“ज्योतिष्याच्या भविष्यवाणीला कोणताही तार्किक आधार नाही. पश्चिमी देशांमध्ये तर ज्योतिष हा हसण्यावारी नेण्याचा विषय आहे आणि त्याला समाजात अजिबात आदरयुक्त स्थान नाही.” - जयंत नारळीकर
संकीर्ण - मुलाखत
पी. ए.कृष्णन
  • खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Mon , 12 April 2021
  • संकीर्ण मुलाखत जयंत नारळीकर jayant Narlikar खगोलशास्त्र ज्योतिष बिग बँग सापेक्षतावाद

पूर्वार्ध

जयंत विष्णु नारळीकर. विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातील भारतातील आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नाव. शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल आणि त्यांनी मिळून मांडलेला सिद्धान्त ‘हॉईल-नारळीकर थिअरी ऑफ ग्रॅविटी’ या नावाने जगप्रसिद्ध आहे. २०२१मध्ये जे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होते, जे करोना उद्रेकामुळे स्थगित झाले आहे. त्याचे अध्यक्ष जयंत नारळीकर असणार आहेत. स्मिथ प्राइज, पद्मभूषण, अडम प्राइज, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, कलिंगा प्राइज, आत्माराम अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. ‘चार नगरातील माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला २०१४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. जितक्या सहजतेने ते अवघड वाटणारा वैज्ञानिक सिद्धान्त समजावून सांगतात, तितक्यात सहजतेने संस्कृत साहित्यावरही संवाद साधतात.

तर अशा अवलिया शास्त्रज्ञ आणि साहित्यिक मराठी व्यक्तिमत्त्वाची ‘कलाचूवाडू’ या तामिळ मासिकासाठी पी.ए. कृष्णन यांनी इंग्रजीत मुलाखत घेतली. कृष्णन यांचा मित्र पेनेश्वरन यांनी ती ऑडिओ स्वरूपातील रेकॉर्ड केली आणि ती इंग्रजीतच शब्दांकित करून जयंत नारळीकर यांना अंतिम मान्यतेसाठी पाठवली. या मुलाखतीची मूळ इंग्रजी आवृत्ती स्वतः जयंत नारळीकर यांनी तपासलेली आहे. वैज्ञानिक सिद्धान्त, विज्ञान, भौतिकशास्त्रातील अनेक संकल्पना इथपासून ते ज्योतिष, बुवाबाजी, अंधश्रद्धा अशा अनेक विषयांवर या मुलाखतीत त्यांनी तर्कशुद्ध आणि सोप्या भाषेत मांडणी केली आहे. एकंदरीतच ही मुलाखत खूप महत्त्वाची आणि वाचनीय वाटली. म्हणून मराठी वाचकांसाठी या मुलाखतीचे भाषांतर केले आहे. ही मुलाखत आमच्यापर्यंत पोहचवणाऱ्या नितीनअण्णा या मित्राचे मनापासून आभार!

- कृतार्थ शेवगावकर, राहुल माने

..................................................................................................................................................................

कृष्णन : बनारस हिंदू विद्यापीठाच्या सुंदर परिसरात तुमचे बालपण गेले. तुमचे वडीलही तिथे शिकवायचे. आजच्यासारखे उत्साही वातावरण कदाचित तेव्हा तिथे नसावे. ती जागा तेव्हा आतासारखी गुन्हेगारांना आश्रय देणारी नव्हती. त्या दिवसांविषयी सांगा...

नारळीकर : ती जागा खरंच खूप प्रेमळ होती. आजही ती जागा दिसायला आणि राहायला तितकीच प्रेमळ आहे. परंतु १९५० साली तिथले शैक्षणिक वातावरण दूषित नव्हते. ते अभ्यासासाठी पूरक असे शांत, स्वच्छ, प्रसन्न होते. फक्त माझ्या तिथल्या शेवटीच्या काही दिवसांत तिथे अडचणी निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. तरीही त्या अपवादात्मक होत्या. ही सगळी वर्षे होत आलेली घसरण अभूतपूर्व  आहे. प्रत्येकाने त्यात हातभार लावला. उत्तर प्रदेशमध्ये घडणाऱ्या घटनांपासून स्वतःला अलग ठेवणे बनारस हिंदू विद्यापीठाला शक्य नव्हते. त्या घटनांचे पडसाद विद्यापीठात उमटणे साहजिक होते. माझे वडील मला सांगायचे की, ‘चले जाव’ चळवळीच्या काळात एकदा संयुक्त प्रांताच्या गव्हर्नरने विद्यापीठाच्या आवारात पोलीस घुसवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या वेळचे कुलगुरू डॉ.राधाकृष्णन यांनी ठाम विरोध दर्शवला होता. आज पोलिसांच्या सक्रिय सहभागाशिवाय विद्यापीठाचे कामकाज चालणे शक्य नाही.

कृष्णन : तुमचे वडील ख्यातनाम गणितज्ञ होते आणि आई संस्कृत भाषेची गाढी अभ्यासक होती. तीसुद्धा विद्यापीठात शिकवत होती का?

नारळीकर : नाही. ती विद्यापीठात शिकवत नव्हती. मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषयात तिने पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मला आणि माझ्या भावाला तिनेच संस्कृत भाषा शिकवली आणि त्या साहित्याची अवीट गोडी आमच्या नसानसांत भिनवली. आम्ही करत असलेल्या अभ्यासाचेही तिला प्रचंड कुतूहल असायचे. आज आम्ही जे कोणी आहोत, ते तिनेच आम्हाला घडवले आहे.

कृष्णन : १९ साली तुम्ही केम्ब्रिजला गेलातज्या विद्यापीठात आयझॅक न्यूटननेलुकासियन अध्यासन’ (Lucasian chair of Mathematics and Applied Physics) हे पद भूषवले त्या विद्यापीठात अभ्यास करायला मिळणे ही नक्कीच भारी गोष्ट असणार. तिथले जीवन कसे होते? (टीप : लुकासियन अध्यासन म्हणजेच Lucasian Chair of Mathematics and Applied Physics हे जगातील सर्वोच्च समजले जाणारे शैक्षणिक पद आहे. हे पद भूषावणाऱ्या प्राध्यापकाला लुकासीयन प्रोफेसर (Lucasian Professor) असे संबोधले जाते. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात भरीव योगदान देऊन जग आणि निसर्ग समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला हे पद भूषवण्याची संधी मिळते. हे पद आतापर्यंत आयझॅक न्यूटन, चार्ल्स बॅबेज, पॉल डिरॅक, स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञानी भूषवले आहे. हेन्री ल्युकास हे १६३९ ते १६४० दरम्यान केम्ब्रिज विद्यापीठाचे ब्रिटिश संसदेमध्ये प्रतिनिधी होते, त्यांनी स्थापन केलेले हे अध्यासन आहे.)

नारळीकर : न्यूटन आमच्यासाठी खूप लांबचा होता. आम्हाला अप्रूप असलेली आणि आख्यायिका वाटावी, अशी जिवंत माणसे केम्ब्रिजमध्ये आमच्या आजूबाजूला होती. उदाहरण अर्थ डिरॅक....

कृष्णन : पॉल डिरॅक? म्हणजे पूंज भौतिकी (Quantam Mechanics) विषयाचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक? ज्याला श्रॉडिंजरसोबत संयुक्त नोबेल पुरस्कार मिळाला. बरोबर ना?

नारळीकर : बरोबर. आधुनिक भौतिकशास्त्रातील इतरही सगळी महान माणसं तिथे होती. सहज चालायला बाहेर पडलं, तर तुम्हाला जी.पी. थॉम्प्सन कोणत्यातरी कोपऱ्यावर भेटायचे. सामान घ्यायला किराणा दुकानात जावं तर जेम्स चॅडविक आपल्यासोबत किराणा घेत असायचे. ती जागा नोबेल पुरस्कारार्थींनी भरलेली होती. मी डिरॅकविषयी सांगत होतो. मी केम्ब्रिजला असताना लुकासीयन अध्यासनावर (Lucasian Chair) पॉल डिरॅक होते. ते आम्हाला पुंज भौतिकी (Quantam Mechanics) शिकवायचे. (मिश्किल हसत) तर सांगायचा मतितार्थ असा की, मी थेट या क्षेत्रातील उस्तादांकडून शिकलो.

कृष्णन : शिक्षक म्हणून ते कसे होते?

नारळीकर : अतिशय मुद्देसूद आणि नेमके. अगदी त्यांच्या पुस्तकासारखे. ते अजिबात विनोद करायचे नाहीत. परंतु त्यांना असणारी विषयाची स्पष्टता विस्मयचकीत करणारी होती.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कृष्णन : १९-१९६०च्या काळात केम्ब्रिज म्हणजे तिसऱ्या जगातील देशांना खरंच मदत करू इच्छिणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या प्राध्यापकांची मांदियाळी होती. बर्नाल आणि डोरोथी हॉजकीन या प्राध्यापकांची नावे माझ्या मनात येत आहेत. कोणत्याही पद्धतीने तुमच्यावर त्यांचा प्रभाव होता का? (टीप : देशाची मोठी लोकसंख्या कमी उत्पन्न आणि खालावलेल्या आर्थिक-सामाजिक स्तरात असेल तर अशशा विकसनशील देशांना त्या काळी तिसऱ्या जगातील देश म्हले जायचे. पहिल्या जगातील देश म्हणजे फक्त अमेरिका. दुसऱ्या जगातील देश म्हणजे रशिया, चायना आणि क्युबा. आणि इतर सगळे तिसऱ्या जगातील देश गणले जायचे.)

नारळीकर : माझ्या दिवसात अशा चळवळींमध्ये केम्ब्रिजपेक्षा ऑक्सफर्ड जास्त सक्रिय होते. बर्नाल आणि डोरोथी हॉजकिन यांच्या संपर्कात मी तरी कधी आलो नाही.

कृष्णन : प्राध्यापक फ्रेड हॉईल अर्थात केम्ब्रिजमधील तुमचे गुरू होते. एक शिक्षक म्हणून आणि एक माणूस म्हणून ते कसे होते हे जाणून घ्यायला आवडेल.

नारळीकर : ते अव्वल दर्जाचे शिक्षक होते. सर्वप्रथम मी त्यांचा विद्युत-चुंबकीय सिद्धान्ताचा (Electromagnetic Theory) वर्ग केला. साधारण विद्युत-चुंबकीय सिद्धांत, कुलोम्बच्या नियमापासून (Coulomb's Law) सुरुवात होऊन मॅक्सवेलच्या समीकरणापर्यंत (Maxwell Equation) जातो. परंतु त्यांनी मॅक्सवेल समीकरणापासून सुरवात करून उलटा प्रवास करत आम्हाला शिकवले. सिद्धान्ताच्या मुळाशी असलेल्या या मूलभूत समीकरणांची आणि नियमांची सांगड कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांना लीलया घालता आली पाहिजे, असा त्यांचा त्यामागे दृष्टिकोन होता. भौतिकशास्त्र (Physics) शिकण्याची ती अभिनव पद्धत  होती. माणूस म्हणून ते अतिशय शांत होते. फार बोलायचे नाहीत. पण आपल्याला समजायचं की, त्यांना व्यर्थ बडबडीपेक्षा विज्ञानाविषयी बोलण्यात जास्त रस आहे. आमच्या शोधप्रबंधाचे ते मार्गदर्शक होते. ते अचानक आमच्यासमोर एखादी अवघड वैज्ञानिक समस्या मांडायचे आणि आम्हाला सल्ला व मत विचारायचे. इतका महान माणूस आपल्याला सल्लामसलत करण्यास पात्र समाजतोय, हा अर्थात सन्मान वाटायचा. त्यांनी आमच्यापुढे मांडलेल्या अवघड वैज्ञानिक समस्येचे निराकारण करण्यासाठी आम्ही सगळेच अतिशय मेहनत घ्यायचो.

कृष्णन : असे म्हणतात की, प्राध्यापक फ्रेड हॉईल (Fred Hoyle) यांना स्व-प्रसिद्धी प्रिय होती आणि त्यासाठी त्यांचा नावलौकिक होता, हे खरं आहे का?

नारळीकर : मला ते खरे वाटत नाही. अतिशय सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगण्याचा वकुब  त्यांच्याकडे होता. त्यामुळे साहजिकपणे पत्रकार आपोआप त्यांच्याकडे गर्दी करायचे. बीबीसी वाहिनीसाठी ‘विश्वउगमशास्त्र’ (Cosmology) या विषयावर त्यांनी दिलेली व्याख्यानमाला अतिशय गाजली होती. ते एक उत्कृष्ट संवादक होते आणि नक्कीच प्रसिद्धीलोलुप नव्हते.

कृष्णन : जॉन ग्रिबन आणि मायकेल व्हाइट यांनी स्टीफन हॉकिंग यांचे चरित्र लिहिले. त्यात फ्रेड हॉईल, तुम्ही आणि स्टीफन हॉकिंग यांच्यात घडलेला एक प्रसंग लिहिला आहे. रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या एका मिटिंगमध्ये मांडणी करताना प्राध्यापक फ्रेड हॉईल तुम्ही काम केलेल्या गणिताचा भाग वापरत होते. त्यांनी असं लिहिलंय की, तेव्हा हॉकिंग मिटिंगमध्ये उठले आणि तुम्ही काम केलेल्या गणितात गृहीत धरलेल्या प्रमाणातील त्रुटी त्यांनी सांगितल्या. त्यामुळे प्राध्यापक फ्रेड हॉईल यांची पंचाईत झाली. त्यामुळे नंतर प्राध्यापकांचा तुम्हाला ओरडा खायला लागला. तुम्हाला हा प्रसंग आत्ता पुन्हा सांगायला आवडेल का?

नारळीकर : ग्रीबन यांनी माझ्यावर आणि प्राध्यापक फ्रेड हॉईल यांच्यावर जे लिहिले, ते फारसे न्याय्य नाही. पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी त्यांनी निदान एकदा मला विचारायला हवे होते. त्या मीटिंगमध्ये हॉकिंग उभे राहिले आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला. प्राध्यापक हॉईल यांना तो प्रश्न नीट समजला नाही. मीही तिथे उपस्थित होतो. हॉईल यांच्या वतीने मी हॉकिंग यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. नंतर जेव्हा प्राध्यापक हॉईल यांनी मला विचारले, तेव्हा मी त्यांना हॉकिंग यांनी घेतलेला आक्षेप आणि त्या आक्षेपावरील वरील माझे उत्तर सांगितले. एवढेच घडले. प्राध्यापक हॉईल यांनी माझ्यावर रागावावे असे काही कारणच नव्हते आणि माझे गणित चुकले होते असे म्हणणेही बरोबर नाही. परंतु ग्रीबिन नेहमी असाच होता.

कृष्णन : मग तुम्ही ग्रीबिन यांना याविषयी लिहिले का?

नारळीकर : मी का लिहू? परंतु त्याच्या पुस्तकाचे परीक्षण करताना मी खरा घडलेला प्रसंग लिहिला.

कृष्णन : तुमचे ऑफिस स्टीफन हॉकिंग यांच्या ऑफिसच्या समोर होते. हो ना? तुम्ही अजूनही मित्र आहात का? (टीप : ही मुलाखत २०१७ सालामधील आहे. १४ मार्च २०१ रोजी वयाच्या ७६व्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांचे निधन झाले.

नारळीकर : आमचा व्हरांडा एकच होता. आम्ही सोबत टेबल टेनिस खेळायचो.

कृष्णन : टेबल टेनिस?

नारळीकर : हो. त्यांना झालेला मज्जारज्जूचा आजार (Motor Neuron Disease) तेव्हा फार बळावला नव्हता. त्यांच्या उच्चारावर थोडा परिणाम झाला होता, परंतु आम्ही विचार केला की, त्यांच्या बोलण्याचा लहेजाच तसा आहे.  तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास ते ‘नाही’ असे आहे. आम्ही आता एकमेकांच्या संपर्कात नाही. पुढे आमचा प्रवास वेगवेगळ्या दिशेने झाला.

कृष्णन : तुम्ही आणि हॉईल हे दोन शास्त्रज्ञ मिळून स्थिरस्थिती सिद्धान्ताचा, म्हणजेच Steady state theory of universeचा मागोवा घेत होते. तुम्ही अर्थात अजूनही त्या सिद्धान्ताच्या मागावर आहात. हॉईल यांनी तर उत्स्फूर्त विश्वाची निर्मिती मांडणाऱ्या पर्यायी सिद्धान्ताचा (Alternative Theory of Spontaneous creation of Universe) तिरस्कारच केला. या सिद्धान्ताचा उल्लेख त्यांनी ‘party girl jumping out of birthday cake’ असा केला होता, जो इंग्रजीमध्ये असंस्कृत वर्तनासाठी वापरला जातो. या सिद्धान्ताचा उपहास करण्यासाठीच महास्फोट म्हणजेच बिगबँग हा शब्द तयार करणारेही तेच होते ना? तथापि महास्फोट सिद्धान्तालाच (बिगबँग) आता जगभरातील शास्त्रज्ञांकडून मान्यता आणि स्वीकारार्हता मिळते आहे. हे दोन्ही सिद्धान्त सोप्या भाषेत सांगाल का?

नारळीकर : आधुनिक विश्वउगमशास्त्राची (Modern Cosmology) सुरुवात १९१७ साली आईनस्टाईनने मांडलेल्या विश्वाच्या मॉडेलने (Einstein Model of Universe) झाली. आईनस्टाईनच्या विश्वसिद्धान्तानुसार विश्व हे एकजिनसी, समस्थानिक आणि स्थिर (Homogeneous, Isotropic and static) होते. विश्व हे स्थिर असून त्यातील आकाशगंगा वगैरे यासुद्धा स्थिर आहेत. हा साधारण समज इतका दृढ होता की जेव्हा १९२२ साली अलेक्झांडर फ्रीडमनने विश्वाचे विस्तारित मॉडेल मांडले तेव्हा आईन्स्टाईनसहित सर्वांनीच त्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले. जेव्हा १९२९मध्ये एडविन हबल याने दीर्घिकांमधील ताऱ्यांच्या वर्णपटलामधील ‘रेडशिफ्ट’वर आधारित वेग आणि अंतर यातील नाते सांगणाऱ्या समीकरणाची घोषणा केली, तेव्हा विश्वउगमशास्त्रातील महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले गेले. त्यामुळे विश्व हे स्थिर नसून विस्तार पावणारे आहे, या निष्कर्षाप्रत लोक आले. मग अलेक्झांडर फ्रीडमन याने मांडलेल्या विश्वाच्या विस्तारित मॉडेलला सर्वदूर मान्यता मिळाली. तेच आता विश्वाचे मॉडेल म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

हे सर्व मॉडेल्स अनंत घनतेच्या स्थितीपासून आलेली आहे. ज्याचा एक अर्थ ‘आदिम अणू’सुद्धा आहे. बोलीभाषेत यालाच आपण ‘बिग बँग’ची स्थिती असे म्हणतो. दुसऱ्या महायुद्धानंतर जॉर्ज गॅमॉव्हने असा शोध लावला की, हीच आदिम घन स्थिती आहे. अतिशय उच्च तापमानच्या उत्सर्जित किरणांच्या मदतीने आणि अणुपेक्षाही लहान असणाऱ्या मूलकणांच्या आधाराने ही स्थिती राखली जाते. आण्विक संमीलन (Nuclear Fusion)साठी ही स्थिती अतिशय आदर्श आहे, असे ते सांगतात.

पण त्यांना लवकरच कळाले की, अणुवस्तुमान ५ किंवा ८ असल्याशिवाय हे साध्य केले जाऊ शकत नाही. १९४०मध्ये ‘बिग बॅं’ग संकल्पनेला आव्हान देणारी आणखी एक संकल्पना आली, जी हर्मन बॉण्डी, टॉमी गोल्ड आणि फ्रेड हॉईल यांनी स्थिरस्थिती सिद्धान्ताच्या रूपात मांडली होती. या सिद्धान्ताद्वारे विश्व हे एकसमान आणि अवकाशात एकस्तरीय आहे, एवढेच नाही तर कालनिरपेक्ष आहे असं सांगितलं.

याचा अर्थ तेथे महास्फोट (बिग बँग) नाही, कोणताही अति-उष्ण असा टप्पा नाही. म्हणजेच विश्व हे कोणत्याही सुरुवातीशिवाय आणि कोणत्याही अंताशिवाय, स्थिर आणि विस्तारलेले आहे. यामुळे अवकाशाच्या नव्या आकारमानाची सातत्यपूर्ण रीतीने निर्मिती होते. हॉईल यांनी विश्वातील पदार्थ निर्मिती ही नकारात्मक ऊर्जेच्या अंतरंगातून होते, असे निरीक्षण आईन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धान्तामध्ये थोडा बदल करून मांडले. जेव्हा अधिकाधिक वस्तुमानाची निर्मिती सुरू झाली, तेव्हा ऊर्जेच्या साठ्याला ते अधिकाधिक नकारात्मक बनण्याची गरज वाटू लागली. पण अवकाशाचा विस्तार लक्षात घेता, साठ्याची ऊर्जा घनता (Energy Density) ही स्थिर राहिली. स्थिरस्थिती सिद्धान्तामध्ये महास्फोट (बिगबँग) सिद्धान्तासारख्या काल्पनिक मिथकांना स्थान नाही आणि या विश्वातील सर्व पदार्थ-वस्तुमान एका क्षणात या विश्वात ऊर्जा अक्षयतेचा सिद्धान्त (Law of conservation of energy) डावलून येणे ही शक्यता वाटत नाही. त्या जागी तेथे सातत्यपूर्ण वस्तुमानाच्या निर्मितीबरोबर विश्वाचा स्थिर विस्तारसुद्धा आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कृष्णन : तुमच्या एका पुस्तकात तुम्ही लिहिलं आहे की, अखेरीस एक दिवस सूर्य पृथ्वीला गिळून टाकेल. सहा अब्ज वर्षांनंतर हे घडणार आहे. तेव्हा मनुष्य प्राणी गुरू ग्रहावरील एखाद्या चंद्रावर आपली वसाहत निर्माण करण्याची शक्यता आहे. वेगळ्या ग्रहावरील चंद्रावर वसाहत निर्माण होण्यासाठी इतकी वाट पाहायला लागेल का? आपल्या डोळ्यांदेखत ते होणे शक्य नाही का?

नारळीकर : नक्कीच ते आपल्या डोळ्यादेखत होणेसुद्धा शक्य आहे. ते या शतकातही होऊ शकते. किंवा येत्या शतकात.

कृष्णन : आपल्या देशाला वैदिक काळात लगधाने लिहिलेल्यावेदांग ज्योतिष ग्रंथापासूनची खगोलशास्त्राची मोठी परंपरा आहे. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कर ही सुविख्यात नावे असलेली ही परंपरा आहे. या परंपरेचे पाईक असल्याचे दडपण तुम्हाला कधी जाणवते का?

नारळीकर : मी स्वतःला या परंपरेचेचा पाईक समजत नाही. माझ्या मते तुम्ही सांगत असलेली परंपरा ही सैद्धान्तिक खगोलशास्त्राची परंपरा आहे. ती फार तर फार आर्यभट्टापासून सुरू होऊन भास्करापाशी संपतेसुद्धा. मी ‘गॅलिलिओ स्कुल’चा, म्हणजेच  दुर्बिणीचा उपयोग करून अभ्यास केल्या जाणाऱ्या खगोलशास्त्राच्या (Telescopic Astronomy) परंपरेतील आहे. आम्ही सगळेच एका अर्थाने गॅलिलिओ स्कूलचे विद्यार्थी आहोत.

कृष्णन : १९७२ साली तुम्ही टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR - Tata Institute of Fundamental Research) आलात. तुम्हाला काय बदल वाटला?

नारळीकर : TIFR ही एखाद्या आंतरराष्ट्रीय संशोधन करणाऱ्या संस्थांसारखी संस्था होती. त्यामुळे मला तिथे अगदीच परके वाटले नाही. खरे तर आम्ही एका भरभराट असलेल्या जागेतून एका अतिशय टंचाई असलेल्या जागेत आलो होतो. प्रत्येक गोष्टीची आम्हाला वाट पाहावी लागली. अगदी गॅस, डाळ, तांदूळ यांचीही. दुसऱ्या बाजूला आमचे नातेवाईक आमच्या आसपास होते. त्यामुळे केम्ब्रिजमध्ये जाणवणारा एकटेपणा इथे नव्हता. इथे काही घरगुती मदत आम्हाला सहज उपलब्ध होती, जिचा तिकडे आम्ही स्वप्नातही विचारही करू शकत नव्हतो. दोन्हीकडे काही चांगल्या गोष्टी आणि काही अडचणी होत्या. दोन्हीकडे काही सारख्या आणि काही वेगळ्या गोष्टीही होत्या.

कृष्णन : सध्या तुम्ही आयुका (The Inter University Centre for Astronomy and Astrophysics) शी जोडलेले आहात. जगातील आणि देशातील बुद्धिमान माणसं आयुकामध्ये येत आहेत का? आयुकाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे?

नारळीकर : परदेशात काम करणाऱ्या माणसाला मायदेशी बोलवून आमच्यासोबत काम करायला लावण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. विज्ञान शाखा निवडलेले सर्व बुद्धिमान विद्यार्थी आयुकामध्ये येतात. हे म्हणताना मला असेही म्हणायचे आहे की, आपल्या देशातील सर्वोत्तम बुद्धिमान विद्यार्थी आता करिअर म्हणून विज्ञान शाखा निवडत नाहीत. भविष्याचा विचार करता, ही गोष्ट आपल्या देशासाठी हानीकारक आहे.

कृष्णन : आपल्या देशात महान भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेले नाहीत. त्यामुळे भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे कोणतेच शोध आपण लावले नाहीत हे समजण्यासारखे आहे. कदाचित सुविधांच्या अभावामुळेही हे घडले असेल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा भौतिकशास्त्रज्ञ होण्यासाठी आपल्या देशातील कमतरता तुम्ही काय सांगाल? शेवटी आपल्याकडेही रमण, सहा, बोस यांच्यासारखे महान भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत.

नारळीकर : याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे आपण आपली विद्यापीठे लोप पावू दिली. आपल्याकडील बहुतेक सर्व महत्वाच्या संशोधन संस्था या विद्यापिठीय व्यवस्थेच्या बाहेर आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात अजिबात येत नाहीत. आपल्याकडील हुशार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या संशोधकांना काम करताना पाहण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे तसे काम करण्याची त्यांना प्रेरणाही मिळत नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात विद्यापीठांनी जी गती पकडली होती, ती आता लोप पावली आहे. मग तुम्ही व्यवस्थेकडून चांगल्या भौतिकशास्त्रज्ञांची अपेक्षा कशी काय करू शकता?

कृष्णन : ज्योतिष हे शास्त्र आहे का? ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरते का? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण चेन्नईतील सगळ्या गर्दी होणाऱ्या पुस्तकांच्या मोठ्या मोठ्या दुकानात ज्योतिष्याच्या पुस्तकांच्या राशी रचून ठेवलेल्या असतात.

नारळीकर : जेव्हा विज्ञानाच्या कसोटीवर ज्योतिष जेव्हा नाकारले जाते, तेव्हा ज्योतिषाचे पाठीराखे जो युक्तिवाद करतात, तो सर्वप्रथम आपण तपासून पाहूया. साधारण तो युक्तिवाद अश्या प्रकारचा असतो.

१. फलज्योतिषद्वारे भविष्य सांगताना ग्रहांची स्थिती अभ्यासली जाते. ही ग्रहस्थिती खगोलशास्त्राप्रमाणेच वैज्ञानिक निरीक्षणाद्वारे नोंदवलेली असते. जर खगोलशास्त्र  हे विज्ञान असू शकते तर ज्योतिष का नाही?

२. एखाद्या ज्योतिषाची सर्व भाकिते खरी ठरलेली असतात. ती कधीही चुकत नाही. अशा ज्योतिष्याच्या बाबतीत तरी आपण त्याला खोटा ठरवू शकत नाही. अशा ज्योतिषाचे फलज्योतिष तरी आपण विज्ञान म्हणून मान्यता द्यायला हवी.

३. हवामानशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचे उदाहरण पहा. हवामानाचे अंदाज चुकतात. डॉक्टरने केलेले रोगाचे निदानही अनेकदा चुकल्याची उदाहरण आपल्याला माहीत असतात. डॉक्टर बदलला की, रोगाचे निदान बदलते असाही अनुभव आपल्याला येतो. जर हवामानशास्त्र आणि वैद्यकशास्त्राला विज्ञानाची मान्यता मिळू शकते तर फलज्योतिषाला का मिळू नये?

४. काही ज्योतिषाची भाकिते खोटी ठरतात, कारण त्यांना ते शास्त्र नीट समजलेलं नाही किंवा न शिकताच त्यांनी ज्योतिषाचा धंदा टाकला आहे. असे ढोंगी लोक ज्योतिषाच्या व्यवसायात आहेत, हे खरोखर दुर्दैवी आहे. परंतु मुळ फलज्योतिष हे विज्ञानावरच आधारलेले आहे.

५. शास्त्रज्ञ आणि ज्योतिषाला नाकारणारे सगळेच म्हणजे ज्योतिष नीट अभ्यास न करता आणि पडताळून न पाहता विधाने करणारी अतिशय गर्विष्ठ मंडळी आहेत. 

या आरोपांचा सामना करताना, एखाद्या विषयाला ‘विज्ञान’ म्हणायचे झाल्यास कोणत्या गोष्टी पडताळून पाहणे गरजेचे आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. विज्ञान हे शतकानुशतकांपासून सिद्धान्त, प्रयोग आणि निरीक्षण (Theorzing, Experimentation and Observation) या निकषांवर उत्क्रांत झालेली प्रक्रिया आहे. गोल गोल फिरत वर जाणाऱ्या आणि न संपणाऱ्या जिन्यासारखी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. निसर्ग समजून घेताना एखादी नवी गोष्ट समजणे म्हणजेच या न संपणाऱ्या जिन्याची एखादी पायरी वर चढण्यासारखे आहे. खरोखर हा जिना चढताना अनेक घसरड्या वाटा आहेत आणि चुकीची वळणेसुद्धा आहेत. विज्ञानाचा इतिहास म्हणजे बनावट सिद्धान्तांचा, दिशाभूल करणाऱ्या प्रयोगांचा आणि चुकीच्या निरीक्षणांचा कचरा आहे. कोणताही शास्त्रज्ञ ही बाब मान्य करेल. याचसोबत तो हे ही मान्य करेल की, कोणत्याही काळात सर्व प्रश्नांचे उत्तर सापडल्याचे ठाम प्रतिपादन विज्ञान करू शकत नाही. उलट अनुभव तर असा आहे की, जेव्हा अशा जिन्यावरील एखादी पायरी जेव्हा आपण चढतो, तेव्हा ज्ञानाच्या अभावामुळे माहितीच नसलेले नवे मुद्दे आणि प्रश्न आ वासून उभे राहतात, ज्यांना प्रश्न म्हणून हाताळण्यासाठी आपली पूर्वीची समज पुरेशी नसते.

मग एखाद्या गोष्टीला आपण विज्ञान म्हणतो, तेव्हा ते कशाच्या बळावर म्हणू शकतो? तर विज्ञान म्हणजे मी खाली लिहीत आहे, त्या पद्धतीने स्वतःलाच लावलेली शिस्त आहे. कोणत्याही वैज्ञानिक सिद्धान्ताला त्याची मूलभूत गृहीतके स्पष्ट सांगावी लागतात. त्या गृहीतकांचे त्या तारखेला उपलब्ध असलेले पुरावे सादर करावे लागतात.

त्या गृहीतकांचे त्या तारखेला उपलब्ध असलेले पुरावे सादर करावे लागतात. जर काही ‘अंदाजे’ विधान करायचे असल्यास त्या अंदाजांमागील गृहीतकांची तार्किक चौकट तुम्हाला सादर करावी लागते. नुसते शब्दांचे खेळ करून चालत नाही आणि वेगवेगळ्या कोनातून त्या ‘अंदाजे’ केलेल्या विधानाकडे पाहताना मूळ गृहीतक बदलूनही चालत नाही. थोडक्यात गृहीतक आणि विधान यात एकवाक्यता हवी असते. अंदाजे केलेल्या विधानाची निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे चाचणी घ्यावी लागते. ती चाचणी वस्तुनिष्ठ असावी लागते. फक्त एखाद्याच ‘अ’ वैज्ञानिकाला योग्य उत्तर मिळते आणि वैज्ञानिक ‘ब’ आणि वैज्ञानिक ‘क’ ते निरीक्षण आणि प्रयोग करू शकत नाहीत असे कधीही होत नाही. प्रयोग आणि निरीक्षण अशा नियंत्रित पद्धतीने करावे लागतात की, त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांचे सांख्यिकीय विश्लेषणाद्वारे (Statistical Analysis) अर्थ लावता आले पाहिजेत. इतकी काळजी घेऊनही कोणताच सिद्धान्त तो पुर्णपणे निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही. आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताने न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला प्रश्न केले आणि तो सुधारला. परंतु अनेक नियंत्रित पद्धतीने केलेल्या निरीक्षण आणि प्रयोगांनंतर त्याला मान्यता मिळाली. या यशानंतरही आज कोणताही शास्त्रज्ञ असे मानत नाही की सापेक्षतावाद हाच गुरुत्वाकर्षणावरील शेवटचा शब्द आहे.

आता पुन्हा ज्योतिष्याच्या समर्थकांनी केलेल्या एका एका युक्तिवादाकडे बघू.

अ. खगोलशास्त्र वर लिहिलेल्या विज्ञानाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करते. फलज्योतिष्य करते का? त्याचे काही मूलभूत सिद्धान्त आहेत का? फक्त एखाद्या ज्योतिषाला नव्हे तर कोणालाही त्या विधानांचा वस्तुनिष्ठ अर्थ लावता येईल असे काही तर्कनिष्ठ नियम आहेत का? जर अंदाज केलेले विधान चुकले तर ज्या नियम आणि सिद्धान्ताच्या आधारे ते विधान केले गेले, ते नियम आणि सिद्धान्त नाकारले जातात का? या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असे आहे. उलट ज्योतिषाचे समर्थक असे म्हणतात की, त्यांचे शास्त्र परिपूर्ण आहे आणि ते अयशस्वी झाल्यास त्याचे खापर ते चुकीचा अर्थ लावणाऱ्यावर फोडतात. म्हणजे व्यक्तीनुरूप अर्थ बदलतो का? असे असेल तर मग या अभ्यासासाठीचे संदर्भपुस्तक कसे तयार करता येईल? आणि विषयात एकमत आणि एकवाक्यता असेलेले शिक्षक तरी कसे सापडतील?

ब. ज्योतिषांनी कदाचित कार्ल पॉपर हे नाव ऐकले नसेल आणि ऐकले असेल तर वैज्ञानिक सिद्धान्ताविषयी त्याने केलेल्या मांडणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले असेल. पॉपेरियन दृष्टीकोन असे सांगतो की, एक जरी अंदाज चुकला तरी तो वैज्ञानिक सिद्धांत बाद ठरवला पाहिजे. अंदाज बरोबर येणे गरजेचे असले तरी सिद्धान्ताला मान्यता मिळवण्यासाठी ते पुरेसे नाही. तुम्ही जर ‘एखाद्याला’ विचारले की, ज्योतिषांनी आतापर्यंत वर्तवलेल्या आणि अपयशी ठरलेल्या अंदाजांची संख्या काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नसेल.

क. हवामानशास्त्र आणि वैद्यकशास्त्र परिपूर्ण नाहीत हे मान्य आहे. परंतु हे विषय वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारलेले आहेत. हवामानशास्त्रामध्ये वातावरण आणि जमीनीच्या वेगवेगळ्या स्थिती अभ्यासून गणिते मांडलेली असतात. ज्या गोष्टींमुळे वातावरणाची आणि जमिनीची स्थिती तशी झाली ते समजून घेतलेले असते. वातावरणाच्या स्थितीची ही निरीक्षणे मानवाने तयार केलेल्या कृत्रिम उपग्रहाद्वारे केली जातात. या कृत्रिम निरीक्षणांमुळे हवामानशास्त्राद्वारे केल्या जाणाऱ्या अंदाजाचा दर्जा खूप हळूहळू सुधारतो आहे. वैद्यकशास्त्राने परिपूर्ण असल्याचा दावा कधीच केलेला नाही. जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानशास्त्र (Biology and Biotechnology) यामुळे माणसाचे शरीर अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजायला आपल्याला मदत झाली आणि रोगाचे निदान आणि उपचार यांचा दर्जा सातत्याने वाढत गेला. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा एखादे नवे औषध बाजारात येते, त्याआधी खूप काळ आणि गरज वाटल्यास काही वर्षे त्याचा अभ्यास आणि चाचण्या सुरू असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून कामगिरीतील काही सुधारणा फलज्योतिष्याने कधी दाखवली आहे का?

ड. ‘खऱ्या’ ज्योतिष्याने दरवेळी सांगितलेले अंदाज खरेच ठरतात म्हणून ज्योतिष्य हे शास्त्र आहे असे म्हणणे असेल तर ज्यांचे अंदाज चुकीचे ठरतात असे सगळे ज्योतिषी ढोंगी आहेत असा अर्थ होईल. अश्या प्रकारे तर कोणत्याच ज्योतिषाला ‘खरा' ज्योतिषी म्हणता येणार नाही. अशा वेळी फलज्योतिष्याद्वारे उपदेश करणाऱ्यांनी गंभीरपणे या गोष्टीकडे पहायला हवे की नको?

इ. आणि शेवटचा आक्षेप. ज्योतिष हे आधीच ग्रंथात बंदिस्त केलेले आहे, त्यात त्याच्या अभ्यासकांनी काय अभ्यास केला, ज्योतिषाच्या चाचण्या कशा घेतल्या, प्रत्येक अभ्यास हा ज्योतिषाचा अंदाज बरोबर येण्यासाठी कसा केला गेला हे लिहिले आहे. याच बळावर ते शास्त्र असल्याचा दावा केला जातो. परंतु एवढे सगळे करूनही ज्योतिषाच्या बाजूने कधी सकारात्मक निकाल देण्यात सातत्याने सर्वांना अपयश आले आहे.

एक सोपे उदाहरण घ्या. बरनी सिल्व्हरमॅन या मिशिगन स्टेट विद्यापीठाच्या मानसशास्त्रज्ञाने एक अभ्यास केला. ज्योतिषाच्या आधाराने पत्रिका आणि गुण जुळवून जी लग्ने ठरतात त्यांची यशस्वीता-अयशस्वीता बघण्यासाठी हा अभ्यास होता. या अभ्यासात आनंदाने लग्न झालेली आणि सोबत जगणारी २९७८ जोडपी निवडली गेली आणि ४७८ घटस्फोटीत जोडपी निवडली गेली. दोन प्रथितयश ज्योतिष्यांकडे या जोडप्यांच्या पत्रिका दिल्या गेल्या. (कोणत्या पत्रिका कोणत्या जोडप्याच्या आहेत हे त्यांना सांगितले गेले नाही.) कोणत्या पत्रिका जुळतात आणि कोणत्या नाहीत असा प्रश्न त्यांना केला गेला. सांख्यिकीय चाचणी घेतल्यावर असे आढळून आले की, त्या दोन प्रथितयश ज्योतिष्यांनी दिलेला निकाल आणि वास्तव यात खूप मोठी तफावत होती.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कृष्णन : तरीही ज्योतिष शास्त्र आपल्या देशात इतके लोकप्रिय का आहे?

नारळीकर : ज्योतिष्याला समाजात मान्यता असल्याचे आणि ते टिकून राहण्याचे एक महत्त्वाचे कारण असे आहे की, त्याकडे मानसशास्त्रीय उपचार म्हणून पाहिले जाते. दुःखी प्रसंगात, अवघड निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा, नैराश्यात असताना ज्योतिषी माणसाच्या मनाला समाधान देतो. अवघड परिस्थितीशी सामना करण्यापेक्षा एखाद्या ग्रहावर किंवा त्या ग्रहस्थितीचा अर्थ सांगणाऱ्या ज्योतिष्यावर त्या परिस्थितीची जवाबदारी सोपवणे सोपे असते. अशा वेळी तर्काला मानवी मनात अगदी शेवटचे स्थान असते.

‘बर्नम इफेक्ट’ नावाचा अजून एक मानसशास्त्रीय सिद्धान्त आहे. ‘बर्नम आणि बेली सर्कस’चे पी.टी.बर्नम यांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले असता ते म्हणाले की, आम्ही सर्कसमध्ये विविधता असलेल्या खूप गोष्टी एकामागून एक करतो. जरी प्रेक्षकांत बसलेल्या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी आवडल्या तरी प्रत्येक जण घरी जाताना ‘आपण काहीतरी भारी पाहिलं’ या भावनेने घरी जातो. फलज्योतिष जे अंदाज वर्तवतात त्याबाबतही असेच होते. आपल्या आयुष्याशी सुसंगत असणाऱ्या अंदाजांवर जास्त लक्ष केंद्रीत होते आणि विसंगत होणाऱ्या अंदाजांकडे दुर्लक्ष होते. अनेकदा ज्योतिष्याचे भविष्याचे अंदाज  'सगळंच सगळ्यांना लागू होईल, अशा शब्दांत बांधलेले असतात.

असा युक्तिवाद केला जातो की, लोकांना समाधान मिळत असल्याने आणि अवघड निर्णय घ्यायला मदत होत असल्याने ज्योतिष्याचे अस्तित्व टिकून राहील आणि ते फोफावेल. जर माणसाला स्वतःला ‘तर्क करणारा प्राणी’ म्हणवून घ्यायचे असेल तर चिंता करण्याची गरज आहे. ज्योतिष्याच्या भविष्यवाणीला कोणताही तार्किक आधार नाही. उलट त्याला शैक्षणिक दर्जा देणे, निर्णयप्रक्रियेचा, हवामान अंदाजाचा भाग बनवणे, शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करताना त्याची मदत घेणे हे काळाच्या खूप मागे जगण्यासारखे आहे. पश्चिमी देशांमध्ये तर ज्योतिष हा हसण्यावारी नेण्याचा विषय आहे आणि त्याला समाजात अजिबात आदरयुक्त स्थान नाही. आपल्या देशात मात्र समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याला गंभीरपणे घेतले जाते. शिक्षण, नोकरी, राजकारण या सर्व ठिकाणी ज्योतिष डोके वर काढते. लोक लग्न जुळवण्यासाठी, मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी, नवीन उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ज्योतिषाची मदत घेतात. विकसित देशांच्या दिशेने वाटचाल सुरू असणाऱ्या या देशात तर्कशुद्ध आणि कार्यक्षम नियोजन असणाऱ्या  मानव संसाधनांची गरज आहे. लोकांना अजून अंधश्रद्ध बनवून विकसित देश होण्याचे ध्येय गाठणे अवघड आहे.

कृष्णन : काही गुरू हवेतून वस्तू काढतात आणिचमत्कार करतात याकडे तुम्ही कसे पाहता?

नारळीकर : त्यावर अविश्वास ठेवण्यासारखं काहीही नाही. जादूगार पी. सी. सरकार म्हणायचे की, हे गुरू जे करतात ते सर्व आम्ही करू शकतो. गुरूंनी कधीही नियंत्रित परिस्थितीमध्ये हे काम केले नाही. कोणालाही खोलात जाऊन या क्रियेचे तपशील तपासणे शक्य नसते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कृष्णन : नील्स बोहरबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. त्याच्या प्रयोगशाळेच्या दरवाज्याजवळ एका सशाचे पाय लटकलेले असायचे- जे त्याच्यासाठी शुभशकुन होते. जेव्हा कुणीतरी त्यांना अशा प्रकारच्या दाव्यावर विश्वास आहे का, हे विचारले असता ते म्हणाले, ‘माझा नाही, पण लोक म्हणतात की माझा विश्वास नसेल तरीही त्याचा परिणाम होतो.’ या गोष्टी खरोखर खूप मनोरंजक आहेत. आपल्या देशात अंधश्रद्धांनी अमाप नुकसान केलेले आहे आणि त्यामुळे लोकांचे अपार बौद्धिक आणि भौतिक नुकसान झालेले आहे. अंधश्रद्धेच्या या राक्षसाशी आपण कसे लढू शकू?

नारळीकर : हे खूप अवघड आहे. एका बाजूला आपल्याकडे वास्तुशास्त्रासारख्या काल्पनिक शास्त्रांवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. जर तुम्ही लोकांना सांगितले की, याला काहीही शास्त्रीय आधार नाही, मग लोकांचे उत्तर असते की, खरंच तसं काही नसेल पण उगाच धोका कशाला पत्करायचा. दुसऱ्या बाजूला देवी-दैवतांना प्रसन्न करण्यासाठी भयानक कर्मकांड करणारे लोक आपल्याकडे आहेत. याला तोंड देण्यासाठी एकच उपाय म्हणजे प्रसार आणि लोकशिक्षण. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाचे जनआंदोलन आहे. या संघटनेचे कार्यकर्ते गावोगाव जाऊन चमत्काराच्या मागील विज्ञान लोकांना समजावून सांगतात. हे सर्व लोकांना समजावून सांगण्यामागे त्यांची अशी भावना आहे की, या सर्व घटनांबद्दल दैवी किंवा नैसर्गिक शक्तींना नियंत्रित करणारी कोणतीही शक्ती नाही. भुताने झपाटलेल्या घरात राहण्याचे आव्हान ते स्वीकारतात. पण अंधश्रद्धेविरुद्धची लढाई प्राथमिक शाळेतच सुरू झाली पाहिजे आणि यात शिक्षकांची प्रमुख भूमिका आहे. खरं तर शालेय अभ्यासक्रमात अंधश्रद्धांविरुद्ध लढण्यासाठी योग्य त्या धड्याचा समावेश करायला हवा. 

कृष्णन : धान्य सोडून भुसकटाबद्दल सांगत बसण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेला जो पारंपरिक ज्ञानाचा वारसा आहे, त्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. वैद्यकशास्त्राच्या बाबतीत तर विशेष हानी झाली आहे. उदाहरणार्थ एका तामिळ वाहिनीवर एक कार्यक्रम चालतो. त्या कार्यक्रमात कोणती तरी गमतीशीर डिग्री घेतलेला मुलगा त्याच्याकडेमानवाला ज्ञात असलेल्या सर्व आजारांवरील रामबाण उपायअसल्याचा दावा दर आठवड्याला करतो. शा तोतया लोकांपासून आपल्या पारंपरिक ज्ञानाचे रक्षण कसे करता येईल?

नारळीकर : पारंपरिक ज्ञानातील काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही घटक असे आहेत की, त्यांची त्वरित हकालपट्टी केली पाहिजे. त्यामुळे ही जबाबदारी वैज्ञानिक समुदायावर आहे. पारंपरिक व्यवस्थांची वैज्ञानिक कसोटीवर तपासणी केली पाहिजे. धान्य आणि भुसकट वेगवेगळे केले पाहिजे. हे सातत्याने आणि काळजीपूर्वक केले पाहिजे. हे करताना यातील चांगल्या ज्ञानाची खरोखर गंभीरपणे अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्ती नाराज होता कामा नये. थापेबाज बनावट बाबा अर्थातच नेहमी तेथे असतील. फक्त सातत्यपूर्ण शिक्षण आणि प्रयत्नांतून त्यांना वेगळं काढता येईल.

..................................................................................................................................................................

ही मूळ इंग्रजी मुलाखत पी. ए. कृष्णन यांच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. ती पाहण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......