महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिकाचे २०२० सालचे साहित्य व समाजकार्यासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. यंदाचा समाजकार्य विशेष कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांना जाहीर झाला आहे. करोनामुळे यंदा पुरस्कार प्रदान सोहळा जाहीर कार्यक्रमाच्या स्वरूपात होणार नसला तरी या पुरस्कारांची माहिती देणारी स्मरणिका फाउंडेशनतर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातील देसाईंविषयीचा हा लेख...
..................................................................................................................................................................
‘चुकला जतीन, प्रेस क्लबमध्ये’ अशी एक म्हण आहे. ‘चुकला फकीर मशिदीमध्ये’ ही म्हण बहुधा त्यावरूनच घेतली असावी! अर्थात, मनाने, बोलण्याने तसंच वागण्यानेही खरोखरच ‘फकीर’ असलेला जतीन प्रेस क्लबमध्ये सापडला नाही, तर त्यास कुठं शोधायचं? तर जतीन हा क्लबमध्ये नसला तर ग्रँट रोडच्या त्या सुप्रसिद्ध ‘शांताश्रमा’त सापडणार किंवा हुतात्मा चौकातील त्या आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या किताबखान्यात! आणि यांपैकी कुठंही तुम्ही गेलात तरी तुम्हाला जतीनला ओळखायला फार काही तोशीश पडणार नाही. अर्थात, त्यासाठी तुम्ही तो सुप्रसिद्ध ‘सिंहासन’ हा सिनेमा बघितलेला हवा. त्या सिनेमात दिगू टिपणीस नावाचा एक रिर्पोटर असतो. निळू फुले या अष्टपैलू अभिनेत्याने ती भूमिका अजरामर करून सोडलेली आहे. तर जतीन हा आजच्या युगातही परिवर्तनाची स्वप्नं-बिप्नं बघणारा दिगू टिपणीसच आहे. जीन पॅण्ट, गुडघ्याच्या खाली जाणारा झब्बा-कुडता, चांगल्यापैकी वाढलेले केस आणि डोळ्याला आपल्या बहुश्रुततेची झलक दाखवणारा चष्मा अशा अवतारातील जतीन तुम्हाला नक्कीच तुमची ओळखपाळख नसली, तरीही ओळखू येणार म्हणजे येणारच.
तर हा ‘जतीन’ म्हणजे जतीन देसाई.
खरं तर जतीनने आता वयाची साठी ओलांडली आहे. त्यामुळे त्याला किमान जतीनभाई असं तरी म्हणायला हवं. पण तो सर्वांचा जतीनच आहे. या मुंबईत कुठेही, कोणावरही काही अन्याय घडला वा घडून गेलेल्या अन्याय-अत्याचाराविरोधात निदर्शनं, धरणं, मोर्चा असू द्यात, तिथं जतीन असणार म्हणजे असणारच. कारण जतीनचं अवघं आयुष्यच असं अन्यायाविरोधात लढण्यात गेलं आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात जी काही ‘पोलरायझेशन’ची खेळी जाणीवपूर्वक अमलात आणली गेली, तेव्हापासून तर जतीनची ही लढाऊ प्रवृत्ती अधिकच ठळकपणे सामोरी येऊ लागली आहे.
एका सर्वसामान्य गुजराती कुटुंबातून आलेल्या जतीनवर हे लढाऊ बाण्याचे आणि तेही गांधीवादाच्या अहिंसक लढाऊ बाण्याचे संस्कार नेमके झाले तरी कसे? तर जतीनची आईच त्या काळात गांधीवादाने प्रभावित झालेली होती आणि ती स्वातंत्र्याच्या आंदोलनातील प्रभातफेऱ्यांमध्ये त्या तरुण वयात सहभागीही होत असे. देसाई कुटुंबच अगदी साधंसिधं मध्यमवर्गीय कुटुंब होतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
जतीनचं पहिली ते चौथी असं शिक्षणही मुंबई महापालिकेच्या शाळेत झालं होतं. पुढे जतीन सोमैया महाविद्यालयात गेला आणि तिथे राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच ‘एनएसएस’ या उपक्रमाशी जोडला गेला. त्या महाविद्यालयातील ‘एनएसएस’चं युनिट हे डहाणू-घोलवड परिसरातील आदिवासींसाठी काही काम करत असे. त्यामुळे जतीनच्या या भागातील फेऱ्या वाढल्या. त्या भागात त्यापूर्वीच गोदावरीबाई परुळेकर यांच्यामुळे डाव्या विचारांचं वारं फैलावलं होतं आणि जतीनच्या वैचारिक तसंच मानसिक जडणघडणीला अगदी पोषक असंच ते पर्यावरण होतं. त्यानंतर जतीनने अनेक महिने त्या भागातच राहणं पसंत केलं. तळागाळातील, समाजाच्या शेवटच्या पातळीवरील माणसाशी जतीनची नाळ त्याआधीच आईवरच्या गांधीवादाच्या प्रभावामुळे जुडलेली होतीच. डहाणू-घोलवड परिसरात केलेल्या ‘एनएसए’च्या कामांमुळे ते नातं अधिक घनिष्ट झालं होतं.
अर्थात, १९७०चं ते अस्वस्थ दशक कोणत्याही संवेदनशील तरुणाला विचार करायला लावणारं जसं होतं, त्याचबरोबर प्रवाहाबाहेर जाऊन काही तरी वेगळं करायची उमेद देणारंही होतं. त्याच दशकात कुमार शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली काही उच्चविद्याविभूषित युवक थेट धुळे जिल्ह्यातील शहादा परिसरात आपलं सुखवस्तू आयुष्य वाऱ्यावर सोडून राहायला गेले होते. त्या भागातील आदिवासींना नवा प्रकाश, नवं जग दाखवण्याची ईर्ष्या या तरुणांच्या मनात होती. त्याच वेळी इकडे राज्याच्या तुलनेने विकसित भागात मेडिकल कॉलेजच्या देणगी प्रवेशाच्या मुद्द्यावरून काही तरुण आंदोलन उभं करू पाहत होते. त्यात कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, अनिल अवचट प्रभृतींचा पुढाकार होता. नेमक्या त्याच सुमारास गुजरातेतील भ्रष्ट राजवटीच्या विरोधात नवनिर्माण आंदोलन सुरू झालं होतं.
जतीन हे सारं बघत होता आणि या पार्श्वभूमीवर त्याने एम. ए. करायचं ठरवलं. मुंबई विद्यापीठात तेव्हा एका वेगळ्याच पद्धतीने एम. ए. करण्याची सोय होती आणि त्या योजनेचं नाव होतं – ‘कंकरन्ट स्टडीज अॅण्ड सर्व्हिस प्रोजेक्ट’. याचा अर्थ तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात सामाजिक कामही करत राहायचं आणि ते काम हेच तुमच्या परीक्षेचा एक भाग समजलं जायचं. जतीनसारख्या चळवळ्या आणि धडपड्या मुलांसाठी ती एक मोठीच सोय होती. जतीनने अर्थातच तोच डहाणू-घोलवड परिसर आपल्या प्रोजेक्टसाठी निवडला. त्या आदिवासी भागात मग जतीन सहा महिने राहत होता, पण एकाच वेळी अनेक विषयांमध्ये लक्ष घालण्याच्या प्रवृत्तीमुळे जतीनचं एम. ए. ला प्रत्यक्ष प्रवेश घेणंच राहून गेलं. आश्चर्याची बाब म्हणजे त्यास कारणीभूत होते जतीनच्या जीवनात अत्यंत आदराचं स्थान असलेले लोकनायक जयप्रकाश नारायण!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तेव्हा जयप्रकाशांच्या विचारांनी प्रेरित होऊन काही तरुणांनी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ची स्थापना केली होती. जतीन त्या वाहिनीचा सैनिक झाला, यात नवल ते काहीच नव्हतं. पण जतीनने ती जबाबदारी पूर्णवेळ कार्यकर्ता, म्हणजेच ‘फुलटायमर’ म्हणून स्वीकारली. तेव्हा फुलटायमरला काही मानधन वगैरे सोडाच, साधा प्रवासखर्चही देण्याचा रिवाज नव्हता. कार्यकर्त्यांनीच संघटनेसाठी पैसे जमा करायचे आणि त्यातून प्रवास आणि अन्य खर्च भागवायचा अशी पद्धत होती. अगदी वाहिनीच्या बैठकीसाठी पाटण्याला जायचं असेल, तरी पैसे जतीनलाच गोळा करावे लागत असत. या प्रकाराने कोणीही कंटाळून जाणं साहजिकच होतं. तरीही जतीन जोमाने काम करत होता. तो आता तलासरी भागात काम करू लागला होता. डोळ्यापुढे संपूर्ण क्रांतीची स्वप्नं होती आणि ओठावर गीत होतं – ‘जयप्रकाश का बिगुल बजा तो; जाग उठी तरुणाई हैं…’ पण जनता सरकार कोसळलं.. मग जनता पक्षही फुटला आणि क्रांतीची स्वप्नंही बघता बघता दूरदेशी उडून गेली.
आता टीचभर पोटाची खळगी भागवण्यासाठी काही तरी करायला हवं, असा साक्षात्कार अखेर जतीनला झाला आणि त्यानं ‘संघर्ष वाहिनी’ला रामराम ठोकून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. स्वयंसेवी संघटनांमधून सामाजिक काम करणाऱ्यांना नोकरी एकच करता येणं शक्य असे आणि ती नोकरी पत्रकारितेची असे! अखेर रमेश ओझा या ‘संघर्ष वाहिनी’च्याच एका कार्यकर्त्याच्या ओळखीने जतीन वार्ताहर म्हणून ‘गुजरात समाचार’मध्ये रुजू झाला. ते साल होतं १९८५. एका अर्थाने हाच जतीनच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ म्हणावा लागेल. ‘गुजरात समाचार’मध्ये वर्ष-सव्वा वर्ष काढून तो ‘जन्मभूमी’मध्ये दाखल झाला. मात्र तिथेही त्याची कार्यकर्तागिरी सुरूच होती.
खरं तर ते दिवस पत्रकारांसाठी सुगीचे म्हणावेत, असेच दिवस होते. संपादक तसंच पत्रकार यांना त्या काळात पूर्ण स्वातंत्र्य होतं. तरीही पत्रकारांनी उठून रस्त्यावर यावं, अशा घटना घडतच. त्याच काळात मग पत्रकारांच्या ‘न्याय्य’ हक्कांसाठी लढणाऱ्या ‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट’ या संघटनेत काम करणं आणि पुढे त्या संघटनेचं चार वर्षं अध्यक्ष राहणं, हा जतीनच्या स्वभावाचाच एक भाग होता. ‘जन्मभूमी’त दहा वर्षं झाली आणि तेव्हा खलीद अन्सारी यांनी ‘गुजराती मिड-डे’ लाँच केला. तेव्हा मग जतीनला बोलावण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच, त्याने आपल्या तटस्थ आणि त्याच वेळी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून केलेल्या बातमीदारीमुळे, उरला नव्हता. जवळपास एक तप त्याने ‘गुजराती मिड-डे’मध्ये विविध पदांवर काम केलं. मात्र, तोपावेतो जतीनचा ‘पाकड्या जतीन’ व्हायचा होता! ती तर एक फारच मोठी कहाणी आहे.
आज तुम्ही-आम्ही जतीनला वेगवेगळ्या चॅनेलवर बोलताना बघतो. त्याचे वेगवेगळ्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाइटवरचे लेख वाचत असतो. त्यातून त्याचा कायम पाकिस्तानविषयीचा सामंजस्याचा तसंच सहानुभूतीचा सूर प्रगट होत असतो. जतीनच्या पाकवाऱ्यांविषयी तर अनेक दंतकथा सर्वत्र पसरलेल्या आहेत. मुस्लिमांविषयी तर जतीनच्या मनात एक ओलाव्याचा धागाच आहे. त्यामुळेच अगदी अलीकडल्या काळापर्यंत जतीनची संभावना काही वेळा एका विशिष्ट वर्तमानपत्रांतून तसेच काही कुत्सित जनांकडून ‘पाकड्या जतीन’ अशी केली जाते... आणि सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगही भरपूर होतं. तर हा असा जतीन पाकिस्तानला पहिल्यांदा गेला तरी कधी?
२००१च्या आसपास नागपूरला ‘पाकिस्तान-इंडिया फोरम फॉर पीस अॅण्ड डेमोक्रसी’ या संस्थेची एक बैठक होती. तिथं त्याला माधव साठे हा त्याचा समाजवादी मित्र घेऊन गेला. तिथंच त्याची गाठ विजया चौहान, नीरा आडारकर आदींशी पडली. हा जतीनच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉइंट. त्यांच्या संपर्कातूनच २००३मध्ये जतीन पहिल्यांदा पाकिस्तानला गेला. तेव्हा भारत-पाकिस्तान अशी थेट विमानसेवाही नव्हती. त्यामुळे जतीन दिल्लीहून दुबईला आणि दुबईतून पाकिस्तानात गेला... पुढे जतीनच्या लक्षात आलं की, भारत-पाक संबंध सुधारायचे असतील तर केवळ दिवाणखानी गप्पांमधून काही होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष झडझडून काम करावं लागेल आणि एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की, गप्प बसेल तर तो जतीन कसला. मग त्याच्या लक्षात आलं की, सौराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मच्छीमार अनवधानाने सागरी सीमा ओलांडतात आणि पाकिस्तानच्या जाळ्यात सापडून तेथील तुरुंगात खितपत पडतात. तीच गोष्ट पाक मच्छीमारांबाबतही होते. मग या मच्छीमारांच्या सुटकेसाठी जतीनने प्रयत्न सुरू केले. त्याच ‘पाकिस्तान-इंडिया फोरम फॉर पीस अॅण्ड डेमोक्रसी’ या संस्थेच्या भारतीय चॅप्टरचा मग तो सरचिटणीसही झाला.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
या संस्थेचं मुख्य काम हे जनमत तयार करणं तर होतंच; शिवाय भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सरकारांकडून काही चांगली कामं करून घेण्यासाठी दबावगट निर्माण करणं, हेही होतं आणि आहेही. या संस्थेची मच्छीमारांसंबंधातील मुख्य मागणी ही ‘नो अॅरेस्ट पॉलिसी’ची असावी. हे दोन्ही देश सागरी सीमारेषा ओलांडून आपल्या हद्दीत आलेल्या मच्छीमारांना थेट अटक करून तुरुंगात पाठवून देतात आणि मग काही महिनेच काय, तर काही वर्षं त्यांना तिथंच खितपत पडावं लागतं. त्याऐवजी अशी सीमारेषा ओलांडणाऱ्यांना त्या त्या देशांच्या सीमारक्षकांनी त्यांना आपापल्या देशांच्या हद्दीत परत पाठवून द्यावं, यासाठी जतीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रदीर्घ मेहनत घेतली. जनमत तयार करण्याबरोबरच दोन्ही देशांच्या सरकारांशी पत्रव्यवहारही केला. मात्र, अजूनही इतकी साधी गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. मच्छीमार अशा रीतीने पकडला गेला की, त्याच्या कुटुंबाची पुरती वाताहत होते. त्यामुळे १४-१४ ऑगस्ट २०२० या, दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून त्यासाठी इम्रान खान तसंच नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांना समाजातील मान्यवरांची निवेदनं देण्यात आली. त्या कामातही जतीनचा पुढाकार होता.
आणखी एक मुद्दा. एकदा घरातला हा कमावणारा माणूस तुरुंगात जाऊन पडला की, घरातल्या मुलग्यांपेक्षा मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. कर्ता पुरुष तुरुंगात जाऊन पडला की, पहिल्यांदा मुलींच्या शाळेवर गदा येते. हा सरळ सरळ मुलींवर होणारा अन्याय आहे. त्याबाबत अशा कुटुंबियांना घराघरांत जाऊन, समजावून सांगण्याचं कामही जतीन आणि त्याचे सहकारी करत आले आहेत.
मात्र, एका महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नावर जतीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली मेहनत फळास आली आहे. एखादा मच्छिमार पकडला गेला की, त्याच्या कुटुंबास प्रतिदिन १५० म्हणजे दरमहा साडेचार हजार रुपये आपलं सरकार देत असे. ही रक्कम अगदीच तुटपुंजी होती. आता या संघटनेच्या प्रयत्नामुळे ही रक्कम दुपटीने वाढवून प्रतिदिन ३०० रुपये देण्यात येऊ लागले आहेत. पाकिस्तानसंबंधात हे काम करताना, सार्क राष्ट्रांमधील अशाच संघटना आणि कार्यकर्ते यांच्याशी जतीनचा मैत्रभाव वाढत गेला आणि आज तो त्यासंबंधातील एक ‘ऑथॉरिटी’ समजला जातो.
अफगाणिस्तानातील महिला कार्यकर्त्यांशी त्याचा अनेकदा संवाद होऊ लागला. अफगाणिस्तानातील विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक युवती मायदेशी परतल्या आहेत. एकदा काबूल येथील एका कार्यशाळेला तो उपस्थित होता. भारत-पाक तसेच अफगाणिस्तान या तीन देशांमधील परस्पर- नातेसंबंधांबाबत तो बोलत होता. तेव्हा त्याने या युवतींना ‘तुम्ही मायदेशी परतता का?’ असा थेट प्रश्न विचारला. कारण अस्थिरता तसंच सुरक्षा असे दोन प्रमुख मुद्दे असतानाही या युवतींचं मायदेशाविषयीचं प्रेम कमी का झालेलं नाही, हा जतीनला कायम पडणारा प्रश्न होता. तेव्हा त्या युवतींनी दिलेलं उत्तर हे सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारं होतं. ‘आम्हाला आमचा समाज बदलायचा आहे आणि त्यासाठी आम्ही परत आलो आहोत,’ असा खणखणीत जवाब त्या युवतींनी जतीनला दिला होता.
नेपाळ या आणखी एका शेजारी देशाशीही जतीनची नाळ अशीच जुडलेली आहे. २०१५मध्ये तिथे घटनादुरुस्ती होऊ घातली होती आणि त्यात आपल्यावर अन्याय होतोय, असा तेथील मधेशी समाजाचा दावा होता. त्यामुळे या समाजाने नेपाळची आर्थिक नाकेबंदी केली होती. हे ‘इकॉनॉमिक ब्लॉकेड’ प्रदीर्घ काळ सुरू राहिलं. तेव्हा ‘सहर’ (साऊथ एशियन फोरम फॉर ह्युमन राइट्स) या संघटनेतर्फे त्यासंबंधात अभ्यास करून एक तपशीलवार अहवाल तयार करण्याच्या कामातही जतीनचा सहभाग होता. ‘सार्क’ राष्ट्रांचं सचिवालयही नेपाळमध्येच आहे. तेव्हा हा अहवाल नेपाळ सरकारबरोबरच या सचिवालयालाही सादर करण्यात आला होता आणि त्याचं कौतुकही झालं होतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
खरं तर सौराष्ट्रात आणि विशेषत: पोरबंदर परिसरात एकदा त्याच्याबरोबर जाण्याचा योग आला, तेव्हा तेथील घराघरांत ‘जतीनभाई’ अशी ओळख असलेल्या एका नव्याच जतीनशी गाठ पडली होती. खरं तर जतीन मासे खातदेखील नाही, तरी या किनारपट्टीवरील मच्छिमार कुटुंबियांना तो माशांइतकाच प्रिय आहे. ही आणखी एक गंमत!
पण पुढे जतीनने आपलं काम केवळ मच्छिमारांपुरतं मर्यादित ठेवलं नाही. भानुदास कराळे असोत, की नुकताच पाक तुरुंगातून सुटून आलेला हमीद अन्सारी असो - निव्वळ गैरसमजुतीपायी पाकमध्ये अडकून पडलेल्या अनेकांच्या सुटकेसाठी दिल्लीत - मग सरकार कोणाचंही असो - जतीन खेट्या घालत असतो आणि तेही स्वत:च्या खिशाला तोशीस लावून. त्यासाठीच त्याने २००८मध्ये ‘गुजराती मिड-डे’ची नोकरीही सोडली आणि तेव्हापासून तो ‘पाकड्या जतीन’ झाला. त्याचे निकटचे मित्रही त्याबद्दल त्याची अनेकदा टवाळी करतात. मात्र, त्याची त्याला पर्वा नसते; कारण त्याची आपल्या कामावर आणि विचारांवर अव्यभिचारी निष्ठा आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात खऱ्या अर्थाने सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झालेले त्याला कधी तरी बघायला मिळतील का? तसं व्हावं यासाठी त्याला त्याच्या जगभरात पसरलेल्या मित्रपरिवारातर्फे शुभेच्छा!
..................................................................................................................................................................
प्रकाश अकोलकर
akolkar.prakash@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment