स्व-खुशीनं न-नायकत्व स्वीकारणाऱ्या वाघसरांचा आणि उषाताईंचा ‘स्वॅग’च वेगळा आहे…
संकीर्ण - श्रद्धांजली
राम जगताप
  • विलास वाघ विलास वाघ (जन्म - १ मार्च १९३९, मृत्यू - २५ मार्च २०२१) आणि त्यांच्या पत्नी उषाताई वाघ
  • Mon , 12 April 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली विलास वाघ Vilas Wagh सुगावा प्रकाशन Sugava Prakashan आंबेडकरी साहित्य आंबेडकर कार्ल मार्क्स गौतम बुद्ध

सामाजिक कार्यकर्ते आणि प्रकाशक प्रा. विलास वाघ यांचं २५ मार्च २०२१ रोजी वयाच्या ८२व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेली काही महिने ते आजारीच होते. त्यामुळे करोना हे केवळ निमित्त होतं असंच म्हणावं लागेल. वाघसरांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी प्रसारमाध्यमांत बरेच लेख प्रकाशित झाले. त्यातले बहुतेक त्यांच्या सामाजिक कार्यावर भर देणारे होते. त्यात त्यांच्या ‘सुगावा प्रकाशन’ या प्रकाशनसंस्थेचा ओझरताच उल्लेख होता.

खरं तर ‘सुगावा प्रकाशन’ आणि त्यामार्फत वाघसर आणि त्यांच्या पत्नी उषाताई यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं, हा मराठी ग्रंथव्यवहारातला एक अतिशय वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग आहे. १९९६ साली कवयित्री शांता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आळंदीला ६९वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. त्यात ‘यशस्वी प्रकाशक’ म्हणून वाघ दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला होता. बहुधा त्याच वेळी ‘वि. पु. भागवत पुरस्कार’ हा प्रकाशनक्षेत्रातला मानाचा मानला जाणारा पुरस्कार ‘सुगावा प्रकाशना’ला देण्यात आला होता. हा पुरस्कार जाहीर करताना निवड समितीनं म्हटलं होतं – “या प्रकाशन संस्थेच्या ध्येयपूर्ण कामाबद्दल आम्हाला आजवर काहीच माहीत नव्हतं.”

तेव्हा खरं तर या पुरस्काराची बातमी वाचून प्रकाशनक्षेत्रातल्या आणि लेखन-वाचनाशी संबंधित असलेल्या अनेकांना ‘सुगावा प्रकाशन? ते कुठली पुस्तकं प्रकाशित करतात?’ असाच प्रश्न पडला असावा. पण त्याच वेळी सामाजिक चळवळीतल्या अनेकांना पुरस्कार निवड समितीला अखेर ‘सुगावा’चा शोध लागला, याचा सुखद धक्काही बसला होता.

त्यामागे अनेक कारणं होती. पहिलं असं की, सुगावा ही काही कथा, कविता, कादंबरी या साहित्य प्रकारातली पुस्तकं प्रकाशित करणारी प्रकाशनसंस्था नाही. ती फक्त वैचारिक स्वरूपाची पुस्तकं प्रकाशित करते, तीही प्रामुख्याने आंबेडकर-दलित चळवळीच्या संदर्भातली. दुसरं असं की, वाघ दाम्पत्य शिक्षण, आंतरजातीय-धर्मीय लग्न, जातीभेद-अस्पृश्यता, अनाथ मुलं अशा विविध प्रश्नांवर काम करणारं. शिवाय आंबेडकरवादी. बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसार करणारं. त्याच धारणेतून म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशातूनच त्यांनी ‘सुगावा’ मासिक आणि ‘सुगावा’ प्रकाशन सुरू केलेलं. त्यामुळे व्यावसायिक हेतूंपेक्षा त्यांचा समाजपरिवर्तनाचा हेतू प्रबळ होता. त्यांनी कधी ‘सुगावा’चं बोधचिन्हही करून घेतलं नाही. आजही ते तुम्हाला त्यांच्या पुस्तकांवर दिसणार नाही. परिणामी सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारी पुस्तकं महाराष्ट्रातल्या बहुतांश प्रकाशन संस्थांसारखी सर्वत्र सहजपणे उपलब्ध नसतात. ती मोजक्याच ठिकाणी मिळतात. सामाजिक चळवळींशी निगडीत असलेल्यांनाच साधारणपणे या प्रकाशनसंस्थेच्या पुस्तकांबाबत माहिती असते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपण प्रकाशनसंस्था कशासाठी चालवत आहोत आणि कुठल्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करत आहोत, याची अतिशय लख्ख जाणीव वाघसरांना आणि उषाताईंना सुरुवातीपासूनच होती. त्यामुळेच आपली पुस्तकं महाराष्ट्रातल्या प्रमुख पुस्तकांच्या दुकानात मिळत नाहीत किंवा ती महाराष्ट्रात सर्वदूर पोहचत नाहीत, याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. पण त्यांची पुस्तकं जिथं पोहचायला हवी असतात, तिथं ती पोहचतात. ज्यांना ती वाचायची असतात, ती ते मिळवून वाचतात.

‘सुगावा प्रकाशना’ची एकंदर कामगिरी पाहता त्याची अशोक शहाणे यांच्या ‘प्रास प्रकाशना’शी तुलना करायचा मोह होतो. शहाणे यांनी अनियतकालिकांच्या चळवळीचं नेतृत्व केलं आणि त्यातल्या अनेक लेखकांची पुस्तकंही प्रकाशित केली. त्यात अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ यांच्या कवितासंग्रहांचा समावेश आहे आणि ‘चाव्या’, ‘इसम’, ‘त्यांचा भारत’, ‘घर-दार’, ‘सिसिफस आणि बेलाक्वा’ (विलास सारंग), ‘माझी कहाणी’ (उस्ताद अल्लाउद्दीन खाँ), ‘प्रिय बाई’ आणि वृंदावन दंडवते यांची नाटकं अशा वैशिष्ट्यपूर्ण गद्य पुस्तकांचाही. प्रासचं प्रत्येक पुस्तक, त्याचा विषय, त्याचा आकार, त्याची मांडणी असं सगळंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रस्थापित साहित्याविरोधात बंडखोरी करणाऱ्यांचं साहित्यच प्रासने छापलं. त्यामुळे साहजिकच ती पुस्तकंही प्रस्थापित प्रकाशनसंस्थांच्या पुस्तकांपेक्षा वेगळी आहेत. शहाणे तर प्रस्थापित पुस्तकविक्रीच्या दुकानांतही प्रासची पुस्तकं विक्रीसाठी ठेवत नाहीत. ती पुण्याला डेक्कन जिमखान्यावरील ‘इंटरनॅशनल बुक डेपो’मध्ये मिळत किंवा मुंबईला फोर्टमधल्या ‘पीपल्स बुक सेंटर’मध्ये. थोडक्यात शहाण्यांचा ‘स्वॅग’च वेगळा होता, आहे.

तसंच काहीसं ‘सुगावा’चंही आहे. या प्रकाशनसंस्थेचं पुण्यात जिथं ऑफिस आहे, तिथपासूनच तिचं वेगळेपण सुरू होतं. तिचा पत्ता आहे – ‘५६२, सदाशिव पेठ, पुणे – ३०’. चित्रशाळा चौकात ‘पेशवाई क्रिएशन’ या प्रसिद्ध कापड दुकानाच्या समोर हे ऑफिस आहे. शिवाय पुस्तकं कुठली तर आंबेडकरी साहित्य व विचार, बौद्ध साहित्य, दलित साहित्य, म. फुले विचार, सामाजिक प्रश्न, हिंदुत्व विरोध, स्त्रीविषयक अशा विषयांवरील.

२००३ साली लोकवाङ्मय गृहाने ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ (भालचंद्र नेमाडे), ‘जागतिकीकरण आणि देशीवाद’ (रंगनाथ पठारे), ‘सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण’ (मकरंद साठे), आणि ‘ ‘असीम न्याया’चे गणित आणि ‘इन्स्टंट मिक्स’ लोकशाही’ (अरुंधती राय) अशा चार पुस्तिका प्रकाशित केल्या होत्या. त्याच सुमारास ‘उपकार, औदार्य आणि त्याग’ ही जुलै २००३मध्ये विजय तेंडुलकरांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अमेरिकेतील अधिवेशनात केलेल्या आणि गाजलेल्या (नेहमीप्रमाणे वादग्रस्त ठरलेल्या) भाषणाची पुस्तिकाही ‘अक्षर प्रकाशना’नं प्रकाशित केली होती. याशिवाय इतरही काही पुस्तिका (दुसरा ज्ञानेश्वर – मिलिंद बोकील इ.) प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा परिचय करून देणारा ‘माहिती आणि ज्ञानाच्या रेडिमेड कॅप्सूल्स’ असा एक लेखच ‘महाराष्ट्र टाइम्स’(११ एप्रिल २००४) या लौकिकप्राप्त दैनिकामध्ये प्रकाशित झाला होता.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पण अशा छोट्या स्वरूपाच्या पुस्तिका सुगावा प्रकाशन त्याच्या कितीतरी आधीपासून प्रकाशित करत आहे. ‘देशाचे दुश्मन’ (दिनकरराव जवळकर), ‘स्त्री-पुरुष तुलना’ (ताराबाई शिंदे), ‘महात्मा रावण’ (वि. भि. कोलते), ‘रावणाची सत्यकथा’ (रामनगीना सिंह), ‘हिंदू की सिंधू’ (भारत पाटणकर), ‘अराज्यवाद’ (पां. वा. गाडगीळ), ‘फॅसिझम अथवा संघटित भांडवलशाही’ (पां. वा. गाडगीळ), ‘फॅसिझम संघ परिवाराचा’ (अ. द. पुराणिक), ‘संघाचा असली चेहरा’ (भाई वैद्य), ‘राखीव जागांची शंभर वर्षे’ (य. दि. फडके), ‘वेश्याव्यवसाय लैंगिक अत्याचारच आहे’ (नंदकुमार पुरोहित), ‘सबलीकरण’ (शरद कुलकर्णी), ‘लोकशाहीला धोके’ (हर्बर्ट अगर, अनु. पन्नालाल सुराणा), ‘गांधीजींचे बलिदान’ (चुनिभाई वैद्य, अनु. मेघश्याम आजगावकर), ‘सनातनी धर्मग्रंथांची मानवघातकी शिकवण’ (का. शि. संकाये) अशा कितीतरी पुस्तिका सुगावा प्रकाशनाने आजवर प्रकाशित केलेल्या आहेत.

त्याचबरोबर डॉ. रावसाहेब कसबे यांची ‘मानव आणि धर्मचिंतन’, ‘धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह’, ‘आंबेडकर आणि मार्क्स’, ‘झोत’, ‘आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार’, ‘डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’ ही पुस्तकं; चां. भ. खैरमोडे यांच्या ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ या चरित्राचे अनेक खंड, कॉ. शरद पाटील यांची पुस्तकं; ‘महाभारतातील स्त्रिया’, ‘विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा’ अशी आ. ह. साळुंखे यांची पुस्तकं आणि ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती’, ‘अस्पृश्य मूळचे कोण होते आणि ते अस्पृश्य कसे बनले?’, ‘राम आणि कृष्णाचे गौडबंगाल’ अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं सुगावाने प्रकाशित केलेली आहेत.

१९९७ साली अरुण शौरी यांचं ‘Worshipping False Gods : Ambedkar and the facts which have been erased’ हे पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर वादग्रस्त ठरलं. तेव्हा त्या पुस्तकावरील टीका व प्रतिक्रियांचं संकलन असलेलं ‘ब्राह्मणी आक्रोश’ (संकलक विलास वाघ) हे पुस्तक सुगावाने लगेचच प्रकाशित केलं होतं. किंवा स्वाध्याय परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले यांचा महाराष्ट्रात गवगवा चालू झालेला असताना सुगावाने ‘शासनपुरस्कृत मनुवादी : पांडुरंगशास्त्री आठवले’ ही शेषराव मोरे यांची पुस्तिका प्रकाशित करण्याचं धाडस दाखवलं होतं.

२०१४ साली गौहत्येच्या अफवांवरून ‘मॉब लिंचिंग’चे प्रकार भारतात घडू लागले, तेव्हा सुगावाने ‘गोहत्या – एक यक्षप्रश्न’ (संपा. अ. भि. शहा), ‘गाईचे अर्थशास्त्र’ (वि. म. दांडेकर), ‘गाईचे मिथक’ (द्विजेंद्रनारायण झा) अशी तीन पुस्तकं महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित केली होती. 

‘नरक - सफाईची गोष्ट’ (अरुण ठाकूर, महमद खडस), ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ (प्रदीप गोखले), ‘संत चोखामेळा विविध दर्शन’ (ऍलिनॉर झेलियट, वा. ल. मंजूळ), ‘नक्षलवादी आणि आदिवासी’ (गोविंद गारे), ‘गांधी आणि आंबेडकर’ (गं. बा. सरदार), ‘बौद्ध धर्मातील स्त्रीविचार’ (लता दिलीप छत्रे), ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह’ (य. दि. फडके), ‘महाराष्ट्रातील विषमता आणि गरिबी, सांपत्तिक असमानता व जातीय भेदभावाचा प्रश्न’ (सुखदेव थोरात), ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ (धर्मानंद कोसंबी), ‘गीता तत्त्वज्ञानाची उलटतपासणी’ (शशिकांत हुमणे), ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ (हमीद दलवाई) अशी पुस्तकं ही तर सुगावाची खासीयतच आहे.

मुळात त्यांचा पिंड आणि जडणघडण ही सामाजिक कार्यकर्त्यांची. त्यामुळे साधं राहणीमान, वागण्या-बोलण्यात साधेपणा आणि बंडखोरी करायची तीही साधेपणानंच. समाज आक्रस्ताळेपणा किंवा उरबडवेपणा करून बदलत नाही आणि सततच्या धक्क्यानेही बदलत नाही. त्यामुळे केवळ काही लाटा निर्माण होतात. त्या काही काळानं विरून जातात. समाजात बदल व्हायचा असेल तर सातत्यानं, चिकाटीनं आणि जिद्दीनं पण शांततापूर्वक काम करावं लागतं. आपल्याला जो विचार पटला आहे, त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. कामात गाडून घ्यावं लागतं. बंडखोरीला विचारशीलतेची आणि तर्कशुद्ध युक्तिवादांची जोड द्यावी लागते. आणि जे आपल्यासह येतील त्यांना बरोबर घेऊन पुढे जावं लागतं. आपल्या कामाला चळवळीचं स्वरूप द्यायचं असेल आणि ती समाजातल्या तळागाळापर्यंत पोहचायची असेल तर दीर्घ काळाचं नियोजन करावं लागतं. आपल्यासोबत असलेल्यांची संख्या मोजण्यापेक्षा त्यांच्या विचाराची दिशा योग्य राहील, याची काळजी घ्यावी लागते. येतील त्या कार्यकर्त्यांसह आणि जातील तिथवर विचार नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी चिकाटी, संयम लागतो. त्यागाची भाषा बोलता कुणालाही येते, पण त्यागमय जीवन जगणं सोपं नसतं. पण तीच जेव्हा तुमची जीवनशैली होते, तेव्हा तुम्हाला कुठल्याही बडेजावाची किंवा डामडौलाची गरज राहत नाही. तुमचा साधेपणा आणि कळकळ समोरच्याला बरोबर प्रतीत होते. तो तुमचं म्हणणं लक्ष देऊन ऐकतो, मग तो विरोधकही असला तरी. वाघसर व उषाताई या सगळ्यांचं मूर्तीमंत उदाहरण होते.

वाघसर एकदा मला म्हणाले होते, ‘आम्ही सदाशिव पेठेत राहून अशी स्फोटक पुस्तकं प्रकाशित करतो तरी अजून आमच्यावर कुणी हल्ला करत नाही, हे नशीबच म्हणायचं!’ त्यांचं म्हणणं खरंच होतं. पण त्यामागचं कारण होतं की, सुगावा प्रकाशनामार्फत ते प्रकाशित करत असलेली पुस्तकं हिंदू धर्म, जातव्यवस्था, हिंदुत्ववाद यांना आव्हान देणारी, ते नाकारणारी असली तरी या दाम्पत्याकडे तुच्छता नव्हती. विरोधकांविषयी बोलतानाही त्यांच्या शब्दांमध्ये कधीही द्वेष, तिरस्कार, तिटकारा नसे. सदाशिव पेठ, चित्रशाळा चौकात राहून त्यांनी कधी आजूबाजूच्या समाजाविषयी कटुता व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं नाही.

२००३मध्ये मौज प्रकाशन गृहातर्फे ‘डॉ. आंबेडकरांचे अंतरंग’ हे चरित्रपर पुस्तक प्रकाशित झालं. त्याची थोडीफार चर्चा होऊ लागली, तेव्हा मी वाघसरांना त्याच्याविषयी त्यांचा अभिप्राय विचारला होता. त्यांनी ते वाचलं होतं. गोखले यांच्या अनेक निष्कर्षांविषयी त्यांचा मतभेद होता. विशेषत: गोखले यांनी आंबेडकरांसाठी जी अनेक विशेषणं वापरली होती, ती त्यांना मान्य नव्हती. ‘गोखले यांनी अभ्यास चांगला केलाय, पण त्यांचे काही निष्कर्ष पटण्यासारखे नाहीत. कारण त्यांचे पूर्वग्रह त्यांना सोडता आलेले नाहीत’, या शब्दांत वाघसरांनी आपली भावना व्यक्त केली. इतक्या साध्या शब्दांत इतर कुठल्या आंबेडकरवाद्याने प्रतिक्रिया दिली असती, असं मला तेव्हाही वाटलं नव्हतं आणि आजही वाटत नाही. चढा सूर आणि आक्रस्ताळी भाषा हा वाघसर काय किंवा उषाताई काय यांचा स्वभावच नव्हता.

म्हणूनच ते कधी हिंदूधर्मावरही तोंडसुख घेतानाही दिसले नाहीत. त्यांना आवडणाऱ्या बुद्ध, मार्क्स, आंबेडकर, फुले यांचा पुरस्कार मात्र ते सदोदित करत. त्या विचारांचा प्रचार-प्रसार करणारी पुस्तकं छापत. समाजावर हल्ला करून आपला विचार त्याच्या गळी उतरवण्याची आकांशा वाघसर व उषाताई यांनी कधीच बाळगली नाही. ते शांतपणे आपले काम करत राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध चळवळीतली अनेक माणसं त्यांच्याशी जोडली गेली.

सुगावाचं ऑफिस आणि वाघ दाम्पत्याचं घरही चित्रशाळा चौकात होतं, हे खरं, पण त्यांच्या ऑफिसमध्ये लोक असायचे ते प्रामुख्यानं बाहेरगावाहून आलेले... सामाजिक संस्था-चळवळींशी निगडित असलेले. आंबेडकरांचे पाईक किंवा त्यांच्याविषयी जाणून घ्यायला उत्सूक असलेले. त्यांच्या दुकानाच्या दर्शनी शोकेसमध्ये कितीतरी पुस्तकं लावून ठेवलेली होती. पण त्या पुस्तकांची भुरळ त्या भागात राहणाऱ्यांना फारशी कधी पडली नाही. ती पडायची महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांना.

थोडक्यात सुगावाचा ‘स्वॅग’च वेगळा होता. आणि त्याचे शिल्पकार होते वाघसर व उषाताई. आयुष्यभर त्यांनी निष्ठेनं आपलं काम केलं. उषाताई सुगावाची पुस्तक विक्री, वसुली, ऑर्डर्स हा भाग पाहत; तर वाघसर पुस्तकाची छपाई, कागद, चित्रकार हा निर्मितीचा भाग पाहत. कुठलं पुस्तकं छापायचं यावरून त्यांचे मतभेद सहसा होत नसत. कारण त्यांची विचार करण्याची पद्धत एकसारखीच होती. महाराष्ट्राभरातल्या विविध चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क होता. कुणाच्या राहण्याची सोय करणं, कुणाच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणं किंवा कुणाचं लग्न जमवून देणं… ही त्यांची आवडती कामं. 

हे दाम्पत्य काही काळ झोपडपट्टीतही राहिलं होतं. उषाताई मूळच्या कुलकर्णी. पण त्यांचं लव्ह-मॅरेज नाही, अरेंज्ड मॅरेजच. पण त्या लग्नाच्या आधीपासूनच वाघसरांशी पूर्णत्वानं एकरूप झालेल्या. माणसं, त्यांची चळवळ हाच त्यांचा ऑक्सिजन आणि तेच त्यांचं बलस्थान. मुळात या दाम्पत्याला ना सामाजिक कामाची पार्श्वभूमी होती, ना प्रकाशनाची. पण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी त्यांची नाममुद्रा उमटवली.

जातीनिर्मूलनाबाबत त्यांचं एकमत होतं, तसंच निधर्मीपणाबद्दलही. हिंदुत्ववादी विचार, हिंदूधर्माचा दोघांनाही तिटकारा. बौद्ध तत्त्वज्ञान, डावा विचार याचे ते पुरस्कर्ते. मार्क्सवाद, आंबेडकर-फुले हा त्यांचा प्रवाह. समाज मार्क्सवादानं बदलो, नाहीतर बुद्धाच्या तत्त्वज्ञानानं, पण तो विचार जेवढ्या प्रकर्षानं पुढे आणता येईल, तेवढा आणण्याचं काम त्यांनी त्यांच्या चळवळीतून आणि सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून केलं.

वाघसर आणि उषाताई या दाम्पत्यामध्ये मोठे तर सोडाच, पण छोटेही मतभेद कधी दिसले नाहीत. त्यांच्या स्वभावात मात्र भिन्नता होती. वाघसर मांसाहारी तर उषाताई शाकाहारी. वाघसर प्रेमळ तर उषाताई परखड. वाघसर बेशिस्त तर उषाताई शिस्तप्रिय. वाघसर प्रसंगी तत्त्वाला थोडीफार मुरड घालणारे तर उषाताई तत्त्वनिष्ठ. वाघसर प्रसंगी कार्यकर्त्यांची एखाद-दुसरी लबाडीही खपवून घेत, तर उषाताई नेमक्या उलट. पण दोघांचंही सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातल्या कामाविषयी एकमत. धर्माला दोघांचाही कडाडून विरोध. जातीभेदाचा दोघांनाही मनस्वी तिटकारा. जातनिर्मूलनावर दोघंही तितकेच ठाम. नवी समाजरचना निर्माण व्हावी आणि ती जातीविरहित असावी हे दोघांचंही स्वप्न. पण हे काम प्रचंड मोठं आहे आणि ते आपल्या हातून होणार नाही, याचीही दोघांनाही पूर्ण जाणीव होती. पण तो विचार लोकांपर्यंत, विशेषत: तरुणांपर्यंत पोहचवण्याचं काम त्यांनी आयुष्यभर मोठ्या उमेदीनं, जिद्दीनं आणि तत्त्वनिष्ठेनं केलं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना उतारवयात नैराश्य तरी येतं किंवा ते तारुण्यात केलेल्या कामाच्या नॉस्टॅल्जियामधून तरी बाहेर पडत नाहीत. वाघसर आणि उषाताईंना उतारवयातही नैराश्य आलेलं दिसलं नाही. आणि तारुण्यातील कर्तबगारीचा पवाडाही त्यांच्याकडून कधी ऐकायला मिळाला नाही. बघावं तेव्हा ते कामात असत. वयोपरत्वे त्यांचं शरीर थकलं, चालण्या-बोलण्यावर मर्यादा आल्या, पण त्यांची जिद्द आणि आशावाद मात्र कायम बुलंदच वाटत राहिला. शारिरीक व्याधींचा बागुलबुवाही त्यांच्या बोलण्यात फारसा डोकावत नसे.

आता वाघसर नाहीत, उषाताईही वयोपरत्वे थकल्या आहेत. सुगावाचं काम त्यांनी आधीच दोन कार्यकर्त्यांकडे सोपवलं आहे. या दाम्पत्यानं शिक्षणसंस्था, अनाथालय, सहकारी पतसंस्था ज्या निष्ठेनं चालवली, त्याच निष्ठेनं त्यांनी सुगावा प्रकाशनही चालवलं. समाजाला आपली कदर नाही, जाणीवपूर्वक आपली दखल घेतली जात नाही, अशी खंत त्यांच्या बोलण्यात कधीही जाणवली नाही. हे दाम्पत्य आपल्या विचारानंच इतकं झपाटून गेलेलं होतं की, त्यांना मानसन्मान, नावलौकिक, गुणगौरव, सत्कार-समारंभ, पुरस्कार यांची इच्छा-आकांक्षा बाळगायलाही कधी फुरसत झाली नसावी. त्यांचा खरा मानसन्मान त्यांच्या विचारांचं वर्तुळ विस्तारीत करण्यातच होता. आणि तेच ते करत राहिले.

महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींतली अतिशय साधेपणानं पण ध्येय व तत्त्वनिष्ठेनं वागणाऱ्या, जगणाऱ्या दाम्पत्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. पण स्व-खुशीनं न-नायकत्व स्वीकारणाऱ्या आणि निरंहकारी, निर्विष, निष्कपटपणे जगणाऱ्या वाघ दाम्पत्याचा ‘स्वॅग’ वेगळाच म्हणावा लागेल.

..................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......