नवभांडवली अर्थकेंद्रीत पाळतसमाजाची विचित्रचित्रे या कादंबरीतून प्रकटली आहेत. त्यामुळे ‘उद्या’च्या अंधारभयाचे हे वर्तमानकथन आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रणधीर शिंदे
  • नंदा खरे आणि त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 26 March 2021
  • ग्रंथनामा शिफारस नंदा खरे Nanda Khare उद्या Udya साहित्य अकादमी Sahitya Akademi

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२०चा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी तो नाकारला असला तरी त्यांची नोंद राहणारच आहे. माध्यमांत, सांस्कृतिक व्यवहारात ज्या तऱ्हेने या घटनेचे वेगवेगळे अर्थ शोधले गेले, यावरून मराठी वाङ्मयीन संस्कृतीचे खुजेपण ध्यानात येते. नंदा खरे यांचे लेखन विविधस्वरूपी आहे. अनेक विषयांत रूची असणाऱ्या प्रज्ञावंत अशा अपवादभूत लेखकांपैकी ते एक आहेत. ‘कहाणी मानवप्राण्याची’पासून, स्थापत्यविज्ञान, पर्यावरण, अनुभवकथन, सृष्टिविज्ञान, विज्ञान व समाजशील स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे.

तसेच मराठीतील रूढ ऐतिहासिक कादंबरीला नवे परिमाण दिले. या कादंबऱ्यांतून ‘व्यक्तिकेंद्रा’ऐवजी समाज-संस्कृती-समूह संदर्भात त्यांनी महाराष्ट्र इतिहासाचा शोध घेतला. हंड्याझुंबरांच्या वैभवी विरासतीची कहाणी न सांगता, सामान्य माणसांच्या व घटना-घडामोडींचा इतिहास त्यांनी शोधला. मराठीतील लोकप्रिय ऐतिहासिक कादंबरीबाबत त्यांनी नोंदवलेले एक मत अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी म्हटले आहे – ‘मराठीतील कादंबरीकार ‘बर्फच्छादित चमकदार शिखरे’ पाहून हरखून जातात. तोल ढळला तर थेट सास-बहू मालिकांच्या कथा लिहितात.’ या लेखन पार्श्वभूमीवर नंदा खरे यांचा लेखनस्वभाव वैशिष्ट्यपूर्ण आहे.

त्यांची ‘उद्या’ ही कादंबरी २०१५ साली प्रकाशित झाली. तिच्यावर काही अपवादभूत परीक्षणे त्या वेळी प्रसिद्ध झाली. मात्र तिच्याकडे मराठी वाङ्मयीन संस्कृतीने फार गंभीरपणे पाहिले नाही. या कादंबरीच्या अनेक शक्यता मराठी समीक्षेला नीटपणे आकळता आल्या नाहीत. वर्तमानाच्या भूमीवरून इतिहास आणि भविष्याच्या संभवशक्यता या कादंबरीत आहेत. आधुनिकता आणि आधुनिकोत्तर काळातील अंतर्विरोध आणि महापेचांनी तिचे लेखन आकाराला आले आहे. या साऱ्या लेखनामागे खोलवरची मानवीयता आहे.

‘उद्या’चा शेवट एका दुःखद भयस्वप्नाने होतो. अनेक प्रकारची कुत्री एका स्थळावर आहेत. त्यांच्या उपस्थितीने वर्तमानाच्या सूचकतचे दर्शन घडते. त्यातील एक छोटं पिल्लू रस्त्यावर येते. समोरून भरधाव वेगाने एसयुव्ही कार येते. कुत्र्याचे पिल्लू घाबरून रस्त्याच्या मधोमध थांबते. पिल्लूची आई ताठरते. भरधाव कारची चाके पिल्लाच्या दोन्ही बाजूंनी जातात. तीही योजनापूर्वक नाही. तर सहज. पिल्लू उठून आईकडे पळते.

आज, आता वाचलंही. ‘उद्या?’ या भय दृश्यचित्राने कादंबरीचा शेवट आहे.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

खरे चिंतनशील कादंबरीकार आहे. भोवताल, स्थानिकता ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलदृष्टी त्यांच्या लेखनात आहे. या बदलाचे मानवी जीवनावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचे चित्र त्यांच्या कादंबरीत आहे. विचारकादंबरी म्हणून त्यांच्या या कादंबरीला विशेष महत्त्व आहे. विशेषतः आधीच्या परंपरेतील वामन मल्हार जोशी व श्री.व्यं. केतकर यांच्या कादंबरीशी नाते सांगणाऱ्या खरे यांनी थक्क वाटावा, असा या कादंबरीचा विस्तार केला आहे. तिला बहुमुखी आयाम प्राप्त करून दिलाय. मराठीतील वास्तववादी कादंबरी एकल, सपाट वर्णनपर स्वरूपाची आहे. या पार्श्वभूमीवर खरे यांची कादंबरी अभिनव आणि प्रयोगशील आहे. त्यांत सामाजिक, राजकीय जाणिवांचे गडद असे सूचन आहे.

‘उद्या’मध्ये परस्परभिन्न पंधरा प्रकरणांतून आजच्या वर्तमानांचे चित्रण आहे. कुटुंब, गाव, आदिवासी, जंगल, कॉर्पोरेट जग, प्रशासन, पोलिसी व्यवस्था, राजकारण, गाव, नवभांडवली व्यवस्था, बहुराष्ट्रीय कंपन्यांची अजस्त्र सावली, नव्या मायाजालातील मानवी व्यवहारांचे सूक्ष्म चित्रण आहे. ‘शोध कहाणी’च्या सादरीकरणातून भविष्याचे वर्तमानकथन करणारी ही कादंबरी आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभ काळातील बदलती स्थिती व पर्यावरणाचा त्यास संदर्भ आहे. येऊ घातलेल्या समाजावकाशाचे गंभीर स्वरूप ती मांडते. तंत्रज्ञानाच्या मितीने घडवलेले जग आणि त्यांचा वर्तनव्यवहार तिच्या केंद्रस्थानी आहे. ‘अर्थकारण केंद्री’त समाजवर्तनशास्त्राचा तिला आधार आहे. नव्या काळातील ‘मूल्यवृद्धी’ला मिळालेली नवी परिमाणे दर्शवणारी ही कादंबरी आहे.

अनेकपदरी आणि परस्परविरुद्ध कथनसूत्रांमधून या कादंबरीचे स्वरूप सिद्ध झाले आहे. विविध प्रकारचा स्थलावकाश, पात्रे, त्यांच्या कृती, विचारदृष्टी आणि या सर्वांमागे असणाऱ्या ‘मूल्यवृद्धी’च्या दाट छायेतील मानवी जग तिच्यात आहे. मराठी वाचकांना अरूढ वाटावी, अशी ही कादंबरी गंभीर विचारसूत्रांचा उलगडा करते. विचारप्रमेय स्वरूपाची ही कादंबरी आहे. ती सरधोपट एखाद्या विचारसूत्राचे समर्थन करणारी नाही, तर प्रत्यक्षातल्या घडामोडींतून निष्पन्न झालेल्या व भविष्यातील भयाच्या नांदीखुणा मांडणारी आहे. तिचा प्रारंभ जागेपणी दुःस्वप्न पुढ्यात ठाकल्याची जाणीव देणारा, तर शेवट ‘उद्या’च्या भयसूचक प्रतीकात्मतेने केलेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या कादंबरीतून मानवी अस्तित्व प्रश्नांकित करणारे वास्तव अधोरेखित होते. अर्थात ही दृष्टी अस्तित्ववादी परात्मतेने पछाडलेली नाही, तर वर्तमानाने मानवी ‘अस्तित्व स्वईप’ केल्याची जाणीव देणारी आहे. त्यातून बदलत्या स्वामीत्वाच्या, मालकीच्या कल्पनेचे स्वरूप उलगडते. दुसऱ्या बाजूला ‘लोकानुनय’ करणाऱ्या नेतृत्वाचा विस्तार होत आहे. त्यामुळे ‘उद्या’ला सखोल राजकीयभानाचे सूत्र आहे. १९८०नंतर अविवेकीपणातून आकाराला आलेल्या राजकारणाची सावली त्यावर आहे. ती प्रतीकात्मता व मिथ्यकथांद्बारा उलगडली आहे. ‘दिवाणखान्यातील हत्ती’, ‘उंटाचा तंबूवर ताबा’ यासारख्या प्रतीकांतून ती अधिक गडद होते. आदिवासी जंगले, वस्त्या, नक्षलवाद ते महानगरांमधील वास्तव आणि त्याचे विविध कंगोरे तिच्यातून प्रकट होतात. ‘लंगड्या’ आणि ‘थोट्या’ महानगरांचे स्वरूप साकारते. एका अर्थाने हे प्रगतीच्या सूजेचे चित्रण आहे.

या कादंबरीत राज्यसंस्था, तंत्रज्ञान, बाजार, व्यापाराच्या मिलाफाने घडवलेल्या समाजवकाशाची चर्चा आहे. त्याची सर्व सृष्टीवर पाळत आहे. संगणकांच्या महाजाळातून प्रचंड ‘स्मरणसाठे’ साठवले जात आहेत. असंख्य ‘भक्तगट’ निर्माण झाले आहेत. यातून ग्राहकांचे नवे मानसशास्त्र घडवले जात आहे. ‘सरकार तुमच्या हगण्यामुतण्यावर लक्ष ठेवू शकते. केवायसी नावाचा उंट तुमच्या घरादारात, झोपण्याच्या खोलीत, संडासात, न्हाणीत घुसला आहे. या पाळतीमुळे मानवी जग एका ‘नियंत्रित’ जगात प्रवेशित झाले आहे. या अदृश्य नियंत्रणाखालील मानवी समाजाचे चित्रण या कादंबरीत आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीतील जगाची कानोसाचित्रे आहेत.

व्यापार एकाधिकार ही आजची परवलीची गोष्ट आहे. तो अमानुष व्यवहारांना जन्म देतो. अतिश्रीमंत आणि दुर्बल यांच्यातील परस्परसंबंधाचा शोध या कादंबरीत आहे. सहज संसाधन आणि खुजट श्रीमंती यांतले तणाव वाढत आहेत. सबळ श्रीमंत राष्ट्रांना शेजारची दुर्बळ राष्ट्रे भक्षणीय वाटू लागली आहेत. वस्तू विनिमिय, श्रम, पैसा हे सर्व बदलते आहे. सर्व संमतीच्या मानीव पायावर उभी असणारी नवी ‘चलन संस्कृती’ आकाराला आली आहे. या नव्या चलनसंस्कृतीचा इतिहास या कादंबरीमध्ये आहे.

हे कादंबरीकथन आजच्या अनेक प्रश्नांशी निकटचे नाते सांगते, हे तिच्यातील अनेक सूत्रांवरून दिसून येते. तेही भडक, बटबटीतपणा येऊ न देता. वर्तमानाच्या अवकाशात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचे कथन आहे. मुलींची शिकार, व्यक्तीचे प्रश्न, वंशविलोपन, व्यक्तींच्या खाजगी जीवनावरील चहुमुखी आक्रमणाची नोंद आहे. राजकारण हे बहुतेक वेळा एका बहुपदरी, बहुआयामी पंजा लढवण्याच्या खेळासारखे असते, परंतु त्यात असमतोल असतो. जगाच्या व्यवहारात हक्क हा तुल्यबळांमध्येच उद्भवणारा प्रश्न आहे. बलवान त्यांना जमेल ते करतात. आणि दुर्बल त्यांना भोगावे लागते ते भोगतात. या वास्तवाचा आविष्कार या कादंबरीत आहे. एका बाजूला चमचमता झगमगाट आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक असमतोल व विषमतेच्या गडद सावलीतले जग हेही आहे. प्रस्थापित-विस्थापितांतील अंतराय व पर्यायांच्या शोधातील अपुरेपणाची जाणीव प्रकटली आहे. त्याची एक बाजू नक्षलवादी चळवळ आणि राज्यसंस्था यांच्यातील अंतर्विरोधाच्या चित्रणात आहे.

‘मूल्य’ संकल्पना आता केवळ ‘आर्थिक’ उरली आहे. ‘बाजार’केंद्री मूल्ये समाजात उतरवली जात आहेत. त्यासाठीचे आकलनसंच घडवले जात आहेत. तसेच प्रत्यक्षता आणि राज्यसंस्था-प्रशासन रचित रचलेले वास्तव यातले बारकावे या कादंबरीत आहेत. अर्थकेंद्रित मूल्यरचनेत हरवलेले ‘माणूसपण’ आणि निसर्गशोध आहे. मात्र तोदेखील ‘आहे असा’ राहिलेला नाही. दाट जंगलभूमी, शेकडो पक्षी, डझनावरी नमुन्याचा चिवचिवाट, नदीचं सौम्य मंद खळाळ चिवचिवाटाला उठाव देणारे असे एक चित्र आहे. मात्र तेदेखील मानवी संपर्काने बाधित झालेले आहे. वर्तमानाने भूतकाळ छिलून टाकल्याची जाणीव ही कादंबरी करून देते.

या कादंबरीचे स्वरूप रूढ कादंबरीपेक्षा वेगळे आहे. कथनतंत्रे, पात्ररचना, प्रयोगशीलता व भाषा या बाबतीत वेगळ्या गोष्टींचा अवलंब नंदा खरे यांनी केला आहे. नायकविरहीत कादंबरीत अनेक आवाज मिसळले आहेत. विभिन्न स्वरूपाची आशयसूत्रे, चित्रणप्रदेश, मानवी स्वभाव व भाषारूपांचा आढळ आहे. सामाजिक, आर्थिक बदलाची व भयमूल्यांची संसूचना देणाऱ्या अनेक गोष्टींचा अवलंब आहे. संवादचर्चा विपुल आहे. आधुनिकोत्तर काळाचे एक सूचन म्हणून विकीर्ण, अशी सूत्रे भाषेच्या सरमिसळीतून साकारली आहेत. प्रश्नविचारांची वाहक म्हणून पात्रे क्रियाशील आहेत. तसेच कथनात कमालीची ताटस्थ्यता आहे, तरी त्यात कथनकर्त्याचा ‘आवाज’ अध्याहृत आहे. नोटबुकातील नोंदी, प्रशासकीय अधिकाऱ्याचे अहवालपत्र नमुने, संख्यात्मक आकडेवारीचे ठिकठिकाणी निर्देश आहेत. कादंबरी ज्ञानमाहितीचा प्रचंड साठा असतो, याचा पुरेपूर प्रत्यय या कादंबरीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, जीवशास्त्र अशा ज्ञानशाखांतील माहितीचे अनेकविध तपशील आहेत. तसेच मुंबई, महिकावती, दादर, माहीम व इतरही स्थळावकाशाच्या अंशतः बदलाचा इतिहासही आहे.

थोडक्यात ‘उद्या’च्या महाविक्राळ प्रश्नसमस्यांचे कथन या कादंबरीत आहे. नवभांडवली अर्थकेंद्रीत पाळतसमाजाची विचित्रचित्रे या कादंबरीतून प्रकटली आहेत. त्यामुळे ‘उद्या’च्या अंधारभयाचे हे वर्तमानकथन आहे. पारंपरिक मराठी कादंबरीस्वरूपाच्या वाटा टाळून नव्या शक्यतांचा शोध खरे यांनी घेतला आहे. वाचकांना बहुल ज्ञानसृमद्धतेचा प्रत्यय देणारी ‘उद्या’ ही मराठीतील महत्त्वाची विचारकादंबरी आहे.

..................................................................................................................................................................

लेखक रणधीर शिंदे समीक्षक आहेत.

randhirshinde76@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

???? ??????

Sat , 27 March 2021

उद्या या कादंबरीचे विश्लेषण वाचनीय , चिंतनीय उतरले आहे. कादंबरी वाचायलाच हवी अशी असोशी आपल्या लेखनातून मनात जागी केली आहे. अनेक चांगल्या कलाकृती वाचनातून निसटतात. असे होऊन जाते. परंतु या कादंबरीला मिळालेला पुरस्कार आणि तो स्विकारणार नसल्याची लेखकाची भूमिका यामुळे नंदा खरे आणि ही कादंबरी अधिक चर्चैत आली. पण या लेखात तिची सामर्थस्थळे नोंदवून तिचा आवाकाही सांगितला आहे. असो लेखक आणि रणधीर शिंदे सर या दोघांनाही धन्यवाद आणि शुभेच्छा. प्रा. डॉ. अरुण कोळेकर. सासवड.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......