राणीचा जोडीदार
पडघम - विदेशनामा
मंदार काळे
  • ब्रिटनची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि तिचा पती प्रिन्स फिलिप
  • Sat , 10 April 2021
  • पडघम विदेशनामा द क्राऊन The Crown राणी एलिझाबेथ (दुसरी) Queen Elizabeth II प्रिन्स फिलिप Prince Philip

‘द क्राऊन’ या मालिकेतील ब्रिटनची राणी एलिझाबेथ (दुसरी)चा पती प्रिन्स फिलिप याच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित. काही तथ्यांचा आधारही घेतला आहे.

..................................................................................................................................................................

प्रिय मायकेल,

तू दूर गेलास त्याला आता एक दशक उलटले. दरम्यान अधूनमधून होणारा फोन आणि पत्रसंपर्क वगळता आपली अनौपचारिक अशी भेट झालेली नाही. आज तुझी तीव्रतेने आठवण झाली आणि हे लिहायला बसलो आहे. या दशकांत एका तीव्र एकटेपणा क्वचित वाटला असेल. तो वाटावा इतकी मानसिक फुरसतही फारशी मिळाली नाही. राजघराण्याला एक्स्प्रेस गाडीला जोडलेला गार्डाचा डबा ही माझी भूमिका निभावता निभावता स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधीच फारशी मिळाली नाही. पण काल जे घडले, त्यातून तुटलेपणाची  भावना अनेक वर्षांनी पुन्हा उसळून आली आहे. यापूर्वी माझे आयुष्य भरकटले, तेव्हा तू माझा सोबती झाला होतास, माझे तारू बंदराला लावणारा तारणहार झाला होतास.

मी सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुटीवर आहे. अर्थात माझ्या तिथल्या मैत्रिणीसोबत. राणीच्या जोडीदाराचे प्रकरण फारसे लपून राहणे शक्य नसते. खुद्द एलिझाबेथलाही ते ठाऊक असावे. पण काल प्रथमच असे घडले की, स्वत: राणी लंडनहून स्वत: इथे माझ्या भेटीसाठी आली. माझ्या एकट्याच्या सुटीच्या काळात तिने यापूर्वी असे केले नव्हते. एक व्यक्ती म्हणून माझी खासगी स्पेस तिने कायम जपली आहे. पण ती आज आली ती मला जाब विचारायला... खरं तर तेही खरे नाही. तिने मला फक्त ‘जनतेच्या सहज नजरेस पडू नकोस याची काळजी घे’ इतकाच सल्ला दिला. बस्स! नव‍र्‍याच्या बाहेरख्यालीपणाची माहिती समजूनही कोणताही कांगावा अथवा अकांडतांडव न करणारी पत्नी मिळणे हे त्याचे भाग्यच म्हणावे लागेल? यात थोडा उपहास डोकावला, हो ना? पण ते अपरिहार्यच आहे. पण तरीदेखील मला खात्री आहे की, यात समजूतदारपणाबरोबरच- कदाचित त्याहून बरीच अधिक, राणी म्हणून असणारी सामाजिक बंधनांची जाणीव असणार. राणीचा नवरा बाहेरख्याली झाला म्हणून वेगळे घेण्याचा पर्याय राणीला असतो कुठे? हे माहीत असल्यानेच मी बेदरकार वागलो, असा तुझा कदाचित समज होईल. पण तसे नाही. 

हे आज ना उद्या होणार याची मला पुरेपूर कल्पना होती. राणीचा जोडीदार हा कायम जनतेच्या, सामान्यांच्या नजरेसमोर असतो. त्यांच्या नजरेपासून स्वत:ला वाचवणे त्याला शक्यच नसते. आणि त्याचे प्रेमपात्र खमंग नि चविष्ट गॉसिपचा भाग होणार हे उघड होतेच. त्यामुळे ही बातमी राणीपर्यंत पोचल्याचे मला काहीच आश्चर्य वाटले नाही, आश्चर्य याचे वाटले की, याबद्दल जाब विचारायला तिने इतकी वर्षे वाट पाहिली. तिने आपला पत्नी म्हणून अधिकार वापरला नाही, ती केवळ राणी म्हणूनच आली, मला भेटली आणि निघून गेली. तुझे हे प्रकरण जनतेच्या समोर फार सहजपणे उघड होऊ नये याची काळजी घे’ इतकाच सल्ला देऊन. यात बाहेरख्याली पतीच्या क्षुब्ध पत्नीपेक्षा आपल्या स्थानाची प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न करणारी राणीच मला दिसत राहिली.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

मी प्रेम केले ते राजाच्या पुतणीवर, राणीवर नव्हे. पण तिच्या काकांच्या राजेपदावरून पायउतार होण्याने आमच्या जगण्याचे आयाम बदलून गेले. वडिलांच्या राजा होण्याने होण्याने माझी पत्नी भावी राणी म्हणून एका चौकटीत बंदिस्त झाली. तिचा-माझा संवाद केवळ एका खिडकीतून व्हावा तसा परका आणि औपचारिक होत गेला. मग माझे आयुष्य तिच्यापासून सुटे होत गेले आणि तसे असूनही त्या नात्यातून आलेल्या नव्या बंधनांनी माझ्या जगण्याभोवती कुंपण घालण्यास सुरुवात केली. राजघराण्याचे हे सारे संकेत राजा अथवा राणी नसलेल्यांच्या गळ्यात कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यासारखे घट्ट बसलेले आहेत. त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची परवानगी नाही. त्यावर उपाय एकच होता. जिवंतपणीच ‘माजी राजा’ असे दुर्मीळ बिरुद मिरवणार्‍या तिच्या काकांनी, एडवर्डनी केला तसा विद्रोह. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे परागंदा होणे. पण मी मुळातच एक देश, एक कुटुंब गमावून आलेलो होतो. आता दोन मुलांचा बाप झाल्यावर, मध्यमवयात पोचल्यावर इतका मोठा विद्रोह करण्याची ताकद माझ्यात उरलेली नाही. राजकुटुंबापलीकडे आणि म्हणून ब्रिटनपलीकडे मला आयुष्यच शिल्लक नाही. आधीच एक परागंदा आयुष्य जगून थोडे स्थैर्य पाहिल्यानंतर आता तेवढे धाडस उरलेले नाही, कुणास ठाऊक. माझी ही मैत्रीण माझ्या माफक विद्रोहाचे फलित की, माझ्यातल्या पुरुषाला, नराला असलेली स्त्री-सहवासाच्या भुकेचे, मला नक्की सांगता येणार नाही. पण एक नक्की, राजकुलातल्यांसाठी वैवाहिक आयुष्याप्रती असलेली, प्रसंगी स्वत:लाच जाचक ठरणारी ही बंधने पाहून मला असं वाटलं होतं की, माझ्या स्विस मैत्रिणीबाबत समजताच एक पत्नी म्हणून ती मला जाब विचारेल. पण फार पूर्वी ही गोष्ट ठाऊक होऊनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे माझ्याकडे लक्ष वेधून घेण्याची माझी इच्छा होती. पण सारे ठाऊक असूनही ती आपण त्या गावचेच नाही, असे भासवत आली. इतकेच नव्हे तर राजघराण्याच्या संकेताला अनुसरून ती त्याला एका शिष्टाचाराच्या आवरणात झाकून टाकत गेली. राणीपदाच्या झुलीखाली तिच्यातल्या पत्नीला चिणून टाकत गेली.

तू तर माझा बालपणापासूनचा, जिवाभावाचा मित्र. नौदलातला सहकारी आणि परागंदा आयुष्यातील माझा मुख्य आधार. तुझ्या बाहेरख्यालीपणामुळे तुझी पत्नी घटस्फोटाचा विचार करते आहे, हे कानावर येताच राजघराण्यावर अप्रत्यक्ष किटाळ नको, म्हणून मला तुझ्यापासून दूर होण्याचा सल्ला देण्यात आला. ‘सीझरच्या पत्नीचे चारित्र्य संशयातीत असायला हवे’ असा वाक्प्रचार आपण सर्रास वापरतो. पण असे खुद्द सीझरनेच म्हटले होते, हे आपण साफ विसरून गेलो आहोत. याबाबत सीझरच्या पत्नीचे म्हणणे काय होते याची नोंद इतिहासात नाही. इथे केवळ राणीचा जोडीदारच नव्हे तर त्याचे मित्रही तसे असावेत असा अलिखित नियम राजघराण्यात आहे. त्यातच घटस्फोट, विवाहविच्छेद हे सर्वांत मोठे किटाळ मानले जाते. एलिझाबेथचे काका, किंग एडवर्ड यांना एक घटस्फोटितेशी लग्न करण्यासाठी राजेपदावर पाणी सोडावे लागले हे तर तुला ठाऊक होतेच. पण पुढे तिच्या बहिणीला घटस्फोटित प्रेमिकाशी लग्न करण्याची परवानगी तिने आणि मंत्रिमंडळाने नाकारली; राजघराण्याच्या प्रतिष्ठेसाठी!

मी नावापुरताच ग्रीक उमराव-पुत्र, क्रीटच्या राजाचा पुतण्या. आयुष्याच्या सुरुवातीलाच देश सुटला. देशात उठाव झाला नि काकाचे राज्य गेले.  कुटुंब परागंदा झाले.  माझ्या वडिलांच्या बाहेरख्याली वृत्तीला कंटाळून आईने दुसरा घरोबा केला. दोघे दोन दिशांनी निघून गेले. मग मी करड्या नाझी पठडीत जगणार्‍या बहिणीच्या संसारात उपरा, आश्रित म्हणून जगलो. पुढे हे अंतर इतके वाढले की, जिच्या घरी मी वाढलो त्या बहिणीच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांस आलेल्या, बुद्धिभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या आईला ‘हा तुझा मुलगा’ म्हणून ओळख करून द्यावी लागली. तिथेच आलेल्या बापाने, ‘माझ्या मुलीच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस’ म्हणून आगपाखड केली. आई-बाप आपल्यासोबत नसले तरी कुठेतरी आहेत, आपले आहेत ही जाणीव बहिणीच्या मृत्यूक्षणी तिच्यासोबतच थडग्यात गेली. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी एका रात्रीत सारे कुटुंब हरवले! 

पण त्या फ्युनरलला उपस्थित असलेल्या डिकी अंकलनी कुटुंब हरवलेल्या मला मला आपल्या छत्राखाली घेतले. हा परागंदा ग्रीक राजपुत्र जर्मनीलाही कायमचा निरोप देऊन करून ब्रिटिश नागरिक झाला. आता माऊंटबॅटन घराण्याचे, म्हणजे आईचे नि डिकी अंकलच्या घराण्याचे नाव लावू लागला. पुढे त्यांच्याच मदतीने रॉयल नेव्हीमध्ये दाखल झालो. त्याच सुमारास लिझची भेट झाली... झाली म्हणण्यापेक्षा राजकारणचतुर डिकी अंकलनी घडवून आणली असली पाहिजे असं आता वाटतं. ज्या व्यक्तीच्या सहवासाची आतुरतेने वाट पाहावी असे कुणी आयुष्यात प्रथमच डोकावले. पण राजघराण्यातील सोयरिकी या केवळ कुटुंबाच्याच नव्हे तर पुर्‍या देशाच्या प्रतिष्ठेचा भाग असतात. त्यामुळे राजा आणि राजाचे राजकीय हस्तक आमच्या विवाहाच्या विरोधात गेले. पण इथे लिझ हट्टाला पेटली होती. मला भेटलेल्या एका हळव्या मुलीतला हा कणखरपणा मला प्रथमच दिसला... पुढे- कदाचित नाईलाजाने असेल, पण तिच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य भागच होऊन गेला. पुन्हा अंकलनी मध्यस्थी करून मला दत्तक घेतले. केवळ माऊंटबॅटन असलेला फिलिप आता ‘ड्यूक ऑफ एडिंबरा’ झाला, राजघराण्याशी सोयरिक करण्यास लायक ठरला. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ग्रीसमधला पदच्युतीनंतर आधी स्वित्झर्लंड नि मग जर्मनीमध्ये परागंदा आयुष्य जगलो होतो. माझ्या दोन्ही थोरल्या बहिणींनी स्वित्झर्लंडच्या वास्तव्यात जर्मन जोडीदार निवडले. त्या कट्टर नाझी झाल्या. मग बहिणीच्या, एका नाझी महिला अधिकार्‍याचा भाऊ म्हणून आदराचा नि द्वेषाचा सामना केला. आपल्या लग्नाला राजा नि त्याच्या राजकीय सल्लागारांचा विरोध याही कारणाने होता. माझा हा नातेसंबंध तोडून टाकण्याची, disown करण्याची अट त्यासाठी आली. मला माझ्या ग्रीक ऑर्थोडॉक्स परंपरांचा त्याग करून तुमच्या अ‍ॅंग्लिकन चर्चचे सदस्यत्व घ्यावे लागले. त्याचबरोबर ग्रीक राजघराण्याशी असलेले संबंध तोडून, त्याच्याशी निगडित सर्व अधिकार व कर्तव्यांपासून मुक्त झाल्याचे जाहीर करावे लागले.

पण याच दरम्यान किंग एडवर्ड यांच्या प्रेमप्रकरणामुळे सत्तेमध्ये उलथापालथ झाली. राजकुलाने आणि संसदेच्या विरोधानंतर ‘राज्य की प्रेयसी’ या तिढ्यामध्ये प्रेयसीची निवड करुन राज्यत्याग करणारा राजा म्हणून एडवर्डची नोंद झाली. राजघराण्याच्या प्रतिष्ठेला नाकारून प्रेमाशी बांधीलकी राखणार्‍या एडवर्डचा मला आजही अभिमानच वाटतो. पण याच घटनेमुळे माझ्याही आयुष्यात उलथापालथ होईल, हे तेव्हा माझ्या ध्यानात आले नव्हते. अपत्यहीन राजा परागंदा झाल्याने, त्याचा धाकटा भाऊ राजा झाला आणि त्याची थोरली मुलगी, माझी वाग्दत्त वधू, राजकुमारी आणि म्हणून राजाची पहिल्या क्रमांकाची वारस ठरली. दुर्दैवाने आपल्या विवाहानंतर लवकरच तिचे वडीलही फुप्फुसाच्या विकाराने कालवश झाले आणि एव्हाना दोन मुलांची आई झालेली माझी पत्नी एलिझाबेथ, आता ब्रिटनची राणी झाली.

इथेच मला राजघराण्याच्या परंपरांची, संकेतांची पहिली दाहक चुणूक पाहायला मिळाली. जगभरात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने सामान्यपणे लग्नानंतर पत्नी पतीचे आडनाव स्वीकारते, त्या घराण्याशी संबंध जोडते. पण माउंटबॅटन घराण्याचे वाढते प्रस्थ पाहून अस्वस्थ झालेल्या लिझच्या आजीने, पंतप्रधान चर्चिल यांच्या सल्ल्याने नवी राणी ही ‘हाउस ऑफ विंडसर’ हे आपले मूळ घराणेच कायम ठेवेल असे जाहीर केले. म्हणजे माझी पत्नी ही ब्रिटनची राणी. तिचा-माझा मुलगा हा राजगादीचा वारस, त्यानंतर त्याच्या पाठची मुलगी. उद्या आपले आमचे तिसरे मूल जन्माला येईल तेव्हा ते तिच्यानंतरच क्रमांक पटकावणार. माझी पत्नी राणी, क्वीन. माझी मुले प्रिन्स आणि प्रिन्सेस... पण या उतरंडीत मला जागाच नाही! मग मी नक्की कोण? जगभरातील पुरुषप्रधानसंस्कृतीमध्ये ‘बीजक्षेत्रन्यायाने’ मूल बापाचे कुलनाम स्वीकारते. पुरुषसत्ताक समाजात मूल नाव लावणार ते बापाचे, आईचे नव्हे. मग मी ‘हाऊस ऑफ एंडिबरा’ कुलनाम मिरवत असताना माझी मुले मात्र हाऊस ऑफ विंडसरची, त्या घराण्याची... हे कसे? त्यांच्या शिक्षणापासून सर्व गोष्टींचा निर्णय करणारेही वेगळेच. यांचा मी कोण मग? केवळ त्यांच्या आईला बीजदान देणारा एखादा अर्वाचीन स्पर्म डोनर की, प्राचीन भारताच्या इतिहासात आपण शिकलो त्याप्रमाणे कुठल्याशा यज्ञामध्ये राणीला बीजदान देऊन पुत्रोत्पत्ती करणारा कुणी निमित्तकारण ऋषी? दरबारी पत्रव्यवहारात माझा उल्लेख राणीचा नवरा म्हणून होत नाही. होतो तो ‘राणीचा जोडीदार’ म्हणून... जोडीदार (consort)! राजवाड्यातले आयुष्य माझे उरलेच नाही, ते तर राणीच्या जोडीदाराचे, त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या शिष्टाचारांच्या चौकटीत घट्ट बांधून घातलेले. त्यात फिलिप कुठेच नाही. अगदी पाळण्यात असतानाच देश सोडून परागंदा व्हावे लागल्यामुळे राजघराण्याचे नाव असले आब कसा असतो ते मला कधीच समजू शकले नाही. त्याची ओळख मला झाली ती इथे, विंडसर कासलमध्ये, आणि तो अनुभव फारसा आनंददायी नव्हता.

अंकलबरोबर ब्रिटनमध्ये आलो तेव्हा माझ्या अपेक्षा माफक होत्या. मला पायलट व्हायचे होते, विमान उडवायचे होते, आकाशाला गवसणी घालून वरुन जग कसे दिसते हे पाहायचे होते. प्रेमाची इतिकर्तव्यता लग्नात होते असा एक समज आहे. माझ्याबाबत तशी आणि तेवढीच ती झाली का? लग्न आहे, प्रेम आहे पण सहजीवनाचे काय? राणीचा नवरा, चुकलो ‘जोडीदार’… त्यामुळे राजकुलाचा सदस्य असल्याने सतत जनतेच्या, राजकारण्यांच्या, माध्यमांच्या नजरेसमोर वावरणे अपरिहार्य. राजकुलाचा सदस्य आहे पण राजवंशी नाही. त्यामुळे बंधने सारी पण मान अथवा अधिकार मात्र नाहीत. वैयक्तिक आयुष्यात तर सोडाच, पण शिष्टाचारातही कुठे डाव-उजवे करण्याची परवानगी नाही. नावापुरते राजकुल असले तरी त्यांच्या जगण्याचे अनेक आयाम हे लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती. त्या अर्थी राणीही एक प्रकारे संसदेच्या नियंत्रणाखाली. मग हे लोकप्रतिनिधी माझ्याकडेही केवळ ‘समर्थाघरचे श्वान’ म्हणून बघतात अशी भावना कायम माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे. हे सारे असह्य होऊन एकदा कोसळलो. उद्वेगाच्या भरात भडाभडा तिला सारे ऐकवले. मग ‘ड्यूक ऑफ एडिंबरा’ असलेला फिलिप ‘प्रिन्स फिलिप’ म्हणून अधिकृतरित्या राजघराण्याचा सदस्य म्हणून तू राजकुलात सामावून घेतला गेला. दोन्ही बहिणी जर्मनीत, कट्टर नात्झी, मी ब्रिटिश राणीचा नवरा, मूळचा ग्रीक... कुलनाम बॅटनबर्ग, माऊंटबॅटन... नक्की काय कुणास ठाऊक. स्वत:ची अशी भूमी नाही, कुटुंब नाही, पत्नी देशाची, मुले तिचे नाव लावणारी आणि फक्त त्यांच्यासोबत राजवाड्यात राहणारा... पण तरीही अनिकेत!

आयुष्यात एकच प्रसंग, ज्यात जोडप्यातला ‘नर’ असल्याची खात्री पटवून देणारा. तिने राणी होण्यापूर्वी राजाचे दूत म्हणून आम्ही श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौर्‍यामध्ये बिथरलेल्या, तिच्यावर चालून आलेल्या हत्तीला सामोरे जात मी तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास वाट करून दिली होती. त्या वेळी तिच्या नजरेत दिसलेले प्रेम शेवटचे! त्यानंतर तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच चेहर्‍यावर राणीचा करारी मुखवटा चढला तो कायमचा. दुसरा प्रसंग बहिणीच्या मृत्यूनंतर शाळेत पोचल्यानंतरचा. सारे कुटुंब एका क्षणात गमावल्याने निर्माण डोक्यात झालेल्या तुफानाला चिणून टाकण्यासाठी शाळेची भिंत मी एकट्याने रात्रंदिवस काम करून बांधून काढली. त्या वेळी हान नावाच्या एका शिक्षकाने माझ्यातल्या उद्वेगाला, दु:खावेगाला समजून घेतले. आपल्या भावना कुणाला तरी समजतात हा आयुष्यात आलेला तो पहिला अनुभव. त्यातून ती शाळा नि तो शिक्षक हा माझ्या मनात एक हळवा कोपरा होऊन बसला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यातूनच आपल्या मुलानेही तिथेच शिकावे, केवळ राणीचा मुलगा म्हणून न राहता स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करावे अशी माझी अपेक्षा होती. पण दुबळ्या मनाच्या चार्ल्सने माझी साफ निराशा केली. जगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करण्यासाठी माझ्या मातृसंस्थेत (alma mater), गॉर्डनस्टन शाळेत पाठवलेला माझा हा मुलगा, तिथल्या आव्हानांसमोर साफ थिटा तर पडला. एवढेच नव्हे, तर आपल्या कचखाऊ वृत्तीने  संघर्षातसमोर पळपुटाही ठरला. ज्या व्यासपीठावरून त्याने माझ्या हस्ते पारितोषिक स्वीकारावे अशी माझी इच्छा होती, त्याच व्यासपीठावरून त्या भेकडाला राजघराण्याच्या डिटेक्टिवच्या कुशीत सुरक्षितता शोधताना पाहिला. हे मूल बीजाचे नव्हे, तर क्षेत्राचे आहे हे सिद्ध करून गेला. व्यासपीठावरून मी बोलत होतो... ’ या स्पर्धेसाठी दृढनिश्चय, बांधिलकी, कमिटमेंट, शारीर बळ, दमसास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धैर्य...’ मी धैर्य हा शब्द उच्चारत असतानाच हा माझा मुलगा एका य:कश्चित नोकराच्या कुशीत आसरा शोधताना मी पाहिला. ज्या शाळेच्या कुंपणाच्या स्वहस्ते बांधलेल्या भिंतीत मी माझ्या रक्ताच्या कुटुंबाचे गमावणे चिणून टाकले होते, तिथेच माझ्या मुलाने माझ्या अपेक्षांचे थडगे बांधले आणि त्याच्या-माझ्यात आपल्या त्या कृतीने एक भिंत उभी केली. मी उभारलेल्या त्या भिंतीने मला नव्या आयुष्याचे फाटक उघडून दिले, तर या नव्या भिंतीने माझा भेकड मुलगा पुन्हा एकवार स्वत:ला राजघराण्याच्या उबदार घरात कोंडून घेताना मी पाहिला. त्या डिटेक्टिवच्या नजरेतही स्वामित्वाचे आव्हान मला स्पष्ट दिसले. ‘हे मूल तुझे नाही, राणीचे आहे आणि मी तिचा दूत आहे. ‘माय डॅडी स्ट्राँगेस्ट’ म्हणत बापाला आदर्श मानण्याच्या, त्याच्या संरक्षक कवचात राहण्याच्या वयातल्या तुझ्या मुलासाठी तू नव्हे तर मी ती भूमिका पार पाडतो आहे.’ असा धिक्कार त्याच्या नजरेतून मला जाणवला. राजघराण्याचा आपला संबंध केवळ ‘राणीचा जोडीदार’ या पलीकडे नाही, याची जाणीव ठळक होत गेली. चार्ल्सने पुढे त्या शाळेतील पाच वर्षांच्या अनुभवाला ‘तुरुंगवास’ किंवा ‘सर्वंकष नरकवास’ असो म्हटले. त्याची मुलेही पुन्हा उमरावांच्या, बोटचेप्या शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या ईटनमध्येच शिकली. त्याने आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्याऐवजी भावी राजा म्हणून सुरक्षित, आव्हानहीन, संघर्षहीन वातावरणात राहणेच पसंत केले. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हे सगळे तुला ठाऊक नाही असेही नाही. पण अनेकदा ते क्रमवार मांडले, त्यांची उजळणी केली तर त्याची वेगळीच संगती लागते. इथे तशी ती लागते आहे का, मला ठाऊक नाही. लागावी म्हणून हे लिहिले असेही नाही. पिसाटलेल्या मस्तकाने एकदा भिंत बांधून काढली, कोसळल्या मनाने एकदा माझे अनिकेत असणे तुझ्यासमोर ओतले होते. तसेच आता थोडेस अलिप्त होऊन संगती लावू पाहतो आहे. हे तुझ्या एखाद्या स्वतंत्र विचाराच्या, स्त्री मुक्तिवादी वगैरे मैत्रिणीला दिलेस तर ती चटकन मला ‘सगळं स्वत:पुरतं पाहणारा, बेदरकार नि सैल वर्तणुकीचा, स्त्रीने आपल्याहून दुय्यम राहावे अशी अपेक्षा असलेला, आणि वर स्वत:च सहानुभूतीची अपेक्षा ठेवणारा ‘मेल शावनिस्ट पिग’ म्हणून मोकळी होईल. तिचे चूक नसेलही कदाचित. लिहावंसं वाटलं एवढं मात्र खरं. 

‘लोकनजरांपासून दूर रहा’ असे सांगायला आलेल्या राणीला मी एवढेच म्हणालो -

“There are two types of people in life. Those whom one imagines to be trustworthy & reliable; who turn out to be treacherous and weak, like Mr. McMillan. And those who appear to be complex and difficult; who turn out to be more dependable than anyone thought... like me! I know exactly what my job is. Your father made it perfectly clear. You are my job! You are the essence of my duty. So here I am, liegeman of life and limb... in, and out (unlike Mr. McMillan)”

तिला पटले की नाही ठाऊक नाही. कदाचित लगामाने बांधलेला घोडा तबेल्यापासून फार दूर जाऊ शकत नाही, याची खात्री असल्याने ती निश्चिंतपणे परतली असेल. स्वित्झर्लंडच्या मुक्त जगात चार दिवसांच्या सुटीला गेलेल्या पक्ष्याला ते तात्कालिक स्वातंत्र्य मागे टाकून लंडनच्या पिंजर्‍यात निमूट परतण्याशिवाय गत्यंतरही नाही.

अशाच एखाद्या तात्कालिक स्वातंत्र्याच्या दरम्यान तुझी भेट व्हावी या इच्छेसह,

तुझा,

फिलीप

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Mon , 12 April 2021

वरील लेख वाचल्यावर 12 एप्रिलच्या लोकसत्तेत आलेला सम्राज्ञीची सावली हा लेख जरूर वाचावा. त्यात प्रिन्स फिलिप यांचा इतका सन्मान राष्ट्रकुल व राष्ट्रकुलबाहय देशातील नागरीक का करत आहेत हे समजेल. या माणसाने स्वत:ला पूर्णपणे राजघराण्याला वाहून घेतले होते व सतत सावली म्हणून वागण्यात कमीपणा वाटून घेतला नाही. आपल्या बायकावर प्रभुत्व गाजवणार्‍या पुरुषांनी यापासून धडा घेतला पाहिजे जेणेकरून domestic violence incidents कमी होतील व कुटुंबामध्ये शांती राहील.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......