‘लेकमात’ : ऊसतोडणी कामगारांचा अनेक पातळ्यांवरचा जीवनसंघर्ष, त्यांची जीवनाला सामोरे जाण्याची उत्कट धडपड आणि बालाघाटातील डोंगररांगांच्या लोकजीवनाचा गंध असलेली कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आसाराम लोमटे
  • ‘लेकमात’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Mon , 05 April 2021
  • ग्रंथनामा शिफारस लेकमात Lekmaat विजय जावळे लेकमात Vijay Javale आसाराम लोमटे ऊसतोडणी कामगार

ऊसतोड मजुरांचे जगणे मांडणाऱ्या अनेक साहित्यकृती मराठीत आहेत. त्यातल्या काही आपल्या अंगभूत सामर्थ्याने उठून दिसतात. सरदार जाधव यांची या विषयावरील ‘कोयता’ ही अप्रतिम कादंबरी आहे. या कादंबरीला १९७२च्या दुष्काळानंतरची पार्श्वभूमी आहे. दुष्काळाआधीची सुबत्ता, त्यानंतर दुष्काळामुळे मोडून पडलेला गावगाडा असे चित्रण या कादंबरीत आहे. दुष्काळानंतर एक-दोन वर्षांनी चांगला पाऊस पडतो. तोवर शेतीधंद्यातही बदल झालेले असतात. आधीचे परंपरागत बियाणे नष्ट होऊन नवनवी बियाणी आलेली असतात. शेती खर्चिक होते. पारंपरिक शेती करणारे कुटुंब शेवटी कामधंद्यासाठी गाव सोडते. ऊसतोडणीचा कोणताही अनुभव नसलेल्या या कुटुंबाला ऊसतोड मजूर म्हणून राबावे लागते. सुरुवातीला ऊसतोड मजूर, नंतर मुकादम आणि त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी असे टप्पे या कुटुंबाच्या आयुष्यात येतात. ऊसतोड कामगार, मुकादम आणि ऊस उत्पादक शेतकरी अशा तिन्ही घटकांना या कादंबरीत स्पर्श करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या तीनही अवस्था अनुभवणारे एकच कुटुंब आहे. सलग तीन वर्षातले हे तीन टप्पे या कुटुंबाने अनुभवले आहेत. तिन्ही टप्प्यावर या कुटुंबाच्या पदरी निराशाच आलेली आहे. या कुटुंबावरचा आघात केवळ नैसर्गिक नाही, त्याची बरीचशी कारणे व्यवस्थेत आहेत. ‘कोयता’मधून जे तपशील येतात, ते व्यवस्थेतल्या बदलाची नोंद घेणारे आहेत.

विजय जावळे यांची ‘लेकमात’ ही कादंबरी अलीकडेच प्रकाशित झाली आहे. यापूर्वी जावळे यांची ‘मिरगीपेर’, ‘चारखणी’, ‘रितं गाव’, ‘खांदेमळणी’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘कोयता’प्रमाणेच मोजक्या शब्दांमध्ये वातावरण उभे करण्याचे ‘लेकमात’चे सामर्थ्य अजोड आहे.

साधारणपणे २० वर्षांपूर्वी विजय जावळे यांची ‘लेकमात’ ही लघुकादंबरी ‘मौज’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. तिने त्या वेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तब्बल दोन दशकांनंतर ही कादंबरी पुस्तक रूपात आली आहे. अर्थात जावळे यांनी आधीच्या पूर्वप्रसिद्ध भागानंतरचा दुसरा टप्पा या कादंबरीत नव्याने अंतर्भूत केला आहे. त्यामुळे या कादंबरीला एक परिपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

 

सातत्याने अवर्षणाची झळ, त्यात केवळ पावसाळ्यातच हिरवे दिसणारे डोंगर आणि एरवी कायम जाणवणारी रखरख... हे बालाघाटच्या डोंगररांगांमधल्या अनेक गावांचे चित्र. ऊसतोडणीच्या दिवसांत या भागातली गावेच्या गावे रिकामी होतात. लाखो मजूर महाराष्ट्रभर कुठे कुठे आणि महाराष्ट्राच्याही बाहेर ऊसतोडणीसाठी जातात. गावाबाहेर पडताना या कुटुंबांची अनेक स्वप्ने असतात. लेकीबाळींची लग्ने, स्वत:च्या जमिनीचा तुकडा पाण्याखाली आणण्यासाठी काही साधनं निर्माण करण्याची धडपड, कुटुंबातल्या शाळकरी मुलांच्या भविष्यावर होणारा परिणाम… हे मजूर गाव सोडतात, तेव्हा त्यांच्यामागे गावात राहिलेल्या वयोवृद्धांची होणारी आबाळ, ऊसतोड मजुरांना परमुलखात गेल्यानंतरचे येणारे विविध अनुभव, कोयत्याला घेतलेली उचल फिटते की नाही याची चिंता, हंगाम सरताना गावी परतण्याची ओढ, अशा सततच्या संघर्षमय जीवनाचे चित्रण ‘लेकमात’मध्ये आलेले आहे.

या कादंबरीतील सर्वच व्यक्तिरेखांचा आपापल्या पातळीवर संघर्ष सुरू असतो. कुटुंबांची, त्यातल्या व्यक्तिरेखांची काही स्वप्ने आहेत आणि ती डोळ्यात घेऊन ही माणसे परिस्थितीशी झगडत राहतात. काही स्वप्ने पूर्ण होतात, काहींचा पाठलाग सातत्याने करावा लागतो. डोळ्यातली स्वप्नं आणि पुढ्यातले रखरखीत वास्तव यांचा लपंडाव या कादंबरीत पाहायला मिळतो, तो अंतहीन आहे; त्याला शेवट नाही.

‘लेकमात’ या शब्दाचा अर्थ लग्नाची मुलगी असा होतो. मुलीच्या लग्नासाठी पै-पै जमवताना कुटुंबाची होणारी दमछाक, साऱ्या घरादाराला करावा लागणारा जीवतोड संघर्ष ‘लेकमात’च्या पानोपानी आहे. दोन सख्ख्या भावांचे एक संयुक्त कुटुंब कादंबरीत आहे. सोपान आणि कौसा हे नवरा बायको, त्यांची नवर्‍याने टाकलेली शोभा ही मुलगी. किसनाप्पा आणि सखु हे आणखी एक जोडपे. या जोडप्याच्या मुलांची शिक्षणासाठी होत असलेली आबाळ, बापूचे रडत-रखडत पदवीचे शिक्षण चालू आहे. कुटुंबाच्या फाटक्या आर्थिक परिस्थितीला टाके घालण्यासाठी त्यालाही हाती कोयता घ्यावा लागतो. बापूचा लहान भाऊ असलेला बाळनाथ शालेय विद्यार्थी आहे. आई-बाप ऊसतोडणीसाठी गेल्यानंतर त्याला एका वसतीगृहात प्रवेश घेऊन आपले शिक्षण सुरू ठेवावे लागते. किसनाप्पा आणि सखु यांची मुलगी सुनंदा हीसुद्धा लग्नाची आहे. एकदा जमलेली तिची सोयरीक मोडते. पुन्हा नवी सोयरीक जुळते. आपली मुलगी सुनंदाचं लग्न जमलं याचं समाधान किसनाप्पाला आहे, पण आधीची घेतलेली उचल फिरते की काय याची धास्तीही आहे. उचल फिरली तर पुन्हा हाती कोयता येणार. पीकपाण्यावर उचल फेडता येईल का, पुन्हा सुनंदाच्या लग्नाच्या खर्चासाठी मुकादमाचे उंबरठे झिजवायची पाळी येईल का, असे अनेक प्रश्‍न किसनाप्पासमोर आहेत. तोही आपली चार एकर जिरायती जमीन कधीतरी पाण्याखाली येईल, अशी स्वप्नं पाहणारा आहे. उसाच्या मोळ्या उचलु उचलु त्याची कंबर पार कामातून गेली आहे. एका जागेवर बसल्यानंतर उठताना त्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. सुनंदावर एकदाच्या अक्षता टाकायच्या आणि सगळं बापूवर सोपवायचं असं किसनाप्पाचं स्वप्न आहे. “बापू, पुढच्या सालापस्तोर कोयतं खेट. आपलं चार एकर जिरायत पानभरतीचं व्हावं एवढीच माझी इच्छाय,” असं तो बापूला म्हणतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

किसनाप्पाची बायको असलेल्या सखूला आपल्या पोरीचं- सुनंदाचं- लग्न जमलं याचं समाधान आहे. ज्या भागात हे कुटुंब ऊसतोडणीसाठी गेलेलं आहे, त्याच भागात मिरज-इचलकरंजी या ठिकाणाहून लग्नाचे कपडे घ्यावेत, जरा स्वस्त मिळतात असं सखूला वाटतं, पण तेही जमत नाही. ऊसतोडणीसाठी परमुलखात हे कुटुंब आलेलं असतं आणि गावाकडं किसनाप्पाची म्हातारी दगावते. पोटापाण्यासाठी गावाची ताटातूट झाल्यानंतर रक्तातल्या नात्याच्या माणसाचे अंत्यदर्शनही घडू नये, अशी अगतिकता या कुटुंबाला सोसावी लागते. सुनंदालाही दुःख होतं. तिला आपल्या आजीला हिरव्या रंगाचं लुगडं न्यायचं असतं. तिच्या गोंदलेल्या हाताला शोभतील अशा बांगड्या न्यायच्या असतात, पण आता ही आजीच या जगात राहिलेली नसते. लग्न जमलेल्या सुनंदाच्या डोळ्यात नव्या संसाराची स्वप्ने आहेत. ऊसतोडणीसाठी आलेल्या मुलखात जरा रिकामा वेळ मिळाल्यानंतर तीसुद्धा आपल्या आईसोबत, मैत्रिणीसोबत जवळच्या शहरात जाऊन लग्नात सजण्या-धजण्याच्या काही वस्तू खरेदी करते.

नवर्‍याने टाकलेली शोभा माहेरी असते. दोन एकर जमिनीच्या लालसेपोटी सासरचे लोक हटून बसलेले असतात. ती चांगली शिकलेली आहे, तिने हार मानलेली नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची जिद्द आहे. धरणग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळाले तर नोकरी लागेल, किमान या आशेपोटी नवरा पुन्हा नांदवेल असे घरच्यांना वाटते. दलालामार्फत पैसे देऊनही हे प्रमाणपत्र काही सहजासहजी हातात पडत नाही. शोभा ही तलाठी आणि बाकीच्या भ्रष्ट व्यवस्थेशी भांडते. ठामपणे उभी राहते. तिकडं सासरचे पुन्हा नांदवायला तयार होतात. ती सासरी जाते, त्यानंतर लगेच किसनाप्पाचं कुटुंब ऊसतोडीसाठी जातं. गावी राहिलेले सोपान-कौसा हे नवरा-बायको पुन्हा आपल्या कोरडवाहू जमिनीसोबत संघर्ष करत राहतात. 

या कादंबरीत बापू हा शिक्षणामुळे आत्मभान आलेला तरुण आहे. ऊसतोडणीसाठी आपल्या कुटुंबासोबत पश्चिम महाराष्ट्रात गेल्यानंतरही त्याची पुस्तकाची पेटी सोबत असते. अधूनमधून वेळ मिळेल तशी ही पुस्तकं तो चाळतो, पण त्यात त्याचे मन रमत नाही. ज्या परिसरात तो ऊसतोडणीसाठी गेलेला आहे, तो सारा मुलुख फिरावा असे त्याला वाटते. शाहू महाराजांचा राजवाडा पहावा वाटतो, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घ्यावे वाटते, महाडला जाऊन चवदार तळ्याचे पाणी चाखावे वाटते, अण्णा भाऊंच्या वाटेगावला जावं वाटतं. तो असा एकटा असला म्हणजे त्याच्या स्वप्नांना पंख फुटतात. शिक्षणासाठी आसुसलेल्या आणि ऊसतोडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची आस असलेल्या बापूला कोयत्याने जखडून टाकल्यासारखे होते. ज्या हातात पेन असायचे, ते हात राबराब राबून निबर होतात. तळहातावरच्या रेषा काळ्याशार पडतात. आपल्या हातचा कोयता जावा, पदवीधर व्हावं, नोकरी करावी हे बापूचं स्वप्न आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या कादंबरीतला पूर्वार्ध हा साधारणपणे दोन दशकांपूर्वी आलेला आहे. आजचा  वेग  त्या जगण्याला नाही. तरीही नव्या बदलाच्या  आश्वासक खाणाखुणा  कादंबरीमध्ये दिसतात. शिक्षणामुळे आत्मभान आलेली तरुणाई नवा विचार करू लागली आहे. गावातल्या संकुचित आणि जातीपातीचे घट्ट पीळ असणाऱ्या माणसांमध्ये नवा विचार अंगीकारणारे तरुण दिसू लागतात. गावातला बापू आणि बौद्धवाड्यातला दिलीप यांचे विचार जुळू लागतात. ऊसतोडणीसाठी गाव सोडून जाणाऱ्या, विस्थापित होणाऱ्या माणसांचा पीळ गावात मात्र घट्ट राहतो. तो कसा सैल होत नाही, असा प्रश्न बापूला पडतो. “मला एक समजत नाही तुम्हा लोकांचं. आता ऊस तोडायला जाता एका ट्रकात, शेजारी-शेजारी झोपता, फडातबी शेजारीच खोप्या, तिथं एकाच चुलीवर सैपाक... येळा-वक्ताला जेवणबी एकाच ताटात... पण गावात मात्र ह्यो खालचा, त्यो वरचा, त्यो म्हार... ह्यो मराठा आन तमुक मांग... असल्या जातीच्या चुली उरावर ठेवून कवरक ह्या वणव्यात स्वतःला जाळून घ्यायचं?” असं बापूचं म्हणणं असतं. यावरून तो किती संवेदनशील आणि विचारी आहे, याची खात्री पटते.

‘लेकमात’मध्ये केवळ वर्णन पुढे घेऊन जाणारे प्रसंग नाहीत, तर यातल्या घटना-प्रसंगांना खास बालाघाट परिसराचा बाज आहे. या डोंगराळ टापूत राहणारी माणसे, त्यांचे भावविश्व, त्यांच्या नात्यातल्या आपुलकीच्या जागा आणि हेवेदावेसुद्धा... रुसवे-फुगवे आणि एक दुसऱ्याला सामावून, समजून घेणे, पंचक्रोशीतल्या देवादिकांच्या जत्रा, परिसरातल्या निसर्गाची वेगवेगळी रूपे, पात्रांच्या स्वभावाच्या नाना तऱ्हा अशा कित्येक गोष्टी ‘लेकमात’मध्ये खूपच जिवंतपणे आल्या आहेत. नवऱ्याने टाकलेल्या आपल्या लेकीचा- शोभाचा- संसार पुन्हा जुळावा, फुलावा यासाठी कान्होबाच्या माळावर घरातल्या सगळ्यांना घेऊन जाणारी कौसा म्हणजे रात्रंदिवस कष्टणाऱ्या असंख्य स्त्रियांचे प्रातिनिधिक रूप आहे. ती नारळ फोडून कापूर, उदबत्ती लावून माथा टेकवते अन म्हणते, “माझ्या पोरीचं चांगलं होऊदे, कान्होबा तुला धजा वाहीन आन सारा माळ खनकिनारी घंटी गाभार्‍यात लावीन.”... आपल्या लेकीचा फाटलेला संसार पुन्हा जुळला तर सारा माळ निनादेल अशी घंटी कान्होबाच्या गाभाऱ्यात लावण्याचा नवस कौसा बोलते. ऊसतोड मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या पट्ट्यातील लोकमानस अशा अनेक प्रसंगांमधून उलगडते. लोकजीवनाचे दर्शन घडवणाऱ्या अशा कितीतरी जागा या कादंबरीत आहेत.

“चैत्र उजाडला आणि सखूला गावाकडची आठवण येऊ लागली. कारखान्याचे पट्टे पडत होते. कोयते आपापल्या सोयीने टेम्पो किरायाने करून गावी परतत होते... हंगाम संपला होता. पाखरं आपापल्या घरट्याच्या ओढीने उडत होते. सगळीकडं पाचट माताळली होती. सुनंदा कान्होबाच्या जत्रला जाण्यासाठी रोजच हट्ट धरून बसत होती... घराघरावर फडकणाऱ्या झेंड्याच्या काठ्या, आदल्यादिवशी निघणारा छबिना, डोंगरावर देवळात गेल्यावर रेवड्याची होणारी उधळण, जत्रेतली रंगीबेरंगी दुकानं, पहिलवानांच्या कुस्त्या हे सगळं तिला साद घालीत होतं.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

“दिवस मावळला. गावावरलं तांबूस तपकिरी उजेडाचं पांघरून अंधारानं हळूहळू काढून घेतलं. काळूखाच्या काळ्‍याभेन तंबूत गाव गडप होऊ लागलं. घरादारातले दिवे लागले. कोकरा-वासराच्या व्याकुळ आवाजाने घराची आंगणं जीती वाटायली. माणसाच्या कुजबुजीनं, काटवटीतल्या भाकरी थापण्याच्या आवाजानं घराला घरपण आलं.”

अशी या कादंबरीतली वर्णने आहेत. त्यातून बोलीचे सामर्थ्य प्रत्ययाला येते. जिवंत बोली हे ‘लेकमात’चे मोठे वैशिष्ट्य आहे. त्यात कुठेही कृत्रिमता दिसून येत नाही. संवाद आणि निवेदन दोन्ही बोलीतच असल्याने वेगळीच एकरूपता कादंबरीला लाभली आहे. बालाघाटासारख्या डोंगराळ भागातले  पाऊसपाण्याचे, अवर्षणाचे, पिकांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे कादंबरीतले निसर्गवर्णन वाचकांचे लक्ष वेधून घेते. ही भाषा म्हणी व वाक्प्रचारांनी समृद्ध आहे. ती कुठेच सपाट असल्याचे जाणवत नाही. बोलीतल्या म्हणी आणि वाक्प्रचारांनी या भाषेला एक वेगळाच झोकदारपणा आल्याचे दिसून येते. ‘सोनं मोडावा अन सोयरा जोडावा’, ‘नि नांदीला बारा बुध्या आन फुटलं कपाळ बांधल्या चिंध्या’, ‘दिवसभर घरी आन दिवा लावून दळण करी’, ‘घरी शिजतं खंडीचं आन चित जायना लांडीचं’, ‘शहाणा नडतो अन् पव्हणारा बुडतो’ अशा कितीतरी म्हणी कादंबरीत पानापानावर आढळतात.

ऊसतोड मजुरांचे संप, धरणाचं पाणी गावापर्यंत यावं म्हणून केली जाणारी आंदोलनं, सर्वसामान्यांची अडवणूक करणारी नोकरशाही, ऊसतोड मजुरांचे होणारे सर्व प्रकारचे शोषण, अशा अनेक बाबी या कादंबरीत आहेत. तरीही मुख्यत्वे ऊसतोडणी करणाऱ्या कुटुंबाच्या जगण्यातल्या हर्ष-खेदाच्या जागा आणि त्यांचा अनेक पातळ्यांवर चाललेला जीवनसंघर्ष, सर्वच ठळक व्यक्तिरेखांची जीवनाला सामोरे जाण्याची उत्कट धडपड, हेच या कादंबरीचे प्रमुख सूत्र आहे. ‘लेकमात’ला लोकजीवनाचा गंध आहे. 

लेकमात : विजय जावळे

हर्मिस प्रकाशन, पुणे, पाने : १४१, मूल्य : १८० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे पत्रकार व कथाकार आहेत. त्यांची ‘इडा पिडा टळो’ (कथासंग्रह), ‘आलोक’ (कथासंग्रह), धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘आलोक’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) मिळाला आहे. ‘तसनस’ ही त्यांची पहिलीवहिली कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

aasaramlomte@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......