सीझरचा मृत्यू मार्च महिन्याच्या पंधरा तारखेला (‘ides of March’) झाला म्हणून ही तारीख इतिहासात कुख्यात झाली...
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • ‘Beware the ides of March’ हा वाक्प्रचार आणि ज्युलिअस सीझर
  • Wed , 31 March 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध Beware the ides of March बिवेअर द आईड्झ ऑफ मार्च ज्युलिअस सीझर Julius Caesar

शब्दांचे वेध : पुष्प तिसावे

‘Beware the ides of March’ (मार्चच्या आईड्झपासून सावध रहा.) म्हणजेच मार्च महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

पण सावध नाही राहिलं तर? तुम्ही ज्युलिअस सीझर नसाल (बहुधा नसालच!) तर काही नाही होणार. सीझरला मात्र त्या दिवशी मरावं लागलं. ‘मार्चच्या आईड्झपासून सावध रहा’ असं एका ज्योतिष्यानं त्याला बजावून सांगितल्यावरही त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं आणि परिणामी त्याच्याच जवळच्या मित्रांनी केलेल्या खुनी हल्ल्यात तो मारला गेला. ही गोष्ट आहे इसवी सनापूर्वी चव्वेचाळीस सालची. सीझर एक थोर सम्राट तर होताच, पण त्याच्या जीवनावर विल्यम शेक्सपिअरनं सोळाव्या शतकात लिहिलेल्या ‘ज्युलिअस सीझर’ या आंग्ल नाटकामुळे तो आधुनिक काळात अधिकच प्रकाशझोतात आला. ‘Beware the ides of March’ हा वाक्प्रचारही याच नाटकात आहे आणि तिथूनच त्यानं इंग्रजी भाषेत स्थान मिळवलं.

सीझरच्या काळात रोमन लोक मार्च महिन्याच्या पंधरा तारखेला ‘आईड्झ’ असं म्हणायचे. जशी आपली संक्रांत दर वर्षी साधारणपणे १४ जानेवारीला येते, तसंच त्यांच्या कालगणनेनुसार मार्चच्या पंधरा तारखेला ‘आईड्झ’ हा दिवस येत असे. वर्षारंभापासूनचा ७४वा दिवस. सीझर रोमन असल्यानं तो तत्कालिन लॅटिन भाषा बोलत असे. त्यामुळे त्या ज्योतिष्यानं ‘ides of March’साठी ‘Idus Martiae’ किंवा ‘Idus Martii’ असा लॅटिन शब्दप्रयोग केला असणार.

रोमन लोकांच्या कालगणनेत प्रत्येक वर्षातले काही दिवस फार महत्त्वाचे मानले जात असत. त्यात १५ मार्च हा असाच एक प्रमुख दिवस होता. या दिवशी काही धार्मिक कृत्यं केली जात असत आणि तुमच्यावर जर कोणाचं कर्ज असेल तर ते फेडण्याचीदेखील ही शेवटची तारीख असे. पुढे सीझरला ब्रुटस नावाच्या त्याच्या जीवश्चकंठश्च मित्रानं याच तारखेला ठार मारलं.

ज्युलिअस सीझर हा काही कोणी सोम्यागोम्या राजा नव्हता. तो एक अत्यंत पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, बलाढ्य असा चक्रवर्ती सम्राट होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे रोमन साम्राज्याच्या इतिहासाला फार वेगळी कलाटणी मिळाली आणि नंतर अवघ्या पाचशे वर्षांनी म्हणजे सन ४७६ मध्ये (काहींच्या मते सन ४८० मध्ये) हे भव्य साम्राज्य कायमचं नाहीसं झालं. सीझरचा मृत्यू ‘ides of March’ ला झाला म्हणून ही तारीख इतिहासात कुख्यात झाली. एरवी या तारखेला अपशकुनी मानावं असं काहीच नाही, पण काही अंधश्रद्ध लोक अजूनही तसं समजतात, हे खरं. ‘१३’ तारखेलाही वाईट समजणारे काही महाभाग आहेत. त्यांच्याबद्दल जरा वेळानं.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

(आताच्या इटली देशातलं) रोम शहर हे तेव्हा एका फार मोठ्या साम्राज्याचं सत्ताकेंद्र होतं. भूमध्य समुद्राला लागून असलेला युरोपचा काही भाग, उत्तर अफ्रिकेचा काही भाग, आणि आताच्या मध्य पूर्वेतील (किंवा पश्चिम आशिया खंडातला) काही भाग - हे सगळं मिळून हे साम्राज्य बनलं होतं. एका काळात तर या रोमन लोकांनी थेट इंग्लंडपर्यंत कूच करून तिथेही आपली वसाहत केली होती. याच साम्राज्याच्या पूर्वेकडच्या भागाला ‘बायझॅंटीन साम्राज्य’ असंही म्हटलं जाई. अनेक महान सम्राटांनी या साम्राज्याचं अधिनायकपद भूषवलं आणि ज्युलिअस सीझर हा त्याच माळेतला एक तेजस्वी मणी होता.

इसवी सनोत्तर पहिल्या सहस्रकाच्या चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन वंशाच्या लोकांनी रोमन साम्राज्याला युद्धात पराभूत केलं. त्याच काळात ख्रिश्चन धर्माच्या विचारधारेनंही तिथं पाय रोवला आणि बघता बघता लवकरच हे साम्राज्य अस्तंगत झालं. त्यांची लॅटिन भाषादेखील मरणाला लागली. असं असलं तरी आजही पाश्चात्य समाजावर असलेली त्यांच्या भाषेची, संस्कृतीची, चालीरीतींची पकड कायम आहे. रोमजवळच्या व्हॅटिकन शहरातून कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप हे जगातल्या सर्व ख्रिश्चन धर्मियांना मार्गदर्शन करायचे.  प्रोटेस्टंट ख्रिश्चन पंथाचा उदय होईपर्यंत हे सुरू होते. आजही कॅथलिक पंथाचे जगभरातले अनुयायी पोपनाच आपला आध्यात्मिक आणि धार्मिक महागुरू मानतात.

लॅटिन भाषा जरी मरणासन्न झाली तरी पुढे तिच्यातूनच आजच्या इटलिअन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्च्युगिज, रुमेनियन अशा अनेक भाषांचा जन्म झाला आहे. इंग्रजी भाषेतलेही हजारो शब्द लॅटिनमधून आलेले आहेत. कायद्याच्या क्षेत्रातही अन्य वैधानिक तत्त्वज्ञानांचा आणि व्यवस्थांचा विकास होईपर्यंत ‘रोमन लॉ’ म्हणजेच ‘रोमन साम्राज्याचा कायदा’ हाच सर्वदूर श्रेष्ठ मानला जात होता. थोडक्यात, रोमन साम्राज्य जरी खालसा झालं असलं तरी त्याच्या खुणा जगात आजही ठळकपणे सापडतात.

यातलीच एक महत्त्वाची खूण होती ज्युलिअन कॅलेंडर. ज्युलिअस सीझरने ग्रीक गणितज्ञांच्या मदतीनं वार्षिक कालगणनेची एक नवीन पद्धत तयार केली होती. यानुसार त्यानं परंपरागत रोमन कॅलेंडरमध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवले होते. ख्रिस्तपूर्व सन ४५ साली अस्तित्वात आलेलं हे कॅलेंडर पुढची १६०० वर्षं म्हणजे इसवी सन १५८२पर्यंत साऱ्या पाश्चात्य जगतात आदर्श मानलं जात होतं. १५८२मध्ये पोप तेरावा ग्रेगरी यानं या ज्युलिअन कॅलेंडरमध्ये एक सूक्ष्म बदल करवला. कालगणना अधिक अचूक व्हावी, यासाठी त्याने एका वर्षात ३६५.२५ ऐवजी ३६५.२४२५ एवढे दिवस असतात असं सुचवलं. त्याची ही कल्पना लवकरच सर्वांनी मान्य केली. त्यामुळे त्यानंतर कालगणनेसाठी जगभरातले लोक ज्युलिअनऐवजी ग्रेगरीचं कॅलेंडर वापरू लागले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आज आपण भारतीय लोक धार्मिक कृत्यं वगळता अन्य सर्व कामांसाठी याच ग्रेगरीअन कॅलेंडरनुसार कालगणना करतो. मात्र मुळात ते सीझरच्या ज्युलिअन कॅलेंडरवरच आधारित आहे, आणि ज्युलिअनचं कॅलेंडर पारंपरिक रोमन कॅलेंडरवर म्हणजेच Republican calendar आधारित होतं. ख्रिस्तपूर्व सन ५०९मध्ये ते सर्वप्रथम वापरात आलं आणि ज्युलिअन कॅलेंडर येईपर्यंत ते वापरात होतं.

या ज्या पारंपरिक रोमन कॅलेंडरमध्ये सीझरनं महत्त्वपूर्ण बदल केले होते, त्यात काय विशेष होतं? ही कालगणना जरा किचकट होती. या जुन्या रोमन कॅलेंडरमध्ये प्रारंभी एका वर्षात फक्त दहा महिने होते. नंतर त्यात दोन महिन्यांची भर घालण्यात आली. म्हणजे आजच्यासारखेच एकूण बारा महिने झाले. या बारापैकी चार महिन्यांना full म्हणजे पूर्ण महिने मानत, कारण त्यांच्यात ३१ दिवस असत. सात महिन्यांना hollow किंवा पोकळ महिने मानत आणि त्यांच्यात २९ दिवस असत. उरलेला एक महिना २८ दिवसांचा असे. हे सगळे चंद्रमास होते.

यातल्या प्रत्येक महिन्यात तीन वेळा खास दिवस येत असत. यातला पहिला होता - Kalends (Kalendae or Kal.) किंवा कॅलेंड. याच नावावरून पुढे इंग्रजीत calendar हा शब्द तयार झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘कॅलेंड’ असं म्हटलं जात असे. καλειν या ग्रीक शब्दापासून हा शब्द बनला आहे. कॅलेंड म्हणजे उद्‌घोषणा करणं, अनाऊन्स करणं. अमावस्या संपून प्रतिपदेच्या चंद्राची कोर आकाशात दिसायला लागली, म्हणजेच नवा मास सुरू झाला, हे घोषित करणारा दिवस म्हणजे कॅलेंड.

पुढचा खास दिवस असायचा Nones (Nonae or Non.) किंवा नॉन्झ. ३१ दिवसांच्या महिन्यात सात तारखेला, तर २९ दिवसांच्या महिन्यात पाच तारखेला ‘नॉन्झ’ म्हटलं जाई. आपण ज्याला आज आठवा दिवस म्हणतो, त्याला रोमन लोक नववा दिवस म्हणत.

‘आईड्झ’ हा महिन्यातला तिसरा खास दिवस असे. त्याच्या आधीच्या आठव्या (नवव्या) दिवसाला नॉन्झ समजलं जात असे. Ides (Idus, Eid. or Id.) किंवा आईड्झ हा दिवस ३१ दिवसांच्या महिन्यात महिन्यातला १५वा दिवस असे, तर २९ दिवसांच्या महिन्यात तो १३वा दिवस असायचा. कोणत्याही महिन्याच्या मधल्या दिवसाच्या आधीचा दिवस म्हणजे आईड्झ. ३१चा मधला दिवस म्हणजे साडेपंधरा. म्हणून त्या महिन्यात १५ला ‘आईड्झ’ असे. तर २९चा मधला दिवस म्हणजे साडेचौदा. म्हणून त्या महिन्यात १३ला ‘आईड्झ’ असे. आईड्झचा खरा अर्थ विभाजन करणे असा होतो. १५ तारखेला साधारणपणे अर्धा महिना पूर्ण होतो आणि त्याचे दोन भाग केले जाऊ शकतात. म्हणून ‘आईड्झ’.

त्याचप्रमाणे पौर्णिमा ही तिथी १३व्या किंवा १५व्या दिवशीच येते, असाही तेव्हा समज होता. पौर्णिमेमुळे महिन्याचे दोन भाग होतात, म्हणूनही ते लोक त्या दिवसाला ‘आईड्झ’ असं म्हणत.

यात आणखी एक गंमत आहे. जुने रोमन लोक कॅलेंड, आईड्झ, आणि नॉन्झ यांचा मार्कर किंवा खूण म्हणून उपयोग करून घेत आणि आपली मासिक कालगणना करत. पण ती आजच्यासारखी १ ते ३१ अशी सरळ दिशेने जाणारी गणना नव्हती. ते उलटी गणना करायचे. म्हणजे पुढच्या महिन्याच्या कॅलेंडपासून सुरू करून ते चालू महिन्याच्या दिवसांचे क्रम ठरवायचे.

उदाहरणार्थ - एप्रिलच्या कॅलेंडच्या (पहिल्या दिवसाच्या) आधीच्या दिवसापासून मार्चच्या आईड्झपर्यंत, मग मार्चच्या आईड्झच्या आधीच्या दिवसापासून मार्चच्या नॉन्झपर्यंत, आणि मग मार्चच्या नॉन्झच्या आधीच्या दिवसापासून मार्चच्या कॅलेंडपर्यंत अशा तीन टप्प्यांत ही गणना केली जायची. आता मार्च महिन्यात ‘आईड्झ’ पंधरा तारखेला येतो. म्हणून अकरा मार्चला ते लोक ‘पाच आईड्झ’ असं म्हणत. कारण (त्यांच्या गणनेनुसार) तो आईड्झच्या आधीचा पाचवा दिवस ठरायचा. या अशाच पद्धतीनं रोमन कालगणना होत असे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

रोमन अंकगणनेचंही असंच उरफाटं गणित आहे. एक तर त्यांना झिरो म्हणजे शून्य ही संकल्पना ठाउकच नव्हती. डेसिमल किंवा बेस-१० या पद्धतीवर त्यांचे अंक आणि अंकगणित आधारित होते. पण place value notation किंवा स्थान मूल्य चिन्हांकन याऐवजी त्यांनी काही ठराविक चिन्हांना विशिष्ट मूल्यं देऊन त्यांच्या भरोशावरच काम चालवलं. I, V, X, L, C, D, आणि M ही ती ठराविक चिन्हं. त्यांची मूल्यं अनुक्रमे १, ५, १०, ५०, १००, ५००, आणि १००० अशी आहेत. यातून क्रम आणि संयोजन (permutation and combination) या पद्धतीनं ते बाकीचे आकडे तयार करायचे. I म्हणजे एक, II म्हणजे दोन, III म्हणजे तीन. पण IV म्हणजे चार. या ठिकाणी पाच उणे एक (= ४) असं होतं. ९ म्हणजे IX. दहा उणे एक. याच धर्तीवर, XL = ४०, XC = ९०, CD = ४००, आणि CM = ९००. मात्र अन्य ठिकाणी ते वेगळी अंकरचना करायचे. ३९ = XXX + IX किंवा XXXIX. ७८९ DCC + LXXX + IX किंवा DCCLXXXIX. १०६६ = M + LX + VI किंवा MLXVI. २०२१ =  MM + XX + I  = MMXXI.

यावरून ११ मार्चला ते लोक पाच ‘आईड्झ’ का म्हणायचे, हे स्पष्ट होईल. आहे ना भारी? अशी आहे मार्चच्या आईड्झची कहाणी.

शेक्सपिअरच्या ‘ज्युलिअस सीझर’ या नाटकात या ‘आईड्झ’चा उल्लेख आहे, हे आपण पाहिलंच. याखेरीज ‘The Ides of March’ या नावाची कादंबरी Thornton Wilder यानं लिहिली आहे. जॉर्ज क्लूनीचा ‘The Ides of March’ या नावाचा चित्रपटसुद्धा प्रसिद्ध आहे.

मार्चच्या आईड्झचं सोडा. तसंही एखाद्या तारखेला किंवा दिवसाला अशुभ मानण्याची अंधश्रद्धा जगात बहुतेक सर्वदूर आढळते. आपल्याकडे अमावस्येला अशुभ मानणारे अनेक लोक आहेत. पाश्चात्य लोकांत तेरा तारखेला (किंवा आकड्याला) वाईट समजलं जातं. त्यातही, जर ही तारीख एखाद्या शुक्रवारी आली असेल तर ती जास्त अशुभ असतं, असं म्हणतात. अगदी ख्रिस्तपूर्व सन १७६०पासून १३ या संख्येला वाईट मानलं गेलं आहे, याचे पुरावे सापडले आहेत.

तत्कालीन ‘Mesopotamian Code of Hammurabi’ या कायद्याच्या पुस्तकात कलमांना क्रमशः नोंदवलं आहे. पण त्यात १३ क्रमांकाचं कलम नाही. १२नंतर एकदम १४. व्हायकिंग लोकांच्या पारंपरिक संकल्पनांमध्येसुद्धा १३ला अशुभ मानलं जात होतं. युरोपात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यावर तर या गैरसमजुतीला अधिकच चालना मिळाली. अनेक पाश्चात्य देशांमध्ये आजही अनेक हॉटेलांमध्ये १३ नंबरचा मजला नसतो. विमानांमध्ये १३ क्रमांकाची खुर्च्यांची रांग नसते. कोणत्याही प्रसंगी जर १३ लोक एकत्र जेवले तर त्यातल्या एकाला पुढच्या वर्षभरात मरण येईल, अशी अनेकांची समजूत असते. म्हणून औपचारिक भोजनाची आमंत्रणं एक तर १२ किंवा नाही तर १३पेक्षा जास्त लोकांना पाठवण्याची पद्धत आजही रूढ आहे.

ख्रिस्तानं मृत्यूपूर्वी जे अंतिम भोजन केलं होतं, त्या वेळी तो स्वतः आणि त्याचे १२ शिष्य असे १३ जण हजर होते. यापैकीच एक जुडास होता. तो सगळ्यात शेवटी आत आला. नंतर त्यानंच येशूशी दगाबाजी करून त्याला पकडण्यात अधिकाऱ्यांना मदत केली. या कारणावरून १३ ही संख्या अशुभ मानली जाऊ लागली. पुढे शुक्रवारी येशूला वधस्तंभावर चढवण्यात आलं. म्हणून १३ (तारीख) + शुक्रवार ही युती अधिकच घातक मानली गेली.

फोबिया किंवा फोबिआ म्हणजे अवाजवी, आत्यंतिक, अतार्किक भीती, भय. १३ या आकड्याच्या भीतीला इंग्रजीत ‘Triskaidekaphobia’ (ट्रिस्काइडेकॅफोबिआ) असं शास्त्रीय नाव आहे. ग्रीक भाषेत treiskaideka याचा अर्थ १३ असा होतो. (treis ‘तीन’ + deka ‘दहा’.) त्याला phobia हा शब्द जोडून १९११ च्या सुमारास Triskaidekaphobia हा नवीन शब्द तयार करण्यात आला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कोणत्याही शुक्रवारी येणाऱ्या तेरा तारखेला जे लोक घाबरतात, त्यांना ‘paraskevidekatriaphobia’ (पॅरॅस्केविडेकॅट्रिआफोबिआ) झालेला असतो. या लांबलचक शब्दाची फोड अशी आहे- ग्रीक भाषेत paraskevi म्हणजे शुक्रवार (फ्रायडे) आणि dekatria म्हणजे तेरा + फोबिआ. हा शब्द Dr. Donald E. Dossey या अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञानं १९९०च्या आसपास तयार केला.

‘Friggatriskaidekaphobia’ या शब्दाचा अर्थ देखील paraskevidekatriaphobia असाच आहे. यातला triskaidekaphobia आपण वर पाहिलाच. मात्र frigga हे पूर्वपद स्कॅन्डेनेविअन देशातल्या दंतकथांमधून घेतलं आहे. हे तिथल्या एका प्राचीन देवीचं नाव आहे. ही चेटुकविद्या, चेटकिणी, आणि शुक्रवारची अधिष्टात्री देवता होती. (शुक्रवारी चेटकिणींचा आरामाचा दिवस असतो, असं तिथे मानलं जाई.) म्हणून frigga म्हणजे शुक्रवार.

बहुतेक दरच वर्षी किमान एकदा तरी शुक्रवारी १३ तारीख येते. ज्या वर्षाची सुरुवात रविवारपासून होते, त्या वर्षी तर एखाद्या शुक्रवारी १३ तारीख असतेच असते. काही काही वर्षांत तर तीन-तीन  शुक्रवार + १३ तारीख अशी युती येऊ शकते. पण हे सगळं माहीत असूनही बरेच लोक या नैसर्गिक घटनेला घाबरतात, हे सत्य आहे.

‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा’, यापेक्षा याचं आणखी चांगलं वर्णन काय करता येईल?

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Milind Kolatkar

Wed , 31 March 2021

आपणास, आपला लेख १२ मार्च नंतर आज पाहून बरं वाटलं. त्या आधिच्या लेखा नंतर आपला स्तंभ थांबवला की काय अशी शंका आली होती. तसेही त्या शेवटच्या लेखात 'विंग्रजी' शब्द असे काही फारसे नव्हते. पण असो. विंग्रजीशब्दांची जाण वाढवण्यास आपली मालिका नक्कीच उपयोगी पडते. अनेक शब्द जवळचे होतात. नवीन आपलेसे होतात. धन्यवाद. -मिलिंद


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......