अजूनकाही
आज २२ मार्च, जागतिक जल दिन. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे आणि निसर्गातील प्रत्येक घटकाचे आपले गुणधर्म व नियम असतात, तसेच पाण्याचेही आहेत. पाणी जीवनदायी आहे आणि चंचलही. निसर्गात ते चक्रीय रूपात सतत फिरत असते. खरे तर चंचल म्हणजेच अस्थिर, पण हा नकारात्मक शब्द असल्यामुळे त्यापेक्षा ‘चंचल’ बरा. नाहीतर पाण्याच्या बाबतीत अर्थ एकच.
पाणी चंचल असल्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. त्याचे स्थान व रूप सतत बदलत राहते आणि त्यासोबत गुणधर्मही बदलतात. बर्फ घन असतो, तर जल प्रवाही असते आणि वाफ व्यापी असते. आपण वापरतो ते पाणी जल स्वरूपातील. समुद्राच्या स्थानी असलेले पाणी खारे आणि ध्रुवावर असलेले बर्फ. पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या दोन तृतीयांशापेक्षा अधिक क्षेत्रावर पाणीच आहे. म्हणजे पाणी मुबलक आहे. पण हे खरे आहे का? पाण्याचे हेच ‘पाळण्यातले पाय’ आहेत का? असतील तर मग टंचाई का निर्माण होते? जरा नीट पाहिले तर असे दिसते की, मानवाच्या वापरायोग्य पाणी पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे! वर वर पाहता हे जाणवत नाही, पण मोजल्यावर समजते की, पाणी दुर्मीळ संसाधन आहे! कदाचित म्हणूनच पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेवरय्या म्हणायचे की, शास्त्रीय मोजमाप करून गणितात मांडले तर समस्येची उकल शक्य आहे.
तुम्ही म्हणाल, आपल्याला पृथ्वीवरच्या पाण्याशी काय घेणे-देणे? आपल्या गावाचे किंवा आपल्या शहराचे गणित तर जगाशी जुळवता येत नाही ना? आपल्या कुटुंबाला दिवसाला लागणारे साधारण ४०० लिटर पाण्याचे गणित पुरेसे आहे. आपल्याला पाण्याचे ‘पाय’ कसे दिसतात, त्यावर आपले भवितव्य अवलंबून आहे.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या ठिकाणी महाराष्ट्राच्या एका गावाचा विचार करू. पठारावरच्या दुष्काळी भागातील साधारण ५०० हेक्टर क्षेत्राचे गाव, वार्षिक पाऊस साधारण ७०० मिलीमीटर. या गावावर पडणारा एकूण पाऊस ३५० कोटी लिटर. गावाची लोकसंख्या व पशुसंख्या जर एक-एक हजार असेल तर गावाची पिण्याची व घरगुती वापराची वर्षभराची गरज केवळ ७ कोटी लिटर होईल, म्हणजे एकूण पावसाच्या केवळ २ टक्के. पाऊस दुप्पट असला तर गरज १ टक्का आणि पाऊस निम्माच असला तर गरज ४ टक्के.
आता शहराचे पाहू. ७०० मिलीमीटरच्या प्रदेशातील पुणे शहराचे उदाहरण घेऊ. पुण्याचे क्षेत्रफळ ३३० वर्ग किलोमीटर म्हणजे ३३,००० हेक्टर. एकूण पावसाचे पाणी झाले २३,००० कोटी लिटर. पुण्याची लोकसंख्या ३५ लाख व १०० लिटर रोज प्रमाणे पाण्याची गरज होईल १२,००० कोटी लिटर, म्हणजे एकूण पावसाच्या ५५ टक्के. पुण्याची इतर कारणांसाठी पाण्याची गरज आहे साधारण २,५०० कोटी लिटर.
थोडक्यात काय, पाण्याचे पाळण्यातले पाय खूप भक्कम आहेत, असे या गणितावरून कळते. गावाची आणि शहराची पाण्याची गरज तिथे पडणाऱ्या पावसापेक्षा कमीच आहे. गावात तरी कौटुंबिक गरजेपेक्षा शेतीची गरज खूप अधिक असते, पण शहरात तसे नाहीये. पुण्यासारख्या कमी पावसाच्या प्रदेशातील शहरातसुद्धा पडणाऱ्या पावसापेक्षा एकूण गरज अर्ध्यापेक्षा थोडी अधिक आहे. पुणे शहराचा पाणी पुरवठा पानशेत-खडकवासला धरणातून होतो. त्यामुळे पुणे शहरावर पडणाऱ्या पावसावरची गरज ५-१० टक्क्यांपेक्षा जास्त नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
काय सांगतात हे पाण्याचे पाळण्यातले पाय? अगदी स्पष्ट आहे- पाणी व्यवस्थापनात आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. आपल्या नागरिकांच्या २-५ टक्के संसाधनाच्या गरजेचे आपण नीटपणे व्यवस्थापन करू शकत नाही. पाण्याचे पाय भक्कम आहेत, आपण त्याला सक्षम करू शकलेलो नाही. पाण्याची टंचाई भासूच शकत नाही, पण भासतेय. मग याचे नीट व्यवस्थापन नको का?
व्यवस्थापनाचा विचार करताना उपलब्धता व मूल्य विचारात घेणे गरजेचे आहे. सहज बोलताना आपण पाणी आणि पैशाची सांगड घालतो. ‘पाण्यासारखा पैसा खर्च करणे’ किंवा ‘पैशासारखे पाणी जपून वापरणे’ वगैरे वगैरे. पैसा आणि पाणी यांचे महत्त्व सारखेच असले तरी पाण्याचे मोजमाप आपण करत नसल्यामुळे पाण्याचे मोल कळत नाही. फक्त उन्हाळ्यात तेवढी माकडाच्या घरासारखी आपल्याला उपरती होते आणि पाऊस आला की, मग पहिले पाढे पंचावन्न!!
पण पाण्याचे उत्पादक मूल्य काढायचे कसे? उत्तर सोपे आहे- अर्थशास्त्रात कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या पक्क्या मालाच्या मूल्याशी तुलना केली तर कच्च्या मालाचे मूल्य काढता येते. अगदी ढोबळमानाने एखाद्या पिकाला लागणारे पाणी, त्या पिकाची उत्पादकता आणि त्यानुसार प्रती लिटर पाण्याच्या वापरातून मिळालेले उत्पन्न काढले तर त्या पिकानुसार पाण्याचे मूल्य काढता येते. हे पाण्याचे निव्वळ मूल्य नसून हे सापेक्ष मूल्य आहे, म्हणजे वापरानुसार हे मूल्य वेगवेगळे येईल.
व्यवस्थापनासाठी हेच तर महत्त्वाचे आहे. ज्या वापरातून पाण्याला अधिक मूल्य प्राप्त होईल आणि हा वापर उपलब्ध पाण्याच्या प्रमाणात असेल तर पाण्याची टंचाई भासणार नाही. पाण्याच्या उपलब्धतेची आणि वापराची भौतिक आणि आर्थिक मांडणी करण्याच्या पद्धतीला ‘पाण्याचा ताळेबंद’ म्हणतात. जसा ‘आर्थिक ताळेबंद’ म्हणजे उत्पन्न व खर्च यांची मांडणी, तसेच पाण्याची उपलब्धता व वापर यांची शास्त्रीय मांडणी म्हणजे ‘पाण्याचा ताळेबंद’. पाण्याची मांडणी कोटी लिटरमध्ये केली, तर पाण्याचा ‘भौतिक ताळेबंद’ आणि कोटी रुपयांत केली तर ‘आर्थिक ताळेबंद’.
ताळेबंद तयार करण्यासाठी पाऊस, हवामान, भौगोलिक व भूगर्भीय स्थिती, लोकसंख्या, पिके, वापराच्या पद्धती, इत्यादी घटकांचा उपयोग करावा लागतो. या बाबी प्रत्येक गावासाठी आणि शहरासाठी वेगवेगळ्या असतात म्हणून ताळेबंद, पण वेगवेगळा करावा लागतो. पाण्याचा ताळेबंद काढायची पद्धत शास्त्रीय आहे, परंतु त्यामध्ये काही अडचणी आहेत. मुख्यत्वे पाण्याच्या निव्वळ उपलब्धतेताचा हिशेब करण्यासाठी आणि पाण्याच्या विविध वापरांची गरज काढण्यासाठी लागणारी आकडेवारी सहज उपलब्ध होत नाही. असू द्या अडचणी, त्या प्रत्येक बाबतीत असतात. म्हणून काही ताळेबंद करायचा टाळता येणार नाही, अव्यवस्था चालू ठेवता येणार नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पाण्यासाठी महिलांची फरफट किती वर्षे किती पिढ्या चालू द्यायची? किती वर्षे पिण्यास अयोग्य असलेले पाणी बालकांनी प्यायचे? किती वर्ष दूषित पाण्यामुळे बालकांच्या, महिलांच्या आणि वयस्कांच्या आरोग्याशी तडजोड करायची? किती वर्षे नागरिकांनी पाण्यासाठी खस्ता खायच्या? किती वर्ष शुद्धीकरण केलेले पाणी गाड्या धुण्यासाठी वापरायचे? याला कधी तरी आपण गांभीर्याने पाहणार आहोत की नाही? पाण्याचा स्थूल अथवा ढोबळ ताळेबंद तयार करून पाण्याचे पाळण्यातले पाय पाहायलाच पाहिजेत, तेव्हाच समजेल ते कसे आहेत. आणि मग, त्याच्या क्षमतेनुसार त्याच्यावर किती भार टाकायचा ते ठरवता येईल.
शासनाचे चुकते तसे नागरिकांचे पण चुकते. पाण्याची टंचाई अनुभवत असूनसुद्धा नागरिक पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात कमी पडतात. पाण्याचे संवर्धन नाही, पुनर्भरण नाही, पाण्याचा क्षमतेनुसार वापर नाही, पाण्याची बचत किंवा पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न नाहीत. पाणी चंचल आहे, पाऊस दोलायमान आहे, हे सगळे आपण अनुभवत आहोत, पण त्याची मांडणी नाही म्हणून पाण्याचे आपल्याला मोल नाही. प्रत्येक गावाचा व शहराचा ‘पाण्याचा ताळेबंद’ तयार करून ‘पाळण्यातले पाय’ ओळखणे व क्षमतेनुसार व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून वेळीच पाऊले उचलली पाहिजेत.
..................................................................................................................................................................
लेखक जयंत पाटील पाणीप्रश्नाचे अभ्यासक आहेत.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment