आसरियार डॉ. के. वीरमणी यांनी ‘द्रविड कळघम’ एक सामाजिक चळवळ म्हणून विकसित केली आहे
पडघम - सांस्कृतिक
व्ही. कुमारसेन
  • आसरियार डॉ. के. वीरमणी आणि त्यांच्या ‘द्रविड कळघम’ या संस्थेचे बोधचिन्ह
  • Tue , 30 March 2021
  • पडघम सांस्कृतिक डॉ. के. वीरमणी महाराष्ट्र फाउंडेशन द्रविड कळघम नरेंद्र दाभोलकर

महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिकाचे २०२० सालचे साहित्य व समाजकार्यासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. यंदाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार चेन्नई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आसरियार डॉ. के. वीरमणी (अध्यक्ष, द्रविड कळघम) यांना जाहीर झाला आहे. करोनामुळे यंदा पुरस्कार प्रदान सोहळा जाहीर कार्यक्रमाच्या स्वरूपात होणार नसला तरी या पुरस्कारांची माहिती देणारी स्मरणिका फाउंडेशनतर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातील वीरमणींविषयीचा हा लेख...

..................................................................................................................................................................

आसरियार (संपादक) डॉ. के. वीरमणी यांच्या नेतृत्वाखाली पेरियार मिशन

थंताई पेरियार इ.व्ही. रामास्वामी (१८७९-१९७३) यांची समाजातील दुर्बल घटकांत आत्मसन्मान जागृत करण्याची आणि त्यांना एक विवेकपूर्ण, प्रतिष्ठेचं जीवन मिळावं अशी तीव्र इच्छा होती. त्यासाठी आपल्या जीवनकार्याची सुरुवात एका वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ‘द्रविड कळघम’ची (‘डीके’ची) स्थापना करून केली. आपण समोर ठेवलेलं हे क्रांतिकारक ध्येय पूर्णत: यशस्वी होण्यासाठी आपलं जीवनच नव्हे, तर पुढच्या कित्येक पिढ्या खर्च व्हाव्या लागतील, याची पेरियार यांना मनोमन खात्री होती. त्यामुळेच त्यांनी आपली ही मानवतावादी चळवळ आणि त्यातल्या कार्यकर्त्यांची फळी स्वत:नंतरही दीर्घकाळ कार्यरत राहील अशा प्रकारेच संस्थेची सुरुवात केली. पेरियार यांनी आपल्यानंतर या चळवळीचं नेतृत्व योग्य लोकांकडे जाईल याची तजवीज आधीच करून ठेवली होती. थंताई पेरियार यांच्यानंतर या चळवळीचं नेतृत्व आधी अन्नई ई.व्ही.आर. मणिअम्माई (१९७३-१९७८) यांच्याकडे आलं व त्यांच्या पश्चात ते आजतागायत आसरियार के. वीरमणी यांच्याकडे आहे. पेरियार यांनी आपल्या हयातीतच डॉ. वीरमणी या शिष्याला संस्थेची तात्त्विक व संघटनात्मक जबाबदारी घेण्यासाठी घडवलं होतं.

अभ्यास व शालेय जीवन

आसरियार के. वीरमणी यांचा जन्म २ डिसेंबर १९३३ रोजी एका साध्याशा कुटुंबात झाला. तमिळनाडूमधलं कुडल्लोर नावाचं बंदर हे त्यांचं जन्मगाव. वीरमणी लहान असतानाच त्यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली. जुन्या पद्धतीच्या शाळेत अगोदर त्यांचं अनौपचारिक शिक्षण सुरू झालं. पुढे आपल्या औपचारिक शिक्षणाच्या काळात, के. वीरमणी यांनी अभ्यासातही आपली चुणूक दाखवली. त्याच काळात ‘सेल्फ रिस्पेक्ट’ या चळवळीचे सदस्य असलेल्या ए. द्रविडमणी यांच्याकडून त्यांना वैचारिक बैठकही प्राप्त झाली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वीरमणी यांनी आपलं पहिलं सार्वजनिक भाषण केलं होतं. पुढे ‘सेल्फ रिस्पेक्ट’ चळवळीच्या कितीतरी नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी अनेक सभा व परिषदांमध्ये भाषणं केली. त्यांनी पेरियार यांच्या उपस्थितीतही सभा गाजवली होती. त्यांचा पेरियार यांच्यासोबत परिचय झाला १९४४मध्ये. त्यानंतर पुढच्या काळात के. वीरमणी यांनी आपला अभ्यास आणि वेगवेगळे विवेकवादी संस्थात्मक उपक्रम या दोहोंचा समतोल साधत आयुष्याची वाटचाल सुरू झाली.

‘द्रविड कळघम’ला वाहिलेलं जीवन

१९६२मध्ये पेरियार यांनी वीरमणी यांना चेन्नई इथे बोलावणं धाडलं. पेरियार यांनी वीरमणी यांच्यावर ‘विदुथलाई’ या तमिळ दैनिकाचा पूर्ण वेळ संपादक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी सोपवली. के. वीरमणी यांनी आपल्यावर सोपवलेली ही जबाबदारी शिरोधार्य मानली आणि वकिलीचा व्यवसाय आटोपता घेतला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘विदुथलाई’ या दैनिकाची स्थापना १९३५मध्ये करण्यात आली. गेली ५९ वर्षं के. वीरमणी त्याचे संपादक म्हणून सलगपणे काम पाहत आहेत. प्रकाशन क्षेत्रातला हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. तमिळ भाषेत ‘आसरियार’ या शब्दाचा अर्थ आहे ‘संपादक’. ‘विदुथलाई’ या दैनिकाच्या प्रकाशनामध्ये वीरमणी यांची असलेली गुंतवणूक आणि त्याकरता स्वत:ला वाहून घेणं या गोष्टींमुळे पुढे पुढे चळवळीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक त्यांना प्रेमाने ‘आसरियार’ (म्हणजेच ‘संपादक’) असेच संबोधू लागले.

आसरियार डॉ. के. वीरमणी यांनी पेरियार यांचा विवेकवादाचा व आत्मसन्मानाचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. आसरियार सध्या ‘पेरियार सेल्फ रिस्पेक्ट प्रपोगंडा इन्स्टिट्यूशन (PSRPI)’ या सार्वजनिक ट्रस्टचे सचिव आहेत. पेरियार यांनी आपली सर्व संपत्ती वापरून हा ट्रस्ट स्थापन केला. या ट्रस्टने पेरियार यांचं सर्व लेखन, भाषणं मुद्रित तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित केलेली आहेत. आसरियार यांनीदेखील तमिळ आणि इंग्रजी या भाषांमध्ये १५०हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. ही पुस्तकं पेरियार यांची विचारधारा, तिचा समाजावर होणारा परिणाम आणि या चळवळीने मिळवलेलं यश अशा विषयांवरची आहेत. समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय, शिक्षण आणि रोजगार मिळावा याकरता पेरियार यांनी सुरू केलेली ही सामाजिक चळवळ आता आसरियार यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते. देशातील सध्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणाकडे पाहता ही अगदी सुयोग्य चळवळ आहे, असे म्हणावे लागेल.

वैधानिक दुरुस्त्यांना मोलाचं साहाय्य

१९२८पासूनच तत्कालीन मद्रास प्रोव्हिन्समध्ये दुर्बल घटकांना राखीव जागा मिळण्याबाबतचा हक्क होता. या कायदेशीर हक्काविरोधातील मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालानंतर, पुढे सर्वोच्च न्यायालयाने असं निश्चित केलं की, हा आदेश भारतीय राज्यघटना १९५०मध्ये तरतुदींच्या विरोधातला आहे. या निकालासंदर्भात पेरियार यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात निदर्शनांचं नेतृत्व केलं. त्यानंतर या तरतुदींनुसार, दुर्बल घटकांना १९५१मध्ये पहिली घटनादुरुस्ती करून त्यात कलम १५ (४) समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ देण्यात आलेले होते. पेरियार यांच्या मार्गावरून वाटचाल करत आसरियार डॉ. के. वीरमणी यांनीही तमिळनाडू राज्य सरकारला याच प्रकारे साहाय्य केलं. १९९३मध्ये घटनेच्या ७६व्या दुरुस्तीनंतर सातव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेल्या कलम ३१ (क) अंतर्गत तमिळनाडू राज्य सरकारला त्या राज्यामध्ये एकंदर आरक्षण (हे देशात सर्वाधिक आहे) कायम ठेवण्यासाठी एक विशेष विधेयक मंजूर करून घेण्यास डॉ. वीरमणी यांच्या विद्वत्तेचा लाभ मिळाला. याअगोदर सामाजिक न्यायाच्या इतिहासात असं जास्तीचं आरक्षण केवळ सत्ताधीशांच्या कार्यकारी आदेशांद्वारेच अमलात आणलं जाऊ शकत होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

याखेरीज, केंद्र सरकारच्या व खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण राहावं याकरता २००६मध्ये ९३वी घटनादुरुस्ती करून त्यात कलम १५ (५) समाविष्ट करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या घटनादुरुस्तीचा म्हणजेच कलम १५ (४) मधील दुरुस्तीचा पाया पहिली घटनादुरुस्ती हा होता. पेरियार आणि त्यांची विचारधारा पुढे नेणारे त्यांचे प्रमुख शिष्य आसरियार यांनी सामाजिक न्याय मिळवून देणाऱ्या या तीन घटनादुरुस्ती प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या चळवळीने निवडणुकांच्या राजकारणात कधी भाग घेतलेला नसल्यामुळे, तिला, समाजात जागृती करून आणि राज्य व केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांवर प्रभाव टाकून सामाजिक न्यायासाठी या तीन घटनेतल्या दुरुस्त्या करून घेता आल्या. पेरियार चळवळीचं हेच मोठं बलस्थान आहे.

आसरियार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सामाजिक चळवळीचं मुख्य काम म्हणजे पेरियार यांच्या आत्मसन्मान, विवेकवाद, सामाजिक न्याय, अंधश्रद्धा-निर्मूलन आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणीचं विकसन, खेरीज धर्मस्वातंत्र्यासारख्या अनेक गोष्टींचा प्रचार व प्रसार करणं हे आहे. या साऱ्या गोष्टी लोकांचं शिक्षण व प्रबोधन करण्यासाठी आयोजित केल्या जातात, त्यात कोणतीही सक्ती किंवा बळ यांचा वापर केला जात नाही. हा एक अहिंसात्मक मार्गाने दिला जाणारा लढा आहे, समता व शांतता मिळवण्याकरता लोकांच्या मनात हिंसेचा उद्रेक घडवून आणणारा हा धडा नव्हे.

अंधश्रद्धा-निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं विकसन

आसरियार समाजात रूढ झालेल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यासाठी अनेक मोहिमा नियमितपणे राबवत असतात. उदाहरणार्थ, सुमारे २५ वर्षांपूर्वी काही विशिष्ट हितसंबंध असलेल्या लोकांनी ‘गणपती दूध पितो’ असा प्रचार सुरू करून ही अंधश्रद्धा लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी आसरियार यांनी याविरोधात तत्काळ कृती करायचं ठरवलं. चेन्नई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एलआयसी इमारतीसमोर ते स्वत: रस्त्यावर उतरले आणि या अंधश्रद्धेचा प्रचार करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चालवला. त्यांच्या या घणाघाती हल्ल्यामुळे अंधश्रद्धेचा फायदा उठवणाऱ्या धार्मिक आणि राजकीय दलालांना अखेर काढता पाय घ्यावा लागला. ‘गणपती दूध पितो’ या अंधश्रद्धायुक्त कल्पनेच्या निर्मूलनाला नुकतीच २५ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समिती’ या विवेकवादी संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आसरियार यांनी वरील घटनेचा उल्लेख केला होता.

निदर्शनाच्या मार्गाचं अनुसरण

सामान्य जनता आणि राज्यातील सत्ताधारी यांचं महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निदर्शनांद्वारे विरोध दर्शवणं हा द्रविड कळघमचा एक मुख्य मार्ग आहे. कधी कधी तातडीने सोडवण्याचा प्रसंग समोर असेल, तर अशा वेळी निदर्शनं करण्याचीही वेळ येते. अशा प्रकारे सार्वजनिक स्थळी निदर्शनं केल्यामुळे आपल्या नावाचं अटक वॉरंट निघेल किंवा तुरुंगवासाला सामोरं जावं लागेल याची आसरियार यांना पूर्ण कल्पना असते. आजवर त्यांना ५०हून अधिक वेळा अटक झालेली आहे.

संपादकीय जबाबदाऱ्या

डॉ. के. वीरमणी यांच्या कुशल संपादकपदाखाली पुढील विविध नियतकालिकं प्रकाशित केली जातात. ‘विदुथलाई’ (मुक्ती) (१९३५) हे दैनिक, ‘उन्माई’ (सत्य) (१९७१) हे पाक्षिक, ‘पेरियार पिन्जू’ (पेरियार बालकं) (१९९८) हे मुलांसाठीचं मासिक, आणि ‘द मॉडर्न रॅशनलिस्ट’ (१९७१) हे इंग्रजी मासिक अशी वेगवेगळी, पत्रकारितेच्या क्षेत्रातील अमोघ शस्त्र वापरून ही संस्था आपला विचार पुढे नेत असते.

आसरियार के. वीरमणी यांनी आजवर अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा समावेश आहे. त्यांत पेरियार सेन्टेनरी पॉलिटेक्निक, पेरियार कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस आणि पेरियार मणिअम्माई इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी (अभिमत विद्यापीठ) इ. चा समावेश आहे. ते या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरूही आहेत. या साऱ्या शैक्षणिक संस्थांची स्थापना पेरियार यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक ट्रस्टद्वारे आणि नंतर आसरियार वीरमणी यांनी स्थापन केलेल्या अनेक ट्रस्ट्सद्वारे करण्यात आलेली आहे. याआधीच्या पिढीतल्या ज्या लोकांना शिक्षण मिळू शकलं नाही, अशा दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना या साऱ्या संस्था शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देत असतात. या संस्थांच्या माध्यमातून आसरियार यांनी स्त्रियांच्या आयुष्यातही मोठी क्रांती घडवून आणलेली आहे.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

द्रविड कळघमसोबतच आसरियार डॉ.के. वीरमणी यांच्याकडे ‘द रॅशनलिस्ट फोरम’ या संस्थेचं नेतृत्व आहे. ही संस्था ‘विवेकवाद’ या विषयामध्ये कार्य करणाऱ्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन्स (FIRA)’ या देशभरात लोकप्रिय असणार्‍या संस्थेशी संलग्न आहे. पेरियार यांची विवेकवादी तत्त्वं आणि त्यांच्या जीवनाचं मिशन यांचा तमिळनाडू राज्याच्या बाहेरही जागतिक पातळीवर प्रसार व्हावा याकरता आसरियार यांनी आता प्रयत्न सुरू केलेला आहे. आसरियार यांनी जागतिक पातळीवर पोचण्यासाठी आता ‘ग्लोबलायझेशन ऑफ पेरियार मिशन’ हे महत्त्वाचं कार्य हाती घेतलेलं आहे. त्याकरता २०११ आणि २०१७मध्ये दोन ‘वर्ल्ड एथिस्ट कॉन्फरन्सेस’ आयोजित करण्यात आल्या होत्या. यांत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक नेत्यांनी व संस्थांनी सहभाग घेतला होता. याखेरीज, २०१७मध्ये, जर्मनीतल्या कलोन इथे ‘पेरियार आत्मसन्मान चळवळ परिषद’ घेण्यात आली. २०१९मध्येही याच धर्तीवर अमेरिकेतल्या मेरीलँडमधल्या सिल्व्हर स्प्रिंग इथे ‘पेरियार मानवतावाद आणि आत्मसन्मान परिषद’ घेण्यात आली. ती ‘पेरियार इंटरनॅशनल USAअ.’च्या सहयोगाने घेण्यात आलेली होती. ‘अमेरिकन ह्यूमनिस्ट असोसिएशनने आसरियार के. वीरमणी यांना ‘लाइफटाइम ह्युमनिस्ट अचिव्हमेंट अवार्ड’ प्रदान करून गौरवलेलं आहे.

के. वीरमणी सामाजिक न्याय पुरस्कार

सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आसरियार यांच्या नावाने १९९६पासून ‘पेरियार इंटरनॅशनल, USA द्वारे ‘के. वीरमणी अ‍ॅवॉर्ड फॉर सोशल जस्टिस’ दिलं जातं. दरवर्षी ‘सामाजिक न्याय’ या क्षेत्रात महत्त्वाचं काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान केला जातो. आजवर जगभरातल्या २१ व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.

आसरियार यांच्यावर झालेले हल्ले

पेरियार चळवळ ही शोषितांची मानसिकता बदलण्यासाठी आहे. शोषितांमध्ये हिंसाचार दिसून येत नाही. हाती घेतलेले हे काम खूप कठीण आहे. ज्या अल्पसंख्य उच्चवर्णीय लोकांना समाजातल्या बहुसंख्यांच्या कष्टांचा व सेवांचा लाभ मिळतो, ते अशी समता सहजासहजी मान्य करत नाहीत. आपल्याला मिळणारे फायदे कायम राहावेत, यासाठी असे उच्चवर्णीय कोणत्याही थराला जातात. णग हिंसाचार करण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. आजवर आसरियार यांच्यावर एकंदर पाच वेळा हल्ले करण्यात आलेले आहेत.

१) दिनांक २० जुलै १९८२ रोजी विरुधुनगर जिल्ह्यातील मामसापुरम इथे आसरियार यांच्यावर एका हिंसक जमावाने हल्ला केला होता. त्या वेळी त्यांच्या नाकाला झालेल्या इजेवर सुमारे एक आठवडा वैद्यकीय उपचार करून घ्यावे लागले होते.

२) जमावाने असाच आणखी एक हिंसक हल्ला ११ एप्रिल १९८५ रोजी उत्तर चेन्नई इथेही केला.

३) सालेम जिल्ह्यातील थम्मामपट्टी इथे २८ ऑगस्ट १९८७ रोजी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मात्र असा हल्ला होऊनही, आसरियार यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणेच तिथल्या सार्वजनिक सभेत आपलं भाषण केलं.

४) द्रविडियन स्टुडंट्स कळघम कॉन्फरन्सला जात असताना २८ सप्टेंबर २०१३ रोजी विरुधाचलम इथे एका जमावाने त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्वत: ही परिस्थिती सावरली आणि ते कार्यक्रमस्थळी पोचले. तिथे त्यांनी या परिषदेत आपलं भाषणही केलं..

५) २०१९च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेदरम्यान थिरुपूर इथे त्यांच्यावर भगव्या शक्तींनी हल्ला चढवला होता. त्यात त्यांच्या मोटारीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आसरियार वर्षातला बराचसा काळ वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून समाजातील सर्व थरांतील लोकांना भेटण्यात व त्यांच्याशी संवाद साधण्यात घालवतात. पेरियार चळवळ ही मुख्यत: लोकांसाठीची व लोकांच्या सहभागातून चालणारी आहे. ही चळवळ अखंड चालत राहावी याकरता केंद्रस्थानी, प्रादेशिक, जिल्हा, तालुका, गाव आणि खेडं या पातळ्यांवर संघटनेची सुविहित रचना करण्यात आलेली आहे. आसरियार यांनी द्रविड कळघम एक सामाजिक चळवळ म्हणून विकसित केली आहे. लोकांमध्ये ‘ब्लॅक शर्ट कॅडर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या दोन पिढ्यांमध्ये मतभेद असलेले दिसून येत नाहीत. अगदी कोविड-१९ साथीच्या संकटादरम्यानही, आसरियार दररोज झूम मीटिंगच्या माध्यमातून आपल्या साऱ्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. कोविड-१९ साथीचा पेरियार चळवळीवर कोणताच अनिष्ट परिणाम झालेला नाही. माहिती-तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून आपली चळवळ यशस्वीरीत्या सुरू राहील याची काळजी आसरियार यांनी घेतलेली आहे.

आज आसरियार ८८ वर्षांचे असले, तरी ते तरुण आणि उत्साहाने भारलेले आहेत असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. साऱ्या जगाला मानवतावादाची शिकवण देऊन तो समाजामध्ये अधिकाधिक रुजावा यासाठी ते अहर्निश पेरियार मिशनचं नेतृत्व करत आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक व्ही. कुमारसेन हे चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात यंत्र अभियांत्रिकी विभागातील ऊर्जा अध्ययन संस्थेत प्राध्यापक आहेत

dktreasurer.tn@gmail.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

sushrutkulkarni@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......