सामान्य माणूस कल्पकतेने विचार करून एक मूलभूत मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्याची मागणी तयार करून चिकाटीने लढून जिंकू शकतो, हे दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं!
संकीर्ण - श्रद्धांजली
विजय तांबे
  • दत्ता इस्वलकर (जन्म -, मृत्यू - ७ एप्रिल २०२१)
  • Mon , 12 April 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली दत्ता इस्वलकर Datta Iswalkar गिरणी कामगार Textile Mill Worker गिरणगाव Girangaon बंद गिरणी कामगार संघर्ष सामिती

अंदाजे आठ-नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. नरीमन पॉइंटमधील कुठल्या तरी इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून अॅडव्हर्टायझिंग एजन्सीतल्या मित्रांबरोबर एका जाहिरातीवर मराठीतून बोलत आम्ही लिफ्टमधून खाली निघालो. बाहेर पडताना लिफ्टमनचा आवाज ऐकू आला ‘मुलाला कुठं नोकरी मिळू शकेल का?’ एकदम चर्र झालं. उलटा फिरलो. लिफ्टमन खूप वयस्कर होते. आयुष्यात पूर्णपणे विझलेला माणूस दिसत होता तो. मी विचारलं, ‘दादा, किती वर्ष लिफ्टमनचं  काम करताय?’ खूप कोरडेपणानं म्हणाले, ‘जास्त नाही.’ मान खाली घालून नंतर आवंढा गिळत म्हणाले, ‘आधी गिरणीत होतो’. मी चटकन त्यांचा हात धरला. आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. तोपर्यंत दुसरी माणसे लिफ्टमध्ये शिरली. मी त्यांचा हात थोपटून बाहेर आलो. या लिफ्टमनकाकांची  वेदना आणि त्यांनी  खूप काही सोसलेलं मला भाजल्यासारखं जाणवलं. याचं कारण दत्ता इस्वलकर.

मुंबई शहरानं देशाला मोठे मोठे कामगार नेते दिले. कामगार चळवळीचा जन्मच मुंबईतला. आणि कामगार म्हणजे गिरणी कामगार. स्वातंत्र्यानंतर मुंबई शहराचे नेते हे कामगार नेते होते. अशोक मेहता, कॉ. डांगे, जॉर्ज फर्नांडिस यांना या शहराने भरभरून प्रेम दिलं. जॉर्ज फर्नांडिस दिल्लीच्या राजकारणात गुरफटल्यावर डॉ दत्ता सामंत मुंबईतील कामगारांचे नेते बनले. इंजिनिअरिंग उद्योगात डॉ. सामंतांचा जबरदस्त प्रभाव होता. दीर्घ काळ संप आणि भरघोस पगारवाढ ही डॉ. सामंतांची वैशिष्ट्ये होती. गिरणी कामगारांनी डॉ. सामंतांना आपले नेते बनवले आणि १९८२ साली मुंबईतील गिरणी कामगारांचा संप सुरू झाला.

गिरणगावात विविध विचारांच्या संघटना काम करत होत्या. राष्ट्र सेवादल आणि समाजवादी मंडळी पूर्वीपासून होती. मॉडर्न मिलमधील जॉबरचा मुलगा दत्ता इस्वलकर सेवादल आणि समाजवादी मित्रांमध्ये रमला. १९७०च्या नंतर दत्ता इस्वलकर वडिलांच्या मिलमध्येच कामाला लागला. मिल मजदूर सभेच्या प्रभाकर मोरेंबरोबर त्याची जवळीक होती. आणीबाणीच्या काळात भूमिगत कामे करण्याऱ्या समाजवादी गटात तो सहज सामावला गेला. त्यानंतरच्या काळात राष्ट्र सेवादलाच्या चौकटीच्या पलीकडे काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांचा वेगळा गट, समता आंदोलन म्हणून स्थापन झाला. दत्ता त्यामध्ये होताच. समता आंदोलनच्या स्थापनेपासून तो गिरणी कामगारांचे विविध प्रश्न संघटनेत मांडत होता. १९८७ मध्ये दत्ताच्या नेतृत्वाखाली समता आंदोलनच्या मंडळींनी एकंदर वस्त्रोद्योग उद्योगाचा अभ्यास सुरू केला. मार्गदर्शक होते बगाराम तुळपुळे. त्याची फलश्रुती म्हणजे समता आंदोलनाने आयोजित केलेली वस्त्रोद्योग परिषद.  परिषदेचे अध्यक्षस्थानी  बगाराम तुळपुळे होते व  उद्घाटन डॉ. दत्ता सामंतांनी केले होते. अजूनही गिरण्या फायद्यात चालवून कामगारांनाही योग्य वेतन देता येईल, अशी मांडणी या परिषदेत केली गेली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गिरणी संप पूर्ण फसला होता. संप कधी मागे घेतला गेलाच नाही. गिरणी कामगार खचला. मालकाकडून मिळतील तेवढे पैसे घेऊन तो देशोधडीला लागला. गिरण्या बंद पडल्या. गिरणगाव उखडला गेला. दीड पावणेदोन कोटी लोकसंख्येच्या शहरातील दहा लाख लोकं उपासमारीत ढकलले जात होते. तो काळ  फार कठीण होता. त्याच वेळी ठाणे तळोजा पट्ट्यातील केमिकल उद्योगही बंद पडत होते. गिरणी संपात पोळलेल्या अडीच लाख कामगारांचे भवितव्य काय याबद्दल कोणत्याच राजकीय पक्षाकडे किंवा युनियनकडे उत्तर नव्हते. कामगार हताश होउन विझत चालला होता. त्या काळात दत्ता अनेकांशी बोलत होता. त्यातूनच २ ऑक्टोबर १९८९ रोजी दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘बंद गिरणी कामगार संघर्ष समिती’ची स्थापना केली. त्याचे सोबती त्याच्यासारखेच गिरणी कामगार होते.

या समितीत अति डाव्यांपासून सेनेपर्यंत सर्व विचारांची मंडळी होती. दत्ता समितीचे अध्यक्ष होता. आतापर्यंतच्या कुठल्याही कामगार आंदोलनापेक्षा ‘बंद गिरणी कामगार संघर्ष समिती’पुढील आव्हाने अत्यंत खडतर होती. एकतर ते मुळातच लढाई हरलेले होते. कामगार जगण्यासाठी मिळेल तो रोजगार करत होते. अनेक जण गावाकडे परतले होते. कोणाला घेऊन लढाई करायची? आणि हरलेल्या लढाई नंतर आपल्या मागण्या कोणत्या असतील? या दोन मोठ्या समस्या होत्या. मुंबई शहरात जमिनींच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. गिरण्यांच्या मालकीची सहाशे एकर जमीन मध्य मुंबईत होती. गिरणी मालकांना घसघशीत लॉटरी लागली होती. गिरणी मालकांना जमीन विकण्यासाठी शासनाची परवानगी हवी होती. ही मुंबई गिरणी कामगारांच्या घामातून घडली आहे. बंद गिरण्यांच्या जमिनीवर फक्त मालकांचा हक्क नाही, तर गिरणी कामगारांचादेखील आहे. त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा. म्हणून गिरणी कामगारांना हक्काने स्वस्त दारात घरे मिळायला हवीत, अशी मागणी मांडली गेली.

या लढाईत गिरणी कामगार मिलच्या गेटवर भेटणार नव्हते. सगळे कामगार विखुरले होते. जवळपासच्या कामगारांना भेटता येत होते. गावाकडे गेलेल्या कामगारांना भेटण्यासाठी दत्ता आणि त्याच्या सोबत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या कामात महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांची मदत घेतली गेली. कामगारांशी संपर्क होत गेला. संघटन उभे राहिले. मात्र आंदोलन किंवा मोर्चासाठी कामगारांना आताचा रोजगार बुडवून येणं शक्य नव्हतं. रोजगार बुडवणं म्हणजे घरात चूल न पेटणे असा अर्थ होता. तरीही आपल्या मागण्यांमध्ये सातत्य टिकवणे, हरलेल्या कामगारांचे मनोधैर्य टिकवणे, आपल्या मागण्या विविध मार्गांनी पुढे रेटत राहणे, ही अतिशय कठीण कामे दत्ताने अथकपणे केली.

दत्ता मॉडर्न मिलमध्ये साधा क्लार्क होता. आकर्षक व्यक्तिमत्त्व, प्रभावी भाषण करणारा असं काही त्याच्यात नव्हतं. आक्रमकपणा तर अजिबात नव्हता. मात्र त्याची कामाबद्दलची तळमळ अफाट होती. सखोल राजकीय जाण आणि आपल्या मागण्यांबद्दलची स्पष्टता यामुळे दत्ताला टाळणे कुठल्याही राजकीय नेत्याला जमले नाही. गिरणी मालक असो वा मुख्यमंत्री, दत्ता बोलायला लागल्यावर समोरच्याला अपराधीपणाची बोच निर्माण होई. त्यामुळे दत्ताचे मागणे रास्त आहे, त्याला बाहेर काढता येणार नाही, याची जाणीव त्यांना होई. त्याच्या मागण्यांना थेट नकार मिळाला नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दत्ताची चिकाटी अफाट होती. गेल्या ३० वर्षातील सर्व मुख्यमंत्र्यांकडे त्याने आपल्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी थोडी प्रगती होत असे. आपल्या भागातील आणि ओळखीच्या आमदारांना सभागृहात प्रश्न विचारायला लावत असे. शासनावर दबाव आणणायासाठी उपोषणासह अनेक कल्पक मार्गांचा वापर त्याने केला. लहान मुलांनी घरच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली. मुलांचा मोर्चा निघाला. घर चालवणाऱ्या गृहिणींचे मोर्चे निघाले. अगस्त क्रांतीच्या सुवर्ण महोत्सवाच्या समारंभात चड्डी-बनियन मोर्चा काढून गांधीजींचे खरे वारसदार आम्हीच आहोत असे जाहीर केल्यावर पोलिसांनी लाठीमार केला मात्र शासनाला खडबडून जागे केले. अति डाव्यांपासून सेनेपर्यंत सगळ्या विचारांचे सदस्य समितीत असूनही आंदोलन कायम शांततामय मार्गाने केले गेले.  महंमद खडस आणि गजानन खातू या ज्येष्ठ समाजवादी साथींनी दत्ताला कायम साथ दिली.

मुंबईत गिरणी कामगारांसाठी कायम सहानुभूती होती. गिरणगाव हे मुंबईचे एकेकाळचे सांस्कृतिक केंद्र होते. या दोन्हीचा मिलाफ करत दत्ताने मुंबईच्या सहानुभूतीला योग्य वळण लावले. मुंबईतील नाट्य आणि सिने कलावंत, लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते बंद गिरणी कामगार समितीच्या मागण्यांना पाठिबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. सामाजिक भान असलेली विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी आंदोलनाचा आधार बनली. बाहेरून मिळणाऱ्या  पाठिंब्यामुळे  कामगारांना उभारी मिळाली.  मागण्यांची योग्य काटेकोर पद्धतीने मांडणी करण्यासाठी व्यावसायिक मित्रमैत्रिणींची मदत झाली. शासनाने जमिनीच्या एक तृतीयांश वाटा गिरणी कामगारांचा ठरवला आणि त्यातून टप्प्याटप्प्याने स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. दत्ता आणि सोबत्यांचा हा मोठा विजय होता.

न्यायालयात अर्ज करून हा हक्क मिळवता आला असता का? न्यायालयात जाणे म्हणजे कोणाच्या तरी विरुद्ध जाणे होणार. निकाल कोणाच्याही बाजूने लागू दे. दुसरा पक्ष वरच्या न्यायालयात जाणार. हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालणार. अंतिम निकालाला किती वेळ लागेल सांगणे कठीण. तसंच समजा गिरणी कामगारांच्या विरुद्ध निकाल लागला तर सगळेच दरवाजे बंद झाले असते. त्यापेक्षा दत्ता आणि त्याच्या सोबत्यांनी संवाद आणि शासनावर विविध मार्गांनी दबाव टाकण्याचा मार्ग अवलंबला. काँग्रेस, सेना, भाजप सर्वांनाच समजावण्याचे काम त्यांना करावे लागले. त्यामुळे त्यांना शत्रूपक्ष नव्हता.

दत्ता ‘बंद गिरणी कामगार संघर्ष सामिती’चा अध्यक्ष होते. त्याने राजकीय महत्वाकांक्षा बाळगली असती तर? कदाचित आमदार झालेही असता. पण प्रश्न सुटण्याला अडचण निर्माण झाली असती. कुठल्याही पक्षात गेल्यावर त्या पक्षाचे नियम पाळावे लागतात. तसंच तुम्ही एका पक्षात आहात म्हणजे इतरांच्या विरोधी असता. कुठल्याही राजकीय आकांक्षा नसलेल्या व्यक्तीशी संवाद साधणे सत्ताधाऱ्यांना नेहमीच सोपे जाते. थेट प्रश्नापर्यंत पोचता येते याची जाण दत्ताला होती. संपाच्या वाताहतीत राजकीय पक्षांचा काय वाटा होता, हे दत्ताने जवळून पाहिले होते. दत्ताने जाणीवपूर्वक प्रश्न सोडवण्याकडे लक्ष केंद्रित केले. आजपावेतो पंधरा हजारपेक्षा जास्त गिरणी कामगारांना स्वस्त दराने म्हाडाची घरे मिळाली. त्यापुढील घरांची लॉटरी काढण्याचे काम चालू आहे.

बंद पडलेल्या गिरण्यांच्या कंपाउंडमधील चाळींमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांना घरे खाली करण्याच्या  नोटीसा मालकांनी दिल्या. दत्ताने हा प्रश्न लावून धरला. कामगारांचा चाळीत राहण्याचा हक्क मान्य करण्यात आला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इथे मी दत्ताला एकेरी संबोधलं आहे, खरं तर आदरार्थी लिहायला हवं. पण खरंच मी गोंधळलो आहे. माझ्यासारख्या अनेकांसाठी दत्ता कितीही मोठा झाला तरी तो दत्ताच होता. त्याचे वागणे अगदी पूर्वीसारखेच राहिले. आम्हा दोघांमध्ये जवळजवळ एक पिढीचं अंतर होतं. पण मला ते कधीच जाणवलं नाही. दत्ता अतिशय दिलखुलास आणि मिस्कील असला तरी सगळ्याला मोहक मालवणी छटा होती. किस्से  खुलवून सांगण्यात  त्याची हातोटी होती. त्याच्या पारदर्शक प्रेमळपणातून अनेक मित्र जोडले गेले. दत्ताला व्यक्तिगत लाभाची कुठलीच अपेक्षा कधीच नसल्याने मैत्रीमध्ये अकृत्रिमपणा जोडला जाई म्हणूनच गिरणी कामगारांच्या घरांसाठी लढणारा दत्ता मॉडर्न मिल कंपाउंडमधील जुन्या सिंगल रूममध्ये राहिला. तसा गिरणगाव, गिरणी संप आणि माझा संबंध आला नसता. घरातल्या वातावरणामुळे सेवादलात गेलो. तिकडे दत्ता भेटला. त्याच्या नजरेतून गिरणगाव पाहिला.

गिरणी संपानंतर मुंबई पार बदलली. लालबाग, परळ बोलायची लाज वाटू लागली म्हणून ‘अप्पर वरळी’ हे नवीन नाव तयार झालं. मॉल आले. गगनचुंबी इमारती सर्वत्र दिसू लागल्या. डेकोरेशन म्हणून काही ठिकाणी गिरण्यांच्या चिमण्या जतन करून ठेवल्या. संप संपल्यावर पुढे काय याचं उत्तर पाठ्यपुस्तकात सापडत नाही आणि नवीन शोधण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. गिरणी संपानंतर सगळे राजकीय पक्ष आणि संघटना नवीन मार्ग न शोधल्याने परिस्थितीशरण होते. दत्ता आणि त्याच्या साथीदारांनी नवा मार्ग शोधला. तुमच्या मालमत्तेत आमचाही वाटा आहे, हे त्यांच्याकडून मान्य करवून घेतलं. हे सगळं करत असताना दत्ताला दुर्धर व्याधी जडली. हालचालींवर मर्यादा आली. तरीही त्याचं काम अखंड चालूच होतं.

सामान्य माणूस कल्पकतेने विचार करून एक मूलभूत मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्याची मागणी तयार करून चिकाटीने लढून जिंकू शकतो, हे दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं. पुढचा काळ अधिक कठीण आहे. लढाया अधिक खडतर होणार आहेत. त्या वेळी पुस्तकापेक्षा कल्पकतेला अधिक महत्व राहणार असल्याने दत्ताची आठवण कायम येत राहील...

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......