अजूनकाही
१. मुख्यमंत्रीपद लाभले याचा अर्थ अखंड महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचा परवाना मिळाला असा होत नाही. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न झालाच तर सर्वांत मोठा विरोध आमच्या वैदर्भीबांधवांकडूनच होईल. कपाळावर कुंकू अखंड महाराष्ट्राचे लावायचे व खोटे मंगळसूत्र दुसऱ्याचे बांधायचे हे धंदे थांबवा. : उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा
या सगळ्या राजकारणी मंडळींना बांगड्या, सौभाग्यचिन्हं वगैरे बाईला विवाहसंस्थेची गुलाम बनवून ठेवणाऱ्या चिन्ह-प्रतीकांचा सोस का असतो? भाजपला 'कमळाबाई' असं संबोधून शिवसेनेने कायम अशाच प्रकारची तोंड-'मर्दुमकी' करून दाखवली आहे. बाईला दुबळेपणाचं प्रतीक मानण्याचा आपल्याला काही हक्क आहे का हो धनुष्यबाणवाले दादा! एक बाई केंद्रात सत्तेत होती, तेव्हा आपण कसे मनीमाऊसारखे पिंजऱ्यात गप्प बसलो होतो, त्याची आठवण ठेवा.
…………………………………………………..
२. रशियाबद्दल अंमळ जास्तच जिव्हाळा आणि आपुलकी दाखवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत टीकेचा भडिमार होत असताना मंगळवारी ट्रम्प यांनी ‘कोण पुतिन मी त्यांना ओळखत नाही’, अशी उपहासात्मक टिप्पणी केली आणि रशियाशी कोणत्याही प्रकारचा समझौता करणार नसल्याचे ट्विट केले.
पुतिन यांच्या मातोश्रींचा बर्थडे जवळ आलाय काय? ट्रम्पतात्या कुठून तरी कुठे तरी जाता-येताना विमान अचानक मॉस्कोला उतरवून बिर्याणी खायला जाणार पुतिनच्या घरी, असा डाउट येऊन राहिलाय.
………………………………………………
३. एकीकडे उल्हासनगरातले नामचीन कलंकित नेते पप्पू कलानी यांना चार हात लांब ठेवत असल्याचा आव आणून त्यांचाच मुलगा ओमी याच्याबरोबर आघाडीचा डाव खेळणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पोस्टरवर मात्र कलानी यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत आणून ठेवल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
भाजप हा स्वच्छ आणि चारित्र्यवान पक्ष आहे, हा निव्वळ एक जुमला आहे, हे एव्हाना स्पष्ट झालंच आहे. आताही निष्ठावंत कार्यकर्त्यांना कलानीच्या चारित्र्याने काही फरक पडत नसेल; त्याचं नाव 'पप्पू' आहे, यानेच ते कावले असतील. महामहीम मोदींच्या पंक्तीत 'पप्पू'? हे त्यांना पसंत पडत नसेल. कलानीच्या सुरेश या मूळ नावाने त्याला हाक मारली की, यांचा आक्षेप संपून जाईल.
…………………………………………….
४. देशात वाघांची संख्या सहा टक्क्य़ांनी वाढली आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. व्याघ्र संरक्षणासाठी केलेल्या उपायांमुळे सध्या देशात २२०० रॉयल बेंगॉल टायगर्स आहेत व ७९१० बिबटे आहेत. ते १३ व्याघ्र अभयारण्यांत असून कॅमेरा ट्रॅप पद्धतीने ही मोजणी केली आहे.
चला चला सैनिकहो, वाघांची संख्या वाढली. आता आपल्याशी कसलाही संबंध नसलेल्या या घटनेचा साहेबांपासून गल्लीनेत्यापर्यंत सर्वांच्या भाषणांत अभिमानाने उल्लेख करून राजकीय फायदा घेण्याची वेळ झाली. चला चला विरोधकहो, वाघांची नुसती संख्या वाढून उपयोग नाही, त्यांनी इतरांच्या ताटाखालचं मांजर बनणं सोडायला हवं, असे विनोद करण्याची वेळ झाली.
…………………………………
५. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र सामोरे यावे. दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे. वारंवार पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ‘पंतप्रधान मोदींआधी माझ्याशी निपटा,’ असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
अहाहा, प्रौढ आणि प्रगल्भ राजकीय नेत्यांची काय ही कसदार भाषा! सरदार पटेलांच्या नावाने मुंबईत एक स्टेडियम होतं फ्रीस्टाइल कुस्त्यांसाठी प्रसिद्ध. दारासिंग, रंधवा वगैरे तिथूनच पुढे आलेली नावं होती. तिथेच भेटा सगळ्यांनी आणि काय ते एकमेकांना निपटून टाका. ते योग्यही ठरेल. कारण, तिथल्या सगळ्याच लढती नेहमीच लुटुपुटूच्या आणि फिक्स्ड असायच्या. तुमचीही त्यात खपून जाईल.
………………………………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment