अजूनकाही
निर्मल ठाकूर यांची एक कविता आहे -
कभी कभी अपना ही चेहरा
अचानक ही
कितना कोमल हो जाता है
तरल हो उठती हैं
आँखें
अनायास ही
चुप हँसी की एक किरन
दूर दिगंत को सुरभित करती
बिखर जाती है
तब वसंत
बिलकुल अकेला होता है
मुझमें
दिगंताला सुगंधित करणारी हास्याची लकेर या जगात असू शकते, यावर विश्वास बसावा, असे वाटत असेल तर फुललेली काटेसावर पाहायला हवी. या झाडाला वसंताने एकट्याने मिठी मारलेली असते. असे भाग्य कुणाला मिळत नाही. वसंत सगळ्या फुलांचा असतो, असे आपल्याला वाटत असते.
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
रितु बसंत, अपनो कंत गोरी गरवा लगाए
झुलना में बैठ आज पी के संग झूले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
गल-गल कुंज-कुंज, गुन-गुन भँवरों की गुंज
राग-रंग अंग-अंग, छेड़त रसिया अनंग
कोयल की पंचम सुन दुनिया दुख भूले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
केवडा, गुलाब, जुई, चाफा, भुंगे, कोकिळा, तिचा पंचम असा सर्वंकष सर्वदूर सर्वांगभर भरलेला उत्सव म्हणजे वसंत. पण इथे निर्मल ठाकूर म्हणत आहेत, त्याप्रमाणे वसंत एकट्या काटेसावरीचा! काळ्या-पांढऱ्या रंगाचा प्रचंड वृक्ष. त्याच्या सगळ्या बाजूंनी भरारलेल्या पांढूर फांद्या. आणि त्या जाडसर फांद्यांनाच फुटलेली जाड पाकळ्यांची लालबुंद फुले.
जाड जाड लाल पाकळ्यांवर मेणाचा थर दिला असावा, अशी चमक त्यांच्यावर असते. त्या लाल मेणाच्या थरावरून सूर्याची किरणे चकाकत राहतात. खरं तर हा लाल नसतो. लाल रंगामध्ये थोडा हलका बरगंडी रंग नाजूकपणे मिसळल्यावर जो लाल तयार होईल, तो लाल असतो हा. गुलाबाच्या कळीच्या आकाराच्या टपोऱ्या कळ्यांमधून ही लाल फुले बाहेर येतात. या कळ्या हिरवट रंगांच्या असतात. त्यांचा तो हिरवा रंग साधा नसतो. त्याच्यावर तपकिरी रंगाचा एक नाजूक हात फिरवलेला असतो.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
हिरव्या आणि तपकिरी रंगाचे मिश्रण करण्याची हिंमत निसर्गच करू जाणे! या अशा बेफाम रंगांच्या कळ्यांमधून सावरीच्या फुलांच्या पाकळ्या बाहेर येतात, तेव्हा त्या कुठल्या तरी साध्या रंगांच्या असून कसे चालेल? अगदी याच कारणासाठी त्यांना अत्यंत सुंदर असा किरमिजी रंग असतो आणि एवढे करूनही कुठे काही उणीव राहून जाऊ नये म्हणून त्या किरमिजी रंगावर पांढऱ्या रंगाची हळूवार उधळण असते. जसजशा या पांढूर किरमिजी पाकळ्या उमलत जातात, तसातसा त्यांच्यावर बरगंडी आणि लाल रंग एकत्र करून जो रंग तयार होतो, त्यावर चमकदार मेणाचा थर चढवला जातो.
पाच पाकळ्यांचे असे लाल चमकदार चक्र. त्याच्या आत फिकट पिवळ्या रंगांच्या दांड्या. पाच पाचच्या पुंजक्यांमध्ये उगवून आलेल्या. प्रत्येक पुंजका पाच पाच दांड्यांचा. म्हणजे पंचवीस दांड्या. बाहेरच्या लाल चमकदार चक्राच्या आत हे परागकोशांच्या दांड्यांचे अतीव सुंदर पिवळसर चक्र. यातल्या प्रत्येक दांडीवर काळया-किरमिजी रंगाचा एक परागकोश. म्हणजे पाच पाकळ्यांच्या चक्राच्या आत पंचवीस परागकोशांतचे एक काळे-किरमिजी चक्र. कळ्यांवर एकदा किरमिजी आणि पांढरा वापरून झाल्यावर परागकोशांवर किरमिजी आणि काळा वापरायला नको का? तर असे हे काळे-किरमिजी चक्र, तेसुद्धा पिवळ्या चक्रावर उभे असलेले.
या तीन अतिशय सुंदर चक्रांच्या आत उभे असतात पाच सरळसोट पिवळ्या दांड्यांवर पाच काळे स्त्रीकोश. आणि शेवटी या स्त्री कोशांना विलग ठेवायला असतो, पाच पाकळ्यांचा एक केशरी तारा! एवढे सगळे सौंदर्य कमी म्हणून की काय, फुलाच्या पाकळ्या मागच्या बाजूने गुलाबी रंगांच्या केलेल्या असतात. त्यासुद्धा गुलाबी मेणाचा थर दिलेल्या!
सूर्य जेव्हा माथ्यावर असतो, तेव्हा किरणे या गुलाबी रंगातून आरपार येतात, आणि हा गुलाबी रंग मंद प्रकाशाने चमकताना दिसतो. बंद खिडक्यांच्या सुंदर तावदानांतून खोलीतला प्रकाश बाहेर झिरपत राहावा, तसा उन्हाळ्यातल्या प्रखर सूर्याचा प्रकाश या गुलाबी पाकळ्यातून गुलाबी होऊन खालच्या दिशेने झिरपत राहतो.
सावरीचे झाड प्रचंड वाढते. त्याला हजारो फुले लागतात. उन्हाळ्यात मध्यान्हीला या झाडाच्या खाली उभे राहून या गुलाबी तावदानांमधून झिरपत असलेला प्रकाश पाहायलाच हवा. सावर लहान असताना पांढूर असते आणि तिला काटे असतात. ती मोठी होत गेली की, काळसर होते. काटे निघून जातात.
मुख्य बुंधा अजस्त्र आणि सरळसोट असतो. या खोडाचा रंग खरं सांगायचं तर हत्तीच्या रंगाचा असतो. मुख्य बुंधा आणि मुख्य फांद्या काळसर झाल्या तरी वरच्या कोवळ्या फांद्या पांढूर असतात. एक छायाप्रकाशाचा खेळ दुपारभर या झाडावर सुरू राहातो. लाल चमकणारी फुले, मंद गुलाबी प्रकाशात हसणारे त्यांचे पृष्ठभाग आणि या काळ्या-पांढऱ्या फांद्यांवर हलणारा छायाप्रकाशाचा खेळ.
रानात किंवा जंगलात किंवा बागेत, कुठेही पाहा काटेसावर आपल्या मस्तीत उभी असते. संस्कृतमध्ये काटेसावरीला ‘शाल्मली’ म्हणतात. हिंदीमध्ये त्याचा अपभ्रंश होतो ‘सेमल’. डॉ. शीला मिश्रा यांनी सावरीच्या अंगावरचा हा उन्हाचा खेळ खूप सुंदर शब्दांत आणि लयीत व्यक्त केला आहे.
आज धूप भटक गई
सेमल के गाँव में।
अनियारे नयनों की
अनबोली चितवन-सी
साँसों में लाज भरी
खोई-सी पुलकन-सी।
आज आँख अटक गई
असुवन की छाँव में।
घर आए पाहुन-सा
मौसम नखरीला
नयनों के पानी से
घर आँगन गीला
किसकी यह सुधि आई
ठोकर-सी पाँव में।
ऊन सावरीवर स्वतःला हरवून बसते. अनिमिष नजरेने हा सौंदर्याचा प्रकाश बघत असताना अश्रूंची छाया कधी तयार होते ते कळत नाही. हा वसंत येतो आणि कुणाची तरी ‘सुधि’ येते, सय येते, आठवण येते. अश्रूंनी घर आणि आंगण ओले होऊन जाते. डोळ्यात अश्रू असताना अंगण आणि अंगणातली सावर बघितली की ते ओले आहेत असे वाटणार नाही का?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
साँसों की टहनी पर
यादों के फूल-सी
अल्हड़ किशोरी की
छोटी-सी भूल-सी
आज साँस भटक गई
पथरीली ठाँव में
श्वासांच्या फांद्यांवर आठवणीची फुले येतात. आणि अल्लड कुमारिकेच्या हातून छोटीशी चूक व्हावी, तशी चूक मनाकडून होते. आपल्या खऱ्या प्रेमाची आठवण होते. खडकाळ प्रदेशात ते हळूवार श्वास हरवून जातात. सावरीचे सौंदर्यसुद्धा उन्हाळ्याच्या मार्गक्रमणेत त्या श्वासांसारखेच लुप्त होणार असते. कोरड्या शुष्क फांद्यांवर जीवनाने तरारलेले एवढे सुंदर यौवन! एक प्रकारची बंडखोरीच झाली आहे, असे वाटते.
तुम्हारे गदराए यौवन
और ये कस उभार
बसंत के आगमन की सूचनाएँ हैं।
हरे राम सिंह यांनी ‘गदराए यौवन’ हा शब्द वापरला आहे. गदर म्हणजे बंडखोरी! तुझे बंडखोर यौवन आणि तुझ्या गात्रांचे तटतटलेले उभार, ही येणाऱ्या वसंताची लक्षणे आहेत. यौवन कुणाचेही असो बंडखोरी आणि गात्रांचे उभार हे एकत्रच असतात. आणि गंमत म्हणजे वसंत या दोघांबरोबर असतोच असतो. म्हणून तर असे बंडखोर रंग आणि सुवास यांची वसंतामध्ये एकच दंगल उडते. यौवन म्हणजेच वसंत आणि वसंत म्हणजेच यौवन!
वसंत वनात असतो. वसंत मनात असतो. या सर्व विश्वाचा एखादा वसंत असेल का? प्रेमचंद गांधी यांच्या एका कवितेत एका कोसळणाऱ्या उल्केने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे -
ब्रह्माण्ड एक वृक्ष है और ग्रह, उपग्रह, नक्षत्र उसकी शाखाएँ हैं
हम जैसे छोटे सितारे उसके पत्ते हैं
पृथ्वी पर जब बसन्त आता है तो
हम देखने चले आते हैं
झड़े हुए पत्ते हमारे पिछले बरस के दोस्त हैं…
उल्का म्हणजे पृथ्वीवरचा वसंत बघायला आलेले छोटे छोटे तारे! प्रेमचंद गांधी यांनी वसंताचे विश्वरूप या कवितेत आपल्याला दाखवून दिले आहे. काटेसावरीची फुले बघितली की, मला ही कविता हटकून आठवते. वसंत बघायला आलेले आणि हवेच्या घर्षणाने लाल झालेले हे तारे काटेसावरीवर येऊन राहतात. चार दिवस पृथ्वीवरचा वसंत बघतात. आणि नंतर मग लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून फुले बनून मातीमध्ये शेवटचे कोसळतात. काटेसावर बघून कळते की वसंत ही एक पॅशन आहे.
हर ऋतु के अस्तित्व को कोई दूसरी ऋतु धकेल
रही है
चुटकी भर धक्के से ही फूटता है कोई नया फूल
खिलती है कोई नई कली
शुरु होता है कोई नया दिल
शिशिर ऋतूला वसंत ऋतूचा हलकाच धक्का लागतो आणि त्या हळूवार धक्याने वसंतातली पहिली कळी हुंकार देते, पहिले फूल उमलते. कुठलेही हृदय सुरू व्हायचे असेल तर या जगतातल्या सृजनतत्त्वाचा हळूवार आणि आश्वासक धक्का लागायलाच हवा. बाळ आईच्या पोटात असते, तेव्हा त्याचे हृदय सुरू व्हावे म्हणून कुठले तरी जीवनतत्त्व त्याला टिचकी मारतच असणार की! लीलाधर जगूडी यांच्या संवेदनेला हे सृजनाचे धक्के जाणवले असणार. नाही तर ते अशी कविता कशी लिहू शकले असते?
हेमंत जोशी यांनी सुद्धा लिहिले आहे -
कहीं नहीं आता बसन्त
वह तो आता है
हमारे दिलों में…
वसंत हृदयाची स्पंदने सुरू करतो आणि मग त्याच हृदयात राहायला येतो.
किसी रंग का नाम नहीं होता बसन्त,
किसी मौसम का नाम भी नहीं होता,
वह तो होता है रिश्ता
पीली सरसों का
धरती के साथ…
वसंत हे एक नाते आहे सृजनाचे पृथ्वीशी असलेले. काटेसावरीची लाल फुले म्हणजे वसंत नाही. फुलांनी काटेसावरीच्या कोरड्या फांद्यांवर फुलून यावे म्हणून जी टिचकी मारली जाते, त्या टिचकीच्या मागची प्रेरणा म्हणजे वसंत! वसंत फुलांची प्रेरणा असतो पण मानवाच्या मनात उमटलेल्या लहरींशिवाय वसंत पूर्णत्वास जात नाही.
बसन्त
एक ज़िन्दा एहसास है
आग का ।
तुम किसी
पेड़,
फूल,
रंग
या ख़ुशबू को
उसका नाम नहीं दे सकते
उस रूप में वह
अधूरा
और
अपाहिज है
जब कि
वह महकता है
जीवित व्यक्ति में
एक आग बन कर
अपने सम्पूर्ण प्रज्ज्वलन
और
मोहकता के साथ
श्याम किशोर वसंताचे एक वेगळेच रूप आपल्या लक्षात आणून देतात. वसंत म्हणजे आपल्या मनात सौंदर्यामुळे आणि यौवनामुळे लागलेली एक मोहक आग! काटेसावरीच्या फुलांच्या रंगाची आणि त्या फुलांसारखीच मोहक आग! या अर्थाने काटेसावर वसंताचे प्रतीक बनून राहते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
शिशिराला वसंताने हळूवार धक्का दिल्यावर काटेसावर फुलते. ग्रीष्माने वसंताला एक छोटासा धक्का दिल्यावर फलधारणा होते. काटेसावरीला शेंगा धरतात. त्यांच्यात कापूस आणि बिया तयार होतात. वर्षा ऋतूच्या सुरुवातीला चुकार ढग आकाशात जमू लागतात. त्यांचा एक श्यामल धक्का ग्रीष्माला पुढे ढकलतो. त्या धक्क्याने काटेसावरीच्या शेंगा उघडतात. सावरीच्या ‘म्हाताऱ्या’ उघडलेल्या शेंगांमधून सुटून हवेत तरंगत राहतात, भिरभिरत राहतात. उन्हाळा आणि पावसाळा यांच्या संधिकालावरील अस्थिर हवेवर त्या दूर दूर जात राहतात. शेवटी त्या कुठे तरी मातीमध्ये पडणार असतात. त्यांच्या मध्यभागी असलेल्या बिया वर्षा ऋतूत रूजणार असतात. २०-२५ वर्षांनंतर वसंत ऋतूमध्ये पुन्हा एकदा फुलून येण्यासाठी! सृजनाचे चक्र सुरू होण्यासाठी सौंदर्याची पाच चक्रे सावरीच्या फुलामध्ये एकाच्या आत एक अशी पुन्हा एकदा गुंफली जाणार असतात.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment