अजूनकाही
पूजा मुधाने ही महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातील अवघ्या १९ वर्षांची एक अल्लड युवती... पण तिसरीत असतानाच तिला समाजातील भीषण जात-वास्तवाचे चटके बसले. त्यामुळे तिच्या कोवळ्या मनावर उमटलेले ओरखडे आज इतक्या वर्षांनंतरही कायमच आहेत.
तिसरीत असताना शाळेतल्या परीक्षेत ती पहिली आली आणि तिचा आनंद गगनात मावेना. साहजिकच आपलं प्रगतिपुस्तक घेऊन मित्र-मैत्रिणींमध्ये मिरवावं, असं तिला वाटू लागलं. पण तिच्या वडलांनी तिला तो आनंद मिळू दिला नाही. त्यांचं म्हणणं होतं - आपण ‘महार’ आहोत आणि आपल्या जातीचा तसा स्पष्ट उल्लेख प्रगतिपुस्तकात आहे आणि त्यामुळेच ते इतरांना दाखवायचं कारण नाही. ‘आपण आपली जात का लपवायची?’ असा त्या अजाणत्या वयातील पूजाचा प्रश्न होता. जातव्यवस्थेचं गुंतागुंतीचं वास्तव त्या वयात तिला कळणं शक्यच नव्हतं... पण ते वास्तव त्या वयातही तिच्या मनावर एक ओरखडा उमटवून गेलंच...
‘आपण खालच्या जातीचे आहोत.. आणि त्याचं प्रदर्शन घडवता कामा नये; उलट ही बाब लपवूनच ठेवायला हवी... हीच गोष्ट त्यामुळे माझ्या मनावर बिंबवली गेली. मात्र आता मी त्या साऱ्यातून बाहेर पडलीय आणि कुणाला आपली जात लपवून ठेवावंसं वाटत असेल, तर ती अत्यंत लाजीरवाणी बाब आहे,’ हे पूजा आता अगदी ठामपणे सांगते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८५ वर्षांपूर्वी जातनिर्मूलनासाठी दाखवलेल्या मार्गावरून जाण्याचा ती प्रयत्न करतेय.
पूजा चौथीत असतानाच तिच्या वडलांनी आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून दुसऱ्याच एका बाईशी लग्न केलं. पूजाची आई जया मुधाने ही मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजातील, तर तिचे वडील पंजाबराव हे दलित. त्यामुळे जयाच्या माहेरच्यांचा या आंतरजातीय विवाहास कडवा विरोध होता. त्यामुळेच पंजाबरावांनी घर सोडल्यानंतरही तिला माहेराकडून कसलीही मदत मिळाली नाही.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अशातच एका अपघातात पूजाच्या आईचा पाय बराच दुखावला गेला आणि त्या परिस्थितीतही तिच्यावर तिघा मुलांना वाढवण्याची जबाबदारी येऊन पडली. तिनं मासे विकायला सुरुवात केली; पण त्यातून काहीच भागत नव्हतं. एका क्षणी तर पूजा शाळा सोडून द्यायचाच विचार करू लागली होती. पण तेव्हाच पूजाच्या आईला ‘बाग शाळां’ची माहिती समजली. पैशांअभावी शिक्षणास मुकावं लागलेल्या मुलांसाठीच या ‘बागशाळा’ वस्ती आणि वाड्यांवर चालवल्या जायच्या. ‘मैत्रकुल’ या तरुणांनीच उभारलेल्या एका संस्थेमार्फत त्या चालवल्या जातात. गरीब मुलामुलींसाठी ‘मैत्रकुल’ हे एक घरच बनून गेलं आहे. ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यांतील गावांत आणि झोपडपट्ट्यांमध्ये चालणाऱ्या ‘बाग शाळां’च्या एका वर्गात पूजानं प्रवेश घेतला आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं.
या नव्या शाळेनं पूजाला आत्मविश्वास दिला आणि आलेलं हे नवं भान सोबत घेऊन ती नव्या जोमानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. ती आता एक हुशार मुलगी म्हणून ओळखली जाऊ लागली होती. त्याच वेळी शाळेत जाण्यापूर्वी आणि आल्यावरही ती आईला घरकामात मदत करत होती... मात्र, तरीही खर्चाची दोन्ही तोंडं कधीच मिटत नसत. त्यामुळे अखेरीस तिच्या मोठ्या बहिणीनं घरात लक्ष घालता यावं म्हणून शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. सुदैवानं या घरच्या कटकटींपासून ‘बागशाळे’नेच पूजाला वाचवलं होतं.
रोजी-रोटीसाठी दोन पैसे कमवण्याच्या आणि घर चालवण्याच्या कामाला आई आणि मोठी बहीण यांनी वाहून घेतलं होतं, तरी पूजाही माशांची ने-आण करण्याच्या कामात त्या दोघींना मदत करत असे. आईला दगदग झेपत नसल्यामुळे पूजा पहाटे चार वाजता उठून विरारच्या घाऊक बाजारातून आईला मच्छी आणून देत असे आणि नंतर आपलं कॉलेज गाठत असे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मात्र, तिचा भाऊ मात्र काही म्हणजे काहीच करत नसे. त्यामुळेच ‘मैत्रकुला’त प्रवेश घेण्याचा निर्णय घेताना ‘आपण या घरच्या कटकटींध्ये गुंतून पडायचं की पुढच्या प्रगतीसाठी बाहेर पडायचं?’ या प्रश्नानं तिच्या मनात घर केलं होतं. पण तेव्हाच पूजाला शिकायची किती तीव्र इच्छा आहे, ते तिच्या आईच्याच लक्षात आलं आणि मग ‘मैत्रकुल’मध्ये प्रवेश घ्यायचा हे ठरूनच गेलं. पुढे ‘मैत्रकुल’च्या कल्याण येथील वसतिगृहात राहावयाला गेल्यानंतर तिनं २०१८मध्ये कल्याणच्या अगरवाल महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं.
आता पूजा सांगते- ‘‘आपली स्वप्नं कशी पुरी करायची, ते मैत्रकुल आपल्याला सांगतं. तिथले मार्गदर्शक केवळ पुस्तकी शिक्षणात गुंतून पडत नाहीत, तर ते आपल्यातील प्रयोगशीलतेला मुक्त वाव देतात आणि त्यातूनच आपण शिकत जातो... आमच्या 'भोवतालचं जग हेच आमचं खरं विद्यापीठ आहे आणि तिथल्या संस्कृतीनंच आम्हाला शिस्त म्हणजे काय तेही शिकवलं आहे... आज आपल्या समाजव्यवस्थेत मुलींनी स्वयंपाक करायला शिकायचं असतं तर मुलांनी अभ्यास झाला की फक्त खेळायचं असतं असं शिकवलं जातं. पण इथे तर आम्ही - मुलगे आणि मुली आळीपाळीने स्वयंपाकापासून ते झाडलोट करण्यापर्यंत सर्वच कामं करतात.’’
मैत्रकुलात प्रवेश केल्यानंतर पूजाला जातीभेदावर तातडीने काम करण्याची जरुरी वाटू लागली. ‘उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे मनीषा वाल्मिकी नावाच्या एका युवतीवर सामूहिक बलात्काराचा प्रसंग ओढवला होता. त्या घटनेनं मला मोठाच धक्का बसला. तर इकडे महाराष्ट्रातही कोल्हापूर येथे अरविंद जगताप या युवकाची एका उच्च जातीच्या मुलीच्या प्रेमात पडल्यानं गळा चिरून हत्या झाली होती. त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. या दोन्ही प्रकरणांत लोकांनी आवाज उठवल्यावरच पोलिसानी त्यांची दखल घेतली होती. आम्ही ‘मैत्रकुल’मध्ये त्यावर चर्चा केली. या दोन्ही घटनामुळे मला संताप तर आलाच पण मी कमालीची अस्वस्थही झाले...’’ पूजा मनापासून सांगत होती.
हे सर्व तरुणांना कसं समजून सांगायचं याबाबत मग तिनं काही ठोकताळे बसवले आणि त्याचाही चर्चा झाली. ‘‘तरुणांनीच जातीभेदाच्या भिंती मोडून काढायला हव्यात आणि आंतरजातीय विवाह हा त्यावरील एक तोडगा असू शकतो. महात्मा गांधींनी आपल्या उत्तर आयुष्यात फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहण्याची शपथ घेतली होती आणि मीही तेच करायचं ठरवलं. लग्न समारंभांवर पैशांची वारेमाप उधळपट्टी करणे म्हणजे पैसे फुकट घालवणं आहे. खरं तर घटनेतील एखादा उतारा त्या वेळी वाचून दाखवायला हवा,’’ पूजा आपलं मत ठामपणे व्यक्त करते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
जुनी पिढी तर ऐकून घ्यायला वा कोणत्याही नव्या विचारांना सामोरी जायलाही तयार नसते. त्यापेक्षा तरुणांना समजावून सांगणं सोपं असतं, असं पूजाला वाटतं. तेव्हा तिनं जातीभेदाविरोधात एक मोहीम हाती घेण्याचं ठरवलं. ‘‘आम्ही एका वेळी एका जिल्ह्याला भेट देऊन तेथील कॉलेज तरूण तसंच स्वयंसेवी संघटनांशी बोलायचं ठरवलं. या विषयावर तरुणांची मतं आम्हाला जाणून घ्यायची होती. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते याच विषयावर काम करत होते. आता आम्ही त्यांच्याशी आणि त्यांच्या चळवळीशी जोडून घेत आहोत. सध्या करोनामुळे आमच्यावर बंधन असली तरी आम्ही जवळपासच्या युवकांच्या गटांसोबत चर्चेला सुरवात केली आहे,’’ पूजानं सांगितलं.
‘‘कॉलेजमध्ये आम्ही या विषयावर बोलू लागलो की, नेहमी पुढे येणारा मुद्दा असायचा - ‘दलितांना तर आरक्षण आहे ना! उच्चवर्णीय लोकांसाठी काय आहे?’ पूजाला हे हमखास विचारलं जायचं. अशा विषयांवर मुलांशी बोललं पाहिजे आणि नेमक्या कोणत्या विचारधारेतून हे विचार आकारास आले आहेत, ते त्यांना सांगायला हवं,” ती सांगते
डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर जातिव्यवस्था निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यांच्या निधनास जवळपास ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पूजा आणि तिच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्याचसाठी झगडावं लागत आहे ही शरमेची बाब आहे.
खरोखरच समाज बदलला आहे काय?
.............................................................................................................................................
लेखिका अलका गाडगीळ युनिसेफसाठी काम करतात.
alkagadgil@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment