‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ हे पुस्तक मराठीतील साहित्य आणि इतर कलांच्या समीक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पुस्तक आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अक्षय शेलार
  • ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
  • Fri , 26 March 2021
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade देशीवाद Deshivad द वर्ल्ड इज फ्लॅट World is Flat नितिन भरत वाघ Nitin Bharat Wagh

लेखक, समीक्षक नितिन भरत वाघ यांच्या ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या पुस्तकाची चौथी सुधारित आवृत्ती (सात नवीन लेखांचा समावेश असलेली) जानेवारी २०२१मध्ये प्रकाशित झाली आहे. त्या निमित्ताने हा लेख…

..................................................................................................................................................................

नितिन भरत वाघ यांच्या ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या पुस्तकातील ‘जॉर्ज ऑरवेल : समाजाचं सांस्कृतिक वाचन आणि ऑरवेलियन काळ’ या लेखात एक वाक्य आहे. ते असे - ‘आपल्याकडे कवी, लेखक वा समीक्षकांना अभ्यासाची, संशोधनाची अजिबात आवड नाही असं दिसतं’. या वाक्यातून वाघ यांना मराठीतील साहित्यव्यवहार आणि वाचन, लेखनसंस्कृतीबाबत असलेली तक्रार अगदी स्पष्टपणे मांडली जाते. खुद्द वाघ यांचं पुस्तक मात्र वरील वाक्याला अपवाद ठरणारं आहे. कारण त्यांच्या या पुस्तकामध्ये अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक वृत्ती असलेलं लिखाण वाचायला मिळतं. 

साहित्य, चित्र, संगीत इत्यादी कला या वास्तवापासून निर्वातात अस्तित्वात नसतात. कारण, त्या कलाकृतीच्या निर्मात्याचा आणि त्याच्या सभोवतालाचा संबंध हा येनकेनप्रकारे त्याच्या जगण्याशी, आणि पर्यायानं कलात्मक अभिव्यक्तीशी येत असतो. त्यामुळेच नितिन भरत वाघ हे साहित्यादी कला आणि कलाकृतींकडे वास्तव आणि त्यासोबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पैलूंच्या चष्म्यातून पाहतात.

या पुस्तकात नव्या, जुन्या सर्वच प्रकारचं साहित्य आणि लेखकांविषयीचे लेख आहेत. त्यामुळे अरुण कोलटकर, विलास सारंग, अरुण काळे या लेखकांच्या साहित्यकृतींपासून ते नीतीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’ या गेल्या काही वर्षांत चर्चेत असलेल्या पुस्तकापर्यंत विविध प्रकारच्या लेखनाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. लेखकाची एकूणच लेखनव्यवहाराविषयीची आत्मीयता ही त्याच्या या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये दिसून येणारी समान बाब. ज्यात कोलटकर-सारंग यांच्या कवितांवरील छोटेखानी लेखापासून ते भालचंद्र नेमाडे, जॉर्ज ऑरवेल यांच्यावरील दीर्घ लेखांपर्यंत सर्वच लेखांचा समावेश होतो. 

नितिन वाघ यांनी ‘सूत्रपाठ’ या लेखातून प्रस्तुत संग्रहाचं समान सूत्र मांडलं आहे. हा लेख वाचताच लेखक समाज आणि साहित्य यांच्यातील परस्परसंबंधाकडे किती गांभीर्यानं पाहतो, याची कल्पना येते. यात साहित्यासोबतच लेखक आणि वाचक यांचा सभोवताल; साहित्याला व्यापून असलेले आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पैलू या बाबींचा एकत्रित विचार केला जातो.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

देशीवाद आणि जागतिकीकरण हे या लेखसंग्रहातील सर्व लेखांच्या केंद्रस्थानी असलेले मुद्दे असले तरी या दोन मुख्य विचारविश्वांसमवेत जातीव्यवस्था, भारतात सध्या वाढीस लागलेला मूलतत्त्ववाद अशा इतर संकल्पनादेखील येतात. या भिन्नविभिन्न संकल्पनांकडे एकत्रितपणे पाहत असताना मराठी, इंग्रजी दीर्घ अवतरणं दिली आहेत. त्यात गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाक्यांपासून ते विन्स्टन चर्चिल, पॉल क्ली यांच्यापर्यंत विविध मान्यवरांचा समावेश होतो. त्यामुळे देशीवाद, जागतिकीकरण आणि भारतीय समाजव्यवस्था यांचा परस्परसंबंध लावत असताना आवश्यक असलेली पुरेशी पार्श्वभूमी लेखक देतो. भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवादाच्या मांडणीआधी आणि नंतर झालेलं सामाजिक स्थित्यंतरदेखील सगळ्या चर्चेमध्ये महत्त्वाचं ठरतं. 

‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या दीर्घ शीर्षकलेखात ‘देशीवाद’ आणि ‘जागतिकीकरण’ हे दोन मुद्दे केंद्रस्थानी येतात. मात्र, या दोन मुद्द्यांच्या अनुषंगानं लेखाचा विस्तार करत असताना विश्वाच्या निर्मितीचा सिद्धान्त मांडणाऱ्या ‘बिग बँग थिअरी’पासून ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानापर्यंत अनेकविध संकल्पनांचा आधार घेतला जातो. लेखक देशीवाद या संकल्पनेकडे एकतर तिचा थेट, आहे त्या स्वरूपात स्वीकार किंवा मग विरोध अशा सरळसोट प्रकारे पाहत नाहीत. तो देशीवाद या संकल्पनेतील त्रुटी स्पष्ट करतो, पण सोबतच तिची पुनर्मांडणी केल्यास ती कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते, याबाबतही लिहितो. काही बाबतीत नेमाडेंच्या या संकल्पनेचं कौतुक करत असताना त्यांचं जातीव्यवस्थेचं समर्थन करणं आणि ‘जातीव्यवस्थेवर हिंदू संस्कृतीचं आणि परिणामी भारताचं अस्तित्व टिकून आहे’, या अर्थाच्या वाक्यामधील फोलपणा दाखवून देतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केली जाते. प्रत्येक गोष्ट आहे तशी स्वीकारणं किंवा नाकारणं इथं घडत नाही. 

अरुण कोलटकर, विलास सारंग, अरुण काळे आणि दिनकर मनवर यांच्या कवितांवर आधारित लेख फारच इंटरेस्टिंग आहेत. कोलटकर-सारंग आणि काळे यांच्या कवितांचा विचार करत असताना जागतिकीकरण, बदलता सभोवताल, इतिहास आणि समाजव्यवस्था इत्यादी संकल्पनांचा विचार करत लेखांची मांडणी केली जाते. त्यामुळे उपरोक्त कवींच्या कवितांच्या केवळ साहित्यिक आणि भाषिक समीक्षेच्या पलीकडे जाणारं लेखन दिसतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हेच दिनकर मनवर यांच्या कवितासंग्रहावरील लेखाबद्दल लागू पडतं. ‘दृश्य नसलेल्या दृश्यातील दृश्य’ नावाचा हा लेख आणि त्याआधी येणारा ‘कला, कवी आणि कविता कारण’ या दोन लेखांचा घनिष्ठ संबंध आहे. कारण, दोन्ही लेखांमध्ये कविता रचली जाणं म्हणजे काय असतं, याचा विस्तृत विचार केलेला आहे. समकालात कवी ही शिवी म्हणून वापरली जावी अशी परिस्थिती का आणि कशी उद्भवली, अशी परिस्थिती असताना प्रत्यक्षात मात्र भाषिक व्यवहाराच्या स्तरावर उत्तम म्हणाव्याशा कवितांची रचना होताना का दिसत नाही, यांचा आढावा घेतला आहे.

कवितेची उत्पत्ती स्पष्ट करत असताना या लेखात भाषेची उत्पत्ती, भाषेचं राजकारण, मानवाच्या उत्क्रांतीमध्ये असलेलं भाषेचं महत्त्व असे अनेक मुद्दे सविस्तरपणे समोर मांडले जातात. त्यापुढे येणाऱ्या एका लेखात ते मनवर यांच्या कवितेतील स्त्रीविषयक दृष्टिकोनाची चिकित्सा करतात. या लेखाचं तात्कालिक कारण हे की, दिनकर मनवर यांच्या कवितेतील एका ओळीवर आक्षेप नोंदवत महिला आयोगानं त्यांना स्पष्टीकरण मागणारी नोटीस पाठवली होती. या लेखातून (आणि त्यामागील कारणातून) एकाच कवीच्या कलाकृतींकडे वेगवेगळ्या हेतूनं कशा पद्धतीनं पाहता येऊ शकतं, याचा अनुभव येतो.

लेखाचं निमित्त काहीही असलं तरी एका कवीच्या कवितांची अर्थपूर्ण आणि सर्वांगीण चिकित्सा या लेखात होते. शिवाय कवितेमध्ये तुकाराम-ज्ञानेश्वरांच्या काळापासून दिसणाऱ्या स्त्रीच्या प्रतिमेविषयी सविस्तर भाग अस्तित्वात असल्यानं ही चर्चा एकांगी किंवा वकिली थाटाची होत नाही. 

‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र… वाटून घेताना’ हा लेख एखाद्या पुस्तकाबद्दल नसून लेखक जयंत पवार यांच्या ‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ या कथेबद्दल आहे. कथेच्या समीक्षेपेक्षा तिचा आस्वाद घेणं आणि नंतर त्या कथेवर व्यक्त होणं अशा स्वरूपाचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. लेखकाच्या वाचनप्रेमाचं द्योतक ठरावा असा हा लेख.

असेच लेख चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, जापानी लेखक हारुकी मुराकामी यांच्यावरही आहेत. कुलकर्णी यांच्यावरील लेखात त्यांची दखल न घेतल्याची तक्रार लेखक मांडतो, तर मुराकामीच्या निमित्ताने जागतिक स्तरावरील लोकप्रियतेची मीमांसा करतो. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘महार (बौद्ध) समूहाने आरक्षण सोडण्यास काय हरकत आहे?’ हा छोटेखानी (वाढीव) लेख पुस्तकातील इतर लेखांच्या यादीत न शोभणारा आहे. त्यातील मुद्दे पटणं अथवा न पटणं हा वेगळा भाग, पण इतर लेख साहित्य, चित्रकलादी कलांच्या अनुषंगानं लिहिलेले असताना हा लेख वेगळा (नकारात्मक अर्थानं) वाटतो.

या लेखाखेरीज इतर काही लेखांमध्ये जागतिकीकरण, मार्क्सवाद आणि इतर काही संकल्पना/मुद्द्यांच्या अनुषंगानं केलेलं लेखन हे पुस्तकात इतरत्र आढळणाऱ्या चिकित्सक वृत्तीला छेद देणारं ठरतं. उदाहरणार्थ, शीर्षक लेखात एके ठिकाणी नारायण मूर्तींच्या संदर्भानं येणारं भांडवलशाहीची कास धरण्याबाबतचं वाक्य. ज्यातून काहीएक वेळा परस्परविरोधी वाक्यं पुस्तकात आढळतात. 

असं असलं तरी ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ हे पुस्तक मराठीतील साहित्य आणि इतर कलांच्या समीक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. विशेषतः इथं फक्त कलाकार अथवा कलाकृतीकडे न पाहता कलाकृतींचा समकालाशी अर्थपूर्ण संबंध जोडत पाहिलं जातं. अपवाद वगळता नुसती आस्वादक समीक्षा वाटेल असं लेखन किंवा टिप्पण्या न करता मांडलेल्या मुद्द्यांचं सविस्तर विवेचन केलं जातं. अशा प्रकारचं अभ्यासपूर्ण लेखन विचारात घेतलेल्या कलाकृतींना न्याय देण्याच्या दृष्टीनंही महत्त्वाचं ठरतं. 

रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat - नितिन भरत वाघ 

आऱ्हान बुकस्मिथ्स, नाशिक

पाने – २२४, मूल्य – ४०० रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3508

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......