अडचणी, संकटं, दुर्दैव हे कुणालाच चुकत नसतं. पण त्यामुळे साचलेपण येत गेलं की, लढाई हरते. आणि हसत गेलं की, मार्ग दिसतात...
संकीर्ण - ललित
जयंत राळेरासकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 20 March 2021
  • संकीण ललित करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

चीनमधील वूहान शहरात जन्मलेला नावाचा विषाणू जगभर थैमान घालणार आहे, याची तशी काहीच कल्पना नव्हती. सुरुवातीला काही बातम्या येत होत्या, पण त्याकडे फारसं बारकाईनं बघितलं गेलं नाही. त्या वेळी नोंदी करून ठेवायला हव्या होत्या, हे लक्षात आलं नाही, याचं आज वाईट वाटतं. म्हणजे ही लिहिण्याची चूस म्हणून नव्हे, पण अनेक बरे-वाईट विचार नंतरच्या काळात आले. पण आपण ते सगळे कसे डिलीट केले? आज आपल्या वृत्तीचा तो एक ग्राफ बनून राहिला आहे...

१६ मार्च २०२० रोजी आमच्या नातवाचा, राहीलचा तिसरा वाढदिवस होता. १२ मार्च रोजी इंद्रायणी एक्स्प्रेसनं पुण्याला जायचं नक्की झालं होतं. रेल्वे रिझर्वेशनसुद्धा झालं होतं. राहीलसाठी काही गिफ्ट आणावं म्हणून गावात गेलो. काहीतरी चुकतं आहे, हे सतत जाणवत होतं, कारण चेहरे न दिसता मास्क फक्त दिसू लागले. मनात एक धास्ती निर्माण झाली. कशीबशी खरेदी आटोपून घरी निघालो. वाटेत प्रमोद भेटला. म्हणाला, “आम्ही पण जाणार होतो, पण रहित केलं. हे बघ आत्ताच तिकीट कन्सल केलं.” त्याचं ऐकून घरी पोहोचलो. गाडी अंगणात लावेपर्यंत सौ. आल्या. म्हणाल्या, “अहो, रौनकचा फोन होता. ‘पुण्यात खूप केसेस होत आहेत. तुम्ही शक्यतो रहित करा’ म्हणाला.”

करोनाचा हा पहिला दणका होता. मन खूप खट्टू झालं. भरलेल्या सगळ्या बॅग्ज बाजूला ठेवल्या! पण त्या वेळीदेखील करोनाची ही दहशत चार महिने असणार आहे असं वाटलं नव्हतं. साधी काय किंवा सार्वत्रिक काय संकटं पाहिली नव्हती, माहिती नव्हती असं नाही. पण हा आपल्या हक्काला दिलेला दणका होता. एकोणिसाव्या शतकात अखेरीस आलेली प्लेगची साथ वाचनात आली होती. फ्लू, स्वाईन फ्लू पाहिले होते. रेशनचे दिवस आणि काही प्रमाणात का होईना युद्धंही पाहिली होती. करोना मात्र वेगळा आहे...

...

दुर्दम्य इच्छाशक्ती, विज्ञानाचे आव्हान, सोशल डिस्टन्सिंग, विलगीकरण, मास्क हे शब्द आणि वस्तू आता रोज कानावर आदळत होते. रोजच्या गरजेच्या वस्तू आणून ठेवणं ही एक नवीन गरज निर्माण झाली. आणि काही गरजा गुंडाळणंदेखील भाग होतं. हे सगळं सांभाळताना एक समस्या नव्यानं समोर आली. घरी काम करणाऱ्या मावश्यांना आता येऊ नका, असं सांगावं लागणार होतं. इथं मला पहिल्यांदा जाणवलं की, आपण झटकन एखादा निर्णय घेऊ शकत नाही. सगळी कामं घरात करायची हे जरा अवघड वाटलं. पण तो निर्णय घ्यावा लागला. मन जरा खट्टू झालं. गेली कित्येक वर्षं आमच्या घराचा एक घटक म्हणून काम करणाऱ्यांना तसं सांगण्याचा उद्धटपणा करावा लागला. ‘तुम्ही म्हनताल तसं...’ असं मावशी म्हणाल्या, पण त्यांची निराशा कळत होती. इलाज कुणाचाच नव्हता. घरातली सगळी कामं दोघांनी वाटून घेतली.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

२४ मार्चच्या लॉकडाऊनने पुढच्या दिवसांची चुणूक दाखवली होती. कुणी येणं नाही आणि कुणाकडे जाणं नाही. काही दिवसांपूर्वी आमचा परिसर, ग्रीन झोनमध्ये होता. आता तो झपाट्यानं रेड झोनमध्ये गेला. क्षणभर वाटलं... आपली जीवनशैलीदेखील ‘ग्रीन’ होती, अचानक ती ‘रेड’ कशी झाली?

...

ही तशी जरा नंतर घडलेली दुर्दैवी घटना आहे. आपल्या ओळखीत अशी काही घटना घडू शकते, हे खूप भयावह वाटतं. अगदी अंतर्मन ढवळून टाकणारी ही गोष्ट माझ्या माहितीतल्या एका अशाच वहिनींच्या बाबतीत घडली. टुकीनं संसार करणाऱ्या सुधीर आणि सुलभावहिनी. संसार तसा ओढग्रस्तीचा होता. सुलभावहिनींना त्या रात्री बरं वाटेना म्हणून ते जवळच्या एका डॉक्टरकडे गेले. कदाचित करोना तर नाही ना या विचारानं ते दोघं अस्वस्थ झाले. काही फोन केले, पण तशा त्या परिस्थितीत येणार कोण? सुधीरची खूप पळापळ झाली. अनेक फोन झाले. इकडे सुलभावहिनी सिरिअस होत गेल्या. अखेर एका प्रतिष्ठित व्यक्तीनं त्यांना अम्ब्युलन्स मिळवून दिली. दुर्दैवाचे दशावतार इथून सुरू झाले. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनसुद्धा कुणी त्यांना दाखल करून घ्यायला तयार नव्हतं. सुधीरचं धाबं दणाणलं. रात्री एकदीडचा सुमार असावा, सिव्हीलमध्ये त्यांना मृत घोषित केलं गेलं. अवघ्या अर्ध्या दिवसाचा हा सगळा प्रवास. धडपड आणि हाती काही नाही असा!  अम्बुलन्समध्ये त्या गेलेल्याच होत्या, असं तो ड्रायवर म्हणतो. आम्ही हे सर्व वृत्तपत्रांतून वाचलं. आणि पराधीन आयुष्याचा हा किस्सा नोंद करून ठेवला. सुलभाच्या अंत्यविधीला सुधीरसोबत कुणीही नव्हतं असं लोक बोलतात. सर्वच आपण दोषी आहोत, पण तरीही दोष कुणालाच देता येत नाही!

पीक आलंय नुसतं बातम्यांचं. सगळ्या बातम्या पोकळ. त्या वृत्तवाहिन्यांवरील बातम्या ऐकणं ही तर एक शिक्षाच झाली आहे. कोणी एक नट. त्याने आत्महत्या केली. त्यांच्या बर्या-वाईट आयुष्याचं किती चर्वण करायचं? आणि ती कोण हातात माईक घेऊन मिरवणारी मुलगी, आणि कमेरा घेऊन सज्ज तिचा सहकारी. माईक नाचवत विचारत होती, “सुशांतचे वडील आहेत ना आत? ते बाहेर का नाही येत? “त्या दोघा महाभागांना त्यांचा बाईट हवा होता. या बातम्या? अशाच बातम्या देणाऱ्या एका बाईला करोना झाला. मग त्यांची यशोगाथा... करोनावर विजय मिळवल्याची. त्यांचा एक अखंड एपिसोडच झाला. म्हणे आवडतं लोकांना. खरंच तसं असावं? आम्ही इतके बधीर झालो आहोत? आमच्या सगळ्या संवेदना संपल्या आहेत काय? परदु:ख शीतल असतं असं म्हणतात. कालपरवा अवतरलेला हा करोना कुणाचा आणि कसला निरोप घेऊन आलाय?

...

वेळ मिळाल्यावर करू म्हणून बाजूला ठेवलेली कित्येक कामं आठवली. इतका अमाप वेळ असूनदेखील ऊर्मी मात्र येत नाही. असं का होत असावं? वारेमाप जमवलेल्या रेकॉर्ड्स असाच साद घालत आहेत. दोन-तीनशे रेकॉर्ड तर अजून ऐकल्यादेखील नव्हत्या. कित्येक दुर्मीळ लेबल्स, गाणी आणि कित्येक आठवणी! वाटलं म्हणून ग्रामोफोन मात्र चकचकीत करून ठेवला. पिनांची डबी पण काढली, पण रेकॉर्ड्सपर्यंत जायला मन काही होईना. दुपार मग तशीच लोळत काढली. आठवणींचा फक्त पिंगा. वांझोटा.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तीच गोष्ट पुस्तकांची. वाचू कधीतरी म्हणून बाजूला ठेवलेली सहा पुस्तकं मिळाली. पुस्तकांचं जग जरा लांब चाललंय. हा परिणाम वयाचा का करोनाचा? आठवलं, एक काळ असा होता, मनाला भिडलेलं पुस्तक शेवटाला आलं की, एक हुरहूर वाटायची. पुस्तक छातीवर पालथं ठेवून सगळा एकजिनसी अनुभव घेत किती वेळ आपण खिडकी बाहेर बघत निवांत पडायचो. आता ते भारलेपण कुठं हरवलं आहे? करोनाच्या या सततच्या ताणामुळे ‘सेंटी’ होतोय का आपण? ‘अब वो जमाना नही’ असं काही सगळं संपल्याची भावना मनात येत आहे. नकोय. तसं काही होऊ नये! म्हणूनच एखादं सुंदर पुस्तक... कधी वसंतराव यांचा मारवा! तिथंसुद्धा हुरहूर आहेच, पण ती वेगळी!!

...

रविवार लोळून काढणाऱ्या मंडळींना अधिक रविवार बहाल केले तरी त्याचा फारसा उपयोग नसतो! तुम्ही अस्वस्थच असलं पाहिजे असं काही नाही. पण किमान संवेदन जागं पाहिजे हे मात्र खरं. (अरे वा, आज जरा वेगळंच फिलिंग येतंय का?) अगदी खरं तर करोनाचा पहिला लॉकडाऊन दणका बसला, त्या वेळी कुठे आपण इतके सिरिअस होतो? अरे, ही तर एक domestic picnic आहे, असंच तर वाटलं होतं. स्वैपाकघरात जरा लक्ष घालून आपणदेखील किती गमती केल्या होत्या. काळजी मात्र वाटली होती, ती परगावी असलेल्या मुलांची. त्यांचं ते work from home प्रकरण जरा विनोदीच वाटलं. मग काही व्हिडिअो कॉल्स पण झाले. मात्र ते नातवंडं दिसावी म्हणून. आली... मजा आली पण त्यात स्पर्शाची पालवी नव्हती. युरोपियन, अमेरिकन मंडळींनी हस्तांदोलन न करता नमस्कार (श्रेष्ठ परंपरा ती हीच की!) केलं आणि मनात बरं वाटलं होतं. ती काळाची गरज होती इतकंच. नात आजीच्या कुशीत झोपते आपल्याकडे. जन्मापासून केलेलं विलगीकरण नसतं आपल्याकडे...

किती विनोद आहे पहा! टप्प्याटप्यानं सवलती दिल्या आणि आपण त्यातून बाहेरदेखील पडलो. जणू करोना संपलाच आहे. समुदायात असलो की, आपण वेगळेच वागतो. मान्य आहे की, आपण सगळेच जाम वैतागलो आहोत. करोनामुळे नाही हा वैताग. तो या बंधनाचा आहे. पण यापेक्षा अधिक काळजी आहे हातावर पोट असणाऱ्या मित्रांची. शिवाय आर्थिक चक्र वगैरे प्रकार आहेतच. कसं नाकारायचं ते? पण मग या सवलती सुरू केल्या, त्याचे अर्थ आपण समजून घेतलेच नाहीत काय? ही एक सार्वत्रिक बेपर्वाई दिसतेय, तिचा अर्थ कसा लावायचा हा प्रश्नच आहे. मन पुन्हा धास्तावलं. ते एकटं पडण्याच्या भीतीचं आहे. विलगीकरण या प्रक्रियेची ती भीती आहे.

मागे एकदा आवाहन केलं गेलं आणि आम्ही टाळ्या, थाळ्या वाजवल्या. आपणसुद्धा झालोच की सामील. चहूबाजूनं एक नाद ऐकू आला. लहान मुलांनी तर तो एक खेळच करून टाकला होता. नंतर एकदा अंधार करून दीप लावण्याचं आवाहन केलं गेलं. आम्ही तेसुद्धा केलं. श्रद्धा म्हणून नसेल कदाचित, पण आपण एकटे नाहीत, संपूर्ण देश या संकटात आहे, याचं भान आलं. विज्ञानाच्या चौकटीत यातलं काहीच नव्हतं. पण ती एक सार्वत्रिक ऊर्जा होती. नकळत एक दिलासा देऊन जाणारी. चौथ्या लॉकडाऊन नंतर आज ते सर्व विस्मरणात गेलं आहे. राहिली आहे ती फक्त भीती. आणि बोचत असलेली गैरसोय..

...

करोनावर औषध नाही आणि संसर्ग खूप जलद होतो आहे. जगातले सर्व देश त्याला बळी पडले आहेत. लाखो लोक मरत आहेत. भीती ही आहे आणि गैरसोय आहे बंधनांची. करोनाचं नेमकेपण सांगणाऱ्या हजारो पोस्ट रोज वाचायला मिळतात, पण खरं काहीच समजत नाही. गेल्या आठवड्यापासून अधिकृत शासकीय माहितीदेखील बंद झाली आहे. अनेक ठिकाणी सुट्टीसाठी आजी-आजोबांकडे आलेली नातवंडं अडकली. फिरतीवर गेलेला नवरा कुठल्या तरी हॉटेलात जायबंदी झालाय. उपहारगृहांचा डोलारा कोसळून गेला. कुठल्यातरी दूर ठिकाणाहून आलेला हॉटेलचा कर्मचारी बिनकामाचा झालाय आणि बायका-पोरांच्या आठवणीत व्याकूळ झालाय. अनेक विवाह-सोहळे रद्द झाले. किती प्रकार सांगायचे? मन गुंतावं म्हणून तंबाखूची चिमुटसुद्धा मिळेना. सुनसान रस्ते आणि दहशतीचा माहोल हेच वास्तव उरलं.

पूर्वीसुद्धा जगत होतोच की! प्रदूषित हवेत, जीवघेण्या रहदारीत का होईना. पण आज वाटतं की, तसल्या त्या जगण्यातदेखील एक प्रवाहीपणा होता. डे केअरमधून मुलाला घेऊन घरी जायचं म्हणून घाईत जाणारी आई... किमान एक प्रयोजन होतं तिला. हे सगळं संपलं आहे. म्हाताऱ्या एकटेपणाला दिलासा देणारी संध्याकाळ आणि ती मंदिरंसुद्धा बंद झाली. घटकाभर होणारी करमणूक संपली. एकंदरीत आयुष्याचा सगळा वेग थांबला..

आज मी एका अविश्वसनीय घटनेची नोंद करतो आहे. माणूस माणसालाच किती पारखा झाला आहे, हे पाहून खरं तर, ऐकून खूप वाईट वाटलं. दिवाकर माझ्या ओळखीतला, खरं तर, नात्यातलाच. मुंबईत एकटा राहतो. पायात किंचित अधू. त्याच्यावर आलेला हा प्रसंग. लॉकडाऊनमुळे त्याच्याकडे कामावर येणारी बाई आता येऊ शकणार नव्हती. सर्वांत मोठा प्रश्न होता तो त्याच्या जेवणाचा. आयुष्यात भाजी पोळी सोडा, पण कुकर लावण्याची माहितीदेखील नसलेला दिवाकर एकदम हवालदिल झाला! शेजारच्या कुटुंबाला त्यानं मदतीची विनंती केली. पण त्यांनी स्पष्ट ‘सॉरी’ म्हणून टाकलं. त्यांनी दुसरे कुठले मार्गदेखील सुचवले नाहीत आणि अंग काढून घेतलं. विचारात पडलेल्या दिवाकरने ही कथा सोसायटीच्या वॉचमनला सांगितली. त्याने त्यांच्या डब्याची व्यवस्था केली, पण आता दिवाकर मनानं खूप खचला. दिवाकरचा मुलगा अमेरिकेत आणि मुलगी तिच्या संसारात तिच्या घरी पुण्याला. सगळं काही सुस्थितीत होतं. पत्नीचे कर्करोगानं झालेलं निधन सोडलं तर एरव्ही सगळं ठीकच होतं. पण नशीबाचा हा फेरा अनुभवायचा होता. दिवाकरने स्वत: ही कथा मला फोनवर सांगितली. रडला बिचारा. अशा अनेक घटना घडल्या असतील. नेते मंडळी लॉकडाऊन जाहीर करतात आणि उपाय शोधल्यासारखे बघत बसतात. अगम्य अशा विविध आकड्यांचं गणित वाचत आम्ही उद्याची वाट पाहत राहतो. दिवाकरसारख्या शेकडो घटना कशा कळाव्यात या यंत्रणेला?

...

महाकाय रचना असलेल्या अशाच एका पुण्याच्या उपनगरातल्या त्या आजींची एक कथा अशीच अस्वस्थ करणारी. whatsapp वर आलेली ही कथा एका समंजस गृहिणीनं सांगितलेली. हजारो कुटुंबं वस्तीला असलेल्या या अशा सोसायटीमधून माणुसकी हरवत चालली आहे काय? करोनाचं आक्रमण ते सिद्ध करण्यासाठी तर नाही? गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती त्या आजींची. त्या दिवशी त्यांना अजिबात उठताच येईना, म्हणून त्या आपल्या मुलीचा समजून नेमका चुकीचा नंबर लावत होत्या. आणि पुन्हा पुन्हा तो कर्वेवहिनीना लागत होता. त्यांच्या ते लक्षात आलं. अखेर त्यांनी मार्ग काढला आणि आजींची सोय झाली. त्यांच्या मुलींनी त्यांचे आभार मानले! प्रश्न सुटला. पण कर्वेवहिनीनी अत्यंत समंजसपणे हे हाताळलं म्हणून ठीक. इतक्या मोठ्या सोसायटीमधून काहीच व्यवस्था करता येणं शक्य नाही काय? दिवाकरला वॉचमन भेटला, या आजींना कर्वेवहिनी भेटल्या. पण हा योगायोगाचा प्रश्न! नाहीतर?

...

सगळ्याच जाणीवा बोथट होत आहेत. डोळ्यांना दिसत नाही आणि कानांना ऐकू येत नाही, असं कानकोंडं सगळं वातावरण. आता ही कोण माणसं आहेत! इतकी का गर्दी केली आहे त्यांनी? भीती नाही का वाटत त्यांना? जरा चौकशी केली तर कुणीतरी म्हणाले, हे सर्व परप्रांतीय आहेत. त्यांना काही नकोय. हवं आहे फक्त त्यांचं गाव, त्यांचं घर, त्यांची बायका-मुलं... हजारो लोक पायी चालत आहेत. हाताला काम नसलेले, हातावर पोट असलेली ही माणसं कुठे राहत होती त्या महाकाय मुंबईत? त्या महानगरीनं आज त्यांना घाबरवून टाकलं आहे. हो, हे परप्रांतीय आहेत. आपले कुणीच नाहीत. निदान त्यांचे चेहरे तसंच सांगतात की, ते इथले नाहीत. सकाळी सातच्या आत दुकान उघडून बसणारं ते बिहारी कुटुंब आणि आमच्या फर्निचरला ज्यांची कलाकुसर लाभली आहे, ते राजस्थानी कारागीर आमचे कुणीच नव्हते? ते आज ‘त्यांची’ माणसं हुडकत शेकडो मैल पायी निघाले आहेत. बा करोना! त्यांना सलामत पोहोचू दे रे त्यांच्या माणसांत. निदान एवढं तरी ऐक...

...

सुप्रसिद्ध कवी प्रवीण दशरथ बांदेकर यांचा एक लेख मध्यंतरी वाचनात आला. अंगावर मुंग्या फिरत आहेत असं दृश्य त्यांना दिसलं. (दिसलं का जाणवलं?) मोबाईलच्या प्रकाशात त्यांना दिसलं ते खूपच भयंकर होतं. मुंग्या कुणाची तरी बोटं ओढून नेताना दिसतात. मुंग्यांची प्रचंड रांग. जीव घाबरा होऊन ते स्वत:ची बोटं, डोळे, जीभ चाचपडतात. बापरे! हे माझेच अवयव आहेत की काय? खोलीभर मुंग्याच मुंग्या. ते ओरडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना त्यांचा आवाज सापडत नाही! या अशा भीषण वास्तवाचं (?) हे स्वरूप आणि मनातील या अदृश्य भीतीनं घाबरवून सोडणं आता रोजचंच झालं आहे. उद्या आपल्यावर तशी वेळ आली तर, बायको सगळं सांभाळू शकेल की नाही? बहुदा नाहीच. आणि आपण तरी त्या अनोळखी जागी एकटे काय करणार चौदा दिवस? आणि त्या आवाक्याबाहेर असलेल्या खर्चाचं काय! whatsappवरील एक महर्षी म्हणत होते- गरम पाणी प्या, गुळण्या करा...अंतर ठेवा, बाहेर पडू नका, काढा घ्या, या गोळ्या घ्या...”

करतो रे बाबा! सगळं करतो, पण एक कर... त्या राक्षसाला माझ्या घराचा पत्ता देऊ नकोस! फेसबुक वर काल सहज एक पोस्ट टाकली तर एका मित्रानं संदेश पाठवला - “प्रत्येकानं आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा...” हेही दिवस जातील.”

...

वेळ जात नव्हता म्हणून पुलंवर दूरदर्शननं केलेली एक फिल्म पाहिली आज. “आनंदानं गदगदणारं झाड” इतकंच त्यांचं वर्णन करता येईल. या आनंदयात्रीनं अनेक वळणावर नेहमीच दिलासा दिला आहे, हे खरं आहे, निदान माझ्यापुरतं तरी. हजार कारणांची भेंडोळी घेऊन आपण तसंच साचलेलं आयुष्य जगतो. साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना पुलं म्हणाले होते- “मी माझ्यावर विनोद करतो, आणि वाचक त्याला हसतात. लेखनातील विनोदाला ते हसतात त्या वेळी ते स्वत:वरदेखील हसत असतात. त्या स्वत:वर हसण्यात एक समाधान दडलेलं असतं. अडचणी, संकटं, दुर्दैव हे कुणालाच चुकत नसतं. पण त्यामुळे साचलेपण येत गेलं की, लढाई हरते. आणि हसत गेलं की, मार्ग दिसतात...” आज पुलंचा हा चष्मा सगळ्याना मिळो असं मनोमन वाटतं. कधीतरी हे पुलं मनात झिरपतील असा विश्वास वाटतो! दुसऱ्या दिवशीची सकाळ मग छान उगवते.

आपलं घर म्हणजे नक्की काय असतं... ते कायम घरात बसून कळतं का? शंभर वेळा आपण या ना त्या कारणानं बाहेर पडतो. कधी काही कारणानं, कधी अकारण. तसं जायची आपली एक सवय असते. एटीएमला, हॉलमधील ट्यूब बदलायला, वाचनालयाचं पुस्तक बदलायला, भाजीला, किंवा कट्ट्यावर गप्पा मारायला. पण तितक्या वेळा आपण घरातदेखील येत असतोच की! नेमका हाच  कैफ आपण आता गमावलाय. म्हणजे घरात बसण्याची गंमत हवी, तर बाहेर पडायला हवं हे नक्की.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आणि इथं तर संचारबंदी. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तर नाहीच. आणि म्हणून सगळा हा वैताग. शहरातला प्रत्येक माणूस बाहेर कधी जायचं यावरच बोलतोय. इस शहर में हर शख्स परेशान क्यू हैं? केवळ सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसणाऱ्या त्या करोनाने जगणं हराम करून टाकलंय. आणि ज्यांना घरंच नाहीत त्यांचं काय? लेकराला खांद्यावर घेऊन दोन-तीनशे मैल पायी चालत जाणार्यांची पायपीट त्यांच्या घरानेच चिल्लरमध्ये काढली. ही ब्याद घरात नकोच म्हणून त्यांना चतकोर भाकरीचा तुकडा दिला नाही किंवा त्या लेकराला कपभर दूध नाही मिळालं. आपल्याच माणसांनी हे केलं. त्यांनी मग घर कुठं हुडकायचं? कामाच्या शोधात ही माणसं परत येतील. हाताला काम नसेल तर तोंडाला घास कुठला मिळेल? त्यांच्यासाठी घर म्हणजेच एक चैन आहे असंच दिसतं...

...

मनाचा समतोल आता ढासळला आहे काय? या नोंदी करताना असा भास होतो आहे की, आपण हे कुठेतरी प्रसिद्ध व्हावं म्हणून लिहितोय. तसं असू नये हे कळतंय. सगळ्याच वेदना यात कशा येतील अशानं? एक दिवस वैतागून आपण टीवी बघणंसुद्धा सोडलं होतं. इतकंच नाहीतर काही दिवस तर वर्तमानपत्रसुद्धा बंद केलं होतं. पण ते जाऊ दे. आता सगळ्याचीच सवय झाली आहे. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर आता हेच बरं वाटायला लागलं आहे... कुणी येणं नाही... कुणाकडे जाणं नाही! लॉकडाऊन संपलाय, लोक घराबाहेर पडले आहेत. आपण मात्र! कदाचित असंच राहायचं आहे काय आपल्याला? असेल, तसंही असेल कदाचित...

..................................................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......