अजूनकाही
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ‘सुगावा’ प्रकाशनाचे संस्थापक आणि ‘सुगावा’ मासिकाचे संपादक प्रा. विलास वाघ यांचे २५ मार्च २०२१ रोजी करोनाच्या संसर्गामुळे दुःखद निधन झाले. तसे त्यांचे वय ८२ वर्षाचे होते. त्यांना मधुमेहाचा विकार होता. हे खरे असले तरी ते आणखी काही वर्षे निश्चितच जगले असते असे वाटते.
त्यांची व माझी शेवटची भेट १९ फेब्रुवारी २०२१ रोजी नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात झाली. सदाशिव पेठेतल्या त्यांच्या कार्यालयाच्या वरच ते राहायला होते. पक्ष संघटनेच्या कामासाठी पुण्याला गेलो की, नेहमी संध्याकाळी त्यांना भेटायला जात असे. वरून खाली यायला त्यांना जरा उशीर झाला. तेव्हा ते म्हणाले, ‘आता मला पूर्वीसारखे चालता येत नाही.’ तसे त्यांना बऱ्याच दिवसांपासून ऐकायलाही कमी येत होते. फोनवर बोलणे तर कठीणच होते. दिसण्याचाही थोडासा प्रॉब्लेम होता. वार्धक्यामुळे शरीर साथ देत नव्हते. नेमक्या अशाच काळात करोनाने त्यांच्यावर घाला घातला. नसता आणखी दोन-चार वर्षे तरी ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊ शकले असते.
वर्षभरापूर्वी त्यांच्याशी मोदी राजवटीबद्दल मी लिहिलेल्या लेखांचे संकलन करून त्याचे एक पुस्तक प्रकाशित करण्याबद्दल बोललो होतो. त्यांनीही त्याला संमती देऊन लेखाचे संकलन करून देण्यास सांगितले होते. पण आता सुगावा प्रकाशनाचे काम आम्ही पाहत नसून प्रकाश जावळे व विनोद शहारे पाहत असल्याचे सांगितले. पण तुमच्या पुस्तकाबद्दल मी त्यांना सांगतो असेही त्यांनी आश्वासित केले होते.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
पण त्यानंतर झालेला करोनाचा कहर व २५ मार्च २०२०पासून लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे कुठेही जाणे-येणे बंद झाले होते. परिणामी माझ्याकडून लेखांचे संकलन झाले नव्हते. पण आता करोनाने थोडी उसंत दिली, म्हणून त्यांना आमच्या जुन्या निर्णयाची आठवण करून दिली. त्यांनीही पुन्हा लेखांचे संकलन करून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी ते केले. त्याचे डीटीपी करून त्यांना त्याची प्रतही पाठवली होती. ती त्यांना मिळाली असेलच. पण त्याचे उत्तर द्यायचे मात्र त्यांना करोनामुळे शक्य झाले नाही, असे दिसते.
या भेटीत नेहमीप्रमाणे त्यांनी ‘कार्ल मार्क्सला बुद्धाप्रमाणे माणसाचे मन’ कळाले नाही’, हे त्यांचे नेहमीचे मत मांडले. यावर त्यांनी मला यापूर्वी लेखही लिहिण्याचे सांगितले होते, पण माझ्याकडून ते शक्य झाले नाही. या मुद्द्यावर ते माझ्याशी जसे बोलत होते, तसेच इतरही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशीही बोलत असावेत. कारण तसा उल्लेख आनंद तेलतुंबडे यांनी त्यांच्या पंचाहत्तरी निमित्ताने काढलेल्या ‘प्रबोधन पर्व’ या गौरवग्रंथातील लेखातही केलेला आहे.
त्या वेळी मी त्यांना ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ यांच्या विचारांची तुलना करणारे डॉ. डी. आर. जाटव यांचे हिंदीमध्ये एक पुस्तक असल्याचे सांगितले होते. त्यांनी ते पाठवण्यास सुचवले. त्याचे आपण मराठीत भाषांतर करून छापू असे ते म्हणाले. त्याप्रमाणे मी त्या पुस्तकाची झेरॉक्स प्रत त्यांच्याकडे पाठवली होती. त्याची पोहोच त्यांनी मला पत्र लिहून दिली आहे. ते त्यांचे मला आलेले शेवटचे पत्र.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तसे मी त्यांच्याकडे फार पूर्वीपासून आमचे नेते व पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड भास्करराव जाधव यांच्याबरोबर जात असे. त्या दोघांच्या व कधीमधी हजर असल्यास उषाताईंच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायच्या. त्यातूनच वाघसरांची व उषाताईंची ओळख झाली. पुढे ती इतकी वाढली की, त्यांनी मला ताकीदच दिली – जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्याला याल, तेव्हा संध्याकाळी माझ्याबरोबर जेवणाला येत चला.
अशाच एका भेटीत त्यांनी मला त्यांच्या मोराणे या गावी कॉम्रेड शरद् पाटील यांचे दोन दिवसांचे शैक्षणिक शिबिर आयोजित केले असल्याचे सांगून त्याचे निमंत्रण दिले होते. त्यांचे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय व वसतीगृह त्यांच्या वडिलोपार्जित शेतीवरच उभारलेले आहे. या महाविद्यालयाने अनेक पारितोषिके मिळवली आहेत. आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा, वसतीगृह इत्यादी बऱ्याच सोयी-सवलती तेथे आहेत. शिबिरासाठी सबंध महाराष्ट्रातून आलेल्या विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी जेवण, चहा, नाष्टा आणि राहण्याची उत्तम सोय त्यांनी केली होती. त्या वेळी कॉम्रेड शरद पाटील यांच्या वैचारिक मेजवानीचा दोन दिवस अनुभव तर घेतला.
सुगावा प्रकाशनाने या पूर्वी माझी ‘धर्म व धर्मांतरे’, ‘एनजीओचा सुळसुळाट’, ‘जागतिक आर्थिक मंदी’, ‘साम्राज्यवाद व जातीअवस्था’ ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. पैकी शेवटच्या पुस्तकाच्या निमित्ताने कोल्हापूरला एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पुण्यातून वाघसर व सौ. उषाताई यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली होती. तेव्हा वाटेत तळेगाव येथे त्यांनी चालवलेली अनाथ मुलांची शाळा व वसतिगृह पाहण्याचा योग आला होता. तेथील मुले-मुली मोठ्या आपुलकीने त्यांच्याकडे येत होती, त्यांच्याशी बोलत होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कॉम्रेड भास्करराव जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी चालवलेल्या ‘कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृति प्रतिष्ठान’द्वारे देण्यात येणारा पहिलाच पुरस्कार वाघ यांना प्रदान करण्यात आला. तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांनाच आश्वासन दिले होते - ‘कॉम्रेड भास्करराव जाधव यांचे आतापर्यंतचे दैनिक ‘श्रमिक विचार’मधील संपादकीय लेख तुम्ही संकलित करून जर दिले तर सुगावा प्रकाशनच्या वतीने ते आम्ही प्रकाशित करू.’ पण आमच्याकडून ते काम झाले नाही.
वाघ आंबेडकरवादी-समाजवादी विचारसरणीचे. कॉम्रेड भास्करराव व मी आंबेडकरवादी असलो तरी कम्युनिस्टही आहोत, याची त्यांना माहिती होती. त्यामुळे काहीशी मतभिन्नता असली तरी, दुरावा मात्र मुळीच नव्हता. उलट जसजशा जास्त भेटी होत गेल्या, तितकी जास्त जवळीक निर्माण झाली. दलित समाजातील उपेक्षित घटकांची उन्नती व्हावी, यासाठी त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचा प्रयत्न चालवला होता. लोकांना वाटण्यासाठी त्यांनी मला अनेक पुस्तके दिली होती. काही पुस्तकांचे गठ्ठे (उदा. ‘आपल्या मनाची काळजी घेताना’ - भिक्खुनी बोधीचित्ता) त्यांनी माझ्याकडे दिले होते. मी आनंदाने त्यांचे वाटप केले होते.
असे प्रा. विलास वाघ सर आपल्यातून निघून गेल्याची कायमची हुरहूर मनाला लागून राहिल. त्यांना अखेरचा जयभीम!
..................................................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment