शब्दांचे वेध : पुष्प एकतिसावे
गेल्या आठवड्यात विख्यात रोमन सम्राट ज्युलिअस सीझरच्या गुणवर्णनात एक ठळक बाब नमूद करायची राहून गेली होती. पण ती काही नजरचूक नव्हती. मुद्दामच तो उल्लेख टाळला, कारण तो एका स्वतंत्र लेखाच्या विषयाचा भाग आहे. हा विषय आहे- ‘मेडिकल इपनिम्स’ (Medical Eponyms) किंवा वैद्यकीय परिभाषेतले असे शब्द जे खऱ्या किंवा काल्पनिक व्यक्तींच्या नावांपासून (विशेषनामांपासून) तयार झाले आहेत. Eponymचा अर्थ The name derived from a person (real or imaginary) असा होतो. Eponym हा इंग्रजी शब्द ग्रीक भाषेतल्या ep इप- (after, नंतर) + -onym अनिम (name, नाम) या शब्दांपासून तयार झाला. ग्रीकमध्ये त्याचा खरा अर्थ the one who is giving the name (आपलं नाव दुसऱ्याला देणारा) असा होतो.
इंग्रजी भाषेत असे शेकडो इपनिम्स आहेत. हूव्हर (Hoover) म्हणजे काय असं विचारलं तर व्हॅक्युम क्लीनर मशीन असं उत्तर कोणीही अमेरिकन व्यक्ती पटकन देईल. मुळात हे नाव हे यंत्र ज्यांनी बनवलं होतं, त्या कंपनीचं (आणि कंपनीच्या मालकाचं) आहे, हे अनेकांना माहीत नसतं. हे यंत्र इतकं लवकर लोकप्रिय झालं की, मग हूव्हर हा शब्द व्हॅक्युम क्लीनर मशीनला समानार्थी म्हणून लोक वापरू लागले. आपल्याकडे एके काळी हिंदुस्थान लिव्हर कंपनीचं ‘डालडा’ या नावाचं वनस्पती तूप फार प्रसिद्ध होतं. पुढे हे नाव सरसकट सर्वच ब्रॅंडच्या वनस्पती तुपांसाठी समानार्थी म्हणून वापरलं जाऊ लागलं.
अशा या हजारो इपनिम्सपैकी फक्त वैद्यकीय क्षेत्रातल्या काही विशिष्ट इपनिम्सवर आज आपण एक धावती नजर टाकणार आहोत. त्यात सीझरही आहे.
तत्पूर्वी, मराठी - हिंदीतही असे काही इपनिम शब्द आहेत का, हे आठवून बघा, बरं.
मी दोन उदाहरणं देतो. ‘साधना कट’. जुन्या पिढीतल्या लोकांना हा शब्द नक्कीच माहीत असेल. १९६०-७०च्या दशकांत साधना या नटीनं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं एक खास स्थान तयार केलं होतं. तिची एक विशिष्ट पद्धतीची हेअर स्टाईल होती. तिचं अनुकरण करून त्या जमान्यातल्या अनेक मुलींनीही आपल्या केसांना तसंच वळण दिलं होतं. साधनानं लोकप्रिय केलेली केशरचना म्हणून या प्रकाराला पुढे लोक ‘साधना कट’ या नावानं ओळखू लागले. मग हा मराठी-हिंदीमधला एक इपॉनिम शब्द झाला, खऱ्याखुऱ्या व्यक्तीच्या नावावरून तयार झालेला.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
आता पु. लं. च्या ‘अंतू बर्वा’ या लेखातला हा उतारा पहा – “अंतू बरवा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बरव्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी बारा-चौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे ‘पडणे’ हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी ‘‘पोहर्याचा 'अण्णू' झाला काय रे?” म्हणून अंतू ओरडतो.” या उताऱ्यातला ‘अण्णू गोगट्या’ हा एका काल्पनिक व्यक्तीवरून तयार केलेला इपनिम शब्द आहे, आणि ही पुलंची मराठीला देण आहे. असे आणखीही काही शब्द असतील.
आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीत अशा इपनिम शब्दांची भरमार आहे. त्यांचं विषयानुसार वर्गीकरण करता येतं. विज्ञानामध्ये ‘रमण इफेक्ट’ (Raman effect) या नावाची संकल्पना प्रसिद्ध आहे. हा इपनिम शब्द सुविख्यात भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या नावावरून तयार करण्यात आला.
आणखी एका भारतीयानं वैद्यकीय शास्त्रात एक बहुमूल्य संशोधन करून एक नवा शोध लावला होता. त्यामुळे त्यांचं नाव या शोधाला देण्यात आलं. हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गृहस्थ होते डॉ. व्ही. एन. (विठ्ठल नागेश) शिरोडकर (१८९९ - १९७१). स्त्री-रोग तसेच प्रसुतीशास्त्रात त्यांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं. ते मूळचे गोव्याचे होते, पण पुढे ते मुंबईला स्थायिक झाले. जुन्या जमान्यातल्या विख्यात अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे ते पती. स्नेहप्रभाबाईंच्या एके काळी अत्यंत गाजलेल्या आत्मचरित्रात (‘स्नेहांकिता’) मी त्यांचं नाव सर्वप्रथम वाचलं होतं.
डॉ. शिरोडकरांनी आपल्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले. त्यातला सर्वात महत्वाचा आणि जगन्मान्य झालेला प्रयोग होता गरोदर स्त्रियांच्या गर्भाशयांबाबतचा. काही महिलांचं गर्भाशय कमजोर असतं. त्यामुळे अशा स्त्रियांचा गर्भधारणेनंतर काही आठवड्यांनी गर्भपात होऊ शकतो किंवा नियत काळापेक्षा आधीच त्यांची प्रसुती होते. म्हणजेच बाळ अपुऱ्या दिवसांचं जन्माला येतं. अशा बाळाची वाढ नीट झाली नसल्यानं ते अशक्त असतं. त्यामुळे ते मरण्याची शक्यता जास्त असते. किंवा रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यानं ते सतत आजारी पडू शकतं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या विषयावर डॉ. शिरोडकरांनी खूप अभ्यास करून एक उपाय शोधून काढला. तो म्हणजे गरोदरपणाच्या १२ ते १४व्या आठवड्यात गर्भाशय-ग्रीवेच्या आतून आणि अवतीभोवती घट्ट टाके घालून ग्रीवेला शिवून टाकणे. (ग्रीवा म्हणजे मानेसारखा भाग किंवा cervix सर्व्हिक्स. गर्भपिशवीतून गर्भाशयाच्या मुखाकडे जाणारा हिस्सा.) हे टाके बाळाच्या जन्माच्या नियत तारखेच्या काही काळ आधी काढून टाकले जातात. कारण त्या वेळी गर्भपात होण्याचा धोका जास्तीत जास्त टळलेला असतो. या प्रकारच्या टाक्याला ‘cervical cerclage’ अथवा ‘cervical stitch’ असं म्हणतात. डॉ. शिरोडकरांनी ही पद्धत पहिल्यांदा शोधून काढली आणि लोकप्रिय केली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या टाक्याला ‘शिरोडकर स्टिच’ (Shirodkar stitch) किंवा ‘शिरोडकर सर्क्लेज’ (Shirodkar cerclage) असं नाव देण्यात आलं. डॉ. शिरोडकरांचं हे संशोधन १९५५ सालचं (आणि मुंबईत केलेलं) आहे.
परंतु आज हा ‘शिरोडकर स्टिच’ मागे पडला असून त्याची जागा ‘मक्डॉनल्ड सर्क्लेज’ (McDonald cerclage)नं घेतली आहे. शिरोडकरांची पद्धत बरीच गुंतागुंतीची आणि जरा कठीण होती. काहीशी अशीच पण अनुकरण करायला सोपी अशी एक वेगळी पद्धत १९५७ साली आय. एस. मक्डॉनल्ड (I. S. McDonald) या ऑस्ट्रेलियन स्त्रीरोग तज्ज्ञानं प्रचारात आणली. म्हणून आज सर्वदूर बव्हंशी तिचाच वापर केला जातो. मात्र असं असलं तरी या बाबतीतले मूलभूत संशोधक म्हणून डॉ. शिरोडकर हेच श्रेयाचे धनी आहेत, हे विसरून चालणार नाही. ‘शिरोडकर स्टिच’ आणि ‘मक्डॉनल्ड स्टिच’ ही दोन्ही वैद्यकीय इपनिम्स आहेत.
आणि आता सीझरबद्दल. ज्या वेळी या ना त्या कारणानं बाळाचा जन्म नॉर्मल पद्धतीनं म्हणजे योनीमार्गातून होऊ शकत नाही किंवा तसं झालं तर मातेच्या अथवा बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी डॉक्टरांची खात्री पटते, तेव्हा ते आपल्या गर्भवती पेशंटला ‘सीझर’ (Caesar) करण्याचा सल्ला देतात आणि पेशंटच्या संमतीनंतर योग्य वेळी ही शस्त्रक्रिया केली जाते. मातेच्या उदराला चीर पाडून तिच्या गर्भाशयातून बाळाला अलगद बाहेर काढलं जातं आणि तिचं पोट पुन्हा शिवून टाकलं जातं. एके काळी क्वचितच वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीचा आज सर्रास आणि जवळपास सरसकट अवलंब केला जातो. (प्रसुतीच्या वेळी होणाऱ्या वेणा नको असणाऱ्या बऱ्याच बायकादेखील सगळं काही ठीकठाक असूनही आपलं सीझरच व्हावं, असा हट्ट डॉक्टरकडे करतात.) त्यामुळे ‘सीझर’ किंवा ‘सीझर झालं’, ‘सीझर बेबी’, असे शब्दप्रयोग अगदी सामान्य लोकांनाही आता माहीत झाले आहेत.
हा शब्द ‘सीझरियन डिलिव्हरी’ किंवा ‘सीझरियन सेक्शन’ किंवा ‘सी-सेक्शन प्रोसिजर’ यांचं लघुरूप आहे. ज्युलिअस सीझर (Julius Caesar) या रोमन राजाचा जन्म सी-सेक्शन प्रोसिजरनं झाला होता आणि असा जन्म घेणारं ते जगातलं पहिलं मूल होतं - म्हणून त्याच्या स्मरणार्थ या पद्धतीला त्याचं नाव (सीझर) देण्यात आलं, असा जवळपास सगळ्याच लोकांचा गैरसमज आहे. खरं तर ही एक दंतकथा आहे. Christopher Wanjek यानं लिहिलेल्या ‘Bad Medicine : Misconceptions and Misuses Revealed, from Distance Healing to Vitamin O’ या पुस्तकात पान क्रमांक पाचवर हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. याचं कारण सांगताना तो म्हणतो की, ज्युलिअस सीझरची आई - Aurelia Cotta (ऑरेलिआ कोटा) - तो ४४ वर्षांचा होईपर्यंत जिवंत होती. आणि इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत (काहींच्या मते चौदाव्या शतकापर्यंत) सीझर ऑपरेशन झाल्यानंतर बाई जिवंत राहिल्याचं एकही उदाहरण अद्याप सापडलेलं नाही.
ज्युलिअस सीझरच्या नावावरून या शस्त्रक्रियेला ‘सीझर’ म्हणतात हे खरं तर ‘Spurious etymology’ (खोट्या व्युत्पत्ती)चं हे एक उत्तम उदाहरण आहे. प्रसुतीच्या वेळी जिला मरण आलं असेल, अशा कोणत्याही स्त्रीचं दफन करण्यापूर्वी तिचं गर्भाशय फाडून आत असलेल्या जिवंत बाळाला बाहेर काढणं हे प्राचीन रोमन कायद्यानुसार अनिवार्य होतं. मृत गर्भवती स्त्रीला तसंच गाडणं हे निषिद्ध मानलं जात असे. त्यामुळे मृत आईचं पोट फाडून बाळाला बाहेर काढणं हे ज्युलिअस सीझरच्या जन्माच्या आधीपासूनच तिथे होत होतं. पण आई जिवंत असूनही केवळ वैद्यकीय कारणांसाठी तिच्यावर ही ‘सीझर’ शस्त्रक्रिया त्या काळात करण्यात आली असल्याचा, आणि ती सफल झाल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. बाराव्या शतकातला प्रसिद्ध ज्युईश संशोधक आणि वैद्यकशास्त्रज्ञ मेमॉनाइड्स (Maimonides) याला तर अशा सीझर शस्त्रक्रियेनंतर ती स्त्री जिवंत राहू शकेल किंवा राहिली तरी तिला पुन्हा गर्भधारणा होईल यावरच भरोसा नव्हता. एका तर्कानुसार लॅटिनमधल्या ‘caedere’ (उच्चार - काइडर) या क्रियापदातून ‘caesar’ हा शब्द तयार झाला. Caedere म्हणजे कापणे, to cut. अशा सीझर बेबींना तेव्हा ‘caesones’ असं म्हणत.
इसवी सनाच्या २३/२४ ते ७९ या काळात थोरला प्लिनी (Gaius Plinius Secundus / Pliny the Elder) या नावाचा एक प्रसिद्ध रोमन लेखक, तत्त्वज्ञ, संशोधक, आणि वैज्ञानिक होऊन गेला. त्याच्या अनुमानानुसार सम्राट ज्युलिअस सीझरच्या जन्माच्या बऱ्याच पूर्वी ज्युलिअस सीझर याच नावाचा एक माणूस त्याच्या वंशात जन्माला आला होता. या पहिल्या सीझरचं वर्णन तो ab utero caeso (गर्भाशयापासून कापलेला) असं करतो. या caesoचं Caesar झालं आणि पुढे त्याच्या समस्त वंशजांनी Caesar हे बिरूद आपल्या नावात तिसऱ्या स्थानी कायमचं धारण केलं. अशा तिसऱ्या नावांना ‘cognomen’ अशी संज्ञा आहे. एके काळी cognomen म्हणजे टोपणनाव समजलं जाई. पण पुढे ते वंशनाम (आडनाव) म्हणून वापरात आणलं जाऊ लागलं. (सम्राट ज्युलिअस सीझरचं पूर्ण नाव Gaius Julius Caesar असं होतं.)
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सम्राट ज्युलिअस सीझरचा आणि सीझरियन सेक्शन शस्त्रक्रियेचा संबंध जोडण्याची चूक ऑक्स्फर्ड डिक्शनरीनंही केली आहे. Caesarean birthची व्याख्या त्यांनी “the delivery of a child by cutting through the walls of the abdomen when delivery cannot take place in the natural way, as was done in the case of Julius Caesar” अशी केली आहे. मेरिअम वेब्स्टर शब्दकोशानं याची व्याख्या जरा आडवळणानं करून हातचलाखी केली आहे- “from the legendary association of such a delivery with the Roman cognomen Caesar.” म्हणजे नक्की कोणता सीझर हे ते सांगत नाहीत.
सीझरच्या जन्माच्या किती तरी आधी प्राचीन भारतात तसंच अन्य देशांमध्येही सीझर शस्त्रक्रियेनं बाळांचा जन्म झाला असल्याची काही उदाहरणं आहेत. दुसरा मौर्य सम्राट बिंदुसार याचा जन्म इसवी सनापूर्वी ३२० वर्षांपूर्वी याच पद्धतीनं झाला होता असं मानतात. त्याचा जन्म होण्याच्या काही दिवसच आधी त्याच्या आईनं (सम्राट चंद्रगुप्ताची पत्नी) चुकून विष प्यायलं आणि त्यामुळे ती मरण पावली. पण इतिहासप्रसिद्ध चाणक्यानं शक्कल लढवून तिचं पोट फाडलं आणि त्यातून जिवंत बाळाला सुखरूप बाहेर काढलं. थोडक्यात काय, ज्युलिअस सीझर हा कितीही मोठा असला तरी या शस्त्रक्रियेचं नाव त्याच्या नावावरून तयार झालं, असं मानणं चूक आहे.
जर्मन, नॉर्वेजिअन, डॅनिश, डच, स्विडिश, हंगरिअन, जॅपनीज, कोरिअन, रशिअन, हिब्रू, अशा अनेक भाषांत ‘सीझरिअन सेक्शन’ यासाठी शब्द असून त्या सर्वांचा अर्थ ‘सम्राटाचा तुकडा’ असा काहीसा होतो. सी-सेक्शननं जन्माला आलेल्या मुलाचं पहिलं नाव ‘सीझो’ (Caeso) असं ठेवण्याची परंपरा प्राचीन रोमन पाळत होते, असंही थोरला प्लिनी म्हणतो.
इटली देशात इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या Saint Caesarius of Terracina (Saint Cesario deacon) याला सध्या ‘सीझर शस्त्रक्रियेचा अधिष्ठाता संत’ (patron saint) मानतात. ज्युलिअस सीझर हा ख्रिस्ती धर्माचा नव्हता, त्यामुळे तो pagan किंवा अश्रद्ध/धर्मविहीन आहे, असं समजून जवळपास त्याच नावाच्या पण ख्रिस्ती धर्माच्या अनुयायाला हा बहुमान बहाल करण्यात आला. सीझर शस्त्रक्रिया सफल व्हावी आणि बाळ-बाळंतीण सुखरूप राहावेत, यासाठी या शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टर आणि पेशंट हे दोघंही या सेंट सीझेरिअसची प्रार्थना करतात.
या पुढचा शब्द आहे ‘Apgar’ किंवा ‘apgar’ (अॅप'गॅर). यालाच ‘Apgar score’ असंही म्हणतात. नवजात शिशूचं सर्वसाधारण स्वास्थ्य कसं आहे, हे ठरवण्याची पद्धत म्हणजे ‘अॅपगॅर’. डॉ. व्हर्जिनिया अॅपगॅर या अमेरिकन प्रसुतीतज्ज्ञ आणि भूल/बधिरीकरण तज्ज्ञ (anaesthetist) महिलेनं ही पद्धत १९५३च्या आसपास शोधून काढली आणि तिच्याच नावावरून या नवीन शोधाला ‘अॅपगॅर’ असं म्हटलं जाऊ लागलं. यात नवजात बाळाच्या स्वास्थ्याची पाहणी पाच कसोट्यांवर केली जाते. हृदयगती, श्वसन, स्नायूंची बळकटी, कातडीचा रंग, आणि प्रतिक्षिप्त क्रिया (reflex response), या त्या पाच कसोट्या आहेत. या प्रत्येकाला ०, १, आणि २ असे गुण दिले जातात. जन्म झाल्यावर अगदी एका मिनिटानं आणि मग पुन्हा पाच मिनिटांनी अशी दोनदा ही परीक्षा केली जाते. ‘अॅपगॅर’ हे इपनिम आहे.
पण पुढे डॉ. Dr. L. Joseph Butterfield यानं याच नावाचं ‘बॅक्रॉनिम’ (backronym) तयार केलं. BBC हे British Broadcasting Corporation या नावाचं लघुरूप आहे. याला आपण abbreviation असं म्हणतो. पण RADAR (र\रेडार) हा शब्द radio detection and ranging या शब्दाचं ‘अॅक्रॉनिम’ (acronym) आहे.
Acronym प्रकारचा शब्द एखाद्या नावाच्या आद्याक्षरांवरून बनतो आणि एक स्वतंत्र शब्द म्हणून आपण त्याचा उच्चार करू शकतो. RADARमध्ये हे शक्य आहे, पण BBC म्हणताना आपल्याला ‘बीबीसी’ असंच म्हणावं लागतं. Backronym हे अॅक्रॉनिमच असतं, पण त्यात मूळ शब्दाच्या आद्याक्षरांपासून किंवा स्पेलिंगपासून नवे शब्द तयार करून एक नवा शब्द तयार केलेला असतो. डॉ. बटरफिल्ड यानं ‘अॅपगॅर’ या शब्दाची फोड करून त्याचं backronym बनवलं. त्यानुसार Apgar मधला A म्हणजे Appearance (दिसणे), P म्हणजे Pulse (नाडी), G म्हणजे Grimace (चर्येवरचे भाव), A म्हणजे Activity (हालचाली), आणि R म्हणजे Respiration (श्वसन). नवजात शिशूच्या स्वास्थ्याची या पाच प्रकारे पाहणी केली जाते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
वैद्यकीय क्षेत्रातले इपनिम्स हे बहुतेक करून डॉक्टरांच्या नावावरून तयार झाले आहेत. उदाहरणार्थ Alois Alzheimer या जर्मन डॉक्टरच्या नावावरून ‘अल्झायमर्स’ (Alzheimer's) या विकाराला नाव मिळालं आहे. काही इपनिम्स तर नर्सेसच्या नावावरूनही बनले आहेत. जसे, Sister Mary Joseph nodule. भौगोलिक नावांवरून बनलेल्या इपनिम्समध्ये Rocky Mountain spotted fever किंवा Warsaw breakage syndrome ही उदाहरणं देता येतील. सिफिलिस या गुप्त रोगाला पूर्वी ‘The French disease’ or ‘the Italian disease’ असं म्हणत.
अती लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या श्वसनाच्या रोगांना ‘Pickwickian syndrome’ असं म्हणतात. हे नाव चार्ल्स डिकन्स यांच्या ‘The Pickwick Papers’ या कादंबरीतल्या एका गलेलठ्ठ पात्राची आठवण म्हणून या रोगाला देण्यात आलं आहे. ‘पॉल ब्रॉका’ (Paul Broca) याच्या नावावरून मानवी मेंदूच्या एका भागाला ‘Broca's area’ असं नाव मिळालेलं आहे. कार्ल सेगन या विज्ञानकथा लेखकाचं ‘Broca's Brain’ हे प्रसिद्ध पुस्तक अनेकांनी वाचलं असेल. Achilles Tendon हा मानवी पायात असणारा (टाच आणि घोटा यांना जोडणारा) एक स्नायुबंध आहे. हे नाव ‘अकिलीझ’ (Achilles) या ग्रीक पुराणांतल्या एका पात्राच्या नावावरून देण्यात आलं आहे.
अशी आणखी शेकडो वैद्यकीय इपनिम्स आहेत. पण या लेखात त्या सर्वांचाच उल्लेख किंवा चर्चा करणं शक्य नाही. म्हणून इथेच थांबतो.
जाता जाता – ‘Caesar's wife must be above suspicion’ ही प्रसिद्ध इंग्रजी म्हण ज्युलिअस सीझरच्या बायकोच्या (पॉंपिया, Pompeia) नावावरून तयार झाली; तर Achilles heel हा शब्दप्रयोग Achilles च्या नावावरूनच तयार झाला आहे. त्यांचा अर्थ पुढे केव्हा तरी...
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment