महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिकाचे २०२० सालचे साहित्य व समाजकार्यासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. यंदाचा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू यांना जाहीर झाला आहे. करोनामुळे यंदा पुरस्कार प्रदान सोहळा जाहीर कार्यक्रमाच्या स्वरूपात होणार नसला तरी या पुरस्कारांची माहिती देणारी स्मरणिका फाउंडेशनतर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातील खातूंविषयीचा हा लेख...
..................................................................................................................................................................
I have a Dream... मार्टीन ल्युथर किंगचं ते भाषण सहा दशकं जगावर प्रभाव ठेवून आहे. स्वप्न कुणाला नसतं? शिक्षण, करिअर, नोकरी, धंदा, कौटुंबिक विकास हे तर आम आदमीचं स्वप्न आणि त्यासाठीच धडपड. पण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या समाजव्यवस्थेचं स्वप्न पाहणारे, त्यासाठी झोकून प्रयत्न करणारे खरे परिवर्तनाचे दूत असतात. परिवर्तनाच्या चळवळींतील असाच चैतन्यदायी दूत म्हणजे गजानन खातू!
गेली सहा दशकं खातूभाई परिवर्तनाच्या चळवळीत सक्रीय आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात औद्योगिक विकास सुरू झाला आणि समाजसुधारणांचे वारेही वाहू लागले. प्रत्येकाच्या आशाआकांक्षा वाढल्या होत्या. दलित-शोषित, अल्पसंख्य, महिला यांचे प्रश्न पुढे ऐरणीवर आले. जात-वर्गव्यवस्थेविरुद्ध आवाज उठू लागला. साहित्य-कला-आविष्कार यांतून नवे हुंकार प्रकट होऊ लागले. यातूनच सामाजिक परिवर्तनाची लढाई जोम धरू लागली. जमीनदारी, दलित-महिला अत्याचार यांविरुद्ध संघटना सक्रिय झाल्या. आंदोलनं सुरू झाली. राजकारणातल्या साचेबंदपणाला आव्हान मिळत गेलं. समाजातील सर्वच थरांतील कार्यकर्ते या आंदोलनात झोकून देत उतरले. काहींनी प्रभावीपणे संघटनांची बांधणी केली, काही नेतृत्व करते झाले. तर या नव्या हुंकाराला व्यापक दिशा देण्यासाठी काहींनी शांतपणे होकायंत्राचं काम केलं. विचारांची रसद पुरवत आंदोलन कसं टिपेला न्यावं, प्राप्त परिस्थितीत काय स्ट्रॅटेजी करावी, हे सांगणाऱ्या मोजक्या माणसांत खातूभाईंनी आजवर निभावलेली भूमिका महत्त्वाची होती.
खातूभाईंच्या सामाजिक कामाची सुरुवात झाली ती राष्ट्र सेवा दल या संघटनेतून. ना. सू. हर्डीकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाभावी कामासाठी सुरू केलेल्या या संघटनेला साने गुरुजी, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे, मधू लिमये अशांनी ठोस वैचारिक अधिष्ठान दिलं. पुढे परिवर्तनातील अनेक लढ्यांना आणि नेतृत्वाला या चळवळीने घडवलं. खातूभाई याच मुशीतून घडले.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
विचाराधिष्ठित परिवर्तनाचं स्वप्न पाहणारा माणूस कधी स्वस्थ बसत नसतो. ‘क्राम्प्टन’मधील आपली नोकरी सोडून खातूभाई ‘अपना बाजार’च्या सहकार चळवळीत उतरले. श्रमिकांनी सुरू केलेल्या ‘अपना बाजार’ची जनरल मॅनेजर म्हणून धुरा हातात घेतानाच ही चळवळ चहूबाजूंनी फोफावली. हे पहिलंच डिपार्टमेण्टल स्टोअर विस्तारू लागलं. अपना बाजारच्या शाखाही वाढत गेल्या. स्वच्छ, दर्जेदार धान्य आणि किफायतशीर किंमत याची सांगड घातली. प्रोसेसिंग उद्योगाला सुरुवात झाली. जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करत खातूभाईंनी अत्याधुनिकीकरण करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला. सहकारी दूध डेअऱ्यांनाही प्रसंगी चाप बसवला. अपना बाजारचा दबदबा तयार झाला. खातूभाईंनी लिहिलेल्या ‘अपना बाजारची गोष्ट’ या पुस्तकात (अक्षर प्रकाशन) या अद्भुत गोष्टी आहेत. अपना बाजारच्या या चळवळीतून खातूभाईंचं काम ‘अमूल’मॅन कुरियन वर्गिसच्या तोडीचं होऊ शकलं असतं, पण भाईंचंच एक सूत्र आड आलं. कोणत्याही संस्थेची मालकी आपल्या हाती असता कामा नये, ही त्यांची भूमिका. ऐन भरात असताना अपना बाजारचा कारभार नव्या पिढीच्या हाती सोपवत भाई नव्या परिवर्तनाच्या लढाईत सामील झाले.
खातूभाईंचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम तरुणाईसोबत स्वत:ला जोडून घेतात. Every good conversation starts with a good listener... असं म्हटलं जातं. खातूभाईंसोबत संवाद होतो तो त्यामुळेच. नीट ऐकायचं आणि नीट समजवायचं हे चळवळीत साधारण होत नसतं. खातूभाई मात्र वेगळे आहेत. तरुणांच्या बाजूने ते कायम उभे राहिले आणि प्रसंगी जोखीमही पत्करलीय.
आणीबाणीत भाईंनी भूमिगत राहून चळवळीला मदत केली. समतेच्या लढाईत ते सातत्याने सक्रिय राहिले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं यासाठी संघर्ष सुरू झाला. नामांतराच्या या लढ्यात भाई उतरले. या लढ्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या. पुढे तुरुंगवासही भोगावा लागला. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळ ते विषमता निर्मूलन परिषद... या साऱ्या समताधिष्ठित चळवळीत खातूभाईंचा सहभाग लक्षणीय होता. विविध सामाजिक संघटनांत काम करणाऱ्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना अर्थसहाय्य व्हावं या हेतूने ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, बाबा आढाव आदींसोबत खांद्याला खांदा लावून खातूभाई उभे होते. निधी संकलनासाठी ‘लग्नाची बेडी’चे दौरे हे त्यांचं कसब होतं.
कामगार चळवळी, ट्रेड युनियन हा खातूभाईंचा जिव्हाळ्याचा विषय. १९८०पासून गिरणी कामगारांचा लढा सुरू झाला. गिरणी कामगार त्या संपात देशोधडीला लागले. त्यात डॉ. दत्ता सामंत यांची हत्या झाली. अशा निर्नायक स्थितीत हवालदिल झालेल्या कामगारांनीच हा लढा आपल्या हातात घेतला. दत्ता इस्वलकर आणि सहकाऱ्यांच्या पाठीशी खातूभाई उभे राहिले. कामगारांची अनोखी आंदोलनं असोत, की सरकारसोबतची बोलणी असोत - त्या सगळ्या स्ट्रॅटेजीत खातूभाई सोबत होते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
कामगारांना घरं मिळवून देईपर्यंत ते या संघर्षाचा भाग झाले होते. नर्मदा बचाव आंदोलनातही मेधाताई पाटकरांसोबत खातूभाई खांद्याला खांदा लावून उभे राहिले. उपोषण, धरणं असोत, की मिटिंगा - आंदोलन पुढे जाण्यासाठी खातूभाईंची मांडणी महत्त्वाची असायची. पर्यायी विकासाची मांडणी खातूभाईंकडून ऐकताना त्यातील लहानसहान कंगोरे लक्षात येतात. ‘विकास- विरोधी’ अशी टीका कायम आंदोलनावर झाली. मात्र त्याचा प्रतिवाद खातूभाई त्यांच्या शैलीत करतात. खूप लिखाण त्यांनी केलं. जागतिकीकरणाचा रेटा, त्याचे परिणाम यावरील त्यांच्या लेखांची तीन पुस्तकं प्रसिद्ध आहेत. अर्थकारणापेक्षा सामाजिक अंगाने या विषयाची केलेली उकल ही कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळाच आहे.
समाजवादी राजकारण जवळून अनुभवतानाच कुठल्याही गटबाजीत खातूभाई अडकले नाहीत. मात्र जिथे शक्य तिथे अजेंडा मांडत राहिले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील आम आदमी पक्षाचे खातूभाई मार्गदर्शक होते. राजकारणाचा गंध नसलेले अनेक तरुण नव्या आशेने त्यात उतरले होते. त्यांना दिशा देण्याचं काम खातूभाई करत होते. पक्ष आणि नेतृत्वाच्या मर्यादा माहीत असतानाही खातूभाई या तरुणांसोबत संवाद करत त्यांना नवा दृठिकोन देत होते. ते सगळे तरुण आजही खातूभाईंना विसरलेले नाहीत.
खातूभाईंना इतिहासापेक्षा भविष्याचा वेध घेणं अधिक आवडतं. ते त्यात रमतात. नव्या गोष्टी मांडतात. नव्या तंत्रात झपाट्याने अपग्रेडेशन होत असतं. माणसानेही अपग्रेड कसं राहावं हे खातूभाईंकडून शिकावं. थ्रीडी प्रिंटरवर दहा वर्षांपासून खातूभाई लिहितायत. थ्रीडी प्रिंटरने मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कसे बदल होणार, याचा वेध घेणारे त्यांचे लेख काहींना अनाकलनीय वाटले. मात्र नव्या मीडियातल्या तरुणांनी खातूभाईंशी दोस्ती केली. सेवा दलाला तरुणांच्या सहभागाने अधिक व्यापक करण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. त्या काळात त्यांनी आयोजित केलेले देशभरातील तरुणांचे आंतरभारती मेळावे आजही स्मरणात आहेत. खातूभाई आजवर एकाही संघटनेचे कधी अध्यक्ष झाले नाहीत.
खातूभाईंचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील काम कायम दुर्लक्षित राहिलंय. राष्ट्र सेवा दलाला इंटरनॅशनल फाल्कन मूव्हमेंटसोबत जोडून घेण्यात खातूभाईंचा पुढाकार होता. तरुणांत लोकशाहीवाद रुजवणं यासाठी फाल्कन चळवळीमार्फत प्रयत्न केले जातात. जगभरच्या तरुणांना तिथल्या शिबिरांत, परिषदांत आमंत्रित केलं जातं. सेवा दलाची अनेक मुलं या शिबिरांत सहभागी झाली होती. मात्र त्यासाठी सर्कस करावी लागली. युरोपीय देश स्वातंत्र्य आणि समतेबाबत आग्रही असतात. लोकशाही प्रक्रियेने चालणाऱ्या संघटनांनाच तिथे जोडून घेतलं जातं. पोषाखी संस्था चालत नाही. सेवा दलात दलप्रमुख हे पद होतं. मग अध्यक्षपद निर्माण झालं. त्यासाठी घटनाबदल झाला तो खातूभाईंच्या हस्तक्षेपाने. असा सेवा दलाचा आंतरराष्ट्रीय सहभाग सुरू झाला.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
'Another world is possible' असा नारा देत World Social Forumची भव्य परिषद जानेवारी २००४साली गोरेगावला भरली होती. सुमारे ७० देशांतील प्रतिनिधींसह ५ लाख लोकांचा सहभाग यांत होता. याआधी अशी परिषद झाली नव्हती आणि होणार नाही. खातूभाई WSF Indiaचे विश्वस्त होते. या आयोजनात खातूभाईंचं महत्त्व अधोरेखित झालं. खातूभाई नियमित येऊन आढावा घेऊन सूचना द्यायचे. त्यांच्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे इथला गिरणी कामगार, श्रमिक आणि लोक सहभाग या परिषदेला लाभला. दुसरं म्हणजे अति डावे आणि समाजवादी, आयटक ते एचएमकेपी पर्यंत इतर सर्व संस्थांची नीट मोट बांधण्याचं काम खातूभाईंमुळे शक्य झालं. तात्त्विक, विवेकी भूमिका घेऊन सगळे वाद ते मिटवायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक खर्चावरील नियंत्रण त्यांच्या हातात होतं. इतकी भव्य परिषद पार पडली, मात्र वायफळ खर्च न होता पैसा शिल्लक राहिला. हे आश्चर्यकारक होतं. हा ताळेबंद इंटरनॅशनल कौन्सिलमध्ये आजही चर्चेचा विषय ठरत असतो, असं WSF आयोजनातील विश्वस्त मिनार पिंपळे सांगतात.
‘स्वप्नांच्या शोधात महाराष्ट्र’ (सहित प्रकाशन) या पुस्तकात खातूभाई लिहितात – “स्वप्न न पाहणारी व्यक्ती किंवा समाज प्रगती करू शकत नाही. हिमालयाचं शिखर पादाक्रांत करण्याचं आणि चंद्रावर पाऊल टाकायचंही स्वप्नच होतं. पण असं भव्यदिव्य अशक्यप्राय स्वप्न पाहिलं म्हणून ते कधीतरी प्रत्यक्षात आलं. महाराठ्रानेही गरिबी-कुपोषणविरहित संपन्न शेतकरी वर्ग, सर्वांना रोजगार, अन्न- वस्त्र- निवारा- शिक्षण-आरोग्य, समतेसह समृद्धी, निसर्गसंवादी जीवन, समाजाला परिपूर्णतेचं समाधान देणारा समाज निर्माण करण्याचं स्वप्न का पाहू नये?”
खातूभाईंचं सगळं काम तसं दृश्य स्वरूपात नाही. पण त्यांच्यासोबत या सगळ्याची निस्सीम अनुभूती येते. ते मोठा विचार मांडतात. आपल्यालाही प्रेरणा देतात. स्वप्नं पाहतानाच ती जगायलाही मदत करतात. याचंच एक उदाहरण म्हणजे रायगडमधलं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक! साने गुरुजींना मातृहृदयी म्हणत ‘श्यामची आई’भोवतीच त्यांची प्रतिमा मांडली गेलीय. या प्रतिमाभंजनासाठी खातूभाईंनी एक वेगळंच स्वप्न पाहिलं. १९९९ साली साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा संकल्प खातूभाईंनी मांडला. या स्मारकासाठी सरकारकडे जागा, पैसे काही न मागता स्मारकाचा हा ध्यास घेत खातूभाईंनी सगळी संकल्पना मांडली. महाराठ्रातील शाळांतून निधी गोळा होऊ लागला. विद्यार्थी-लोक सहभागातून हे स्मारक उभं राहिलं. त्या वेळी पाचदहा रुपयांचा निधी देणारे विद्यार्थी आता स्मारकावर येतात. त्या यादीतील आपलं नाव बायको-मुलांना दाखवताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
दापोलीतील साने गुरुजींच्या जन्मस्थळापासून जवळच माणगावमध्ये ३६ एकर जागेवरील हे स्मारक अनेकांगांनी मानबिन्दू ठरत आहे. विपुल लेखन करणारे धर्मचिकित्सक साने गुरुजी, जातिअंतासाठी प्राण पणाला लावणारे, शेतकरी-कामकऱ्यांचं आंदोलन टोकाला नेत यशस्वी करणारे लढवय्ये साने गुरुजी या स्मारकातून लोकांना भेटतायत. पुतळा नसलेलं, पण नवचैतन्याने सळसळणारं हे एकमेव स्मारक! कुणाचीही मालकी, वर्चस्व नसलेलं हे एकमात्र स्मारक. हे खातूभाईंचं व्हिजन!
साने गुरुजींनी बलशाली भारताचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. स्वातंत्र्यलढ्यापासून ते सामाजिक चळवळींपर्यंत सर्व लढे गुरुजींनी यशस्वी केले. पण प्रत्येक ठिकाणी नव्या नेतृत्वाकडे कार्यभार सोपवून गुरुजी पुढच्या लढ्यासाठी सज्ज झाले. तेच सूत्र खातूभाईंनी अंगीकारलंय. अमर्याद पदं भूषवत बसण्यापेक्षा नवी माणसं जोडावीत, नवा विचार समजून घ्यावा, प्रश्नांना भिडत जावं, नव्याने मांडणी करावी, नवी माध्यमं अंगीकारावीत ही त्यांची खासियत. म्हणूनच खातूभाई स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा पत्ता असतात. खातूभाईंसोबतचा सहवास म्हणजे नदीचं प्रवाहीपण, सागराची खोली, डोंगराची उंची, पहाटेचा सूर्योदय, वाहता ताजा वारा...
खातूभाईंचं मन:पूर्वक अभिनंदन!
चैतन्यदायी विचारांचा हा प्रवाह खळखळत राहो, ही मनोकामना !!!
..................................................................................................................................................................
युवराज मोहिते
mohiteyuvraj1gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment