अजूनकाही
आपला धर्म, रूढी-परंपरा-प्रथा-रीतीरिवाज आणि आजूबाजूचे लोक यांनी इतके अवडंबर माजवले आहे की, मृत्यूकडे आपण गांभीर्याने आणि सुतकी चेहऱ्यानेच पाहतो. त्यामुळे या विषयाकडे हलक्याफुलक्या दृष्टीकोनातून बघणाऱ्या कलाकृती फार कमी आहेत. कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटात एका पालिका आयुक्ताच्या प्रेताची वाताहत आपण बराच वेळ बघतो आणि हसून लोटपोट होतो. ‘साधू और शैतान’मध्ये एका सरदाराचे (प्राण) प्रेत टॅक्सीच्या मागच्या सीटवर बघून मेहमूद–ओमप्रकाश यांची उडालेली तारांबळ दाखवली होती. ‘रामप्रसाद की तेरवी’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या मृत्यूकडे नर्मविनोदी अंगाने पाहण्यात आले आहे. नाटककार सतीश आळेकर यांनी ‘महानिर्वाण’ या नाटकात मृत्यूकडे ‘ब्लॅक कॉमेडी’च्या ढाच्यामधून बघताना प्रेक्षकांना आपल्याच वर्तणुकीमधले विरोधाभास दाखवून धमाल उडवून दिली होती. आणि आता नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘पगलैट’ हा चित्रपट नर्मविनोदी अंगाने एका मृत्यूने सुरू होऊन आपल्याला अंतर्मुख करतो.
संध्या (सान्या मल्होत्रा) या युवतीच्या नवऱ्याचे विवाहानंतर सहा महिन्यांतच निधन झाले आहे आणि अनेक सदस्य असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा वातावरणात संध्याचे आई-वडील तिला भेटण्यासाठी येतात. तिला बघितल्यावर आई हमसाहमसी रडायला सुरुवात करते, तेव्हाच संध्या आईला म्हणते, ‘मां, अब बस भी करो’. जीवाभावाची मैत्रीण आल्यानंतर संध्या उत्साहाच्या भरात म्हणते, ‘सगळेच सुतकामध्ये आहेत, पण मला तर भूक लागली आहे. निदान चिप्स आणि पेप्सी मिळेल का?’ अशा पद्धतीने चित्रपट सुरू झाल्यानंतर खरे तर प्रेक्षकांना धक्का बसतो आणि संध्या अशा विचित्र पद्धतीने का वागत आहे, असा प्रश्न पडतो. परंतु थोड्या वेळानंतर आपल्याला त्याचे उत्तर मिळते आणि आपण तिच्या बाजूने विचार करण्यास सुरुवात करतो. तिचा नवरा, आस्तिक प्रत्यक्षात दिसत नाही, पण सर्वांच्या बोलण्यातून जाणवते की, तो कधी कोणासाठी काही करत नसायचा. सहा महिन्यांत त्याच्याकडून प्रेम हा शब्द कधी संध्याच्या कानावर पडत नाही, तो कधीही संध्याचा विचार करत नाही, किंबहुना कुटुंबातील सर्वच सदस्य स्वतःचा विचार करतात. अशा परिस्थितीमध्ये संध्याला नवऱ्याबद्दल विशेष काही न वाटणे आपण समजून घेऊ शकतो.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
या कुटुंबात अनेक सदस्य आहेत आणि प्रत्येकाचा स्वभाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. घरात असा बाका प्रसंग घडल्यानंतर काही बेभान होतात, रितीरिवाज कोणते आहेत आणि ते कसे पाळावेत, यावर कंटाळवाणे भाषण देतात. काही इतरांच्या वर्तणुकीवर टीका करतात, काहींना सत्यपरिस्थितीची जाणीव असते आणि ‘लोक काय म्हणतील?’ याचा विचार न करता, या वेळेस काय करणे गरजेचे आहे, त्यावर कृती करतात. काही वेळ घालवण्याचे साधन शोधून काढतात. असे नमुने कोणत्याही दुःखद प्रसंगी आपण आजूबाजूला बघत असतो.
या सर्व गदारोळामध्ये आस्तिकचे वडील (आशुतोष राणा) इतका खर्च कसा पेलणार, या विचाराने ग्रस्त होतात. आस्तिकची आई (शिबा चढ्ढा) दुःखामधून सावरायचे, नवऱ्याची काळजी घ्यायची, आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची की, ‘लोक काय म्हणतील?’ याची काळजी करायची, या चिंतेत पडते. ज्येष्ठ सदस्य तय्याजी (रघुवीर यादव) यांची तऱ्हा वेगळीच. अशा दुखवट्यात पुढील १३ दिवस काय करावे, याबद्दल आपले रितीरिवाज काय, याची ते उजळणी करत राहतात.
या सर्व व्यक्तिरेखा आपल्याला तपशिलात समजतात आणि आपणही या कुटुंबाचा एक सदस्य बनतो, हे लेखक-दिग्दर्शकाचे वैशिष्ट्य आहे. मोठ्या कुटुंबात प्रवेश करणाऱ्या युवतीकडे दुर्लक्ष करून आपापल्या विश्वात मग्न असणाऱ्यांना नातलग तरी कसे म्हणावे? सोशल मीडियावर येणारे ‘RIP’ वगैरे मॅसेज किती तकलादू असतात, हे एका प्रसंगात दिसते.
लेखक-दिग्दर्शक उमेश बिश्त यांनी अनेक व्यक्तिरेखांचा तोल सांभाळत उत्तम कथा लिहिली आहे आणि तितक्याच बारकाव्यांसह दिग्दर्शितही केली आहे. काही व्यक्तिरेखा डोळ्यांच्या खाणाखुणांमधून व्यक्त होतात, काहींच्या प्रतिक्रिया बघण्यासारख्या असतात, काही अखंड बडबड करत राहतात. परंतु चित्रपटात योग्य तेवढेच संवाद असल्याने तो वेधक झाला आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्यात संध्या मृत आस्तिकच्या पन्नास लाखाच्या विम्याची मालकीण (नॉमिनी) होणार आहे, अशी बातमी समजताच सगळ्यांची वागणूक कशी बदलते, हे बघण्यासारखे आहे. मोठ्या गोतावळ्यात सगळेच पाठीमागे एकमेकांविरुद्ध बोलत असतात, पण समोर असे बोलतात की, सरड्यालाही लाज वाटावी. पैसा दिसताच नाती कशी बदलतात, याचे चित्रण सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते. सुनेला विम्याचे पैसे मिळणार, हे समजताच घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना सही करण्यासाठी साधा पेन मिळत नाही, असे काही प्रसंग उत्तम बारकाव्यानिशी लिहिले आहेत.
संध्याची मैत्रीण गोंधळलेल्या अवस्थेत डोअरबेल वाजवते, दारातून आत प्रवेश करते, अनेक जण जमा झाल्याचे तिला दिसते आणि त्याच वेळी वरच्या मजल्यावरून सान्या तिला हाक मारते, असे प्रसंग उत्तमरीत्या चित्रित करणाऱ्या राफे मोहम्मद यांची सिनेमॅटोग्राफी उत्तम. ‘नाझीया के लिये एक पॅकेट चिप्स और पेप्सी लेके आना’ असे संध्या जेव्हा दिराच्या मित्राला सांगते, त्या वेळी कॅमेरा घरी बनवलेल्या बेचव खाण्यावर जातो! अनेक पात्रांच्या गर्दीत एकेक व्यक्तिरेखा अलगदपणे उलगडत नेण्याची अवघड कामगिरी सहजगत्या दाखवण्यात प्रेरणा सैगल यांच्या संकलनाने बाजी मारली आहे. मंत्रोच्चार सुरू असताना पाणीपुरीचा प्रसंग, घराबाहेरच्या व्यक्तीस चपला सांभाळायला सांगितले जाणे, त्याच वेळी पवित्र-अपवित्र मंत्र ऐकू येणे, असे प्रसंग चपखल आहेत.
संगीत दिग्दर्शक अर्जित सिंग यांची गाणी कंटाळवाणी आहेत, रसभंग करणारी आहेत. जितका विचार लेखक-दिग्दर्शक-संकलक यांनी केला आहे, तितका विचार संगीत–पार्श्वसंगीताच्या बाबतीत होणे गरजेचे होते. पण अनमोल अहुजा यांचे कास्टिंग उत्तम. त्यांची योग्य कलाकारांची निवड करण्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. आशुतोष राणा, शिबा चढ्ढा, रघुवीर यादव, जमील खान, श्रुती शर्मा, राजेश तेलंग यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा उत्तम आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सर्वांत मनस्वी भूमिका केली आहे नायिका सान्या मल्होत्राने. ‘दंगल’मधून उल्लेखनीय प्रवेश, ‘ल्युडो’मधून उत्तम अभिनय आणि आता विविध पैलूंचा आविष्कार. अतिशय कमी कालावधीमध्ये सान्याने भूमिकांचे वैविध्य जपले आहे.
पगलैट म्हणजे वेडेपणा, चक्रमपणा, विचित्रपणा. अर्थात इतरांना धक्का देण्यासारखे वागणे, प्रवाहांविरुद्ध पोहणे. कोणत्याही परंपरा पाळताना बुद्धी गहाण ठेवण्यातच आम जनतेला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत असते. त्यामुळे विचार करणारे लोक ‘पागल’ वाटतात. आम जनता ‘लोक काय म्हणतील?’ या भीतीचा बळी ठरते. अशा वेळी काही अतरंगी लोक इतरांच्या ठाम समजुतीला धक्का देणारे वर्तन करतात आणि स्वतःच्या मनाला योग्य वाटेल तेच करतात. ‘दिल की आवाज’ ऐकणारे असेच लोक नव्या परंपरांना जन्म देतात, नवे ट्रेंड तयार करतात, नवीन कल्पनांची अंमलबजावणी करतात, नवे प्रयोग करतात. असे लोक संख्येने कमी असले तरी त्यांच्या अंतरंगी विचारांमुळे काही नवे प्रवाह येतात, काही उल्लेखनीय कामगिरी होते.
‘गुलाम’ या चित्रपटात एक संवाद आहे - “बहेती लहेरों के साथ कोई भी तैर लेता है, लेकीन असली इन्सान तो वो होता है, जो लहेरों को चीरकर आगे निकलता है.”
..................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment