठी जावू देण्यात यावे, अशी याचिका केली सर्वोच्च न्यायालयात. न्यायालयाने त्यांना तशी परवानगी दिली. मात्र त्यासाठी इटलीचे भारतातील राजदूत डॅनिएल मॅन्सिनी यांची वैयक्तिक हमी घेण्यात आली. मतदान झाले की, त्यांनी भारतात परतावे असे ठरले होते. पण झाले असे, की ते परतणार नाहीत, अशी भूमिका इटलीने घेतली. त्यावर मग भारतानेही अशी भूमिका घेतली की, ते जोवर परतत नाहीत, तोवर इटलीच्या राजदूतांना देश सोडून जाता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वैयक्तिक हमी दिली होती, त्यामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांना असलेल्या संरक्षणाचा लाभ त्यांना घेता येणार नाही. मोठा राजनैतिक पेच निर्माण झाला त्यातून. अखेर त्या वर्षीच्या मार्चमध्ये ते परतले. पुढे न्यायालय आणि राजनैतिक वाटाघाटी या पातळ्यांवर ते प्रकरण लोंबकळत राहिले. मोदींच्या प्रोपगंडाकारांनी नेमका याचाच लाभ उठवला. याचा परिणाम लोकमानसावर होतच होता. हा प्रोपगंडा समाजमाध्यमांतून विविध पातळ्यांवरून पसरत गेला. त्याचा भाजपला इष्टसा परिणाम होत गेला…
त्या निवडणुकीला, भाजपच्या त्या प्रोपगंडाला आता सहा वर्षे झाली आहेत. नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत आणि ज्या मच्छीमारांची लढाई ते लढणार होते, त्यांचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकरणात कशा प्रकारे न्याय व्हावा, असे मोदीच त्यांच्या ट्विटमधून अप्रत्यक्षरीत्या सांगत होते. ते मरिन्स कोणत्या तुरुंगात आहेत हे मॅडमने सांगावे, या त्यांच्या आव्हानाचा भावार्थ त्या मारेकऱ्यांनी तुरुंगातच असायला हवे असा होतो. पण मग ते आहेत का कारावासात? तर नाहीत. १३ सप्टेंबर २०१४ रोजी त्यातील एक मरिन इटलीला परतला. त्या मरिनच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला विचारले होते की तुमची काही हरकत आहे का? सुषमा स्वराज तेव्हा परराष्ट्रमंत्री होत्या. त्यांनी सांगितले, ‘मानवतावादी भूमिकेतून आमचा त्यास विरोध नाही.’ तो गेला. २८ मे २०१६ रोजी दुसऱ्यालाही मानवतावादी भूमिकेतून मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली. या खटल्यात इटली आणि भारतात वाद होता खटल्याच्या हद्दीचा. तो सुटत नाही तोवर हे - मोदींच्या शब्दांत सांगायचे तर - इटालियन मारेकरी तिकडेच राहिले तरी भारत सरकारची काहीही हरकत नाही, असे तत्कालिन अतिरिक्त महाधिवक्ता पी. एस. नरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आणि आता परवाच्या ९ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात त्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही रामसुब्रमणियन यांच्या पीठासमोर भारताचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले की, इटलीच्या सरकारने या प्रकरणी नुकसान भरपाई देण्यास संमती दर्शविलेली आहे. ती रक्कम जमा झाली की आठवड्याच्या आत हा खटला बंद करावा.
मोदींची लढाई संपली. आश्वासने हवेत विरली. पण ती तशी विरणारच होती. प्रोपगंडा हा नेहमीच असत्य, अर्धसत्य, अपमाहिती यांवर आधारलेला असतो. तथ्यांची, वस्तुस्थितीची, सत्याची मोडतोड करून लोकांसमोर एक चित्र उभे करण्यात आलेले असते. लोक भुलतात त्याला. कालांतराने सारेच विसरले जाते. तोवर प्रोपगंडाकारांचे साध्य मात्र साधून गेलेले असते.
..................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment