मराठीतील नामवंत समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मराठीतील महत्त्वाच्या समीक्षाग्रंथाला/समीक्षकाला दिला जाणारा ‘पहिला डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार’ नुकताच ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ज्येष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानिमित्ताने कोल्हापूर आकाशवाणीसाठी ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी त्यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत ४ ऑगस्ट, २०२० रोजी कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली. त्या मुलाखतीतील काही भाग व काही प्रा.रणधीर शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांवरच आधारित भाग ‘समाज प्रबोध पत्रिके’च्या ऑक्टोबर-डिसेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झाला आहे. तिच्या पुनर्मुद्रणाचा हा पूर्वार्ध....
..................................................................................................................................................................
‘म.सु.पाटील समीक्षा पुरस्कारा’चा स्वीकार करताना आपल्या भावना कशा आहेत?
रसाळ - एकतर डॉ. म.सु. पाटलांचे आणि माझे खुप जुने असे संबंध होते. ते मनमाडला प्राचार्य होते आणि मी औरंगाबादला. तेव्हा अंतरही खूप कमी होतं. येणं-जेणं असे. माझं पहिलं पुस्तक ‘कविता आणि प्रतिमा’ हे जेव्हा प्रसिद्ध झालं, तेव्हा मौजेनं औरंगाबादला एक चर्चासत्र घेतलं. त्यात म.सु. पाटील माझ्या त्या पुस्तकावर बोलले. ते ‘अनुष्टुभ’ मासिक चालवत. त्यामध्ये माझं बरंचसं लेखन प्रसिद्ध झालं. म.सु. पाटलांबद्दल आदर वाटण्याचे मुख्य कारण असे एका शेतकरी घराण्यातून, नंतर कामगार असलेल्या वडलांकडून ते वाढत वाढत प्राध्यापक, प्राचार्य आणि फार मोठे मराठीचे समीक्षक बनले. हा जो एक प्रवास आहे, बौद्धिक असा, तो अतिशय नावाजण्याजोगा आहे. कोणालाही त्यांच्याबद्दल आदर वाटावा असाच आहे.
दुसरं असं की, मराठी समीक्षेत काही मूलभूत स्वरूपाचं कार्य ज्या मोजक्या समीक्षकांनी केलं, त्यामध्ये मी म.सु. पाटलांचा समावेश करेन. हे कार्य दुहेरी प्रकारचं आहे. एक म्हणजे सैद्धान्तिक समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि दुसरं उपयोजित समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांनी लेखन केलेलं आहे. कवितेवर प्रामुख्याने त्यांचं कार्य आहे. आणि ज्ञानेश्वरांपासून आजच्या मराठी कवितेपर्यंत असा मोठा फलक त्यांनी आपल्या अभ्यासासाठी घेतलेला आहे. म्हणून अतिशय विविधतापूर्वक त्यांनी हे लेखन केलेले आहे. आणि म्हणून अशा एका मोठ्या लेखकाच्या नावानं असलेला हा पुरस्कार मला मिळतोय, ही अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं. मला एक अतिशय मानसिक समाधान त्यातून प्राप्त झालेलं आहे. हे मला या ठिकाणी आनंदानं सांगावंसं वाटतं.
सर आपण म.सु.पाटील यांची पार्श्वभूमी सांगितली. ते कुठल्या परिस्थितीमधून पुढे आले. आणि कशा तऱ्हेनं त्यांनी मूलभूत असं समीक्षेच्या क्षेत्रामध्ये काम केलं. विशेषतः कवितेच्या बाबतीतलं त्यांचं जे काम आहे, ते काम हा तुम्हा दोघांना जोडणारा एक समान दुवा आहे. कारण आपणसुद्धा आयुष्यभर कवितेचाच ध्यास\शोध घेत आलेला आहात. त्यांची जशी पार्श्वभूमी आपण सांगितली, तशी आम्हाला अशी उत्सुकता आहे की, आपण ज्या परिसरातून आलात, ज्या कुटुंबातून आलात. त्या आपल्या जडणघडणीसंबंधी थोडं सांगावं?
रसाळ - माझ्या बाबतीत असं म्हणता येईल की, मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो. औरंगाबाद हे शहर निजामी राजवटीखाली होतं. तेथे उर्दू भाषा हीच या प्रांतात कायम राहिली. तीन भाषा या प्रांतात बोलल्या जात. मराठी, तेलुगू आणि कन्नड. या तिन्हीही भाषा टिकवून ठेवण्याच्या चळवळी आमच्याकडे झाल्या. मी या काळामध्ये विद्यार्थी होतो. आणि माझं सगळं शिक्षण उर्दू माध्यामतून झालेलं आहे. मराठी किंवा मातृभाषा ही पहिल्या क्रमांकाची भाषा अभ्यासक्रमात नसे. उर्दू ही पहिली भाषा, इंग्रजी ही दुसरी भाषा आणि मराठी, तेलुगू किंवा कन्नड तिसरी भाषा. म्हणजे तिला शिक्षणात अतिशय गौण स्थान दिलं जात होतं. सातवीपर्यंत मराठी तुम्हाला शिकवलं जाई. त्या त्या भागात आठवीपासून पुढे मॅट्रिकपर्यंत मराठी हा एक ऐच्छिक विषय म्हणून असे. बुद्धिमान विद्यार्थी मराठी घेत नसत. ते उच्च गणित विषय घेत. त्यामुळे उत्तम प्रकारचं मराठी या भागामध्ये कधीही शिकवलं गेलं नाही. माझंही सातवीपर्यंतच मराठी होतं. पुढे मी गणित विषय घेतला. पण मी जेव्हा आठवीमध्ये गेलो, तेव्हा बदल झाले. म्हणजे हैद्राबाद संस्थान मुक्त झालं आणि ताबडतोब नव्या सरकारनं अभ्यासक्रम बदलून टाकले. महाराष्ट्रामध्ये जो अभ्यासक्रम चालू होता, तो आम्हाला शिकवायला प्रारंभ झाला. मग शेवटची दोन-तीन वर्षं मी मराठीमधून शिकलो. परंतु उर्दू ही पहिली भाषा मात्र कायम राहिली. ती बदलायला दोन-चार वर्षं लागली.
दुसरी गोष्ट अशी की, मराठवाड्यात लेखकांना वावच नव्हता. व्याख्यात्यानं आपण काय बोलणार, याची टिपणं सादर करावी लागत असत. अतिशय तापदायक असं सगळं सांस्कृतिक वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये ज्यांनी मराठी भाषा टिकवली अशा कुटुंबापैकी माझं कुटुंब होतं. माझे वडील तेव्हा एक अभ्यास मंडळ चालवत. मासिकं, मराठी नियतकालिकं त्या मंडळाचे सदस्य वाटून घेत की, यांनी ‘मौज’ साप्ताहिक घ्यायचं, आणि ‘नवयुग’ एकानं घ्यायच, त्यांनी ‘विविधवृत्त’ घ्यायचं, यांनी ‘सत्यकथा’ घ्यायचं, वगैरे या पद्धतीने. ही मासिकं मग आपापसात फिरवत. नंतर आठ दिवसांनी एकत्र बसून वाङ्मयावर चर्चा करत. या पद्धतीनं वाङ्मय टिकवलं जात असे. छोटे-मोठे कथाकार असत. त्यांची पुस्तकं कोणी छापत नसत. कारण प्रकाशन व्यवसाय हा मराठवाड्यात नव्हताच. हौशी लेखक असत. म्हणजे स्वतःच उत्तम अक्षरात पुस्तक लिहून काढायचं, ते बाइंड करायचं आणि हे आपलं पुस्तक. अशा पद्धतीनं काही कथाकार मी औरंगाबादमध्ये लहानपणी पाहिलेले आहेत. अशा घुसमटून टाकणाऱ्या वातावरणामध्ये मी मराठी भाषेवर प्रेम करायला शिकलो. हे सामान्यपणे १९४८पर्यंत हे वातावरण होतं. त्यानंतर बदल झाले आणि मग मुक्तपणे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या विकासाचा मार्ग खुला झाला.
तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मी वाढत असल्यामुळे मराठी भाषा शिकणं, मराठीमध्ये वाचन करणं या गोष्टी अवघड असलेल्या औरंगाबादमध्ये एकही वाचनालय नव्हतं. काही सुशिक्षित मंडळींनी एकत्र येऊन एक वाचनालय स्थापन करायच ठरवलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नुकतेच औरंगाबादला येऊन गेलेले होते. लोकमान्य येऊन गेले असल्यामुळे औरंगाबादमध्ये भयंकर उत्साह होता. तेव्हा लोकमान्यांच्या नावानं हे वाचनालय सुरू करावं. पण निजाम सरकारने त्याला परवानगी दिली नाही. मग त्याचं ‘बलवंत वाचनालय’ असं नाव ठेवण्यात आलं. मराठी वर्तमानपत्र आणि मासिकं तिथं मोफत वाचायला उपलब्ध असत. पुस्तकं मात्र वर्गणीदार होऊनच मिळत. पुस्तकं मिळवण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. अनेक वकील मंडळी, धनिक मंडळी यांनी पैसे दिले आणि त्यातून ते ग्रंथालय उभं राहिलं. असं गावोगावी झालं. प्रत्येक शहरामध्ये या पद्धतीनं मराठी ग्रंथालयं स्थापन केली गेली.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
मी तुम्हांला सांगतो, राष्ट्रीय शाळा स्थापन केल्या गेल्या. पण संस्कृत हा विषय शिकवायला परवानगी नाही. पण निजाम सरकार कसं उदार आहे, हे दाखवण्यासाठी सरकारी शाळेमध्ये मात्र संस्कृत विषय असे. खाजगी शाळांमध्ये संस्कृत शिकवू दिलं जात नसे. प्रत्येक जिल्ह्यात एक सरकारी हायस्कूल असे. त्यामध्ये संस्कृत शिकवलं जाई. बाकी कुठेही लोकांना संस्कृत येऊच नये, या पद्धतीचं धोरण आखलं जात असे. हे अतिशय जाणीवपूर्वक ठरवून केलं गेलं. म्हणून मराठवाड्यामध्ये १९४८पर्यंत जे वाङ्मयीन वातावरण आहे, ते पूर्ण मध्ययुगीनच होतं. जे छोटे-मोठे कवी लेखक होते ते मध्ययुगीन मराठी परंपरेत आख्यानक कविताच लिहीत असत. रामायण, महाभारतावर कविता लिहीत असत. त्याचं आधुनिकीकरण मराठीमध्ये दोन लेखकांनी केलं. एक वा.रा. कांत आणि दुसरे बी. रघुनाथ यांनी हे नव वाङ्मयाचं वारं मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आणलं. ही गोष्टसुद्धा १९४५च्या नंतरची आहे. त्याच्या आधी फार भीषण अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये होती.
आपण उस्मानिया विद्यापीठात शिकलात. पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तर तिथे काही चांगले शिक्षक होते. त्यांच्यासंबंधी थोडं किंवा आपल्या महाविद्यालयीन काळासंबंधी जाणून घ्यायला आवडेल.
रसाळ - माझे वडील स्वतः लेखक होते. फार मान्यता प्राप्त नाही, पण हे लिहीत होते. त्यांचे लेखन पश्चिम महाराष्ट्रातल्या मासिकांतून कधीही आलंच नाही. एक सुदैवानं चांगला आऊटलेट होता. तो म्हणजे औरंगाबादला एक नभोवाणी केंद्र होतं. ते अतिशय लोकप्रिय केंद्र होतं. या केंद्राचं कार्यक्रम महाराष्ट्रात ऐकले जात असत. नगर, नाशिक, खानदेशामधलं जळगाव, विदर्भामधलं बुलढाणा वगैरे अशी सगळी गावं, जिल्हे यामध्ये त्यांचे कार्यक्रम प्रसारित होत असत. त्यासाठी वडील लेखन करत. त्यांच्या कथा आणि दुसरं म्हणजे श्रृतिका, एकांकिका मोठ्या प्रमाणात आकाशवाणीवर प्रसिद्ध झाल्या. आणि त्यांचं शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात झालेलं. फर्ग्यसन महाविद्यालयाचे ते विद्यार्थी. तिथून ते इंटरआर्टस् झाले.
खाजगी शाळेत शिक्षक होते. म्हणजे सरस्वती भवन नावाची जी राष्ट्रीय शाळा औरंगाबादला आहे, तिच्यामध्ये ते शिक्षक होते. आणि या प्रकारचं सगळं वाङ्मयीन कार्य करणं हाच त्यांचा व्यवसाय होता. या वातावरणामध्ये मी वाढलो. त्यांचे माझ्यावर अतिशय उत्तम वाङ्मयीन संस्कार आहेत. मुख्य म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य असे की, लहान असताना आठ-नऊ वर्षाचा असल्यापासून सगळीकडे मी त्यांच्याबरोबर जात असे. त्यांच्या ज्या बैठकी होत असत, त्या वाङ्मयीन चर्चांना ते मला घेऊन जात असत. लहानपणापासून मी त्या बैठकी ऐकत आलो आहे. या बैठका आमच्या घरीच प्रामुख्याने होत असत. त्यात वा.रा. कांत असत. औरंगाबादमधील नवोदित लेखक होते, ते त्यामध्ये सहभागी होत. एखादा लेखक आला की, त्याला बोलवलं जात असे. त्याच्याशी चर्चा घडवून आणत. माझ्या घरी मला आठवतं मामा वरेरकर येऊन गेले. या बैठकीमधील वातावरणाचे माझ्यावर संस्कार झाले.
दुसरं १९५० मध्ये मी मॅट्रिक झालो. त्या वर्षी औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालय स्थापन केलं. मिलिंद महाविद्यालय. औरंगाबादला सरकारी महाविद्यालय होतं. ते इंटरपर्यंतच होतं. हे महाविद्यालय स्थापन झाल्यावर वडील म्हणाले की, ‘तू प्रायव्हेट कॉलेजमध्येच शिकायचं,’ म्हणून या महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी. तिथं उत्तम शिक्षक होते. बाबासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की, शिक्षक मग तो कोणत्याही जातीचा असो तो उत्तमच पाहिजे. म्हणून तेथे मोठे अप्रतिम शिक्षक होते. इंग्रजीसाठी म.ना. वानखेडे होते. नंतर तत्त्वज्ञानामध्ये मेघःश्याम पुंडलिक रेगे होते. मराठी विभागात कॉलेजचे प्राचार्य म.भि. चिटणीस होते. या तिघांचे माझ्यावर खूप चांगले संस्कार आहेत. मी मराठी, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, विज्ञान हे विषय घेतले. त्यामुळे रेग्यांशी माझा खूप जवळचा संबंध त्या काळामध्ये आला. रेगे फार मोठे तत्त्वज्ञ मानले गेले. त्यांचं वागणं, बोलणं वैशिष्ट्यपूर्ण असे. ते महाविद्यालयाचे त्या काळात हिरोच होते. तरुण होते. २५-२६ वर्षाचे देखणे होते. खूपच आणि अतिशय उत्तम विनोदी मर्म, मार्मिक असं त्याचं बोलणं असे. त्यांचं व्याख्यान ऐकणे हे एक खास आनंदायक असा भाग असे. त्यांच्या वर्गामध्ये अतिशय चैतन्य असे. त्याचे एक संस्कार आम्हा मुलांवर झाले.
दुसरे चिटणीस ज्यांनी मला मराठी वाङ्मयाची गोडी लावली. त्यांचं वैशिष्ट्ये असं की, अभ्यासक्रमांच्या बाहेरचं ते बोलत. अभ्यासक्रम महत्त्वाचा नाही. म्हणजे उदा. नवकथा आणि नवकवितेची ओळख १९५० साली चिटणीसांमुळे झाली. वर्गामध्ये ते नेहमी मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, माडगूळकर यांचे संदर्भ देत. त्यांची वैशिष्ट्यं सांगत. म्हणजे अभ्यासक्रमाशी संबधित नसलेलंच असं चालत असे. मला वाचनाची खूपच गोडी होती. तेव्हा त्यांनी एखादा पुस्तकाचा संदर्भ दिला की, मी ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक घेऊन वाचून टाकत असे. एकदा त्यांनी फ्रॉईडचा संदर्भ दिला. मग मी ग्रंथालयात गेलो, म्हणालो, ‘मला फ्रॉईडचे व्हॉल्युम पाहिजेत’. ग्रंथपाल म्हणाला, ‘बाळ, तू अजून लहान आहेस फ्रॉईडची पुस्तकं मी तुला देणार नाही.’ मग चिटणीससरांकडे गेलो. त्यांनी चिठ्ठी दिली- ‘याला फ्रॉईडचे खंड द्या’. मी ते वाचायचा प्रयत्न केला, पण तेव्हा ते काय कळणं शक्य नव्हतं.
पण ही गंमतजिज्ञासा. चिटणीसांचं असं होतं की, मराठीचे विद्यार्थी काय वाचतात यावर त्यांचं लक्ष असे. त्या काळात कार्ड असे. म्हणजे आम्ही पुस्तकं घेतलं, त्याची कार्डावर यादी असायची. मोठाल्या कार्डावर. ते कार्ड बघत. शिक्षक कसा असावा याचं चिटणीस आदर्श उदाहरण. त्यांचे फार मोठे संस्कार झाले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तिसरे वानखेडे. यांच्यामुळे इंग्रजी वाङ्मयाची गोडी मला लागली. मी जेव्हा एम.ए.ला गेलो, तेव्हा वानखेडेंनी समीक्षेची कोणती पुस्तकं इंग्रजी कोणत्या अनुक्रमाने वाच याची यादी स्वतःच्या अक्षरात करून दिली होती. तेव्हा असे शिक्षक मला लाभले. नंतर मी हैद्राबादला गेल्यानंतर तिथं भालचंद्र महाराज कहाळेकर होते. त्यांनी लिहिलं काहीच नाही, परंतु विलक्षण तर्कशुद्ध बोलणं आणि वाङ्मयाचा अतिशय सखोल असा त्यांचा अभ्यास होता. त्यांची पद्धती अशी असे की, ते चर्चा करून शिकवत. ‘उद्या आपण मर्ढेकरांची ‘गणपत वाणी’ ही कविता घेणार आहोत. तुम्ही ती वाचून या, त्यावर विचार करू.’ मग त्यावर चर्चा करत तेच प्रश्न विचारत. हे असंच का? हा शब्द का? या ऐवजी असं असतं तर काय झालं असतं. त्यामुळे कुठल्याही कवितेचं विश्लेषण करण्याची सवय तेव्हापासून लागली. किंवा कविता कशी समजून घ्यायची, समजून घेताना तिच्याकडे कसं बघायचं, हे त्यांच्यामुळे शिकलो. भगवंतराव देशमुख नावाचे शिक्षक लाभले. अतिशय रसिक होते. त्यांचं शिकवणं थोडंसं रसिकतेच्या अंगानं होतं.
काही काळ भगवंतराव देशमुख कोल्हापूरला राजाराम महाविद्यालयात होते....?
रसाळ - हो, तिथंही होते. म्हणजे मला कवितेची गोडी या दोन प्राध्यापकांमुळे लागली. नाहीतर मी स्वतः एकही कविता लिहिलेली नाही, तरीही मी कवितेचाच विचार प्रामुख्यानं केला. याचं कारण ही सगळी मंडळी. मर्ढेकरांचा खरा परिचय म.भि. चिटणीसांनी १९५०-५१ मध्ये मला करून दिला. त्यानंतर ही सगळी मंडळी, त्यांचे संस्कार माझ्यावर झाल्यामुळे… म्हणजे माझ्या वडलांपासून ते कहाळेकरांपर्यंत असे अतिशय उत्तम शिक्षक मला लाभले.
ना. गो. नांदापूरकरांविषयी काय सांगाल?
रसाळ - नांदापूरकरांचं एक वैशिष्ट्य सांगतो. जुन्या वाङ्मयाचे ते अभ्यासक होते. मी जेव्हा एम.ए.ला हैद्राबादला गेलो, तेव्हा ते नुकतेच निवृत्त झाले होते. पण त्यांना शिकवायला दिलेलं होतं. त्यामुळे ते विद्यापीठात काही तास घेत. ते आम्हाला जुनं वाङ्मय शिकवत. त्यांचं वैशिष्ट्य असं की, मराठी भाषेचा अतिशय सखोल असा अभ्यास होता. त्यांनी आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवली त्या काळामध्ये. हे शब्द, त्यांच्या व्युत्पत्ती आणि हे शब्द मराठवाड्याच्या बोलीभाषेत कसे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून ते कसे लुप्त झाले, हे ते सांगत. खरं म्हणजे निजामी राजवटीमध्ये ज्यांनी मराठी भाषेवर प्रेम करायला विद्यार्थ्यांना शिकवलं त्यात मुख्यतः नांदापूरकर होते. ते औरंगाबादला सरकारी महाविद्यालयामध्ये मराठीचे शिक्षक होते. मराठीवर प्रेम करायला, वाचायला वगैरे गोष्टी त्यांनी शिकवल्या. ते जेव्हा बदली होऊन हैद्राबादला गेले, तेव्हा जवळपास दोनशे-अडीचशे विद्यार्थी त्यांना पोहचवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते. असे हे नांदापूरकर. त्यांची शिकवण्याची पद्धती जुनी असे. परंतु त्यांचे काही संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे ही सगळी मंडळी जर माझ्या नशिबात आली नसती तर, मी कोण असतो आणि कसा असतो, हे मला सांगता येत नाही.
त्या अर्थाने तुम्ही इतके भाग्यवान आहात की, तुम्हाला चांगले शिक्षक मिळाले आणि त्यांचा संस्कार तुमच्यावर झाला. वाङ्मयाच्या आकलनासंबंधीचं बीजारोपण तुमच्यात झालं…
रसाळ - तुम्हाला सांगतो चिटणीससरांमुळे मी असे जवळपास ठरवलं की, सगळी समीक्षेची पुस्तकं ग्रंथालयात असतील तेवढी वाचून काढायची. ती सगळी वाचणं शक्य नव्हतं, परंतु माझं प्रचंड वाचन झालं. मला एम.ए.ला स्वतंत्रपणे अभ्यासच करावा लागला नाही. आधीच सगळं वाचन झालं होतं. त्यामुळे तिथं मी प्रामुख्यानं इंग्लिश वाचलं. मराठी वाचायची गरजच वाटली नाही.
मग त्यानंतर तुम्ही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झालात?
रसाळ - नंतर मी एम.ए. फर्स्ट क्लास झालो. उस्मानिया विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या इतिहासामध्ये एम.ए. प्रथम श्रेणीत आलेले पहिले विद्यार्थी भगवंत देशमुख. त्यानंतर १२ वर्षानी मी पहिला. मध्ये कोणीही नाही. तेव्हा मला नोकरी ताबडतोब लागली. औरंगाबादलाच सरकारी महाविद्यालयामध्ये त्यांनी मला ताबडतोब घेऊन टाकलं. सरकारी इंटरव्यूह नंतर झाला. पण त्याच्या आधी लोकल अपॉइंर्मेंट मला देऊन टाकली. मी १९५७ पासून मराठी शिकवायला लागलो. गंमत अशी की, मला जे वरिष्ठ प्राध्यापक लाभले. त्यात सरकारी महाविद्यालयामध्ये भगवंत देशमुख विभागप्रमुख लाभले. ते माझे गुरूच होते. विद्यापीठात वा.ल.कुलकर्णी लाभले. हे दोघेही नामांकीत शिक्षक. ते ज्या वर्गाला शिकवत, त्या वर्गाला आपण शिकवायचं आहे याचं एक सतत दडपण असे. त्याचा फायदा असा की, खूप बारकाईनं तयारी करूनच वर्गात जायचं याची सवय लागली. ‘वा. ल. कुलकर्णी उत्तमच आहेत, पण रसाळ बरं शिकवतात’ असं विद्यार्थ्यांनी म्हणावं या हेतूनं तयारी करून मी जात असे.
आणि ही तयारी करून म्हणजे अभ्यासून प्रकट व्हावे, अशा तऱ्हेचा तुमचा दृष्टीकोन तयार झाला. तो कायम राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात आल्यानंतर वा.ल. कुलकर्णींचे सहकारी झालात. आणि तुम्ही ‘कवितेतील प्रतिमासृष्टी’ हा विषय आपल्या संशोधनासाठी, पीएच.डी.साठी घ्यायचा ठरवलात. तर हा विषय निवडावा आणि यावर संशोधन करावं, असं तुम्हाला का वाटलं?
रसाळ - खरं म्हणजे तो मी निवडलेला नाही. पण तो माझा झाला नंतर. तेव्हा माझे पहिले गुरू म.भि. चिटणीस हे विद्यापीठाचे रजिस्टार होते. त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, ‘तू आता विद्यापीठात आलास. आता पीएच.डी. कर. आणि कवितेतल्या प्रतिमेवर कोणीही आतापर्यंत काम केलेलं नाही. तर तू हा विषय घे.’ थोडंसं मार्गदर्शनही त्यांनी केलं. कसं करायचं? काय करायचं. वा. ल. कुलकर्णी तर होतेच. पुढे मी वाचन करायला लागल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, जोपर्यंत या संकल्पना नीटपणे मांडल्या जात नाहीत, तोपर्यंत यांच्यावर उपयोजित काम करणं चुकीचं आहे. म्हणून पहिल्यांदा प्रतिमा आणि एकूण कविता यांची सैद्धांतिक मांडणी करणं आवश्यक आहे, असं वाटलं.
मग मी वा.लं.ना म्हणालो की, ‘मला थोडा विषय बदलून द्या. कालखंड काढून टाका.’ मग विषय बदलण्यासाठी अर्ज, मग ती कमिटी, मग कमिटीपुढे अर्ज. एवढं होऊन माझा विषय बदलला आणि ‘कवितेतील प्रतिमासृष्टी’ असा विषय आला. प्रामुख्यानं इंग्लिशचं वाचन करावं लागायचं तेव्हा. मला एकूण दहा वर्षं हा अभ्यास करायला लागली. मला मदत करणारे कोण होते तर चिटणीससर, वा.ल. कुलकर्णी आणि रेगे. रेगे औरंगाबादला वारंवार यायचे. आले की, मी जाऊन भेटायचो. आणि मग त्यांनी प्रतिमा मानससास्त्रामध्ये कोणत्या अर्थानं वापरली जाते वगैरे अशा अनेक चर्चा करून मला बरंचसं मार्गदर्शनही केलं. चिटणीससरांनी ‘मुंबईला शा.शं. रेगेंना जाऊन भेट. ‘त्यांना म्हणावं मी प्रतिमेवर काम करतोय, चिटणीससरांनी पाठवलं आहे. मला कोणती पुस्तकं आहेत, ती दाखवा.’ म्हणून सांगितल्याचं आठवतं.
ग्रंथपाल सिद्धार्थ महाविद्यालयाचे ना?
रसाळ – हो. मी गेलो. त्यांनी पन्नास एक पुस्तकं माझ्यासमोर आणून ठेवली. ‘प्रतिमा’ या विषयावर इंग्रजीमध्ये जे लेखन झालं ते. मी दबकूनच गेलो. त्यातली काही पुस्तकं मी वाचली. प्रामुख्यानं अमेरिकन ‘न्यू क्रिटीसिझम’मधली पुस्तकं मी प्रामुख्याने वाचली आणि ‘न्यू क्रिटीसिझम’चा एक प्रभाव माझ्या सगळ्या वाङ्मयीन विचारावर तेव्हापासून पडला. हा ग्रंथ सिद्ध झाला म्हणजे पीएच.डी.चा प्रबंध झाला. वा.ल.कुलकर्णींचं वैशिष्ट्य असं होतं की, परीक्षक त्या अभ्यास क्षेत्रातले जाणकारच नेमायचे. त्यांनी यामध्ये तडजोड कधीही केली नाही. तेव्हा माझ्या प्रबंधाचे परीक्षक होते रा.भा. पाटणकर आणि मेघःशाम पुंडलिक रेगे. दोघांचे अनुकूल अभिप्राय आले. नंतर या दोघांनी तीन तास माझी मौखिक परीक्षा घेतली. आणि गंमत म्हणजे मी खरोखर वाचलेलं आहे काय की, नुसते तुकडे घेऊन प्रबंधात जोडलेले आहेत, हे त्यांनी तपासलं. आणि मग मी पीएच.डी. झालो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पीएच.डी. झाल्यानंतरही या विषयाचा पाठपुरावा तुम्ही करतच राहिलात. त्यातून पुढे तुमचा ‘कविता आणि प्रतिमा’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. प्रतिमेला केंद्रस्थानी ठेवून तुम्ही हा सगळा विचार मांडलेला आहे. तसंच आपला ‘वाङ्मयीन संस्कृती’ हा ग्रंथ मला महत्त्वाचा वाटतो. कारण वाङ्मयीन संस्कृतीसंबंधी सैद्धांतिक असा विचार फारसा केलेला आपणाला दिसत नाही. याकडे कसे वळलात?
रसाळ - मला असं वाटायला लागलं की, आपलं वाङ्मय फार पाश्चात्याच्या प्रभावाखाली आहे. मी १९६६ साली केशवसुतांच्या कवितेतवर एक लेख लिहिला. त्यांची जन्मशताब्दी होती आणि मी असं मांडलं की, रोमँटिसिझमला भारतीय परंपरेतलं रूप देऊन यांनी कविता लिहिली. त्यामुळे ती कविता चांगली झालेली आहे. नुसतं रोमँटिसिझम मराठीमध्ये त्यांनी आणला असं काही झालेलं नाही. सुरुवातीच्या काळात १९व्या शतकात हे पाश्चात्य संकल्पनांचं मराठीकरण करणं ही प्रक्रिया झालेली आपल्याला दिसते. उदा. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘सौभद्र’ लिहिताना त्यात काही इंग्रजी रसही आणलेले आहेत. नाटक भारतीय परंपरेतलं ठेवूनही त्यांनी त्यामध्ये आधुनिक गोष्टी आणल्या. मला असं वाटायचं की, याच प्रक्रियेनं आपण आपल्या वाङ्मयाचा विकास केला पाहिजे. परंतु नंतर तो झाला नाही. नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चात्य जाणिवा, पाश्चात्य दृष्टीकोन स्वीकारूनचं वाङ्मय निर्माण झालं. खरं म्हणजे, उत्तम कविता ही त्या संस्कृतीतूनच निर्माण होते. कारण त्या संस्कृतीचे संस्कार त्या कलावंतावर होत असतात. त्याचं व्यक्तिमत्त्व घडतं असतं. मराठीमध्ये हे नीट होत नाही. हे मला जाणवत होतं. आपल्या वाङ्मयाचं खुजेपण यामध्ये आहे, अशी माझी एक समजूत. त्यातून मग ‘वाङ्मयीन संस्कृती’ हा ग्रंथ तयार झाला.
त्या काळात प्रामुख्याने टी.एस. इलियट याचा विचार माझ्या मनात होता. त्यानं असं मांडलं की, युरोपीय वाङ्मयाचं एक कुळ आहे. म्हणजे उदा. फ्रान्समध्ये काही एक नवी प्रवृत्ती आली की, ती हळूहळू सगळ्या युरोपभर वाययामध्ये जाते. एवढेच नाही तर चित्रकलेत एखादा काहीतरी नवं घडतं आणि त्याचा प्रभाव सगळ्या कलाप्रकारावर युरोपमध्ये पडतो. तेव्हा एक वाङ्मयीन कूळ तयार झालेलं आहे. याचं कारण त्यांचं सांस्कृतिक जीवन समान आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या सांस्कृतिक जीवनात काही फरक नाही. त्यांची मूल्यव्यवस्था, जीवनपद्धतीही समान आहे. तसेच म्हणजे भारताचंही आहे. एखादा बंगाली किंवा एखादा तामिळनाडू आणि एखादा मराठी तसं सांस्कृतिक अंतर फार नाही. विविधता असूनही एक समान दुवा आहे. तेव्हा आपल्याकडे का नाही होत? कारण या वेगवेगळ्या भाषांमध्ये वाङ्मयीन दळणवळणच आपण प्रस्थापित केलेलं नाही. म्हणजे मला जितके इटालियन कादंबरीकार माहीत आहेत, तितके काही आसामी माहीत नाहीत असं का?
या बाबतीत वासाहतिक दृष्टीकोनाच्या प्रभाव व दृश्यपरिणाम असावा का? असे आपण सूचित करत आहात?
रसाळ - त्याचे हे दृश्यपरिणाम. ब्रिटिशांनी प्रामुख्यानं शिक्षणपद्धतीतून आमची एकूणच संस्कृती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे अप्रत्यक्ष संस्कार केलेते आणि त्याचे परिणाम म्हणजे मी त्यामध्ये कुंटे यांचे ‘राजा शिवाजी’ची प्रस्तावनाचे विश्लेषण केलेलं आहे. कुंटे हेच म्हणतात, की इंग्रजी कविता ही आपल्या कवितेपेक्षा श्रेष्ठ कशी. खरं म्हणजे अशी तुलनाच होत नाही. म्हणजे उद्या कोणी असे म्हणाले की, मोझार्ट किशोरी अमोणकरपेक्षा श्रेष्ठ, तर ती तुलना चुकीची आहे. त्याची संगीताची परंपरा वेगळी आहे. आमची संगीताची परंपरा वेगळी आहे.
म्हणजे आपल्याकडे मराठीचा शेक्सपिअर कोण, मराठीचा वर्डस्वर्थ कोण, ही मानसिकता जी तयार झाली. ती त्यातून आलेली असावी?
रसाळ - हे सुरू झालं आणि त्याचे दृश्य परिणाम मराठी वाङ्मयावर झाले. म्हणून हे थांबवलं पाहिजे. त्याच्यावर लिहिलं पाहिजे. याची जाणीव करून दिली पाहिजे. यातून मी काही लेख लिहिले. हे मी स्वतंत्र पुस्तक लिहिलं नाही. विविध लेख एकत्र केले आहेत
जसा मर्ढेकरांचा तुम्ही उल्लेख केलेलाच आहे. विद्यार्थिदशेपासून मर्ढेकरांचा परिचय झाला. नंतर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही मर्ढेकरांवर दोन सुरेख अशी उत्तम पुस्तकं लिहिली. एक म्हणजे ‘मर्ढेकरांची कविता : जाणीवेचे अंतःस्वरूप’ आणि दुसरं म्हणजे ‘मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण’. या पहिल्या ग्रंथामधून तुम्ही एक सैद्धान्तिक मांडणी केलेली आहे. आणि दुसऱ्या ग्रंथामधून, मर्ढेकर तुम्हाला समजले तसे तुम्ही मांडले आहेत. दुसऱ्या ग्रंथाद्वारे मराठीमध्ये सर्वसाधारणपणे दुर्बोध म्हटल्या गेलेल्या अशा कवितांचा अन्वय आहे. दुर्बोधता हे प्रकरण आपल्या मराठीमध्ये पुन्हा पुन्हा येत असतं. तुमचा कवितेचा सूक्ष्म अभ्यास आहे. दुर्बोधता ही संकल्पना काय आहे? म्हणजे खरोखर अस्सल अर्थानं किंवा त्याच्या मर्यादा किंवा वाचकाच्या मर्यादेतून ती आलेली असते का? काय म्हणता येईल त्याबद्दल?
रसाळ - दुर्बोधता ही प्रामुख्यानं येते ती कवीच्या किंवा लेखकाच्या आत्मनिष्ठेतून. म्हणजे असं की, मला जो अनुभव व्यक्त करायचा आहे, तो परिपूर्णपणे व्यक्त करण्यासाठी मी जे शब्द निवडीन, ते त्या अनुभवाशी एकरूप असले पाहिजेत. मग ते शब्द वाचकाला कळतात की नाही, हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही. म्हणून अनुभवामधली जी सूक्ष्मता आहे, ती व्यक्त करण्यासाठी प्रतिमांची मोडणी करणं, शब्द बदलणं, शब्दांची रूपं नवी करणं ही त्याची अपरिहार्य गरज होते. म्हणजे स्वतःला अभिव्यक्त करणं हेच महत्त्वाचं आहे. बाकी इतर गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. या जाणिवेतून ही दुर्बोधता प्रामुख्याने आली. पण गंमत अशी की, नंतर मुद्दाम दुर्बोध लिहिणं म्हणजे चांगलं लिहिणं, अशीच काहींची समजूत झाली. म्हणून अस्सल दुर्बोधता आणि नकली दुर्बोधता यात फरक करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ही फार अवघड अशी गोष्ट आहे.
तुमच्या आरंभीच्या समीक्षेवर रूपवादाचा प्रभाव होता आणि नंतर मात्र तो संस्कृती-समीक्षेकडे झुकला, असं मानलं जालं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
रसाळ - या प्रश्नाचं उत्तर देण्यास आवश्यक असलेली वाङ्मयीन समीक्षेबद्दलची माझी भूमिका प्रथम स्पष्ट करतो. वाङ्मय किंबहुना सर्वच कला यांचे संपूर्ण स्वरूप कधीच उलगडणार नाही, असे मी मानतो. कलानिर्माते कलानिर्मिती करताना प्रस्थापित झालेल्या स्वरूपात परिवर्तने घडवून तिला नवनवी रूपं देताना दिसतात. त्यामुळे वाङ्मकृती ही अशी अशी असते, असं नेमकेपणानं म्हणता येत नाही. वाङ्मयकृतीचं समग्र स्वरूप पकडण्याचा प्रयत्न समीक्षा करत असते. काव्य असं असं असतं किंवा असं असलं पाहिजे, या प्रकारची विधानं समीक्षेत असतात. वाङ्मयकृती आणि समीक्षा यांच्या नात्याबद्दल मी एक दृष्टान्त देत असतो. वाङ्मयकृती ही प्रचंड अशा उभ्या-आडव्या देहाच्या व्यक्तीसारखी आहे. आणि सर्व प्रकारच्या वादांची समीक्षा ही अपऱ्या पांघरुणासारखी आहे. सर्वच वादांच्या समीक्षकांना असं वाटत असतं की, केवळ आपलंच ‘पांघरूण’ वाङ्मयकृतीचा सर्व देह झाकून टाकू शकतं. पण प्रत्यक्षात हे पांघरूण वाङ्मयकृतीवर टाकलं तर तितं एक तर डोकं उघडं राहतं किंवा पाय तरी उघडे राहतात! मग समीक्षक जेव्हा आपलं पांघरूण उघड्या डोळ्याकडे ओढतात, तेव्हा तिचे पाय उघडे पडतात! मग ते तिच्या पायाकडे ओढू लागतात! तेव्हा आपण समीक्षेतील स्वीकारलेली भूमिका वाङ्मयाचं परिपूर्ण स्वरूप स्पष्ट करू शकतं, या भ्रमात कोणीही राहू नये असं मला वाटतं. समीक्षेतील प्रत्येक वाद वाङ्मयकृतीचं संपूर्ण शरीर झाकण्यासाठी आपापलं ‘पांघरूण’ लांबरूंद करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो आता हे वाढवलेलं पांघरूण वाङ्मयकृतीचं शरीर पूर्णपणे झाकील. पण तसं होतच नाही! म्हणून मी जी भूमिका घेतो, ती अपुरी आहे, आणि अपुरीच राहणार, हे मी नेहमी लक्षात ठेवतो. आणि जर कोणी त्याच्यातील उणीवा तर्कशुद्धपणे दाखवून दिल्या तर त्याही मी मान्य करतो. माझं ‘पांघरूण’ वाङ्मयकृतीचं शरीर इतर पांघरुणांपेक्षा सर्वांत अधिक प्रमाणात झाकतं, एवढंच मी म्हणतो!
मी केवळ रूपवादी नाही. वाङ्मयकृतीचं रूप आणि तिचा आशय या दोन्हींचा मी विचार करतो. मी आशयाभिव्यक्तीची अभिन्नता मानतो. परंतु वाङ्मयकृतीचं स्वरूप तपासताना या दोन्ही गोष्टी वेगळ्या करून तपासाव्या लागतात आणि त्या तशा तपासता येतात; तसंच हे केल्यावर या दोन्ही गोष्टी मुळात एकजीव आहेत का, हेही पाहता येतं, असं माझं मत आहे. आशय आणि रूप या दोहोंचा विचार करणाऱ्या या भूमिकेला मी ‘संबंधवादी’ भूमिका म्हणतो.
कलाकृतीचं ‘कलाकृती’ म्हणून जर मूल्य ठरवायचं असेल तर केवळ कलामूल्यं लावूनच ते ठरवता येईल. अन्य मूल्यांच्या कसोटीवर तिचं ‘कलापण’ कसं ठरवता येईल? एखादी वाङ्मयकृती कलाकृती असूनही त्याशिवाय अधिकचं काही देत असेल तर ती देत असलेलं हे अधिकचं तिचं कलाकृतीपण पाहताना लक्षात घेण्याचं मला कारण वाटत नाही.
वाङ्मयकृतीचं मूल्यमापन करताना आपण निकषांचा एक व्यूह वापरत असतो. या व्यूहात अनेक निकष असतात. प्रत्येक समीक्षक आपल्या भूमिकेप्रमाणे मूल्यव्यूहातील निकषांचा अग्रक्रम ठरवून आपला स्वत:चा ‘मूल्यव्यूह सिद्ध करत असतो.
लेखक-कवींचे अनुभव ही त्यांची निर्मितीसामग्री असते. या अनुभवांचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या जाणिवा अनुभवांच्या आकलनविश्लेषणातून लेखक-कवींना प्राप्त होत असतात. या जाणिवाच लेखक-कवीचे अनुभव संघटित करून त्यांना कलारूप देत असतात. लेखक-कवीचे अनुभव त्याच्या सभोवतालच्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवातून त्याला प्राप्त होत असतात आणि जाणीवा या आलेल्या अनुभवांची निष्पत्ती असल्यामुळे त्या अनुभवांचा आणि ते अनुभव देणाऱ्या विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचा भागच असतात. परभाषेतल्या वाङ्मयातून व्यक्त होणाऱ्या जाणिवा त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवातून सिद्ध झालेल्या असतात. आपले लेखक-कवी जेव्हा त्या स्वीकारून आपल्या अनुभवांची संघटना बांधू पाहतात, तेव्हा ते अनुभव स्वाभाविकपणे संघटितच होत नाहीत. वाचकाला त्या जाणिवांच्या संदर्भात वाङ्मयकृतीतील अनुभवाचा प्रत्ययच येत नाही. त्यामुळे अशा वाङ्मयकृती वाचकाला परक्या वाटतात. अशा वाङ्मयकृतीचे वाचक तिचे फक्त बौद्धिक आकलन करू शकतात. अशा वाङ्मयकृतींवर समीक्षा लिहिणारे समीक्षक आपल्या समीक्षेतून समीक्षाविषयक असलेल्या वाङ्मयकृतीचे बौद्धिक आकलन व्यक्त करतात. अशा वाङ्मयकृतींच्या आकलनाला वैचारिक निबंधाच्या आकलनाचं स्वरूप प्राप्त होतं.
वाचकाला वाङ्मयकृतीचा प्रत्यय येणं म्हणजे वाचकाच्या स्वत:च्या अनुभवांना वाङ्मयकृतीतल्या अनुभवांकडून आणि जाणिवांकडून अर्थपूर्णता लाभणं. परभाषिक वाङ्मयकृतीतील जाणिवा वाचकाच्या अनुभवांना अर्थपूर्णता देऊ शकत नाहीत. यामुळे अशा वाङ्मयकृती वाचकाला ‘आपल्या वाटत नाहीत; त्याला त्या परक्या वाटतात. कुठलीही कलाकृती निर्मात्याच्या संस्कृतीतूनच जन्मलेली असली तरच ती त्या संस्कृतीचा भाग बनून ती आस्वादयोग्य होते. माझी समीक्षा एवढ्यापुरताच संस्कृतीचा विचार करते. म्हणून माझ्या समीक्षेला संस्कृती-समीक्षा म्हणता येईल, असं मला वाटत नाही.
वाङ्मयकृतीसंबंधीचे काही प्राथमिक घटक आणि वैशिष्ट्यं कोणत्या स्वरूपात आहेत, हे मूल्यमापनात पहावं लागतं. काव्य, कथा आणि नाट्य या तीन मूलभूत भाषिक रूपांतून काव्य, कथा, आणि नाट्य ही तीन वाङ्मयरूपं घडली, असं मी मानतो. काव्य, कथा, आणि नाट्य या रूपांतून त्यांचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. त्यांना मी वाङ्मयप्रकार म्हणतो. लेखक-कवी वाङ्मयप्रकार मोडू शकतो, पण तो वाङ्मयरूप मोडू शकत नाही. किरण नगरकर यांनी ‘सात सक्कं त्रेचाळीस’मध्ये आणि श्याम मनोहर यांनी ‘कळ’ या कादंबरीत कथानक मोडलं असलं तरी त्यात कथात्मकता कायम राहिली. वाङ्मयकृतीच्या मूल्यपनात वाङ्मयरूपाच्या आणि वाङ्मयीन भाषेच्या वैशिष्ट्यांची तपासणी करावी लागते आणि त्या सोबत कलामूल्यांच्या साहाय्यानं तिची कलात्मकता निश्चित करावी लागते.
साधारणत: आपली काव्यसमीक्षा १९८०पूर्व मराठी कवितेचीच राहिली आहे. चित्रे, कोलटकर, लघुनियतकालिकांतील कविता आणि दलित कविता यावर आपण लिहिलं नाही. तसंच १९९० नंतरच्या मराठी कवितेकडे आपण कसं पाहता?
रसाळ - हे पूर्ण खरं नाही. चित्रे यांच्यावर मी जरी लिहिलेलं नसलं तरी कोलटकरांवर लिहिलेलं आहे. सुर्वे, ना. धों. महानोर, नामदेव ढसाळ यांपैकी काहींवर विस्तृत तर काहींवर छोटे लेख लिहिले आहेत. चित्रे, कोलटकर, आरती प्रभू, आणि वसंत आबाजी डहाके यांच्यानंतर मराठीत लक्षणीय कविता फारशी लिहिली गेलीच नाही. या कवींनंतर विधानात्मक स्वरूपाची कविता लिहिली जाऊ लागली. कविता म्हणून तिचं गद्यापेक्षा वेगळेपण विसरलं जाऊ लागलं. सामाजिक बांधीलकी हे मूल्य बनलं. न पेलणारं समाजपरिवर्तनाचं ओझं कवी डोक्यावर घेऊ लागले. तरीही कविता महाजन, अनुराधा पाटील, प्रफुल्ल शिलेदार, श्रीधर नांदेडकर हे आणि असे काही कवी चांगली कविता लिहिताहेत. परंतु अशा कवींवर लिहायला माझं वय आता परवानगी देत नाही. एका साहित्यसंमेलनात मी १९९० नंतरच्या कवींबद्दल असं म्हणालो होतो की, हे कवी केवळ गवंडीकाम करणारे आहेत. विटांप्रमाणे ते शब्द एकापुढे एक असे रचत जातात! त्या वेळी माझ्यावर बरीच टीका झाली होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
तुम्ही तुमच्या ‘नागर आणि ग्रामीण अभिरुची’ या लेखात ब्रिटिशकाळात आपल्यात नागर आणि ग्रामीण अशा दोन अभिरुची अस्तित्वात आल्या असून हा अभिरुचिभेद नष्ट झाल्याशिवाय मराठी वाङ्मय सर्वच मराठी भाषकांचं बनू शकणार नाही, असं म्हटले आहे. हा अभिरुचिभेद नष्ट कसा होणार?
रसाळ - ‘वाङ्मयेतिहासापुढील प्रश्न’ यावरच्या एका चर्चासत्राचं उद्घाटन करताना मी म्हटलं होतं की, आजही ग्रामीण आणि नीमशहरी भागात ‘मध्ययुगापासून चालत आलेल्या वाङ्मयीन परंपरेत वाङ्मयनिर्मिर्ती होते आहे. अलीकडच्या संतांच्या लीलांचं आणि चरित्रांचं वर्णन करणारं कथात्म साहित्य, लावण्या, भक्तिपर पदं लिहिली जातात आणि पुस्तकरूपानं प्रसिद्धही होतात. त्यांनाही एक वाचकवर्ग असतो. आपल्याला या वाङ्मयाचा सुगावाही नसतो. या सर्व वाङ्मयाची नोंद घेतल्याशिवाय आपला वाङ्मयेतिहास पुरा होतो काय? आपण या वाङ्मयाची दखल कशी घेणार आहोत? अर्थात या चर्चासत्रात माझ्या या मुद्द्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. आपल्या वाङ्मयीन संस्कृतीत दोन भिन्न वाङ्मयीन परंपरा आणि दोन भिन्न अभिरुची अस्तित्वात आल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राची एकच वाङ्मयीन परंपरा आणि वाङ्मयाभिरुची असली पाहिजे. ती निर्माण करायची असेल तर ग्रामीण भागाचं १०० टक्के साक्षरीकरण आणि त्याच्या जीवनपद्धतीचं आधुनिकीकरण झालं पाहिजे. शहर आणि ग्रामीण हा सांस्कृतिक फरक नष्ट होऊन शहर आणि ग्रामीण हा फरक केवळ लोकवस्तीपुरताच राहिला पाहिजे. अर्थात ही दीर्घकाळ चालणारी आर्थिक-सामाजिक प्रक्रिया आहे.
दुसरं म्हणजे ‘परोपजीवी’ बनलेलं आपलं नागर वाङ्मय ‘स्वजीवी’ बनलं पाहिजे. आपल्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवातून लेखक-कवींच्या जीवनविषयक जाणिवा घडल्या पाहिजेत. आधुनिक बनलेली शहरं आणि गावं यांचं हे सामाजिक वास्तव असेल. अशा समान वास्तवातून जन्मलेल्या जाणिवा नागर आणि ग्रामीण वाचकाला ‘आपल्याच’ वाटतील. असं जेव्हा घडेल तेव्हा नागर-ग्रामीण असा अभिरुचिभेद उरणारच नाही. अशा वातावरणात कोणीही जरी आध्यात्मिक वाङ्मय निर्माण केलं तरी ते सर्वांचंच बनलेलं असेल. छोट्याशा केरळमध्ये १०० टक्के साक्षरता असल्यामुळे तिथं आजच्या वाङ्मयाचा खप लोकसंख्येनं त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या महाराष्ट्रातील पुस्तक खपापेक्षा कितीतरी जास्त असतो. महाराष्ट्रात पुस्तकं खपवता खपवता प्रकाशक जिकिरीला येतात. नागर-ग्रामीण असा अभिरुचिभेद नष्ट करण्यासाठी लोकसंख्येची १०० टक्के शिक्षितता आणि ग्रामांचं आधुनिकीकरण आणि त्याचबरोबर मराठी वाङ्मयाचं ‘मऱ्हाटमोळेकरण’ हाच उपाय आहे. हे झालं की आपल्या ग्रंथविक्रीव्यवहारालाही चांगले दिवस येतील.
शब्दांकन : ऋचा जांभळे
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment