अजूनकाही
कवयित्री आणि कथाकार प्रज्ञा दया पवार यांचा येत्या ११ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. नुकतीच अभय कांतांसोबतच्या त्यांच्या सहजीवनाला दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने कांता यांनी लिहिलेला हा विशेष लेख...
..................................................................................................
‘आणि तरीही मी म्हणेन, आय अॅम प्राऊड ऑफ यू, प्रज्ञा!’ असं माझ्या प्रज्ञाविषयीच्या एका अप्रकाशित लेखातलं शेवटचं वाक्य आहे. प्रस्तुत लेख नवा असल्याने त्या जुन्या लेखात मी जे म्हटलं होतं, त्याची पुनरूक्ती इथं करणार नाही, जरी तो लेख अप्रकाशित राहिलेला असला तरी. कारण एक तर तो लेख सात वर्षांपूर्वीचा आहे आणि आजचे संदर्भ खूपच बदललेले आहेत. शिवाय तो लेख फारसा चांगला उतरला नाही असं मलाच वाटल्यानं संबंधित संपादकाने वारंवार तगादा लावूनही मी तो त्याला दिला नाही. ‘आणि तरीही मी म्हणेन....’ हे त्या लेखातलं शेवटचं वाक्य मला अजूनही तितकंच महत्त्वाचं वाटतं. इथं ते वाक्य त्याच्या संदर्भासह देऊन मग तुमच्या साक्षीनं मी करत असलेल्या वर्तमान संवादाकडे वळतो (साहजिकच काही वेळेला मी थेट तुमच्याशीही बोलणार आहेच).
‘प्रज्ञा, तू अत्यंत ठामपणाने धाडसी पण विचारांवरची मांड न सोडता जे निरनिराळे प्रयोग केलेस त्यामुळे तुझ्या दादांना (वडील दया पवार यांना) खूपच त्रास झाला असता, की कसं होणार आपल्या या वेड्या पोरीचं आणि तरीही प्रत्येक वेळेस ते तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते. इतकंच नव्हे तर आपल्या लेकीची लेखनातली झेप बघून बाप से बेटी सवाई या भावनेने त्यांचं काळीज अक्षरश: सुपाएवढं झालं असतं.’
‘दादांशी माझी तुलना करण्याची हिंमत मी अजिबात करणार नाही.’
आणि तरीही मी म्हणेन, ‘आय अॅम प्राऊड ऑफ यू, प्रज्ञा!’
प्रज्ञा हा शब्द माझ्यासाठी कायमच कळवजा आणि काळजातला आहे.
प्रज्ञा हे नाव तसं छोटसं, उण्यापुऱ्या अडीच अक्षरांचं. पण उच्चारताना, लिहिताना विस्तारत जाणारं, भाषेगणिक वेगवेगळी रूपं घेणारं आणि अधिकाधिक अवघड होत जाणारं. तिच्यासारखंच.
माझ्यासाठी हे नाव अशा एका व्यक्तीचं आहे, जिचं वर्णन करताना माझ्या हातून पुढे लिहिला गेलेला एखाद् दुसरा शब्द अतिरंजित म्हणून सोडून द्या, पण खोटा मात्र अजिबातच नाही.
प्रज्ञा एक आत्यंतिक जिवंत माणूस आहे. सच्ची आहे. दांडगटपणादेखील एवढ्या सच्चेपणाने करते की बस्स. त्यामुळं तो अत्यंत अल्पजीवी असतो! मुळात ती एक सच्ची कवयित्री आहे. तिची कविता तिच्याहूनही अधिक सच्ची आहे. खरं तर तिची कविता तिच्यापुढची आहे, असं माझं ठाम मत आहे. प्रज्ञा आधुनिक आहे. पारंपरिक आहे. उत्तराधुनिक आहे. अवखळ आहे. कायम दुग्ध्यात असणारी विदूषी आहे. अतिशय तीक्ष्ण आहे. तीव्र बुद्धिमान आहे. प्रचंड सेंटी आहे. विशेषत: सिनेमा बघताना ती अनेकदा हमसून हमसून रडत असते. गाणी ऐकणं हा तिचा वीकपॉइंट आहे. ती एक अत्यंत सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. ती घरकोंबडी आहे. ती पुरुषधार्जिणी आहे. ती प्रखर स्त्रीवादी आहे. तिची जातजाणीव तल्लख आहे. तिची वर्गजाणीव तीव्र आहे. जात आणि वर्गजाणीव भेदून पुढे जाण्याची तिच्यात प्रचंड उर्मी आहे. ती जोडीदार आहे. ती मालकीण आहे. ती मैत्रीण आहे. ती बहीण आहे. ती मुलगी आहे. ती वादपटू आहे. ती तत्त्वज्ञ आहे. साहजिकच ती वेडी आहे. धाडसी आहे. लवचीक आहे. हट्टी आहे. ती प्रज्ञा आहे!
आता तुम्हाला माझ्या तिच्याविषयीच्या भावनेचा काहीएक अंदाज आला असेल.
अशी नायिका आयुष्यात असणं ही गोष्टच खूप सुंदर आहे. अर्थात प्रज्ञासाठी ‘नायिका’ हा शब्द माझा नसून पुष्पाताई भावेंचा आहे. जेव्हा जेव्हा त्या तिला भेटतात तेव्हा त्यांचं तिला उद्देशून असलेलं हमखास पहिलं वाक्य असतं, ‘काय म्हणते आमची नायिका!’तशीही प्रज्ञाच्या आयुष्यात माणसांची कमी नाही. ही माणसं नात्यागोत्यातलीच असतात असं नाही. नाती तर ती जपतेच. जीवापाड जपते. नुसती वर्तमानातलीच नाही तर काही कारणानं भूतकाळात गेलेली नातीही. सुटून गेलेली नाती जपण्यासाठी भूतकाळात वारंवार टेहलटिकोरी करून येणं हे त्यासह येणाऱ्या सर्व त्रासवेदनांसकट ती मनःपूर्वक जगते. भूतकाळाचा हा संदर्भ मांडणारी तिच्यावर केलेली माझी एक कविता आहे, ‘सुरुवात कुठून करू?’ या शीर्षकाची.
तुझ्या
पायाच्या टकलू अंगठ्यापासून
घट्ट भरीव ओठांपासून
अपऱ्या नाकापासून
की, तू डोळ्यात गोठवून ठेवलेल्या
अपार वेदनेपासून?
हा काळा करडा पट्टा
हलत राहतो सारखा आपल्यामधून
तू आत जातेस
बाहेर येतेस
बाहेर येतेस
आत जातेस
आताही तू आत गेलेली आहेस
मी खोळंबलोय कधीचा
एकेक क्षण होऊन
तू दोन्ही हात पसरतेस
आता हा पट्टा भेदू
की त्याच्यासकट तुला खेचू?
सांग ना,
सुरुवात कुठून करू?
अशी नात्यांची अपार भूक असलेली लेखिका एकटी राहील? दहा वर्षांपूर्वी आम्ही एकत्र येत होतो तेव्हा मी तिला तुझ्यावर ७६ जणं मरतात असं छातीठोकपणे म्हणत असे. या दहा वर्षांत परिस्थिती बदललेली तर नाही. उलट तो आकडा आता १७६ झाला असेल इतकंच.
प्रज्ञाची एक कविता आहे, ‘बोलून चालून नादान बाई मी’ या शीर्षकाची. त्या कवितेतल्या काही ओळी अशा आहेत,
भारीच नाद मला
शब्द कुटायचा
तशी नादानच आहे म्हणा ना!
रोज ढिगभर शब्द गोळा करायचे
न् एक एक कुटत बसायचे!
....
आता तर मला कंटाळाच यायला लागलाय
अडेच ना,
कुठलाही शब्द.
ना कुठला चकवा,
ना कसली झिंग
ना आनंदाचा डोह,
ना आनंदतरंग!
शेवटी नादच सोडला मी
असल्या अ-पौरुषेय भाषेचा.
बोलून चालून नादान बाई मी
अनघड आडग्या चालीची
वहिवाट बिकट वाटेनं करणारी.
म्हटलं, आता जरा आडवा पट घेऊ
भाषेचा.
सुरुवात केली
स्वतःच्याच नावापासून;
प्रज्ञा
...
बत्ता नुसताच खालीवर, खालीवर
...
रग लागलीय हाताला,
नसा टरारून आल्यात दंडाच्या,
सुजून काळी निळी झालीत माझी बोटं,
तरीही मी कुटतेच आहे
दिवस न् रात्र..
उरी फुटतेय,
अवघी ताकद गोळा करतेय
माझ्या दुखर्या मलूल डोळ्यात
आता उतरू लागलाय माझा प्राण
....
खरं तर ही कविता तशी मोठी आहे. त्यातल्या या मोजक्याच ओळी आहेत, हारीनं मांडलेल्या किंवा मी त्या कवितेचं या संवादासाठी एक नवं संपादन केलं आहे असं म्हटलं तरी चालेल. माझा मुद्दा एवढाच आहे की, स्वतःच्या नावामुळे ज्या कवयित्रीला इतकं सगळं सहन करावं लागतं, ती कवयित्री किती अनघड नि अवघड जगत असेल. अशी खतरनाक प्रज्ञा माझ्या आयुष्याचा गेली दहा वर्षं अंगभूत भाग असल्यावर तिच्या या'कवितागत स्व'ची स्थिती या संवादपर लेखातील 'अ-कवितागत स्व’ची म्हणजे साध्या भाषेत माझीही झालेली असणार यात नवल ते काय?
प्रज्ञाचा येत्या ११ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा सर्वसाक्षी संवाद आहे म्हणा ना. अलीकडेच तिने तिची एक नवी कविता फेसबुकवर टाकली. त्या कवितेत वाढदिवसाचा संदर्भ येतो. कवितेच्या शेवटच्या ओळी अशा आहेत,
नाहीसा होत चाललेला
वाढदिवस साजरा करू
ये
केक कापू
भरवू घास एकमेकांना
आणि विझवू मेणबत्त्या
कायमच्याच
या मेणबत्त्या कायमच्याच विझवण्याची भाषा कवयित्री कोणत्या ‘कवितागत पर’ला उद्देशून करतेय हे मला नेमकं सांगता येणार नाही, पण ती माझ्याशीच करते आहे अशी कल्पना करून बघायचं ठरलं तर मला माया अँजेलोच्या कवितेतून प्रज्ञाला एक साद घालावीशी वाटते. कविता माया अँजेलोची. अनुवाद माझा.
मला तुझा हात दे
थोडी जागा कर माझ्यासाठी
कवितेतल्या
या क्षोभापलीकडची
तुझ्यापुढे आणि मागे चालण्यासाठी
इतरांना असू दे ना
खाजगीपण
शब्दांना स्पर्श करण्याचं
अन् प्रेमाच्या हरवलेपणावर
प्रेम करण्याचं
माझ्यासाठी
मला तुझा हात दे
..................................................................................................................................................................
लेखक ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाचे संपादक आहेत.
abhaykanta3@gmail.com
..................................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Thu , 09 February 2017
लेखकाला अजून बरंच काही सांगायचं आहे, पण ते राहून गेलं आहे आणि लेख मध्येच संपला आहे, असं वाटतं. पण जेवढा लेख उतरला आहे, तेवढा चांगला जमून आला आहे.