पांगारा म्हणजे बोलायचे काम नाही! एकदा फुलला की, बहराशिवाय झाडावर काही नसते. फुललेल्या पळसाला काही पाने लगडलेली दिसतात. सोनसावरीवर काही पाने दिसतात. पांगारा आणि काटेसावर यांच्या बाबतीत बहर म्हणजे बहर! पण काटेसावरीपेक्षा पांगाऱ्याचा बहर जास्त ‘इंटेन्स’ असतो! काटेसावरीचे झाड लालेलाल झालेले कधी दिसत नाही. रांगोळीच्या विखुरलेल्या ठिपक्यांसारखी काटेसावरीची फुले दिसतात. पांगारा म्हणजे केवळ लाल रंगाची एक अपूर्व दंगल असते. लाल रंगात चमकदार भगवा मिसळला की, जी मजा येईल ती या फुलांवर पसरलेली असते.
उतरत्या उन्हात पांगारा जणू चमकतो आहे असे वाटते.
आपण तळवा पसरला आणि त्यावर जर लाल-भगव्या रंगाच्या ज्योती उमलून आल्या, तर जसे दिसेल तशी पांगाऱ्याची फुले दिसतात! एका रांगेत पाच-पाच फुले. तपकिरी, सोनेरी आणि लाल रंगाच्या कळ्यांमधून ती उमलून येतात. फुलांइतकीच या फुलांची बाह्यदले सुंदर असतात. पण, ती बघणाऱ्याच्या पटकन लक्षात येत नाहीत, कारण फुलांच्या ज्योती म्हणजे सौंदर्याची एक दंगल असते, आणि हे बाह्यदलांचे सौंदर्य अतिशय शालीन आणि मृदू असते. तपकिरी, सोनेरी आणि लाल छटा असलेली ही बाह्यदले एखाद्या सुंदर निरंजनासारखी असतात आणि त्यातून या लाल भगव्या ज्योती उमलून आलेल्या असतात.
पाच फुलांची एक रांग उमलून आली की, पुढच्या कळ्यांची रांग वर येऊ लागते. आधीची फुले पक्व होऊन गळून पडतात आणि त्यांना नाजूक गवारीसारख्या शेंगा लागतात. तोपर्यंत पुढची रांग रसरसून उठते. एकूण रचना फुलांची वेणी करतात तशी असते. अर्धचंद्राकार. एकूण लाल तेज बघता अर्धसूर्याकार म्हणावे लागेल!
पांगाऱ्याच्या फुलण्याला ‘फुलणे’ हा शब्द कितीही सुंदर असला तरी जरा सौम्य ठरेल. पांगाऱ्याची आतषबाजी असते. संध्याकाळचे सोनेरी ऊन पांगाऱ्याच्या तपकिरी आणि पांढूर फांद्यांवर पडलेले असते. संपूर्ण झाडाला एक सोनेरी छटा आलेली असते. सोनेरी झाड आपल्या सर्वांगावर चमकदार ज्योतींचे तुरे लेवून उभे असते. डोळ्याचे पारणे फिटेल अशी ही आतषबाजी असते.
रेनर मारिया रिल्केने लिहिले आहे -
‘Everything is blooming most recklessly; if it were voices instead of colors, there would be an unbelievable shrieking into the heart of the night.’ (सगळेच फुलते आहे भन्नाट बेपर्वाईने, फुलांवर सजवले गेले असते आवाज जर रंगांऐवजी, तर रात्रीच्या हृदयातून ऐकू आला असता बेफाम कोलाहल!)
रात्री उडणारी फुलांच्या उमलण्याची धांदल ही कविता वाचली की, डोळ्यासमोर येते. रिल्के हा थोर कवी आहे तो त्याच्या या दृष्टीमुळेच!
किती लगबगीने लाल रंग भगव्या रंगात मिसळला जात असेल. त्यावर अद्भुत चमक कशी जाऊन बसत असेल. स्टेजवर एंट्री घेण्याच्या वेळी एखाद्या सुंदर आणि सेन्सिटिव्ह नटीची धांदल उडते, ती या वेळी माझ्या डोळ्यासमोर येते. तिचे ते ग्रीन रूममधील मेकअप करणे, तिची ते वेशभूषा सावरणे, तिचे ते संवाद आठवणे, तिचे ते आपली एंट्री येण्याची वाट पाहणे. हा सर्व गोंधळ सुरू राहतो आणि मग एंट्रीची वेळ आली की, सगळी धांदल सावरून ती स्टेजवर अवतरते. सगळ्यांना बेभान करते ती आपल्या रूपाने, आपल्यामधील ‘ग्रेस’ने आणि आपल्यामधील ‘कले’ने!
रिल्के वाचला की वाटते- सूर्य उगवला की पांगाऱ्याच्या कळ्या रात्रीची सौंदर्यरचनेची धांदल बाजूला ठेवून अशाच अवतरत असतील विश्वाच्या या स्टेजवर लाल-भगव्या चमकदार ग्रेसने उत्फुल्ल होऊन! पांगाऱ्याच्या या सगळ्या आतषबाजीच्या मागील धांदल-नाट्य समजून घ्यायला रिल्केच पाहिजे. येरागबाळ्याचे काम नाही हे! संध्याकाळी पक्षी किलबिलाट करत असतात. त्या नटीच्या अभिनयाला जशी संगीताची पार्श्वभूमी असावी लागते, तशी पांगाऱ्याच्या या आतषबाजीला पक्ष्यांच्या किलबिलाटाची पार्श्वभूमी असावी लागते.
जॉर्ज मेरिडिथने लिहिले आहे -
‘As then, the larks from running rings pour showers:
The golden foot of May is on the flowers,
And friendly shadows dance upon her brow.’
(घिरट्या घालत करतो आहे चंडोल वर्षाव संगीताचा, वसंताची सोनेरी पाऊले उमटली आहेत फुलांवर, आणि पर्णछायांची जाळी उमटली आहे वृक्षांच्या ललाटावर…)
‘The lover of life holds life in his hand, As the hills hold the day.’ (आपले प्राण हातात घेऊन उभा राहतो प्रेमिक निसर्गाचा, जशा टेकड्या असतात उभ्या मिठीत घेऊन दिवसाला)
आतषबाज पांगरा, सोनेरी ऊन आणि किलबिलाट करणारे पक्षी... संपूर्ण टेकडी आनंदून गेलेली असते. का नाही घेणार, अशा दिवसाला ती टेकडी आपल्या मिठीमध्ये?
यौवन, वसंत आणि सौंदर्य एक आदिम त्रिकुट आहे!
पांगाऱ्याची फुले कित्येकांना एखाद्या सुंदर स्त्रीच्या ओठांसारखी दिसतात. श्री अरविंद यांच्या ‘नाईट बाय द सी’ या कवितेतल्या ओळी अशा वेळी आठवतात. पुढे मोठे योगी झालेले श्री अरविंद फुले, यौवन, स्त्रीत्व, वसंत आणि प्रेम यांना किती इंटेन्सली एकत्र आणतात हे बघण्यासारखे आहे!
By this treasure-house of flowers
In the sweet ambiguous hours.
Many a girl’s lips ruby-red
With their vernal honey fed
Happy mouths, and soft cheeks flushed
With Love’s rosy sunlight blushed.
(या फुलांच्या मनमुराद सोहळ्यात,
या मुग्ध समयी,
प्रेमाच्या उगवत्या सूर्यप्रकाशात
लाजून चूर होतात मुली;
ज्यांच्या गालांवर चमकत राहते लज्जेची लाली,
ज्यांचे ओठ आहेत लाल माणकांसारखे
आणि ज्यांच्या ओठात भरून राहिला आहे काठोकाठ
मध वसंताच्या यौवनाचा.)
या सौंदर्याच्या सानिध्यात राहिले की, मन प्रसन्न होते, शांत होते. अशा वेळी जाणवते की, आपण शहरात राहून कशा कशाला मुकलो आहे. सौंदर्य नसेल तर आयुष्यात बाकी म्हणून फार कमी उरते. उरते ते बेगडी स्थैर्य आणि त्यातून येणारे बेगडी समाधान!
यौवन, वसंत आणि प्रेम हे सर्व गोड वादळे तयार करतात. ही वादळांची नशा काढून टाकली आणि सौंदर्याकडे एक तत्त्व म्हणून पाहिले तर सौंदर्य आपल्याला नशेकडून शांततेकडे नेते.
सौंदर्याचे, फुलांचे, माणसाचे आणि पृथ्वीचे नाते जॉन कीट्सने त्याच्या ‘एन्डिमियन’ या कवितेत फार सुंदर सांगितलेले आहे -
‘A thing of beauty is a joy for ever:
Its loveliness increases; it will never
Pass into nothingness; but still will keep
A bower quiet for us, and a sleep
Full of sweet dreams, and health, and quiet breathing.
Therefore, on every morrow, are we wreathing
A flowery band to bind us to the earth’
(सौंदर्याने परिपूर्ण गोष्ट म्हणजे एक सनातन आनंद...
जाते सौंदर्य निखरत प्रत्येक दिवसामाजी...
नाही अंतर्धान पावत सौंदर्य कधी शून्यामध्ये...
निववत जाते आपली तप्त मने सौंदर्य,
उतरून येते आपल्या मनात शांत निद्रा बनून सौंदर्य,
राहते आपल्या मनात आपली साखर स्वप्ने
बनून सौंदर्य,
राहते आपल्यात आपले आरोग्य बनून सौंदर्य,
आणि वाहत राहते आपल्यामधून आपले शांत श्वास बनून सौंदर्य;
म्हणूनच दृष्टी वळत असते आपली फुलांच्या वाफ्यांकडे रोज सकाळी,
हे वाफे म्हणजे असतात मणिबंध फुलांचे,
जे बांधुन टाकत असतात आपल्याला या पृथ्वीच्या मातीशी.)
सौंदर्यतत्त्वाकडून एवढे सगळे मिळाले की, स्वर्गच उभा राहतो माणसाच्या आयुष्यात.
एमिली डिकिन्सनलासुद्धा एका फळाच्या निरामय अस्तित्वातच स्वर्ग सापडला होता -
‘ “Heaven”—is what I cannot reach!
The Apple on the Tree—
Provided it do hopeless—hang—
That—“Heaven” is—to Me”
(नाही पोहोचू शकत मी स्वर्गापर्यंत त्या कधी...
पाहते मी फळ एक लगडलेले एका तरुवर उन्मनी,
ना बंधन तया आशेचे, ना चिंता तया कसलीही,
माझ्यासाठी अस्तित्व मुक्त असे, स्वर्ग हाच प्रत्यही)
पांगाऱ्याची आतषबाजी लक्षात येणे, तिच्याकडे ओढले जाणे, त्या झाडाखाली बसून फुलांवरचे भुंगे पाहणे हा स्वर्ग आहे. पांगाऱ्याचे फुललेले रूप पुढील वर्षभरासाठी डोळ्यात आणि मनात साठवणे हाच स्वर्ग आहे. पुढे पांगाऱ्याच्या बिया शेंगांमधून बाहेर पडतात. गुंजांसारख्या लाल बिया! पांगाऱ्याच्या उघडलेल्या शेंगा आतून सोनेरी आणि रूपेरी रंग एकत्र करून रंगवलेल्या असतात. शिंपल्यांच्या आत जशा रंगांच्या लाटा असतात तशा सोनेरी आणि रूपेरी रंगाच्या लाटा या शेंगांच्या आत असतात.
पांगारा म्हणजे सौंदर्यतत्त्वाने केलेली आतषबाजी, तर शिरीष म्हणजे सौंदर्याचा मृदू आणि अत्यंत मर्यादाशील आविष्कार!
पुण्यात चतुःश्रृंगीच्या टेकडीवर ‘वारा पॉइंट’ म्हणून एक प्रसिद्ध पॉइंट आहे. तिथे एक देखणा शिरिषाचा वृक्ष आहे. अत्यंत देखणा. काही व्यक्ती सुंदर म्हणूनच जन्मतात, तसे झाडांचेही असते. टेकडीवर इतकी शिरिषाची झाडे आहेत, पण याची सर कोणाला नाही! त्याच्या मूळ खोडाला उपशाखा फुटत गेल्या आहेत, त्या प्रत्येक वेळी पंचेचाळीस अंशाचा कोन करून. त्यामुळे फांद्यांचा एक आवर्त तयार झाला आहे. त्याची एक बाजू ऊंच गेली आहे आणि एक थोडी खाली राहिली आहे. त्यामुळे झाडाचा एकूण घाट त्रिकोणी झाला आहे. या देखण्या शिरीष वृक्षासमोर दोनशे मीटरवर एक धूमकेतूसारखा सैराट पांगरा आहे. सौंदर्याचे दोन ध्रुव एकमेकांसमोर उभे आहेत.
पांगाऱ्याचे सौंदर्य दिवाळीतल्या लाल फुलछडीसारखे, तर शिरिषाचे निरंजनातील शांत ज्योतीसारखे. पांगारा दूरवरूनही लक्ष वेधून घेतो. शिरिषाखाली बसलेल्या लोकांनाही त्याचे सौंदर्य जाणवत नाही. पांगाऱ्याला फुले येतात, तेव्हा त्याला पाने नसतात फारशी. शिरिषाला फुले येतात, तेव्हा त्याला पालवी फुटलेली असते. पालवीचा गडद पोपटी रंग आणि जुन्या पानांचा गडद शेवाळी रंग यांच्या आत शिरिषाची पिस्त्याच्या रंगाची फुले लपलेली असतात. तुम्ही निरखून पाहिले तर पानांच्या हिरव्या पोपटी ढगांवर फिकट पिस्त्याच्या रंगाची छटा पसरलेली दिसते. फलन झाल्यावर या फुलांवर फिकटसा पिवळसर रंग चढतो. हे हिरवे पिवळसर गोंडे झाडाखाली पडतात. ऐन बहर असताना झाडाखाली एक मंद सुवास दरवळत राहतो.
नाजूक नव्या फांद्यांना बारा बारा कळ्यांची चक्रे फुटतात. हिरवी लवंग असावी अशा कळ्या! या चक्राकार फुटलेल्या कळ्यांमधून कारंजं उडावे असे पांढरे तंतू बाहेर येतात. प्रत्येक तंतूवर एक परागकोश. नीट बघितले तर पराग कोशावर पिवळसर छटा असते. तंतूंमध्ये नंतर मंद पांढरा रंग मिसळलेला जातो. पुढच्या टोकाला हे तंतू हिरवे होत जातात, आणि खालच्या भागात पांढरे राहतात. त्यामुळेच बहुतेक शिरिषाचे फूल लांबून पिस्त्याच्या रंगाचे दिसत असावे.
शिरिषाची पाने एखाद्या पिसाऱ्यासारखी असतात. मोराचा जसा अनेक डोळ्यांचा एक पिसारा बनलेला असतो, तसा येथे छोट्या छोट्या पानांचा एक पिसारा बनलेला असतो. असे असंख्य पोपटी आणि शेवाळी पिसारे एका एका फांदीवर. आणि या पिसाऱ्यांच्या आत ही हिरव्या पांढऱ्या आणि पिस्त्याच्या रंगांच्या तंतूंची फुले आणि त्यांचे फलन झाल्यानंतरचे पिवळसर गोंडे! झाडावर मागे हिरव्या शेंगा उरतात. त्या हळूहळू सहा आठ महिन्यात सोनेरी होतात. त्या खाली पडल्या की, वाऱ्यावर लोळत दूर दूर जातात. त्यांच्या आत मनोहारी कॉफीच्या मनोहारी रंगाच्या बिया असतात. ज्या लोकांनी ही मजा पाहिलेली असते ते आयुष्यभर शिरिषाचे आशिक बनून राहतात.
हे विश्व सौंदर्याने ओतप्रोत नटवले गेले आहे. या विश्वातील खूपसे सौंदर्य लपून राहिलेले असते. लपून राहिलेल्या सौंदर्यावर श्री अरविंद यांची एक कविता आहे. तिचे नाव आहे ‘एस्टेल’ (Estelle). श्री अरविंद योगी म्हणून एवढे मोठे आहेत की, त्या तेजापुढे त्यांच्या कवितेच्या सौंदर्याकडे जगाचे दुर्लक्ष झालेले आहे. एस्टेल म्हणजे तारका. वयाच्या पंचविशीतले अरविंद एका तारकेला म्हणत आहेत -
‘Why do thy lucid eyes survey,
Estelle, their sisters in the milky way?
The blue heavens cannot see
Thy beauty nor the planets praise.
Blindly they walk their old accustomed ways.
Turn hither for felicity.
My body’s earth thy vernal power declares,
My spirit is a heaven of thousand stars,
And all these lights are thine and open doors on thee.’
(बघते आहेस का या आकाशगंगेतील इतर तारकांकडे हे तारके, तुझ्या पाणीदार डोळ्यांनी?
हे निळे आसमंत नाही पाहू शकत तुझे सौंदर्य, ना कौतुक करू शकत ते ग्रहांच्या तेजाचे.
इथे फिरत राहते सगळे ज्याच्या त्याच्या जुन्यापान्या सवयीच्या मार्गाने.
माझ्याकडे बघ जर बघायचेच असतील तुला तुझ्या प्रभेने दीपलेले डोळे.
माझ्या शरीराची पृथ्वी देते आहे साक्ष तुझ्या वासंतिक शक्तीची,
माझे अंतरंग म्हणजे आहे एक स्वर्ग हजारो तारकांचा,
ही सारी दीप्ती तुझीच आहे,
आणि माझ्या अंतरंगातील प्रकाशाची दारे उघडत आहेत तुझ्याच दिशेने…)
ही कविता लिहिली तेव्हा अरविंद अगदी तरुण होते. पण या जगातील पार्थिवामधील आणि अपार्थिव तेजामधील नाट्य त्यांना त्या वयातही अगदी स्पष्टपणे जाणवले होते. सौंदर्य हे या दोन जगातील एक सांघा आहे, हे त्यांना अगदी लख्खपणे जाणवत होते. त्यांच्या सर्व आंतरिक शक्ती, त्यांचा सर्व कॉन्शसनेस, सौंदर्याच्या दिशेने आपली सर्व दारे उघडण्यासाठी आतूर झाला होता.
हे विश्व भौतिकशास्त्राच्या जुन्यापन्या नियमांनी चालते आहे. या जुन्या पान्या चक्रात वसंत एक जिवंत चक्र दरवर्षी सुरू करतो. सौंदर्यचक्र! ती खरी मजा! आपल्या मनाचे, आपल्या अंतरंगाचे सौंदर्य आणि निसर्गातले सौंदर्य एकच आहे, असे ही श्री अरविंदांची कविता आपल्याला सांगते आहे का?
तसे नसेल तर निसर्गातले सौंदर्य आपल्या मनात रेझोनेट का होते? बाहेरील सौंदर्याचा आपल्या मनात अनुनाद का तयार होतो? सोप्या भाषेत सांगायचे तर या विश्वातील सौंदर्य पाहिल्यावर आपल्या मनात काहीतरी झंकारते, या झंकाराचे कारण नक्की काय?
सौंदर्याची ओढ हा कलेचा एक अविभाज्य भाग असतो! कधी ती पांगाऱ्याची आतषबाजी अनिमिष नजरेने बघत बसते. कधी ती शिरिषाच्या लपलेल्या फुलांना हृदयात साठवते. कधी ती सौंदर्याची ओढ आपल्या प्रेयसीच्या किंवा प्रियकराच्या सौंदर्यासाठी आपल्या सगळ्या तारुण्याची आहुती देते. आणि, कधी ही ओढ आपल्या अंतरंगाची सगळी दारे, दूरच्या एखाद्या एकट्या पडलेल्या तारकेसाठी अतिशय प्रेमाने उघडे करते.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment