१.
बुधवार, २५ मार्च २०२०च्या दुपारी अॅटलांटात ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो आणि अचानक आमच्या HRकडून अगदी छोटीशीच परंतु ठळक अक्षरातली इमेल आली – ‘‘Covid-१९मुळे कंपनीने खबरदारी म्हणून सोमवारपासून सगळ्यांनी घरून ऑनलाईन काम करावे असे ठरवले आहे. तुमचा लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे वगैरे घरी घेऊन जावे. अर्थात काही विसरलात तर उद्या ऑफिस उघडे असेल. आपण साधारण याच पद्धतीने सुमारे पाच-सहा आठवडे कामकाज करणार आहोत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने ऑफिसात परत कसे बोलवायचे याच्या सूचना देण्यात येईल. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सहकार्याबद्दल आभार.”
दोन तासांतच गरजेच्या वस्तू घेऊन आम्ही सर्वांनी गाशा गुंडाळला. घरी येतो तर बायको आणि दोन्ही मुलं आधीच घरी पोचलेली होती, कारण त्या तिघांनाही त्याच दिवशी ऑनलाईन काम करण्याचे आदेश मिळाले होते! अर्थात हे काही अगदीच अनपेक्षित नव्हतं, कारण त्याआधी दोन-तीन आठवड्यांपासून युरोप, न्यूयॉर्क इथली गंभीर परिस्थिती टीव्हीवरून दिसतच होती. त्या दिवशी मात्र कळून चुकलं की, करोनाने आपल्या दैनंदिन जीवनावर अतिक्रमण केलंय!
आणि आज २६ मार्च २०२१... गेल्या वर्षभरात आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कसा आमूलाग्र बदल झाला, साध्यासाध्या गोष्टी करायला व मिळायला कसा त्रास होऊ लागला, किंवा जगण्या-वागण्यावर जी बंधनं आली, याची उजळणी मी करायची गरज नाही. एव्हाना आपल्या सर्वांनाच कळून चुकलंय की, हे संकट किती महाभयंकर होतं आणि ते आणखी खूप रेंगाळू शकतं. आणि खरं सांगाल तर अशा प्रकारच्या आपत्तीत जगातल्या कोणत्याही सरकारकडे रामबाण उपाय असूच शकत नाही. तेव्हा सरकार, प्रशासन, समाजसेवी मंडळी यथामती-यथाशक्ती जे जे प्रयत्न करत आहेत, त्यांचं आपण कौतुक करायला हवं. किमान आखून दिलेले नियम पाळून शक्य तेवढी साथ द्यायला हवी. कारण ज्या देशांनी सारासार विचार करून लोकहिताचे (म्हणजे अवघड आणि अप्रिय!) निर्णय घेतले आणि मुख्य म्हणजे जिथे त्यांना लोकांची व माध्यमांची स्वयंस्फूर्त साथ मिळाली, तिथे करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. अर्थात आपण जर दिवाणखान्यात बसून फक्त चर्चांमधे भाग घेतला तरी हरकत नाही, परंतु त्यानं करोनाचं काहीच बिघडत नाही, आपलं मनस्वास्थ मात्र बिघडेल!
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
माध्यमांवरून आठवलं, मला वाटतं वृत्तपत्रं-मासिकं ही अजूनही सर्वांत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. अगदी लहान असल्यापासून मी वृत्तपत्रं वाचतोय आणि त्यांच्या आकर्षक पुरवण्या मला अजूनही आठवतात... ‘साहित्य-शास्त्र-मनोरंजन’ किंवा ‘रविवार पुरवणी’ अशी नावं असलेल्या! त्यात व्यक्तिचित्रं, प्रवासवर्णनं, चित्रपट-समीक्षा, पुस्तक-परीक्षणं आणि चिंतनपर लेख असा लालित्यपूर्ण मजकूर असे. अर्थात ती परंपरा अजूनही चालूच आहे. त्याचं कारण म्हणजे या पुरवण्या नेहमीच रोजच्या बातम्यांपलीकडे जाऊन वाचकाला काहीतरी वेगळं देतात आणि समाजाचं मनःस्वास्थ्य उत्तम ठेवायचा प्रयत्न करतात. मग मनाला एक प्रश्न पडला की, या विचित्र काळात आपण काही वेगळं केलं की, नुसत्याच दिवाणखान्यात बसून चर्चा झोडल्या? विचार केला की, हे निदान स्वतःशी पडताळून पाहावं आणि जमलं तर त्यावर लिहावं. तेव्हा ही काही रोजनिशी नव्हे, तर जमेल तेव्हा सहज म्हणून केलेल्या गोष्टींच्या (ज्या कदाचित इतरांनीही केल्या असतील!) नोंदी व निरीक्षणं आहेत. हेतू एकच, तो म्हणजे वाचकांना घरबसल्या एक विरंगुळा मिळावा व त्यांनाही स्वतःच्या आवडीचं काही करावंसं वाटावं. माझी ‘करोना विरंगुळा पुरवणी’ म्हणा ना हवं तर!
तर मंडळी, गेल्या मार्च अखेरीपासूनच आम्ही चौघंजण घरून आपापलं काम करायला लागलो. अर्थात त्या पूर्वीही कधीतरी ‘घरून काम’ करायची वेळ आली होती, परंतु तरी ५-६ आठवडे कसं होणार, हा प्रश्न आमच्या प्रत्येकाच्या मनात होताच. पण शेवटी माणूस हा सवयीचा गुलाम आहे, या उक्तीची प्रचिती आली आणि तीन-चार दिवसांतच सगळ्यांचं दिवसाचं एक रूटीन तयार झालं. कोणी डायनिंग टेबलवर तर कोणी झोपायच्या खोलीतच आपापलं कामाचं दुकान मांडलं! घरातला मुक्त वावर आणि एकमेकांना साधी हाक मारणं यावरही बंधनं आली, कारण कोणास ठाऊक कुणाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल नेमका चालू असायचा!
अर्थात संध्याकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत कामं संपवायचा शक्यतो प्रयत्न करत असू. मग संध्याकाळी आम्ही टीव्हीसमोर आणि मुलं त्यांच्या गेम्सवर मग्न. हे सगळं अंगवळणी पडलं खरं, पण साधारण ८-१० दिवसांनी प्रश्न पडला - असं किती दिवस चालायचं? शिवाय वीकेंडला काय करायचं? कोणाला भेटू शकत नाही आणि कोणाकडे जाऊ शकत नाही. बाहेर कुठे जायचं तरी नेहमीच्या बहुतांश जागा, मॉल्स बंद, आणि मोजकीच रेस्टॉरंट उघडी पण तीसुद्धा फक्त ‘take out’साठी!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मग बायकोनं एक शक्कल लढवली. अॅटलांटाहून जरा दूर गेलं की, खूप डोंगर-दऱ्या आणि वनराई आहे आणि त्यांचं संवर्धन व्हावं व लोकांना त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी राष्ट्रीय वनउद्यानांमध्ये बऱ्याच trails (आखलेल्या पायवाटा!) आहेत, हे आम्ही अधून-मधून अनुभवलं होतं. तिनं आम्हाला आदेशच दिला, “दर शनिवारी सकाळी आपल्या घरापासून साधारण एका तासावर असणारा कोणतातरी trail करायचा. अगदी मास्क घालून. परवा सकाळी ८ वाजता निघायचे आहे.” मुलांची कुरकुर सुरू झालीच, मग आम्ही छान क्लृप्ती केली. “ट्रेक करून परत येताना बाहेर कुठेतरी जेवण घेऊया.” बाहेरचं जेवण हे शब्द कानावर पडताच मुलांना काय होतं हे तुम्ही जाणताच. ती एकदम तयार!
पहिल्याच शनिवारी आम्ही एक डोंगरातला ट्रेक केला, जवळजवळ साडेतीन मैल. परंतु चढ-उतार इतके होते की, काही ठिकाणी विश्रांतीसाठी तीन-चार मिनिटं चक्क थांबावं लागलं. मला त्या क्षणी लहानपणी अॅम्बॅसिडर गाडीने केलेल्या मुंबई-पुणे प्रवासाची आठवण झाली. घाटात एका विशिष्ट जागी त्या गाड्याही बॉनेट उघडून १०-१२ मिनिटे थांबवत! ट्रेक संपेपर्यंत अगदी घामाघूम होऊन गेलो आणि परतीच्या वाटेवर मुलांच्या आवडत्या पिझ्झावर सर्वांनी गाडीतच ताव मारला. विशेष म्हणजे जवळजवळ पुढचे ८-१० आठवडे हा प्रकल्प सुरू राहिला. कधी दरी-डोंगरातून तर कधी मोठ्या तळ्याकाठानं चालणं झालं. काही ठिकाणी नदीच्या पाण्याची खळखळ अनुभवता आली तर काही धबधबे. एक दोनदा अचानक आलेल्या पावसात चिंब भिजणंही झालं!
बराच विचार करून हे ट्रेक्स आखलेले असावेत. त्यामुळे मुद्दाम एखाद्या छानशा पुलाखालून किंवा धरणावरून ते आपल्याला पुढे नेतात. अशा अनेक ‘पॉइंट्स’वरनं निसर्ग जसा दिसतो, त्याचं वर्णन शब्दांत करणं शक्य नाही, ते अनुभवलंच पाहिजे. निसर्गाच्या इतक्या जवळ असताना मला बरेचदा ‘माझे जीवनगाणे’ गाण्याच्या ‘कधी ऐकतो गीत झऱ्यातुन, वंशवनाच्या कधी मनातुन, कधि वाऱ्यातुन, कधि ताऱ्यांतुन झुळझुळतात तराणे’ या ओळींची आठवण होत असे.
आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक ट्रेकच्या सुरुवातीला लावलेला नकाशा बघून सुरुवात करायचो. मग दर ५०-१०० फुटांवरच्या झाडांवर पांढऱ्या किंवा पिवळ्या खुणा आम्हाला मार्ग दाखवत. असं असलं तरी एक दोनदा मार्ग चुकलोच आणि ते लक्षात आल्यावर मुलांचे एकमेकांत ‘मी तुला मगाशीच सांगत होतो, तू किती मूर्ख आहेस’ वगैरे डायलॉग सुरू होत. पण फोनवर कुठली तरी APP बघत तीच दोघं आम्हाला पुन्हा योग्य वाटेवर आणत. मुलं जरा मोठी झाली की, हा एक फायदा असतो नाही का? इतरही काही अडचणी आल्या, तेव्हा जवळपासच्या वाटसरूंना विचारलं आणि बहुतेक वेळा पटकन व अचूक उत्तर मिळालं. तेव्हा ध्यानात आलं की, अरे आपण आज इथं पहिल्यांदा आलोय, पण ही मंडळी नेहमीच येत असावीत! पुढे जूनपर्यंत उकाडा वाढायला लागला होता. तोवर मुलंही त्यांच्या मित्रांबरोबर मैदानावर खेळायला जाऊ लागली आणि आम्ही दोघंही मंडळींबरोबर घराजवळच चालायला जाऊ लागलो होतो. त्यामुळे हा प्रकल्प स्थगित केला खरा, परंतु इतक्या वर्षांनी आम्ही चौघांनी उत्साहानं आणि नेटानं एकत्र काही वेगळं केलं याचंच अप्रूप वाटतं!
२.
हे झालं वीकेंडचं, शिवाय आठवड्यात दिवसाआड एखाद्या वेब सिरीजचा भाग बघणं, काही चित्रपट बघणं हे चालूच होतं. आपल्याकडल्या पंचायतराजवर आधारित हिंदी मालिका खूपच आवडली.
दिल्लीत राहणारा एक सुशिक्षित बेकार तरुण शेवटी एक बऱ्या पगाराची नोकरी मिळते म्हणून मित्राच्या समजावण्यावरून एका छोट्या गावात जातो. काहीशा अनिच्छेनेच जातो खरा, आणि काही दिवसांतच प्रचंड वैतागतो (एकटेपण, सुखसोयींचा अभाव, इ.). परंतु हळूहळू तिथलं संथ परंतु शांत आयुष्य, कुरघोडींचं स्थानिक राजकारण आणि लोकांचं एकमेकातलं चमत्कारिक वागणं याचं त्याला कुतूहल वाटू लागतं. आणि हे सारे लोक थोडेसे स्वार्थी असले तरी मुळात वाईट नाहीत आणि पंचायतीचा सेक्रेटरी या नात्याने आपण इथं कदाचित काही चांगल्या योजना राबवू शकू, अशी आशा त्याला वाटू लागते. आता ‘पंचायत’च्या दुसऱ्या हंगामाची आतुरतेनं वाट पाहत आहोत!
आणखी एक लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे ‘नाळ’. गावात राहणाऱ्या एका लहानग्या मुलाला ‘तू दत्तक आहेस, तुझे जन्मदाते पालक शहरात आहेत’ हे घरी आलेल्या शहरी पाहुण्याकडून अचानक कळतं. त्याच्या कोवळ्या मनावर त्याचा काय परिणाम होतो आणि तो पालकांबरोबर कसा तुटक वागू लागतो, याभोवती फिरणारा हा काहीसा ग्रामीण वळणाचा अतिशय सुंदर चित्रपट. सगळ्याच पात्रांचा अत्यंत सहज सुंदर अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन. सगळ्यांनी आवर्जून बघायलाच हवा हा चित्रपट.
याशिवाय अधूनमधून मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर ‘ZOOM’ भेटींचा रतीब सुरू होता. सगळ्यांचा वेळ चांगला जाई शिवाय काही उपयुक्त माहिती मिळे. पण असंही वाटून गेलं की, यात एकमेकांचे ‘हालहवाल’ विचारण्यापेक्षा स्वतःचे ‘हाल’ सांगायचा भाग जास्त असे! ते काहीही असो, हे मात्र नक्की की, कुणाला तरी भेटायची, निदान कुणाशी तरी बोलायची भूक मात्र सगळ्यांच्याच चेहऱ्यांवर जाणवे. या नव्या तंत्रज्ञानाला मानलंच पाहिजे. कारण त्यामुळेच तर आपण आपलं काम बहुतांशी करू शकतोय किंवा मित्रमंडळींशी अगदी समोर बसल्यासारखे गप्पा मारू शकतो आहोत. पुढे तीन-चार आठवड्यांनी मात्र बोलायचे विषयदेखील संपले आणि हे कॉल्स आपोआप बंद पडले. हे सारं काहीसं एखाद्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमासारखं आहे, तोचतोचपणा आला की, कार्यक्रम बंद पडतो. शेवटी आशय महत्त्वाचा!
असाच एकदा विचार करत बसलो होतो, तेव्हा जाणीव झाली की, आपण सध्या एका अर्थानं स्थानबद्धतेत आहोत, मग पूर्वी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगात काय बरं केलं असेल? तर भरपूर वाचलं असावं! अर्थात टिळक, सावरकर, नेहरू यांचं सर्वोत्कृष्ट लेखनही याच काळात झालं असं म्हणायला हरकत नाही. मग आठवण झाली ती डिसेंबर १९मध्ये भारतात गेलो असताना उत्साहानं खरेदी केलेल्या पण शेल्फवरच पडून असलेल्या पुस्तकांची! जणू हरवलेला खजिनाच पुन्हा सापडला. त्यानंतर संध्याकाळचा वेळ तर निवांत जाऊ लागलाच आणि बरीच पुस्तकंही वाचून झाली. त्यातल्या दोन-तीन पुस्तकांबद्दल थोडक्यात (खरं तर सविस्तर लिहायला हवं पण ते पुन्हा कधीतरी).
सर्वप्रथम ‘लता सुर-गाथा’ या हिंदीतल्या पुस्तकाबद्दल (६००हून अधिक पानांचा ग्रंथच तो!). खूप ऐकून होतो त्यामुळे ते घेतलं होतं. मी एकंदरीतच जुन्या गाण्यांचा चाहता व लताबाईंच्या गाण्यांचा निस्सीम भक्त. पण त्यांच्यावर लिहिलेलं एखादं पुस्तक मुद्दाम आणून कधी वाचलं नव्हतं. यतींद्र मिश्र हे हिंदीतील एक तरुण व अभ्यासू लेखक (त्यांनी बिस्मिल्ला खान, गिरीजा देवी यांचीही चरित्रं आधी लिहिलेली आहेत). त्यांना कल्पना सुचली की, लताबाईंच्या सांगीतिक प्रवासावर पुस्तक लिहावं. त्यानिमित्तानं लताबाईंची मुलाखत घ्यावी, ज्यायोगे त्यांची सुरुवातीची धडपड व पुढे बहरलेली प्रदीर्घ कारकीर्द याचे वाचकांना दर्शन होईल, आणि ओघानं हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णकाळावरही प्रकाश पडेल.
यात अडचण अशी की, यतींद्र राहतात अयोध्येत, शिवाय हे काही चार-पाच दिवसांत होणारं काम नाही. मग हा प्रश्न त्यांनी कसा सोडवला असेल? तर पुढची जवळजवळ चार-पाच वर्षं ते अयोध्येतून लताबाईंना ठरलेल्या वेळी फोन करत व त्यांच्या सांगीतिक गप्पा चालत! या गप्पा आणि मिश्र यांनी केलेल्या सखोल संशोधनाचं फलित म्हणजे हे पुस्तक. आणि पुस्तक हिंदीत असलं तरी भाषा सोपी आणि ओघवती. त्यामुळे लगेच वाचून झालं. हायस्कुलात तीन वर्षं हिंदी घेतलं होतं तेदेखील कुठेतरी कामी आलं असावं!
पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिल्या भाग हा एक शोधनिबंधच (२०० पानं!) आहे, ज्यात ‘लता’ची जडणघडण, तिच्या गायनाचा प्रवास व त्यांच्या पार्श्वगायनाचं रसग्रहण केलं आहे. विशेष म्हणजे हे नुसतेच स्तुतिपुराण नाही तर स्वत:चे निष्कर्षही लेखकानं मांडले आहेत.
दुसरा भाग म्हणजेच चार-पाच वर्षं चाललेली ती टेलिफोन मुलाखतमाला! यात त्यांनी लताबाईंना त्यांचे सहकारी, त्या वेळचे गीतकार-संगीतकार, स्टुडिओतलं वातावरण आणि इतर अनेक घटना अशा अनेक गोष्टींवर प्रश्न विचारलेले आहेत. बहुतेक प्रश्नांना लताबाईंनी सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. मदन मोहन, मुकेश, नौशाद यांच्याबद्दल त्या खूप आपुलकीनं बोलताना दिसतात. त्याचप्रमाणे सुमन कल्याणपूर, महंमद रफी, शंकर-जयकिशन यांच्याबद्दलही त्यांनी मोकळेपणाने उत्तरं दिलेली आहेत. बहुतेक सर्व मंडळींचं सांगीतिक मूल्यमापन त्या वस्तुनिष्ठ पद्धतीनं करताना दिसतात, आणि वेळोवेळी व्यावसायिक मतंही स्पष्टपणे मांडायला मागेपुढे पाहत नाहीत, परंतु एक मर्यादा पाळून.
अधूनमधून संभाषण थोडं हलकंफुलकं करण्यासाठी लेखक त्यांना ‘rapid-fire’ स्वरूपात ‘एक पर्याय निवडा’ स्वरूपाचे प्रश्न विचारतो. शिवाय कधी वैयक्तिक आवडी निवडीबाबतचे खुसखुशीत प्रश्न करतो. या दोन्ही प्रकारच्या गप्पांमध्ये त्या अधिकच खुलतात! आणि त्यातून अनेक गोष्टी समजतात. वानगीदाखल दोन तीन उदाहरणं. लंडनमधला पहिला शो हिट झाला, तेव्हा घातलेली साडी पुढच्या तीन-चार शोंना पुन्हा पुन्हा इस्त्री करून ‘good luck’साठी वापरली. किंवा मी कोणतंही गाणं उभं राहूनच गाते आणि गाताना माझ्या अगदी जवळ एक व्हायोलिन वादक हलकेच सूर देण्यासाठी असे. आवडती शहरं म्हणजे लंडन आणि मी जिथं मी कायमचीच रुळले आहे, ती मुंबई अशा अनेक गोष्टी कळतात.
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला कशाचं अप्रूप वाटेल हे सांगता येत नाही - रेडिओवर ‘आपकी फर्माइश’मध्ये गाणं ऐकवण्याआधी पत्र पाठवणाऱ्या श्रोत्याचं नाव सांगतात. सर्वांत प्रथम त्यांचं नाव रेडिओवर पुकारलं गेलं, ते एक श्रोता म्हणून (‘बेगम अख्तरचं एक गाणं ऐकवा’ हे पत्र लिहून कळवल्याबद्दल!), पुढचे दोन-तीन दिवस ही गोष्ट त्या सगळ्यांना सुटल्या होत्या. गंमत म्हणजे गेली ५० वर्षं तरी त्यांच्या शेकडो गाण्यांची फर्माइश रेडिओकडे दररोज होत असेल!
पुस्तकाचा तिसरा भाग छोटासाच आहे, पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा. कारण यात लताबाईंनी जवळजवळ सगळ्या महत्त्वपूर्ण सहकाऱ्यांबरोबरची आवडती गाणी निवडलेली आहेत. हे पुस्तक वाचून आपल्याला ‘लता’ या दैवी आवाजापलीकडच्या लताबाई तर भेटतातच, त्याचबरोबर पार्श्वसंगीताच्या दुनियेची सोनेरी सफरही होते! हे पुस्तक म्हणजे चोखंदळ सिनेसंगीत रसिकांसाठी एक अमूल्य ठेवा आहे.
इंग्रजी पुस्तकं मी फारशी वाचत नाही (खरं तर सारखे शब्द अडत राहतात आणि वाचनाची मजा जाते म्हणून!), परंतु इंग्रजीत प्रचंड वाचन असणाऱ्या माझ्या चुलत बहिणीनं मला ‘The Music Room’ हे नमिता देविदयाल यांनी लिहिलेलं पुस्तक आवर्जून सुचवलं होतं. एक आई आपल्या शाळकरी मुलीचा आवाज बरा आहे, याची जाणीव होऊन तिला प्रसिद्ध गायिका (कै.) धोंडुताई कुलकर्णी यांच्याकडे त्यांच्या छोट्याश्या खोलीवजा घरात घेऊन जाते. त्यांना तिचा आवाज आवडतो आणि त्या तिला गाणं शिकवायला तयार होतात. तिथून सुरू होते एका सांगीतिक नात्याची - ऋणानुबंधाची संवेदनशील कहाणी. ती लहान मुलगी म्हणजेच नमिता, ज्या आज उत्तम लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत, आणि ज्यांना धोंडुताई प्रेमानं एके काळी ‘my little केसर(बाई केरकर!)’ म्हणत!
शिकवणीतले बारकावे, कलाकारांचे मनस्वी स्वभाव आणि आपल्या गुरूची संगीतावरची आजन्म निष्ठा या साऱ्यावर लेखिकेनं मनापासून पण डोळसपणे लिहिलेलं आहे. एका गुणी पण काहीशा उपेक्षित शास्त्रीय गायिकेचं ते जणू चरित्रच आहे. लेखिकेनं धोंडुताईंबरोबर कार्यक्रमांच्या निमित्तानं केलेले प्रवास, गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितलेल्या कडू-गोड आठवणी हे सगळं जणू आपण समक्षच बसून ऐकतो आहोत, असा भास होतो. गंमत म्हणजे या सगळ्यातून लेखिकेला केसरबाईंबद्दल कुतूहल जागृत होतं आणि ती त्यांच्या कन्येला जाऊन भेटते - तिची मुलाखत घेते, ते प्रकरणही वाचण्यासारखं आहे. माझे ज्येष्ठ वाचकमित्र मला म्हणाले, ‘एखादं पुस्तक तुम्हाला पुढे खेचत नेतं.’ किती खरं आहे! ‘विंग्रजी’ असूनही अक्षरशः चार-पाच दिवसांत मी हे पुस्तक मी हातावेगळं केलं.
३.
सरतेशेवटी ‘रुचिरा’ या मराठमोळ्या पुस्तकाची गंमत.
आधी लिहिल्याप्रमाणे सोशल मीडियावर विशेषतः भारतातून (लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन वगैरेमुळे घरकामाची माणसं येत नसल्यानं) घरच्या परिस्थितीवर आलेली ‘संकटं’, स्वतःलाच करावं लागणारं ‘घरकाम’ यावर बऱ्याच तक्रारी - विनोद चालू होते. अर्थात पश्चिमेच्या देशात राहणाऱ्या आम्हा मंडळींना याची बरेच वर्षांपासून सवय आहे. परंतु हेही तितकंच खरं की, किचनमध्ये माझी मदत म्हणाल तर भांडी घासणं, कांदे-बटाटे चिरणं किंवा फारतर ऑम्लेट करणं, या पलीकडे फारशी नसते. तेव्हा बायकोला स्वयंपाकात मदत करून काहीतरी ‘भरीव’ योगदान करावं असं मी मनाशीच ठरवलं. नियम एकच, असा पदार्थ करायचा जो शक्यतो तिनं केलेला नसावा आणि सगळं संपूर्णपणे स्वतः करायचं.
तेव्हा आमच्या घरात २०-२५ वर्षांपासून असलेल्या ‘रुचिरा’ची आपोआप आठवण झाली! कमलाबाईंचं पुस्तक उपयुक्त ठरलंच, पण त्याचबरोबर ‘कृती’साठी YouTubeवरच्या अनेक ‘शेफ’ मंडळींचीही मदत झाली! आणि मी धिरडी-डोश्याचे वेगवेगळे प्रकार करायचा सपाटा लावला - मूग डोसा, गव्हाचं धिरडं, रवा डोसा आणि अगदी म्हैसूर डोसासुद्धा. शिवाय आपल्याकडे जो चमचमीत चीज-टोस्ट मिळतो तोदेखील.
पुढे विचार आला की, एखादी स्वीट-डिश का करू नये आणि पूर्वी कुठेतरी खाल्लेलं (आणि आवडलेलं!) पान-बहार आईस्क्रीम केलं. आधी हे प्रयोग घरच्यांवर केले आणि आश्चर्य म्हणजे हे सगळे पदार्थ त्यांना चक्क आवडले! त्यानंतर काही वेळा मित्रमंडळी भेटायला आली (म्हणजे मागच्या डेकवर गप्पा मारायला!) तर त्यांनाही करून घातले. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतलं एक वाक्य मला खूप भावतं – ‘समाधानाचा जन्म स्वयंपाकघरात होतो. गृहस्वामिनीने निरनिराळे पदार्थ करून घरच्यांना संतुष्ट करावं हा सुखी संसाराचा मूलमंत्र आहे.’ गेली २५ वर्षं ज्या गृहस्वामिनीनं आमच्या जिभेचे चोचले हौशीने पुरवले, तिला इतक्या वर्षांनी का होईना, काही वेगळे पदार्थ करून थोडासा हातभार लावला, याचं या नवरोजीला समाधान आहे!
तर मंडळी, वेगवेगळ्या गोष्टी केल्या तरी वर्षभरापासून बहुतांशी घरीच असल्यामुळे ‘वेळे’ची जाणीव नव्यानं झाली. अर्थात काही वेळा हा वेळ काही जाता जात नाही, तेव्हा अनवधानानं टीव्ही लावतो. जगभरातल्या बातम्या बघितल्या की, एकीकडे स्थलांतरित लोकांचे हाल, त्यांचे गेलेले रोजगार आणि त्यांच्यातील काहींनी गमावलेले जीव हे सारं दिसे. चक्रीवादळं, पूर, मोठे वणवे यांच्याही भीषण बातम्या येतच होत्या. अर्थात करोना आहे म्हणून हे निसर्गाचे खेळ थोडीच चुकतात? दुसरीकडे मास्क न घालता निष्काळजीपणे घोळक्यात फिरणारी मंडळी अजूनही दिसतात. कालपरवाच इथं काही लोकांनी मास्कची जाहीर होळी केली (म्हणे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येते!). हे सारं पाहून विषण्ण व्हायला होतं. यामुळेच स्वतःचा जीव धोक्यात घालून करोनाशी दिवसरात्र झुंजणारे वैद्यकक्षेत्रातले लोक, पोलीस, इतर सरकारी व स्वयंसेवी मंडळी यांचा कौतुकमिश्रित अचंबा वाटतो!
या आणीबाणीच्या परिस्थितीतही अमेरिकेत निवडणूक सुरळीतपणे पार पडली आणि करोनाची सावली त्यावर पडली नसती तरंच नवल. बायडन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर निष्प्रभ ठरतील असा अनेकांचा होरा होता. याची मुख्य कारणं म्हणजे बेरोजगारीचं नगण्य प्रमाण, तेजीत असलेले स्टॉक मार्केट, व्यापाराच्या बाबतीत चीनबाबत सातत्यानं ट्रम्प यांनी घेतलेली ठाम भूमिका, आणि बायडन यांच्याकडे नसलेला करिष्मा. या सगळ्यामुळे मार्चपर्यंत ट्रम्प यांचं पारडं जड होतं. परंतु पुढे मात्र ट्रम्पनी गरज नसताना वेळोवेळी केलेल्या ट्विटसमधून त्यांची आत्मप्रौढी आणि वर्णद्वेषी, हुकूमशाही वृत्ती दिसून आली. या काळात काळ्या व्यक्तींवर पोलिसांनी केलेल्या निंदनीय अत्याचारांवर त्यांचं भाष्य एखाद्या राष्ट्रप्रमुखाला शोभेलसं खचितच नव्हतं. त्यातून ‘Black Life Matters’सारखी उस्फूर्त चळवळ उभी राहिली आणि अमेरिकाभर सगळीकडे प्रचंड निदर्शनं पाहायला मिळाली.
इतकंच काय पण करोनामुळे लाखो माणसं मरत असताना आपल्या सभांमध्ये ते मास्क घालणाऱ्यांची (ज्यात बायडनही आले!) टिंगल करत राहिले. थोडक्यात शेवटपर्यंत आपल्या अतिरेकी पाठीराख्यांना आवडेल तेच रेटून बोलत राहिले. याचा फायदा राजकारणात मुरलेल्या बायडन यांनी पुरेपूर करून घेतला. मी लोकाभिमुख निर्णय घेईन, सर्वांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करेन आणि तज्ज्ञांचं मत विचारात घेऊन करोनाशी लढेन हे ते शांतपणे गेले सहा महिने लोकांना सांगत होते. आणि शेवटच्या काही कार्यक्रमांत ‘आपल्या समाजकारणातली हरवलेली सभ्यता आणि दोन्ही पक्षातलं सौजन्य प्रस्थापित करायचा मी कसोशीनं प्रयत्न करेन’ ही एकच गोष्ट त्यांनी कळकळीनं सांगितली. मला वाटतं, बहुतांश अमेरिकन लोकं ही मध्यममार्गी असतात आणि यातली १०-१५ टक्के मंडळी कोणत्याच पक्षाला बांधलेली नसतात. या वेळी ही ‘कुंपणावरची’ मंडळी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून विक्रमी मतदान झालं आणि बायडन यांचा निर्णायक विजय झाला.
..................................................................................................................................................................
हेही पहा :
..................................................................................................................................................................
तरीही ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाही! मतांची पुनर्मोजणी, कोर्ट असे निरनिराळे मार्ग ते अजमावत राहिले. पुढे आपल्या समर्थकांना राजधानीत बोलावून व्हाईट हाऊस समोर त्यांनी चिथावणीखोर भाषण केलं. आणि पुढे काय झालं ते साऱ्या जगानं बघितलं. इथल्या संसदेवर जमाव चाल करून गेला आणि त्यामुळे फारसं काही हशील झालं नसलं तरी दोन-तीन लोकांचे हकनाक बळी गेले आणि साऱ्या जगात अमेरिकन लोकशाहीची शोभा झाली.
ट्रम्प यांचा सूर नंतर काहीसा निवळला असला तरी जानेवारी २०२१ला दुपारी त्यांना सामानासकट घराबाहेर काढायची वेळ (आपल्या चित्रपटांतल्या जप्तीच्या दृश्यांसारखे!) येते का, असं मला उगीचच वाटून गेलं. नवीन अध्यक्ष पद ग्रहण करतो तेव्हा मावळता अध्यक्ष झालं गेलं सर्व विसरून त्या कार्यक्रमाला हजर राहतो ही आजवरची प्रथा. ट्रम्प हे पहिलेच असे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी तो समारंभ चुकवला आणि सरळ आपल्या फ्लॉरिडाच्या घरी निघून गेले! उपाध्यक्ष पेन्स यांनी मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावून लोकशाहीची थोडी का होईना लाज राखली. जगातल्या सर्वांत बलाढ्य लोकशाहीबद्दल मी हे लिहितोय, यावर माझा स्वतःचा विश्वास बसत नाहीये! अर्थात हेही खरं की, अमेरिकेत (व जगात इतरत्रही) निरनिराळ्या चळवळी-मोर्चे करोनाकाळातही तितक्याच आवेशाने सुरू राहिले. तेही जिवंत लोकशाहीचं लक्षणच मानलं पाहिजे नाही का? त्यामुळेच या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून ‘सलाम’ मात्र करावासा वाटतो.
असहाय्यपणे किंवा मूकपणे हे सर्व मी पाहत असलो तरी या गोष्टी ‘चिंतन’ करायला भाग पडतात. आणि लगेचच उमगतं की, आपलं जीवन तसं किती सुरळीत चालू आहे. आपण किती बारीकसारीक गोष्टींना त्रास आणि हाल म्हणतो याची शरम वाटायला लागते! पण आपलं दैनंदिन जीवन - छोटेमोठे निर्णय यात आपण सर्वांनीच किती पटकन आमूलाग्र बदल घडवून आणला याची मजाही वाटते. ज्या प्रकारे या संकटाला आपण सामोरे जात आहोत, नवनवे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, याबद्दल मानवजातीचं कौतुकही वाटतं. हेही ध्यानात येतं की, उगीच होणारी खरेदी व अनेक ‘अत्यावश्यक वाटणाऱ्या गोष्टी’ न केल्यानं फारसं काही बिघडलं नाही! आपलं विस्तारित कुटुंब, मित्रमंडळी यांची किंमतही जास्त कळायला लागली आहे कदाचित. एकंदरीतच मला वाटतं, आपल्या अनिर्बंध जीवनशैलीला निसर्गानं घातलेला हा लगाम आहे. अर्थात त्यातून काय बोध घ्यायचा हे मात्र ज्यानं त्यानं ठरवायचं!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
चातुर्मास म्हणजे केवळ सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध ऋतुचक्र आणि जीवनशैलीशीदेखील निगडीत आहे. त्यामुळे पथ्यं आली, हे कुठेतरी वाचलं होतं. करोनाच्या या बारोमासात काही नवीन बंधनं आणि बरीच शिस्त पाळावी लागतेय खरी, पण त्याचबरोबर काही वेगळ्या आणि काही फुरसतीनं करायच्या गोष्टी करता आल्या (आणि सुदैवानं संसर्ग झाला नाही) हेही नसे थोडके!
हे वर्ष तर सरलं पण अजूनही परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा नाही, नुसते चढउतार चालू आहेत. परंतु वैज्ञानिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे लस आली, याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जगभरात सगळ्यांना ती मिळायला अजून किती वेळ लागेल ते कोणास ठाऊक! पण आपल्या सर्वांनाच ‘छोटीसी आशा’ वाटू लागलीय हे मात्र नक्की.
उद्या होळी आहे. त्यात जगभरातील दृष्ट प्रवृत्ती, वाईट विचार याबरोबरच हा करोनादेखील जळून खाक होवो, ही एकच भाबडी प्रार्थना!
इति करोना पुराणम् (की पुरवणीम्?) संपूर्णम्!
..................................................................................................................................................................
रवी गोडबोले, अॅटलांटा
ravigod08@rediffmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment