अजूनकाही
९०वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी रोजी डोंबिवली इथं भरलं. ते संपून आता दोन दिवस उलटून गेलेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्याविषयी काहीशी आरडाओरड, नापसंती आणि थोडाफार तिटकारा मराठी साहित्यिकांमध्ये व साहित्यप्रेमींमध्ये दिसू लागला होता. त्यामागे अनेक कारणं होती. त्यापैकी पहिलं म्हणजे, या संमेलनात राजकीय नेत्यांची भाऊगर्दी होणार हे स्पष्ट झालं होतं. पण संमेलनाच्या उदघाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटनाला राज ठाकरे हे ऐनवेळी आलेच नाहीत. त्यासाठी महानगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम असल्याचं सांगितलं गेलं. दोन, या संमेलनाची गतवर्षी पिंपरी-चिंचवड इथं डी. वाय. पाटील यांच्या कृपाप्रसादाखाली झालेल्या संमेलनाशी तुलना केली जाऊ लागली. कारण हे संमेलन अलीकडच्या संमेलनाच्या तुलनेत साधेपणाने आयोजित केलेलं होतं. तीन, पहिल्या दिवासापासूनच या संमेलनाला फारशी गर्दी होण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट झालं होतं. ते दुर्दैवानं खरं ठरलं. चार, संमेलनाची कार्यक्रमपत्रिका चार-दोन अपवाद वगळता अतिशय ढिसाळ होती. पाच, उदघाटनाचे दोन राजकीय पाहुणे आले नाहीत. त्यामुळे एकंदर संमेलनालाही नाट लागला. कारण नंतरच्या अनेक कार्यक्रमांचे नियोजित वक्ते ऐनवेळी आलेच नाहीत. त्यासाठी कारणं दिली गेली की, आयोजकांनी परस्पर आमची नावं टाकली, आधी आम्हाला विचारलं नाही. ज्यांना विचारलं गेलं त्यांनाही ऐनवेळी विचारलं गेलं. त्यामुळे त्यातील काहीजण नाराज होते. ज्यांना बोलावलं त्यातील बरेचसे सुमार म्हणावेत इतके सामान्य वकुबाचे होते. पाच, संमेलनाची सजावट आकर्षक असली तरी ढोबळ होती. नियोजन तर गलथान म्हणावं असंच होतं. सहा, संमेलनाची सुरक्षाव्यवस्था अतिशय भोंगळ होती. अति अति महत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेली आसनं, पत्रकारांसाठी राखीव असलेली आसनं यावर कुणीही पासाशिवाय जाऊन बसत होतं. एखाद्याने ग्रीन रूमपर्यंत जायचं ठरवलं तरी त्याला सहज जाता येत होतं. सात, या संमेलनासाठी श्रीपाल सबनीस वगळता माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक यांना बहुधा निमंत्रणंच दिलेली नव्हती. कारण संमेलनात त्यांची मोठ्या प्रमाणावर उणीव भासत होती. आठ, या संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी निवडून आल्यापासून कुठलंही वादग्रस्त विधान केलं नाही. आयोजकांनीही कुठलाही वाद निर्माण केला नाही. आणि इतरही कुणी संमेलनाध्यक्ष, आयोजक यांच्यावर कुठलेही आरोप करून वादांचा धुरळा उडवण्याचा प्रकार केला नाही.
त्यामुळे दरवर्षी संमेलनाच्या दोन महिने आधीपासून त्याविषयीच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून यायला सुरुवात होऊन संमेलनाचा गाजावाजा होतो, तसं काहीही झालं नाही. हल्ली कुठल्याही वादंगाशिवाय प्रसारमाध्यमं दखल घेत नाहीत. सकारात्मक गोष्टींना बातमीमूल्य राहिलेलं नसल्यानं संमेलनाची तयारी, संमेलनाध्यक्षांची मुलाखत, त्यांच्याविषयीचे लेख यांनाही प्रसारमाध्यमांमध्ये फारसं स्थान मिळालं नाही. अगदी सुरुवातीला स्वागताध्यक्ष कोण होणार यावरून वाद रंगण्याची चिन्हं होती, पण तो वादही लवकरच शमला.
या सर्व कारणांमुळे या संमेलनाचा गाजावाजा झाला नाही. आयोजकांनीही आपण संमेलन भरवत आहोत, ते कसं भव्यदिव्य असेल, याचा डिंडिम वाजवला नाही. त्यामुळे ना प्रसारमाध्यमांमधून या संमेलनाविषयी वातावरण तयार झालं, ना आयोजक संस्था, आगरी युथ फोरमने डोंबिवली-कल्याण शहरात त्याची जाहिरात केली. खरं तर ज्या गावात संमेलन होतं, तिथं त्याचा बराच प्रसार होतो. पण संमेलन सुरू झाल्यानंतरही डोंबिवलीतल्या बहुतांश लोकांना आणि रिक्षावाल्यांना साहित्य संमेलन नावाची गोष्ट आपल्या शहरात होते आहे, याची साधी गंधवार्ताही नव्हती.
आगरी युथ फोरमने तर संमेलन सुरू झाल्यानंतर शहरात काही ठिकाणी फ्लेक्स लावले. तेही अशा ठिकाणी आणि अशा आकाराचे लावले की, सहजासहजी कुणाला दिसू नयेत. एरवी आयोजक संस्थेला स्वत:ची जाहिरात करण्याची, एवढंच नव्हे तर स्वत:चा नको तेवढा डिंडिम वाजवण्याची संधी साहित्य संमेलन देत असतं. पण त्या संधीचा आगरी युथ फोरमने फारसा फायदा करून घेतला नाही.
आगरी युथ फोरमने आपल्या परीनं संमेलन व्यवस्थित पार पडेल यासाठी पुरेपूर प्रयत्न केले असले तरी त्यांना या संमेलनाचं शिवधनुष्य पेललं नाही, हीच गोष्ट सत्य आहे. त्याचीही काही कारणं आहेत. एक, महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यात सर्व राजकीय पक्ष गुंतून पडले आहेत. शिवाय कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सेना-भाजपची सत्ता आहे. त्यांनी संमेलन तोंडावर आलेलं असताना महानगरपालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा तोटा संमेलनाला झाला. शिवाय निवडणुकांमुळे या संमेलनासाठी राजकीय पक्षांकडून जो निधी मिळायला हवा होता तोही मिळाला नाही. आगरी युथ फोरमने संमेलनाचं बजेट पाच कोटींचं ठरवलं होतं. पण त्यांना जेमतेम दीड कोटी रुपये उभे करता आले. नोटाबंदीचे दुष्परिणाम अजूनही पुरते संपलेले नसल्याने त्याचाही परिणाम निधी संकलनावर झाला.
या सगळ्या कारणांमुळे या ९०व्या साहित्य संमेलनाचा फ्लॉप शो झाला, असं म्हणायला हरकत नाही!
‘डोंबिवली ही मुंबईतील सदाशिव पेठ आहे’, ‘सांस्कृतिक शहर आहे’, या प्रकारच्या उपमांचा उल्लेख अनेकदा केला जातो. डोंबिवलीतील उच्चवर्णीय सनातनी ब्राह्मणांच्या प्राबल्याचीही ग्वाही अनेक जण देत असतात. त्यामुळे डोंबिवलीची हीच ओळख या संमेलनाला नडली, अशी चर्चा पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली होती. कारण हे संमेलन आगरी युथ फोरम या संस्थेने आयोजित केलं होतं. ही संस्था दरवर्षी डोंबिवली शहरात खाद्य महोत्सव भरवते, इतरही काही सांस्कृतिक कार्यक्रम करते. पण म्हणून या संस्थेनं आणि डोंबिवलीतील आगरी समाजानं थेट मराठी साहित्यावर हक्क सांगावा, थेट साहित्य संमेलनच आयोजित करावं? तेही डोंबिवलीसारख्या ‘नमस्ते सदा वत्सले’ म्हणणाऱ्यांच्या शहरात? याचा मनस्वी राग या उच्चवर्णीय ब्राह्मणांना आला आणि त्यांनी या संमेलनावर जाणूनबुजून बहिष्कार टाकला, अशी चर्चा संमेलनाच्या पहिल्या दिवसापासूनच दबक्या आवाजात सुरू झाली होती.
ही चर्चा केवळ पत्रकार करत होते असं नाही. त्यात काही डी-कास्ट झाल्याचा दावा करणारे डोंबिवलीकर होते, तथाकथित पुरोगामी होते, एकंदर संमेलनसंस्कृतीचा दुस्वास करणारे पण दरवर्षी संमेलनाला हजेरी लावणारे होते आणि डोंबिवलीविषयी अकारण तिटकारा असणारेही होते. या मंडळींचा असा दावा होता की, आगऱ्यांना साहित्यातलं काय कळतं? त्यात त्यांनी साहित्य संमेलन भरवलं ही गोष्ट डोंबिवलीतील उच्चवर्णीय ब्राह्मणांना एत्किंचितही आवडलेली नाही. आमची मक्तेदारी असलेलं संमेलन हे साहित्याचा गंधही नसलेले लोक कसं काय भरवू शकतात, या त्राग्यातून या मंडळींनी संमेलनावर एकजुटीनं बहिष्कार टाकला. त्यामुळे या संमेलनाला फारशी गर्दी झाली नाही.
हा दावा खरा मानायचा तर मग आगरी युथ फोरम दरवर्षी जो खाद्य महोत्सव भरवतं, त्याच्यावरही डोंबिवलीतील उच्चवर्णीय ब्राह्मणांनी बहिष्कार टाकायला हवा होता. पण हे तर तिथं जाऊन भरपेट मासे खातात, माश्यांच्या चटण्या, लोणची घेऊन येतात. पुन्हा पुन्हा जातात आणि ढेकर येईपर्यंत चापतात. हे कसं काय? त्याचा प्रतिवाद असा केला जाऊ शकतो की, खाद्य महोत्सव ही वेगळी गोष्ट आहे आणि साहित्य संमेलन ही वेगळी गोष्ट आहे. आगरी लोकांचा खाद्य महोत्सव ही खास त्यांची ओळख आहे आणि साहित्य संमेलन ही खास उच्चवर्णीय ब्राह्मणांची. आता असं संमेलन आगऱ्यांनी पळवलं तर काय करणार ‘नमस्ते सदा वत्सले’वाले? त्यांनी सरळ बहिष्कारच टाकला.
कदाचित याच न्यायाने या संमेलनाकडे माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ आणि मान्यवर साहित्यिक यांनीही पाठ फिरवली असावी. कदाचित याच निकषावर सामान्य साहित्यप्रेमींनीही या संमेलनाला जाण्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत वीकेंड साजरा करण्याला प्राधान्य दिलं असावं.
आगऱ्यांनी साहित्य संमेलन भरवले म्हणून उच्चवर्णीय ब्राह्मणांनी त्यावर बहिष्कार टाकला? खरोखरच असं घडलं का? डोंबिवलीतील काही सुजाण नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाही, ‘या आक्षेपात काही तथ्य नाही. आगऱ्यांचा इतका दुस्वास करावा इतका काही कडवटपणा या दोन समाजात नाही.’ त्यांनी महानगरपालिकांच्या निवडणुका हेच मुख्य कारण असल्याचं सांगितलं. पण त्यामुळे आगरी युथ फोरमला पुरेसा निधी उभा करता आला नाही. त्याचा आणि गर्दीचा काही संबंध असायचं कारण नाही. त्यासाठी जाहिरातीचं कारण पुढे केलं जातं. त्यात काही प्रमाणात नक्कीच तथ्य वाटतं. चार-दोन वाद झाल्याशिवाय साहित्य संमेलनाची जाहिरात होत नाही आणि संमेलनाच्या वातावरणनिर्मितीमध्ये रंगही भरले जात नाहीत.
परिणामी हे संमेलन वादाशिवाय झाल्याने ते गर्दीशिवाय पार पडलं. गर्दी जमवायची असेल तर वादांचा धुरळा उडवावाच लागतो. कारण त्या धुरळ्यात अनेकांना आपले हात माखून घेता येतात. काहींना आपले हिशोब पूर्ण करता येतात. तर काही त्या धुरळ्यालाच अबीर-गुलाल समजून स्वत:ला मिरवून घेतात. पण धुरळा उडवलाच गेला नाही. परिणामी अनेकांची खोटी झाली. दुसरं असं की, या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका, त्यांचे विषय आणि त्यात सहभागी झालेले बहुतांशी साहित्यिक हे सामान्य वकुबाचे म्हणावे असे होते. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका ठरवण्याचं काम साहित्य महामंडळ करत असलं तरी त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी आयोजक संस्थाच करत असते. आगरी युथ फोरमने महामंडळाच्या कार्यक्रमपत्रिकेचे तीन तेरा वाजवल्याचे अनेक अनुपस्थित मान्यवरांमुळे सिद्ध झालेच आहे. शिवाय स्थानिक साहित्यिकांना संधी या नावाखाली ज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला गेला, त्यांच्यासाठी कुणी का म्हणून संमेलनाला जावं? चेतन भगत, अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान यांसारख्या सेलिब्रेटींना बोलावलं असतं तर कदाचित काहींना तेवढ्यापुरता आपला आळस झटकला असता किंवा आपला बहिष्कार आवरता घेतला असता.
आगरी युथ फोरमला साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी सुचवल्याचं सांगितलं गेलं. त्याला या संस्थेनं होकार दिला, पण नंतर पाटील यांच्याकडून कुठल्याच प्रकारचं मार्गदर्शन घेतलं नसावं. कारण या आयोजक संस्थेचे जे सल्लागार कम मार्गदर्शक कम कार्यकर्ते होते, तेही सामान्य वकुबाचे म्हणावेत असेच होते. आता सामान्य वकुबाच्या लोकांकडून प्रथम दर्जाचं काम कसं होणार?
‘त्यांनी पदर ओढला म्हणून तिने पातळ सोडलं, खरा प्रकार एवढाच झाला’ अशी एक विंदा करंदीकर यांची विरुपिका आहे. आगरी विरुद्ध उच्चवर्णीय ब्राह्मण वादामुळे हे संमेलन फ्लॉप झाले असेल तर विंदांची कविता केवळ आणीबाणीच्या काळालाच उद्देशून लिहिली होती, असं म्हणता येणार नाही.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Saarang
Fri , 10 February 2017
:-D
Nivedita Deo
Thu , 09 February 2017
khoop chan lihilele ahe
Praveen Bardapurkar
Wed , 08 February 2017
हे काही पटलं नाही बुवा ! यात काही तरी वेगळा अजेंडा असल्याचा वास येतोय .
Tejas Kulkarni
Wed , 08 February 2017
टूकार आणि तथ्यहीन लेख. कुठलीही गोष्ट नकारात्मक भावाने पाहण्याची खोड आहे.
Mahesh Puranik
Wed , 08 February 2017
‘अक्षरनामा’वर नेहमीच मतभेदांचं स्वागत केलं जाईल, फक्त त्यामागे सद्हेतू असावा; व्यक्ती, संस्था, पक्ष, वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा व्यापक समाजहित असावं. आधुनिक जगात सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांवर भारतीय राज्यघटना उभी आहे. या मूल्यांचं आपल्या परीनं रक्षण करणं हे ‘अक्षरनामा’चंही धोरण असेल. *** संपादक साहेब, तुम्ही तुमच्या पोर्टलविषयी वरील शब्दात माहिती दिलीय. पण आपल्या या लेखातून आपण फक्त द्वेष आणि द्वेषचं पसरवण्याचे महत्कार्य करत आहात. दुसरी गोष्ट, नेहमी साडेतीन टक्के म्हणून म्हटल्या जाणाऱ्या ब्राह्मणांनी संमेलन यशस्वी होऊ दिले नाही, असे म्हणणे म्हणजे गणिताचा आणि आपला छत्तीसचा आकडा असावा याची खात्रीच पटवून देणारे विधान आहे. पुन्हा संमेलन यशस्वी होण्यासाठी वाद झाला नाही, असे तुम्ही म्हटलेय. यातून तुमची वैचारिक दिवाळखोरी, आणि लेखनाचा वकूब लक्षात आला. आणखी एक गोष्ट म्हणजे वादाशिवाय प्रसिद्धी नाही हा आपला आवडता सिद्धांत असावा आणि याचे पालन आपण प्रसिद्ध केलेल्या लेखातून केल्याचे स्पष्ट होते. वादग्रस्त लेखन करून आपल्या वेबपोर्टलला जास्तीतजास्त लोकांनी वाचावे, हिट्स मिळाव्यात अशी तुमची इच्छा असल्याचे कळते. यावरून तुम्ही सकस-सकारात्मक विचारही करू शकत नाहीत आणि तसे लेखनही करू शकत नाहीत असे म्हटले तर काही वावगे ठरू नये.
Vibha Bidve
Wed , 08 February 2017
कुठले वाद झाले नाहीत म्हणून हा वाद उकरून काढलात का? काहीही लॉजिक, काहीही द्वेष... ह्यामुळे अक्षरनामाला प्रसिद्धी मिळावी असा उद्देश सरळ दिसतोय. अशा छिद्रान्वेषी वृत्तीने फार काही साध्य होईल असं वाटत नाही.
Parth Kapole
Wed , 08 February 2017
शिवाय एकूणच लेख बघता लेखक अतिशय सामान्य वकुबाचा आणि बौद्धिक दिवाळखोर असल्याचे जाणवते
Parth Kapole
Wed , 08 February 2017
असे लेख लिहून आपण जातीय द्वेषास हातभार लावत आहोत, याची थोडी तरी लाज बाळगावी लेखकाने
Parth Kapole
Wed , 08 February 2017
असे लेख लिहून आपण जातीय द्वेषास हातभार लावत आहोत, याची थोडी तरी लाज बाळगावी लेखकाने
ADITYA KORDE
Wed , 08 February 2017
write clearly sir, what do you want to say. Do you think that it was a flop show because brahmins boycoted it ? Are brahmins that united? was there any call from any organization like rss (you coose to call them "नमस्ते सदा वत्सले’ म्हणणाऱ्यांच्या ") Is there any proof or is it just filth in your mind.....?
Parth Kapole
Wed , 08 February 2017
अतिशय टुकार आणि दर्जाहीन लेखन. कोणतेही संदर्भ नाहीत, अपुरी माहिती आणि लेखकाच्या मनात असलेला जातीय द्वेष लेखात उतरलाय...