अजूनकाही
‘मर्दानगी आणि पितृसत्ता’ या विषयावर हे सदर लिहायला घेतले तेव्हा मन जरा साशंकच होते. वाटले की, समोर असलेले ८-१० विषय संपले की काय घ्यावे लिहायला? पण आता जाणवतेय की, आपल्या आसपास अशा काही नित्यनवीन घटना घडत असतात. त्या प्रत्येक घटनेतून ‘मर्दानगीचे’ मूल्य अखंडपणे पुढे येतच राहते. मर्दानगी किंवा पुरुषार्थाचे मूल्य अपरिहार्यपणे ‘पितृसत्ताक संस्कृती’मधल्या ‘अस्मितांच्या राजकारणाशी जोडलेले आहे आणि दिवसेंदिवस ते क्षीण होण्याऐवजी जास्तच प्रबळ होत चाललेले आहे. या ‘अस्मिता’ धगधगत्या निखाऱ्यासारख्या सतत काही ना काही आपल्या कवेत घेत राहतात. कधी राष्ट्रीयत्वाशी, कधी धर्माशी, कधी जातीयतेशी, कधी प्रादेशिकतेशी, कधी स्थानिक संस्कृतीशी घट्ट जोडलेल्या या अस्मिता सातत्याने ‘मर्दानगी’च्या रूपात व्यक्त होत राहतात. जणू एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. जसं जातीव्यवस्था आणि पितृसत्ताक व्यवस्था एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, तसंच पितृसत्ताक व्यवस्थेतील अस्मिता, ‘मर्दानगी’चे मूल्य सोबत घेऊनच आविष्कृत होत असते.
गेले काही दिवस तामिळनाडू येथील ‘जलिकट्टू’ या चवताळलेल्या बैलांवर काबू मिळवण्याच्या खेळाशी जोडलेल्या तामिळी सांस्कृतिक अस्मितेने असाच हैदोस घातला आहे. या खेळात अतोनात हिंसा आणि क्रौर्य व्यक्त होते. म्हणूनच १९६० पासून आजतागायत प्राण्यांच्या छळावर बंदी आणण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण त्याला सांस्कृतिक अस्मितांशी जोडल्याने ती प्रथा अजूनही पूर्णपणे बंद होऊ शकली नाही. या खेळात बैलाला बांधून ठेवले जाते आणि त्याला माज आणण्यासाठी विविध गोष्टी खायला दिल्या जातात, दारू पाजली जाते, त्याच्या लिंगाला इजा केली जाते, मिरची पावडर लावली जाते, गुदद्वारात काठ्या ढोसकल्या जातात. या सगळ्याने बिथरलेला तो बैल चवताळून धावू लागला की, त्याला मोकळे सोडले जाते. सैरावैरा धावणाऱ्या त्या बैलावर जो कोणी काबू आणेल तो सामर्थ्यवान, वीर्यवान, ताकदवान मर्द! विशेष म्हणजे असा पुरुषार्थ गाजवण्याची मुभा फक्त उच्च-जातीय पुरुषांनाच असते.
सगळ्यात खेदजनक बाब म्हणजे ‘जलिकट्टू’ प्रथेवर बंदी आणण्ण्याच्या संदर्भात १९६०, १९९१, २००४, २००९, २०११, २००१४ आणि यावर्षी म्हणजे २०१७ या काळात सर्वोच्च न्यायालयात अनेक दावे केले गेले, सप्रमाण पुरावे सादर झाले, पण तेथे दोनच मुद्द्यांचा ऊहापोह केला गेला. तो म्हणजे ‘कृषी-सांस्कृतिक अस्मितेचा’ प्रश्न विरुद्ध ‘भूतदयावादी प्राणीमित्रांचे भोंगळ प्राणीप्रेम’! या प्राणीमित्रांना कुठेही आजही मदुराईच्या ग्रामीण भागात दलितांना पशूंपेक्षाही हीन वागणूक देणाऱ्या प्रथा चालू असलेल्या दिसल्या नाहीत का? गोठ्यातल्या गुरांना वेळेवर चारा घातला नाही म्हणून आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बायकोला गुरापेक्षाही क्रूरपणे मारहाण करणारे शेतकरी दिसले नाहीत का? या सर्व दाव्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रांतील चर्चेमध्ये ‘कृषी-संस्कृती’मधील’ धार्मिक रूढी-प्रथांमधून दलितांचे आणि स्त्रियांच्या सन्मानाचे अवमूल्यन केलेले दिसते. परंतु वर्षानुवर्ष हीच आमची ‘द्रविडी’ कृषीप्रधान संस्कृती आहे आणि त्याचा मला अभिमान वाटला पाहिजे असेच स्त्रियांच्या आणि दलितांच्या मनावर बिंबवले असल्याने हे दोन्ही घटक स्वखुशीने या रूढी प्रथांना साथ देतात. अनेक दलित ओबीसी लोक आजही पापमुक्तीसाठी मंदिरात जाऊन ब्राम्हण भोजन घालतात आणि त्यांच्या उष्ट्या खरकट्या पानावरून उघड्या पाठीने लोळत जाऊन आपले पाप धुवून काढतात. अनेक शेतकरी बायका दुष्काळातसुद्धा स्वत: अर्धपोटी राहून ताकदवान बैलांची आणि गाईंची पैदास व्हावी म्हणून गोठ्यात राहून सकस अन्ननिर्मिती करतात, गाभण गाईची सेवा करतात बाळंतपण करतात. म्हणजे जेथे गाईगुरांना सन्मान आहे, पण माणसाला नाही हीच निसर्गप्रेमी कृषीप्रधान संस्कृती म्हणायची का? ही दुसरी बाजू ‘जलिकट्टू’ प्रथेवरील बंदीविषयीच्या सार्वजनिक चर्चाविश्वात कुठेही कुणीही चर्चिलेली दिसत नाही. ना न्यायालयाने संस्कृती रक्षकांना खडसावलेले दिसते. तामिळनाडूत आज ४७ टक्के स्त्रिया शेतकरी शेतमजूर आहेत, तर ३० टक्के शेतमजूर हे दलित आहेत. त्या सर्वांची आरोग्य अवस्था आतिशय चिंताजनक आहे असे तेथील स्त्री संघटनेतर्फे केलेल्या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.
खरं तर हा प्रश्न जितका तामिळी संस्कृतीशी जोडला गेला आहे, तितकाच राष्ट्रीय अस्मितेशी आणि शेवटी ‘पुरुषार्था’च्या कल्पनेशी घट्टपणे जोडला गेलेला आहे. म्हणूनच ‘जलीकट्टू’वर बंदी आणणे म्हणजे पुरुषार्थाला आव्हान देणे, असं अनेकांना मनापासून वाटतं. मर्दानगी तेव्हाच सिद्द होते जेव्हा हिंसा आणि क्रौर्य घडते. पण त्याबाबत त्या व्यक्तीला किंवा समूहाला जराही हळहळ वाटत नाही. किंबहुना अपरिमित हिंसा व क्रौर्य हे त्या त्या समूहाचा विजयोत्सवच समजला जातो. आपल्या तथाकथित ‘राष्ट्रीय’ किंवा सांस्कृतिक हिताच्या आड येणाऱ्या माणसाची, अगदी आपला भाउबंद असला तरी गय करू नये, असा सल्ला श्रीकृष्ण अर्जुनाला महाभारतात दिलेला दिसतो, यातच आपल्या संस्कृतीचे सगळे सार आले आहे. ‘हिंसेमध्येच पुरुषार्थ आहे’ हे तत्त्व कसे सूक्ष्मपणे ठसवले जाते हे यातून स्पष्ट होते. बळीला पायाखाली चिरडून किंवा रावणाला मारून त्याचे शीर आपल्या वेशीवर टांगत ‘दिवाळी दसरा’ किंवा ‘विजयादशमी’ साजरी करणारी आपली भारतीय हिंदू संस्कृती, बकरी ईदेला बकऱ्यांला हलाहल करून मारणाऱ्या व रक्ताचे पाट वाहवणाऱ्या इस्लामपेक्षा तसूभरही कमी नाही.
‘जलिकटटूच्या प्रथेत ‘जहरी पौरुषत्वा’चे म्हणजे ‘Toxic Masculinity’चेच गौरवीकरण केले जाते. नव्हे, असे घातक उदात्तीकरण हाच या खेळाचा पाया आहे. या सदरातील माझ्या पूर्वीच्या एका लेखात मी ‘जहरी पौरुषत्वा’ची तपशिलात चर्चा केलीय. थोडक्यात सांगायचे म्हणजे ‘जहरी पौरुषत्व’ हे पुरुषाला वर्चस्वभावनेने आंधळे करणारे असते. स्वाभिमानाचे नैसर्गिक मानवी मूल्य ओलांडून माणसाला अमानवी, हिंसकतेकडे नेणारे हे मूल्य आहे. जे त्या पुरुषाला स्वत:लाही खूप घातक ठरते. त्याला वर्चस्ववादाच्या सापळ्यात अडकवते. ‘जहरी पौरुषत्वाने संमोहित झालेला पुरुष वेगवेगळ्या स्वरूपाच्या युद्धभूमीकडे चालू लागतो आणि अंतिमत: संघर्षातून स्वत:चा विनाश ओढवून घेतो.
१९९२ साली कमल हसनची ‘सिंगरवेळळन” नावाचा तामिळ चित्रपट आला होता. या चित्रपटात कृषीसंस्कृतीत निसर्ग, पशुपक्षी, पशुधन याच्याशी सुसंवादी जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याचे अतिशय सुंदर चित्रण आहे. पण तामिळी संस्कृतीतील ‘मर्दानगी’ गाजवण्याच्या किंवा नायकाचे पौरुषत्व दाखवण्याच्या हव्यासापोटी ‘जलिकट्टू’चे दोन-तीन प्रसंग त्यात घातले गेले आणि सौंदर्यपूर्ण नैसर्गिक प्रेमाला क्रौयाचे गालबोट लागलेले दिसते. यात दुसरीही एक गोष्ट आहे ती म्हणजे बैलांचे वीर्यवान, ताकदवान पौरुषत्व जोखण्यासाठी त्याला ‘जलिकट्टू’त खेळवले जात असताना गरज नसतानाही नायकाला त्याच्या प्रेयसीची प्रतिमा तेथे दाखवली जाते आणि जणू बैल आणि स्त्री या दोघांच्याही स्वैर झालेल्या लैंगिक अभिव्यक्तीवर ताबा मिळवणारा नायक किती महान ‘मर्द’ आहे ही, भूमिका पुढे आणली जाते. म्हणजे लैंगिक भावनेने उधळलेला बैल आणि स्वैर- मोकळेपणाने आपल्या लैंगिक भावना व्यक्त करणारी स्त्री या दोन्ही गोष्टी जो पुरुष काबूत आणतो, तो ‘सामर्थ्यवान पुरुष’ खराखुरा ‘मर्द’.
इथे मला संत तुलसीदासाने आपल्या रामायणात ‘ढोल, शूद्र, पशु, नारी, यह सब ताडनके अधिकारी’ हे मनुस्मृतीमधील वचन उदघृत केले आहे याची आठवण करून द्यायची आहे. स्त्री शुद्र आणि पशु यांच्या प्रती केलेले क्रौर्य हे कसे समर्थनीय आहे याचेच ‘जलिकट्टू’ हे दृश्य प्रतिक आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
माजावर आलेला ‘वळू’ आणि स्वैरपणाने आपल्या लैंगिक भावना व्यक्त करणारी स्त्री या दोघांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे, हे प्रत्येक पुरुषाचे आद्य कर्तव्य आहे हे आपली संस्कृती शिकवते. म्हणूनच ‘जलिकट्टू’ प्रथेचे समर्थन करताना स्वत:च्या लैंगिक भावनांची स्वैर अभिव्यक्ती करणाऱ्या ‘त्रिशा’ या तामिळ अभिनेत्रीला या सांस्कृतिक खेळात खेचून आणले जाते. लोकमान्यता मिळवण्यासाठी पौरुषत्व दाखवण्याच्या या प्रथेचा प्रसंग तामिळनाडूतील अनेक चित्रपटात आवर्जून घातलेला दिसतो. म्हणूनच मरीना बीच वर ‘जलिकट्टू’ प्रथेच्या समर्थनार्थ जेव्हा लाखोंचा जनसमुदाय जमा होतो, तेव्हा कमल हसन, रजनीकांत, विजय, सुरिया, जी. व्ही. प्रकाश, विशाल, जय मारवा या सगळ्या अभिनेत्यांना जनभावनेचा आदर करण्यासाठी त्यांच्या सोबत रस्त्यावर हजर व्हावे लागते. इथेच सांस्कृतिक अस्मितेची राष्ट्रवादासोबत मोट बांधली जाते. संपूर्ण तामिळनाडू राज्य तर सोडाच पण केवळ मदुराई मधल्या अलन्ग्नापूर, अव्लीयापूर आणि इतर १६ ते १७ गावांपुरते मर्यादित असलेल्या ‘जलिकट्टू’ प्रथेचे रूपांतर राष्ट्रीय सांस्कृतिक अस्मिते मध्ये हाहा म्हणता होते हे आश्चर्यजनक नाही वाटत? कसे घडले हे सारे? कोणती अदृश्य शक्ती आहे यामागे?
स्वातंत्र्यपूर्व कालापासून दक्षिणेत असुरांची, द्रविडी संस्कृती विरुद्ध आर्यभटांची हिंदुत्ववादी संस्कृती असा संघर्ष प्रचलित आहे. ख्रिश्चन मिशनरी, पेरियार रामस्वामी, न्यायाधीश शंकर, डॉ. आंबेडकर आणि अनेक समाजसुधारकांनी हिंदुत्ववादी मंडळीना रोखण्यात यश मिळवले आहे. पण गेल्या तिसेक वर्षांत काळाच्या ओघात क्षीण झालेल्या अनेक रूढी-प्रथांचे पुनरुज्जीवन सांस्कृतिक अस्मितांच्या रूपात उजव्या शक्तींनी चालवले आहे. १९६० पासून आजतागायत अशा प्रकारच्या हिंसक प्रथांना पाताळात गाडण्याचा प्रयत्न होऊनही त्या पुन्हापुन्हा डोके वर का काढतात? कारण मोठ्या चलाखीने पडद्यामागे राहून या सांस्कृतिक अस्मितांचे स्फुल्लिंग पेटवले जाते. हे न समजण्याइतके द्रविडी राजकारणी मूर्ख निश्चितच नाहीत.
‘जलिकट्टू’ खेळ हा भलेही सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असेल, पण त्यासाठी होणारा सगळा मानवी व्यवहार हा जात आणि लिंगभाव वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आहे हे निश्चित. क्रीडा आणि संस्कृतीमधील ही मर्दानगी मुख्यत: स्त्रिया आणि इतर दडपलेल्या समूहांना अधिकाधिक दबावाखाली आणण्ण्यासाठी वापरली जात असते. दलित जातीजमाती तसेच अल्पसंख्याक धर्मसंस्कृती आपल्या टाचेखाली ठेवून सांस्कृतिक अस्मितांचे स्तोम माजवणे, त्याचे गौरवीकरण करणे हे या फॅसिस्ट राष्ट्रवादाशी जोडलेले आहे. स्वैर लैंगिक अभिव्यक्ती करणाऱ्या अभिनेत्रीचा विकृत पाठलाग केला जातो तेव्हा स्पष्टपणे या खेळातील जहरी मर्दानगीचे रूप उघड होते. ज्या गाई बैलांवर क्रौर्याच्या रूपात पुरुषार्थाचे, मर्दानगीचे प्रदर्शन केले तेच आणि दलितांवरही हिंसेच्या वेगळ्या रूपात स्त्रिया व्यक्त होत असते.
आजही ज्या देशात ऑनर किलिंगचे प्रमाण फार मोठे आहे, गर्भलिंग निवड आणि स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत, ज्या देशात स्त्रियांच्या दडपणुकीचे अनेक मार्ग अवलंबले जातात, अशा देशात पशु आणि स्त्रियांचा सन्मान कसा होईल? उलट अशा प्रकारची सांस्कृतिक प्रतीके ही नेहमीच दडपणुकीची हत्यारेच बनतात. ‘जलिकट्टू’ चालू ठेवावे म्हणून किंवा बैलझुंज, बैलगाडी स्पर्धा, त्यावरील बंदी उठवावी म्हणून रस्त्यावर येणारा लाखोंचा जनसमुदाय आमच्यासाठी जास्तीत जास्त ग्रामीण आरोग्य केंद्रे निर्माण व्हावी म्हणून कधी रस्त्यावर उतरेल? पारंपरिक व्यवसाय संस्कृतीच्या नावाखाली अनिष्ट रूढी-परंपरांचे समर्थन करणाऱ्या संस्कृतिरक्षकांच्या बॅन्डवॅगनमध्ये उड्या मारणारी प्रतिष्ठित मंडळी खैरलांजी, खर्डा या सारख्या दलित अत्याचारांविरोधात कधी बरे रस्त्यावर येतील? या कारणांसाठी ते रस्त्यावर येत नाहीत हे सारे खेदजनक आहे. प्रत्येक संस्कृतीमध्ये कालक्रमानुसार परिवर्तन होत असते. वाईट मूल्ये टाकून द्यायला हवीत. चांगली मूल्ये दडवून माणसाला आंधळे बनवणाऱ्या मूल्यांचा गौरव करणाऱ्या संस्कृतिरक्षकांची खेळी आपण कधी बरे ओळखणार? काळाबरोबर परंपरा बदलण्याचे धोरण आपण कधी बरे शिकणार?
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
kundapn@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment